हेन्री किसिंजर दुटप्पी की दुहेरी
तरूणभारत,नागपूर १९.१२.२०२३
हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.
हेन्री किसिंजर दुटप्पी की दुहेरी
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430
Email- kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
नुकतेच निधन पावलेले अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर वयाच्या शंभराव्या वर्षीही राजकीयदृष्ट्या सक्रिय होते. परराष्ट्र संबंधात भावनेच्या आहारी न जाता आपला व्यवहार असला पाहिजे, यावर त्यांचा भर असे. त्यांचा नोबेल पारितोषिक प्रदान करून जसा गौरव करण्यात आला होता, तसाच युद्ध गुन्हेगार म्हणून धिक्कारही त्यांच्या वाट्याला आला होता. ते नक्की कसे होते हे सांगणे कठीणआहे.
भारताचा कमालीचा द्वेश
1970 च्या दशकात तर त्यांच्या भारतद्वेष्टेपणाला ऊत आला होता. भारतीय लोक गेली 600 वर्षे खुषमस्करी करणारे भिक्कारडे लोक होते, असे दूषण भारतीयांना देणारे, इंदिरा गांधी यांच्या विषयी पराकोटीची वर्णद्वेषी व स्त्रीद्वेषी विधाने व शिवीगाळ करणारे म्हणून जसे हेन्री किसिंजर कुख्यात होते, तसेच पुढच्या काळात सपशेल माफी मागून इंदिरा गांधींविषयी आपल्याला अपार आदर आहे अशी त्यांची स्तुतीही करणारे, 1972 मध्ये भारत आणि जपानला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे स्थायी सदस्यत्व दिले जावे अशी रोखठोक भूमिका घेणारेही किसिंजरच. किसिंजर मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे प्रभावित झाले होते. 2018 साली भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तोंडभर कौतुक करणारे, जून 2023 मध्ये मोदी अमेरिकेच्या भेटीवर असतांना प्रकृती ठीक नसतांनाही त्यांच्या सन्मानार्थ दिलेल्या सरकारी मेजवानीसाठी आवर्जून उपस्थित राहणारे, त्यावेळचे मोदींचे भाषण लक्षपूर्वक ऐकणारे, नंतर पुढाकार घेऊन मोदींशी स्वत:हून संवाद साधणारेसुद्धा हेन्री किसिंजरच.
नवीन तंत्रांची निर्मिती
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तसेच परराष्ट्र सचिव असतांना त्यांनी वाटाघाटींच्या/ संवादांच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ‘पॅालिसी ऑफ डेंटेट’ या नावाने ओळखला जातो. हेन्री किसिंजर यांनी अमेरिका आणि रशिया व चीन यातील वैमनस्य कमी व्हावे म्हणून हे तंत्र वापरून पाहिले व त्यात ते बऱ्यापैकी यशस्वीही झाले.
तणाव कमी करण्याचे तंत्र म्हणून हेन्री किसिंजर यांनी स्वत:ही एक नवीन तंत्र विकसित केले आहे. ते ‘शटल डिप्लोमसी’ म्हणून ओळखले जाते. यात जेव्हा दोन वैरी देश (नेते) एकमेकांचे तोंडही पाहण्यास तयार नसतात तेव्हा मध्यस्थ तडजोडीसाठी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांची आलटून पालटून भेटी घेतो, त्यांच्या अटी एकमेकांना सांगतो, आणि शेवटी मध्यम मार्ग काढून त्या दोघात एकमत घडवून आणतो. अरब आणि इस्रायल यातील हाडवैर संपवण्यासाठी 1973 मध्ये किसिंजर यांनी हे तंत्र वापरले. व्हिएटनाम आणि अमेरिका यातील युद्ध थांबवण्यासाठी हेन्री किसिंजर यांनी व्हिएटनामच्या प्रतिनिधीशी पॅरिसमध्ये वाटाघाटी केल्या. किसिंजर अमेरिकेतून पॅरिसला येत तर उत्तर व्हिएटनामचे प्रतिनिधी ले डक थो हे व्हिएटनामधून पॅरिसला येत आणि त्यांच्यात बोलणी होत. या दोघांनाही नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण या काळात त्यांचे नाव कंबोडियावरील अमेरिकेच्या गुप्त बॉम्बहल्ल्याशी आणि दक्षिण आफ्रिकेतील क्रूर लष्करी राजवटीशी जोडले गेले होते, त्यामुळे त्यांच्या नावावरून नोबेल शांतता पुरस्कार निवड समितीत वाद निर्माण झाला होता. त्यांच्यासोबत वाटाघाटीत सहभागी असलेले उत्तर व्हिएटनामचे ले डक थो यांनाही किसिंजर यांच्या बरोबर नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पण त्यांनी नोबेल पारितोषक नाकारले. त्यांचे म्हणणे असे होते की, आमच्यातील वाटाघाटीनंतर अजूनही शांतता निर्माण झालेली नाही. यावेळी निवड समितीच्या सदस्यात तीव्र मतभेद झाले होते. दोन सदस्यांनी तर आपल्या पदाचा राजीनामाच दिला होता. अमेरिकेची नामुष्की कमी करण्यासाठी व्हिएटनाम युद्ध संपावे म्हणून किसिंजर यांनी 1973 मध्ये उत्तर व्हिएटनामशी पॅरिस शांतता करार घडवून आणला. पुढे जेव्हा उत्तर व्हिएटनामने करार मोडून दक्षिण व्हिएटनामचा ताबा घेतला तेव्हा हेन्री किसिंजरन यांनी पारितोषिक परत करण्याचा प्रयत्न करून पाहिला.
हेन्री किसिंजर यांच्यावर इतर देशातील प्रस्थापित राजवटींना उलथून लावण्यासाठी बंडखोरीला मूक संमती दिल्याचा (टॅसिट सपोर्ट) आरोप केला जातो. चिलीमधील साम्यवादी राजवट उलथून टाकण्याच्या बंडाला त्यांचा असा पाठिंबा होता. तसेच अर्जेंटिनातील सैन्यदलाने जनतेलाच वेठीला धरले तेव्हा किसिंजर यांनी तिकडे काणाडोळा केला असे म्हणतात.
जर्मनीतील बॅव्हेरिया प्रांतात हेन्री किसिंजर यांचा एका मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात इतिहासप्रसिद्ध न्युरेम्बर्ग शहराला आता लागून असलेल्या फर्थ या गावी झाला. जन्मत: बुजरा (शाय) असलेल्या हेन्रीचा बालपणापासून असलेला जर्मन भाषेतील उच्चारणातील स्वराघात (अॅक्सेंट) करण्याची लकब जन्मभर कायम होती.
1938 मध्ये किसिंजर अमेरिकेत आश्रयाला आले आणि त्यांनी हार्वर्डमध्ये राज्यशास्त्राच्या अभ्यासाला सुरवात केली. हॉर्वर्डमध्ये त्यांना सर्व सन्मान मिळाले पण प्राध्यापकाची नोकरी मात्र मिळाली नाही. पुढे हॉर्वर्डने प्राध्यापकपद देऊ केले पण तेव्हा हेन्री किसिंजर यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद स्वीकारत प्राध्यापकपद नाकारले.
1957 मध्ये हेन्री किसिंजर यांनी ‘अण्वस्त्रे मर्यादित स्वरुपात वापरण्यास हरकत नाही’, असा विचार मांडणारी ‘न्युक्लिअर वॅार थिअरी’, मांडली. यानुसार अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांचा नेमकेपणाने केलेला वापरही रणनीतीचा एक भाग म्हणून ग्राह्य ठरतो. या पुस्तकाने हेन्रींना जगभर कुप्रसिद्धी मिळवून दिली. रिचर्ड निक्सन यांनी 1968 मध्ये हेन्री किसिंजर यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद आणि परराष्ट्रव्यवहार मंत्रिपद बहाल केले. या काळात आंतरराष्ट्रीय जगतात शीतयुद्ध चरम पंथाला पोचले होते. क्युबाप्रकरणी भडका उडताउडता थांबला होता. अमेरिकन फौजा व्हिएटनाममध्ये साम्यवाद्यांशी लढत होत्या आणि रशियाने झेक रिपब्लिकची राजधानी असलेल्या प्राग शहरावर आक्रमण केले होते.
निक्सन आणि किसिंजर यांनी रशियाबरोबरची बंद पडलेली अण्वस्त्र कपात विषयक बोलणी पुन्हा सुरू केली व चीनच्या माओशी गुप्तपणे संपर्क साधून चीनशी दोस्ती करून चीनचे 23 वर्षाचे एकाकीपण संपवले व रशियाला शह देण्याचा प्रयत्न केला. याच काळात अमेरिकेने तटस्थ कंबोडियावर साम्यवादी फौजांना आश्रय दिल्याचे निमित्त साधून बेसुमार बॅाम्बफेक करून निदान 50 हजार निष्पाप नागरिकांना यमसदनी पाठविले. यामुळे जगात आणि खुद्द अमेरिकेतही अभूतपूर्व गदारोळ उठला होता.
बांगलादेशचे युद्ध आणि दुक्कलीचे मनसुबे
बांगलादेश युद्धाचे वेळी भारताला थोपवण्याठी अमेरिकेचे 7वे आरमार बंगालच्या उपसागराच्या दिशेने निघाले होते. पण भारताने विमानमार्गे जाऊन पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल नियाझी यांनाच ताब्यात घेतले आणि पुढे पूर्व पाकिस्तानचे रुपांतर बांगलादेशमध्ये झाले. उरलेले पाकिस्तानही भारत काबीज करील, अशी भीती अमेरिकेला वाटत होती. या घटनेमुळे भारत अमेरिका यातील संबंधात निर्माण झालेली कटुता अनेक वर्षे टिकून होती. किसिंजर पाकिस्तानचे चाहते होते, ते का? तर चीनशी गुप्त भेटीगाठी घडवून आणण्याच्या प्रयत्नात त्यांना तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान याह्याखान यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. बहुदा म्हणूनच भारताला अमेरिकेने शस्त्रे पुरवू नयेत यासाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. शेवटी भारताने ॲागस्ट 1971 मध्ये रशियाशी शांतता, मैत्री व सहकार्य करार केला. तो आजही टिकून आहे.
हेन्री किसिंजर गीता आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र यांचे गाढे अभ्यासक होते. आपली वैशिष्ट्ये, श्रेष्ठता आणि ज्येष्ठता पाश्चात्यांच्या तोंडून ऐकली म्हणजे अनेकांना लवकर पटते, असा अनुभव आहे. गेलेल्याबद्दल वाईट बोलू नये, असाही संकेत आहे. पण त्याशिवाय समीक्षा सम्यक कशी होणार?
No comments:
Post a Comment