Monday, October 9, 2023

                                       निज्जरचा मारेकरी कोण?

तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक १०/१०/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो

निज्जरचा मारेकरी कोण?

लेखांक२ रा

वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड.  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022   9422804430    

Email- - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

निज्जरचा मारेकरी कोण?

    खलिस्तानवादी चळवळीचा एक नेता हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात हत्या झाली. ही हत्या एकतर आपापसातील वैमनस्यातून तरी झाली असावी किंवा तो टोळीयुद्धातला एक टप्पा तरी असावा. टोळ्यांमध्ये हे असे प्रकार अधूनमधून होत असतात. अशाप्रकारे अनेकदा दोन टोळ्याच एकमेकींना संपवतात सुद्धा! एक मात्र नक्की की, याचा भारताशी काहीही संबंध नाही. भारतात अनेक उत्पात घडवून आणणारा  हरदीपसिंग निज्जर याला कॅनडाने काही वर्षांपूर्वीच नागरिकत्व बहाल केलेले होते. तर इकडे भारतात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते आणि तो भारतालाही हवा होता. त्याला कायदेशीर मार्गाने भारतात आणून त्याच्यावर रीतसर व कायदेशीर मार्गाने शिक्षा करण्यासाठीच्या हालचाली  भारताने सुरू केल्या होत्या. पण त्याची अशाप्रकारे मारेकऱ्याकरवी हत्या करणे भारताला साफ नामंजूर असून तसे भारताचे धोरण नाही. पण या हत्येशी भारताचा संबंध जोडून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत भारतावर या हत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला. एवढ्यावरच न थांबता कॅनडाने भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्याला परत पाठविण्याचा निर्णयही घेतला. याचे कारण काय ? तर आपल्या सेवाकाळात हा अधिकारी भारताची गुप्तहेर  संघटना रॅा मध्ये काही काळ काम करीत होता म्हणून! भारताने कॅनडाचा हा आरोप फेटाळून तर  लावलाच,  शिवाय प्रत्युत्तरादाखल कॅनडाच्याही एका राजनैतिक अधिकाऱ्यास पाच दिवसांत देश सोडून जाण्यास सांगितले. तेव्हापासून भडकलेले  हे प्रकरण दिवसेदिवस पेटतच चालले असून आता चीन आणि पाकिस्तान या भारताच्या  वैऱ्यांच्या रांगेत कॅनडाही जाऊन बसतो की काय असे वाटू लागले आहे.

  कॅनेडियन पंतप्रधानांचा बेजबाबदार आरोप 

   भारताला सतत उपद्रव देणाऱ्या खलिस्तानवादी अतिरेक्यांना कॅनडा कायमच आश्रय देत आलेला आहे. त्यामुळे भारताचे त्या देशाशी संबंध पूर्वीपासूनच काहीसे तणावाचेच राहिले आहेत. आताच्या आततायी कृतीने तर त्या देशाने भारतासोबतचे संबंध पार बिघडवून टाकले आहेत. याचा परिणाम म्हणून भारत-कॅनडा यांच्यात होऊ घातलेली मुक्त व्यापार करारावरील चर्चाही भारताकडून स्थगित करण्यात आली आहे.

 कॅनडा हा शिखांची वस्ती असणारा सगळ्यांत मोठा देश आहे. लाखो शीख तेथे पिढ्यानुपिढ्या राहतात आणि आज कॅनडाचे अर्थकारण, राजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी यात शिखांचा फार मोठा सहभाग निर्माण झाला आहे. कॅनडामधील राजकीय पक्ष आणि नेते यांना तेथील शिखांच्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतात, त्यांचे म्हणणे ऐकावेच लागते,  त्यांचे मत दुर्लक्षून  राजकारणात काहीच करता येणार नाही कारण एक जबरदस्त मतपेढी शिखांनी उभी केली आहे. 

हरदीपसिंग निज्जर

   आत्ता ज्या व्यक्तीमुळे वाद निर्माण झाला आहे तो हरदीपसिंग निज्जर हा ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या संघटनेचा प्रमुख होता. भारताच्या दृष्टीने तो फक्त एक दहशतवादी होता. भारतीय तपास यंत्रणांनी त्याची माहिती देणाऱ्याला दहा लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. अशा या निज्जरची 18 जून 2023 रोजी व्हँकुअरचे उपनगर सरे येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्या बाबत तपास चालूच आहे. तो संपलेला नाही. मात्र, या हत्या प्रकरणात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय गुप्तचर यंत्रणांकडे अंगुलीनिर्देश केला आहे. कोणताही पुरावा नसताना ट्रुडो यांनी या हत्येचे खापर भारतावर फोडणे, योग्य नव्हते. कॅनडा सरकारकडे अशा स्वरुपाचे काही पुरावे असतीलच तर ते त्याने भारत सरकारकडे आधी सोपवायला हवे होते. तसे न करता ट्रुडो जाहीरपणे का बोलले? पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि सद्ध्याचे भाजपनेते अमरिंदर सिंह यांच्या मते  यामागे कॅनडामधील राजकारण आहे. भारतात सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर एका वर्षाने 2025 मध्ये कॅनडात निवडणुका होऊ घातल्या आहेत. ट्रुडो यांना आता सत्तेत येऊन अनेक वर्षे झाली आहेत. त्यांना आता स्पष्ट, निर्विवाद बहुमत मिळणार नाही, असा राजकीय पंडितांचा कयास आहे. अशा वेळी श्रीमंत, प्रभावी आणि बलदंड शीख समुदायाची मतपेढी  आपल्यासोबत असावी, असे ट्रुडो यांना वाटते आहे.  त्यामुळे त्यांनी भारतविरोधी आणि शिखांना खूश करतील अशी विधाने  बेछूट  असली तरी केली असणार यात शंका नाही. 

 शेतकरी आंदोलनात खलिस्तान्यांची घुसखोरी 

   भारतात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात काही कॅनेडियन शिखांनी स्थानिक शिखांना भरपूर मदत केली होती. एवढेच नव्हे तर कॅनडा सरकारने घेतलेली भूमिकाही कॅनेडियन शिखांसारखीच  संशयास्पद होती. आणि दिल्लीच्या सीमेवरील तंबूंमध्ये घुसलेल्या खलिस्तानी समर्थकात कॅनेडियन खलिस्तानी शीखही होते.  निज्जर आणि इतरही अनेकांनी तेव्हा या आंदोलनात चिथावणीखोर भूमिका वठवली होती. या सर्व आंदोलकांना आणि कॅनडात राहून उघडपणे खलिस्तानवादी संघटना चालविणाऱ्यांना, भारताचा मित्र या नात्याने  कॅनडा सरकारने प्रतिबंध करायला हवा होता. या उलट कॅनडा सरकार त्यांची वकिली करीत होते. कॅनडा आणि भारत यांच्यातील या संघर्षाचा आर्थिक परिणाम काय होतो हे भविष्यात दिसेलच. जी-20  परिषदेसाठी ट्रुडो राजधानीत आले, तेव्हा त्यांनी भारताला न आवडणारी काही विधाने केली होती. मसूर डाळींबाबत भारतात पडणारी तूट कधी कधी कॅनडा भागवतो. दोन लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी कॅनडातील अनेक विद्यापीठांमध्ये शिकत आहेत. लाखो भारतीय कुटुंबे कॅनडाच्या विकासात सिंहाचा वाटा उचलत आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रुडो यांच्यासारखे पोरकट नेते हे संबंध गेली अनेक वर्षे क्रमाक्रमाने बिघडवत आले आहेत. मात्र, यातून जगातील काही देशांमध्येच नाहीत तर  भारतातही खलिस्तानी कट्टरवाद्यांना आनंदाच्या उकळ्या फुटतांना दिसत आहेत.  भारत हे मुळीच खपवून घेणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यासाठी कॅनडा सरकारला हे समजेल अशा भाषेतच उत्तर देण्याला दुसरा काहीही पर्याय दिसत नाही. 

  पंजाबमधून पूर्वीपासूनच कॅनडात स्थलांतर होत आले आहे. कॅनडात शीख समुदायाची संख्या मोठी आहे आणि आता तेथे हा एक प्रभावी समाजघटक ठरला आहे. इतकेच काय, कॅनडाच्या पंतप्रधानपदी लवकरच शीख व्यक्ती दिसू शकेल, असेही काही निरीक्षक म्हणतात. जालंदर येथे जन्मलेला हरदीप निज्जर 1997 मध्ये कॅनडाला गेला. तिथे तो सुरुवातीला प्लंबर म्हणून काम करायचा. तिथे त्याचा संबंध ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या खलिस्तानवादी संघटनेशी आला. पाकिस्तानची गुप्तचर संघटना इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स, अर्थात ‘आयएसआय’ने सुरुवातीपासूनच ‘बब्बर खालसा’ला बळ दिले आहे. तर भारताने ‘बब्बर खालसा’ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करून तिच्यावर बंदी घातली आहे. हरदीप नंतर ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या संघटनेचा प्रमुख बनला. व्हॅँकुअरचे उपनगर असलेल्या सरे येथील गुरुद्वारात राहून तो भारतविरोधी कारवाया करायचा. अगदी अलीकडे तो या गुरुनानक गुरुद्वाराचा प्रमुख म्हणून निवडूनही आला होता. एका हिंदू पुजाऱ्याची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप होता. 18 जून रोजी याच गुरुद्वाराच्या दारात अज्ञात मारेकऱ्यांनी निज्जरची गोळ्या घालून हत्या केली. त्याचे खापर कॅनडा भारतावर फोडतो आहे. एक मित्रराष्ट्र या नात्याने कॅनडाची ही भूमिका निषेधार्य आहे.


No comments:

Post a Comment