My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Monday, November 8, 2021
चर्चेची तेरावी फेरी आणि चीनचा अडेलतट्टूपणा
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
भारत आणि चीन यात सीमारेषेबद्दल वाद असला तरी प्रत्यक्ष ताबारेषा कोणीही ओलांडू नये यासारखी पथ्ये दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागांमध्ये पाळली जावीत, असा करार दोन्ही देशात झालेला आहे, निदान होता तरी. असे असले तरी लडाखमध्ये ताबारेषा ओलांडून चीनने घुसखोरी केलीच. ताबारेषेच्या चिनी बाजूच्या आत असलेल्या मोल्डो येथे हॅाट स्प्रिंग्ज प्रकरणी नुकत्याच पार पडलेल्या, चर्चेच्या 13 व्या फेरीत, यावेळी काहीही निष्पन्न झाले नाही. असे यापूर्वीही अनेकदा झाले आहे. त्यामुळे यावेळी वाटाघाटीत प्रश्न निकाली निघाला नाही म्हणजे वेगळे खूपकाही झाले, असे म्हणता यायचे नाही. पण वेगळेपण यात आहे, की यावेळच्या चर्चेत कटुतेचे, भांडाभांडीचे, संतापाचे जेवढे वातावरण निर्माण झाले, तेवढे यापूर्वी कधीही दिसले नव्हते. याशिवाय जे अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले, तेवढे आणि तसे यापूर्वी कधीही निर्माण झाले नव्हते. तसेच याच सुमारास अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या सीमारेषेवर जी एक नवीन घटना घडली तिचीही नोंद घेणे आवश्यक आहे. या भागातील ताबारेषेवर चिनी सैनिकांनी ताबारेषा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यामुळे दोन्ही देशांचे सैनिक एकमेकासमोर आले आणि त्यांच्यात हाणामारी आणि वादावादी झाली. चुकून गोळीबार झाला आणि संघर्ष पेटला असे होऊ नये म्हणून जुन्या एका करारानुसार दोन्ही बाजूंच्या सैनिकांजवळ शस्त्रे नव्हती, म्हणून बरे. काही वेळाने चिनी सैनिक परत फिरले आणि हा प्रश्न चिघळला नाही. ही समाधानाची बाब असली तरी लडाखमध्ये सैन्ये एकमेकांपासून दूर करण्याबाबत चर्चा आणि त्याच वेळी अरुणाचलात मात्र ‘नो मॅन्स लॅंड’ या प्रवेशनिषिद्ध भागात घुसखोरीचा प्रयत्न ह्या दोन्ही घटना एकाच वेळेस घडाव्यात, हा निव्वळ योगायोग होता, असे म्हणता यायचे नाही. याचवेळी तिकडे दूर तैवानवर चीनच्या लढाऊ विमानांनी दीडशे गस्ती घालाव्यात, हाही योगायोगच म्हणायचा का? एववढेच नव्हे तर याच काळात काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आपली रणनीती बदलून सुरक्षा कर्मचाऱ्यांना, निवडक बिगरमुसलमानांना आणि प्रशासनात सहभागी झालेल्या मुसलमानांनाही ठार करायला सुरवात केली, हाही योगायोग वाटत नाही. पूर्वी हे अतिरेकी सार्वजनिक ठिकाणीच अंदाधुंद गोळीबार करीत आणि पळून जात.
चीनचे घुसखोरीसाठीचे तंत्र
चर्चा करतांना समोरच्याच्या मनात नक्की काय सुरू आहे, हे कळणे आवश्यक असते. चिनी एवढे चलाख आहेत की त्यांच्या मनात काय चालू आहे, याचा ते थांगपत्ता लागू देत नाहीत. हे निरीक्षण आहे, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे! म्हणून चिन्यांचे बोलणे नाही, तर प्रत्यक्ष कृती बघून, भारताने तोडीसतोड भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे चीनची ही चिडचिड असावी, असा अंदाजही नरवणे यांनी व्यक्त केला आहे. चीनची एक विशिष्ट रणनीती असते, असे म्हणतात. हळूच एखाद्या भागात घुसखोरी करायची. विरोध होताच आपणच आकांडतांडव करायचे. दुसऱ्या पक्षाने सौम्य भूमिका घेतली तर ताबारेषा पुढे सरकवून तेवढ्या भागावर ताबा मिळवायचा. भारताला चीनची ही चाल चांगलीच माहीत झाली असल्यामुळे यावेळी भारतीय सैन्यानेही चोख उत्तर दिले आणि चिनी सैनिक परत गेले, पण इशारा देऊनच. अगोदर घुसखोरी करायची, विरोध झाला तरच मागे फिरायचे आणि परत फिरतांना इशारा द्यायचा. नंतर धमक्या द्यायला सुरवात करायची. सैन्याची आणि युद्धसामग्रीची जमवाजमव करून शक्तिप्रदर्शन करायचे, नंतर हल्लाही करायचा पण शेवटी जशासतसे उत्तर मिळाले की मात्र समजुतदारपणाचा आव आणून माघार घ्यायची पण तीही पूर्वस्थितीपर्यंत नाही, थोडे हातचे राखूनच, हे चीनचे ठरीवठशाचे तंत्र झाले आहे.
यावेळी 9 तास बाचाबाचीच चालली होती. चर्चेत सैन्य विलगीकरणाबाबत एक इंचभरही प्रगती झाली नाही आणि गस्त बिंदू क्रमांक 15 पाशी समोरासमोर उभ्या ठाकलेल्या उभयपक्षांच्या तुकड्या हॅाट स्प्रिंग्ज- गोग्रा- कोंग्का ला भागात, आपापल्या जागी तशाच ठाण मांडून कायम आहेत. गस्तबिंदूबाबतच्या या लहानशाच बाबतीत गतिरोध उत्पन्न झाल्यामुळे मुख्य मुद्दा तसाच अनिर्णित राहिला आणि डेमचोक येथील चार्डिंग निंग्लुंग ओहोळ आणि डेपसांग मैदानी प्रदेशातल्या चिन्यांच्या अपेक्षित माघारीवर चर्चाच झाली नाही. याचे एक कारण यावेळी चिनी चमूचा नेता नवीन होता, हे असू शकते. त्याला कदाचित ताठर भूमिका स्वीकारा अशा वरून सूचना असतील किंवा तो नवीन असल्यामुळे त्याचा भर प्रतिपक्षाला जोखण्यावर, प्रतिपक्षावर जरब बसवण्याच्या प्रयत्नावर आणि स्वपक्षीयांवर छाप पाडण्यावरच केंद्रित असणेही शक्य आहे.
या अगोदर झालेल्या चर्चामधील एकवाक्यतेनुसार गलवान खोरे, पॅंगॅांग सरोवराचा उत्तर आणि दक्षिण भाग आणि गोग्रा ठाणे या ठिकाणांहून दोन्ही देशांची सैन्यदले ठरल्याप्रमाणे मागे सरकली आहेत. तसेच यावेळीही ठरणे निदान त्या दृष्टीने वाटचाल होणे अपेक्षित होते. यावेळीही डिसएंगेजमेंट बाबत असेच घडणेही अपेक्षित होते. डिसएंगेजमेंट नंतर या टापूत कोणत्याही देशाच्या सैनिकी तुकड्या तैनात असत नाहीत. फक्त ठरविलेले गस्तबिंदूच अपवाद असतात. या बिंदूंपर्यंत दोघेही येऊजाऊ शकतात. आतापर्यंतचे करार याच अटीवर करण्यात आले आहेत.
भारताकडून जशास तसे
यापूर्वी झालेल्या चर्चेत गस्त बिंदूपर्यंत दोन्ही देशांच्या गस्त तुकड्या ये जा करू शकतील असे आणि एवढेच ठरले असतांना गस्तबिंदूंपर्यंत आपली ताबारेषा वाढविण्याची चलाखी चीनने केली आहे. पॅंगॅांग सरोवराचे बाबतीत तर चीनने ठरलेले गस्त बिंदूच अमान्य केले होते/आहेत. चीनने असे केले नसते तर गलवानचा गेल्यावर्षीचा संघर्ष उद्भवलाच नसता. याशिवाय या भागात चीनने अनेक ठिकाणी स्थायी आणि अस्थायी स्वरुपाचे बांधकाम करून, ताबारेषेत हवा तसा बदल करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, यासाठी तिथे शस्त्रास्त्रे गोळा केली आहेत आणि दळणवळणाच्या सुविधाही उभ्या केल्या आहेत. त्यामुळे भारतानेही आपल्या बाजूने अशाच सुविधा उभारून तोडीसतोड उत्तर दिले आणि त्यामुळे चीनला आपल्या भागातील कारवाया आवरत्या घ्याव्या लागल्या. पण ही बाब चीनच्या वर्मी लागली असून चीनचा चर्चेतील ताठरपणा वाढलेला दिसतो आहे. म्हणूनच लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे आणि नवनियुक्त हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी चीनने आपल्या कुरापती आवरल्या नाहीत तर गंभीर परिणाम होतील असा सज्जड इशारा दिला आहे. म्हणजे आता लष्करीस्तरावर जे करणे आवश्यक होते ते पुरतेपणी साधले असून यापुढे राजकीय पातळीवर जेव्हा चर्चा होईल, तेव्हा चीनला अशीच खडसावण्याची भूमिका भारताला घ्यावी लागणार आहे. दरम्यानच्या काळात ताबारेषा आणि सीमारेषा यातील वेगळेपण पुसण्याचा छुपा हेतू समोर ठेवून चीनने आपल्या संसदेत कायदा पारित करून हा प्रश्न आणखीनच बिकट करून ठेवला आहे.
यावेळी वेगवेगळी पत्रके कडवट भाषेत प्रसारित झाली आहेत. भारताने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, सीमाप्रश्न सामोपचाराने सुटला तर उभय देशातील संबंध सुधारण्याचे दृष्टीने ते एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. या सौम्य पण स्पष्ट बजावणीला चीनकडून उचित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने प्रगतीही होऊ शकली नाही.
चिनी पत्रकात तर भारतावर आरोपच केला आहे. भारताने अवाजवी, अवास्तव आणि अव्यवहार्य मागण्या केल्या आहेत. यामुळे वाटाघाटीत सोडवणुकीचा मार्ग न गवसता अडचणीच निर्माण झाल्या आहेत. आजपर्यंत जेवढी माघार घेतली आहे, तीच खूप समजा, त्यापुढे आता आणखी माघार घेणार नाही, असे उद्धट भावही चीनच्या पत्रकात स्पष्ट दिसत आहेत. घुसखोरीपूर्वी परिस्थिती जशी होती तशीच ती आताही असावी अशी भारताची रास्त अपेक्षा आणि मागणी आहे. ही मागणी जर चीनला अचानक अवाजवी, अवास्तव आणि अव्यवहार्य वाटत असेल तर, याचा अर्थ चीनला प्रश्न चर्चेने सुटावा असे वाटत नाही, असाच होतो. ग्लोबल टाईम्स या चीनच्या अधिकृत मुखपत्रात चिनी नेत्यांच्या चर्चेदरम्यानच्या भूमिकेचीच री ओढलेली आहे.
गेल्याच महिन्यात भारताचे आणि चीनचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि वांग यी यांची फावल्या वेळात चर्चा झाली होती. त्यावेळी शांघाय कोॲापरेशन ॲार्गनायझेशनची परिषद ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे येथे सुरू होती. तेव्हा ताबारेषाप्रश्नी लवकरात लवकर तोडगा काढण्याचे ठरले होते. या सहमतीचा चर्चेवर किंचितही परिणाम झालेला दिसत नाही. वरच्या स्तरावर जे ठरते ते जेव्हा खालच्या स्तरावरील चर्चेत प्रत्यक्षात येत नाही, तेव्हा याची दोन कारणे संभवतात. एक म्हणजे ही भूमिका खालच्या स्तरापर्यंत पोचत नाही किंवा ज्येष्ठ नेत्यांनी एक भूमिका घ्यायची आणि प्रत्यक्ष चर्चेत मात्र बाकीच्यांनी दुसराच राग आळवायचा, असातरी हा प्रकार असला पाहिजे. दुसरीच शक्यता जास्त वाटते.
चीन असा का वागतो?
भारताला संरक्षणावरील खर्च वाढविण्यासाठी चीनने भाग पाडले आहे. कोरोना महामारी, त्यामुळे खुद्द चीनची होत असलेली अनपेक्षित आर्थिक घसरगुंडी, भारतीय जनमानसाच्या आत्मनिर्भरतेच्या धोरणाचा चिनी मालाच्या आयातीवर झालेला परिणाम, चीनमध्ये आज अजूनही टिकून असलेली गरीबी आणि श्रीमंती यातील प्रचंड खाई, बेल्ट ॲंड रोड या आणि अशा अन्य अतिमहत्त्वाकांक्षी प्रकल्पांना येत असलेले अपयश, खुद्द चीनमध्येच वाढीस लागलेला असंतोष यामुळे निदान सध्यातरी एक देश म्हणून चीन किंकर्तव्यमूढ होऊन चेकाळल्यासारखा वागतो आहे. अशा परिस्थितीत निकटचा शेजारी या नात्याने भारताला अतिशय विचारपूर्वक आणि निर्धाराने पावले टाकावी लागतील.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment