My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Monday, December 12, 2022
हिमाचल प्रदेशाच्या निवडणूक निकालाचा ताळेबंद
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
2022 मध्ये हिमाचल प्रदेशाच्या 12 जिल्ह्यातील 68 मतदार संघातील 17 मतदारसंघ शेड्युल्ड कास्टसाठी तर 3 शेड्युल्ड ट्राईबसाठी आरक्षित असून 388 पुरुष आणि 24 महिला = 412 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले असता 55 लक्ष, 92 हजार, 828 मतदारांपैकी 75.6% मतदारांनी म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा थोड्याशा जास्तच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून एक विक्रमच प्रथापित केला. आप पक्ष कॅांग्रेस आणि भाजप यांच्याकडून निदान काही जागा तरी हिस्कावून घेईल ही निवडणूक पंडितांची अपेक्षा फोल ठरली. भरपूर मतदान म्हणजे नाराजी (अॅंटिइन्कम्बन्सी) चा जोर! मतदारांद्वारे सत्ताबदलाचा निश्चय, हे गृहीतक खरे ठरले.
निवडणूकपूर्व अंदाज - निवडणूकपूर्व अंदाज सांगत होते की, भाजप 48 ते 50 जागा घेऊन नंतर कॅांग्रेस आणि नंतर आप अशाक्रमाने 68 जागांचे विभाजन होईल. पण तसे झाले नाही. निवडणूकपूर्व अंदाजापेक्षा एक्झिट पोल्स अधिक विश्वसनीय मानले जातात. यात भाजपला कमीत कमी 24 जागा आजतकने वर्तविल्या होत्या तर जास्तीत जास्त 41जागा एबीपीने सांगितल्या होत्या तसेच कॅांग्रेसला कमीत कमी 24 जागा एबीपीने वर्तविल्या होत्या तर जास्तीत जास्त 40 जागा आजतकने देऊ केल्या होत्या.
सदस्य संख्या - 2017 सालच्या निकालानंतर सध्याच्या विधान सभागृहात भाजपचे बहुमतापेक्षा 9 जास्त म्हणजे 44 सदस्य होते, तर कॅांग्रेसचे 21 आणि अन्य 3 अशी स्थिती होती. 2019 मध्ये तर लोकसभेच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या. 2022 मध्ये मात्र सभागृहात भाजप 25, कॅांग्रेस 40 आणि अन्य 3 अशी सदस्यसंख्या आहे.
मतांची टक्केवारी - 2017 मध्ये भाजपला 48.8% मते होती तर 2022 मध्ये 43% म्हणजे 5.8 % मते कमी मिळाली आहेत. हा भाजपसाठी नाराजीचा (अॅंटिइन्कम्बन्सी) परिणाम मानावा लागेल. 2017 मध्ये कॅांग्रेसला 41.7% मते होती तर 2022 मध्ये 43.9 % म्हणजे 2.2 % मते जास्त मिळाली आहेत.
वेध टक्केवारी (स्ट्राईक रेट) - भाजपची वेध टक्केवारी 2017 मध्ये 64.7 % होती म्हणून जागा 44/68 मिळाल्या होत्या, ती 2022 मध्ये 36.8 % इतकी उतरली आणि जागा 25/68 अशा मिळाल्या. कॅांग्रेसची वेध टक्केवारी 2017 मध्ये 30.9 % होती म्हणून जागा 21/68 मिळाल्या होत्या, ती 2022 मध्ये 58.8 % इतकी चढली आणि जागा 40/68 अशा मिळाल्या.
मागास जाती व जनजाती (शेड्युल्ड कास्ट व शेड्युल्ड ट्राईब - 20 जागा) - 2017 मध्ये भाजपला 20 पैकी 15 असा हिशोब आहे तर 2022 मध्ये 20 पैकी 8 असा हिशोब आहे. 2017 मध्ये कॅांग्रेला 20 पैकी 5 असा हिशोब आहे तर 2022 मध्ये 20 पैकी 12 असा हिशोब आहे.
अग्निपथ योजनेचा परिणाम - 4 वर्षांची अग्निपथ योजना सैनिकीपेशाप्रधान हिमाचल प्रदेशातील जनतेला आवडली नाही. त्यांना सैन्यदलात कायमस्वरुपी नोकरी योजना हवी होती. प्रियंका वडेरा/गांधी यांनी केंद्रात सत्ता आल्यावर अग्निपथ योजना गुंडाळण्याचे आश्वासन कॅांग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणुकीत दिले होते. खरेतर हा बदल संसदेतच करता येऊ शकणारा आहे आणि संसदेच्या निवडणुका 2024 मध्ये आहेत. पण हे दूरच्या दिव्यासारखे आश्वासनही मतदारांवर परिणाम करते झाले. ही एक प्रमुख नाराजी (अॅंटिइन्कम्बन्सी) ठरली.
बंडखोरीचा फटका
या निवडणुकीत बंडखोरीने अक्षरशहा उच्छाद मांडला होता. आशीष शर्मा यांचे उदाहरण या दृष्टीने मनोवेधक आणि बोधप्रद आहे. यांना अगोदर भाजपने आणि नंतर कॅांग्रेसने उमेदवारी नाकारली. अवघ्या 48 तासात हे दोन्ही प्रकार घडले. ते अपक्ष म्हणून उभे राहिले आणि दोन्ही पक्षांच्या नाकावर टिच्चून 25 हजार 916 म्हणजे 47 % मते मिळवून निवडूनही आले. बंडखोरी हा शिस्तभंग, तो मान्य करायलाच नको. कारण तो मान्य केल्यास चुकीचा संदेश जातो. पण जेव्हा शिस्तभंगी भरभरून मते मिळवून निवडून येतो, तेव्हा पक्षाच्या निवडसमितीच्या निवडक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करीत नाही का? इथे तर दोन्ही पक्षांच्या निवडक्षमतेला आव्हान देऊन नाकारलेल्या उमेदवाराने त्यांच्याच पदरात त्यांच्या चुकीचे माप टाकल्यागत झाले नाही का? त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी कॅांग्रेसचे उमेदवार पुष्पिंदर वर्मा हे होते. भाजपचे नव्हते. पुष्पिंदर वर्मा यांना फक्त 13 हजार 17 मते होती. भाजपचा उमेदवार तर तिसऱ्या क्रमांकावर होता.
एकूण 35 बंडखोर उभे होते, त्यातले फक्त 2 निवडून आले. तेही मूळचे भाजपचे होते. उरलेले ‘व्होट कटवे’ सिद्ध झाले. काही प्रकरणी त्यामुळे अधिकृत उमेदवारांचा पराभवही झाला आहे, त्याबाबतचा सर्व तपशील अजून हाती आलेला नाही. भाजपचे बंडखोर उमेदवार होश्यार सिंग हे कांग्रा जिल्ह्यातील डेरा मतदार संघातून निवडून आले. होश्यार सिंग यांना 22 हजार 997 मते मिळाली तर भाजपच्या अधिकृत उमेदवाराला (रमेश चंद यांना) 16 हजार 730 मते मिळाली, मुख्य हे की, कॅांग्रेसच्या राजेश शर्मा यांना 19 हजार 120 मते मिळाली. म्हणजे भाजप बंडखोर पहिला, कॅांग्रेसचा उमेदवार दुसरा आणि भाजप अधिकृत तिसरा असा हा नामुष्कीचा दाखला आहे.
के एल ठाकूर हे भाजपच्या तिकिटावर 2012 मध्ये निवडून आले होते. पण 2017 मध्ये पडले. 2022 मध्ये त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांनी बंडखोरी करीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा आणि कॅांग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. बंडखोर ठाकूर यांना 33 हजार 427 मते मिळाली. हरदीप बावा या कॅांग्रेसच्या उमेदवाराचा त्यांनी 13 हजार 264 मतांनी पराभव केला. भाजपचा अधिकृत उमेदवार लखविंदर राणा हा तिसऱ्या क्रमांकावर होता.
निवडणुकीत एकूण 99 अपक्ष उमेदवार होते. भाजपचे 21 बंडखोर उमेदवार होते, तर 14 बंडखोर कॅांग्रेसचे होते. भाजपने फक्त 6 च बंडखोरांची हकालपट्टी केली. तर कॅांग्रेसने 5 च बंडखोरांना निलंबित केले होते.
हिमाचलने प्रथा बदलली नाही - आलटून पालटून सरकारे बदलण्याची प्रथा हिमाचलने बदलली नाही. भाजपच्या विजयाचा चौखूर उधळणारा रथ हिमाचलमध्ये थबकला. डबल इंजिनच्या सरकाराचा मोह हिमाचलवासीयांना प्रभावित करू शकला नाही. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा होम पिचवर पराभव झाला. प्रचाराची धुरा तर त्यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. पंतप्रधानांच्या सभांना तर भरबून गर्दी होत होती.मतदारांची भूमिका कडक आणि सुस्पष्ट होती. एका आड एक सरकार बदलण्याची प्रथा त्यांनी न सोडण्याचा निर्णय केला होता. त्यामुळे कॅांग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रचारासाठी आले नाहीत तरी सर्व प्रचार मोहीम दिवंगत लोकप्रिय मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्या पत्नी आणि संसद सदस्या, तसेच प्रदेश कॅांग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंग यांच्या नेतृत्वाखाली सुखविंदर सिंग सुखू यांनी चालविली. निकृष्ट प्रशासनव्यवस्था, विकासाचा अभाव, मतदारांना दिलेली पण पूर्ण न केलेली आश्वासने, कोविडची सदोष हाताळणी हे कॅांग्रेसच्या प्रचारातील स्थानिक पातळीवरील मुद्दे होते. प्रतिभा सिंग यांनी आमदारांना इकडेतिकडे न नेण्याचा धाडसी(?) निर्णय घेतला, याची माध्यमांनी नोंद घेतली. विधानपक्ष नेतेपदी अनेक नेत्यांनी दावा केला होता. शेवटी प्रचाराची धुरा सांभाळणारे सुखविंदर सिंग सुखू मुख्यमंत्री पदी, तर गेल्या 5 वर्षात विरोधी पक्षनेतेपदी असलेले मुकेश अग्निहोत्री उपमुख्यमंत्री होत आहेत.
असे का झाले? - पराभवासाठी भाजप अध्यक्षांना दोष देता येणार नाही. काही विशिष्ट मतदारसंघांबाबत मुख्यमंत्री जय राम ठाकूर सरकार सापत्न भावाने वागले, असा त्यांच्यावर आरोप केला जातो. तो चूक की बरोबर हा प्रश्न नाही. जनमानसात तशी भावना निर्माण झाली होती, हे महत्त्वाचे. उमेदवारांची निवड चुकली असाही आक्षेप घेतला जातो. कॅांग्रेसमधून आयात केलेल्यांवर अवाजवी भरवसा ठेवला जातो आहे, या तक्रारींचा गांभीर्याने विचार झाला नाही. बंडखोरांना आवरता आले नाही. या बरोबर उमेदवार नसलेल्या स्थानिक नेत्यांनीही नाराज होत उदासीन राहण्याचे ठरविले. 21 पैकी फक्त 6 च बंडखोरांची हकालपट्टी केली गेली. या मागचे कारण लवकर लक्षात येण्यासारखे नाही. 2017 मघ्ये प्रेमकुमार धुमल यांनी पूर्ण प्रांतभर निवडणूक मोहीम राबविली होती. यावेळी त्यांच्या वाट्याला एक लहानसा हिस्सा देण्यामागचे नियोजनही लक्षात येत नाही. यामुळे राज्यभर दुहेरी नाराजी (अॅंटिइन्कम्बन्सी) पसरली होती. उपऱ्या कॅांग्रेसजनांची वरवर सुरू होती आणि धुमलांची मात्र उपेक्षा करीत त्यांचा वावर मर्यादित केला गेला. यामागे पक्षाचीही काही भूमिका असू शकते हे मान्य केले तरी ते कार्यकर्त्यांच्या गळी उतरले नाही, हा मुद्दा राहतोच.
नाराजी (अॅंटिइन्कम्बन्सी) ची कारणे - जुन्या पेंशन योजनेला नकार, सफरचंद उत्पादकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष, महामार्गासाठी अधिगृहीत जमिनीवर चौपट मोबदला देण्याच्या आश्वासनापासून घुमजाव यासारखी असल्याचे सांगितले जाते.
निरनिराळ्या खेळी - निवडणुकी आधी केंद्राने ‘हाती’ जमातीला अनुसूचित जमातीत सामील करून घेऊन चतुर चाल खेळल्याच्या भ्रमात सर्व होते. आता ट्रान्स-भागातील 5 जागा आपल्याच, हा अतिविश्वास ठरला. हातीबहुल भागात कॅांग्रेसचा उमेदवार विजयी झाला. कधीकधी फासे उलटे पडतात म्हणतात, ते असे. उना जिल्ह्यातील हरोलीला बल्क ड्रग पार्क देऊ केल्यामुळे भाजपचा फायदा काही प्रमाणात नक्कीच झाला असणार, पण तेवढ्याने ती जागा काही पदरात पडली नाही. दिग्गज कॅांग्रेस पुढारी, माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेता, मुकेश अग्निहोत्री, यांनी या सर्वावर मात करीत हरोलीची जागा आपल्या हाती ठेवलीच. स्थानिक नेतृत्व आपले पाय रोवून पक्के उभे असेल, जनमानसात त्याला आदराचे स्थान असेल, ते जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले असेल तर ऐनवेळी टाकलेला फासा त्याच्या विरोधात यशस्वी ठरत नाही, हा धडा या निमित्ताने सर्वांनीच लक्षात ठेवावा, असा आहे. मुख्यमंत्री 38 हजार 183 अशा विक्रमी मताधिक्याने जिंकले खरे तसेच आणि अन्य दोन मंत्रीही विजयी झाले पण हे तीन वगळता उरलेले 9 मंत्री धाराशाही झाले यावरूनही नाराजी (अॅंटिइन्कम्बन्सी) किती होती ते लक्षात येते यावेळी गुजराथ मधली ‘सबको बदल डालूंगा’, ही नीतीच उपयोगी ठरते. केंद्राच्या आणि राज्याच्या कल्याणकारी योजना, पंतप्रधानांची धवल प्रतिमा यांच्या आधारे ‘रिवाज’ वर मात करून दुसऱ्यांदा हिमाचलवर सत्तेवर येण्याचे भाजपचे स्वप्न मतदानातील अल्पशा उण्या टक्केवारीने किंवा मतसंख्येने साकारले गेले नाही. चालायचच प्रत्येक खेळी यशस्वी ठरतेच असे नसते.
हार जीत कोणाची आणि कशी?
0000 -1000 च्या फरकाने भाजपने जिेंकलेल्या जागा 3; तर कॅांग्रेसच्या 05
1001 - 5000 च्या फरकाने भाजपने जिेंकलेल्या जागा 8; तर कॅांग्रेसच्या 16
5001-10,000 च्या फरकाने भाजपने जिेंकलेल्या जागा 9; तर कॅांग्रेसच्या13
10,001 पेक्षा जास्त फरकाने भाजपने जिेंकलेल्या जागा 5; तर कॅांग्रेसच्या 06
कॅांग्रेस 43.9 मते% म्हणजे 1852504 मते आणि भाजप 43% मते म्हणजे 1,814530 मते, असा अल्प फरक होता. पण फक्त 0.9% किंवा 1,852504-1,814530 = 37974 (सदतीस हजार नऊशे चव्हरॅहत्तर) मतांचा फरक 15 जागांच्या फरकासाठी कारणीभूत ठरावा ना? यावर कुणाचा विश्वास बसेल का?(कॅांग्रेस 40 जागा - भाजप 25 जागा =15 जागांचा फरक), अन्य 3 हे गणित मात्र असाच हिशोब करते आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment