Monday, May 9, 2022

दूर अंतरावरचा भारताचा जवळचा मित्र - कुर्दिस्तान वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? ॲाटोमन साम्रज्यात एका सलग भूभागात राहणाऱ्या कुर्द लोकांचे सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या एक स्वतंत्र राष्ट्र आहे, ही बाब पहिल्या महायुद्धाच्या शेवटीच मान्यता पावली होती, असे इतिहास सांगतो. तसे पाहिले तर कुर्द लोक, कुर्द आणि यझदी या दोन भिन्न वंशात विभागलेले आहेत. पण आपण सगळे कुर्द आहोत, असेच हे दोघेही मानतात, तसे वागतात आणि तसेच वावरतातही. वाद फक्त, खरा आणि मोठा कोण, तू की मी, कुर्द की यझदी एवढाच आहे. ॲाटोमन साम्राज्याची शकले झाली त्या काळी स्वयंनिर्णयाचे तत्त्व त्याकाळी जगात रीतसर, लिखितस्वरुपात आणि कायदेशीरपणे मान्यता पावले नव्हते. याचा फायदा घेत आणि सलग कुर्दिस्तानची निर्मिती ब्रिटन आणि फ्रान्स यांना राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरली नसती म्हणूनही, लीग ॲाफ नेशन्सने या दोन राष्ट्रांच्या कपट कारस्थानाला बळी पडून, स्वतंत्र आणि सलग कुर्दिस्तानला मान्यता दिली नाही. तर कुर्द लोक बहुसंख्येत असलेल्या ॲाटोमन साम्राज्यातील भूभागाचे पाच तुकडे करून तुर्कस्तान, इराण, इराक, सीरिया आणि आजचा आर्मेनिया पण तेव्हाचा सोव्हिएट रशिया यांत ते समाविष्ट केले. तेव्हापासून 1) आग्नेय तुर्कस्तानमधली 1 कोटी 50 लाख, 2) वायव्य इराणमधली 81 लाख, 3) उत्तर इराकमधली 55 लाख, 4) ईशान्य सीरियातली 20 लाख, 5) नैरुत्य आर्मेनियातील 80 हजार आणि पश्चिम युरोपातली 20 लाख कुर्द जनता एकत्र येण्यासाठी सतत धडपडत आहे. फोडा आणि झोडा (डिव्हाइड ॲंड रूल) ही नीती पाश्चात्यांच्या डिएनए मध्येच आहे की काय अशी शंका यावी असे त्यांचे आजवरचे वर्तन राहिलेले आहे. तेव्हापासून कुर्द लोकांची जी ससेहोलपट सुरू आहे, ती आजतागायत सुरूच आहे. आठ दशकानंतर इराकला संघर्षानंतर का होईना, सुबुद्धी सुचली आणि आणि त्याने कुर्दबहुल प्रदेशाला घटनाधिष्ठित स्वायत्तता दिली. उरलेल्या चौघांना म्हणजे इराण, सीरिया, तुर्कस्तान आणि आर्मेनियाला यांना, ही सुबुद्धी कधी आणि किती घनघोर संघर्षानंतर सुचेल, याबद्दल सध्यातरी काहीही सांगता यायचे नाही. पण कमाल आहे त्या कुर्द लोकांची की त्यांनी जो जो विरोध करील त्या प्रत्येकाशी किंवा एकाचवेळी त्या सर्वांशी आपला लढा कमी अधिक प्रमाणात पण सतत चालूच ठेवला आहे. कोण आहेत कुर्द? इतिहासात कुर्द लोकांचा उल्लेख 1597 मध्ये आणि आधीही केलेला आढळतो. तर 20 व्या शतकापासून स्वतंत्र कुर्द राष्ट्रवाद जगाचे लक्ष वेधून घेतांना दिसतो आहे. कुर्द लोक मेसोपोटेमियामध्ये वसती करून होते, असे मानतात. जीन पूल या आधुनिक संकल्पनेचा आधार घेतला, तर मेसोपोटेमिया मधील कॅाकेशस पर्वताजवळचा भूभाग आणि मध्य आशियाशी कुर्दा यांचे जैविक संबंध आहेत. आनुवंशिकता, भाषा आणि सांस्कृतिक दृष्ट्या कुर्दांची स्वतंत्र ओळख आहे. तसेच एकेश्वरवादी आणि सात संत मानणारे यझदी यांचेही परस्परांशी संबंध आहेत. विशेष हे आहे की यझदी संस्कृती आणि हिंदू संस्कृती यात पुरातन काळापासून विलक्षण साम्य आहे. यझदी हे भटके लोक असून त्यांनी भारतातही स्थलांतर केल्याचे दाखले आहेत. हा सहवास थोडा थोडका नाही तर दोन हजार वर्षांपासूनचा आहे. या काळात त्यांच्यावर हिंदू संस्कृतीचा परिणाम झालेला दिसतो. यझदी आणि हिंदू यातील साम्य तीर्थस्थाने, पवित्र स्थाने ही संकल्पना यझदी आणि हिंदू या दोन्हींमध्ये आहे, त्यांच्या वस्त्रप्रावरणांतही सारखेपणा आहे. आरती आणि पूजाआर्चेत अग्नीचा वापर, तसेच निरांजन वापरून ओवाळण्याची प्रथा ही कर्मकांडे दोन्ही संस्कृतीत आढळतात. शिवपार्वतीचा पुत्र आणि गणेशाचा भाऊ कार्तिकेय याचे जसे वाहन मोर आहे. असेच साम्य असलेली देवता यझदींमध्येही आहे. कार्तिकेय आणि यझदींची देवता हे दोघेही स्वभावाने खट्याळ आहेत. तर गंभीरपणे पाहता ते शांतता आणि मानव्याचा संदेश देणारे आहेत. कार्तिकेयाची उत्पत्ती जशी शिवाच्या उर्जेतून आहे. तशीच यझदी देवता तव्सी मेलेकची उत्पत्ती त्याच्या पित्याने प्रकाशापासून झालेली आहे. दोघांचे साहचर्य मोरासोबत आहे. दोन्ही संस्कृतीत पुनर्जन्माची आणि मरणोत्तर जीवनाची कल्पना मान्यता पावलेली आहे. यझदींचे एवढे साम्य इतर कोणत्याच संस्कृतीशी आढळत नाही. या पुराण कथांव्यतिरिक्त, आजही दैनंदिन जीवनातील आणि देवळातील कपाळीचा टिळा, दोन्ही संस्कृतीत शुभ आणि पवित्र मानला जातो. भारत आणि कुर्दविपुल प्रदेश यात जसे इतिहासकाळापासून संबंध आहेत, तसेच आजही भारत कुर्दविपुल भागातील खनिज तेल तुर्की कंपन्यांकडून विकत घेत असतो. कुर्दविपुल भागात आजही अनेक भारतीय कामधंद्यानिमित्त गेले आहेत. तर अनेक कुर्द बांधव शिक्षणासाठी आणि वैद्यकीय उपचारांसाठी भारताला प्राधान्य देत असतात. इराकमध्ये कुर्दविपुल भागाला बरीच स्वायत्तता आहे. हा स्वायत्त प्रदेश परदेशांशी आणि परदेशातील विविध संघटनांशी संबंध राखून आहे. ‘कुर्दिस्तान रीजनल गव्हर्मेंट’, ही उत्तर इराकमधील स्वायत्त कुर्दिस्तान प्रदेशची (ॲाटोनॅामस कुर्दिस्तान रीजन) कार्यकारी (एक्झिक्युटिव्ह) संस्था आहे. या संस्थेचे मंत्रिमंडळ इराकी कुर्दिश पार्टी हा बहुमत मिळविणारा पक्ष निवडतो. हे मंत्रिमंडळ प्रधानमंत्र्याची निवड करते. अध्यक्ष मात्र जनतेतून निवडला जातो. तोच मंत्रिमंडळाचा, राज्याचा आणि सैन्यदलाचाही प्रमुख असतो. तोच खातेवाटप करतो. सभागृहाचा नेता मात्र प्रधानमंत्री असतो. अध्यक्षाच्या अधिकारात त्याचाही वाटा असतो. कुर्द सैन्यदल ‘पेशमर्गा आर्म्ड फोर्स’ या नावाने ओळखले जाते. पेशमर्गा या शब्दाचा अर्थ ‘मृत्यूशी सामना करणारे’ असा आहे. इस्लामिक स्टेटचा (आयएस) नि:पात करण्यासाठी जे आंतरराष्ट्रीय सैन्यदल उभारण्यात आले आहे, त्यातला एक घटक म्हणूनही हे दल कार्य करीत असते. अर्थेन सामर्थ्यम् आज कुर्दिस्तान प्रदेशात विकासासाठी आत्यावश्यक असलेले राजकीय स्थैर्य आहे. ‘अर्थेन दासता’, हे जसे सत्य आहे तसेच ‘अर्थेन सामर्थ्यम्’, हेही तेवढेच सत्य आहे. यासाठी कुर्दिस्तान रीजनल गव्हर्मेंटचे स्वत:चे असे परराष्ट्र धोरण आहे. इराकमधील एक स्वायत्त भाग एवढेच वेगळेपण असूनही कुर्दिस्तान रीजनल गव्हर्मेंटचा आजवरचा प्रवास कौतुकास्पदच म्हटला पाहिजे. आंतरराष्ट्रीय सारीपटावर स्वतंत्र व्यवहार करणारी एक चमू म्हणून जग आज कुर्दिस्तान रीजनल गव्हर्मेंटकडे पाहते आहे. कारण आज 30 देशांचे प्रतिनिधी एर्बिल या 12 लक्ष लोकसंख्या असलेल्या कुर्दिस्तानच्या राजधानीच्या गावी आहेत. युरोपीयन युनीयन, युनायटेड नेशन्स, इंटरनॅशनल कमेटी ॲाफ दी रेड क्रॅास या सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालयेही एर्बिल येथे आहेत. कुर्दिस्तान रीजनल गव्हर्मेंटची कार्यालये सुद्धा किमान 14 देशात आहेत. आधुनिक भारत आणि कुर्दिस्तान ऐतिहासिक संबंध असूनही भारत आणि कुर्दस्तानमध्ये व्यवसाय, खनिज तेल, शिक्षण आणि आरोग्य ही क्षेत्रे वगळता अतिशय मर्यादित स्वरुपाचे संबंध आहेत. 2014 मध्ये भारतात नवीन राजवट आलेली पाहून आणि मध्य आशियाबाबतचे भारताचे धोरण बदललेले पाहून, कुर्दिस्तानचे परराष्ट्र व्यवहार पाहणारे नेते हेमीन हावरानी यांनी भारताशी अधिक घट्ट स्वरुपाचे राजकीय आणि आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा, भारतीय वृत्तसृष्टीच्या माध्यमातून व्यक्त केली. आम्हाला साह्य करणारा एक महत्त्वाचा साथीदार म्हणून भारताने एर्बिलमध्ये वाणिज्य दूतावास उघडावे, अशी इच्छा आणि अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच भारतीय कंपन्यांनी कुर्दिस्तानमध्ये गुंतवणूक करावी, असे निमंत्रणही दिले. हे कळताच भारतातील मोदी राजवटीने एक खास दूतच तिकडे रवाना केला. भारताचा कुर्दस्तानला पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही त्याने कुर्दिस्तानला दिली आणि पेशमर्गा या प्रदेशाला स्थैर्य आणि सुरक्षा प्रदान करील, असा विश्वासही व्यक्त केला. याशिवाय लवकरच भारत तिथे वाणिज्य दूतावास सुरू करील, असे आश्वासन दिले ते वेगळेच. कुर्दिस्तान आणि इस्रायल कुर्दिस्तान प्रदेश आणि इस्रायल यांत स्नेहाचे संबंध आहेत. 2006 मध्ये कुर्दिस्तानचे नेते मसूद बारझानी यांनी कुवेतमध्ये एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, इस्रायलशी संबंध राखणे हा काही गुन्हा होत नाही. बगदादने इस्रायलशी संबंध प्रस्थापित करताच पाठोपाठच आम्ही येतोच आहोत. त्यावेळचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी तर कुर्दांची तोंड भरून स्तुती केली. राजकीय निष्ठा आणि आधुनिकता या दोन्ही कसोट्यांवर कुर्द उतरले आहेत म्हणून त्यांचे राजकीय स्वातंत्र्य त्यांना मिळालेच पाहिजे, असे म्हणत त्यांनी स्वतंत्र कुर्दिस्तानच्या मागणीला आपला पाठिंबा व्यक्त केला. संपूर्ण अखंड कुर्दिस्तान केव्हा? इराकच्या उत्तरेकडील तीन प्रांतातून इराकी फौजा मागे घेतल्यानंतर 1992 मध्ये इराकमध्ये स्वायत्त कुर्दिस्तान प्रदेश उदयाला आला. तेव्हापासून तिथे त्यांचे स्वत:चे स्थानिक प्रशासन आणि 111 सदस्यांची संसद (पार्लमेंट) कारभार करीत आहेत. 2010 पूर्वी सीरिया आणि इराकमध्ये स्थिरता होती. 2014 नंतर मात्र या भागात इसीसमुळे अस्थैर्य निर्माण झाले आहे. ‘2030 मध्ये कुर्दिस्तान अस्तित्वात येईल’, अशी भविष्यवाणी अमेरिकेने तेव्हाच्या म्हणजे 2010 च्या स्थिरतेच्या वातावरणाची नोंद घेत केली होती. आजच्या या कुर्दिस्तानचा ध्वज आणि भारताचा राष्ट्रध्वज यात कमालीचे साम्य आहे. चक्राऐवजी सूर्याची प्रतिमा ठेवली, की झाले. गुजराथमध्ये नुकत्याच पार पडलेल्या उद्योगासंबंधीच्या कार्यक्रमात निरनिराळ्या देशांच्या प्रतिनिधींना पाचारण करण्यात आले होते. त्यात कुर्दिस्तानचा प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होता. भारताने निमंत्रण दिल्याच्या आनंदाचे भाव त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडत होते. भारताचे निमंत्रण हा आमच्यासाठी एक फार मोठा आणि मोलाचा सन्मान आहे, अशा आशयाचे उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडले. भविष्यकालीन कुर्दिस्तान आणि भारत यांच्यातील स्नेहाची ही नांदीच म्हटली पाहिजे.

No comments:

Post a Comment