Monday, April 25, 2022

जागतिक राजकारण आणि फ्रान्सची अध्यक्षीय निवडणूक वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? फ्रान्समध्येही अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय राजवट आहे. यावेळी 2022 मध्ये 10 एप्रिलला झालेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीत तीन प्रमुख उमेदवाराना मिळालेल्या मतांची 2022 आणि 2017 मधील टक्केवारी ठोकळमानाने अशी आहे. 1) मॅक्रॅान 28 % तर (2017 मध्ये 24%), 2) मेरीन-ले- पेन 23% तर (2017 मध्ये 21%) 3) जीन-लक मॅलेनकॅान 22 % तर (2017 मध्ये 20%). उरलेल्या नऊ उमेदवारांपैकी कुणाही एका उमेदवाराला 8% ही मते मिळालेली नाहीत. कुणालाही 50 % पेक्षा जास्त मते मिळाली नसल्यामुळे आता 24 एप्रिलला 2022 रविवारी मॅक्रॅान आणि पेन यांच्यात मतदानाची दुसरी फेरी पार पडणार आहे. या दोघात सध्या 5% चा फरक आहे. त्यामुळे पेन यांनी हा फरक भरून काढण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करीत निरनिराळे डावपेच आखीत प्रचाराला सुरवात केली आहे. तर मॅक्रॅान मात्र जुन्याच अजेंड्यावर ठाम आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थलांतरितांनी निर्माण केलेल्या समस्या गेली अनेक वर्षे स्थलांतरितांचा प्रश्न फ्रान्समध्ये ऐरणीवर आला आहे. सीरियामधून परगंदा होऊन युरोपभर पसणाऱ्यांमध्ये इसीसचे कडवे अतिरेकी छुपेपणे प्रवेश करीत असून संधी मिळताच उत्पात घडवून आणीत आहेत. 6% लोकसंख्या असलेला इस्लाम हा फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. फ्रान्समध्ये नव्याने आश्रयाला आलेले सर्व सुन्नी या कट्टर पंथाचे अनुयायी आहेत. त्यामुळे यांना आश्रयार्थी मानायचे की घुसखोर हा प्रश्न जगभर पडला आहे. फ्रान्स हे खरेखुरे धर्मातीत (सेक्युलर) राष्ट्र आहे. प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार हव्यात्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य फ्रान्समध्ये आहे. अगोदरच इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांपासून फ्रेंच लोकांच्या एकतेला धोका निर्माण होत होताच. हा धोका आता सीरियातून येणाऱ्या निर्वासितांमुळे खूपच वाढला आहे. फ्रान्समधधील इस्लाम धर्म पाळणारे वर्णाने काळे, गोरे व सावळे असे तिन्ही वर्णाचे आहेत. इस्लाम धर्मीयांच्या कडवेपणामुळे वेळोवेळी ताणतणाव निर्माण होत असतात. फ्रान्समधील मुस्लिमांचे तीन प्रमुख गट पाडता येतील. १. बहुसंख्य मूक मुस्लीम (सायलेंट मेजॅारिटी) - फ्रान्समध्ये पिढ्यानपिढ्या राहणारे हे धर्मातीत भूमिका स्वीकारून वावरणारे असून त्यांचे प्रमाण मुस्लिमांमध्ये 46 टक्के आहे. हे देशाचे कायदे पाळणारे आहेत. २. अभिमानी मुस्लिम (प्राऊड मुस्लिम) - यांची मुस्लिमांमधील संख्या 25 टक्के आहे. धर्माभिमानी असून सुद्धा त्यांनी बुरखा व हिजाब वरील बंदी स्वीकारली आहे. ३. कडवे मुस्लिम ( हार्ड लाइनर्स) यांची मुस्लिमांमधील संख्या 28 टक्के असून हे नकाब व बहुपत्नित्त्वाचे पुरस्कर्ते आहेत. आश्चर्याची बाब ही आहे की, हे मुख्यत: तरूण, अकुशल कामगार असून ते गावकुसाबाहेर राहणारे, सनातनी वृत्तीने आपली वेगळी व स्वतंत्र ओळख राखणारे आणि बंडखोर स्वभावाचे आहेत. देशाच्या कायद्यापेक्षा शरीयतप्रणित कायदेकानून त्यांना अधिक महत्त्वाचे वाटतात. फ्रान्समध्ये ठळकपणे नजरेस पडणारी धार्मिक प्रतीके (सिम्बॅाल्स) जसे हिजाब (महिलांनी डोक्यावर रुमाल बांधणे) सार्वजनिक ठिकाणी - जसे शाळा, परिधान करण्यावर मनाई आहे. हे या कडव्या इस्लाम धर्मीयांना मान्य नाही. इस्लामी व्होट बॅंक नाही असे असले तरी अजूनतरी फ्रान्समध्ये इस्लामी व्होट बॅंक नाही, असे अनेक राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यामुळे इस्लामची कट्टर विरोधक असलेल्या पेन सुद्धा त्यांना निरनिराळी प्रलोभने दाखवीत आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत. यावरून मॅक्रॅान यांनी त्यांच्यावर कडक शब्दात टीकाही केली आहे. मॅक्रॅान यांची धोरणे मुस्लीम मुलतत्त्ववाद्यांना आवडत नाहीत. तरीही फ्रान्समधले बहुसंख्य मुस्लीम कमी उत्पन्न गटात आणि शैक्षणिक दृष्ट्याही मागासलेल्या गटात मोडत असल्यामुळे हे मुद्दे कोणता पक्ष नीट हाताळेल हे लक्षात ठेवूनच मतदान करील, असे एक मत आहे. पेन यांचा विजय झाला तर… पेन ही निवडणूक जिंकणार नाहीत, असेच सर्व गृहीत धरून चालले आहेत. पण उद्या जर पेन यांचे राजकीय डावपेच यशस्वी झाले आणि त्या खरोखरच जिंकल्या तर काय होईल, याचे अंदाज बांधायलाही अभ्यासकांनी सुरवात केली आहे. उजव्या विचारसरणीच्या असूनही पेन रशियाला सुरवातीपासूनच अनुकूल भूमिका घेत आल्या आहेत, हे एक राजकीय आश्चर्यच आहे. युरोपीयन युनीयन ही एक सशक्त संघटना म्हणून उभी राहू नये या मताच्या त्या आहेत. सशक्त युरोपीयन युनीयनमध्ये फ्रान्सच्या वाट्याला दुय्यम भूमिका येईल, असे त्यांचे मत आहे. नाटोबाबतही त्यांची हीच भूमिका आहे. बलिष्ठ नॅार्थ अटलांटिक ट्रिटी अलायन्स रशियाला डिवचून त्याला स्पर्धकाच्या भूमिकेत घेऊन जाईल, असे त्या म्हणतात. फ्रान्सने युक्रेनला प्रचंड प्रमाणात शस्त्रे पाठविली हे त्यांना मुळीच आवडलेले नाही. स्वसंरक्षणाच्या दृष्टीने उपयोगाची ठरेल अशीच सामग्री पाठवा. आक्रमण करण्यास साह्यभूत होतील अशी शस्त्रे पाठवू नका, स्संरक्षणासाठी उपयोगी पडतील म्हणून गुप्तहेरगिरी करण्यासाठीची साधने पाठवा, कारण ही माहिती बचाव करण्याचे दृष्टीने उपयोगी पडेल, असे त्या म्हणात. आपण शस्त्रे पाठविली तर युद्धाची व्याप्ती वाढेल आणि पुढे त्याची झळ फ्रान्सलाही घायाळ करील. त्यापेक्षा महागाईवर लक्ष केंद्रित करा. रशियाकडून मिळणारे खनिज तेल आणि नैसर्गिक वायू नाकारून आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत आहोत. त्यापेक्षा रशियासोबतचा व्यापार वाढवा. यातच फ्रान्सचे हित आहे. पेन यांचा विजय युरोपीयन युनीयनच्या ऐक्याला घातक अशा विचाराच्या पेन जिंकल्या तर आजवरच्या युरोपीयन युनीयन मधील विचार आणि धोरणाबाबतच्या एकवाक्यतेला तडा जाईल. रशियावर बंधने टाकून त्याला जेरीस आणण्याच्या प्रयत्नांना खीळ बसेल, म्हणून मॅक्रॅान यांनाच मते द्या असे एक गट म्हणतो आहे तर आज युरोपीयन युनीयनमध्ये आर्थिक बाबतीत जर्मनी पहिल्या क्रमांकावर आहे तर फ्रान्सचा क्रमांक दुसरा लागतो. तो खाली जायला नको असेल तर रशियाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. क्रिमियाला रशियाने 2014 मध्येच जिंकून घेतले आहे. फ्रान्सने आता क्रिमिया रशियाचाच भाग आहे, हे मान्य करावे, असा सल्ला पेन यांनी फ्रान्सला दिला आहे. मॅक्रॅानही रशियाने सबुरीने घ्यावे म्हणून सुरवातापासून प्रयत्न करीत आले आहेत. त्यांनी रशियाच्या पुतिन यांच्याशी तासन् तास चर्चाही केली आहे. शेवटीतर ते स्वत: क्रेमलीनला प्रत्यक्ष जाऊन आणि पुतिन यांच्याशी चर्चा करून आले आहेत. रशियाशी संबंध कायम ठेवायचे पण बंधनांनाही पाठिंबा द्यायचा, ही त्यांची भूमिका आहे. उजव्या विचारसरणीच्या पेन यांना रशियाचा एवढा पुळका का आहे याबाबत शोध पत्रकारांनी बित्तमबातमी बाहेर काढली आहे, ती अशी आहे. पेन यांच्या पक्षाला फ्रान्समधल्या एकूण एक बॅंकांनी कर्ज देण्यास नकार दिला होता. कारण त्यांना हे भरवशाचे कूळ वाटत नव्हते. अशा बिकट प्रसंगी रशियाने त्यांना भरघोस रक्कम कर्जाऊ दिली आहे. ‘अर्थेन दासता’ या वचनानुसार तर पेन यांची भूमिका नाहीना, असा संशय लोक व्यक्त करीत आहेत. परदेशाशी आर्थिक संबंध ठेवण्याची प्रवृत्ती अनेक देशातील राजकीय पक्षांमध्ये दिसू लागली आहे. याचा जागतिक राजकारणावर परिणाम होतानाही दिसतो आहे. याबाबत सावधगिरीचा इशारा राजकीय विचारवंतांनी दिला असला तरी तो गंभीरपणे घेण्याच्या विचारात अनेक देशातील राजकारणी निदान आजतरी दिसत नाहीत. पेन यांनी नुकताच एक खुलासा केला आहे. आता रशियाबद्दल माझा काहीसा भ्रमनिरास झाला आहे, असे त्या म्हणू लागल्या आहेत. पण तरीही तडजोडीचे प्रयत्न चालूच ठेवावेत, असेही त्या म्हणतात. अशी भूमिका घेतली नाही तर रशिया आणि चीन यांची जनळीक वाढेल आणि हे कुणालाच परवडणारे नाही. फ्रान्समधील निवडणुकीचा निकाल जागतिक राजकारणाला कलाटणी देणारा ठरेल, असे जे म्हटले जाते, त्याचे कारण हे असे आहे. (शेवटी मॅक्रॅान ५८.५% मते मिळवून निवडून आले)

No comments:

Post a Comment