अमेरिकेत पुन्हा ट्रंपयुगाची नांदी
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
2020 ची अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक ही 59वी चतुर्वार्षिक निवडणूक होती. ती मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 ला म्हणजे नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवार नंतरच्या पहिल्या मंगळवारी कायद्यातील तरतुदीला अनुसरून पार पडली माजी उपाध्यक्ष ज्यो बायडेन हे अध्यक्षपदाचे तर कॅलिफोर्नियातील कनिष्ठ सिनेटर कमला हॅरिस यांनी तेव्हाचे रिपब्लिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उपाध्यक्ष माईक पेन्स यांचा पराभव केला. तेव्हा जगभर कोविड-स19ची साथ होती. जगावर मंदीचे सावट होते. जागतिक कोविड महामारी आणि तत्जन्य मंदीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली . तरीही 1900 नंतर या निवडणुकीत टक्केवारीनुसार सर्वाधिक मतदान झाले. याचा अर्थ असा होतो की, या काळात अमेरिकेत प्रस्थापित सरकारबद्दल भरपूर नाराजी होती. बायडेन यांना यांना 81 दशलक्षाहून अधिक मते मिळाली. अमेरिकेच्या तोपर्यंतच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवाराला एवढी मते यापूर्वी मिळाली नव्हती. यावरून प्रस्थापित सरकारबद्दलच्या नाराजीच्या प्रमाणाची कल्पना येते.
बायडेन यांनी पक्षांतर्गत निवडणुकीत अनेक स्पर्धकांना (यात कमला हॅरिस याही होत्या), मागे टाकीत डेमोक्रॅट पक्षाची अध्यक्षपदासाठीची उमेदवारी मिळवली आणि आपल्याशी स्पर्धा करणाऱ्या हॅरिस यांनाच आपला उपाध्यक्षपदासाठीचा साथीदार उमेदवार म्हणून निवडले. त्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन तसेच पहिल्या आशियाई-अमेरिकन आणि तोपर्यंतच्या प्रमुख पक्षाच्या तिकिटावर तिसऱ्या महिला उमेदवार ठरल्या. इकडे रिपब्लिकन पक्षाच्या पक्षांतर्गत स्पर्धेत अमेरिकेच्या तोपर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त म्हणजे 2,549 प्रतिनिधी मिळवून विद्यमान अध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा नामांकन मिळवले.
निवडणुकीतील प्रमुख मुद्द्यांमध्ये कोविड-19 ची हाताळणी, कोविड-19 चा अमेरिकन अर्थकारणावर झालेला परिणाम हे प्रमुख विषय होते. सुरू असलेल्या साथीच्या रोगामुळे, विक्रमी संख्येने मतपत्रिका लवकर आणि मेलद्वारे टाकण्यात आल्या. 38 राज्यांमध्ये या पद्धतींचा वापर करून मतदान झालेल्या एकूण मतांपैकी निम्म्याहून अधिक मते होती आणि फक्त तीन राज्यांमध्ये ती 25 % पेक्षा कमी होती. अमेरिकेत नोंदणीकृत मतदार म्हणून नोंदणी करतांनाच आपण कोणत्या पक्षाचे मतदार त्याचीही नोंदणी करता येते. नोंदणीकृत रिपब्लिकनपेक्षा अनेक नोंदणीकृत डेमोक्रॅट्सनी मेलद्वारे मतदान केले. मोठ्या संख्येने मेल-इन मतपत्रिकांचा परिणाम म्हणून, काही स्विंग राज्यात मतमोजणी करण्यास आणि अहवाल देण्यास विलंब झाला, अशी निवडणूक आयोगाची भूमिका होती, तर याच्या मुळाशी काहीतरी काळेबेरे आहे, असा रिपब्लिकन पक्षीयांना संशय होता. त्यामुळे आरोपांच्या फैरी झडल्या. याची परिणीती 6 जानेवारीच्या कॅपिटॅाल वरील ‘हल्ल्यात’ झाली. बायडेन यांना इलेक्टोरल कॅालेजमध्ये 306 मते मिळाली तर ट्रम्प यांना 232 मते मिळाली. बायडेन जिंकले आणि विद्यमान अध्यक्ष ट्रंप हरले. विद्यमान अध्यक्ष हरण्याचा असा प्रकार 1992 मध्ये एच डब्ल्यू बुश यांच्या बाबतीत झाला होता. मिशिगन, पेन्सिलव्हॅनिया आणि आणि विस्कॅान्सिन ही राज्ये डेमोक्रॅट पक्षाने आपल्याकडे खेचली, आणि म्हणून हे मुख्यत: घडले. मतमोजणीत हेराफेरी आणि अन्य गैरप्रकार झाले असा आरोप करीत ट्रंप यांनी हा निकाल नाकारला. ट्रंप यांच्यावर निकाल उलथवण्याचा कट रचल्याच्या आरोप ठेवण्यात आला. असा प्रकार अमेरिकेत प्रथमच घडत होता.
बायडेन यांची अपेक्षाभंग करणारी कारकिर्द
2020 मध्ये ट्रम्प यांचा पराभव करून ज्यो बायडेन अध्यक्षपदी विराजमान झाले होते. पण त्यांचा गेल्या चार वर्षांतील कारभार अगदीच प्रभावहीन ठरला. देशांतर्गत प्रश्न तर त्यांना नीट हाताळता आले नाहीतच पण जागतिक पातळीवरही त्यांची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची ठरली. आज अमेरिका एकमेव जागतिक महासत्ता आहे. अशा राष्ट्राच्या प्रमुखाचा जगभर दरारा असायला हवा होता. पण या प्रमुखाला आपल्या देशाच्या सामर्थ्याचा परिचय जगाला करून देता आला नाही, हे एक दारूण सत्य आहे. तसे नसते तर रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास युद्ध झालेच नसते, असे परखड मत अनेक जागतिक समीक्षकांनी नोंदविले आहे. बायडेन यांच्या शेवटच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीबद्दल तर न बोललेलेच बरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. हा काळ त्यांच्या विस्मरणांच्या कथांमुळेच लक्षात राहिला तर राहील. मात्र हा ‘अवघ्या’ 81 वर्षांचा ‘तरूण’ पुन्हा 2024 मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभा राहिला. यावेळी त्याच्या फटफजितीची उदाहरणे पाहून डेमोक्रॅट पक्षाच्या जुन्याजाणत्या धुरिणांनी त्याला महत्प्रयासाने लढतीतून माघार घ्यावयास लावली. अध्यक्षपदाची उमेदवारी विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्याकडे चालून आली.
कमला हॅरिस विरुद्ध डोनाल्ड ट्रंप
अनपेक्षितपणे चालून आलेल्या या संधीचे या बाईंनी सोने केले. चर्चेच्या दोन फेऱ्यांत त्यांनी डोनाल्ड ट्रंप यांना चारी मुंड्या चीत केले. पातळी अत्यंत सुमार दर्जाची आहे, असे जनमत निर्माण करण्यात कमला हॅरिस यशस्वी ठरल्या. पण असे म्हटले जाते की सर्व शक्तिमान आणि प्रगत अमेरिकेचे जनमत, अध्यक्षपदी एका महिलेने बसावे हे मान्य करायला फारसे अनुकूल नव्हते. ते काय असेल ते असो. नंतर ट्रंप यांच्यावर एकापाठोपाठ झालेले झालेले हल्ल्यांचे प्रयत्न जनमताचे ध्रुवीकरण होण्यासाठी योगवाही (कॅटॅलिस्ट) ठरले. खरे तर एक उमेदवार या नात्याने कमला हॅरिस या डोनाल्ड ट्रंप यांच्यापेक्षा निश्चितच सरस होत्या. असो.
ट्रंप यांचा विजय आणि पुरोगामी कंपू
आता ट्रंप निवडून आले आहेत. हे अनेक पुरोगाम्यांना आणि बुद्धिमंतांना मुळीच आवडलेले नाही. स्वत:ला प्रागतिक म्हणवणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदावर रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांदा निवड होणे ही जागतिक समुदायातील या गटाला अशुभ बाब वाटते. याचे एक कारण असेही असू शकते की, अनेक मुद्द्यांवर ट्रम्प यांची मते टोकाची आणि कालबाह्य आहेत. आणि त्यामुळे अमेरिकेच्या यापुढील धोरणांवर त्यांचा परिणाम होईल, असे त्यांना वाटते. जगातील सर्वशक्तिमान देशाच्या नेत्याने जागतिक शांततेसाठी आणि पर्यावरणरक्षणासाठी प्रयत्न करायला हवेत. या बाबतीत अमेरिकेची भविष्यातील धोरणे कशी राहतात, हे पहावे लागेल.
2024 मध्ये रिपब्लिकन पक्षाने राखलेली राज्ये राज्ये व इलेक्टोरल व्होट्स अशी आहेत.(सद्ध्या उपलब्ध माहिती)
1) अल्बामा 9 मते,2) अर्कान्सास 7 मते, 3)फ्लोरिडा 30 मते, 4) इदाहो 4 मते 5) इंडियाना 6) कन्सस 6 मते 7) केंटुकी 8 मते 8) ल्युसियाना 8 मते 9) मिसिसीपी 6 मते 10) मिसुरी 10 मते 11) मोंटाना 4 मते 12) नॅार्थ डाकोटा 3 मते 13) नेब्रास्का 2 मते 14) ओहायो 16 मते 15) ओल्काहोमा 7 मते 16) साउथ कॅरोलिना 9 मते 1साऊथ डाकोटा 3 मते 17) टेनसी 11 मते 18) टेक्सास 40 मते 19) उटाह 6 मते 20) वेस्ट व्हर्जेनिया 4 मते 21) व्योमिंग 3 मते 22) विस्कॅान्सन 10 मते
रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅट पक्षाकडून हिस्कावून घेतलेली राज्ये व इलेक्टोरल व्होट्स अशी आहेत.
१) जॅार्जिया 16 मते, 2) आयोवा 6 मते 3) नॅार्थ कॅरोलिना 16 मते 4) पेन्सिलव्हॅनिया 19 मते
डेमोक्रॅट पक्षाने राखलेली राज्ये व व इलेक्टोरल व्होट्स अशी आहेत.
- कॅलिफोर्निया 54 मते 2) कोलोराडो 9 मते 3) कनेक्टिकट 7 मते 4)डेलावेअर 3 मते 5) हवाई 4 मते 6) इलिनॅाइस 19 मते 7) मेरी लॅंड 10 मते 8) मिनेसोटा 10 मते 9) मॅसॅच्युसेट्स 11 मते 10) न्यू हॅंपशायर 4मते 11) न्यू जर्सी 14 मते 12) न्यू मेक्सिको 5 मते 13) न्यू यॅार्क 28 मते 14) ओरेगॅान 8 मते15) ऱ्होडआयलंड 4 मते 16) व्हर्मॅांट 3 मते 17) व्हर्जिनिया 13 मते 18)वॅाशिंगटन 12 मते
(आजची स्थिती रिपब्लिकन 31 राज्ये डेमोक्रॅट 19 राज्ये)
सत्तांतराचे संबाव्य पडसाद
युरोपातील नाटो संघटना, जागतिक व्यापार संघटना, वातावरण बदल करार, रशियाशी मैत्री, इस्रायलचे समर्थन आणि इराणविरोध यांविषयीची डोनाल्ड ट्रंप यांची मते डेमोक्रॅट पक्षाच्या मतांपेक्षा अगदी वेगळी आहेत. त्यामुळे जागतिक राजकारण यापुढे कोणते वळण घेईल, यावर राजकीय निरीक्षक लक्ष ठेवून आहेत. भारतासाठी त्यांची काही मते आणि धोरणे धोकादायक म्हणावी अशीच आहेत. युक्रेनप्रकरणी ट्रंप यांनी अमेरिकेची शस्त्रास्त्रांची मदत बंद केल्यास युक्रेनला रशियाशी तह करण्यावाचून दुसरा उपाय उरणार नाही. इस्रायलने गाझापट्टी व इराणवरील हल्ले पूर्णपणे थांबवावेत यासाठी बायडेन प्रशासन इस्रायलला आग्रह करीत होते. ट्रंप असे काही करणार नाहीत. इस्रायलने इराणच्या तेलविहिरी बॅाम्बहल्ले करून बंद पाडाव्यात आणि अण्वस्त्रे निर्माण करण्यासाठी इराणचे जे प्रयत्न सुरू आहेत असे म्हटले जाते, ती केंद्रे नष्ट करावीत या मताचे ट्रंप आहेत, त्यामुळे हे संघर्ष भविष्यात अधिक गंभीर रूप धारण करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
नाटो या संघटनेतील युरोपीय देश आपल्या संरक्षणासाठी अमेरिकी शस्त्रास्त्रे, सैनिक आणि निधीवर अवलंबून असतात. भविष्यात पुतिनसारख्यांनी हल्ले केल्यास आपण नाटो सदस्यांच्या मदतीस जाणार नाही, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. नाटोतील सदस्य देशांना अमेरिकेच्या मदतीची अपेक्षा असेल तर त्यांनी अमेरिकी फौजांचा खर्च उचलावा अशी अट ट्रम्प यांनी घातली होती. नाटोतील सामायिक जबाबदारीचे तत्त्व ट्रंप यांना मान्य नाही. हा पवित्रा त्यांनी प्रत्यक्षात अमलात आणला तर युरोपातील इतर देशांवर हल्ले करण्यासही पुतिन कमी करणार नाहीत, अशी भीती राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेने जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या दोन्ही जागतिक वित्तीय संस्थांतून बाहेर पडावे असे मत ट्रंप यांनी व्यक्त केले होते. याऐवजी अमेरिकेने व्यापार आणि वित्त या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करावे, यावर त्यांचा भर आहे. स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवावे आणि त्यानंतर आयात कराव्या लागणावर मालावर कर आकारावा या मताचे ते आहेत. या धोरणाचा विकसनशील देशांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होईल. आज अमेरिकन बाजारपेठेत आपला माल करसवलतींमुळे स्वस्तात विकून या देशांना स्पर्धेत टिकून राहणे शक्य होते आहे.
पॅरिस वातावरण करारातून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेने ट्रम्प यांच्याच राजवटीत घेतला होता. पण बायडेन यांनी तो निर्णय फिरवला. ट्रंप यांनी करारातून बाहेर पडण्याचा निर्णय पुन्हा घेतल्यास हवामान बदलामुळे होत असलेली हानी आणखी गंभीर रूप धारण करील. अमेरिकेने अधिकाधिक तेल विहिरी खोदाव्यात व खनिज तेलाचे उत्पन्न वाढवावे या मताचे ते आहेत. ‘डिग बेबी डिग’ म्हणजे आणखी तेल विहिरी खोदा हा नारा त्यांनी अमेरिकेत प्रचारादरम्यान दिला होता. विद्युत वाहनांना ट्रम्प सतत विरोध करीत आले आहेत. अशी ट्रंप यांची पर्यावरणविषयक विचारांची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. जागतिक तापमानवाढ रोखण्याच्या लढाईत हे विचार अडथळेच ठरू शकतात.
अमेरिकन मतदारांचे दोन प्रकार
अमेरिकेचे शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग पडतात. पदवीधर नसलेला तरूण वर्ग, ग्रामीण शेतकरी वर्ग, धार्मिक आणि श्रद्धाळू मतदार ग्रामीण भागात जास्त प्रमाणात असणार हे उघड आहे. हा मतदार वर्ग रिपब्लिकन पक्षाचा पाठिराखा आहे. 1000 ग्रामीण जिल्ह्यात ट्रंप यांनी डेमोक्रॅट पक्षाला तर मागे टाकलेच, त्याशिवाय रिपब्लिकन पक्षाला 2016 आणि 2020 मध्ये जेवढी मते मिळाली होती त्याहीपेक्षा जास्त मते घेऊन स्वत:चाच उचांकही मोडला. मी अवैध स्थलांतराला पायबंध घालीन, हे ट्रंप यांचे नेमके आश्वासन ग्रामीण अमेरिकेतील मतदारांना विशेष आवडले असे दिसते. या तुलनेत हॅरिस यांची आश्वासने मोघम स्वरुपाची असत, असे एक मत आहे.
अमेरिकेतील रूढी आणि परंपरावादी मतदार अजूनही त्या देशाच्या अध्यक्षपदावर महिलेची निवड करण्यास फारसा अनुकूल नाही, हेही या निवडणुकीत दिसले. तसेच अमेरिकेत अध्यक्षपदी महिलेला बसवण्यास विरोध केल्याचे हे दुसरे उदाहरण होय. हिलरी क्लिंटन यांच्याही विरोधात 2016 मध्ये त्यांचे महिला असणे असेच आड आले होते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यातून यावेळची महिला तर कृष्णवर्णीही होतीना!
एकतर्फी निवडणूक
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अटीतटीची होईल असा अंदाज राजकीय निरीक्षखांनी वर्तवला होता. तो साफ चुकीचा ठरसा. प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक राज्यांमध्ये जोरदार मुसंडी मारली, असे दृश्य समोर आले आहे. याला पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, व्हिस्कॉन्सिन ही बेभरवशाची राज्येही (स्विंग स्टेट्स) अपवाद ठरली नाहीत. या राज्यांची एकूण 45 इलेक्टोरल मते निर्णायक ठरली. नॉर्थ कॅरोलिना या आणखी एका निर्णायक राज्यात ट्रम्प यांनी विजय मिळवला. डोनाल्ड ट्रंप यांच्यासारखे पुनरागमन अमेरिकेत गेल्या अनेक वर्षात पहायला मिळाले नव्हते.
तिहेरी विजय
रिपब्लिकन पक्षाचा हा ट्राय फॅक्टस (तिहेरी) विजयही ठरू शकेल. या पक्षाने अध्यक्षपद जिंकले आहे. या निवडणुकीनंतर सिनेटमध्येही 100 पैकी 51 जागा रिपब्लिकन पक्षाकडे आहेत. 435 सदस्य संख्या असलेल्या हाऊसची द्विवार्षिक निवडणूकही याचवेळी पार पडली आहे. ते निकालही यथावकाश समोर येतीलच. इथेही 435 पैकी 218 जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाल्या (ताजा आकडा 211) तर तर तिथेही बहुमत रिपब्लिकन पक्षाला मिळेल. सद्ध्याच्या निकालांवरून मतदारांचा जो कल दिसतो आहे, तो तसाच हाऊसचे प्रतिनिधी निवडतांनाही असेल आणि तोही तसात असण्याचीच शक्यता आहे, तर रिपब्लिकन पक्षाचे हे तिहेरी यश असणार आहे. मात्र सिनेटमध्ये अनेक प्रश्नी सुपरमेजॅारिटी (60% मते) ठरावाच्या बाजूने असेल तरच तो ठराव पारित होतो. अशा प्रसंगी मात्र रिपब्लिकन पक्षाला डेमोक्रॅट पक्षाचे सहकार्य मिळविणे आवश्यक राहील.
डोनाल्ड ट्रंप यांची पत्नी प्रचारापासून दूर
ट्रम्प यांनी स्थलांतरितांच्या मुद्दा अतिशय चतुराईने हाताळला. त्यांची पत्नी स्वत: इटलीतून आलेली स्थलांतरित आहे. ट्रंप यांनी तिला प्रचारात उतरवलेच नाही. तशात हॅरिस यांचे स्वतःचे स्थलांतरित व गौरेतर असणे ही तर ट्रम्प यांच्यासाठी अतिशय सोयीची बाब ठरली. ट्रंप यांच्या प्रचाराची दिशा अशी होती. बाहेरून येणारे अमेरिकेत सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण करीत आहेत, ते ‘इथल्यांचे’ रोजगार घेतात, ‘इथल्यांच्या’ पाळीव प्राण्यांना मारून खातात, ते कर भरत नाहीत, बेकायदेशीर राहूनही सगळ्या सोयीसुविधांचा लाभ घेतात. डेमोक्रॅटिक सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास भूमिपुत्रांची गळचेपी होईल, हे ट्रंप यांनी मतदारांच्या मनावर बिंबवले. पण आजचे अमेरिकन गोरे हेही भूमिपुत्र ठरत नाहीत. हा मुद्दा उपस्थित करायला मूळ भूमिपुत्रांना आजच्या गोऱ्या अमेरिकनांनी शिल्लकच ठेवलेले नाही. त्यामुळे हा मुद्दा कोण उपस्थित करणार? या मुद्द्यांचा पारपंरिक रिपब्लिकन मतदारांवरच नव्हे, तर तरुण मतदारांवरही परिणाम झाला. मात्र बेकायदेशीर घुसखोरीला मान्यता नसावी, हा मुद्दा वाजवी म्हणता येईल.
ट्रंप यांच्यावरील हल्ले
जुलै 2024 मध्ये पेनसिल्व्हॅनियामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका प्रचारसभेदरम्यात प्राणघातक हल्ला झाला. यातून ट्रम्प बालबाल बचावले. बायडेन यांच्या सरकारने ट्रम्प यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली असा संदेश यातून पसरवला गेला. ट्रम्प यांच्यावर फ्लोरिडातही हल्ल्याचा प्रयत्न होणार होता. पेनसिल्वेनियात रक्तबंबाळ ट्रम्प यांनी मूठ उगारून दिलेला ‘फाइट’ म्हणजे लढा हा संदेश त्यांच्या समर्थकांना एकवटण्यास कारणीभूत ठरला. हे समर्थक अखेरपर्यंत ट्रम्प यांच्या पाठीशी उभ राहिले.
ट्रम्प हे हुकूमशाही प्रवृत्तीचे आणि एककल्ली स्वभावाचे भडक माथ्याचे आहेत. पराभव दिसू लागताच त्यांनी निवडणूक निकालच उधळून लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाने केला. पण त्याचा परिणाम झाला नाही. गर्भपाताच्या मुद्द्यावर ट्रम्प यांच्या राजवटीत महिलांना न्याय मिळणार नाही, असे हॅरिस प्रचारसभांमध्ये मांडत होत्या. त्यांना शहरी महिला मतदारांकडून मोठा प्रतिसादही मिळाला. पण ग्रामीण भागांमध्ये तो तेवढा प्रभावी ठरला नाही.
मग कोणते मुद्दे प्रभावी ठरले?
अमेरिकेच्याही अर्थव्यवस्थेवर आज ताण पडतो आहे. पण तिची प्रगती थांबलेली नाही. महागाई आणि रोजगारीवर भायडेन प्रशासनाने उपायही केले. परिणामत: तेथील फेडरल रिझर्व्हने अलीकडेच अमेरिकेतील व्याजदरही कमी केले होते. पण तरीही कनिष्ठ आर्थिक वर्ग, बेरोजगारी, छोटे उद्योजक आणि नोकरदार यांना महागाईचा सामना करणे जड गेले, हेही खरे आहे. दक्षिणेकडील काही राज्यांना चक्रीवादळांचा तडाखा बसला. बायडेन प्रशासनाने पुरेशा सक्षमपणे हा प्रश्न हाताळला नाही, असा आरोप तेथील जनतेने केला. कोविडनंतर अमेरिकेची अर्थव्यवस्था अजूनही पुरेशी सावरली नाही, असेही मत अनेक नागरिकांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे.
डोनाल्ड ट्रंप यांचा विजय आणि भारत
डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेतील निवडणुकीत जिंकणे हा विषय भारतासाठी काही अंशी आनंदाचा तर काही अशी सावध राहण्यांचा विषय आहे.
सहकार्य मिळू शकेल अशी क्षेत्रे अशी आहेत. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पांच्यात मैत्रीपूर्ण सबंध राहिले आहेत. मोदींच्या लोकप्रियतेने ते चकित झाले आहेत तसे त्यानी बोलूनही दाखवले आहे.
1 चीनचे आव्हान- ट्रम्प यांनी भारतावा उल्लेख आशियातीत एक मोठी शक्ती म्हणूनच यापूर्वीही केला आहे. विशेषतः चीनच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी त्यांनी भारताकडून सहयोगाची अपेक्षा केली आहे. या मुद्यावर दोन्ही देशांची भूमिका पुष्कळशी सारखी असेल.
2 शस्त्रास्त्रे करार आणि तंत्रज्ञान देवाणघेवाण : आगामी काळात या दोन्ही क्षेत्रात दोन्ही देशामध्ये सहकार्य वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही.
3 अवैध घुसखोरी: ट्रम्प आणि मोदी यांची मते घुसखोरीसंदर्भात जुळणारी आहे.
4 दहशतवाद अमेरिकेप्रमाणेच भारतानेही दहशतवादाचा सामना केला आहे. त्यामुळे या मुद्यावर ट्रम्प भारतासोबतच राहतील
5 कॅनडा आणि खलिस्तान: अमेरिका आणि कॅनडात खलिस्तानी कारवाया वाढल्याने मागील काही दिवसापासून भारताला बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे कॅनडातील भारतीय हिंदूच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. ट्रम्प यांच्या येण्याने कॅनडावर दबाव बनवण्यासाठी भारताला मदत मिळू शकेल.
6 सीमा आणि काश्मीर प्रश्नी ट्रंप यांचा भारताला पाठिंबा असेल.
सावध राहण्याचीही आवश्यकता
1 ट्रंप ही बेभरवशाची लहरी व्यक्ती आहे. त्यांची निर्णय घेण्याची पद्धतही विचित्र आहे, हे लक्षात ठेवून भारताला वागावे लागेल.
2 एच1बी व्हिसा बाबत ट्रंप यांचे धोरण कठोर राहिलेले आहे. पुढील काळात या बाबत अमेरिकेचे धोरण काय राहते, ते डोळ्यात तेल घालूनच पहावे लागेल.
3 ट्रंप वर्णभेदाचे समर्थक नसले तरी त्यांच्या मनात वर्णभेदाची जाणीव मुळीच नाही, असे म्हणता येणार नाही.
4 ट्रंप यांचे करविषयक धोरण भारताला फायद्याचे असेल, असे वाटत नाही.
'
वेचलेले वृत्तकण
1 यावेळी म्हणजे 2024 मध्ये 50 पैकी 31 राज्यांनी ट्रंप यांच्या बाजूने मतदान केले. 2020 मध्ये यापैकी 6 राज्यांनी बायडेन यांच्या बाजूने मतदान केले होते.
2 डेमोक्रॅट पक्षाच्या बाजूने 19 राज्यांनी मतदान केले. त्यापैकी 17 राज्यात मतदानाची टक्केवारी 2020 च्या टक्केवारीच्या तुलनेत घसरली होती.
3 रिपब्लिकन पक्षाला 7 कोटी 19 लाख पॅाप्युलर व्होट्स आणि 292 इलेक्टोरल व्होट्स मिळाली तर डेमोक्रॅट पक्षाला 6 कोटी 69 लाख पॅाप्युलर व्होट्स आणि 224 इलेक्टोरल व्होट्स मिळाली. म्हणजे रिपब्लिकन पक्षाला डेमोक्रॅट पक्षापेक्षा 50 लाख जास्त पॅाप्युलर व्होट्स आणि 68 इलेक्टोरल व्होट्स मिळाली.
4 2024 मध्ये सातही स्विंग स्टेट्सनी रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने मतदान केले असे दिसते. असा प्रकार 24 वर्षानंतर प्रथमच घडतो आहे
4 डोनाल्ड ट्रंप यांचा प्रति मतदार खर्च 16.6 डॅालर इतका झाला तर कमला हॅरिस यांचा प्रति मतदार खर्च 24 डॅालर इतका झाला.
5 अध्यक्षपदी आरूढ होताना डोनाल्ड ट्रंप यांचे वय 78 वर्षे 219 दिवस इतके असेल. ज्यो बायडेन यांनी सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांचे वय 78 वर्षे 61 दिवस इतके होते. अशाप्रकारे डोनाल्ड ट्रंप हे अमेरिकेचे सर्वात ज्येष्ठ अध्यक्ष असतील.
6 डोनाल्ड ट्रंप हे अमेरिकेचे 45 आणि 47 वे अध्यक्ष असतील. कारण 46 वे अध्यक्ष ज्यो बायडेन असणार आहेत. अमेरिकेत यापूर्वी पक्त एकदा असा प्रकार घडला होता. ग्रोव्हर क्लिनलंड हे 22 वे आणि 24 वे अध्यक्ष 1885 ते 1889 आणि 1893 ते 1897 या काळात होते. 1889 ते 1893 या मधल्या चार वर्षासाठी बेंजामीन हॅरिसन हे अमेरिकेचे अध्यक्ष होते.
7 डोनाल्ड ट्रंप एलॅान मस्कवर जाम खूष आहेत. त्यांच्यासारखे फक्त तेच असू शकतात, एवढी अभूतपूर्व कामगिरी त्यांनी या निवडणुकीत पार पाडली आहे.
8 ‘मी अमेरिकनांवरील कर्ज आणि कर दोन्हीही कमी करीन’, डोनाल्ड ट्रंप यांचे अमेरिकन जनतेला आश्वासन
9 ‘माझे उपाध्यक्षपदाचे साथीदार जे डी व्हान्स आणि त्यांची भारतीय सौंदर्यवती पत्नी उषा’, या अभूतपूर्व जोडप्याचे मी हार्दिक अभिनंदन करतो’, डोनाल्ड ट्रंप.
10. ‘मी युद्ध प्रारंभ करणारा नव्हे तर युद्धे थांबवणारा अध्यक्ष अध्यक्ष सिद्ध होईन’, डोनाल्ड ट्रंप.
11. ट्रंप यांना विजयाबद्दल अभिनंदन करणारे संदेश देशभरातून आणि जगभरातून आले. शी जिनपिंग यांनीही अभिनंदनपर संदेश पाठविला आहे. ते म्हणतात, ‘दोन्ही देशांनी संवाद करावा, मतभेदाचे योग्य व्यवस्थापन करावे, परस्पर सहकार्य वाढवावे. दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम केले तर नक्कीच फायदा होईल’.
12 अमेरिकेच्या डेमोक्रॅट अध्यक्षांपेक्षा रिपब्लिकन अध्यक्षांचेच भारताशी अधिक स्नेहाचे संबंध राहिलेले आहेत. कमला हॅरिस तशा भारतीय असतीलही पण त्या आपला आफ्रिकन वारसाच अधिक उघडपणे सांगत आल्या आहेत. त्या पाकिस्तानधार्जिण्या असून त्यांची काश्मीरविषयक भूमिका पाकिस्तानला अनुकूल राहिलेली आहे.
डोनाल्ड ट्रंप यांच्या यशाला कारणीभूत ठरलेले मुद्दे
- अमेरिकेत ज्यो बायडेन यांच्या कार्यकाळात भडकलेली महागाई.
- ट्रंप यांचा अमेरिकेतील घुसखोरी थांबवण्याचा निर्धार.
- सामान्य अमेरिकन पुरुषाला ट्रंप ‘आपला माणूस’, वाटला.
- ‘अमेरिका हा उजव्या गोऱ्या ख्रिश्चनांचा देश आहे’, ही ट्रंप यांची भूमिकामतदारांना भावली.
- इव्हॅन्जिअलिस्ट या ख्रिश्चनांमधील सनातनी, रुढीवादी, परंपरानिष्ठ मतदारांच्या प्रभावी गटाने ट्रंप यांना दिलेली ‘एक गठ्ठा’ मते विजयास पुष्कळ प्रमाणात कारणीभूत ठरली.
- ‘कोण, कुठली कमला हॅरिस?’, सामान्य अमेरिकन मतदाराचे कमला हॅरिस यांच्या बद्दलचे मत.