शी जिनपिंग आणि ज्यो बायडेन : मतभेदाचे मुद्दे
तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक 12.12. 2023 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.
शी जिनपिंग आणि ज्यो बायडेन : मतभेदाचे मुद्दे
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430
Email- kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
चीनची चिंता आणि अमेरिकेची अपरिहार्यता या दोन्ही मुद्यांचा विचार केल्याशिवाय शी जिनपिंग आणि बायडेन यांच्या भेटीच्या फलिताचे मूल्यमापन करता येणार नाही. सॅनफ्रान्सिसको येथील चर्चेनंतरही उभय देशात काही काही मतभेद कायम आहेत. तैवानची स्वायत्तता हा प्रश्न चीन आणि अमेरिका या दोघांसाठीही सारखाच महत्त्वाचा आहे.
तैवान प्रकरणी मतभेद कायम
तैवानच्या सुरक्षेचा मुद्दा अमेरिका नजरेआड होऊ देणार नाही. कोणताही शब्दच्छल न करता बायडेन यांनी हे भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत स्पष्ट केले. 1948 साली माओच्या साम्यवादी मुक्ती सेनेने चिआंग काई शेख यांना चीनच्या मुख्यभूमीवरून हुसकावून लावल्यानंतर त्यांनी आजच्या तैवान म्हणजे तेव्हाच्या फॅार्मोसा या अविकसित बेटावर माघार घेतली. आजच्या तैवानची अर्थव्यवस्था मात्र मुक्त आणि अतिविकसित आहे. तिला भूतलावरचे ‘एकॅानॅामिक मिरॅकल’ म्हणून गौरविले जाते. मायकोचिप आणि इलेक्ट्रॅानिक उद्योगात तैवानचे स्थान जगात सर्वोच्च मानले जाते. 1948 साली चीनवर जणू जागतिक बहिष्कारच होता. पण जगाचा तैवानवर बहिष्कार नव्हता. चीन आपल्याला हव्या असलेल्या वस्तू तैवानमधून तस्करी करून मिळवीत होता. तैवान ही चीनची बाह्य जगाशी संपर्क साधण्याची जणू खिडकीच होती. आज चीन एक महासत्ता आहे. त्याला तैवान किंवा हाँगकाँग सारख्या खिडक्यांची आवश्यकता नाही, तर आता त्याला यांचा ताबा हवा आहे. पण विकसित तैवानला हे मान्य नाही. तसेच अमेरिकेचाही तैवानवर वरदहस्त आहे. म्हणून सद्ध्यातरी चीन गुगुरत हात चोळीत बसला आहे. तैवानप्रकरणी या दोन महासत्तांमधली बोलणी फिसकटली आहेत.
दुसरा असाच फिसकटलेला मुद्दा आहे दक्षिण चिनी समुद्राबाबतचा. अगोदर शेजारच्या देशाशी सीमावाद उकरून काढायचा, आपल्या सीमा त्या देशात सरकवायच्या, जुन्या इतिहासकाळातील तथाकथित दाखले/नकाशे समोर करायचे, पुढे त्या भूभागावर अधिकार सांगायचा, समुद्रातील आणि उपसागरातील बेटांवरही आपला अधिकार सांगायचा, कृत्रिम बेटेही तयार करायची आणि नवीन प्रदेश जिंकून घ्यायचा, टाकलेल्या चार पावलांपैकी चर्चेत फक्त दोन पावले मागे घ्यायची, असे चिनी विस्तारवादाचे बहुमुखी स्वरूप आहे. हे आपल्याला मान्य नाही, असे अमेरिकेने चीनला स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
चीनच्या समजुतदारपणामागचे रहस्य
चीन अधूनमधून समजुतदारपणा दाखवत असतो. त्याला तशीच काही कारणे आहेत. कोविडमुळे चीनची घसरलेली अवस्था अजूनही पुरतेपणी सावरलेली नाही. महागाई इतकी वाढेल, असे चीनला वाटत नव्हते. चिनी जनता आज पूर्वी कधी नव्हती एवढी अस्वस्थ आणि असंतुष्ट आहे. चीनमधील परकीय उद्योग बाहेर पडत आहेत. चीनमध्ये मूलच नको, असा विचार वाढत चालला आहे. त्यामुळे लोकसंख्या घटते आहे. असे असले तरी चीन आजही एक महासत्ताच आहे. पण भारतासारखे विकसनशील देश आणि चीन यातील असमतोल कमी होत चालला आहे, ही सुद्धा वस्तुस्थितीच आहे. याशिवाय चीनच्या आक्रमक हालचालींना असलेला विरोध अमेरिकेने कायम ठेवला असून आर्थिक निर्बंध मागे घेतले जााणार नाहीत हे ठासून सांगितले आहेत.
चीनमधील मानवाधिकाराचे हनन
आजच्या चीनमधील शिझियांग (सिकियांग) राज्यात/प्रांतात गत 2,500 वर्षात डझनावारी राज्ये/साम्राज्ये जन्माला आली, फुलली, फळली व शेवटी लयाला गेली. याहीपेक्षा मागे जातो म्हटले तर महाभारतात या सिकियांग प्रदेशाला ‘तुषार’/‘तुखार’ हे नाव दिलेले दिसते. दिग्विजय यात्रेत अर्जुनाने हा भाग जिंकल्याचेही उल्लेख आहेत. अशा या अतिप्राचीन व इतिहासप्रसिद्ध पण आजच्या चिनी भागात अगोदरपासूनच सुरू असलेला वाद सध्या विकोपाला गेला आहे. सुरवात अशी आहे की, मध्य आणि पूर्व आशियात उघुर नावाचा एक तुर्किक वांशिक गट होता/आहे. ह्यातील बहुतेक लोक आज धर्माने मुस्लीम आहेत. चीनमधील शिझियांग (सिकियांग) नावाच्या राज्यात या उघुर लोकांची वस्ती जास्त प्रमाणात असून त्यांचा एक नावापुरता स्वायत्त विभाग चीनमध्ये आहे. चीनमध्ये उघुरांना वांशिक अल्पसंख्यांक म्हणून मान्यता आहे. पण ते मूळ निवासी आहेत, असे काही चीन मानत नाही. उघुरांची भूमिका मात्र नेमकी उलट, म्हणजे आपण मूळ निवासी आहोत, अशी आहे. चीनमध्ये वायव्य दिशेला असलेल्या या शिझियांग (सिकियंग) राज्याच्या सीमा जशा चीन या मुख्य देशाला लागून आहेत, तशाच त्या मंगोलिया, कझखस्थान, किरगिझस्थान आणि अफगाणिस्थान या देशांनाही लागून आहेत. या देशात आणि सिकियांग राज्यात मात्र सर्वात जास्त उघुर लोक राहतात. तुर्किक भाषा बोलणाऱ्या उघरांना आजवर जवळजवळ सर्वच देशांनी निर्दयपणे वागवले अशा नोंदी इतिहासात सापडतात. पण याचा अर्थ असाही नाही की, उघुर स्वत: अगदी धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ आहेत. राजकारणात, त्यातही जागतिक राजकारणात तर असा ‘बिचारा’ क्वचितच कुणी सापडेल. पण आज त्यांची चीनमध्ये ससेहोलपट होते आहे, हे खरे आहे. त्याविषयी सौदी अरेबिया, इराण, कतार वगैरे देश मूग गिळून बसतात. याचे कारण असे आहे की, चीन अनेक मुस्लिम देशांत मोठमोठे पायाभूत सुविधांचे प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पांसाठी भांडवल, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ सढळ हाताने पुरवत आहे. म्हणूनच, भारतात मुस्लिमांवर अन्याय होतो अशी भारतावर टीका करणारे हे मुस्लिम देश चीनचा मात्र निषेध करीत नाहीत, करू शकत नाहीत. बायडेन यांनी चीनमधील मानवाधिकारहननाचा उल्लेख केला व सिकियंग, तिबेट व हाँगकाँगच्या जनतेला अधिक स्वायत्तता व मतदानाचे हक्क देण्याची गरज आहे, असे सांगितले. परंतु जिनपिंग यांनी या विषयावर बोलण्यासच नकार दिल्याच्या वार्ता आहेत.
भारताला वगळून चर्चा करू.
शी जिनपिंग यांच्या म्हनण्यानुसार जगात चीन आणि अमेरिका या दोन महासत्ता आहेत. त्यांच्यात स्पर्धा, कुरबुरी कलह अपेक्षित आहे. पण या निमित्ताने होणाऱ्या चर्चेत भारताचा समावेश करण्यास त्यांचा विरोध असतो. आर्थिक संपन्नता आणि लष्करी सामर्थ्य यात भारत खूपच मागे आहे. त्याला बरोबरीच्या नात्याने चर्चेत सहभागी करण्याची मुळीच गरज नाही, अशी चीनची भूमिका आहे. तर जागतिक राजकारणाची विशेषत: आशियाबाबत चर्चा करतांना भारताला वगळून चालणार नाही, अशी अमेरिकेची भूमिका आहे.
धरसोड तुझे दुसरे नाव अमेरिका
अमेरिकेचे धोरण अनेकदा धरसोडीचे आणि केवळ स्वहिताचाच विचार करणारे राहिलेले आहे. ज्या उद्देशाने, म्हणजे तालीबान्यांचा बीमोड करण्याच्या हेतूने, अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप केला तो हेतू पूर्ण होण्या अगोदरच देशांतर्गत दबावाला बळी पडून अमेरिका अफगाणिस्तानमधून तिथल्या लोकशाही मार्गाने सत्तारूढ असलेल्या नेतृत्वाला अक्षरशहा वाऱ्यावर सोडून बाहेर पडली. तैवानबाबत अमेरिकेचे धोरण असेच कायम राहील याचा काय भरवसा? भारताला विश्वासात घेतल्याशिवाय जागतिक राजकारणाचा विचार करता येणार नाही, असे चीनला बजावणारी अमेरिका आपल्या या भूमिकेवर कायम राहीलच, याचा तरी काय नेम? थोडक्यात काय की, ‘ख़ुदी को कर बुलंद इतना कि हर तक़दीर से पहले ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे, बता तेरी रज़ा क्या है’, हा एकच मार्ग भारतासमोर उपलब्ध आहे, हे विसरून चालणार नाही.
No comments:
Post a Comment