Monday, December 25, 2023

 शिया  आणि सुन्नी यांची अप्रत्यक्ष युती

तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक 26.12. 2023 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.

वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड.  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022   9422804430    

Email- - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 


शिया  आणि सुन्नी यांची अप्रत्यक्ष युती.

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३० 

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

  मुस्लिम ब्रदरहूड या नावाने परिचित असलेल्या सुन्नी मुस्लिम संघटनेचे मूळ नाव ‘जमात अल इख्वान अल- मुस्लिम’, म्हणजेच  ‘सोसायटी अॅाफ मुस्लिम ब्रदर्स’, असे आहे. इजिप्तमध्ये 1928  साली स्थापन झालेल्या या संघटनेचा  संस्थापक ‘हसन अल-बन्ना’ या नावाचा इस्लामी विद्वान पेशाने शिक्षक होता. अरब जगातातील हमास सारख्या अनेक संघटनांवर या संघटनेचा प्रभाव आहे. 

  2011 मध्ये जानेवारी महिन्यात इजिप्तमध्ये राजकीय क्रांती घडून आली. 2012 मध्ये इजिप्तमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या राजकीय पक्षाचा मुस्लिम ब्रदरहूडने पुरस्कार केला होता. परंतु दहशतवादी कारवायांमुळे त्या सरकारने मुस्लिम ब्रदरहूडवर कठोर कारवाई केली व 2015 मध्ये तिला दहशतवादी संघटना म्हणून घोषितही केले. सध्या इजिप्त, बहारिन, रशिया, सीरिया, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरात अशी मोठी व प्रभावी राष्ट्रे तिला दहशतवादी संघटनाच मानतात.

    मुस्लिम ब्रदरहूडचे लक्ष्य कुराण व सुन्नाह वर आधारित मुस्लिम व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक व राजकीय जीवनपद्धतीची पुनर्स्थापना करणे हे आहे. पण आज कतार व तुर्कस्थान हे  दोनच मुख्य देश मुस्लिम ब्रदरहूडचे पाठीराखे उरले आहेत.

  कटकारस्थान रचण्याचे, खून घडवण्याचे आणि प्रस्थापित शासन व्यवस्था उलथवण्याचे या संघटनेचे प्रयत्न उघडकीस आले आहेत. 2016 नंतर तर डोनाल्ड ट्रंप यांनी सत्तेवर येतायेताच इस्लामिक दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्याला अनुसरून अमेरिकेने मध्यपूर्वेतील मुस्लिम ब्रदरहूडच्या शक्तिस्थानांना नष्ट करण्यासाठी दग्धभू धोरण स्वीकारण्यासही मागेपुढे पाहिलेले नव्हते.

   प्रारंभी अरब देशात या संघटनेने सनदशीर मार्गांनी सत्ता हस्तगत केली खरी,  पण  हिचा लोकशाहीवर विश्वास नाही.  इजिप्तमध्ये तर हिचा उमेदवार मोहम्मद मोर्सी अध्यक्षपदी निवडून आला होता. पण वर्षभरातच हिंसक निदर्शनानंतर, कमालीचा असंतोष निर्माण होऊन शेवटी इजिप्तमध्ये राज्यक्रांती घडून आली आणि मोहम्मद मोर्सीला घरच्या घरी स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते. 17 जून 2019 ला मोर्सीचे  इजिप्तमध्ये तुरुंगातच निधन झाले.

   खुद्द मुस्लिम ब्रदरहूडचा मात्र, आपण शांततेचा पुरस्कार करणारे व लोकशाहीवर विश्वास ठेवणारे असून हिंसाचाराचा निषेध करणारे आहोत, असा दावा आहे. 

सुन्नीपंथी हमास 

  अशा या  मुस्लीम ब्रदरहूड  नावाच्या ज्यू विरोधी संघटनेतून हमास या संघटनेचा जन्म झाला आहे. आज हमासचे नेतृत्व इस्माईल हनीय यांच्याकडे आहे.  हमासने लोकशाही पद्धतीने फतेह या प्रतिस्पर्ध्याचा 2006 मध्ये निवडणुकीत पराभव करून गाझा पट्टीत (पॅलेस्टाईनचा एक प्रांत) सत्ता काबीज केली. तेव्हापासून लपण्यासाठी, संरक्षणासाठी आणि येजा करण्यासाठी भुयारांची जोडजाळी विणून हमासने सर्वप्रकारची आयुधे, दारूगोळा यांचा संग्रह तिथे आणि इतरत्र गोळा करून ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायलवर अचानक हल्ला केला.  या हल्ल्यात 1200 नागरिक मृत्युमुखी पडले तर नागरिक व सैनिक मिळून 240 व्यक्ती ओलीस म्हणून हमासने ताब्यात घेतल्या. हा इस्रायलवर झालेला आजवरचा  सर्वात जबरदस्त हल्ला होता. हमासने अनेक निरपराध नागरिकांची हत्या तर  केलीच आणि अनेकांना ओलीस म्हणूनही बरोबर नेले. हे सर्व अजूनही मुक्त झाले नाहीत, ते लवकर मुक्त होतील, असे वाटतही नाही. त्यांना भुयारातच कोंडून ठेवले असेल, असे गृहीत धरून इस्रायलने त्यांना बाहेर काढण्यासाठी भुयारे पाण्याने भरण्यास सुरवात केली आहे. पण ही वेळखाऊ क्रिया आहे. या काळात ओलिसांना भुयारातच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकणी हलवणे सहज शक्य आहे. गाझापट्टीतील एकूण  20 हजारावर नागरिक आणि सैनिक यांना इस्रायलने यमसदनी पाठविले असले आणि उद्या आणखी एवढ्याच लोकांना ठार केले तरी 20 लाख पॅलेस्टिनियनांपैकी लाखो  शिल्लक राहतीलच. त्यातले अनेक आज हमासचे विरोधकही असतील/नव्हे तसे ते आहेतच, ते हमासकडे वळू शकतात. म्हणजे हमासला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचे इस्रायलचे उद्दिष्ट पूर्ण होणे किती कठीण आहे, हे उघड आहे.

लेबॅनॅान मधील  शियापंथी हिजबुल्ला 

   दुसरे असे की,  हिजबुल्ला (अल्ला यांचा पक्ष) ही शियापंथी मुल्लिमांची राजकीय संघटना आहे. ही संघटना हमासप्रमाणे सुन्नींची नाही. यातला एक गट अतिरेकी (मिलिटंट) आहे, 1992 पासून या गटाचे नेतृत्व लेबनीज धर्मगुरू हसन नसरुल्लाकडे आहे. याचा जन्म शिया कुटुंबात लेबॅनॅानची राजधानी बैरूटमध्ये 1960 मध्ये झाला. ही हिजबुल्लाची  जिहादी शाखा आहे. हिजबुल्लाचा राजकीय गट ‘लॅायल्टी टू दी रेझिस्टंट ब्लॅाक पार्टी’ या नावाने लेबॅनॅानच्या संसदेत ओळखला जातो.

   शियापंथी हिजबुल्लाच्या जिहादी शाखेने शत्रूवत  सुन्नीपंथी हमासला पाठिंबा दिला आहे. असे आजवर क्वचितच घडले असेल. मात्र या अतिरेकी हिजबुल्ला गटाने इस्रायलवर रॅाकेट व ड्रोन यांच्या सहाय्याने मारा जरी सुरू केला असला तरी हमासप्रमाणे इस्रायलच्च्या सीमा मात्र ओलांडल्या नाहीत. इस्रायलनेही हिजबुल्लाच्या हल्ल्याला लेबॅनॅानच्या सीमा न ओलांडता  चोख उत्तर दिले आहे.

   येनेनमधील शियापंथी हूती 

  तिसरे म्हणजे,  येमेनच्या शियापंथी हूती बंडखोरांनी तुर्कस्तानहून भारताकडे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाचे, ते इस्रायलचे जहाज आहे असे समजून लाल समुद्रात नुकतेच  अपहरण केले. ओलीस म्हणून ठेवलेल्या जहाजावरील एकूण २५ कर्मचाऱ्यांमध्ये एकही भारतीय नागरिक नव्हता.  हे जहाज इस्रायलचे असल्याचे हूतींनी सांगितले. परंतु, इस्रायलने हूताींचे हे म्हणणे खोडून काढले. जहाजाच्या मालकांपैकी एक इस्रायली होता, हे मात्र खरे. जहाजाचे नाव ‘गॅलेक्सी लीडर’ असून ते भारताच्या दिशेने येत होते, हेही खरे आहे. सना या येमेनच्या राजधानीतील हूतींनी इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात स्वतंत्रपणे प्रवेश केला, त्यांनी इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. 

  हूती ही एक येमेनच्या सुन्नी शासनाविरोधात शिया मुस्लिम गटाने चालवलेली चळवळ आहे. हूती हे शिया मुस्लिमांमधील झायदी या गटात मोडतात. हूती ही एक  दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते.  शियापंथी हूतींना शियाबहुल  इराणचा पाठिंबा आहे.  येमेनच्या उत्तरेकडील भागात या हूतींचे मूळ निवासस्थान आहे. ‘झायदी’ गटाचे एकेकाळी येमेनवर राज्य होते. पुढे ते लयाला गेले. 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात हूतींनी ‘झायदी’ शाखेच्या  पुनरुत्थानासाठी चळवळ सुरू केली. एकतर मुस्लिमांध्ये सुन्नी बहुसंख्य (80%) आहेत, तर शिया अल्पसंख्य(20%) आहेत. या अल्पसंख्याकांमध्येही झायदा अल्पसंख्य आहेत. थोडक्यात असे की झायदा हा शियापंथी मुस्लिमांमधला अति चिमुकला गट आहे. या गटाला शियापंथी इराणचा पाठिंबा लष्करी आणि आर्थिक स्वरुपाचा आहे. हूतींनी सप्टेंबर 2014 मध्ये येमेनची राजधानी सना ताब्यात घेतली आणि 2016 पर्यंत उत्तर येमेनच्या बर्‍याच भागावर ताबा मिळवला. शियापंथी इराणचे इस्रायलशी वैर असल्यामुळे शियापंथी हूतीही इस्रायलच्या विरोधात उभे ठाकले आहेत. याशिवाय असे की, 2003 मध्ये  अमेरिकेने  शियापंथी इराकवर हल्ला केला होता तेव्हापासूनच  शियापंथी हूती अमेरिकेच्या आणि अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या इस्रायलच्या विरोधात गेले आहेत.  शियापंथी इराणची सुन्नीपंथी हमास, शियापंथी हिजबुल्ला आणि शियापंथीच हूती या तिघांनाही एकाच वेळी सक्रिय चिथावणी आहे. तोडीस तोड म्हणून एकटा असूनही इस्रायल एकाच वेळी एकेकाला चांगलेच झोडपून काढतो आहे. आता बोला?


Monday, December 18, 2023

 हेन्री किसिंजर दुटप्पी की दुहेरी

तरूणभारत,नागपूर १९.१२.२०२३

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.

हेन्री किसिंजर दुटप्पी की दुहेरी

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 

Email- kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee?


  नुकतेच निधन पावलेले अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री  हेन्री किसिंजर वयाच्या शंभराव्या वर्षीही राजकीयदृष्ट्या सक्रिय होते. परराष्ट्र संबंधात  भावनेच्या आहारी न जाता आपला व्यवहार असला पाहिजे, यावर त्यांचा भर असे. त्यांचा नोबेल पारितोषिक प्रदान करून जसा गौरव करण्यात आला होता, तसाच युद्ध गुन्हेगार म्हणून धिक्कारही त्यांच्या वाट्याला आला होता. ते नक्की कसे होते हे सांगणे कठीणआहे. 

 भारताचा कमालीचा द्वेश 

  1970 च्या दशकात तर  त्यांच्या  भारतद्वेष्टेपणाला ऊत आला होता.  भारतीय लोक गेली 600 वर्षे खुषमस्करी करणारे भिक्कारडे लोक होते, असे दूषण  भारतीयांना देणारे, इंदिरा गांधी यांच्या विषयी पराकोटीची वर्णद्वेषी व स्त्रीद्वेषी विधाने  व शिवीगाळ करणारे म्हणून जसे हेन्री किसिंजर कुख्यात होते, तसेच  पुढच्या काळात सपशेल माफी मागून इंदिरा गांधींविषयी आपल्याला अपार आदर आहे अशी त्यांची स्तुतीही करणारे, 1972 मध्ये भारत आणि जपानला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे स्थायी सदस्यत्व दिले जावे अशी रोखठोक भूमिका घेणारेही किसिंजरच. किसिंजर  मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे प्रभावित झाले होते. 2018 साली भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तोंडभर कौतुक करणारे, जून 2023 मध्ये मोदी अमेरिकेच्या भेटीवर असतांना प्रकृती ठीक नसतांनाही त्यांच्या सन्मानार्थ दिलेल्या सरकारी मेजवानीसाठी आवर्जून उपस्थित राहणारे, त्यावेळचे मोदींचे भाषण लक्षपूर्वक ऐकणारे, नंतर पुढाकार घेऊन मोदींशी स्वत:हून संवाद साधणारेसुद्धा हेन्री किसिंजरच.

      नवीन तंत्रांची निर्मिती 

    अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तसेच परराष्ट्र सचिव असतांना त्यांनी वाटाघाटींच्या/ संवादांच्या माध्यमातून  राजकीय क्षेत्रातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ‘पॅालिसी ऑफ डेंटेट’ या नावाने ओळखला जातो. हेन्री किसिंजर यांनी अमेरिका आणि रशिया व चीन यातील वैमनस्य कमी व्हावे म्हणून हे तंत्र वापरून पाहिले व त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही झाले.

 तणाव कमी करण्याचे तंत्र म्हणून हेन्री किसिंजर यांनी स्वत:ही एक नवीन तंत्र विकसित केले आहे. ते ‘शटल डिप्लोमसी’ म्हणून ओळखले जाते. यात जेव्हा दोन वैरी देश (नेते) एकमेकांचे तोंडही पाहण्यास तयार नसतात तेव्हा मध्यस्थ तडजोडीसाठी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांची आलटून पालटून भेटी घेतो, त्यांच्या अटी एकमेकांना सांगतो,  आणि शेवटी मध्यम मार्ग काढून त्या दोघात एकमत घडवून आणतो. अरब आणि इस्रायल यातील हाडवैर संपवण्यासाठी 1973 मध्ये किसिंजर यांनी हे तंत्र वापरले. व्हिएटनाम आणि अमेरिका यातील युद्ध थांबवण्यासाठी हेन्री किसिंजर यांनी व्हिएटनामच्या प्रतिनिधीशी पॅरिसमध्ये वाटाघाटी केल्या. किसिंजर अमेरिकेतून पॅरिसला येत तर उत्तर व्हिएटनामचे प्रतिनिधी ले डक थो हे व्हिएटनामधून पॅरिसला येत आणि त्यांच्यात बोलणी होत. या दोघांनाही नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण या काळात त्यांचे नाव कंबोडियावरील अमेरिकेच्या गुप्त बॉम्बहल्ल्याशी आणि दक्षिण आफ्रिकेतील क्रूर लष्करी राजवटीशी जोडले गेले होते, त्यामुळे त्यांच्या नावावरून नोबेल शांतता पुरस्कार निवड समितीत वाद निर्माण झाला होता. त्यांच्यासोबत वाटाघाटीत सहभागी असलेले उत्तर व्हिएटनामचे ले डक थो यांनाही किसिंजर यांच्या बरोबर नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पण त्यांनी नोबेल पारितोषक नाकारले. त्यांचे म्हणणे असे होते की, आमच्यातील वाटाघाटीनंतर अजूनही शांतता निर्माण झालेली नाही. यावेळी  निवड समितीच्या सदस्यात तीव्र मतभेद झाले होते. दोन सदस्यांनी तर आपल्या पदाचा राजीनामाच दिला होता. अमेरिकेची नामुष्की कमी करण्यासाठी व्हिएटनाम युद्ध संपावे म्हणून किसिंजर यांनी 1973 मध्ये उत्तर व्हिएटनामशी पॅरिस शांतता करार घडवून आणला. पुढे जेव्हा उत्तर व्हिएटनामने करार मोडून दक्षिण व्हिएटनामचा ताबा घेतला तेव्हा हेन्री किसिंजरन यांनी  पारितोषिक परत करण्याचा प्रयत्न करून पाहिला.

  हेन्री किसिंजर यांच्यावर इतर देशातील प्रस्थापित राजवटींना उलथून लावण्यासाठी बंडखोरीला मूक संमती दिल्याचा (टॅसिट सपोर्ट) आरोप केला जातो. चिलीमधील साम्यवादी राजवट उलथून टाकण्याच्या  बंडाला त्यांचा असा पाठिंबा होता. तसेच अर्जेंटिनातील सैन्यदलाने जनतेलाच वेठीला धरले तेव्हा किसिंजर यांनी  तिकडे काणाडोळा केला असे म्हणतात.

   जर्मनीतील बॅव्हेरिया प्रांतात हेन्री किसिंजर यांचा एका मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात इतिहासप्रसिद्ध न्युरेम्बर्ग शहराला आता लागून असलेल्या फर्थ या गावी झाला. जन्मत: बुजरा (शाय) असलेल्या हेन्रीचा बालपणापासून असलेला जर्मन भाषेतील उच्चारणातील स्वराघात (अॅक्सेंट) करण्याची लकब  जन्मभर कायम होती. 

  1938 मध्ये किसिंजर अमेरिकेत आश्रयाला आले आणि त्यांनी  हार्वर्डमध्ये राज्यशास्त्राच्या अभ्यासाला सुरवात केली. हॉर्वर्डमध्ये त्यांना सर्व सन्मान मिळाले पण प्राध्यापकाची नोकरी मात्र मिळाली नाही. पुढे हॉर्वर्डने प्राध्यापकपद देऊ केले पण तेव्हा हेन्री किसिंजर यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद स्वीकारत प्राध्यापकपद नाकारले.

   1957 मध्ये हेन्री किसिंजर यांनी ‘अण्वस्त्रे मर्यादित स्वरुपात वापरण्यास हरकत नाही’, असा विचार मांडणारी ‘न्युक्लिअर वॅार थिअरी’, मांडली. यानुसार  अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांचा नेमकेपणाने केलेला वापरही रणनीतीचा एक भाग  म्हणून  ग्राह्य ठरतो. या पुस्तकाने हेन्रींना जगभर कुप्रसिद्धी मिळवून दिली. रिचर्ड निक्सन यांनी 1968 मध्ये हेन्री किसिंजर यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद आणि परराष्ट्रव्यवहार मंत्रिपद बहाल केले. या काळात आंतरराष्ट्रीय जगतात शीतयुद्ध चरम पंथाला पोचले होते. क्युबाप्रकरणी भडका उडताउडता थांबला होता. अमेरिकन फौजा व्हिएटनाममध्ये साम्यवाद्यांशी लढत होत्या आणि रशियाने झेक रिपब्लिकची राजधानी असलेल्या प्राग शहरावर आक्रमण केले होते.

   निक्सन आणि किसिंजर यांनी रशियाबरोबरची बंद पडलेली अण्वस्त्र कपात विषयक बोलणी पुन्हा सुरू केली व  चीनच्या माओशी गुप्तपणे संपर्क साधून चीनशी दोस्ती करून चीनचे 23 वर्षाचे एकाकीपण संपवले व रशियाला शह देण्याचा प्रयत्न केला.  याच काळात अमेरिकेने तटस्थ कंबोडियावर साम्यवादी फौजांना आश्रय दिल्याचे निमित्त साधून बेसुमार बॅाम्बफेक करून निदान 50 हजार निष्पाप नागरिकांना यमसदनी पाठविले. यामुळे जगात आणि खुद्द अमेरिकेतही अभूतपूर्व गदारोळ उठला होता.

बांगलादेशचे युद्ध आणि दुक्कलीचे मनसुबे 

  बांगलादेश युद्धाचे वेळी भारताला थोपवण्याठी अमेरिकेचे 7वे आरमार बंगालच्या उपसागराच्या दिशेने निघाले होते. पण भारताने विमानमार्गे जाऊन पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल नियाझी यांनाच ताब्यात घेतले आणि पुढे पूर्व पाकिस्तानचे रुपांतर बांगलादेशमध्ये झाले. उरलेले पाकिस्तानही भारत काबीज करील, अशी भीती अमेरिकेला वाटत होती. या घटनेमुळे भारत अमेरिका यातील संबंधात निर्माण झालेली कटुता अनेक वर्षे टिकून होती. किसिंजर पाकिस्तानचे चाहते होते, ते का? तर चीनशी गुप्त भेटीगाठी घडवून आणण्याच्या प्रयत्नात त्यांना तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान याह्याखान यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. बहुदा म्हणूनच भारताला अमेरिकेने शस्त्रे पुरवू नयेत यासाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. शेवटी भारताने ॲागस्ट 1971 मध्ये रशियाशी शांतता, मैत्री  व सहकार्य करार केला. तो आजही टिकून आहे. 

  हेन्री किसिंजर गीता आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र यांचे गाढे अभ्यासक होते. आपली वैशिष्ट्ये, श्रेष्ठता आणि ज्येष्ठता पाश्चात्यांच्या तोंडून ऐकली म्हणजे अनेकांना लवकर पटते, असा अनुभव आहे. गेलेल्याबद्दल वाईट बोलू नये, असाही संकेत आहे. पण त्याशिवाय समीक्षा सम्यक कशी होणार? 



Monday, December 11, 2023

 शी जिनपिंग आणि ज्यो बायडेन : मतभेदाचे मुद्दे

तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक 12.12. 2023 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.

शी जिनपिंग आणि ज्यो बायडेन : मतभेदाचे मुद्दे

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 

Email- kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee?


चीनची चिंता आणि अमेरिकेची अपरिहार्यता या दोन्ही मुद्यांचा विचार केल्याशिवाय शी जिनपिंग आणि बायडेन यांच्या भेटीच्या फलिताचे मूल्यमापन करता येणार नाही. सॅनफ्रान्सिसको येथील चर्चेनंतरही उभय देशात काही काही मतभेद कायम आहेत. तैवानची स्वायत्तता हा प्रश्न चीन  आणि अमेरिका या दोघांसाठीही सारखाच महत्त्वाचा आहे. 

  तैवान प्रकरणी मतभेद कायम 

   तैवानच्या सुरक्षेचा मुद्दा अमेरिका नजरेआड होऊ देणार नाही. कोणताही शब्दच्छल न करता बायडेन यांनी हे भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत स्पष्ट केले. 1948 साली माओच्या साम्यवादी मुक्ती सेनेने चिआंग काई शेख यांना चीनच्या मुख्यभूमीवरून हुसकावून लावल्यानंतर त्यांनी आजच्या तैवान म्हणजे तेव्हाच्या फॅार्मोसा या अविकसित बेटावर माघार घेतली. आजच्या तैवानची अर्थव्यवस्था मात्र मुक्त आणि अतिविकसित आहे. तिला भूतलावरचे  ‘एकॅानॅामिक मिरॅकल’ म्हणून गौरविले जाते. मायकोचिप आणि इलेक्ट्रॅानिक उद्योगात तैवानचे स्थान जगात सर्वोच्च मानले जाते. 1948 साली चीनवर जणू जागतिक बहिष्कारच  होता. पण जगाचा तैवानवर बहिष्कार नव्हता. चीन आपल्याला हव्या असलेल्या वस्तू तैवानमधून तस्करी करून मिळवीत होता.  तैवान ही चीनची बाह्य जगाशी संपर्क साधण्याची जणू खिडकीच होती. आज चीन एक महासत्ता आहे. त्याला तैवान किंवा हाँगकाँग सारख्या खिडक्यांची आवश्यकता नाही, तर आता त्याला यांचा ताबा हवा आहे. पण विकसित तैवानला हे मान्य नाही. तसेच अमेरिकेचाही तैवानवर वरदहस्त आहे. म्हणून सद्ध्यातरी चीन गुगुरत हात चोळीत बसला आहे. तैवानप्रकरणी या दोन महासत्तांमधली बोलणी फिसकटली आहेत.

  दुसरा असाच फिसकटलेला मुद्दा आहे दक्षिण चिनी समुद्राबाबतचा. अगोदर शेजारच्या देशाशी सीमावाद उकरून काढायचा, आपल्या सीमा त्या देशात सरकवायच्या, जुन्या इतिहासकाळातील तथाकथित दाखले/नकाशे समोर करायचे,  पुढे त्या भूभागावर अधिकार सांगायचा, समुद्रातील आणि उपसागरातील बेटांवरही आपला अधिकार सांगायचा, कृत्रिम बेटेही तयार करायची आणि नवीन प्रदेश जिंकून घ्यायचा, टाकलेल्या चार पावलांपैकी चर्चेत फक्त दोन पावले मागे घ्यायची, असे चिनी विस्तारवादाचे बहुमुखी स्वरूप आहे. हे आपल्याला मान्य नाही, असे अमेरिकेने चीनला स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

 चीनच्या समजुतदारपणामागचे रहस्य

   चीन अधूनमधून समजुतदारपणा दाखवत असतो. त्याला तशीच काही कारणे आहेत. कोविडमुळे चीनची घसरलेली अवस्था अजूनही पुरतेपणी सावरलेली नाही. महागाई इतकी वाढेल, असे चीनला वाटत नव्हते. चिनी जनता आज पूर्वी कधी नव्हती एवढी अस्वस्थ आणि असंतुष्ट आहे. चीनमधील परकीय उद्योग बाहेर पडत आहेत. चीनमध्ये मूलच नको, असा विचार वाढत चालला आहे. त्यामुळे लोकसंख्या घटते आहे. असे असले तरी चीन आजही एक महासत्ताच आहे. पण भारतासारखे विकसनशील देश आणि चीन यातील असमतोल कमी होत चालला आहे, ही सुद्धा वस्तुस्थितीच आहे. याशिवाय चीनच्या आक्रमक हालचालींना असलेला विरोध  अमेरिकेने कायम ठेवला असून आर्थिक निर्बंध मागे घेतले जााणार नाहीत हे ठासून सांगितले आहेत.

चीनमधील मानवाधिकाराचे हनन 

   आजच्या  चीनमधील शिझियांग (सिकियांग) राज्यात/प्रांतात गत 2,500 वर्षात डझनावारी राज्ये/साम्राज्ये जन्माला आली, फुलली, फळली व शेवटी लयाला गेली. याहीपेक्षा मागे जातो म्हटले तर महाभारतात या सिकियांग प्रदेशाला ‘तुषार’/‘तुखार’ हे नाव दिलेले दिसते. दिग्विजय यात्रेत अर्जुनाने हा भाग जिंकल्याचेही उल्लेख आहेत.  अशा या अतिप्राचीन व इतिहासप्रसिद्ध पण आजच्या चिनी भागात अगोदरपासूनच सुरू असलेला वाद सध्या विकोपाला गेला आहे. सुरवात अशी आहे की, मध्य आणि पूर्व आशियात उघुर नावाचा एक तुर्किक वांशिक गट होता/आहे. ह्यातील बहुतेक लोक आज धर्माने मुस्लीम आहेत. चीनमधील शिझियांग (सिकियांग) नावाच्या राज्यात या उघुर लोकांची वस्ती जास्त प्रमाणात असून त्यांचा एक नावापुरता स्वायत्त विभाग चीनमध्ये आहे. चीनमध्ये उघुरांना वांशिक अल्पसंख्यांक म्हणून मान्यता आहे. पण ते मूळ निवासी आहेत, असे काही चीन मानत नाही. उघुरांची भूमिका मात्र नेमकी उलट, म्हणजे आपण मूळ निवासी आहोत, अशी आहे. चीनमध्ये वायव्य दिशेला असलेल्या या शिझियांग (सिकियंग) राज्याच्या सीमा जशा चीन या मुख्य देशाला लागून आहेत, तशाच त्या मंगोलिया, कझखस्थान, किरगिझस्थान आणि अफगाणिस्थान या देशांनाही लागून आहेत.  या देशात आणि सिकियांग राज्यात मात्र सर्वात जास्त उघुर लोक राहतात.   तुर्किक भाषा बोलणाऱ्या उघरांना आजवर जवळजवळ सर्वच देशांनी निर्दयपणे वागवले अशा नोंदी इतिहासात सापडतात. पण याचा अर्थ असाही नाही की, उघुर स्वत: अगदी धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ आहेत. राजकारणात, त्यातही जागतिक राजकारणात तर असा ‘बिचारा’ क्वचितच कुणी सापडेल. पण आज त्यांची चीनमध्ये ससेहोलपट होते आहे, हे खरे आहे. त्याविषयी सौदी अरेबिया, इराण, कतार वगैरे देश मूग गिळून बसतात. याचे कारण असे आहे की, चीन अनेक मुस्लिम देशांत मोठमोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पांसाठी भांडवल, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ सढळ हाताने पुरवत आहे. म्हणूनच, भारतात मुस्लिमांवर अन्याय होतो अशी भारतावर टीका करणारे हे मुस्लिम देश चीनचा मात्र निषेध करीत नाहीत, करू शकत नाहीत. बायडेन यांनी चीनमधील मानवाधिकारहननाचा उल्लेख केला व सिकियंग, तिबेट व हाँगकाँगच्या जनतेला अधिक स्वायत्तता व मतदानाचे हक्क देण्याची गरज आहे, असे सांगितले. परंतु जिनपिंग यांनी या विषयावर बोलण्यासच नकार दिल्याच्या वार्ता आहेत.

   भारताला वगळून चर्चा करू.

  शी जिनपिंग यांच्या म्हनण्यानुसार जगात चीन आणि अमेरिका या दोन महासत्ता आहेत. त्यांच्यात स्पर्धा, कुरबुरी कलह अपेक्षित आहे. पण या निमित्ताने होणाऱ्या चर्चेत भारताचा समावेश करण्यास त्यांचा विरोध असतो. आर्थिक संपन्नता आणि लष्करी सामर्थ्य यात भारत खूपच मागे आहे. त्याला बरोबरीच्या नात्याने चर्चेत सहभागी करण्याची मुळीच गरज नाही, अशी चीनची भूमिका आहे. तर जागतिक राजकारणाची विशेषत: आशियाबाबत चर्चा करतांना भारताला वगळून चालणार नाही, अशी अमेरिकेची भूमिका आहे. 

   धरसोड तुझे दुसरे नाव अमेरिका 

  अमेरिकेचे धोरण अनेकदा धरसोडीचे आणि केवळ स्वहिताचाच विचार करणारे राहिलेले आहे. ज्या उद्देशाने, म्हणजे तालीबान्यांचा बीमोड करण्याच्या हेतूने, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप केला तो हेतू पूर्ण होण्या अगोदरच देशांतर्गत दबावाला बळी पडून अमेरिका अफगाणिस्तानमधून तिथल्या लोकशाही मार्गाने सत्तारूढ असलेल्या नेतृत्वाला अक्षरशहा वाऱ्यावर सोडून बाहेर पडली. तैवानबाबत अमेरिकेचे धोरण असेच कायम राहील याचा काय भरवसा? भारताला विश्वासात घेतल्याशिवाय जागतिक राजकारणाचा विचार करता येणार नाही, असे चीनला बजावणारी अमेरिका आपल्या या भूमिकेवर कायम राहीलच, याचा तरी काय नेम? थोडक्यात काय की,  ‘ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे, बता तेरी रज़ा क्या है’, हा एकच मार्ग भारतासमोर उपलब्ध आहे, हे विसरून चालणार नाही.

Sunday, December 10, 2023

  


हेन्री किसिंजर पूर्ण


तरूणभारत, मुंबई, 9 व 10 डिसेंबर२०२३

वयाच्या शेवटच्या टप्प्यावरही राजकीयदृष्ट्या सक्रिय असलेले हेन्री किसिंजर यांचा जन्म दिनांक 27 मे 1923 तर निधन दिनांक 29 नोव्हेंबर 2023 हा आहे. त्यांचे या दिनांकाला बुधवारी  म्हणजे  शंभरी पार केल्यानंतर 6 महिन्यांनी   अमेरिकेमधील कनेक्टिकट प्रांतातील लिचफिल्ड काऊंटीतल्या (जिल्हा) केंट या लहानशा गावी  (लोकसंख्या सुमारे (3000) रहात्या घरी  सकाळी 5 चे सुमारास निधन झाले. विशेष म्हणजे त्या अगोदर जुलै 2023 मध्ये ते शी जिनपिंग यांची भेट घेण्यासाठी गुपचूप जाऊन आले होते. अत्यंत बुद्धिमान अमेरिकन मुत्सद्दी, आंतरराष्ट्रीय संबंधक्षेत्रातील प्रपितामह, विरोधकांकडून युद्ध गुन्हेगार म्हणून व  पूर्व पाकिस्तानमधील मानवीहक्कहनन व वंश विच्छेद याकडे दुर्लक्ष करणारे म्हणून धिक्कारलेले  पण चाहत्यांनी शांततेसाठीचे नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरविलेले हेन्री किसिंजर नक्की कसे होते, हे सांगणे कठीण आहे. पण एक मात्र नक्की की, भारतासाठी त्यांच्या कारकिर्दीचा कालखंड भारत अमेरिका संबंधाचा विचार करता पराकोटीचा वाईट कालखंड मानला जातो.

   असे होते हेन्री किसिंजर 

  1969 ते 1977 अशी सात वर्षे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री व  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागर असलेले हेन्री किसिंजर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुत्सद्दी, लेखक, विश्लेषक, विचारवंत, प्रतिभा आणि प्रज्ञा प्रसन्न असलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व लाभलेले, आयुष्यभर प्रकाशझोतात वावरणारे, आयुष्यभर व्यसनी असूनही शतकभर आयुष्य लाभलेले, आंतरराष्ट्रीय राजकारणावर विपुल आणि मार्गदर्शक लिखाण करणारे, दशसहश्स्रेषु वक्ता असलेले, नोबेल शांतता पुरस्कार विजेते, विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील एक अत्यंत प्रभावी राजकारणी आणि युगप्रवर्तक घटनांचे  साक्षीदार असलेले, तत्त्विकतेपेक्षा वास्तववादाला जपणारे, धोरणनिर्धारणापेक्षा रणनीतीवर भरवसा असलेले, परराष्ट्र धोरण लष्करी सामर्थ्य असेल तरच टिकू शकते, असे मानणारे, जर्मनीच्या बिस्मार्कला गुरुस्थानी मानणारे, अमेरिकेचा एकाकी पडलेल्या चीनशी संपर्क सुरू करणारे, अमेरिका व चीन यांची मैत्री रशियाला काटशह देऊ शकेल असे मानणारे, माओपासून चीनच्या प्रत्येक सर्वोच्च नेत्याशी संपर्कात असलेले, डेमोक्रॅट केनेडी ते रिपब्लिकन ट्रंप आणि पुन्हा डेमोक्रॅट बायडेन या काळातील अनेक अध्यक्षांचे सल्लागार असलेले, प्रथम हार्वर्ड विद्यापीठात विभागप्रमुख व  नंतर राजकारणी झालेले, सनातनी ज्यू असलेले, जर्मनीतील नाझी  छळवादातून वयाच्या 15 व्या वर्षी सुटका करून घेऊन 1938 मध्ये अमेरिकेत पलायन करून आलेले व पुढे नागरिक झालेले,  व्हिएटनाम युद्धात नामुष्की झालेल्या अमेरिकेला सन्मानपूर्वक बाहेर काढण्यासाठी पॅरिस शांतता परिषदेचे यशस्वी आयोजन करणारे, युद्ध टाळता आले तर पहावे या मताचे असलेले, संघर्ष संपवता न आला तरी त्याची तीव्रता कमी करता येते यावर विश्वास असलेले, म्हणून अमेरिकेला रशियाशी सौम्य धोरण स्वीकारण्यास लावून शस्त्र नियंत्रण कायद्याचा मार्ग प्रशस्त करणारे, रिचर्ड निक्सन सारख्या अमेरिकेच्या धसमुसळ्या अध्यक्षाला भरकटण्यापासून दूर ठेवणारे सल्लागार, आखाती देशांशी अमेरिकेचे संबंध सुधारावेत म्हणून सतत दौरे केल्यामुळे ‘शटल डिप्लोमसी’ या बॅक डोअर डिप्लोमसी टेक्निकला  जन्माला घालणारे, 1970 च्या दशकातील तीव्र भारतद्वेष्टे असलेले, भारतीय लोक गेली 600 वर्षे खुषमस्करी करणारे भिक्कारडे लोक होते, असे दूषण  भारतीयांना देणारे, इंदिरा गांधी यांच्या विषयी पराकोटीची वर्णद्वेषी व स्त्रीद्वेषी विधाने  व शिवीगाळ करणारे, पण त्याचवेळी भारताकडून आपल्याला हवे ते पदरात पाडून घेणारे महान अप्पलपोटे असलेले,  पुढे सपशेल माफी मागून इंदिरा गांधींविषयी आपल्याला अपार आदर आहे अशी त्यांची स्तुतीही करणारे, 1972 मध्ये भारत आणि जपानला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे स्थायी सदस्यत्व दिले जावे अशी रोखठोक भूमिका घेणारे, 1974 आणि 2012 मध्ये भारताला भेट देणारे, आपण भारतविरोधी भूमिका घेतली होती, ही चूक 2012 साली कबूल करणारे पण ही भूमिका आपण दबावाखाली घेतली होती, अशी सारवासावरही करणारे, शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिकेने भारताशी असलेले संबंध आणखी दृढ करावेत, असा आग्रह धरणारे, स्वत:च स्वत:ला बुद्धिमान मुत्सद्दी म्हणवून घेणारे आणि प्रत्यक्षात तसे असणारे, मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे प्रभावित झालेले, 2018 साली भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तोंडभर कौतुक करणारे, जून 2023 मध्ये मोदी अमेरिकेच्या भेटीवर असतांना प्रकृती ठीक नसतांनाही सरकारी मेजवानीसाठी आवर्जून उपस्थित राहणारे, त्यावेळचे मोदींचे भाषण लक्षपूर्वक ऐकणारे, नंतर पुढाकार घेऊन मोदींशी स्वत:हून संवाद साधणारे,   महिलांच्या संगतीत रमणारे आणि हा तर माझा ‘विरंगुळा’ आहे, त्यात लपवण्यासारखे काय आहे, असा प्रतिपक्षालाच प्रश्न विचारणारे, जिल सेंट जॅान, शर्ली मॅक्लेन, मार्लो थॅामस या सारख्या विख्यात अभिनेत्री आणि सौंदर्यवती महिलांच्या संगतीत रममाण होणारे, कोणत्याही महिलेला प्राथम्याने ज्याच्याबरोबर डेटला जावे अशी भुरळ पडेल असे व्यक्तिमत्त्व (वूमनायझर) असलेले किसिंजर पाकिस्तानचे चाहते होते, ते का? तर चीनशी गुप्त भेटीगाठी घडवून आणण्याच्या प्रयत्नात त्यांना तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान याह्याखान यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.  यावेळी ते प्रथम भारतात आले, काही दिवस भारतात राहून भारत खूश होईल अशी विधाने करीत राहिले व नंतर पाकिस्तानमध्ये गेले आणि तिथून पाकिस्तानचे विमान वापरून गुप्तता राखीत चीनला गेले. बहुदा म्हणूनच भारताला अमेरिकेने शस्त्रे पुरवू नयेत यासाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. शेवटी भारताने ॲागस्ट 1971 मध्ये रशियाशी शांतता, मैत्री  व सहकार्य करार केला. तो आजही टिकून आहे. 

   बांगलादेशचे युद्ध आणि दुक्कलीचे मनसुबे 

  बांगलादेश युद्धाचे वेळी किसिंजर आणि निक्सन ही जोडगोळी भारताला धमक्या देत होती. भारताची अमेरिकेत असलेली संपत्ती जप्त करू, अशी विधाने करीत होती. भारताला थोपवण्याठी अमेरिकेचे 7वे आरमार बंगालच्या उपसागराच्या दिशेने निघाले सुद्धा होते. पण भारताने विमानमार्गे जाऊन पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल नियाझी यांनाच ताब्यात घेतले आणि पुढे पूर्व पाकिस्तानचे रुपांतर बांगलादेशमध्ये झाले. उरलेले पाकिस्तानही भारत काबीज करील, अशी भीती या दुक्कलीला वाटत होती. या घटनेमुळे भारत अमेरिका यातील संबंधात निर्माण झालेली कटुता अनेक वर्षे टिकून होती.

   किसिंजर आणि हार्वर्ड विद्यापीठ

   किसिंजर यांची शैक्षणिक कारकीर्द हेवा वाटावा अशी होती. पण हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना येथे आपणास प्राध्यापकपदाचा दर्जा मिळावा अशी त्यांची तीव्र इच्छा होती. ती मात्र पूर्ण होऊ शकली नाही. प्राध्यापकपद सोडल्यास हेन्री किसिंजर यांना हार्वर्डमध्ये इतर सर्व सन्मान मिळाले. हार्वर्ड विद्यापीठाने आपल्या ‘आंतरराष्ट्रीय परिसंवाद शाखे’चे प्रमुखपद किसिंजर यास दिले, त्यांचा प्रबंधही डॉक्टरेटसाठी स्वीकारला पण प्राध्यापक होण्याचे त्यांचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. गुरुनाम गुरू अशी पात्रता असलेले हेन्री  किसिंजर हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक होऊ शकले नाहीत. पण हार्वर्ड विद्यापीठातील  साधनसामग्रीचा पुरेपूर उपयोग करणाऱ्या  किसिंजर यांना कल्पकतेचीही साथ होती.  यांच्या  भरवशावर किसिंजर हार्वर्ड विद्यापीठात उत्तमोत्तम कार्यक्रम आयोजित करीत असत. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची अनुमती मिळालेले स्वत:स धन्य मानीत. 

   किसिंजर आणि रशिया 

   सोव्हिएत युनियनची आण्विक शक्ती व क्षमता आणि तिचा सामना कसा करावा यावर किसिंजर यांनी सर्व तपशीलांना स्पर्श करणारा ग्रंथस्वरुपी अहवाल तयार केला. हा अहवाल त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या वाचनात आला. एखादे चांगले लिखाण वाचनात आले तर तसे लेखकांना कळविण्यासाठी आवश्यक असलेली गुणग्राहकता  राजकारणी असूनही निक्सन यांच्या स्वभावात होती. त्यांनी किसिंजर यांना  हा अहवाल अतिशय आवडल्याचे कळविले. या निमित्ताने या दोघात आलेला संबंध या दोघांच्या एकत्र राजकीय प्रवासास निमित्त ठरला. दररोज भेटी, आठवड्यात एकदा ‘खास’ भोजन असा कार्यक्रम नित्याचा झाला. या अहवालाने प्रभावीत होऊन हार्वर्डने किसिंजर यांना  प्राध्यापकपद देऊ केले. पण आता हेन्री किसिंजर यांनी ही ‘ऑफर’ नाकारली. विद्यापीठ एका चांगल्या प्राध्यापकास मुकले खरे पण  आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीक्षेत्राला मात्र  एक प्रभावी मार्गदर्शक लाभला. 

 किसिंजर आणि व्हिएटनाम युद्ध

  अमेरिका आणि व्हिएटनाम युद्धात (1954 ते 1975) किसिंजर यांची भूमिका महत्त्वाची आणि वादग्रस्त राहिलेली आहे. सुरवातीला अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले किसिंजर युद्धाचे समर्थक होते. पण पुढे हे युद्ध अमेरिकेसाठी एक ओझे होऊन बसले आणि अमेरिकेच्या प्रतिष्ठेला धक्क्यावर धक्के बसू लागले तेव्हा त्यांनी गुप्त वाटाघाटी करून तहाचा एक मसुदा तयार केला. पण हा मसुदा त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष असलेल्या रिचर्ड निक्सन यांना आवडला नाही त्यांनी तो नाकारून, जंगलात लपून बसून गनिमी पद्धतीने लढणाऱ्या व्हिएटनामी सैनिकांचा  शोध घेण्यासाठी व्हिएटनामवर नापाम बॅाम्ब वर्षाव करून व्हिएटनाममधील जंगलेच  निष्पर्ण केली. पण पुढे तहाचा काहीसा असाच मसुदा मान्य करून अमेरिका व्हिएटनाम युद्धातून 1973 मध्ये बाहेर पडली. यालाच पॅरिस शांतता करार म्हणून संबोधले जाते. 

   किसिंजर आणि नोबेल पारितोषिक 

   1973 मध्ये, हेन्री किसिंजर यांना अमेरिकेचे परराष्ट्र सचिव म्हणून नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण या काळात त्यांचे नाव कंबोडियावरील अमेरिकेच्या गुप्त बॉम्बहल्ल्याशी आणि दक्षिण आफ्रिकेतील क्रूर लष्करी राजवटीशी जोडले गेले होते, त्यामुळे त्यांच्या नावावरून वाद निर्माण झाला होता. त्यांच्यासोबत वाटाघाटीत सहभागी असलेले उत्तर व्हिएटनामचे ले डक थो यांनाही किसिंजर यांच्या बरोबर नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पण त्यांनी नोबेल पारितोषक नाकारले. त्यांचे म्हणणे असे होते की, आमच्यातील वाटाघाटीनंतर अजूनही शांतता निर्माण झालेली नाही. यावेळी  नोबेल शांतता समितीच्या निवड समितीत तीव्र मतभेद झाले होते. दोन सदस्यांनी तर आपल्या पदाचा राजीनामाच दिला होता. 

   किसिंजर यांचे सव्यसाचित्व 

   राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद आणि परराष्ट्रमंत्रीपद ही दोन्ही खाती एकाचवेळी सांभाळण्याचे सव्यसाचित्व किसिंजर यांच्या ठायी होते. कित्येक दशके अमेरिका आणि चीन यातून विस्तव जात नव्हता. या पदावर असतांना किसिंजर यांनी  विख्यात अमेरिकी माध्यमांमधील दिग्गज वार्ताहरांना थांगपत्ताही लागू न देता  चीनच्या माओशी संपर्क प्रस्थापित केला. पुढे किसिंजर यांचा चीन दौराही असाच या कानाचे त्या कानाला कळू न देता पार पडला. नंतर अध्यक्ष निक्सन आणि हेन्री किसिंजर हे चीन दौऱ्यावर रीतसर भेट देऊन आले.  ही सर्व मोहीम किसिंजर यांनी एकहाती आखली होती. चीनचे बहिष्कृतपण अशाप्रकारे संपले. यामुळे खूश होऊन माओ यांनी किसिंजर यांस ‘लाओ पेंग्यु’ (खरा मित्र) अशी पदवी बहाल केली होती.  पण चीनसंदर्भातले किसिंजर यांचे त्यांचे अंदाज साफ चुकले. अमेरिकेने चीनमध्ये गुंतवणूक करावी, असा त्यांचा सल्ला होता. अमेरिकेने त्या प्रमाणे केले. स्वस्त वीज, जमीन, पाणी आणि मनुष्यबळाचा फायदा अमेरिकन औद्योगिक क्षेत्राला झाला पण इकडे चीनही बलसंपन्न झाला. पण पुढे मात्र  किसिंजर यांच्या अपेक्षेप्रमाणे घडले नाही. चीनवरील बहिष्कार संपला आणि तो जागतिक राजकारणाचा एक हिस्सा झाला की, तो अधिकाधिक लोकशाहीवादी होईल, अशी किसिंजर यांची धारणा होती. याच भ्रमात या नंतरचे अनेक अध्यक्षही होते. पण प्रत्यक्षात चीनने या सर्वास कशी धोबीपछाड दिली हा सर्व घटनाक्रम इतिहासाचा एक महत्त्वाचा हिस्सा झाला आहे. ठकावर   महाठकाने मात केली, ती अशी. 

         गीता, कौटिल्य आणि हेन्री किसिंजर

  गीता, कौटिल्य आणि हेन्री किसिंजर ही तीन नावे एकत्र पाहिल्यानंतर कुणाच्याही भुवया आश्चर्याने उंचावल्या नाहीत तरच आश्चर्य! पहिली दोन नावे एकत्र उच्चारली तर कुणालाही आश्चर्य वाचावयास नको. हेन्री किसिंजर हे नावही अनेक सामान्यजनांना माहीत नसेल. पण जागतिक राजकारणात मात्र या अमेरिकन कूटनीतिज्ञाला लोक ओळखून आणि वचकून असत. अमेरिका आणि चीन यांच्यात दोस्तीचे तसेच व्यापारी संबंध निर्माण करण्याचे श्रेय फार मोठ्या प्रमाणात हेन्री किसिंजर यांना दिले जाते. या कूटनीतिज्ञाच्या कार्यकर्तृत्वाचा,  स्वभाववैशिष्ट्याचा, चतुराईचा परिचय करून देणाऱ्या कथा लोकांमध्ये अनेकदा सांगितल्या जातात. त्यापैकी दोन नमुन्यादाखल नमूद कराव्याशा वाटतात. चर्चा करण्यासाठी जेव्हा हेन्री किसिंजर आपल्या परदेशी समपदस्थासोबत चर्चेला बसत असत तेव्हा त्या दोघांमध्ये सहाजिकच एक टेबल असे. समोरच्या व्यक्तीसमोर संदर्भासाठी मुद्द्यांचे टाचण असे. हेन्री किसिंजर यांना टाचणातील अक्षरे उलटी दिसत आणि त्यामुळे त्यात काय लिहिले आहे ते दिसूनही कळत नसे. यावर उपाय म्हणून असा उलटा दिसणारा मजकूर वाचण्याचा सराव त्यांनी केला होता. आता प्रतिपक्ष कोणकोणते पर्याय घेऊन आला आहे, हे त्यांना कळत असे. यामुळे अमेरिकेसाठी वाटाघाटीने  जास्तीतजास्त किफायतशीर  सौदा करणारा राजकीय प्रतिनिधी असा त्याचा लौकिक होता, असे म्हणतात. हेन्री किसिंजर यांना अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा एक अत्यंत विश्वसनीय सहकारी मानले जाते. ही मैत्री वैयक्तिक पातळीवरही आहे, असा निक्सन यांचा समज होता. प्रतिपक्षाच्या वॅाटरगेट नावाच्या कार्यालयात काय खलबते चालतात हे कळावे म्हणून निक्सन यांच्या संमतीने म्हणा किंवा मान्यतेने म्हणा मायक्रोफोन बसवण्यात आले होते, असे म्हणतात. पुढे हा प्रकार उघडकीला आला आणि निक्सन यांची नाचक्की होऊन त्यांच्यावर देशभर टीकेची झोड उठवण्यात आली. अशा प्रसंगी आपली ही विश्वसनीय सल्लागार व्यक्ती नक्की उपयोगी पडेल, अशा खात्रीने निक्सन यांनी  हेन्री किसिंजर यांना भेंटीला बोलवून ‘आता मी काय करू’, असे अत्यंत काकुळतीने विचारले. पण एक अक्षरही न बोलता हा कूटनीतिज्ञ चिरूट ओढीत एका कोपऱ्याकडे एकटक पाहत राहिला, असे सांगतात. ‘या पापाला राजीनामा देण्याशिवाय दुसरे प्राय:श्चित्त नाही’, असेच जणू हेन्री किसिंजर यांना सुचवावयाचे असावे. कारण या भेटीनंतर निक्सन राजीनामा देऊन पायउतार झाले. एका राजकारण्याला आपल्या ‘शब्दाविण्या झालेल्या या संवादात’, हेन्री किसिंजर यांनी नक्की काय सांगितले असेल, यावर अनेक माध्यमात चर्चा होत होती, असे म्हणतात. हेन्री किसिंजरच्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण परिचय  अर्थातच या दोन कथातून होणार नाही हे खरे असले तरी  झलक मात्र नक्की मिळेल, असे वाटते.
                        गीतेनुसार जगाचा व्यवहार
      अशा या हेन्री किसिंजर यांनी एकूण 27 पुस्तके लिहिली आहेत. ती सर्व सारखीच सरस आहेत.  त्यापैकी एक पुस्तक तसे जुने असले तरी पेन्ग्विनने हिंदुस्थानात चारपाच वर्षांपूर्वी प्रसिद्ध केले आहे. ‘वर्ल्ड ॲार्डर: रिफ्लेक्शन्स ऑन द कॅरेक्टर ऑफ नेशन्स अँड द कोर्स ऑफ हिस्टरी’, असे भलेमोठे शीर्षक असलेले हे  पुस्तक आहे. या पुस्तकातील ‘गीतेनुसार जग’ (द वर्ल्ड ॲकॅार्डिंग टू गीता) याबद्दलचे त्यांचे विचार जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असेल. या शिवाय कौटिल्याचे अर्थशास्त्र याबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले आहेत. आजवर गीतेचे अनेक अभ्यासक होऊन गेले आहेत. लोकमान्य टिळकांना गीतेत कर्मयोग गवसला, कुणाला भक्तियोग तर कुणाला संन्यास योग गवसला. डॅाक्टर चान्सरकरांना तर त्यात अर्थशास्त्रातील तत्त्वे आढळली. किसिंजर यांना या ग्रंथात अनेक चक्रे (सायकल्स) आढळतात. प्रत्येक चक्र सहस्रावधी वर्षांचे असते. साम्राज्यांचाच नव्हे तर विश्वाचा सुद्धा नाश होतो पण तो पुन्हा निर्माण होण्यासाठी. मानवी अनुभवाचे वास्तविक स्वरूप त्यांनाच कळते ज्यांचा स्वतःचा त्यात सहभाग असतो. गीतेत किसिंजर यांना नैतिकता (मोरॅलिटी) आणि सामर्थ्य (पॅावर) यांतील संबंधांची चर्चा केलेली आढळते. युद्धाचे दुष्परिणाम, त्यात होऊ घातलेला स्वकीय आणि निरपराध लोकांचा होणारा विनाश या सर्वाला आपण कारणीभूत होणार या कल्पनेने गांगरलेला आणि गलितगात्र झालेला अर्जुन युद्धाचे समर्थनच होऊ शकत नाही या निष्कर्षाला कसा पोचतो, याची नोंद किसिंजर घेतात आणि भगवान श्रीकृष्ण त्याचे समाधान कसे करतात हेही ते विस्ताराने सांगतात.  हे सर्व विस्ताराने या छोटेखानी लेखात सांगणे शक्य नाही आणि तो या लेखाचा हेतूही नाही.
                        गीता - आध्यात्मिक शब्दकोष
      ‘तू आपले कर्म कर’, हा भगवान श्रीकृष्णाचा आग्रह (अपील) अर्जुनाला पटतो आणि तो कसा नि:शंक होऊन युद्ध करण्यासाठी सज्ज होतो हे किसिंजर सारख्या एकेकाळच्या सैनिकी पेशाच्या आणि वृत्तीच्या राजकारण्यालाही पटले आणि भावले यांचे आश्चर्य वाचावयास नको. नैतिकतेचा निषेध न करता, प्राप्त परिस्थितीत तात्काळ कर्तव्याची कृतीच कशी महत्त्वाची असते, या गोष्टींची नोंद त्यांनी घ्यावी ही बाबही किसिंजर यांच्या कारकिर्दीशी मिळतीजुळती वाटते. निर्भय मनाने युद्ध करावे, असा गीतेचा संदेश आहे, असे ते म्हणतात पण त्याचवेळी महात्मा गांधी गीताला आपला आध्यात्मिक शब्दकोष (स्पिरिच्युअल डिक्शनरी) मानीत असत, याची त्यांना आठवण आहे.
                        कौटिल्याची विशेषता
          यानंतर किसिंजर वळले आहेत ते थेट कौटिल्याकडे. कौटिल्य  इसवीसनापूर्वीच्या चौथ्या शतकात होऊन गेल्याची नोंद ते आवर्जून घेताना दिसतात. भारतात मौर्य घराण्याच्या उदयाचे कारकत्त्व ते कौटिल्याला देतात, ते योग्यच म्हटले पाहिजे. एकाच राज्याच्या कारकिर्दीत ‘अलेक्झांडर द ग्रेट’ला भारतीय उपखंडातून पिटाळून लावून उपखंडात एकछत्री अंमल निर्माण करणारा कौटिल्य अर्थशास्त्रातही तेवढ्याच अधिकारवाणीने लिहितो यामुळे किसिंजर काहींसे विस्मित झाल्याची जाणीव होते.
                      कौटिल्य आणि पाश्चात्य चिंतक
    युरोपात वेस्टफालियाचा तह रूर्ह नदीतिरी झाला त्याच्या कितीतरी आधी कौटिल्याने राज्याराज्यात कायम स्वरूपी संघर्षाची स्थिती असते असते, हे जाणले होते, हे त्यांनी मनमोकळेपणाने मान्य केले आहे. मिचिएवेली या इटालीयन इतिहासकार, तत्त्ववेत्ता, राजनीतिज्ञाप्रमाणेच कौटिल्याची भूमिका होती, असे किसिंजर म्हणतात. पण स्थिती असलीच तर नेमकी उलट होती. कारण कौटिल्याचा काळ मिचिएवेलीच्या काळाच्या कितीतरी अगोदरच्या आहे. रिचिलिऊ हा फ्रेंच धर्ममार्तंड आणि राजकारणी सुद्धा याच विचाराचा होता, पण या दोघात सुमारे दोन हजार वर्षांचे अंतर होते, हे मात्र हेन्री किसिंजर यांनी स्पष्टपणे नोंदवले आहे. राज्य ही मुळातच ठिसूळ (फ्रॅजाईल) संस्था आहे. त्यामुळे ते कायम स्वरूपी राहिलेच पाहिजे, या म्हणण्याला नैतिकतेचा आधार नसतो, हेकिसिंजर यांना जाणवावे यात आश्चर्य ते काय? अमेरिकेची आजवरची धोरणे आणि व्यवहार याच तत्त्वावर अनुसरून राहत आले आहेत.
                    कौटिल्याची भावलेली शिकवण
    राज्याचा स्थापना कशी करावी, त्याचे रक्षण कसे करावे, शत्रूंच्या कारवायांना योग्यवेळ पाहून पायबंद कसा घालावा, प्रदेश कसे जिंकावेत याबाबतचे कौटिल्याचा विचार किसिंजर यांना पटलेले दिसतात. सामर्थ्य बहुआयामी असते. त्याचे घटक परस्परावलंबी असतात. उद्दिष्टानुसार त्यांचा वापर करायचा असतो. भौगोलिक परिस्थिती, आर्थिक पाठबळ, सैनिकी सामर्थ्य, राजकीय डावपेच, हेरगिरी, तत्कालीन कायदे, परंपरा, लोक भावना, अफवा, दंतकथा, मानवी स्वभावविशेष, माणसाचा दुबळेपणा या सर्व बाबी राजाला माहीत असल्या पाहिजेत, या कौटिल्याच्या शिकवणीची नोंद किसिंजर यांनी आपल्या पुस्तकात घेतली आहे. या ठिकाणी त्यांना मिचिएवेली या इटालीयन राजनीतिज्ञाची आणि क्लॅासेविच या जर्मन तत्त्वज्ञाची आठवण होते. यापैकी क्लॅासेविच याने युद्धातील नीतिनियमांचा पाया घातला, असे मानतात.
          सत्तेचा समतोल ही कौटिल्याची संकल्पना
    सत्तेचा समतोल ही संकल्पना पाश्चात्यांना सुचण्याच्या दोन हजार वर्षे पूर्वी कौटिल्याने मांडली, हे किसिंजर मनमोकळेपणाने मान्य करतात. शत्रू आणि मित्र या दोघांवरही पाळत ठेवण्यासाठी आणि माहिती मिळविण्यासाठी फिरते साधू, भटके, जादुगार, ज्योतिषी यांचा उपयोग कसा करून घ्यावा, अफवा पसरवून राज्यात बेदली कशी माजवावी, दोन राज्यांत वैमनस्य कसे निर्माण करावे, शत्रूच्या सैन्यात गोंधळ कसा माजवावा आणि या सर्वांसाठी योग्यवेळ कशी साधावी, याचा वस्तुपाठच कौटिल्याने दिला आहे. ह्या सर्व बाबींचीही तपशीलवार नोंद किसिंजर यांनी घेतली आहे.
    प्रजा असंतुष्ट असणार नाही, याकडे राजाचे कायम लक्ष असले पाहिजे.  मिचिएवेली (युरोपातील पुनर्निर्मितीच्या कालखंडातील तत्त्ववेत्ता)  आणि कौटिल्य यांची तुलना करताना किसिंजर एक महत्त्वाचा फरक दाखवतात, तो असा की, कौटिल्याचे सर्व विवेचन भावनिक आत्मीयतेपासून (नॅास्टॅग्लिया) पूर्णपणे अलिप्त होते.
  अशोकाच्या काळात भारताचा विस्तार आजचे पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि इराण यांतील काही भाग येथपर्यंत झाला होता, याबद्दल मात्र आपण होकारार्थी किंवा नकारार्थी टिप्पणी करू इच्छित नाही, असे किसिंजर यांनी म्हटले आहे.  आपली वैशिष्ट्ये आणि ज्येष्ठता पाश्चात्यांच्या तोंडून ऐकली म्हणजे अनेकांना लवकर पटते, असा अनुभव आहे. गेलेल्याबद्दल वाईट बोलू नये, असाही संकेत आहे. पण समीक्षा करायची झाली तर व्यक्तिमत्त्वाच्या दोन्ही बाजू समोर यायला नकोत का?




 https://www.mahamtb.com//Encyc/2023/12/9/American-diplomat-Former-national-security-advisor-Henry-Kissinger.html

Monday, December 4, 2023

 शी जिनपिंग आणि ज्यो बायडेन यांच्या भेटीचे फलित 

लेखांक दुसरा 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 

Email- kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee?

   शी जिनपिंग आणि ज्यो बायडेन यांच्या भेटीचे फलित 

 लेखांक दुसरा 

  आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य व्यासपीठाच्या शिखर समितीची /एशिया-पॅसिफिक एकॅानॅामिक कोऑपरेशनची (एपीइसी)  30 वी बैठक अमेरिकेतील सॅनफ्रान्सिसको येथे 15 ते 17 नोव्हेंबर 2023 ला झाली. 1989 मध्ये ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबरा येथे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील प्रमुख 12 देशांनी या व्यासपीठाची स्थापना केली होती. आज या व्यासपीठातील सदस्यांची संख्या 21 आहे. यावेळी म्हणजे 2023 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडे यजमानपद होते. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग  आणि ज्यो बायडेन यांच्यात फावल्या वेळात सकारात्मक वातावरणात चर्चा झाली. काही विषयांवर सहमती झाली तर काहींवर वाद कायमच राहिला आणि दोन्ही देशांनी आपापल्या भूमिका ठासून मांडल्या. आदल्याच वर्षी म्हणजे 2022 मध्ये जी20 च्या शिखर परिषदेत इंडोनेशियातील बाली  येथेही हे दोघे भेटले होते. पण या एका वर्षात बरेच काही घडून गेले आहे. ऑगस्ट 2022 मध्ये अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी चीनच्या विरोधाला न जुमानता तैवानचा दौरा केला होता. तोही प्रसिद्धीचे ढोल पिटत! तेव्हापासून  चिडलेल्या चीनने दोन्ही देशांतील सैनिकी संपर्काचे मार्गच स्थगित केले होते.  अचानक युद्ध सुरू होऊ नये म्हणून दोन देशातील सेनाप्रमुखांची ही सेफ्टी व्हॅाल्व  सारखी संपर्क व्यवस्था होती. अशा परिस्थितीत शी जिनपिंग  2017 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेत आशिया-पॅसिफिक आर्थिक शिखर समितीच्या बैठकीचे निमित्त साधून आले होते. फावल्या वेळातील ही दोन राष्ट्रप्रमुखांची भेट  मैत्रीपूर्ण वातावरणात झाली असे उभयपक्षी सांगण्यात आले. तसे ते सांगायचेच असते.  

   भेटीसाठी उत्सुक कोण?

  आपली चीड, संताप गुंडाळून ठेवून शी जिनपिंग यांनी बायडेन यांची भेट का घेतली असावी? तसेच बायडेनही या भेटीसाठी का तयार झाले असावेत?  

  एक असे की,  गेल्या वर्षी अमेरिकेने चीनवर लागू केलेल्या आर्थिक निर्बंधांचा जाच आता चीनला वाढत्या प्रमाणात जाणवू लागला आहे. दुसरे असे की,   चीनच्या ‘बीआरआय’ प्रकल्पाला अनेक देशांतून अनपेक्षित विरोध होत असल्याने चीनच्या प्रभावाला तडा गेला आहे. हा प्रकल्प ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’,  ‘बीआरआय’,  किंवा बी अँड आर’ अशा नावांनी जगभर ओळखला जातो. तर खुद्द चीनमध्ये हा प्रकल्प ‘वन बेल्ट वन रोड’ (ओबीओआर) म्हणून ओळखला जातो.  ही चीनने 2013 मध्ये आखलेली जागतिक स्तरावरची वाहतुक व्यवस्था आहे. 2013 मध्ये 150 पेक्षा जास्त देशांनी या योजनेला सहमती दर्शविली होती. खुद्द शी जिनपिंग यांचे हे विशाल स्वप्न आहे. हे पूर्ण होताच चीनकडे वाहतुक क्षेत्रातील जागतिक नेतृत्व चालून येणार आहे. काही विश्लेषक तर या प्रकल्पाची अमेरिकेच्या ‘मार्शल प्लॅन’शी तुलना करतात. दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम युरोपातील देशांची आर्थिक व्यवस्था पार कोलमडली होती. ती सावरावी म्हणून अमेरिकेने कोट्यवधी डॅालर युरोपकडे वळविले होते. ही ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’, योजना बारगळली तर चीनचे आर्थिक नुकसान तर होईलच पण त्याचबरोबर चीनच्या जगातील वर्चस्वालाही धक्का पोचेल.  तिसरे असे की, हमास आणि इस्त्रायल यांच्यातील  युद्धात तात्पुरता युद्धविराम झालेला असला तरी हे युद्ध किती काळ चालेल हे सांगता येत नाही.  या युद्धात अमेरिका इस्त्रायला मदत करीत असून आज ना उद्या चीन रशिया आणि इराण यांना हमासच्या बाजूने उघडपणे उभे रहाावेच लागेल. म्हणजे तिसरे महायुद्ध सुरू झाल्यासारखेच आहे. चौथे असे की, नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे चिडलेल्या चीनने दोन्ही देशांतील सैनिकी संपर्काचे मार्ग स्थगित केले खरे पण ही स्थिती अशीच कायमस्वरुपी रहावी, हे चीनच्या हिताचे नाही. यातून चीनला बाहेर पडायचे असून ‘उभयपक्षी सैनिकी संपर्काचे मार्ग’ पुन्हा सुरू करायचे होते. 

   म्हणून की काय नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीच्या निमित्ताने झालेला जळफळाट विसरून  शी जिनपिंग यांनी अमेरिकेला 2 पांडा भेट म्हणून देण्याचे सूतोवाच केले.  यावेळी ते म्हणाले की, पांडा हा चिनी आणि अमेरिकी लोकांमध्ये मैत्रीचा एक दूत आहे. या साखरपेरणीला बऱ्यापैकी यश मिळालेले दिसते. मुख्य म्हणजे तुटलेला सैनिकी संपर्क आता परत जोडला जाईल व काही अनर्थ घडण्यापूर्वी दोन्हीकडचे वरिष्ठ सैनिकी अधिकारी चर्चेने तो टाळण्याचा प्रयत्न करतील/करू शकतील. या व्यवस्थेचे महत्त्व समजण्यासाठी थोडे मागे जावे लागेल. सन 2020 मध्ये तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षीय निवडणुकीत यश मिळावे म्हणून जनमत आपल्याकडे वळविण्यासाठी चीनवर हल्ला करतील अशा वावड्या उठल्या होत्या. पण अमेरिका आणि चीन यात सैनिकी संपर्क मार्ग सुरू असल्यामुळे अमेरिकेच्या ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दूरध्वनी करून चीनला वाटणारी शंका दूर केली होती. जगाच्या इतिहासात चुकून किंवा गैरसमज झाल्यामुळे युद्धे सुरू झाल्याच्या घटना काही कमी नाहीत. चुकीचे अंदाज, गैरसमज आणि चुकीची माहिती मिळाल्यामुळे पहिले महायुद्ध सुरू झाले, असे अनेक इतिहासकारांचे मत आहे. संपर्क व्यवस्थेची पुनर्स्थापना होणे ही बाब म्हणून महत्त्वाची ठरते. या चर्चेत हे घडून आले. 

   अमेरिकेतील तरुणाई आणि मादकद्रव्याधीनता

   दुसरे असे की, अमेरिकेतील तरूण पिढी  फेंटानिल या नावाच्या मादक द्रव्याच्या आहारी गेली आहे. त्यामुळे तरूण पिढीचे अतोनात नुकसान होते आहे. ज्या पदार्थापासून हे मादक द्रव्य तयार होते, त्याचे उत्पादन चीनमध्ये होते. हा पदार्थ अमेरिकेला तस्करी करून पाठविला जाणार नाही, अशी व्यवस्था करण्याचे आश्वासन शी जिनपिंग यांनी बायडेन यांना दिले. अमेरिकेसाठी ही मोठीच उपलब्धी म्हणावी लागेल.

  तिसरा मुद्दा कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’शी  (एआय) संबंधित होता. याचा वापर व दुष्परिणाम, हा आज जरी गंभीर विषय नसला तरी त्याचे दुरुपयोग व्हायला सुरवात झाली आहे. वेळीच दक्षता घेतली नाही तर पुढे हा विषय आटोक्याच्या बाहेर जाण्याची भीती आहे. लष्करीक्षेत्रात तर हा भस्मासूर ठरू शकेल.  त्या दृष्टीने  सुरवातीपासूनच उपाययोजना करण्यावर उभयपक्षी एकमत झाले, हा शुभसंकेत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर संरक्षण क्षेत्रात, विशेषतहा आण्विक क्षेपणास्त्रांच्या कार्यप्रणालीत झाला, तर अनर्थ ओढवू शकतो. याचा वापर व दुष्परिणाम, हा सद्ध्या जरी प्रामुख्याने  चर्चेचाच विषय असला, तरी त्याचे सुरुवातीचे दुरुपयोगही झोप उडवणारे आहेत.  

   अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमधील स्पर्धा आर्थिक क्षेत्रापुरती मर्यादित आहे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. तर चीन बिघडलेल्या सर्वच संबंधांसाठी अमेरिकेला जबाबदार धरतो आहे. म्हणून  चर्चेदरम्यान काही मतभेद दूर होऊ शकले नाहीत. तैवानचे स्वातंत्र्य, दक्षिण चिनी समुद्रातील चीनची दादागिरी, चीनद्वारे मानवाधिकाराचे होत असलेले उल्लंघन आणि भारताला विश्वासात न घेता झालेले विचारमंथन या मुद्यांचा उहापोह पुढील लेखात.