My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Tuesday, October 25, 2022
इराणमधील महिला हत्याकांड!
(पूर्वार्ध)
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर - 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
आजच्या इराणला समजून घ्यायचे असेल तर पहलवी घराण्याच्या कारकिर्दीपासून सुरवात केली तर ते सोयीचे होईल. हे इराणचे शेवटचे राजघराणे आहे. 1925 ते 1979 या 54 वर्षांच्या दीर्घ कालखंडात इराणवर या घराण्याची राजवट होती. रेझा शहा पहलवी हा एक सैनिकी अधिकारी तसेच राजकारणी होता. त्याची राजवट इराणवर 1925 ते 1941 पर्यंत होती. त्याने इराणमध्ये अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सुधारणा घडवून आणल्या. त्यामुळे रेझा शाह पहलवीने आधुनिक इराणचा पाया रचला, असे इतिहासकार मानतात. ब्रिटिश आणि रशियन आक्रमणामुळे त्याला 1941 मध्ये पदच्युत व्हावे लागले. त्याचा पुत्र मोहंमद रेझा शहा हा इराणचा शेवटचा शहा आहे. तो 1941 ते 1979 या काळात इराणवर राज्य करीत होता. 1963 मध्ये शहाने व्हाईट रेव्होल्युशन घडवून आणली. हे जसे इराणचे पाश्चात्यिकरण होते, तसेच ते आधुनिकीकरणही होते. यात भूमी सुधार आणि महिलांना मतदानाचा अधिकार समाविष्ट होता. इराणमध्ये महिलांना अधिकार देणारा राजा अशीही त्याची ओळख इतिहासात नोंदविलेली आहे. पण त्याच्या कारकिर्दीतच याचबरोबर इराणमध्ये गरीब आणि श्रीमंत यातील दरीही वाढत गेली, अशीही इतिहासाची नोंद आहे. शहा हुकुमशाही वृत्तीचा होता, त्याच्या प्रशासनात भ्रष्टाचार, खनिज तेलापासून मिळणाऱ्या संपत्तीचे विषम वाटप, सक्तीचे पाश्चात्यिकरण, विरोधकांना दडपण्यासाठी गुप्त पोलिस यंत्रणेचा गैरवापर यांना ऊत आला होता. हे नकारात्मक मुद्देही नोंद घ्यावेत असे आणि नंतरच्या क्रांतीला निमंत्रण देणारे ठरले आहेत.
याचा परिणाम इराणमध्ये इस्लामिक क्रांती होण्यात झाला. शहाची राजवट उलथून टाकण्यात आली. या क्रांतीचे नेतृत्व आयातोल्ला रुहोल्ला खोमिनी यांनी केले. विशेष उल्लेखनीय बाब ही आहे की, या क्रांतीला कट्टर सनातनी इस्लामी संघटनांसोबत डाव्यांचाही पाठिंबा होता. तसेच खनिज तेल उपसणाऱ्या उद्योगातील कामगारांनीही आंदोलनात सहभागी व्हायचे ठरविले, हा सर्वात जास्त परिणाम करणारा मुद्दा ठरला. या क्रांतीनंतर इराणने इस्लामिक प्रजासत्ताक घटनेचा अंगिकार केला. राजेशाहीचा अंत झाला पण प्रजातंत्र न येता धर्ममार्तंड सर्वाधिकारी ठरला. तो ओळखला जातो, आयोतोल्ला खोमीनी या नावाने. आयोतोल्ला ही श्रेष्ठतम शिया धर्माधिकाऱ्याला दिली जाणारी पदवी आहे. तेव्हापासून आजपावेतो इराणमध्ये धर्मसत्ता राज्यशकट हाकीत आली आहे.
इराण कसा?
इराण हा भौगोलिक दृष्टीने पाहता आशियाच्या नैरुत्य भागातला एक पर्वतमय, रूक्ष आणि नापिक प्रदेश असलेला, अनेक वांशिक गटांची वसती असलेला, मध्यभागी पठारी वाळवंट असलेला, पठाराभोवती अति उंच पर्वतरांगांचा वेढा असलेला भूभाग आहे. याचे क्षेत्रफळ ठोकळमानाने 16 लक्ष 50 हजार चौरस किलोमीटर म्हणजे भारताच्या निम्मे इतके आणि लोकसंख्या मात्र 8 कोटी 67 लक्ष इतकीच अशी विरळ आहे. पठाराभोवतालच्या पर्वतरांगांमध्ये ज्या खिंडी आहेत, त्यातूनच पठारी वाळवंटात जाणे शक्य आहे. या पर्वतरांगांना लागून असलेल्या कडांना स्पर्श करणाऱ्या इराणमधील जलदुर्भिक्ष असलेल्या भागातच लोकवस्ती केंद्रित आहे. तेहेरान हे राजधानीचे शहर इराणच्या उत्तरेकडील एलबर्झ पर्वताच्या पायथ्याशी अस्ताव्यस्त पसरलेले आहे. या शहरातील भव्य शिल्पे जशी सौंदर्याची साक्ष पटविणारी होती, तशीच ती भोवती हिरव्याकंच बगीच्यांचे वेटोळे असलेलीही होती. पण हा इतिहास झाला. 1978-79 च्या क्रांतीत झालेल्या पडझडीनंतर या शहरावर पसरलेली अवकळा दूर करण्याचे प्रयत्न नंतरच्या काळात झाले आहेत खरे, पण जुन्या नैसर्गिक वैभवाची सर आधुनिक तेहेरान शहराला काही आलेली नाही. इराणमधल्या इतर शहरातही जुन्या वैभवाच्या अवशेषांच्या अशाच खुणा आधुनिक इमारतींना केविलवाणी साथ देतांना आजही दिसतात. आज शिक्षणाची, व्यापाराची, संस्कृतीची मोठमोठी केंद्रे या शहरांमध्ये आढळून येतात. जुन्या आणि ख्यातनाम पर्शियन साम्राज्यातील एक ‘अॅंटिक पीस’ म्हणून इराणकडे बोट दाखवता येईल. सामरिकदृष्टीने मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे इराण हे जगातील एक महत्त्वाचे सत्ताकेंद्र झालेले आहे. याशिवाय नैसर्गिक साधन संपत्तीची रेलचेल असल्यामुळे, यात पेट्रोलियमचा विशेष उल्लेख करावा लागेल, जागतिक महासत्तांची वक्रदृष्टी इराणला सतत भोवते आहे. नैसर्गिक संपत्ती इराणला शाप ठरला आहे तो असा!
1979 नंतरचा इराण
डिसेंबर1979 मध्ये इराणने नवीन राज्यघटनेचा स्वीकार केला. या घटनेत खोमीनी यांना तहाहयात इराणचे राजकीय आणि धार्मिक नेते म्हणून मान्यता देण्यात आली. आधुनिक जगातल्या कोणत्याही देशाच्या राज्यघटनेत अशी मुलखावेगळी तरतूद केलेली आढळणार नाही. खोमीनी यांनी घड्याळाचे काटे उलटे फिरविले. त्यांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मिळालेले अधिकार काढून घेतले. त्यांना वारसा हक्काने किंवा भरपाई म्हणून मिळणारी रक्कम पुरुषांच्या तुलनेत निम्मी केली. त्यांचा वाहन चालविण्याचा, नोकरी करण्याचा आणि विद्यापीठात शिक्षण घेण्याचा अधिकार मात्र कायम ठेवला. आज महिलांचा जो उठाव जगाला दिसतो आहे त्याच्या मुळाशी हा शिक्षणाचा अधिकार असावा. मुळात अधिकारच नसणे वेगळे आणि असलेले अधिकार काढून घेणे वेगळे, याचीही नोंद घ्यावयास हवी. गमावलेल्या अधिकारांची बोच इराणी महिलांना सतत जाणवत राहिली ती शिक्षणामुळे. बुरखा घालण्याची सक्तीही करण्यात आली. पाश्चात्य संस्कृतीच्या निदर्शक असलेल्या सर्व बाबींवर बंदी घालण्यात आली. परंपरागत इस्लामी कायद्यानुसार पाशवी शिक्षा पुन्हा नव्याने ठोठावल्या जाऊ लागल्या. या व्यवस्थेमुळे सर्व जगात महदाश्चर्याची आणि तीव्र संतापाची लाट उसळली. तोंड दाबून बुक्क्यांचा मार हा शब्दप्रयोग आपल्याला माहीत आहे. इराणमध्ये तर महिलांना बुरखा न घालण्यासारख्या धर्मविरोधी वर्तनासाठी फटक्यांची शिक्षा दिली जाते. ही शिक्षा भोगतांना बुरखा घालून उकिडवे बसवून बांधलेल्या अवस्थेत त्यांना गुन्ह्याच्या गंभीरपणानुसार 100 पर्यंत फटके खावे लागतात. फटके खातांना बोळा कोंबलेल्या मुखावाटे जेमतेम बाहेर पडणारे चित्कारही हृदय पिळवटून टाकणारे असतात. घरात बंद दरवाजाच्या आत होणारे हिंसाचार किंवा लैंगिक अघोरी छळ यांच्या विरुद्ध कोणतेही कायदेशीर संरक्षण महिलांना नाही. त्यांना मतदानाचा अधिकार नाही. या विरुद्ध महिलांचे आंदोलन इराणमध्ये गेली अनेक दशके होत असे. त्यामुळे किंवा आणखी कशामुळे या आघोरी शिक्षांचा वापरही कमी होत चालला होता. पण इब्राहिम रइसी हे 3 ऑगस्ट 2021 ला सत्तेवर आल्यापासून महिलाविषयक कायद्यांची कडक अंमलबजावणी व्हायला इराणमध्ये पुन्हा सुरवात झाली. त्यांनी महिलांवर देखरेख ठेवण्यासाठी वेगळी निगराणी यंत्रणा चौकाचौकात उभी केली.
माहसा अमिनीची छळकथा
इराणमधील २२ वर्षीय तरुणी माहसा अमिनी हिला 13 सप्टेंबर 2022 ला सार्वजनिक ठिकाणी हिजाब ‘व्यवस्थित’ न घेतल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. ती 3 दिवस पोलीस कोठडीत होती. कोठडीत16 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. हा मृत्यू ‘हार्ट अटॅक’ मुळे झाला असे जाहीर करण्यात आले. कोठडीत कोसळल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे सांगण्यात आले. पण तिला दवाखान्यात भरती केले तेव्हाच ती मृतावस्थेत होती. अमिनीच्या मृत्यूनंतर संपूर्ण इराणभर निषेधाचे मोर्चे निघाले. महिला रस्त्यांवर उतरून हिजाब (डोके झाकण्याचे वस्त्र) जाळून टाकीत निषेध व्यक्त करू लागल्या.
अमिनीला अजिबात वाईट वागवण्यात आले नाही, ती ‘हार्ट अटॅक’ मुळे मरण पावली, असा दावा पोलीस करीत आहेत. मात्र, अमिनीला कोणताही आजार नव्हता आणि अटक झाली त्यावेळी ती निरोगी होती, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला, तेव्हा कुठे अमिनीच्या आईवडिलांशी फोनवर बोलून तिच्या मृत्यूची संपूर्ण चौकशी करण्याचे वचन इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी दिले आहे. न्यायिक व संसदीय चौकशीचे आदेश तर यापूर्वीच देण्यात आले आहेत, असा खुलासा शासनाने केला आहे.
अमिनीची कासरा नावाच्या हॅास्पिटलमधली छायाचित्रे जगभर दाखविली जात आहेत. त्यात तिचा चेहरा सुजलेला दिसतो आहे, डोळे काळे झालेले दिसत आहेत, तिच्या कानातून रक्तस्राव होताना दिसत आहे, अमिनीला रुग्णालयात आणले तेव्हाच तिचा मेंदूमृत्यू (ब्रेन डेड) झाला होता, असे हॅास्पिटलने इन्स्टाग्रामद्वारे जाहीर केले होते. पण नंतर मात्र ते विधान काढून टाकण्यात (डीलिट) आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment