लोकशाही एका शहरांच्या देशातली
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक २४/०१/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
लोकशाही एका शहरांच्या देशातली!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. तो अॅमेझॅान या महाकाय नदीसाठीही प्रसिद्ध आहे. 8.5 चौरस मिलियन किमी क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा म्हणजे भारतापेक्षा अडीच पट मोठा आहे, ब्राझीलची लोकसंख्या मात्र फक्त 21 कोटी 50 लाख एवढीच आहे. पण या लोकसंख्येनुसारही तो जगातला पाचवा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेला अटलांटिक महासागर असून या देशाला ७, ४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी लाभली आहे. या देशात पोर्तुगीज भाषा बोलली जाते. ब्राझीलमध्ये गोरे 47.7%, संमिश्र 43.1%, कृष्णवर्णी 7.6% आशियन 1.1% आणि मूळ निवासी मात्र फक्त 0.4% आहेत. ब्राझीलमधील तब्बल 87 % टक्के लोक शहरात राहतात. तर फक्त 13 % लोकच खेड्यात राहतात. अशाप्रकारे ब्राझील हा शहरांचा देश आहे. हा 99 % साक्षरांचा देश असलेला ब्राझील, संयुक्त राष्ट्र संघ (युनो), जी 20, ब्रिक्स, मरकोसूल या सरख्या महत्त्वाच्या संघटनांचा संस्थापक सदस्यदेश आहे. जी 20 ची पुढची म्हणजे 2024 ची शिखर परिषद ब्राझीलमध्ये होऊ घातली आहे.
ब्राझीलमधील सार्वत्रिक निवडणुकांची पहिली फेरी 2 ऑक्टोबर 2022 ला रविवारी पार पडली. ही निवडणूक देशातील यश्चयावत सर्व पदांसाठी होती. ज्यांना वैध मतदानापैकी 50 %+1 इतकी किमान मते मिळाली ते निवडून आले. उरलेल्या जागांचे बाबतीत पहिल्या दोघात मतदानाची दुसरी फेरी 30 ऑक्टोबर 2022 ला रविवारीच पार पडली. यात दोघांपैकी ज्यांना वैध मतदानापैकी 50 %+1 इतकी किमान मते मिळाली ते निवडून आले. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत अनुक्रमे 79.05% आणि 79.41% असे म्हणजे जवळपास सारखेच मतदान झालेले आढळते. याचा अर्थ असा की, दोन्ही फेऱ्यांकडे मतदारांनी सारख्याच गांभीर्याने पाहिले.
मतदानाची सक्ती, पण कशी?
18 ते 70 वयाच्या मतदारांना मतदान करणे सक्तीचे आहे. मतदान न केल्यास दंडाची तरतूद आहे. पण 16 ते 18 वय असेल किंवा वय 70 पेक्षा जास्त असेल तर मात्र मतदान करणे ऐच्छिक आहे. सैनिकांना राजकीय भूमिका नसावी यासाठी सैनिकी पेशातील व्यक्तींना मतदानाचा अधिकार नसतो. ब्राझीलमध्ये राहणाऱ्या पोर्तुगीज नागरिकांना आणि पोर्तुगालमध्ये राहणाऱ्या ब्राझिलियन नागरिकांना मतदानाचा तसेच निवडणुकाला उभे राहण्याचा अधिकार त्या त्या देशात असतो. याला इक्वालिटी स्टॅट्युट असे म्हणतात. या आशयाचा करार पोर्तुगाल आणि ब्राझीलमध्ये 7 सप्टेंबर 1971 ला करण्यात आला आहे.
2022 मध्ये अतिउजव्या विचारसरणीचे विद्यमान अध्यक्ष जेर बोलसोनारो दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावून पहात होते. 2018 मध्ये ते सोशल लिबरल पार्टीचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. पण 2019 मध्ये त्यांनी सोशल लिबरल पार्टीचा राजीनामा दिला आणि वेगळी आघाडी करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. ब्राझीलमध्ये अमेरिकेप्रमाणे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या जोडगोळीला म्हणजेच टिकेटला मतदार मतदान करतात. जोडगोळीच पडते किंवा जिंकते.
माजी अध्यक्ष लुई इनासिओ लुला द सिल्व्हा हे लेफ्ट विंग वर्कर्स पार्टीचे उमेदवार तिसऱ्यांदा, पण सलग तिसऱ्यांदा नव्हे, तर 2022 मध्ये आपले नशीब आजमावून पहात होते. ते 2002 आणि 2006 मध्ये ब्राझीलचे अध्यक्ष होते. लुला यांच्यावर 2016 मध्ये महाभियोग चालवून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. पुढे कोर्टकचेऱ्या होऊन लुला यांना त्यांचे सर्व अधिकार 2021 मध्ये बहाल करण्यात आले. 2022 मध्ये लुला यांनी निवडणूक लढविली आणि अल्प मताधिक्याने जिंकली.
जेर बोल्सनारो आणि लुई इनासिओ लुला द सिल्व्हा, कोण कसा?
जेर बोल्सनारो यांची मुक्ताफळे - ‘‘मी बलात्कार करावा अशी तुझी लायकी नाही”, असे एका महिलेविषयी अश्लाघ्य उद्गार काढणारे, ‘‘मला पाच मुलगे आहेत, पण सहाव्या अपत्याच्या वेळी मी अशक्त होतो आणि मला मुलगी झाली,’’ असे मुलखावेगळे ज्ञान पाजळणारे, ‘‘कैद्यांचा आणि गुन्हेगारांचा छळ करायलाच हवा’’, अशा मघ्ययुगीन भूमिकेला आजही कवटाळून बसणारे, ‘‘माझा मुलगा समलिंगी निघाला तर मला त्याच्याविषयी काहीही ममत्व वाटणार नाही’’, अशी असंवेदनशील आणि अपरिपक्व भूमिका स्वीकारणारे बोल्सनारो किती खुज्या व्यक्तिमत्त्वाचे आणि वैचारिक दारिद्र्य असलेले होते याची पुरेपूर कल्पना येऊ शकेल. त्यांची अप्रगत आणि विकृत सामाजिक भूमिका, विज्ञाननिष्ठा तर सोडाच पण विज्ञानविरोधी दृष्टीकोन, मागास वृत्ती, कोणाचेही डोळे उघडणारी ठरावी. आजकाल युरोप आणि अमेरिका खंडात जनमताला प्रतिगामी व्यक्तीच आपल्याशा का वाटू लागल्या आहेत, कुणास ठावूक? हा एक अभ्यासाचाच विषय आहे. यांचा ब्राझीलमध्ये पराजय झाला याचे कुणालाही वाईट वाटण्याचे कारण नाही. वाईट वाटते ते याचे की, प्रतिगामी आणि प्रगत विचाराच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमधला फरक अत्यल्प आहे!
लुई इनासिओ लुला द सिल्व्हा ‘‘मला जिवंत गाडण्याचा प्रयत्न झाला, पण मी तो यशस्वी होऊ दिला नाही,’’ असे लुला निर्दोष सिद्ध झाल्यानंतर म्हणाले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोन वर्ष तुरुंगात खितपत राहिल्यानंतर आरोप सिद्ध होऊ न शकल्यामुळे त्यांना मुक्त करण्यात आले होते. लुला हा जॉर्ज फर्नान्डिस यांच्याप्रमाणे कामगार वर्गातून आणि चळवळीतून पुढे आलेला राजकारणी नेता आहे. साहजिकच त्यामुळे त्याच्यावर डावेपणाचा शिक्का बसला आहे. पण जेव्हा दोनदा, म्हणजे 2002 आणि 2006 या वर्षी, त्यांच्या हाती ब्राझीलची सत्ता आली, तेव्हा त्या काळात त्यांचा डावेपणा अनुभवाला आला नाही. उलट ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेने त्यांच्या कार्यकाळात उत्कर्षाच्या दिशेने कूस बदलेली आढळते. वैचारिक डावेपण गुंतवणुकीच्या विरोधात नसते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. पोथीनिष्ठ डावेपण आज राजकारणात कुठेही यशस्वी झालेले दिसत नाही. व्यवसायाला नफ्याची जोड देणे म्हणजे भांडवलशाहीचा पुरस्कार करणे नव्हे, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. सुरक्षित सामाजिक जीवन आणि रोजगारनिर्मितीसाठी भांडवली गुंतवणूकीवर त्यांनी सतत भर दिलेला दिसतो.
लुला यांना पहिल्या फेरीत 48.43 % मते मिळाली. तर विद्यमान अध्यक्ष बोलसोनारो यांना 43.20 % मते मिळाली. म्हणजे विद्यमान अध्यक्षाला 5.23 % मते कमी मिळाली. हे असे विद्यमान अध्यक्षाचे बाबतीत ब्राझीलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. पण तरीही 50 % +1 इतकी किमान मते न मिळाल्यामुळे मतदानाची दुसरी फेरी लुला आणि बोलसोनारो यांच्यात 30 ऑक्टोबर 2022 ला घेण्यात आली. यावेळी लुला आणि बोलसोनारो यांना अनुक्रमे 50.90% आणि 49.10% मते मिळाली. म्हणजे लुला फक्त 1.80 % मतांच्या परकाने विजयी झाले.
बोलसोनारो समर्थकांचा निकाल स्वीकारण्याय नकार
लुला यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाली तेव्हापासूनच बोलसोनारो यांनी त्यांच्यावर बेछुट आरोप करायला सुरवात केली होती. पण हे आरोप निरीक्षकांना योग्य वाटले नाहीत. दुसऱ्या फेरीतही लुला यांनी आघाडी घेताच तर बोलसोनारो यांचा तिळपापडच झाला. त्यांनी सुपीरियर इलेक्टोरल कोर्टात तक्रार केली. इलेक्ट्रॅानिक व्होटिंग मशीनने केलेल्या नोंदी चुकीच्या आहेत, असा आक्षेप नोंदविला. कोर्टाने त्यांचा आक्षेप तर फेटाळलाच शिवाय त्यांना भला मोठा म्हणजे 4.3 मिलियन डॅालर एवढा दंडही ठोठावला.
निवडणुकीची दुसरी फेरी पूर्ण होते न होते तोच बोलसोनारो समर्थकांनी ब्राझिलिया या राजधानीच्या शहरासह रिओडिजानेरो, सॅल्व्हॅडोर, बेलो हॅारिझॅांटे, सॅओ पॅालो, मॅनॅास अशा सर्व मोठ्या शहरात निदर्शने करण्यास सुरवात केली. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच देशभर निदर्शने, हल्ले, हिंसाचार यांना ऊत आला.
बोलसोनारो यांच्या समर्थकांनी राजधानी ब्राजीलियामध्ये प्रचंड राडा केला. नवे राष्ट्रपती म्हणून लुला यांनी शपथ घेताच बोलसोनारो यांचे समर्थक संतप्त झाले. आंदोलकांनी संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयात घुसून धुडगूस घातला, प्रचंड तोडफोड आणि जाळपोळही केली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 400 लोकांना अटक केली आहे.
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
दरम्यान, ब्राझिलमधील या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘बोलसोनारो यांच्या समर्थकांनी देशाची संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयावर हल्लाबोल करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. ब्राझिलच्या लोकशाही संस्थाना अमेरिकेचं संपूर्ण पाठबळ आहे’, असे ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ब्राझीलमध्ये घडत असलेल्या दंग्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी लुला शासनाला पाठिंबा व्यक्त केला असून लोकशाही परंपरांचे प्रत्येकाने पालन केलेच पाहिजे, ह्या मुद्द्यावर भर दिला आहे.
बोलसोनारो सद्ध्या अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात आले आहेत. त्यांनी सुरू असलेल्या उत्पाताशी आपला संबंध नाही, असे जाहीर केले आहे. पण त्याचबरोबर लुला यांनी केलेल्या आरोपांचा धिक्कारही केला आहे. तसेच त्यांनी शांततापूर्ण निदर्शनांना पाठिंबाही व्यक्त केला आहे. बोलसोनारो काहीही म्हणोत, ‘पर ये ज्यो पब्लिक है, वो सब जानती है।’
ि
No comments:
Post a Comment