Monday, January 2, 2023

 आंतरराष्ट्रीय सीमावाद कसे सुटतील?

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ०३/०१/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

आंतरराष्ट्रीय सीमावाद कसे सुटतील?

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

    भारताच्या भूसीमांची (लॅंड बॅार्डर्स)) एकूण लांबी ठोकळमानाने 15,107 किलोमीटर असून  समुद्रकिनारा 7,517 किलोमीटर आहे. त्यापैकी भूसीमेची लांबी बांगलादेशाच्या बाबतीत सर्वातजास्त म्हणजे 4,097, तर चीन 3,488, पाकिस्तान 3,323, नेपाळ 1,751, म्यानमार 1,643, भूतान 699 आणि अफगाणिस्तान 106 किलोमीटर  अशी आहे. पण आश्चर्याची बाब ही आहे की, डिपार्टमेंट ऑफ बॉर्डर मॅनेजमेंट स्थापन व्हायला 2004 हे वर्ष उजाडावे लागले. यानंतरच सीमांवर पहारा, सीमांचे रक्षण, सीमावर्ती भागात रस्त्यांचे आणि रेल्वे रुळांचे जाळे, कुंपण, रात्री कुंपणांवर प्रकाशझोत, निगराणी अहवालांची समीक्षा, सीमांची आखणी, पडताळ नाकी (चेक पोस्ट),  अशांबाबत अधिक तपशीलवार विचार सुरू झाला. भारत-पाकिस्तान, भारत-बांगलादेश आणि भारत म्यानमार याबाबत सीमावर्ती भागात रस्ते, कुंपण आणि रात्री प्रकाशझोत यावर  विशेष लक्ष देण्याचे कारण सांगण्याची आवश्यकता नसावी. भारत-चीन सीमेला अजून उभयपक्षी  रीतसर करार होऊन मान्यता मिळालेली नाही. जे जुने ब्रिटिशकालीन करार आहेत, ते चीनला मान्य नाहीत. भारत-नेपाळ सीमावादही अधूनमधून उफाळून येत असतोच. भारत-भूतान सीमेबाबत बरीचशी सामान्य स्थिती आहे. भारत-अफगाणिस्तान सीमाप्रश्न पाकव्याप्त काश्मीर भारतात आल्यानंतरच खऱ्या अर्थाने विचारात घेता येईल.

  भारत आणि बांगलादेश यातील 4,097 किलोमीटर आंतरराष्ट्रीय सीमा जगातली 5 व्या क्रमांकाची लांब सीमा आहे. ही सीमा आसाम, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय आणि पश्चिम बंगाल  यांना लागून आहे.  

  सीमाप्रश्नी द्विपक्षीय विषय 

  भारत आणि बांगलादेश यात सीमाप्रश्नी नुकतीच 18 वी चर्चा पार पडली असून त्यात घुसखोरी आणि दहशतवादी उपद्रव या मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले गेले. भारत आणि बांगलादेश यांनी ‘नो मनी फॅार टेरर’ या विषयावर दिल्ली येथे झालेल्या परिषदप्रसंगी गृहमंत्रीस्तरावर, म्हणजे अमित शहा आणि असादुझामन खान यात, फावल्या वेळी चर्चा केली. या चर्चेत परस्परहिताच्या प्रश्नांवर एकमत झाल्याच्या वार्ता आहेत. 1971 साली बांगलादेशाच्या निर्मितीच्या निमित्ताने झालेल्या संघर्षात भारताने केलेली मदत बांगलादेश विसरलेला नाही, असे बांगलादेशाचे गृहमंत्री आवर्जून म्हणाल्याचे वृत्त आहे. भारत आणि बांगलादेश यात सीमाविषयक द्विपक्षीय विषय असे आहेत. कुंपण, आंतरराष्ट्रीय  सीमेपासून 150 यार्डांच्या यात दोन्ही बाजूंनी करावयाची विकास कामे, घुसखोरी आणि बंडखोरी रोखण्यासाठी परस्पर सहकार्य, दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, तस्करी यांना 

अटकाव हे ते प्रमुख विषय आहेत. एकूण 4,097 किलोमीटर सीमेपैकी 3,145 किमी सीमेवर कुंपण घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. उरलेल्या सीमेवर प्रत्यक्ष (फिजिकल) आणि अप्रत्यक्ष (नॅान-फिजिकल) अडथळे उभारण्याचे काम सुरू आहे. पण भारत आणि बांगलादेश यातील सीमा अनेक ठिकाणी प्रवेशसुलभ (पोरस) असून त्यामुळे सीमेपलीकडून बेकायदेशीर कारवाया आणि घुसखोरी रोखण्यात बऱ्याच अडचणी येत असतात, या बाबीची नोंद उभयपक्षी घेण्यात आली.

   उभयपक्षी महत्त्वाचे अनेक मुद्दे आहेत/असतात.  त्यात संबंधित दोन देशात सहकार्य असावे लागते. सीमेवर कुंपण घालणे, आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून 150 यार्ड आत विकासाची कामे करणे, गस्त घालणे, सीमा बेकायदेशीरपणे ओलांडणाऱ्यांना अडवणे, बंडखोरांना पायबंद घालण्याबाबत परस्परांना सहकार्य करणे, दहशतवादी कारवाया, संघटित गुन्हेगारी, तस्करी आदींचा बंदोबस्त करणे अशी कामांची लांबलचक यादी असते. ही कामे पार पाडण्यासाठी देशपातळीवर एकमत व्हावे लागते मगच प्रत्यक्ष सीमारेषेवर चर्चा, वाटाघाटी, अन्यप्रकारे परस्परसंपर्क होऊ लागतात.

   भारत बांगलादेश सीमेवर अनेक लहानमोठी खिंडारेही आहेत. त्यामुळे बंगलादेशातून भारतात घुसखोरी/तस्करी सहज शक्य असते. हा उपद्रव वाढला असून तो रोखणे हे एक कठीण काम होऊन बसले आहे. त्यासाठी मंत्रीस्तरावर परस्पर चर्चा होत असतात.

 भारतात किती बांगलादेशी घुसखोर 

    गेल्या 5 वर्षात जवळजवळ 2,500 बांगलादेशींनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे भारतात प्रवेश मिळवल्याची नोंद आहे. नोंद न झालेले अनेक असू शकतात. अशांचा भारतात शोध घेणे एक जिकिरीचे काम होऊन बसले आहे. घुसखोरांची चेहरेपट्टी भारतीयांशी मिळतीजुळती असते. ते सफाईने बंगाली भाषा बोलू शकतात. त्यांनी वाममार्गाने आधार कार्डही बनवून घेतलेले असते. असे निदान 2 कोटी बांगलादेशी, आम्ही पश्चिम बंगालचेच आहोत असे म्हणत, आजमितीला भारतात रहात असतील, हे नक्की.  यापैकी अनेक भारतविरोधी कारवाया करतांना आढळले आहेत. 

   अडचणींवर मात

   पण केवळ साधे कुंपण घालून घुसखोरी थांबणार नाही. कुंपणाचेही काही नवीन प्रकार आता उपलब्ध झाले आहेत. यात तंत्रज्ञानावर आधारित देखरेख व्यवस्था योजलेली असते. सीमावर्ती भागात रस्त्यांचे जाळे तयार करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. त्यामुळे सीमेजवळ वेगाने हालचाली करणे शक्य होते. अर्थात याचा उपयोग तस्करही करू शकतात पण त्याला उपाय नसतो.

  कुंपण घालतांनाही अडचणी येतात. एक प्रमुख अडचण असते लहान लहान ओढे आणि ओहोळांची. तसेच मध्येच एखादा खोलगट टप्पा येतो. कधीकधी सीमारेषेपासून 150 यार्डाच्या आत मनुष्यवस्ती असते. ती लोकं आपली जागा सोडायला तयार नसतात. भूमिअधिग्रहणाची प्रकरणे लवकर मार्गी लागत नाहीत. अशा सर्व अडचणी आणि अडथळे पार करीतच 4,223   पैकी 3,751 किलोमीटर लांबीचे सीमेनजीकचे रस्ते बांधून तयार झाले आहेत. उरलेले मार्च 2024 पर्यंत पूर्ण होतील. प्रकाशझोत व्यवस्था पश्चिम बंगाल, मेघालय, आसाम, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यातून सीमेलगत केली जात असून 4,225 किलोमीटर पैकी 3,077 किमीपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. 

   पश्चिम बंगाल आणि आसाम मधील बांगलादेशी घुसखोरांची पहिली गंभीर दखल 2014 च्या निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी घेतली होती. यावेळीच त्यांनी इशारा दिला होता की, ‘भारतात बेकायदीशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींनी परत मायदेशी जाण्याची तयारी करावी हे बरे. या पूर्वी मतपेटीचा विचार करून या घुसखोरांचे रेड कार्पेट आंथरून स्वागत करण्यात आले आहे. मे  2014  नंतर हे लाड बंद होतील’, पश्चिम बंगालमधील सेरामपोर येथे बोलतांना मोदींनी ही तंबी घुसखोरांना दिली होती. 

   1947 मध्ये भारताची फाळणी झाली. यानंतर रॅडक्लिफ सीमारेषा ही भारत आणि पूर्व पाकिस्तानमधली सीमारेषा झाली. पुढे 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली. तेव्हापासून हीच सीमारेषा भारत आणि बांगलादेश यातील सीमारेषा झाली. बांगलादेश-भारत यातील 4,096 कि.मी. लांबीची सीमारेषा आता आंतरराष्ट्रीय सीमारेषा झाली आहे. भारतातून बांगलादेशात सुमारे ५४ नद्या वाहतात. अनेक ठिकाणी नदी हीच सीमा धरली आहे. परंतु या नद्या आपला मार्ग बदलत असल्यामुळे  या सीमा सतत बदलत्या राहिल्या आहेत. 

 एनक्लेव्ह किंवा अंत:क्षेत्र किंवा परवृत्त प्रदेश किंवा चितमहाल

   जेव्हा एका देशाचा छोटासा भूभाग दुसऱ्या देशाने पूर्णपणे वेढलेला असतो, तेव्हा त्या भूभागाला अंत:क्षेत्र किंवा परवृत्त प्रदेश (एनक्लेव्ह) असे म्हणतात. भारत आणि बांगलादेश यातील अशा भूभागांना चितमहाल असेही म्हटले जाते. भारत आणि बांगलादेश यात असे भूभाग निर्माण होण्यामागे ऐतिहासिक आणि भौगोलिक कारणे आहेत. भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली तेव्हा हा प्रकार घडून आला होता. सिरिल रॅडक्लिफ यांच्याकडे बंगाल आणि पंजाबची विभागणी भारत आणि पाकिस्तानमध्ये कशी करायची हे काम सोपविले होते. अतिशय वेगाने हे काम पूर्ण करा, असा आदेश  सिरिल रॅडक्लिफ यांना माऊंटबॅटन यांनी दिला होता. हुकुमाची तालिमी करीत रॅडक्लिफ यांनी हे काम केवळ सहा आठवड्यात पार पाडले. आणि हा नकाशा 16 ऑगस्ट 1947 ला जाहीर करण्यात आला. विभागणी कशी करू नये, याचे हे सर्वोत्तम उदाहरण ठरावे.

  आपापले हितसंबंध जपण्यासाठी संबंधितांनी आपल्याला हवे ते भूभाग भारत आणि पाकिस्तानमध्ये ‘टाकून’ घेतले. हा गुंता आजही पुरतेपणी सुटला नाही. कोणती अंत:क्षेत्र किंवा परवृत्त प्रदेश (एनक्लेव्ह) भारतात आणि कोणती पाकिस्तानात किंवा आजच्या बांगलादेशात, हे सांगणेही कठीण होऊन बसले आहे. आज 119 अंत:क्षेत्र किंवा परवृत्त प्रदेश (एनक्लेव्ह) भारतात असून त्यांच्यावर बांगलादेश आपला अधिकार सांगतो, तर 72 बांगलादेशात असून त्यांच्यावर भारत आपला अधिकार सांगतो आहे.

  पुढे यथावकाश 7 मे 2015 ला भारताच्या संसदेने 100 घटना दुरुस्ती पारित केली. यानुसार भारताला 51 अंत:क्षेत्रे म्हणजे 7000 एकर भूभाग मिळाला आणि बांगलादेशाला 111 अंत:क्षेत्रे म्हणजे 17,000 हजार एकर भूभाग मिळाला. भूमीच्या अदलाबदलीत ज्यांना भारतात यायचे होते ते नागरिक भारतात आले आणि ज्यांना बांगलादेशात रहावयाचे होते, ते बांगलादेशात गेले. उभयपक्षी समजुतदारपणाचे हे एक आंतरराष्ट्रीय उदाहरण मानले जाते.

   जर दोन देशांच्या सीमा एकमेकींना स्पर्श करीत असतील तर लहानमोठे वाद निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरावी लागणारच. पण या देशांनी सहकार्य आणि सहयोगाची भूमिका स्वीकारली तर शांततेबरोबर सुबत्तेचाही लाभ दोन्ही देशांच्या वाट्याला येऊ शकतो. आज बांगलादेशात बांगलादेशाचे निर्माते शेख मुजिबुर रहमान यांच्या कन्या शेख हसीना यांचे शासन आहे. भारताची मदत आपल्याला किती मोलाची आहे, याची त्यांना जाणीव होती व आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा समृद्ध वारसा असलेल्या भारतात आज मोदी शासन सत्तारूढ आहे. परस्पर सहयोगासाठी यापेक्षा आणखी चांगली परिस्थिती कोणती असू शकेल?

टीप - नकाशा स्वतंत्र ईमेलने पाठविला आहे.



No comments:

Post a Comment