शिया आणि सुन्नी यांची अप्रत्यक्ष युती
तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक 26.12. 2023 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.
वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड.
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 9422804430
Email- - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
शिया आणि सुन्नी यांची अप्रत्यक्ष युती.
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
मुस्लिम ब्रदरहूड या नावाने परिचित असलेल्या सुन्नी मुस्लिम संघटनेचे मूळ नाव ‘जमात अल इख्वान अल- मुस्लिम’, म्हणजेच ‘सोसायटी अॅाफ मुस्लिम ब्रदर्स’, असे आहे. इजिप्तमध्ये 1928 साली स्थापन झालेल्या या संघटनेचा संस्थापक ‘हसन अल-बन्ना’ या नावाचा इस्लामी विद्वान पेशाने शिक्षक होता. अरब जगातातील हमास सारख्या अनेक संघटनांवर या संघटनेचा प्रभाव आहे.
2011 मध्ये जानेवारी महिन्यात इजिप्तमध्ये राजकीय क्रांती घडून आली. 2012 मध्ये इजिप्तमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या राजकीय पक्षाचा मुस्लिम ब्रदरहूडने पुरस्कार केला होता. परंतु दहशतवादी कारवायांमुळे त्या सरकारने मुस्लिम ब्रदरहूडवर कठोर कारवाई केली व 2015 मध्ये तिला दहशतवादी संघटना म्हणून घोषितही केले. सध्या इजिप्त, बहारिन, रशिया, सीरिया, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरात अशी मोठी व प्रभावी राष्ट्रे तिला दहशतवादी संघटनाच मानतात.
मुस्लिम ब्रदरहूडचे लक्ष्य कुराण व सुन्नाह वर आधारित मुस्लिम व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक व राजकीय जीवनपद्धतीची पुनर्स्थापना करणे हे आहे. पण आज कतार व तुर्कस्थान हे दोनच मुख्य देश मुस्लिम ब्रदरहूडचे पाठीराखे उरले आहेत.
कटकारस्थान रचण्याचे, खून घडवण्याचे आणि प्रस्थापित शासन व्यवस्था उलथवण्याचे या संघटनेचे प्रयत्न उघडकीस आले आहेत. 2016 नंतर तर डोनाल्ड ट्रंप यांनी सत्तेवर येतायेताच इस्लामिक दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्याला अनुसरून अमेरिकेने मध्यपूर्वेतील मुस्लिम ब्रदरहूडच्या शक्तिस्थानांना नष्ट करण्यासाठी दग्धभू धोरण स्वीकारण्यासही मागेपुढे पाहिलेले नव्हते.
प्रारंभी अरब देशात या संघटनेने सनदशीर मार्गांनी सत्ता हस्तगत केली खरी, पण हिचा लोकशाहीवर विश्वास नाही. इजिप्तमध्ये तर हिचा उमेदवार मोहम्मद मोर्सी अध्यक्षपदी निवडून आला होता. पण वर्षभरातच हिंसक निदर्शनानंतर, कमालीचा असंतोष निर्माण होऊन शेवटी इजिप्तमध्ये राज्यक्रांती घडून आली आणि मोहम्मद मोर्सीला घरच्या घरी स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते. 17 जून 2019 ला मोर्सीचे इजिप्तमध्ये तुरुंगातच निधन झाले.
खुद्द मुस्लिम ब्रदरहूडचा मात्र, आपण शांततेचा पुरस्कार करणारे व लोकशाहीवर विश्वास ठेवणारे असून हिंसाचाराचा निषेध करणारे आहोत, असा दावा आहे.
सुन्नीपंथी हमास
अशा या मुस्लीम ब्रदरहूड नावाच्या ज्यू विरोधी संघटनेतून हमास या संघटनेचा जन्म झाला आहे. आज हमासचे नेतृत्व इस्माईल हनीय यांच्याकडे आहे. हमासने लोकशाही पद्धतीने फतेह या प्रतिस्पर्ध्याचा 2006 मध्ये निवडणुकीत पराभव करून गाझा पट्टीत (पॅलेस्टाईनचा एक प्रांत) सत्ता काबीज केली. तेव्हापासून लपण्यासाठी, संरक्षणासाठी आणि येजा करण्यासाठी भुयारांची जोडजाळी विणून हमासने सर्वप्रकारची आयुधे, दारूगोळा यांचा संग्रह तिथे आणि इतरत्र गोळा करून ऑक्टोबर 2023 मध्ये इस्रायलवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात 1200 नागरिक मृत्युमुखी पडले तर नागरिक व सैनिक मिळून 240 व्यक्ती ओलीस म्हणून हमासने ताब्यात घेतल्या. हा इस्रायलवर झालेला आजवरचा सर्वात जबरदस्त हल्ला होता. हमासने अनेक निरपराध नागरिकांची हत्या तर केलीच आणि अनेकांना ओलीस म्हणूनही बरोबर नेले. हे सर्व अजूनही मुक्त झाले नाहीत, ते लवकर मुक्त होतील, असे वाटतही नाही. त्यांना भुयारातच कोंडून ठेवले असेल, असे गृहीत धरून इस्रायलने त्यांना बाहेर काढण्यासाठी भुयारे पाण्याने भरण्यास सुरवात केली आहे. पण ही वेळखाऊ क्रिया आहे. या काळात ओलिसांना भुयारातच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकणी हलवणे सहज शक्य आहे. गाझापट्टीतील एकूण 20 हजारावर नागरिक आणि सैनिक यांना इस्रायलने यमसदनी पाठविले असले आणि उद्या आणखी एवढ्याच लोकांना ठार केले तरी 20 लाख पॅलेस्टिनियनांपैकी लाखो शिल्लक राहतीलच. त्यातले अनेक आज हमासचे विरोधकही असतील/नव्हे तसे ते आहेतच, ते हमासकडे वळू शकतात. म्हणजे हमासला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचे इस्रायलचे उद्दिष्ट पूर्ण होणे किती कठीण आहे, हे उघड आहे.
लेबॅनॅान मधील शियापंथी हिजबुल्ला
दुसरे असे की, हिजबुल्ला (अल्ला यांचा पक्ष) ही शियापंथी मुल्लिमांची राजकीय संघटना आहे. ही संघटना हमासप्रमाणे सुन्नींची नाही. यातला एक गट अतिरेकी (मिलिटंट) आहे, 1992 पासून या गटाचे नेतृत्व लेबनीज धर्मगुरू हसन नसरुल्लाकडे आहे. याचा जन्म शिया कुटुंबात लेबॅनॅानची राजधानी बैरूटमध्ये 1960 मध्ये झाला. ही हिजबुल्लाची जिहादी शाखा आहे. हिजबुल्लाचा राजकीय गट ‘लॅायल्टी टू दी रेझिस्टंट ब्लॅाक पार्टी’ या नावाने लेबॅनॅानच्या संसदेत ओळखला जातो.
शियापंथी हिजबुल्लाच्या जिहादी शाखेने शत्रूवत सुन्नीपंथी हमासला पाठिंबा दिला आहे. असे आजवर क्वचितच घडले असेल. मात्र या अतिरेकी हिजबुल्ला गटाने इस्रायलवर रॅाकेट व ड्रोन यांच्या सहाय्याने मारा जरी सुरू केला असला तरी हमासप्रमाणे इस्रायलच्च्या सीमा मात्र ओलांडल्या नाहीत. इस्रायलनेही हिजबुल्लाच्या हल्ल्याला लेबॅनॅानच्या सीमा न ओलांडता चोख उत्तर दिले आहे.
येनेनमधील शियापंथी हूती
तिसरे म्हणजे, येमेनच्या शियापंथी हूती बंडखोरांनी तुर्कस्तानहून भारताकडे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाचे, ते इस्रायलचे जहाज आहे असे समजून लाल समुद्रात नुकतेच अपहरण केले. ओलीस म्हणून ठेवलेल्या जहाजावरील एकूण २५ कर्मचाऱ्यांमध्ये एकही भारतीय नागरिक नव्हता. हे जहाज इस्रायलचे असल्याचे हूतींनी सांगितले. परंतु, इस्रायलने हूताींचे हे म्हणणे खोडून काढले. जहाजाच्या मालकांपैकी एक इस्रायली होता, हे मात्र खरे. जहाजाचे नाव ‘गॅलेक्सी लीडर’ असून ते भारताच्या दिशेने येत होते, हेही खरे आहे. सना या येमेनच्या राजधानीतील हूतींनी इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात स्वतंत्रपणे प्रवेश केला, त्यांनी इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली.
हूती ही एक येमेनच्या सुन्नी शासनाविरोधात शिया मुस्लिम गटाने चालवलेली चळवळ आहे. हूती हे शिया मुस्लिमांमधील झायदी या गटात मोडतात. हूती ही एक दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते. शियापंथी हूतींना शियाबहुल इराणचा पाठिंबा आहे. येमेनच्या उत्तरेकडील भागात या हूतींचे मूळ निवासस्थान आहे. ‘झायदी’ गटाचे एकेकाळी येमेनवर राज्य होते. पुढे ते लयाला गेले. 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात हूतींनी ‘झायदी’ शाखेच्या पुनरुत्थानासाठी चळवळ सुरू केली. एकतर मुस्लिमांध्ये सुन्नी बहुसंख्य (80%) आहेत, तर शिया अल्पसंख्य(20%) आहेत. या अल्पसंख्याकांमध्येही झायदा अल्पसंख्य आहेत. थोडक्यात असे की झायदा हा शियापंथी मुस्लिमांमधला अति चिमुकला गट आहे. या गटाला शियापंथी इराणचा पाठिंबा लष्करी आणि आर्थिक स्वरुपाचा आहे. हूतींनी सप्टेंबर 2014 मध्ये येमेनची राजधानी सना ताब्यात घेतली आणि 2016 पर्यंत उत्तर येमेनच्या बर्याच भागावर ताबा मिळवला. शियापंथी इराणचे इस्रायलशी वैर असल्यामुळे शियापंथी हूतीही इस्रायलच्या विरोधात उभे ठाकले आहेत. याशिवाय असे की, 2003 मध्ये अमेरिकेने शियापंथी इराकवर हल्ला केला होता तेव्हापासूनच शियापंथी हूती अमेरिकेच्या आणि अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या इस्रायलच्या विरोधात गेले आहेत. शियापंथी इराणची सुन्नीपंथी हमास, शियापंथी हिजबुल्ला आणि शियापंथीच हूती या तिघांनाही एकाच वेळी सक्रिय चिथावणी आहे. तोडीस तोड म्हणून एकटा असूनही इस्रायल एकाच वेळी एकेकाला चांगलेच झोडपून काढतो आहे. आता बोला?
No comments:
Post a Comment