Monday, October 23, 2023

 हेरगिरीच्या सम्राटाला बेसावध गाठले!!!

तरूणभारत, नागपूर मंगळवार दि २४ .१०.२०२३हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॉगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.   

हेरगिरीच्या सम्राटाला बेसावध गाठले!!!

वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड.  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022   9422804430    Email- kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 


   इस्रायलला आपल्या गुप्तहेर यंत्रणेचा सार्थ अभिमान आहे. पण हमास या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याचा तिला सुगावा लागू नये, ही आश्चर्यकारक घटना 7 ऑक्टोबर 2023 ला घडली  आणि इस्रायलचे जगभर हसे झाले.  असे म्हणतात की, हमासने अगोदर इस्रायलची सर्व संपर्क यंत्रणाच उध्वस्त केली. सद्ध्या सुरू असलेले युद्ध इस्रायल जिंकेल यात शंका नाही. पण या विजयाने सद्ध्या झालेली बेअब्रू आणि फजिती कधीही विस्मृतीत जाणार नाही. कारण कुंपणापलीकडे असलेल्या गाझापट्टीत हमासची सर्वंकष स्वरुपाच्या हल्ल्याची, ‘ऑपरेशन अल अक्सा फ्लड’ची तयारी निदान काही महिने अगोदरपासून सुरू असली पाहिजे. पण हे इस्रायलला कळू नये, ही बाब आश्चर्यकारक आहे. हल्ल्यांसाठी शस्त्रास्त्रांचा पुरवठा इराणने व तुर्कीने केला याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. डझनावारी फायटर विमाने इस्रायलच्या हद्दीत घुसली. रॅाकेट्सना हवेतच नष्ट करणारी ‘आयर्न डोम’ यंत्रणा/व्यवस्था इस्रायलने विकसित केली आहे. पण यावेळी तिला यश मिळाले नाही. हल्ल्यात दूरवरच्या जेरुसलेम आणि तेलअविव मधल्या इमारती सुद्धा जमीनदोस्त झाल्या.

  गाझा पट्टीवर आहे हमासची सत्ता 

   गाझा पट्टीत सध्या हमास हा दहशतवादी गट सत्तेवर आहे. गाझा पट्टीतून आधी हजारो छोटी क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि नंतर जमीन व समुद्रमार्गे हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये शिरले. त्यांनी  वेगवेगळ्या किबुत्झमध्ये  योम किप्पूरची सुट्टी साजरी करणाऱ्या नागरिकांवर बेछुट गोळीबार केला. नंतर सीमा ओलांडून आत घुसलेल्या दहशतवाद्यांनी  परततांना अनेक महिला आणि मुले यांना ओलीस म्हणून गाझा पट्टीत नेले आहे.

अनेक किबुत्झचा नाश 

   किबुत्झ हा इस्रायलमधील सामूहिक जीवन जगणारा गट आहे. बहुतेक स्थलांतरित ज्यू असे गट करून ठिकठिकाणी राहतात. एका किबुत्झमध्ये अनेक कुटुंबे असतात. एक हजारपर्यंतच्या व्यक्तींचे ‘सांघिक’ स्वरुपाचे सामूहिक जीवन हे स्थलांतरित लोक जगत असतात. किबुत्झमधील सामूहिक एकजिनसीपणा  टोकाला पोचलेला असतो. इतका की आपल्या कोणत्याही मुलाचे पितृत्व नक्की कुणाकडे आहे, हे कोणतीही आई सांगू शकत नाही, असे म्हणतात. स्थलांतरितांच्या या किबुत्झकडे आजच्या सांस्कृतिक मापदंडाने पाहण्यात अर्थ नाही. उलट किबुत्झ हा एखाद्या ग्रंथाचा आणि समाजशास्त्रज्ञांसाठीचा संशोधनाचा विषय असू शकेल. विशेष हे आहे की, इस्रायलमधील 3% लोक असे एकत्र जीवन जगतात!  हमासच्या हल्ल्यात अनेक किबुत्झ नष्ट झाले आहेत. भूतलावरच्या वाटेवेगळ्या सामूहिक जीवनाचे प्रतीक असलेली एक जीवन पद्धती हमासच्या हल्ल्यात फार मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. या हल्ल्याची ही एक वेगळ्याच प्रकारची पण अपरिमित हानी म्हणावी लागेल. 

  हिजबुल्ला गट 

   लेबॅनॅान मध्ये मूळ धरून बसलेल्या हिजबुल्ला गटानेही इस्रायल बरोबर संघर्ष करायला सुरवात केलेली आहे. हिजबुल्ला म्हणजेच शियांचा ‘अल्लांचा पक्ष’. हा राजकीय गट जसा आहे तसाच तो एक लष्करी गट सुद्धा आहे. मौलवीही असलेला हसन नसरल्ला हा या गटाचे नेतृत्व करतो. हिजबुल्लाचा राजकीय गट लेबॅनॅान मधील रेझिस्टन्स ब्लॅाक या राजकीय पक्षासोबत असतो तर लष्करी  दहशतवादी गट हल्ले करतो.  सद्ध्याच्या लष्करी संघर्षात छुपेपणाने इराण, तर उघडपणे हमास आणि हिजबुल्ला गट हे तिघे सक्रिय आहेत. पैसा आणि शस्त्रास्त्रे पुरवून इराण आणि तुर्कस्तान हे गटाचे महत्त्वाचे छुपे साथीदार बनले आहेत. 

 हमास या दहशतवादी संघटनेची शाखा लेबॅनॅानमध्येही सक्रिय असून ओसामा हमदान हा या शाखेचा प्रमुख आहे. इस्रायलवर हमासने हल्ला करताच लेबॅनॅानमधूनही हल्ले होण्यास सुरवात का झाली ते लक्षात येण्यासाठी हा तपशील उपयोगी पडेल असा आहे. अशाप्रकारे इस्रायलला लागून असलेल्या लेबॅनॅानमधून हल्ले सुरू झाल्यामुळे इस्रायलला दुसऱ्या आघाडीवरही लढावे लागत आहे. अरबांनी इस्रायलशी शांतता करार करावेत म्हणून अमेरिका प्रयत्न करीत असून त्या प्रयत्नांना यशही येत चालले होते. अमेरिकेशी या बाबतीत स्पर्धा करीत चीनही अशाच खखटपटीत आहे. लेबॅनॅानशिवाय सीरिया, जॉर्डन आणि इजिप्त यांच्याही सीमा इस्रायलला लागून आहेत. पैकी इजिप्तने इस्रायलला मान्यता दिलेली आहे. पण या तिघांपैकी सीरिया आणि जॉर्डन  यांनी जर इस्रायलशी युद्ध सुरू केले तर या संपूर्ण आखातात दीर्घ काल संघर्ष सुरू राहील आणि तो अतिशय रक्तरंजित असेल. सद्ध्या इराणचे विदेश मंत्री सीरियाला भेट द्यायला निघाले असतांना इस्रायलने दमास्कस विमानतळावर क्षेपणास्त्रे डागली. त्यांना विमानातून उतरता आले नाही व परत जावे लागले.  युद्धाच्या कक्षा वाढू नयेत म्हणून अमेरिकेने आपली शस्त्रदले भूमध्य सागरात आणून ठेवली आहेत आणि या युद्धात आणखी इतर कुणी दखल देऊ नये, असा दम दिला आहे. सद्ध्या सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये शांतता व सहकार्याचा करार व्हावा असे प्रयत्न सुरू आहेत. इतर अरब राष्ट्रांनीही असे शांतता करार इस्रायलशी करावेत म्हणूनही अमेरिका प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना बऱ्यापैकी यशही येत चालले होते. ही प्रक्रिया थांबावी म्हणून इराणला हाताशी धरून चीनच्या चिथावणीने हा संघर्ष सुरू झाला आहे, यात शंका उरलेली नाही.  इराण आणि चीन यात सद्ध्या व्यापार आणि अन्य बाबतीत सहकार्याचे वातावरण आहेच. या संघर्षाचा बोलविता धनी म्हणून चीनकडे अंगुली निर्देश का केला जातो, यावर या तपशीलामुळे प्रकाश पडू शकेल. आता एका अरब राष्ट्राविरुद्ध युद्ध करणाऱ्या इस्रायलशी करार करण्यापूर्वी सौदी अरेबिया दहादा विचार करील. इस्रालयमध्ये हल्ला करतांना हमासच्यावतीने पत्रके टाकण्यात आली आहेत.  ‘पॅलेस्टाईनला वगळून इस्रायल सोबत शांतता करार कसा काय केला जाऊ शकतो अशा आशयाचा मजकूर या पत्रकात आहे. तसेच हमासच्या प्रवक्त्यांनी सर्व अरब विश्वाला इस्रायलविरुद्ध एक होण्याबाबत आवाहन केले आहे. पण इस्रायलच्या निर्धारावर या आवाहनाचा परिणाम होणार नाही, हे नक्की. इस्रायलची चिंता वेगळीच आहे. हमासने आपल्यासोबत जे नागरिक आणि इस्रायली सैनिक नेले आहेत त्यांच्याबरोबर अनेक महिला व मुलांनाही ओलीस म्हणून  नेले आहे. यांची सुखरूप सुटका हा इस्रायलसमोरचा आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे. इस्रायलने म्हणूनच गाझा पट्टीची कोंडी केली असून वीज आणि जीवनावश्यक सर्व घटकांचा गाझा पट्टीला होत असलेला पुरवठा थांबवला आहे. ओलिसांना सोडाल तरच कोंडी उठेल, असा इशारा इस्रायलने हमासला दिला आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मन फौजांनी लेनिनग्राडची अशीच कोंडी केली होती. यामुळे थंडी आणि उपासमारीमुळे लाखापेक्षा जास्त लोक मेले होते, 

  सद्ध्या इस्रायलकडून हमासच्या तळांवर जबरदस्त हल्ले होत आहेत. इस्रायसचे पंतप्रधान नेतान्याहू त्यांनी हमासविरुद्ध युद्धाचीच घोषणा केली आहे.  


No comments:

Post a Comment