My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Monday, February 28, 2022
युक्रेनचे पतन अटळ
श्री.संपादक, तरूणभारत , नागपूर
आजच्या महत्त्वाच्या विषयाशी संबंधित सोबतचा लेख प्रसिद्ध करण्याचे बाबतीत योग्य तो निर्णय व्हावा, ही विनंती.
आपला स्नेहाकांक्षी,
वसंत काणे. शुक्रवार, दिनांक : 25 /02/2022 , दुपारी 4 वाजता
युक्रेनचे पतन अटळ
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
युक्रेनची सध्याची स्थिती कशी आहे याबाबत अमेरिका आणि युरोपमधील वृत्तवाहिन्यांचे सचित्र अहवाल रकाने भरभरून प्रकाशित होत आहेत. युक्रेनबाबत रशिया केलेल्या कारवाईचा परिणाम काय झाला हे पाहतो आणि मग पुढचे पाऊल टाकतो आहे. आज युक्रेनला रशियाने 1.5 लक्ष सैनिकांची, घोड्याच्या नालेसारखी रचना उभारून, तीन बाजूंनी घेरले आहे. चौथ्या बाजूला मात्र पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया आणि रोमानिया हे नाटोचे सदस्य देश आहेत. युक्रेनची ही बाजू त्यामुळे सुरक्षित आहे. अमेरिकेने रशियावर युक्रेनविरुद्ध आक्रमक पावले उचलत असल्याचा आरोप लावला आहे. रशियाने अर्थातच हा आरोप फेटाळून लावला असून नाटोवरच ठपका ठेवला आहे की, युक्रेनला पाठिंबा देऊन नाटोनेच रशियाच्या पश्चिम भागाला धोका निर्माण केला आहे. युक्रेनच्या डॅानबास या पूर्व भागावर रशिया क्षेपणास्त्रे डागत पुढे चालला आहे. बेलारुसमधून चेरनोबिल मार्गे व क्रिमियामार्गेही आक्रमण सुरू झाले आहे. तर डॅानबास या भागात फुटिरतावाद्यांचा पूर्वीपासूनच अंमल आहे. तसेच डॅानेत्स्क आणि लुहान्स्क या प्रांतात फुटिरतावादी बरेच प्रभावी असून या दोन प्रांतांना, रशियाने दोन स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे.
भयंकर परिणामांना तयार रहा
15 फेब्रुवारी 2022 ला रशियाने जाहीर केले होते की, आमचे युद्धाभ्यास पार पडले असून आम्ही सैन्य मागे घेत आहोत. तर रशियाच्या कथनी आणि करनीमध्ये फरक आहे, असे ॲंथोनी ब्लिंकन यांनी जाहीर केले होते.
बायडेन यांनी पुतिन यांना बजावले होते की, युक्रेनवर आक्रमण कराल भयंकर परिणामांना तुम्हाला तयार रहावे लागेल. तर पुतिन यांनी बायडेन यांना आता दम दिला आहे की हस्तक्षेप कराल तर कोणत्याही टोकाला जाऊ. वृत्तांवरून आणि उपग्रहांनी पाठविलेल्या चित्रांवरून असे दिसते आहे की, सैन्य, रणगाडे, तोफा युक्रेनच्या सीमेवर, क्रिमिया आणि बेलारुस मधून चांगलेच पुढे सरकले आहेत. युक्रेनला अमेरिका आणि नाटो देशांनी पैसे पुरवले, प्रशिक्षण दिले आणि युद्ध सामग्रीनेही सज्ज केले आहे. पण रशियासमोर त्याचा निभाव लागेल, अशी शक्यता दिसत नाही.
1991 मध्ये सोव्हिएट रशियाची शकले होताच नाटोने एस्टोनिया, लॅटव्हिया आणि लिथुअॅनिया यांना नाटोत सामील करून घेतले. पण पुढे युक्रेनची वाटचाल या दिशेने सुरू होत आहे हे कळताच रशिया खडबडून जागा झाला.
विस्तारित नाटो रशियाच्या अस्तित्वालाच धोका
रशियाने नाटोचा झालेला हा विस्तार आपल्या अस्तित्वालाच धोका आहे, असे मानले आणि युक्रेनला नाटोत सामील होऊ नकोस अशी तंबी दिली. भाषा, संस्कृती आणि राजकीय दृष्ट्या युक्रेनला रशिया आपलाच हिस्सा मानतो. युक्रेनच्या पूर्व म्हणजेच रशियाच्या पश्चिम सीमेला लागून असलेल्या भूभागात रशियन भाषा बोलणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, हे खरे असले तरी दोन देशांमधल्या सीमेजवळच्या भूभागात असा प्रकार असणे सहाजीकच आहे/असते. पण म्हणून युक्रेनियन आणि रशियन एक आहेत, अ्सा निष्कर्ष कसा काढता येईल?.
2014 पर्यंत युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेंको यांची रशियाशी जवळीक होती. म्हणून युरोपीयन युनीयन बरोबर सहकार्याचा करार करण्यास त्यांनी नकार दिला. पण हे जनतेला न आवडून कीव या राजधानीच्या शहरात अतिऊग्र निदर्शने झाली इतकी की पेट्रो पोरोशेंको यांना राजीनामा द्यावा लागला. पुढे त्यांच्या जागी पाश्चात्यधार्जिणे विद्यमान अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्सकी प्रचंड बहुमताने निवडून आले. त्यांनी लगेच नाटोत प्रवेश करण्यासाठी राज्यघटनेत बदल करण्यास सुरवात केली.
याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने 2014 पर्यंत युक्रेनचा भाग असलेला पण रशियनप्रेमी जनता असलेला क्रिमीया हा भाग रशियात सामील करून घेतला आणि पूर्वयुक्रेनमधील फुटिरतावाद्यांना उत्तेजनही दिले. फुटिरतावाद्यांनी जेव्हा डोनबासमधील एका मोठ्या भूभागावर नियंत्रण मिळविले तेव्हा भीषण संग्राम झाला होता. पुढे शस्त्रसंधी झाला खरा पण या भागातील पाश्चात्यधार्जिण्या दीड लाख लोकांनी आत युक्रेनमध्ये स्थलांतर केले. पण यामुळे या भागात रशियाधार्जिण्यांचा प्रभाव आणखीनच वाढला.
नंतर मात्र रशियाने पूर्वयुक्रेनला, हायब्रिड वॅारफेअर या युद्धतंत्राने, अनेक महिने कोंडी करूनच बेजार केले. यात राजकीय संघर्ष आणि परंपरागत युद्धतंत्र यांची सरमिसळ असते. अधूनमधून चकमकी उडतात. तसेच सायबर युद्धतंत्राचाही आधार घेतला जातो. खोट्या बातम्या पेरणे, आर्थिक कोंडी करणे, निवडणुकीत ढवळाढवळ करणे, या सारखे डाव टाकले जातात. कसेही करून आक्रमण करण्यास निमित्त उभे करणे हा यामागचा हेतू असतो. असे करीत रशियाने पाश्चात्यांना ठणकावून सांगितले की, पूर्वी सोव्हिएट युनीयनचा भाग असलेल्या देशात नाटोच्या प्रवेशाला आम्ही आमच्या अस्तित्वावरचा घाला समजू.
रशियाचे मागणीपत्रक
डिसेंबर 2021 मध्ये रशियाने अमेरिका आणि नाटोला एक मागणीपत्रच पाठवले. युक्रेन कधीही नाटोचा सदस्य होणार नाही आणि पूर्वी सोव्हिएट रशियाचा भाग असलेल्या देशात सैनिकी पथके तैनात होणार नाहीत, याची अमेरिका आणि नाटोने हमी द्यावी, अशा आशयाच्या त्या मागण्या होत्या. ‘आम्हाला वाटाघाटींचे गुऱ्हाळ नको आहे. स्पष्ट शब्दात हमी द्या आणि तीही तात्काळ द्या. आम्ही अमेरिकेला लागून क्षेपणास्त्रे लावली आहेत का? नाही ना, मग युक्रेनला नाटोत सामील करून घेऊन अमेरिकेने क्षेपणास्त्रे आमच्या सीमेवर काय म्हणून आणून ठेवावीत?’, असे म्हणत पुतिन यांनी आपली पत्रपरिषद आवरती घेतली होती.
2022 मध्ये युक्रेन आणि रशिया यात अनेक निष्फळ वाटाघाटी कधी जर्मनीने तर कधी फ्रान्सने ‘शटल डिप्लोमसी’ पद्धतीने पार पडल्या आहेत. या प्रकारात एक मध्यस्थ भांडणाऱ्या दोघात एकेकाशी बोलून त्या चर्चेचे वृत्त दुसऱ्याला सांगतो आणि दुसऱ्याची भूमिका पहिल्याला कळवतो.
16 फेब्रुवारीला जर्मनीच्या राष्ट्रप्रमुखांनी पुतिन यांची भेट घेतली. डॅानबासमध्ये युक्रेन रशियनांचा वंशविच्छेद करीत असल्याचा आरोप पुतिन यांनी केला. यावर उपाययोजना करण्यासाठी ‘मिन्स्क पीस टॅाक्सच्या’, धर्तीवर वाटाघाटी व्हाव्यात , अशी सूचना पुतिन यांनी केली.
बेलारूसमील मिन्स्क गावी झालेला ‘मिन्स्क प्रोटोकॅाल’ हा करार संघर्ष टाळण्यासाठी करण्यात आला होता. यासाठी 2014 या वर्षी रशिया, युक्रेन आणि ॲार्गनायझेशन फॅार सिक्युरिटी ॲंड कोॲापरेशन इन युरोप (ओएससीई) यात त्रिपक्षीय वाटाघाटी झाल्या होत्या. यावेळी जर्मनी आणि फ्रान्स यांनी सहाय्यकाची भूमिका वठविली होती. यात तीन पक्षांशिवाय स्वाक्षरी करणाऱ्यात डॅानेत्स्क पीपल्स रिपब्लिक आणि लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक हे कोणाचीही मान्यता नसलेले युक्रेनमधील दोन बंडखोर गटही सहभागी झाले होते. पण मिन्स्क 1 आणि मिन्स्क 2 हे दोन्ही करार विफल ठरले. पण तरीही हा फॅारमॅट (चौकट) कायम ठेवूनच पुढील वाटाघाटी कराव्यात, असे ठरले.
युक्रेनचा अध्यक्ष पूर्वाश्रमीचा यशस्वी विनोदी अभिनेता
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्सकी यांना कोणाचीही मान्यता नसलेल्या बंडखोर किंवा फुटिरतावाद्यांशी वाटाघाटी करणे आवडलेले नाही. आम्ही पूर्वसीमेवर युक्रेनचे नियंत्रण पुन्हा नक्कीच प्रस्थापित करू, असे ते म्हणाले. यावर पुतिन यांनी फटकारले की, ‘तुम्हाला आवडले की नाही, ह्याला विचारतो कोण? करार पाळायला तुम्ही बांधलेले आहात’. झेलेन्सकी हे पूर्वाश्रमीचे विख्यात विनोदी नट आणि टीव्ही कलाकार आहेत. ‘मी सीमा सुरक्षित राखीन’, या आश्वासनाच्या भरवशावर युक्रेनियनांनी झेलेंस्की यांना भरघोस मतांनी निवडून दिले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या उद्दाम वक्तव्याचा निषेध करीत त्यांनी ‘आम्ही त्यांचे गुलाम नाही’, असे बाणेदार उत्तर दिले आहे.
डावपेचांना ऊत येणार
नॅार्ड स्ट्रीम 1 ही रशियाची नैसर्गिक वायू वाहून नेणारी वाहिनी युक्रेनमधून पुढे जर्मनीत जाते. युक्रेनमार्गे जाणा-या या आणि अशा अनेक वाहिन्या सुरक्षित रहाव्यात यासाठी रशियाला युक्रेनशी काहीसे जुळवून घ्यावेच लागत होते. पण म्हणूनच नॅार्ड स्ट्रीम 2 ही दुसरी वाहिनी रशियाने युक्रेनला वगळून बाल्टिक समुद्राच्या पाण्यातून पुढे जर्मनीत नेली आणि युक्रेनचे उपद्रव मूल्य दूर केले होते. पण युक्रेनबाबतचा आताचा रशियाचा व्यवहार लक्षात घेऊन, जर्मनीने नॅार्ड स्ट्रीम 2 च्या आधारे नैसर्गिक वायू स्वीकारण्यास स्थगिती दिली आहे. अशा रशियाला जेरीस आणणाऱ्या डावपेचांना यापुढे ऊत येईल, असे दिसते.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्सकी यांनी पूर्वायुष्यात युक्रेनच्या अध्यक्षाची भूमिका वठविली होती. आज ती भूमिका प्रत्यक्षात मात्र गांभीर्याने राजकीय पटलावर आणि युद्धभूमीवर वठवणे त्यांना तेवढे सोपे जाणार नाही. कारण आता रशियाच्या तोफा खरीखुरी आग ओकू लागल्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त चर्चा केली आणि आम्हाला एकटे पाडले असा ठपका झेलेन्स्की यांनी नाटो आणि अमेरिकेवर ठेवला आहे. पण युक्रेन नाटोचा सदस्य नाही. त्यामुळे अमेरिका आणि नाटोच्या फौजा युक्रेनच्या साह्याला जाणार नाहीत. नाटोचा भर आपल्या सदस्य राष्ट्रांच्या रक्षणापुरताच सीमित असणार आहे आणि अमेरिका आणि नाटोचा भर रशियाचा आर्थिक बहिष्कार आणि कोंडी करूनच रशियाला जेरीस आणण्यावर असेल. जे रशियाला सहकार्य करतील, त्यांच्यावरही अमेरिकेची आणि नाटोची खपा मर्जी असेल, हे शब्द कोणाला उद्देशून असतील बरे? अमेरिकेची भारतासोबत बोलणी सुरू आहेत तर चीनबद्दल टिप्पणी करण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. शेवटी युक्रेनने मोदींनी रशियाला आवरावे, अशी कळकळीची विनंती केली. मोदींनी हिंसेऐवजी चर्चेच्या मार्गाने प्रश्न हाताळावा, असे आवाहन केले पण युक्रेनचे निर्लष्करीकरण आणि निर्नाझीकरण करण्याशिवाय आपल्यासमोर दुसरा मार्गच उरला नव्हता, असे पुतिन यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना रोमानियात आणून मग हवाईमार्गे भाडे न आकारता स्वदेशी आणण्यावरच सध्या भारत लक्ष केंद्रित करीत आहे.
(२५.०२. २०२२ दुपारी 4 वाजता)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment