My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Monday, February 14, 2022
आभासी चलनविश्वात भारताचाही लवकरच प्रवेश!
प्रति, श्री.संपादक, तरूणभारत , नागपूर
आजच्या महत्त्वाच्या विषयाशी संबंधित सोबतचा लेख प्रसिद्ध करण्याचे बाबतीत योग्य तो निर्णय व्हावा, ही विनंती.
आपला स्नेहाकांक्षी,
वसंत काणे. शुक्रवार, दिनांक11/02/2022
आभासी चलनविश्वात भारताचाही लवकरच प्रवेश!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
आज जगभरात अनेक लोक आभासी चलनावर चर्चा करतांना आढळतात. या विषयाचा आवाका एखाद्या लहानशा लेखात मावणारा तर निश्चितच नाही. पण जो विषय जगभर गाजतो आहे त्याबाबतच्या उपलब्ध माहितीची निदान तोंडओळख करून घ्यायचा प्रयत्न आपल्यासारख्या सामान्यांनीही करायला काय हरकत आहे? बिटकॅाइन या एकाच आभासी चलनाची चर्चा सध्या होताना दिसते आहे. पण या बिटकॅाइनवर किंवा तत्सम अन्य आभासी चलनांवर न नियंत्रण आहे एखाद्या विश्वसनीय नियामक संस्थेचे, न सरकारचे. त्यामुळे होणाऱ्या घोटाळ्यांचा व फसवणुकीचाही बभ्रा जगभर होऊ लागलेला दिसतो आहे. करबुडव्यांनी आणि अतिरेक्यांनीही या पद्धतीने आर्थिक व्यवहार केलेले आढळले. म्हणून सरकारी किंवा अन्य योग्य नियंत्रणांची वेसण घालून आभासी चलन अमलात आणण्याचे धोरण जागतिक स्तरावर ज्या अनेक देशांनी स्वीकारले आहे, त्यात भारतही आहे.
आभासी चलनावर बंदी घालता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी, गैरवापर किंवा बेकायदा व्यवहार टाळण्यासाठी सरसकटबंदी ऐवजी ‘क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल, 2021’ या नावाचे या कूट चलनाचे कायद्याने नियमन करणारे विधेयक संसदेपुढे विचारार्थ ठेवले आहे. आभासी चलनाची संकल्पना आता जगभर एवढ्या वेगाने पसरली आहे की तिचा विचार प्रत्येक देशाला आज ना उद्या करावाच लागणार आहे. रिझर्व्ह बॅंक स्वत: डिजिटल चलन व्यवहारात आणणार असल्यामुळे भारत या प्रश्नाकडे कोणत्या भूमिकेतून पाहतो आहे, हे स्पष्ट होते आहे. त्यामुळे आता आभासी चलनाच्या भारतातील रीतसर, कायदेशीर आणि सुरक्षित प्रवेशाबाबत शंका उरायला नको. तसेच रिझर्व्ह बॅंकेच्या हाताळणीनंतर विश्वसनीयतेचा प्रश्नही सुटणार हेही गृहीत धरायला हवे. रिझर्व्ह बँक ब्लॉकचेन किंवा तत्सम अन्य जागतिक स्तरावरचे तंत्रज्ञान वापरून डिजिटल रुपी प्रसारात आणणार आहे.
ब्लॉकचेन टेक्नॅालॅाजी म्हणजे काय?
समजा की, तुम्हाला एखाद्याला पैसे बॅंकेच्या मध्यस्थीशिवाय आणि एक छदामही बॅंक कमीशन न देता आणि क्षणार्धात पाठवायचे आहेत. किंवा समजा की, तुम्हाला बॅंकेत पैसे ठेवायचे नसून पैसे साठविण्यासाठी संगणक नेटवर्कशी जोडलेली किंवा संगणकाद्वारे उघडता येणारी एक वेगळीच चंची (वॅालेट) हवी आहे आणि यात पैसे साठवायची सोय तुम्हाला हवी आहे. म्हणजेच समजा की, तुम्हाला स्वत:च्याच मालकीची अशी बॅंक हवी आहे की, जिच्यावर फक्त तुमचेच नियंत्रण राहील. म्हणजेच असेही की, पैशाच्या काढघालीवर फक्त संबंधित दोघांचेच नियंत्रण असेल, तिसरा कुणी तिला स्पर्शही करू शकणार नाही, अगदी सरकारसुद्धा, अशी व्यवस्था तुम्हाला हवी आहे. हे बोलणे आज कल्पनाविश्वात राहिलेले नाही. हे साकारण्यासाठी जे विश्वसनीय तंत्रज्ञान वापरले जाते, त्याला ब्लॅाकचेन टेक्नॅालॅाजी असे म्हणतात. यात खाती बॅंकेत नाहीत तर इंटरनेटवर असतील. कमांड देताच तेवढी रक्कम देणाऱ्याच्या खात्यातून वजा झाल्याची आणि घेणाऱ्याच्या खात्यात जमा झाल्याची नोंद होईल. ईमेल अकाऊंट प्रमाणे इंटरनेटवर या दोघांची खाती मात्र असली पाहिजेत. एखाद्याला कागदी नोटांची गरज भासलीच तर त्यासाठी एटीएम सारखी व्यवस्था असेल.
ब्लॅाकचेनचा जनक डेव्हिड चॅाम याने 1982 या वर्षी एक ब्लॅाकचेनसदृश प्रणाली शोधून काढली. तब्बल 9 वर्षांनी 1991 मध्ये स्टुअर्ट हाबर आणि डब्ल्यू स्कॅाट स्टोरमेटाने आपले या विषयाचे संशोधन प्रसिद्ध केले. पण सतोशी नाकामोटो या टोपणनावाने काम करणाऱ्या व्यक्ती किंवा गटाने पहिली ब्लॅाकचेन शोधून काढली आणि बिटकॅाइन या नावाचे पहिले चलन जन्माला आले.
ब्लॅाकचेन टेक्नॅालॅाजी ही एक गूढ स्वरुपाची जादुई कमाल आहे, असे अनेकांना वाटते. तसे पाहिले तर या तंत्रज्ञानाविषयीचे आपले सर्वांचेच ज्ञान बाल्यावस्थेत आहे. पण सर्वच जेव्हा हे तंत्रज्ञान स्वीकारतील आणि सज्ञान होतील तेव्हा ही स्थिती असणार नाही. या तंत्रज्ञानातील गूढता दूर करण्याचा एखादा अल्पसा प्रयत्न सुद्धा म्हणूनच मोलाचा ठरतो. त्यासाठी ब्लॅाकचेनचे कार्य कसे चालते ते समजून घेणे आवश्यक आहे.
डिजिटल करन्सी
सुरवातीला आपण डिजिटल करन्सी किंवा अंकीय चलन म्हणजे काय ते समजून घेऊ. ते आजच्या नोटेपेक्षा किंवा नाण्यापेक्षा वेगळे असते. ही एक अशी संपत्ती आहे की, हिचे व्यवस्थापन म्हणजेच सांभाळ, हिची साठवण आणि हिचा विनीमय संगणकाद्वारे म्हणजेच माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या यंत्रणेद्वारे, म्हणजेच इंटरनेटद्वारे केला जातो. ईमेलद्वारे जसा मजकूर पाठवता येतो, तसे ब्लॅाकचेन वापरून पैसे पाठवता येतात, असे म्हटले तरी सध्या चालण्यासारखे आहे. अशाप्रकारे हे विनीमयाचे एक 24/7(अहोरात्र) चालणारे माध्यम आहे. 500 रुपयापेक्षा कमी किमतीचे व्यवहार रोख स्वरुपात सध्याप्रमाणे सुरू रहायला हरकत असणार नाही. संगणकात माहितीची नोंद ठेवणाऱ्या डाटाबेसद्वारे इंटरनेटवर डिजिटल व्यवहारांची नोंद केली जाते. त्यात अनेक नोंदवह्या (फाईल्स) किंवा तक्ते (स्टोअर्ड व्हॅल्यू कार्ड) असतात. ह्यांचे स्वरूप देवघेवीसाठी तयार केलेल्या खातेवही, खतावणी, पंजिका/ रजिस्टर सारखे असते. यात व्यवहार गुप्त किंवा सांकेतिक भाषेत नोदवलेले जातात. ही नोंद तिहेरी असते. लेजर आणि कॅश बुक किंवा आपल्या पासबुकवरच्या नोंदीसारखी सारखी फक्त दुहेरी नोंद नसते. ही नोंदवही न जार्ण होईल न फाटेल.
नोटा किंवा नाण्यांच्या स्वरुपातील पारंपरिक चलन आणि डिजिटल करन्सी किंवा अंकी चलन यात पुष्कळ साम्य आहे. फक्त इथे नाण्यांच्या स्वरुपात जसा धातूचा गोल तुकडा असतो किंवा नोटांच्या स्वरुपात जसा कागदाचा चौकोनी तुकडा असतो, तसा भौतिक आकार मात्र नसतो. भौतिक आकार नसल्यामुळे इंटरनेटवर क्षणार्धात देवाणघेवाण करता येते. याशिवाय नोटा छापण्याचा आणि नाणी टाकसाळीतून पाडण्याचा खर्च वाचतो, हे वेगळेच. ‘कोन बनेगा करोडपतीमध्ये’ अमिताभ बच्चन फक्त एक बटन दाबतो आणि घोषणा करतो की,’ये 50 रुपयेलाख आपके अकाऊंटपर जमा हुवे’ आणि ते पैसे तसे जमा झाल्याचे हिरव्या रंगातील खुणेवरून आपल्याला लगेच कळते सुद्धा. फोनवरील ॲपचा उपयोग करून बॅंकेतील पैसे पाठविण्याची पद्धतही याच जातकुंळीची आहे. डिजिटल व्यवहार अगदी असेच नाहीत पण यासारखे आहेत. असेच म्हणण्याचे कारण असे की, त्यात बॅंकेची मध्यस्थी नसते. ईमेल पाठवणारा आणि स्वीकारणारा यात जसे फक्त इंटरनेटच तेवढे असते, पोस्ट ॲाफिसची मध्यस्थी नसते, तसेच या व्यवहारात बॅंकेची मध्यस्थी नसते. सध्या अस्तित्वात असलेली आभासी चलने बहुदा सरकारने चलने म्हणून मान्य केलेली नसतात. म्हणून या व्यवहारांना तशी कायदेशीर मान्यता नसते. या व्यवहारात शासनाची आणि बॅंकेची मध्यस्थी टाळून मालकी हक्क हस्तांतरित करता येतात. पैसे ठेवणाऱ्याला त्याचे मूल्य दर्शवणारे टोकन किंवा पासवर्ड मिळतो.
व्यवहार पद्धती
वस्तू विकत घेण्यासाठी किंवा सेवा मिळविण्यासाठी डिजिटल चलनाचा वापर केला जातो. ज्याप्रमाणे इंटरनेटच्या आधारे ईमेल पाठविणे शक्य होते, त्याचप्रमाणे ब्लॅाकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे पैसे पाठवता येतात. ब्लॅाकचेनमध्ये कोणालाही बदल करता येत नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की, जो व्यवहार नोंदवला जातो तो व्यवहार किंवा ती नोंद संबंधिताशिवाय इतर कुणालाही बघता येत नाही. तसेच संबंधितांनाही बदलता येत नाही. रेकॅार्डच बदलला असे इथे होऊच शकत नाही. विशेष म्हणजे पाठवणारा आणि स्वीकरणारा याशिवाय तिसऱ्या ठिकाणीही नोंद केली जाते. अपरिवर्तनीय असणे आणि एकाचवेळी संबंधित दोघांशिवाय तिसऱ्या ठिकाणीही नोंद होणे हे ब्लॅाकचेनचे मूलभूत गुणधर्म आहेत. त्यामुळे या नोंदी बिनचुक असतात. याच वैशिष्ट्यांमुळे यांना हॅक करता येत नाही.
सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी)
आभासी चलन व्यवहारांसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्याची भूमिका भारताने स्वीकारली आहे. एवढेच नव्हे तर रिझर्व्ह बँकही सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) व्यवहारात आणणार आहे. अशाप्रकारे डिजिटल रुपी या नावाने एक स्वस्त आणि कार्यक्षम चलन व्यवस्थापन प्रणाली, धोके दूर करीत आणि सावधगिरी बाळगत यथावकाश निर्माण होईल. या नवीन तंत्रज्ञानाला फिनटेक (फायनॅनशिअल टेक्नॅालॅाजी) असे नाव आहे. व्यवहारात सुलभता, सुधारणा आणि स्वयंचलितता (इझ, इंम्प्रुव्हमेंट ॲंड ॲाटोमेशन) आणण्यासाठी हे उपयोगी पडणार आहे. आवश्यकेनुसार डिजिटल करन्सीचे रोकडीमध्ये (कॅश) मध्ये तात्काळ रुपांतर करण्याची एटीएम सारखी सोय उपलब्ध असणार आहे.
थोडक्यात काय? तर आभासी युगात डिजिटल होण्यासाठी जगातील देशादेशात आता स्पर्धा सुरू होतील, जगभर बॅंकांची आवश्यकता कमीकमी होत जाईल, बॅंकांमधील ठेवींना ओहोटी लागेल, टिकून राहण्यासाठी त्यांना खास आणि वेगळे प्रयत्न करावे लागतील, देशांच्या अर्थकारणावर व्यापक परिणाम होतील, स्टार्टअप्ससाठी नवीन दालन खुले होईल, आर्थिक धोरणे अधिक सक्षम आणि पारदर्शी होतील. रोकडव्यवहार कमी होतील, इलेक्ट्रॅानिक हस्तांतरण सुरू होईल. किमती उतरतील. शिवाय नोटा छापण्याचा, टाकसाळीतून नाणी पाडण्याचा, नोटा आणि नाणी साठवण्याचा, वाटप करण्याचा, त्यासाठी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था योजण्याचा खटाटोप वाचेल आणि स्विट्झर्लंडच्या धर्तीवर आवश्यक ती कायदेशीर तरतूद करतांना पैसे दडवता येणार नाहीत असा कडेकोट बंदोबस्त करून मोबाईल आणि संगणकाप्रमाणे एका सुलभ आणि सुरक्षित अशा एका नवीन आर्थिक युगाचा प्रारंभ होईल, अशी आशा आणि अपेक्षा आपण बाळगूया.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment