Monday, December 26, 2022


हा 1962 चा भारत नाही.

तरूण भारत, नागपूर.   

मंगळवार, दिनांक२७/१२/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     


हा 1962 चा भारत नाही. 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   चीन संपूर्ण  अरुणाचल प्रदेशावरच आपला अधिकार आहे असे म्हणतो तर, अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग असल्याचे भारताने चीनला ठणकावून सांगितले आहे. तवांग सेक्टरमधील प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा चिनी सैनिकांचा डाव भारतीय जवानांनी नुकताच म्हणजे 9 डिसेंबर 2022 ला उधळून लावला. यापूर्वी एकदा दिवसा केलेला असाच प्रयत्न फसल्यामुळे यावेळी चिन्यांनी रात्रीची वेळ निवडली होती. चीनची घुसखोरी रोखताना जोरदार चकमक उडाली. या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. सहा जखमी भारतीय जवानांवर  गुवाहाटीमधील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 300 च्यावर चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्यातले कितीतरी सैनिक जखमी झाले असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. चिनी सैन्य ओढा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी करीत असतांना झालेला आवाज आणि  गोंधळ कळताच भारताने अंदाज घेण्यासाठी तातडीने 70 ते 80 जवानांना पाठविले. असे काहीतरी घडणार असल्याची कुणकुण भारताला अगोदरच लागली असल्यामुळे भारतीय जवान चिनी घुसखोरांना हुसकावण्यासाठी तयारीतच होते.  काही तास हाणामारी सुरू होती. या संघर्षात बंदुकीचा वापर झाला नसला तरी लाठ्या  आणि दगडांचा येथेच्च वापर करण्यात आला आणि शेवटी भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना परत जाण्यास भाग पाडले. ज्या ठिकाणी संघर्ष झाला, त्या ठिकाणी घनदाट जंगल आहे. चीनने आपल्या बाजूने पायाभूत सुविधा उभारल्या आहेत हे भारताला माहीत होते.  बर्फवृष्टी आणि दाटून आलेले ढग यामुळे भारतीय सॅटेलाइट्सना चिनी सैन्याच्या हालचाली टिपतांना अडथळे येत होते. म्हणून रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल जिओलोकेशन इक्पिमेंटचा वापर करून भारतीय सेनाधिकाऱ्यांनी सॅटेलाइट इमेजेस घेऊन चिन्यांच्या हालचाली टिपल्या होत्या. चीनची भूमिका आक्रमकाची असल्यामुळे हल्याचे स्थळ  आणि काळ तो निवडू शकतो आणि निवडतोही. भारताला मात्र सर्व सीमेवरच देखरेख ठेवावी लागते. हे अवघड काम आपले सेनाधिकारी किती चोखपणे बजावत असतात, याचा अनुभव यावेळीही पुन्हा आला.  

   सीमावर्ती प्रदेशातील संपर्क व्यवस्था 

  सद्ध्या चर्चेत असलेले तवांग आसामातील गुवाहाती पासून 555 किलोमीटर आणि तेजपूर पासून 320 किलोमीटरवर आहे. समुद्रसपाटीपासूनची तवांगची उंची 2669 मीटर आहे. तवांगची लोकसंख्या 11 हजारापेक्षा जास्त पण 12 हजारापेक्षा कमी आहे. तवांगला एक हेलिपॅड असून ते वायुदलाच्या वापरात आहे. उड्डान योजनेला अनुसरून ते लवकरच नागरी उड्डाणांसाठीही मोकळे करण्यात येणार आहे. नागरी विमान वाहतुक लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलॅाई या या गुवाहाती येथील विमानतळाहून नियमितपणे होत असते. गोपीनाथ बोर्डोलॅाई हे प्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी, आधुनिक आसामचे निर्माता आणि आसाम राज्याचे  प्रथम मुख्यमंत्री म्हणून आसाममध्ये सर्वज्ञात आहेत. तसेच तेजपूर येथील  सोलोनिबारी विमानतळावरूनही नागरी वाहतुक होत असते. सोलोनिबारी हे तेजपूर तवांग मार्गावरील एक ठाणे असून या ठिकाणी सैनिकी प्रशिक्षण केंद्र आहे. तवांग पासून सर्वात जवळचे ब्रॅाडगेज रेल्वे स्टेशन नाहारलागन हे असून ते रेल्वेच्या जाळ्यातील एक महत्त्वाचे केंद्र  आहे. पंतप्रधान मोदींनी नुकतीच ईशान्य भारताला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी संपर्कासाठी रेल्वेसह हाती घेतलेल्या इतर सर्व योजनांची तपशीलवार माहिती सांगितली आहे. यामुळे पर्यटनाला जशी उभारी मिळेल तशीच सैनदलाचाची हालचालही वेगाने होऊ लागेल. रूळमार्गात जसे उंच जागी पूल असतील तसेच बोगदेही असणार आहेत. सर्वात उंच पूल 11 हजार फूट उंचीवर असेल तर सर्वात लांब बोगदा 30 किलोमीटर लांब असणार आहे. रुळांच्या जोडीला दोन लेनचा रस्ताही असणार आहे. भूतानमध्येही तवांगशी संपर्क साधता येईल असे विमानतळ उभारले जात आहे. नॅशनल हाय वे एनएच 13 चे शेवटचे टोक तवांग असून अरुणाचलाची राजधानी इटानगरपासून ते 450 किलोमीटर दूर आहे. हा सर्व तपशील या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे की यामुळे संपूर्ण ईशान्य भारत मुख्य भारतभूमीशी जोडण्याचे जिकिरीचे आणि  कठीण काम 2014 पासून कसे नेटाने आणि जिद्दीने हाती घेतले गेले आहे, याची निदान तोंडओळख तरी होईल. मोदी शासन सीमाप्रश्नी उदासीन आहे, अशी  टीका करणाऱ्यांचे या माहितीमुळे समाधान होणे कठीण असले तरी अन्य भारतीयांसाठी ही माहिती नोंद घ्यावी, अशी असणार आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंर जे काम तातडीने हाती घेण्याची आवश्यकता होती ते काम हाती घ्यायला खरी  सुरवात वाजपेयी शासन दिल्लीत आल्यानंतरच झालेली आढळते. पण  हा कालखंड पाच सहा वर्षांचाच होता. पुढे नंतरच्या 10 वर्षात पुन्हा हा विचार काहीसा थंड्या बस्त्यातच पडला होता. यातून तातडीने पुन्हा काम सुरू झाले ते 2014 नंतर मोदी शासन दिल्लीत सत्तारूढ झाल्यावरच. असो.

   अरुणाचल प्रांतातल्या तवांग जिल्ह्यात वाहणारी मुख्य नदी आहे तवांग च्यू . संपूर्ण तवांग जिल्हा हे या नदीचे खोरे असल्या सारखे आहे. तिबेटमधून वाहत येणाऱ्या दोन नद्याही तवांग च्यू नदीला येऊन मिळतात. यानंतर ही संयुक्त नदी तवांग या गावाजवळून वाहत जाऊन भूतानमध्ये प्रवेश करते. भूतानमधून ती आसाममध्ये प्रवेश करते. यावेळी ही मानस नदी या नावाने ओळखली जाते. प्रत्यक्ष जलप्रवाह याहीपेक्षा क्लिष्ट स्वरुपाचे आहेत. तवांग गावाचा निकट संबंध तिबेट, अरुणाचल, भूतान आणि आसाम यांच्याशी कसा आलेला आहे, हे स्पष्ट होण्यासाठी ही माहिती उपयोगी पडू शकेल. चीनची वक्रदृष्टी सद्ध्या तवांगवर का आहे, हेही स्पष्ट होण्यासाठी हा तपशील उपयोगी पडावा  असा आहे.

  नष्टप्राय झालेल्या तिबेटी संस्कृतीचे एकमेव स्थान - तवांग 

   तिबेटची संस्कृती आज नष्ट होण्याच्या मार्गाला लागलेली आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही. आज फक्त तवांगमध्येच ती मोकळेपणी श्वास घेते आहे. तिबेटचे नेते दलाई लामा मार्च 1958 मध्ये चीनच्या तावडीतून निसटून भारतात आले तेव्हा ते तवांगच्या मठात काही काळ विसावले होते. म्हणून तिबेटींना तवांगचे विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच चीनलाही आज ना उद्या तवांगवर ताबा मिळवायचाच आहे आणि तिबेटी संस्कृती पुरतेपणी नामशेष करायची आहे. पण चीनने हे कारण असे उघडपणे आजवर मांडलेले नाही. तवांग जिल्ह्याचे मुख्यालय तवांग येथे आहे. एका बाबीची नोंद घ्यायला हवी आहे की तवांग हे एकच नाव जिल्ह्याला, गावाला आणि नदीलाही आहे! आणखी कशाकशाला आहे ते सद्ध्या न कळले तरी चालण्यासारखे आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेपासून तवांग 16 किलोमीटर अंतरावर आहे. तवांगलाच बुद्धधर्मीयांचा प्रसिद्ध गेलुग्पा मठ (मॅानस्टेरी) आहे. तोही चीनच्या नजरेत खुपतो आहे.

   तवांगचे सामरिक महत्त्व 

  तवांग या निसर्गसुंदर प्रदेशात मोनपा जमात वसती करून आहे. अरुणाचलाच्या अगदी पश्चिम टोकाला तवांग गाव आहे. म्हणजेच ते अरुणाचल (भारत), तिबेट (चीन) आणि भूतान यांना जवळजवळ स्पर्श करून आहे. म्हणूनच तवांग हा सामरिक दृष्ट्याही महत्त्वाचा भूभाग आहे. महाकाय हिमालयाचा हिस्सा असलेला हा भूभाग अति उंच शिखरे आणि खोलखोल दऱ्यांनी व्यापलेला आहे. सर्वात उंच शिखर 22,500 फूट उंचीचे आहे. असे असूनही हा प्रदेश पर्यटकस्नेही आहे, हे विशेष! बर्फाच्छादित शिखरे, स्वच्छ पाण्याची तळी, बोचरी पण सहन होईल अशी थंडी, मैत्रिभाव आणि ‘अतिथी देवो भव’ भाव जपणारे साधे भोळे गिरिजन यामुळे पर्यटकांना भुरळ पडली नसती तरच नवल होते. स्वच्छ वातावरणामुळे इथे घडणारे शिखरांचे दर्शन डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे, नवलाईच्या आणि विखुलेल्या वाड्या पाड्या आणखी बहुदा स्वर्गातच असतील. तवांग या नावाची कथा तरी हाच भाव निर्माण करणारी आहे.

  तवांग नाव कशावरून आले?

  ‘त’ चा अर्थ घोडा असा आहे तर ‘वांग’ म्हणजे खास किवा निवडक! हा खास घोडा मेराग लामा लोड्रे गियास्टो यांचा होता. या घोड्याने मठासाठीची जागा म्हणून हा भूभाग निवडला, असे एक दंतकथा सांगते. तप करण्यासाठी सुयोग्य जागा या ‘पारखी’ घोड्याने अचुक निवडली आहे. तप संपताच लामाने डोळे उघडले तर घोडा अदृश्य झाला होता. लामा त्या घोड्याच्या शोधात निघाला तेव्हा त्याला घोडा या जागी विश्रांती घेत उभा असलेला दिसला. या जागी एकेकाळी राजा काला वांगपो याचा राजवाडा होता. म्हणूनही ही जागा मठासाठी लामाने निवडली.

   दुसरीही एक दंतकथा सांगितली जाते, ती अशी. पद्म लिंग्पा या नावाची एक धनाढ्य व्यक्ती होती. अगदी दुसरा कुबेर म्हटले तरी चालेल. त्याने हे गाव वसवले.  ‘त’ हे टॅमड्रिंग तंत्र  ह्या  विद्येच्या नावातील आद्याक्षर आहे आणि ‘वांग’ याचा अर्थ दीक्षांत समारंभ. या दोन्हीचे मिळून झाले तवांग, म्हणजेच विद्याग्रहण करण्याचे स्थान किंवा केंद्र तवांग. कोणत्याही अंगाने विचार करा, तवांग आहे मात्र, एकमेवाद्वितीय!  म्हणूनच 9 डिसेंबरचे कांड घडले. तवांगच्या वाट्याला आणखीही बरेच काही वाढून ठेवलेले असणार हे उघड आहे. पण चीनला 9 डिसेंबरच्या घटनेनंतर  पुन्हा एकदा कळले असेल की, ’हा 1962 चा भारत नाही’.


टीप : सोबत नकाशा स्वतंत्र ईमेलने पाठवीत आहे.



No comments:

Post a Comment