Monday, January 1, 2024

 बांगलादेशातील निवडणूक -  7 जानेवारी 2024

तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक 02.01. 2024 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.

बांगलादेशातील निवडणूक -  7 जानेवारी 2024

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३० 

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   बांगलादेशाच्या कायदेमंडळाचे राष्ट्रस्तरावर 350 सदस्यांचे एकच सभागृह आहे. यापैकी 300 सदस्यांची भारताप्रमाणे 5 वर्षांसाठी निवड होते. 50 जागा महिलांसाठी राखीव असतात. यांची निवड सत्ताधारी पक्ष किंवा आघाडीतर्फे नामनिर्देशित (सिलेक्ट) केले जातात. पंतप्रधान हा सरकारचा प्रमुख असतो. 

2018 ची निवडणूक 

  30 डिसेंबर 2018 ला झालेल्या निवडणुकीत शेख हसीना यांच्या आघाडीने दणदणीत विजय संपादन केला होता.  यावेळी सुमारे10 कोटी मतदारांपैकी 80.20%मतदारांनी म्हणजेच अगोदरच्या निवडणुकीपेक्षा 20% जास्त मतदारांनी मतदान केले होते. शेख हसीना यांच्या आवामी लीगच्या आघडीला 257 जागा मिळाल्या. एच एम इर्षाद यांच्या जपी(ई) आघाडीला 26 जागा आणि जातीय ऐक्य परिषदेला 7 जागा मिळाल्या होत्या. 

आता बांगलादेशात 7 जानेवारी 2024 ला विरोधकांचा विरोध अमान्य करीत इव्हीएम मशीनचा वापर करून  सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सर्वात मोठ्या विरोधी पक्षाने म्हणजे  खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने (बीएनपी) निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. बीएनपीच्या सर्वोच्च नेत्या आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया गेल्या काही वर्षांपासून तुरुंगात होत्या आणि आता  नजरकैदेत आहेत. इतर कुठलाही पक्ष शेख हसीना यांच्या सत्ताधारी अवामी लीगला आव्हान देण्याच्या स्थितीत नाही. काही वर्षापूर्वीपर्यत बांगलादेशाच्या राजकारणावर  खालिदा झिया यांचाही प्रभाव होता. आता मात्र शेख हसीना यांच्यासमोर कुणी प्रतिस्पर्धीच उरला नाही. भारताच्या दृष्टीने विचार केल्यास ही चांगली बातमी आहे, कारण धार्मिक कट्टर संघटनांच्या विरोधात हसीना  भूमिका घेत आहेत. ही बाब भारतासाठी महत्त्वाची आहे.

   विरोधकांचा निवडणुकीवर बहिष्कार 

  बांगलादेशात  ‘जातीय पार्टी’ या तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचाही निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार होता. परंतु शेख हसीना यांनी त्यांची  समजूत घातली आणि  एकूण 300 पैकी  पैकी 26  मतदारसंघात  त्यांच्या विरोधात उमेदवारच उभे केले नाहीत.

आवामी लीगने डाव्या विचाराच्या जातीय समाजतांत्रिक दलासाठी 3 व ‘वर्कर्स पार्टी’साठी 2 मतदारसंघ सोडले आहेत. बांगलादेशात निवडणुका तटस्थ, न्याय्य आणि योग्य वातावरणात होतात, असे चित्र निर्माण करण्यासाठी शेख हसीना यांच्या अवामी लीगने एकूण 31 जागी उमेदवार उभे न करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे, असा त्यांच्यावर विरोधकांनी आरोप केला आहे.  76 वयाच्या शेख हसीना वाजेद या 2009 नंतरच्या 10 व्या पंतप्रधान असतील.1996 ते 2001 ही त्यांची पहिली कारकीर्द होती. त्यानंतर  2009 ते आजपर्यंत अशा सततच्या कालखंडात त्या बांगला देशाच्या पंतप्रधानपदी आहेत. त्यांची दुसरी कारकीर्द 2009 ते 2014, तिसरी कारकीर्द 2014 ते 2019  आणि चौथी कारकीर्द 2019 ते 2024 अशी अखंड आहे. तसे एकूण 29  राजकीय पक्ष निवडणुकीत भाग घेत आहेत पण  ते सगळे लहान पक्ष आहेत आणि त्यांचा प्रभावही फारसा नाही. बांगलादेशच्या निवडणुकीकडे साहजिकच भारत, चीन, अमेरिका इत्यादी देशांचे लक्ष आहे. भारताचे अवामी लीगसोबत जुने संबंध आहेत. शेख हसीना या ''बंगबंधू'' मुजीबूर रेहमान यांच्या कन्या होत. 1971 च्या स्वतंत्र बांगलादेशासाठीच्या  लढ्यात भारताचे मोलाचे सहकार्य बांगलादेशाला लाभले होते. 1975 मध्ये 14-15 ऑगस्टच्या रात्री तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानच्या लष्कराच्या काही जवानांनी मुजीबूर रेहमान आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या केली होती. तेव्हा शेख हसीना बांगलादेशात नसल्यामुळे वाचल्या. नंतर त्या काही वर्षे भारतात होत्या. तेव्हापासून त्यांचे भारताशी अतिशय जवळचे संबंध  राहिलेले आहेत.

  बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात -ए - इस्लामी हे आजवर बहुतेकदा एकत्र निवडणूक लढवीत आले आहेत. जमात -ए- इस्लामी या पक्षाचे वैशिष्ट्य असे आहे की, त्यांच्याजवळ भरपूर संख्येत कार्यकर्ते आहेत पण या पक्षाला जनतेत फारसा पाठिंबा नाही. बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धात ‘जमात’ने पाकिस्तानच्या लष्कराला मदत केली होती, हा त्यांचा अक्षम्य अपराध होता. आज 50 वर्षे उलटून गेली तरी या पक्षावरचा जनतेचा रोष कमी झालेला नाही. शिवाय या पक्षाच्या पाकिस्तानला साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांना   शेख हसीना यांचे सरकार  युद्ध गुन्हेगार मानत आले आहे. त्यांना  शिक्षा देण्यासाठी सरकारने लवाद बसवला आहे. त्यामुळेही लोकमत कायम विरोधात राहण्यास मदत होत असते. जमात’चे आजही पाकिस्तानच्या ‘आयएसआयशी’ संबंध आहेत‌. 1971 च्या युद्ध गुन्हेगारांना फाशी देण्यास पाकिस्तानने विरोध केला होता, हेही जनतेला आवडले नाही. त्यांना ही बाब देशाच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ केल्याप्रमाणे वाटते.  बांगलादेश नॅशनल पक्षाला थोडाफार जनाधार आहे. पण तेवढ्याने भागत नसते. लोकमत आपल्याकडे वळवण्यासाठी कार्यकर्त्यांचे प्रबळ पाठबळही असावे लागते. याबाबतीत बांगलादेश नॅशनल पक्ष मागे पडतो. ‘सटवाईला नाही नवरा आणि म्हसोबाला नाही बायको’, या सारखी स्थिती आहे. म्हणून हे दोन पक्ष बांगलादेशाच्या राजकारणात जोडीने वावरताना दिसतात. मग उरतो तो शेख हसीना यांचा आवामी लीग हा पक्ष. अन्य पर्याय नसल्यामुळे तरुण वर्ग अवामी लीगच्यासोबत आहे. पण हा केवळ टीना (देअर ईज नो अदर अल्टरनेटिव्ह) फॅक्टर नाही. शेख हसीना यांच्या कारकिर्दीत बांगलादेशाने अनेक क्षेत्रात डोळ्यात भरावी, अशी प्रगती केली आहे. उद्योगक्षेत्रात बांगलादेश  खूप पुढे आहे. बांगलादेशात तयार झालेल्या पोशाखांना जगभर मान्यता आहे. या व्यवसायाने सुमारे ४० लाख कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

हंगामी सरकारच्या नेतृत्वात निवडणुका घ्या.

 बांगलादेशातील निवडणुका ‘तटस्थ, मुक्त आणि न्याय्य वातावरणात’ होत नाहीत, असे मत व्यक्त करीत अमेरिकेने निवडणूक प्रक्रिया नीट पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.  वाटाघाटी कुठे अडल्या आहेत हे आवामी लीगने स्पष्ट केले आहे. शेख हसीना यांनी आधी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा आणि तटस्थ हंगामी सरकारच्या नेतृत्वाखाली निवडणुका घ्याव्यात, असा आग्रह धरल्यामुळे ही बैठकच झाली नाही, असे आवामी लीगने अमेरिकेला कळविले आहे. अमेरिकेने याबाबत आणखी पुढे पाऊल न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कारण अमेरिकेला बांगलादेश चीनकडे वळेल, अशी भीती वाटते आहे. ‘बांगलादेशची निवडणूक’ ही त्या देशाची अंतर्गत बाब आहे,’ अशी भूमिका भारत,चीन आणि रशिया यांनी स्वीकारली आहे.  बांगलादेश नॅशनल पार्टी 1996 मध्ये सत्तेत असताना विरोधी पक्ष अवामी लीगनेच निवडणूक तटस्थ व्यक्तीच्या नेतृत्वाखाली घेण्याची मागणी केली होती. खालिदा झिया सरकारने ती मागणी मान्य करून त्याप्रमाणे राज्यघटनेत तेरावी दुरुस्तीही केली होती. पण  2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तेरावी दुरुस्ती घटनाविरोधी ठरवली. त्याचा आधार घेऊन शेख हसीना सरकारने हंगामी तटस्थ सरकारची तरतूद रद्द करणारी घटनादुरुस्ती केली. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा उकरून काढण्यात अर्थ नाही, हे स्पष्ट आहे. कडक स्वभावाच्या शेख हसीना हुकूमशहाप्रमाणे वागतात, असा त्यांच्यावर विरोधक आरोप करतात पण आजतरी बांगलादेशची जनता त्यांच्या पाठीशी आहे, म्हणून शेख हसीना यांना पर्याय नाही, हे नक्की आहे.



No comments:

Post a Comment