My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Monday, December 5, 2022
इस्रायलमधील अस्थिर सरकारांची स्थिर धोरणे
तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक ०६/१२/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
इस्रायलमधील अस्थिर सरकारांची स्थिर धोरणे
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर 440 022 मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
इस्रायलमध्ये पक्षांची बजबजपुरी आहे. नित्य नवनवीन पक्ष जन्माला येत असतात तसेच काही अस्तंगतही होत असतात. असे का होत असेल? तर इस्रायल मधील निवडणूकविषयक नियमांमुळे असे होत असते. इस्रायलमध्ये पक्षच निवडणूक लढवू शकतात. एकटी व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. म्हणून एखाद्याला निवडणूक लढविण्याची इच्छा झाली तर तो अगोदर नोंदणीसाठी आवश्यक असलेले किमान सदस्य गोळा करतो, पक्ष स्थापन करतो आणि त्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवतो. त्या व्यक्तीची लढण्याची इच्छा पूर्ण झाली आणि तो विजयी झाला तर ठीक आहे. विजयश्रीने माळ घातली नाही आणि तो निराश होऊन स्वस्थ बसला तर तो पक्ष संपतो किंवा संपल्यातच जमा होतो. त्यामुळे इस्रायलमध्ये डझनावारी पक्ष जसे नित्य निर्माण होत असतात, तसेच ते अंतर्धानही पावत असतात.
असे असले तरी निदान आठ दहा पक्ष इस्रायलमध्ये सुरवातीपासून टिकून आहेत. ते आघाड्या करून निवडणूक लढवतात किंवा एकमेकात विलीन तरी होऊन नवीन पक्ष तयार करून निवडणूक लढवतात. यांचा हिशोब ठेवतांना अभ्यासकांच्या मेंदूला मुंग्या न आल्या तरच नवल! या पक्षांचे तसेच त्यांच्या आघाड्यांचे उजवे, डावे, अतिउजवे, अतिडावे, मध्यममार्गी, धार्मिक उदारतावादी किंवा कडवे असे विविध प्रकार आहेत.
याशिवाय असे की, इस्रायलमध्ये ज्यू 80 टक्के तर अरब 20 टक्के आहेत. त्यामुळे ज्यूंचे पक्ष, अरबांचे पक्ष आणि आता या दोघांमधले मवाळ एकत्र येऊन क्वचित तयार होणारे संयुक्त पक्षही आहेत. शिवाय असे ही की सर्व ज्यूंचा धर्म जरी एकच असला तरी त्यांच्यात पंथही काही कमी नाहीत. त्यामुळे पंथाभिमान जोपासणारे पक्षही आहेत. यांचे सहाजीकच आपापसात फारसे सख्य नसते. तसेच इस्रायलमध्ये आलेले ज्यू अनेक देशातून आपली मायभूमी पुन्हा एकदा वसवण्याच्या एकाच तीव्र इच्छेने आलेले असले तरी, त्यांच्या अनेक पिढ्या ज्या देशात गेलेल्या असतात त्या देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाचा त्यांच्यावर अपरिहार्यपणे परिणाम झालेला असतो. जसे की, रशियासारख्या साम्यवादी देशातून आलेल्या ज्यूंवर साम्यवादाचा परिणाम झाल्याशिवाय कसा राहील? त्याचप्रमाणे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली या सारख्या लोकशाहीवादी देशातून आलेले ज्यू साम्यवादाच्या परिणामांपासून मुक्त आणि साम्यवाद्यांशी फटकून वागणारे असतात, हे स्वाभावीकच म्हटले पाहिजे. ज्यूंमध्येही कट्टर आणि मवाळ आहेतच, असणारच. एक मात्र मानले पाहिजे की जेव्हा इस्रायलच्या अस्तित्वाचा किंवा अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा मात्र हे सगळे एकदम एक होतात. या मुद्द्याबाबत तसेच आर्थिक धोरणांबाबत मात्र त्यांच्यात फारसे मतभेद नसतात. त्यामुळे इस्रायलमधल्या सरकारांमध्ये अस्थिरता असली तरी धोरणात मात्र एक किमान सातत्य आढळून येते आणि आर्थिक सुबत्तेलाही बाधा पोचत नाही, हे विशेष! पण आता हळूहळू जहाल मवाळ असे नवीन पोटभेद निर्माण व्हायला सुरवात झालेली आढळते. कालमानानुसार ते तसे होणारच.
इस्रायल मधील पक्ष आणि 120 जागांचा हिशोब
1 लिकुड पार्टी - नॅशनल लिबरल मूव्हमेंट किंवा लिकुड म्हणजे घट्टपणे एकत्र असलेला (कन्सॅालिडेटेड) पक्ष, 1973 मध्ये अनेक छोटे पक्ष एकत्र येऊन तयार झालेला हा पक्ष मध्यममार्गी पण उजवीकडे झुकलेला पक्ष आहे. बेंजामिन नेतान्याहू हे स्वतंत्र इस्रायलमध्ये जन्मलेले नेते आहेत. महिलांचे बाबतीत सैल वर्तन असलेले बेंजामिन नेतान्याहू कडवे ज्यू आहेत. नोव्हेंबर 2022 च्या निवडणुकीत या पक्षाला 23.41% मते व 32 जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील जागांपेक्षा 2 ने जास्त आहेत.
2 ब्ल्यू अँड व्हाईट पार्टी - ही मध्यममार्गी उदारमतवादी आघाडी आहे. 2019 मध्ये रेझिलियन्स पार्टी, येश एटिड पार्टी आणि टेलेम पार्टी यांनी ही आघाडी उभारली आहे. बेंजामिन नेतान्याहू यांचा पराभव करायचाच असा दृढनिश्चय करून हे पक्ष एकत्र आले होते. मात्र नोव्हेंबर 2022 च्या निवडणुकीत ही आघाडी अस्तित्वात नव्हती ती दुभंगली होती. त्यामुळे जागांचा हिशोब नाही.
या आघाडीतील येश पार्टी हा उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष आणि मध्यमवर्गीयांचा पक्ष आहे. येर लेपिड यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला नोव्हेंबर 2022 च्या निवडणुकीत 17.78% मते व 24 जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील या पक्षाच्या जागांपेक्षा 7 ने जास्त आहेत.
3 शास पार्टी - शास हा स्पेनमधून परागंदा झालेला अतिअति सनातनी हेराडी ज्यू पंथ आहे. हे फक्त हलाखा ह्या ज्यू कायद्याशिवाय आणि परंपरेशिवाय आणखी इतर कोणतेही आधुनिक नीती नियम मानायला तयार नसतात. एवढेच नव्हे तर हे इतरांचा तिरस्कार करणारेही आहेत. खरे ज्यू आपणच, असे मानणारे हे ज्यू आहेत. कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्यात शास पार्टी असतेच, असे संख्याबळ या पक्षाचे पार्लमेंटमध्ये असते. आर्ये डेरी यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला नोव्हेंबर 2022 च्या निवडणुकीत 8.24 % मते व 11 जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील जागांपेक्षा 2 ने जास्त आहेत.
4) युटीजे पार्टी - या पक्षाचे पूर्ण नाव युनायटेड टोरा ज्युडाइझम असे आहे. ही खरेतर दोन हेराडी पंथीय पक्षांची आघाडी आहे. यिझाक गोल्डनॅाफ यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला नोव्हेंबर 2022 च्या निवडणुकीत 5.88 % मते व 7 जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील जागांइतक्याच आहेत.
5) हाडाश-ताल पार्टी - ही हाडाश पक्ष आणि ताल पक्ष आणि अन्य डावे पक्ष यांची आघाडी आहे. हिचे स्वरूप एखाद्या तंबू सारखे आहे. म्हणजे असे की, डावीकडे झुकलेल्या सर्व पार्ट्या या आघाडीत असतात. आयमन ओडे यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला नोव्हेंबर 2022 च्या निवडणुकीत 3.75 % मते व 5 जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील जागांइतक्याच आहेत.
6) इस्रायली लेबर पार्टी उर्फ हावोडा पार्टी - हा पक्ष सामाजिक लोकशाहीचा आणि ज्यू राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता आहे. कामगार चळवळ उभारणारे सर्व नेते या पक्षाशी संबंध ठेवून असतात. धर्मातीत आणि राष्ट्रवादी भूमिका घेणारा हा पक्ष मध्यममार्गी पण काहीसा उजवीकडे झुकलेला पक्ष आहे. मेराव मिचेली यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला नोव्हेंबर 2022 च्या निवडणुकीत 3.69 % मते व 4 जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील जागांपेक्षा 3 ने कमी आहेत.
7) रिलिजिअस झिओनिस्ट पार्टी - पॅलेस्टाईन किंवा सीरिया यांना तसूभरही भूमी देण्यास या पक्षाचा विरोध आहे. यातील काहीतर सर्व वेस्ट बॅंक ताब्यात घ्या, असे म्हणणारे आहेत. पण बहुतेकांची भूमिका वेस्ट बॅंकचा 63% भाग ताब्यात घ्यावा अशी आहे. या पक्षाचा समलिंगी विवाहांना धार्मिक कारणास्तव विरोध आहे. स्थलांतरित अरबांची हकालपट्टी, सरकार नियंत्रित न्यायपालिका यावर या पक्षाचा भर आहे. या पक्षाच्या भूमिका ज्यू वर्चस्ववाद आणि अरबविरोध यावर आधारित असतात. बेझानेल स्मॅाटरिच यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला नोव्हेंबर 2022 च्या निवडणुकीत 10.83% मते व 14 जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील जागांपेक्षा 8 ने जास्त आहेत.
😎 नॅशनल युनिटी पार्टी - प्रत्यक्षात ही एक आघाडी आहे. बेनी गॅंट्ज यांची ब्ल्यू व्हाईट पार्टी आणि गिडिऑन साऽर यांची न्यू होप पार्टी यांच्या या आघाडीवर माजी चीफ ऑफ स्टाफ, गादी इझनकोट यांचा वरदहस्त आहे. बेनी गॅंट्ज यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला नोव्हेंबर 2022 च्या निवडणुकीत 9.08 % मते व 12 जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील जागांपेक्षा 2 ने कमी आहेत.
9) यिसरायेल बेटिनू पार्टी - हा पक्ष अॅव्हिक्डॅार लिबरमन यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा धर्मनिरपेक्ष, राष्ट्रवादी उजवीकडे झुकलेला पक्ष आहे. हे ज्यू रशियातून स्थलांतरित झालेले आहेत. हा पक्ष दिवसेदिवस क्षीण होत चालला आहे. या पक्षाला नोव्हेंबर 2022 च्या निवडणुकीत 4.49 % मते व 6 जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील जागांपेक्षा 1 ने कमी आहेत.
10) राऽम पार्टी - या पक्षाचे नाव युनायटेड अरब लिस्ट पार्टी असेही आहे. पण हे नाव आज फारसे प्रचारात नाही. इस्लामिक चळवळीची ही राजकीय शाखा आहे. हिची स्थापना 1996 या वर्षी झालेली आहे. मन्सूर अब्बास यांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला नोव्हेंबर 2022 च्या निवडणुकीत 4.07 % मते व 5 जागा मिळाल्या आहेत. या विसर्जित सभागृहातील जागांपेक्षा 1 ने जास्त आहेत.
लिकुड पार्टी -32, रिलिजिअस झिओनिस्ट पार्टी -14, शास- 11, युटीजे -7 अशा एकूण 64 सदस्यांच्या पाठिंब्यावर नेतान्याहू यांचे गेल्या 4 वर्षातले 5 वे सरकार इस्रायलमध्ये सत्तारूढ होते आहे. पहिले सरकार एप्रिल 2019 मध्ये, दुसरे सप्टेंबर 2019 मध्ये, तिसरे मार्च 2020 मध्ये , चौथे मार्च 2021 मध्ये आणि आता नोव्हेंबर 2022 मध्ये पाचवे सरकार स्थापन झाले आहे. सरकारे अस्थिर पण धोरणे मात्र स्थिर आणि आर्थिक प्रगतीही अव्याहत, हा जागतिक दर्जाचा चमत्कार करावा, तो इस्रायलनेच.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment