विक्रमी शेख हसीना!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
रविवारी 7 जानेवारीला बांगलादेशमध्ये राष्ट्रीय निवडणुका पार पडल्या. विरोधी पक्षाच्या बहिष्कारामुळे मतदान 41% च्या जवळपास झाले. वंगबंधू शेख मजिबुर रहमान यांच्या कन्या शेख हसीना पाचव्यांदा निवडून आल्या. यावेळी बांगलादेश लोकशाही मार्गाने जाणार किंवा कसे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. पण शेख हसीना यांनी दोनतृतियांशपेक्षा जास्त जागा (300 पैकी 223 ) जिंकल्या व विजय मिळवला, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. इर्शाद यांचा राष्ट्रीय पक्ष 11, अपक्ष 62, अन्य 3 जागा असा एकूण हिशोब आहे. अपक्षांमध्ये आवामी लीगनेच उभे केलेले उमेदवार आहेत, असा विरोधकांचा आरोप आहे.
भारत बांगलादेश मैत्री
भारताचे या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष होते. कारण भूराजकीयदृष्टय़ा बांगलादेश हे भारतासाठी महत्त्वाचे शेजारी राष्ट्र आहे. ईशान्य भारतातील फुटीरतावादी गटांच्या कारवाया पुरतेपणी आजही तांबलेल्या नाहीत. तसेच चीनचे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये प्रभुत्व वाढत चालले आहे. यावर उपाययोजना करायची असेल तर शेजारी बांगलादेशासोबत मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करणे काळाची गरज आहे. विशेष म्हणजे बांगलादेशातील भारताविरोधी कट्टर धर्माध संघटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बांगलादेशाशी राजनैतिक, व्यापारी, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करणे हे भारताच्या हिताचे आहे. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये लोकशाही मागे पडल्याबद्दल काही देश अतिशय अस्वस्थ झाले होते, यात अमेरिका, संयुक्त राष्ट्रे, ब्रिटन यासारखे पाश्चात्य देश आहेत, तर शेख हसीना विजयी झाल्याबद्दल भारताच्या जोडीला रशिया, आणि चीन यांनीही आनंद व्यक्त केला आहे. भारत आणि बांगलादेशमध्ये 4100 किमी लांबीची सीमा आहे. ती सुरक्षित असणे उभयपक्षी हिताचे आहे. खालिदा झिया यांची बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी (बीएनपी) पाकिस्तानधार्जिणी आहे. खालिदा झिया यांच्या सत्ताकाळात, बांगलादेशाच्या मुक्तिसंग्रामात भारताने केलेली मदत, खालिदा झिया जणू पार विसरून गेल्यासारख्या वागत होत्या. चीनचे नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीव आणि आता बांगलादेशालासुद्धा आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचे प्रयत्न सतत चालू असतात. अशा परिस्थितीत बांगलादेशातील कट्टरतावादी संघटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तिथे धर्मनिरपेक्षतेवर हे मूल्य भर देणाऱ्या शेख हसीना यांचे सत्तेत पुनरागमन भारताच्या दृष्टीने निश्चितच हितकारक ठरणार आहे. तसेच अमेरिकादी पश्चिमात्य राष्ट्रांची दक्षिण आशियात ढवळाढवळ सुद्धा भारताच्या हिताची नाही. याशिवाय भारत आणि बांगलादेश यात दीर्घ ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध देखील आहेत, हेही महत्त्वाचे आहे. एक स्थिर, समृद्ध असा बांगलादेश शेजारी असणे भारताच्या हिताचे आहे. यामुळे, मदतीची जाणीव असलेल्या कृतज्ञ शेख हसीना यांच्या पाठीशी भारत सतत उभा असतो. जगातही भारताचा एक जवळचा मित्र म्हणूनच बांगलादेशाकडे पाहिले जाते. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात तर दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण परस्पर सहकार्याचे संबंध भरपूर प्रमाणात वृद्धिंगत करण्याचे काम उभयपक्षी झाले आहे. तीस्ता पाणीवाटप करार, भारत-बांगलादेश रेल्वेमार्ग अशा अनेक करारांतून ही मैत्री वृद्धिंगत झाली आहे.
विक्रमी कारकीर्द
1996 ते 2001 ही शेख हसीना यांची पहिली कारकीर्द होती. त्यानंतर 2009 साली शेख हसीना या बांगलादेशात पुन्हा सत्तेवर आल्या. त्यानंतर 2009 ते आजपर्यंतच्या सततच्या कालखंडात त्या बांगलादेशाच्या पंतप्रधानपदी आहेत. त्यांची दुसरी कारकीर्द 2009 ते 2014, तिसरी कारकीर्द 2014 ते 2019 आणि चौथी कारकीर्द 2019 ते 2024 आणि आता पाचवी कारकीर्द 2024 ते 2029 अशी अखंड आहे. 2009 पूर्वी, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे भारताशी अत्यंत प्रतिकूल संबंध होते. त्या काळात असंख्य भारतविरोधी दहशतवाद्यांना आणि अतिरेकी गटांना बांगलादेशात मुक्तद्वार आणि आश्रय असे. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) शी संबंध असल्याचा आरोप असलेल्यांना आणि इस्लामी कट्टरपंथीयांना त्यावेळेस बांगलादेशाने मदत केली होती. हसीना यांनी त्यांच्या कार्यकाळात भारतविरोधी घटकांवर केलेल्या कठोर कारवाईमुळे आणि भारताच्या दहशतवादविरोधी सहकार्यामुळे गेल्या दहा वर्षात पूर्व सरहद्द पुष्कळअंशी सुरक्षित झाली आहे. आज म्यानमारमधील परिस्थिती पार बिघडली आहे. अशा परिस्थितीत भारत आणि बांगलादेश यांच्यातील संरक्षणविषयक भागीदारी अतिशय उपयोगाची आणि महत्त्वाची आहे. बांगलादेशच्या निर्मितीपासूनच या देशाविषयी भारताला आपलेपणा वाटत आला आहे, हे साहजिकच आहे. पण बांगलादेशातील लष्करशहा किंवा काही निर्वाचित सरकारांनीही योग्य प्रतिसाद दिला असे घडले नाही.
बिमस्टेक
गेल्या काही वर्षांत दक्षिण आशियात मोठे आर्थिक बदल झाले आहेत. बांगलादेशही आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला आहे. आज बांगलादेश ही आशियातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था आणि बाजारपेठ आहे. पूर्वी पाकिस्तान या स्थानी होता. जागतिक बँकेच्या अहवालानुसार बांगलादेशाने जीडीपी च्या बाबतीत पाकिस्तानला धोबीपछाड दिली आहे. आज बांगलादेश हे भारतीय वस्तूंसाठी एक मोठे निर्यातस्थान बनले आहे. हसीना यांच्या सत्ताकाळात, बांगलादेश जलमार्गांद्वारे भारताच्या ईशान्य भागाला दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देतो आहे. आज भारत आणि पाकिस्तानमध्ये आर्थिक सहकार्य नाही. नजीकच्या भविष्यकाळात यात सुधारणा होण्याची शक्यताही नाही. त्यामुळे भारतीय उपखंडात पुरवठाश्रृंखलेत बांगलादेशाचे भारताला मिळत असलेले सहकार्य मोलाचे ठरले आहे.
बंगालचा उपसागर दक्षिण आणि आग्नेय आशियाला जोडतो. या भागात सर्वप्रकारच्या सहकार्यासाठी बांगलादेश एक महत्त्वाचा दुवा आहे. बंगालच्या उपसागराच्या पूर्वेकडील बाजूस म्यानमार, थायलंड, बांगलादेश असून भारतीय उपखंडाचा पूर्वेकडील भाग या उपसागराने जोडला जातो. त्याच्या सुरक्षा आणि सहकार्यासाठी बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अॅण्ड इकनॉमिक कोऑपरेशनची स्थापना करण्यात आली असून त्यांचे सचिवालय ढाका येथे आहे. थायलंडमधील बॅंकॅाकमध्ये 31 जुलै 1997 ला स्थापन झालेल्या या संस्थेला आता 25 वर्षे झाली आहेत. 1997 साली बांगलादेश, भारत (इंडिया), श्रीलंका, थायलंड हे चारच देश एकत्र आले असल्यामुळे ही बिस्ट-इक (बांग्लादेश, भारत (इंडिया), श्री लंका आणि थायलंड) म्हणून ओळखली जायची. डिसेंबर 1997 मध्ये म्यानमारचा समावेश झाल्यानंतर ही बिमस्ट-इक झाली. 2004 मध्ये नेपाळ आणि भूतान सामील झाल्यानंतर मात्र सर्व समाविष्ट देशांची नावे वगळून हिचे नाव बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अॅण्ड इकनॉमिक कोऑपरेशन असे झाले. या संस्थेच्या निर्मितीमुळे या भागातील आर्थिक सहकार्य वाढीस लागले आहे. याचा एक परिणाम म्हणून जपानसारख्या आर्थिक संपन्न देशांनी या भागात आर्थिक गुंतवणूक करायला प्रारंभ केला आहे. याचा लाभ बांगलादेशमध्येही जपानची मोठी गुंतवणूक होण्यात झाला आहे.
दोन्ही डगरींवर हात
शेख हसीना या भारताकडून मदत घेतात आणि मग चीन नाराज होऊ नये म्हणून चीनशीही संबंध चांगले ठेवण्याचा कसून प्रयत्न करतात, असा आरोप केला जातो. पण चीन ही जगातील दुसरी आर्थिक महासत्ता आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि चीन बांगलादेशापासून दूर नाही ही भौगोलिक स्थिती नाकारता येणार नाही. चीनची जशी जगभर जगभर गुंतवणूक आहे, तशीच ती बांगलादेशातही असणारच. चीनशी व्यापार करूच नका अशी अपेक्षा व्यवहाराला धरून नाही. तरीही आज भारत आणि चीनमधील संबंध अतिशय ताणलेले असतांना दोघांशीही चांगले संबंध ठेवण्यावाचून बांगलादेशासमोर दुसरा कोणता पर्याय आहे बरे? अफूग्रस्त चीन हा निद्रिस्त राक्षस आहे. त्याला जागे करू नका, असा परखड सल्ला नेपोलियनने दिला होता. याकडे दुर्लक्ष करणाऱ्यात अमेरिकेचा पहिला नंबर लागतो. चीनचे बहिष्कृत स्वरूप संपवून त्याला जगात मानाचे स्थान मिळावे म्हणून साह्य केले ते अमेरिकेने. अब पछताये क्या होत?
बांगलादेशाचे कायदेमंडळ
बांगलादेशाच्या कायदेमंडळाचे राष्ट्रस्तरावर 350 सदस्यांचे एकच सभागृह आहे. यापैकी 300 सदस्यांची भारताप्रमाणे 5 वर्षांसाठी निवड होते. 50 जागा महिलांसाठी राखीव असतात. यांची निवड सत्ताधारी पक्ष किंवा आघाडीतर्फे नामनिर्देशित (सिलेक्ट) करून केली जाते. पंतप्रधान हा सरकारचा प्रमुख असतो.
2018 ची निवडणूक
30 डिसेंबर 2018 ला झालेल्या निवडणुकीत शेख हसीना यांच्या आघाडीने दणदणीत विजय संपादन केला होता. यावेळी सुमारे10 कोटी मतदारांपैकी 80.20%मतदारांनी म्हणजेच अगोदरच्या निवडणुकीपेक्षा 20% जास्त मतदारांनी मतदान केले होते. शेख हसीना यांच्या आवामी लीगच्या आघडीला 257 जागा मिळाल्या होत्या. एच एम इर्षाद यांच्या आघाडीला 26 जागा आणि जातीय ऐक्य परिषदेला 7 जागा मिळाल्या होत्या.
आता बांगलादेशात 7 जानेवारी 2024 ला विरोधकांचा विरोध अमान्य करीत इव्हीएम मशीनचा वापर करून सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. सर्वात मोठ्या विरोधी पक्षाने म्हणजे खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने (बीएनपी) या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. बीएनपीच्या सर्वोच्च नेत्या आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया गेल्या काही वर्षांपासून तुरुंगात होत्या आणि आता नजरकैदेत आहेत. इतर कुठलाही पक्ष शेख हसीना यांच्या सत्ताधारी अवामी लीगला आव्हान देण्याच्या स्थितीत नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत बांगलादेशाच्या राजकारणावर खालिदा झिया यांचाही प्रभाव होता. आता मात्र शेख हसीना यांच्यासमोर कुणी प्रतिस्पर्धीच उरला नाही. भारताच्या दृष्टीने विचार केल्यास ही चांगली बातमी आहे, कारण धार्मिक कट्टर संघटनांच्या विरोधात हसीना भूमिका घेत आहेत. ही बाब भारतासाठी महत्त्वाची आहे.
विरोधकांचा निवडणुकीवर बहिष्कार
बांगलादेशात ‘जातीय पार्टी’ या तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचाही निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार होता. परंतु शेख हसीना यांनी त्यांची समजूत घातली आणि एकूण 300 पैकी पैकी 26 मतदारसंघात त्यांच्या विरोधात उमेदवारच उभे केले नाहीत.
आवामी लीगने डाव्या विचाराच्या जातीय समाजतांत्रिक दलासाठी 3 व ‘वर्कर्स पार्टी’साठी 2 मतदारसंघ सोडले होते. बांगलादेशात निवडणुका तटस्थ, न्याय्य आणि योग्य वातावरणात होतात, असे चित्र निर्माण करण्यासाठी शेख हसीना यांच्या अवामी लीगने एकूण 31 जागी उमेदवार उभे न करण्याचा प्रयत्न चालविला होता, असा त्यांच्यावर विरोधकांनी आरोप केला होता. 76 वयाच्या शेख हसीना वाजेद या 2009 नंतरच्या 10 व्या पंतप्रधान असतील. तसे एकूण 29 राजकीय पक्ष निवडणुकीत भाग घेत होते पण ते सगळे लहानसहान पक्ष आहेत आणि त्यांचा प्रभावही फारसा नाही. बांगलादेशच्या निवडणुकीकडे साहजिकच भारत, चीन, अमेरिका इत्यादी देशांचे लक्ष होते. भारताचे अवामी लीगसोबत जुने संबंध आहेत. शेख हसीना या ''बंगबंधू'' मुजीबूर रेहमान यांच्या कन्या होत. 1971 च्या स्वतंत्र बांगलादेशासाठीच्या लढ्यात भारताचे मोलाचे सहकार्य बांगलादेशाला लाभले होते. 1975 मध्ये 14-15 ऑगस्टच्या रात्री तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानच्या लष्कराच्या काही जवानांनी मुजीबूर रेहमान आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या केली होती. तेव्हा शेख हसीना बांगलादेशात नसल्यामुळे वाचल्या. नंतर त्या काही वर्षे भारतात होत्या. तेव्हापासून त्यांचे भारताशी अतिशय जवळचे संबंध राहिलेले आहेत.
म्हसोबा आणि सटवाई यांची युती
बांगलादेश नॅशनल पार्टी आणि जमात -ए - इस्लामी हे आजवर बहुतेकदा एकत्र निवडणूक लढवीत आले आहेत. जमात -ए- इस्लामी या पक्षाचे वैशिष्ट्य असे आहे की, त्यांच्याजवळ भरपूर संख्येत कार्यकर्ते आहेत पण या पक्षाला जनतेत फारसा पाठिंबा नाही. बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धात ‘जमात’ने पाकिस्तानच्या लष्कराला मदत केली होती, हा त्यांचा अक्षम्य अपराध होता. आज 50 वर्षे उलटून गेली तरी या पक्षावरचा जनतेचा रोष कमी झालेला नाही. शिवाय या पक्षाच्या पाकिस्तानला साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांना शेख हसीना यांचे सरकार युद्ध गुन्हेगार मानत आले आहे. त्यांना शिक्षा देण्यासाठी सरकारने लवादही बसवला आहे. त्यामुळेही लोकमत त्यांच्या कायम विरोधात राहण्यास मदत होत असते. जमातचे आजही पाकिस्तानच्या ‘आयएसआयशी’ संबंध आहेत. 1971 च्या युद्ध गुन्हेगारांना फाशी देण्यास पाकिस्तानने विरोध केला होता, हेही जनतेला आवडलेले नाही. त्यांना ही बाब देशाच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ केल्याप्रमाणे वाटत होती. बांगलादेश नॅशनल पक्षाला थोडाफार जनाधार आहे. पण तेवढ्याने भागत नसते. लोकमत आपल्याकडे वळवण्यासाठी कार्यकर्त्यांचे प्रबळ पाठबळही असावे लागते. याबाबतीत बांगलादेश नॅशनल पक्ष मागे पडतो. ‘सटवाईला नाही नवरा आणि म्हसोबाला नाही बायको’, या सारखी स्थिती जमात -ए- इस्लामी आणि बांगलादेश नॅशनल पक्षाची आहे. म्हणून हे दोन पक्ष बांगलादेशाच्या राजकारणात जोडीने वावरताना दिसतात. पण तरीही त्यांना जनाधार काही मिळत नाही. मग उरतो तो शेख हसीना यांचा आवामी लीग हा पक्ष. अन्य पर्याय नसल्यामुळे तरुण वर्ग अवामी लीगच्यासोबत आहे. पण हा केवळ टीना फॅक्टर (देअर ईज नो अदर अल्टरनेटिव्ह) नाही. शेख हसीना यांच्या कारकिर्दीत बांगलादेशाने अनेक क्षेत्रात डोळ्यात भरावी, अशी प्रगती केली आहे. उद्योगक्षेत्रात बांगलादेश खूप पुढे आहे. बांगलादेशात तयार झालेल्या पोशाखांना जगभर मान्यता आहे. या व्यवसायाने सुमारे ४० लाख कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
विकसित बांगलादेश भारतासाठी महत्त्वाचा
शेख हसीना सत्तेवर आल्यापासून बांगलादेशातील बजबजपुरीला पुष्कळ प्रमाणात पायबंद बसला आहे. प्रगती आणि विकासासाठी राजकीय स्थैर्य ही पहिली महत्त्वाची आवश्यकता असते. ती 2009 पासून बांगलादेशाला शेख हसीना यांनी मिळवून दिली. प्रगत आणि विकसित शेजारी ही भारताचाचीही गरज होती. बांगलादेशाचे विकसित स्वरूप भारतासाठीही खूप उपयुक्त ठरले आहे आणि त्यामुळे भारताच्या दृष्टिकोनातून बांगलादेशातील सत्तास्थानी शेख हसीना असाव्यात, ही महत्त्वाची बाब होती. बांगलादेशशी भारताचे संबंध सुधारले, ते शेख हसीना यांच्यामुळेच. आज शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये लोकशाही मागे पडली असा आरोप केला जातो. पण विरोधकांनीही काही पथ्ये पाळली पाहिजेत. विरोध सनदशीर मार्गाने केला पाहिजे. बांगलादेशात हे घडले नाही/घडत नाही. मोकळे विरोधक अव्यवहार्य मागण्या करतात. त्या पूर्ण केल्या नाही तर हैदोस घालतात. त्यांना अटक करावी तर लोकशाहीवर हल्ला झाल्याचा कांगावा करतात. अशा परिस्थितीत राज्यकारभार करणे ही तारेवरची कसरत असते. ती करण्याचा शेख हसीना यांनी प्रयत्न केला हे खरे आहे, पण या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाले नाही, हीही वस्तुस्थितीच आहे. पण शेख हसीना यापेक्षा आणखी काही करू शकत नव्हत्या याचीही नोंद घ्यावयास नको काय?
हंगामी सरकारच्या नेतृत्वात निवडणुका घ्या.
बांगलादेशातील निवडणुका ‘तटस्थ, मुक्त आणि न्याय्य वातावरणात’ होत नाहीत, असे मत व्यक्त करीत अमेरिकेने निवडणूक प्रक्रिया नीट पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पण याबाबतच्या वाटाघाटी कुठे अडल्या हे शेख हसीना यांच्या आवामी लीगने स्पष्ट केले आहे. शेख हसीना यांनी आधी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा आणि तटस्थ हंगामी सरकारच्या नेतृत्वाखाली निवडणुका घ्याव्यात, असा आग्रह धरल्यामुळे विरोधकांसोबत बैठकच झाली नाही, असे आवामी लीगने अमेरिकेला अगोदरच कळविले होते. अमेरिकेनेही याबाबत आणखी पुढे पाऊल न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कारण अधिक ताणले तर बांगलादेश चीनकडे वळेल, अशी भीती अमेरिकेला वाटते आहे. अमेरिकेचा हा निर्णयही व्यवहाराला धरूनच घेतलेला निर्णय नाही का? हसीना-समर्थकांबरोबरच खालिदा-समर्थकांकडूनही या पेचप्रसंगी भारताने आपली बाजू घ्यावी, अशी मागणी होत होती. पण भारताने तसे केले नाही, हे आंतरराष्ट्रीय संकेतांना धरूनच झाले आहे. ‘बांगलादेशची निवडणूक’ ही त्या देशाची अंतर्गत बाब आहे,’ अशी भूमिका भारत, चीन आणि रशिया यांनी स्वीकारली आहे. बांगलादेश नॅशनल पार्टी 1996 मध्ये सत्तेत असताना विरोधी पक्ष असलेल्या हसीना यांच्या अवामी लीगनेच निवडणूक तटस्थ व्यक्तीच्या नेतृत्वाखाली घेण्याची मागणी केली होती, हे खरे आहे. खालिदा झिया सरकारने ती मागणी मान्य करून त्याप्रमाणे राज्यघटनेत तेरावी दुरुस्तीही केली होती, हेही खरेच आहे. पण 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तेरावी दुरुस्ती घटनाविरोधी ठरवली. त्याचा आधार घेऊन शेख हसीना सरकारने हंगामी तटस्थ सरकारची तरतूद रद्द करणारी घटनादुरुस्ती केली. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा उकरून काढण्यात अर्थ नव्हता, हे स्पष्ट आहे. या तपशीलाकडे अमेरिकादी देश दुर्लक्ष करीत असतील तर त्याला काय म्हणावे? कडक स्वभावाच्या शेख हसीना हुकूमशहाप्रमाणे वागतात, असा त्यांच्यावर विरोधक आरोप करतात पण आजतरी बांगलादेशची जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, म्हणून शेख हसीना यांना पर्याय नाही, ही वस्तुस्थिती सर्वांनीच स्वीकारावी यातच शहाणपणा आहे.
No comments:
Post a Comment