Saturday, March 30, 2024

 

तरूणभारत , मुंबई

   आजच्या महत्त्वाच्या विषयाशी संबंधित सोबतचा लेख प्रसिद्ध करण्याचे बाबतीत योग्य तो निर्णय व्हावा, ही विनंती. 

आपला स्नेहाकांक्षी, 

वसंत काणे  मार्च 2024

मालदीवमध्ये  मुइझ्झूंची मनमानी आणि मोदी मॅजिक 


वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com  

Blog - kasa mee? 

   2024 च्या मार्च महिन्यात मालदीव आणि चीन यांच्यामध्ये एका संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यानुसार चीन मालदीवला काहीही मोबदला न घेता (ग्रॅटिस) संरक्षण देणार आहे. अशाप्रकारे मालदीवच्या बाबतीत भारतापासून दूरता आणि चीनशी जवळीक याला प्रारंभ झाला आहे. मालदीव भारतासाठी भूराजकीय, सामरिक, आर्थिक, वांशिक, भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यापारी अशा विविध दृष्टींनी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या कराराचा परिणाम हिंदी महासागरातील भूराजकीय वातावरणात फार मोठा बदल होण्यात होणार आहे. कारण हे निमित्त करून मालदीवने भारताची जी सैनिकी पथके (77 सैनिक आणि 12 वैद्यकीय कर्मचारी), जी उभयपक्षी मान्यतेनुसार आजवर मालदीवमध्ये होती, त्यांना भारतात परत जाण्यास सांगितले आहे. याच्या उत्तरादाखल भारत आणि  अन्य काही राष्ट्रांना हिंदीमहासागरविषयक रणनीतीची नव्याने आखणी करावी लागणार आहे. मालदीव आणि चीन यातील करार गुप्त स्वरुपाचा आहे. चीन म्हणे घातक नसलेली शस्त्रेच मालदीवला पुरवणार असून त्यांच्या वापराविषयीचे प्रशिक्षणही देणार आहे. पण या समजुतीत राहण्यात अर्थ नाही. याला जोडूनच चिनी संशोधन/गुप्तचर जहाज शियांग यांग हाँग 03 डॉकिंगने मालदीवला भेट दिल्याचे वृत्त आहे.  भारतासोबतच्या तणावाच्या या काळात मालदीव हळूहळू नवे मित्रही जोडतो आहे. चीनसोबत संरक्षण करार केल्यानंतर अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी कट्टर इस्लामिक देश तुर्कीसोबत नवा करार केला आहे. तुर्कीसोबतच्या या नव्या करारानुसार मालदीवने आपल्या भोवतालच्या समुद्रात म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये गस्त घालण्यासाठी लष्करी ड्रोन्सची खरेदी 3 मार्च 2024 रोजी केली आहे. म्हणजे हा करार भारतीय सैन्याच्या माघारीपूर्वी झाला असल्याची गंभीर दखल भारताने घेतली आहे.

 दर्पोक्ती!

 ‘‘मालदीव कोणत्याही देशाच्या मदतीवर अवलंबून नाही. आमचा देश जरी लहान असला, तरी भोवतालचा  हिंद महासागर हिशोबात घेतला तर आम्ही नऊ लाख चौरस किलोमीटरचा स्पेशल इकॉनॉमिक झोन असलेला एक ‘भला मोठा देश’ आहोत. हा महासागर कोणत्याही विशिष्ट देशाची मालमत्ता नाही'', ही मोहम्मद मुइज्जू यांची दर्पोक्ती हास्यास्पद असली तरी ती हसण्यावारी नेण्यासारखीही नाही. हिंदी महासागरात मालदीव मोक्याच्या जागी आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा राखण्यासाठी आणि व्यापारी जलमार्ग अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने मालदीव अतिशय महत्त्वाचा आहे. उत्तरादाखल भारताने आपली आयएनएस जटायू ही युद्धनौका  लक्षद्वीपमधील मिनीकॅाय बेटावर मालदीवपासून 130 किलोमीटर अंतरावर  आणून ठेवली आहे. त्यामुळे भारतालाही पाळत ठेवणे  (ऑपरेशनल सर्व्हिलन्स) सोयीचे होणार आहे. 

मालदीव कसा?

    मालदीवचे प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक कंकणाकृती द्वीपसमूह आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान 26 बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैऋत्येस 750 किलोमीटरवर आणि भारताच्या नैऋत्येस 600 किलोमीटरवर आहेत. मालदीव द्वीपसमूहाने जरी समुद्रातील  90,000 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे, तरी या बेटसमूहातील जलयुक्त भाग वगळला तर सर्व बेटसमूहांचे एकूण क्षेत्रफळ फक्त सुमारे 400 चौरस किमी आहे. म्हणजे हा ‘भला मोठा देश’ नक्कीच नाही. समुद्रात बुडालेल्या एका पर्वताची पाण्यावर आलेली शिखरे म्हणजे ही बेटे असून हा पर्वत लक्षद्वीपापर्यंत पसरलेला आहे.  तशी इथे एकूण 1200 बेटे आहेत. पण 6 लाख मनुष्यवस्ती फक्त 200 बेटांवरच आहे. बहुतेक बेटांची समुद्रसपाटीपासूनची उंची फक्त 8 फूट इतकीच आहे. त्यामुळे अनेकदा अगोदर अस्तित्वात असलेली बेटे समुद्रात बुडून जावीत व सागरांतर्गत उलथापालथींमुळे नवीन बेटे  निर्माण व्हावीत, असा प्रकार या भागात नेहमी सुरू असतो. सागराच्या उथळपणामुळे सुरवातीला या भागात नौकानयन करणे अतिशय धोकादायक मानले जात असे. म्हणून पूर्वी मसाल्याचे पदार्थ वाहून नेणारी जहाजे या बेटांना वळसा घालून जायची. आता मात्र अचुक नकाशे उपलब्ध आहेत. 

  एकट्या माले या  राजधानीच्या शहराची लोकसंख्याच एक लाख आहे. बाकीच्या अनेक बेटांवरील लोकसंख्या तर शेकड्यातच असते. इसवी सन 1117 च्या सुमारास येथे दीवा महाल साम्राज्य होते, असे उल्लेख आहेत. तसे सद्ध्या माहीत असलेला मालदीवचा इतिहास, 2,500 वर्षांहून अधिक जुना आहे. येथील सुरुवातीचे रहिवासी हे गुजराती असल्याचं मानलं जातं. तर काहींच्या मतानुसार या बेटांचा सांस्कृतिक इतिहास तसा तिसऱ्या शतकापासून सुरू होतो. मालदीववर 12 व्या शतकापर्यंत हिंदू राजांचे राज्य होते. यानंतर ते बौद्ध धर्माचे केंद्र बनले. तमिळ चोला राजांनीही येथे राज्य केल्याचं सांगितलं जातं. येथे अनेक वर्षे बौद्धधर्म आचरणात होता. पुढे अरब व्यापाऱ्यांच्या आगमनानंतर या बेटात इस्लाम धर्माचा शिरकाव झाला आणि आज येथे 98 टक्के लोक सुन्नीपंथीय इस्लाम धर्मीय आहेत. 1965 पर्यंत येथे ब्रिटिशांची सत्ता होती. 

  आज इथे पर्यटन, मासेमारी, स्कुबा डायव्हिंग, हॅाटेलिंग हे मुख्य व्यवसाय आहेत. जोडीला औषधी पाण्याचे झरेही आहेत. मालदीवच्या उत्तर आणि दक्षिण बाजूने असलेल्या  समुद्राच्या  पट्ट्यातून  भारताचा 50 टक्के व्यापार होतो. आखाती तेलापैकी 80 टक्के येथून येते. चीनचाही आफ्रिका आणि आखाताला होणारा निम्मा व्यापार मालदीव समुद्रातून होतो. ही बेटे केव्हा बुडतील याचा काहीही भरवसा नाही, हे जाणून येथील राज्यकर्ते भारतात जमीन विकत घेण्याचा विचार करीत असतात, असे म्हणतात. 

   मालदीवचे नवीन अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू  

   मालदीवमध्ये सप्टेंबर 2023 च्या पंचवार्षिक निवडणुकीत, चीनधार्जिण्या पीपल्स नॅशनल कॅांग्रेसचे (पीएनसी) मोहम्मद मुईझ्झू  यांना 1,29,000 म्हणजे 54% मते मिळाली, तर भारतस्नेही मालदीव डेमोक्रॅटिक पार्टीचे (एमडीपी) मोहम्मद सोली यांना 1,10,000 म्हणजे 46% मते मिळून मोहम्मद मुईझ्झू   हे विजयी झाले. मालदीवमध्ये नव्याने निवडून आलेले अध्यक्ष  मुईझ्झू  हयांचा कल  चीनकडे असला तरी मुईझ्झू यांच्या आधीचे अध्यक्ष इब्राहीम सोली यांचा मात्र भारताविषयी विशेष स्नेहभाव होता. इब्राहीम सोली यांच्याच्याविरोधात अध्यक्षीय निवडणुकीत प्रचार करताना मुईझ्झू यांनी, तोपर्यंत मालदीवमध्ये उभयपक्षी मान्य तरतुदीनुसार तैनात असलेली भारतीय सैन्यदलाची तुकडी, यानंतर  तिथे असू नये अशी भूमिका घेतली होती. ही भूमिका ‘इंडिया आऊट’ मोहीम म्हणून गाजली होती. सोली यांचा पराभव करून मुईझ्झू सत्तेवर आले आणि त्यांनी भारतीय सैनिकी पथकाविषयी आवाज उठवण्यास सुरुवात केली. आता 10 मार्च 2024 रोजी भारतीय पथकातील काहींची रवानगी भारतात केली जात असून 10 मे 2024 पर्यंत उर्वरित सैनिकही भारतात रवाना होणार आहेत. मुईझ्झू जरी भारतविरोधी असले, तरी मालदीवच्या आधीच्या काही राज्यकर्त्यांचे भारताशी घनिष्ट संबंध होते. त्यामुळे भारत आजही सहकार्याची भूमिका कायम ठेवूनच वागतो आहे, पण बदललेल्या परिस्थितीकडे भारत फारकाळ दुर्लक्ष करून शकणार नाही. चीनला आपल्याला अनुकूल असलेल्या मुईझ्झू यांचा मालदीवमध्ये प्रभाव वाढवायचा आहे. आपल्या प्याद्याचा प्रभाव  वाढणे आणि खुद्द आपलाच प्रभाव वाढणे, यात चीनच्या दृष्टीने फारसा फरक नाही. याउलट प्याद्याच्या हातून आपल्याला हवेते साधून घ्यायचे आणि स्वत: नामानिराळे राहायचे, यातच चीनची सोय अधिक आहे. आज ना उद्या मालदीवला चीनचा हा कावा  कळेलही, पण तोपर्यंत मालदीववर चीनची मगरमिठी पक्की झालेली असेल. ‘बॉयकॉट मालदीव’ हे भारतीय पर्यटकांनी ‘इंडिया आऊट’ विरुद्ध उभे केलेले प्रत्युत्तर  उत्फूर्त आहे. त्याला भारताची फूस किंवा चिथावणी नाही. मालदीवचे अर्थकारण भारतातून येणाऱ्या पर्यटकांकडून मिळणाऱ्या पैशावर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. मुईझ्झू यांची चीनधार्जिणी भूमिका लक्षात येताच शेकडो भारतीय पर्यटकांनी आपली मालदीवमधील आरक्षणे रद्द करून आपला मोर्चा भारताचा भाग असलेल्या निसर्गरम्य लक्षद्वीपकडे वळवला आहे.

मालदीवमध्येही मोदी मॅजिक   

    मुईझ्झू यांची भारतविरोधी आणि चीनधार्जिणी भूमिका लक्षात येताच शेकडो भारतीय पर्यटकांनी आपली मालदीवमधील आरक्षणे रद्द करून आपला मोर्चा भारताचा भाग असलेल्या निसर्गरम्य लक्षद्वीपकडे वळवला. आता मात्र मुईझ्झू यांची पाचावर धारण बसली आहे. याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप या भारतीय बेटांच्या निसर्गसौंदर्याचे कौतुक केल्यानंतर तर मालदीवमधील तीन मंत्र्यांचा जळफळाट होऊन त्यांनी अत्यंत असभ्य प्रतिक्रिया दिल्या आणि मालदीवमध्ये सोशल मिडियावर मालदीवच्या या तीन मंत्र्यांनी  मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली. यावर संताप व्यक्त करीत भारताने मालदीवचे भारतातील हायकमीश्नर इब्राहीम शाहीब यांना भारताच्या परराष्ट्रव्यवहार मंत्रालयात बोलवून चांगलेच खडसावले व जाब विचारला. तेव्हा मात्र  मुईझ्झू यांनी माफी मागत या तीन मंत्र्यांना निलंबित केले आणि भारतीय पर्यटकांनी  आपला मालदीववर टाकलेला बहिष्कार मागे घ्यावा, असे आवाहन केले. भारत, रशिया आणि चीनमधून मालदीवला बहुसंख्येने पर्यटक येत असले तरी त्यात भारताचा क्रमांक पहिला, रशियाचा दुसरा तर  चीनचा तिसरा क्रमांक लागतो.  

   भारतीय पर्यटकांच्या भूमिकेमुळे मालदीवची अर्थव्यवस्था पार कोलमडण्याच्या स्थितीत येऊ घातली आहे. मालदीवचे एक प्रभावी नेता, मोहम्मद नाशीद हे मालदिवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे संस्थापक सदस्य आणि 2008 ते 2012 पर्यंत अध्यक्षपदी होते.  मे 2019 ते नोव्हेंबर 2023 या काळात मजलीसचे (संसद) स्पीकरही होते. खरे लोकशाहीवादी म्हणून ख्याती असलेले  मोहम्मद नाशीद भारताचे महत्त्व जाणून आहेत. ते भारताच्या स्नेहभावाची खात्री असलेले जुने, जाणते नेते आहेत.  त्यांनी तर मालदीवच्या जनतेच्या वतीने भारतीयांची माफी मागून पर्यटनावरील बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. मालदीवचे यापूर्वीचे अध्यक्ष निवडून येताच अगोदर भारतभेटीवर आले होते. तर मुईझ्झू मात्र अगोदर चीनच्या भेटीला गेले आहेत. तरीही याला प्रत्युत्तर देताना भारताने मालदीवला केली जाणारी सर्वप्रकारची मदत काही कमी केलेली नाही कारण तसे केले तर निर्माण होणारी पोकळी चीन ताबडतोब भरून काढील आणि  चीनचा मालदीवमधला हस्तक्षेप आणि प्रभाव आणखी वाढेल. (पूर्वार्ध)

Sunday, March 24, 2024

20240326 लहानपण देगा देवा!

आमचे खेळ आणि खरचटणे 

वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी 7, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022   

Email- kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   टीव्हीवर होळीची दृश्ये पाहत होतो आणि एकदम घानमाकड हा खेळ खेळला जातांना दिसला. हा आमचा लहानपणचा खेळ होता. यात मोकळ्या जागेत मध्यभागी एक ४/५ फूट उंचीचा भरभक्कम खांब उभारला जायचा. त्याचे वरचे टोक काहीसे निमुळते केलेले असायचे. एका ५/६ फूट लांबींच्या तशाच खांबाला मध्यभागी खाच केलेली असे. हा खांब उभ्या खांबावर ठेवला की तराजूच्या आडव्या दांड्यासारखी रचना तयार व्हायची. आडवा खांब भूपृष्ठाला समांतर असायचा. त्याच्या  एका बाजूला आडव्या खांबावर दोन तीन मुले बसायची. दुसऱ्या बाजूला अशीच समवयस्क  मुले बसायची. अशाप्रकारे समतोल साधला गेला की एक मुलगा आडव्या खांबाला गती धेऊन पटकन बाजूला होत असे. मग बाहेर काहीसा दूर उभा राहत तो आडव्या खांबाला वर्तुळाकार गती देण्याचे काम करायचा. गोलगोल फिरून चक्कर यायला लागली की एकेक पडायला लागायचा आणि मगच हा खेळ थांबत असे.

   दुसरा खेळ म्हणजे लोखंडी रिंग. लोखंडी रिंग आणि तिला दांडा असे हिचे स्वरुप असायचे. दांड्याच्य एका टोकाला वर्तुळाकृती आकार असायचा ही दोन वर्तुळे एकातएक अडकवलेली असायची. अशी रिंग घेऊन शर्यत लावून पळायचे हा आमचा लहान मुलांचा कार्यक्रम असायचा. रिंग लहान असली तर वाकून धावावे लागे. योग्य आकारची असे तेव्हा ताठ उभेराहून आम्ही धावत असू. मोठ्या उंच मुलांच्या रिंगा आमच्या डोक्याच्या रांगेत याव्यात, इतक्या मोठ्या असत. लहान मुले त्या घेऊन धावायचा प्रयत्न करीत. पण ते सोपे नसे. उंच रिंग घेऊन धावणे व धावतांना तोलही सांभाळणे ही कौशल्याची बाब होती. अनेक प्रयत्न असफल होत. पडले की खरचटायचे. 

    दुसरे दिवशी ती जखम पिकायची. जखम  पायाला झाली असेल तर जांघेत गाठ यायची, हाताताला जखम झाली असेल तर काखेत गाठ यायची.  गाठी दुखायच्या. माझ्या हाताला आणि पायाला नेहमीच काहीनाकाही कारणास्तव खरचटायचे. आणि दुसऱ्या दिवशी जखम पिकायची जखमा आणि गाठी ठसठसायच्या. त्या रात्री कंदिलांवर कापड ठेवून शेकायच्या हा कार्यक्रम ठरलेला असे. तरी आम्ही खरचटताच टिंक्चर आयोडीनमध्ये कापूस बडवून त्या फायाने खरचटलेली जागा स्वच्छ करीत असू. त्याकाळी जखमेवर लावायला ‘सल्फरचे मलम’ मिळत असे. ते लावायचे. वर कापसाचा फाया ठेवायचा. मग बॅंडेज बांधायचे. पायाचे बँडेज उभे राहताच घसरायचे. मग ते पुन्हा बांधायचे. यावेळी ते करकचून बांधले जायचे. मग रग लागायची. दुसऱ्या  दिवशी परमँगनेट ऑफ पोटॅश टाकलेल्या पाण्याने  जखम स्वच्छ करण्याचा कार्यक्रम असायचा. त्यावेळी कापूस जखमेला पक्का  चिकटला जायचा. तो ओढून काढायचा तर वेदना होत. त्या टाळण्यासाठी त्याच्यावर  परमँगनेट ऑफ पोटॅश टाकलेल्या पाण्याचा अभिशेक करायचा. आणि तो हळूहळू जखमेपासून अलगद वेगळा करायचा. कधिकधि आपलाच धक्का लागून तो ओढला जायचा आणि त्वचेच्या काही भागाला सोबत घेऊन तो वेगळा व्हायचा. त्यावेळी देव आठवत. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागत. पण पुढचा कार्यक्रम पार पाडणे भाग असे. तो म्हणजे जखम परमँगनेट ऑफ पोटॅश टाकलेल्या पाण्यात कापूस बुडवून त्या फायाने जखम स्वच्छ करायची. मृत त्वचा चांगल्या त्वचेपासून सहजासहजी वेगळी होत नसे. कापूस घासावा तर वेदना होत. पण उपाय नव्हता. मग जखमेवर बोरिक पावडर टाकायची. कापसाच्या फायाला सल्फरचे मलम लावायचे ते नीट लागले तर दुसऱ्या दिवशी ड्रेसिंग करतांना जखमेवर ठेवलेला कापूस अलगद निघत असे. मग पट्टीबंधन (बॅंडेज)  हा कार्यक्रम असायचा. मला दुसरे महायुद्ध संपलेले आठवते. युद्धात जखमी सैनिकांच्या जखमा पिकू नयेत म्हणून शास्त्रज्ञांनी निरनिराळी औषधे, मलमे, गोळ्या, इंजक्शने शोधून काढली होती. ती बाजारात यायला सुरवात माझ्या समोर झालेली मला आठवते. आजच्या अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल औषधांचे पूर्वज भूतलावर अवतरले होते. जखमांचे पिकणे बरेच कमी झाले होते.  

  खरजेवरचेही याचवेळी औषध आले त्यामुळे खरूजही हळूहळू नाहीशी होत गेली. त्याकाळी शाळकरी मुलांना खरजेचा त्रास होत असे. खरूज बोटांच्या बेचकेत होत असे. तिला भयानक खाज सुटायची. खाजवून खाजवून रक्त यायचे. त्यावरही परिणामकारक औषध आले नव्हते. स्वच्छतेचे पालन हाच प्रतिबंधात्मक उपाय असे. मोठ्यांच्या वाट्याला खरूज फारशी येत नसे. पण शाळेत एकाला जरी खरूज झाली तरी ती वर्गात हळूहळू पसरायची. खाजवून खाजवून आम्ही रडकुंडीला येत असू. त्यावर रडण्याशिवाय उपाय नसे. पुढे औषधे आली ती ‘सल्फा ड्रग्ज’ म्हणून ओळखली जायची, असे अंधुकसे आठवते. वर्षा दोन वर्षांनी टायफाईडवरचे परिणामकारक औषध क्लोरोमायसेटीनही बाजारात आल्याचे माझ्या आठवणीत आहे. सिबॅझॅाल आणि एल्कोसीन ही औषधेही बाजारात आल्याचे आठवते. ही दुसऱ्या महायुद्धाची सकारात्मक देणगी होती. जखमी सैनिक बरे व्हावेत म्हणून तेव्हा त्यांच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून शोधून काढलेली औषधे सामान्यासाठीही बाजारात उपलब्ध होऊ लागल्यामुळे बालगोपालांबरोबर मोठ्यांचेही जीवन पुष्कळ  सुकर झाले आहे. 



 

Monday, March 18, 2024

 मालदीवमध्ये  मुइझ्झूंची मनमानी 

(लेखांक पहिला)

तरूणभारत, नागपूर

मंगळवार  दिनांक 19. 03. 2024

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॉगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.   

मालदीवमध्ये  मुइझ्झूंची मनमानी 

(लेखांक पहिला)

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com  

Blog - kasa mee? 

   2024 च्या मार्च महिन्यात मालदीव आणि चीन यांच्यामध्ये एका संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यानुसार चीन मालदीवला काहीही मोबदला न घेता (ग्रॅटिस) संरक्षण देणार आहे. अशाप्रकारे मालदीवच्या बाबतीत भारतापासून दूरता आणि चीनशी जवळीक याला प्रारंभ झाला आहे. मालदीव भारतासाठी भूराजकीय, सामरिक, आर्थिक, वांशिक, भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यापारी अशा विविध दृष्टींनी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या कराराचा परिणाम हिंदी महासागरातील भूराजकीय वातावरणात फार मोठा बदल होण्यात होणार आहे. कारण हे निमित्त करून मालदीवने भारताची जी सैनिकी पथके (77 सैनिक आणि 12 वैद्यकीय कर्मचारी), जी उभयपक्षी मान्यतेनुसार आजवर मालदीवमध्ये होती, त्यांना भारतात परत जाण्यास सांगितले आहे. याच्या उत्तरादाखल भारत आणि  अन्य काही राष्ट्रांना हिंदीमहासागरविषयक रणनीतीची नव्याने आखणी करावी लागणार आहे. मालदीव आणि चीन यातील करार गुप्त स्वरुपाचा आहे. चीन म्हणे घातक नसलेली शस्त्रेच मालदीवला पुरवणार असून त्यांच्या वापराविषयीचे प्रशिक्षणही देणार आहे. पण या समजुतीत राहण्यात अर्थ नाही. याला जोडूनच चीनच्या संशोधन कार्यात सहभागी जहाजानेही मालदीवला भेट दिल्याचे वृत्त आहे. भारतासोबतच्या तणावाच्या या काळात मालदीव हळूहळू नवे मित्रही जोडतो आहे. चीनसोबत संरक्षण करार केल्यानंतर अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी कट्टर इस्लामिक देश तुर्कीसोबत नवा करार केला आहे. तुर्कीसोबतच्या या नव्या करारानुसार मालदीवने आपल्या भोवतालच्या समुद्रात म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये गस्त घालण्यासाठी लष्करी ड्रोन्सची खरेदी 3 मार्च 2024 रोजी केली आहे. म्हणजे हा करार भारतीय सैन्याच्या माघारीपूर्वी झाला असल्याची गंभीर दखल भारताने घेतली आहे.

 दर्पोक्ती!

 ‘‘मालदीव कोणत्याही देशाच्या मदतीवर अवलंबून नाही. आमचा देश जरी लहान असला, तरी भोवतालचा  हिंद महासागर हिशोबात घेतला तर आम्ही नऊ लाख चौरस किलोमीटरचा स्पेशल इकॉनॉमिक झोन असलेला एक ‘भला मोठा देश’ आहोत. हा महासागर कोणत्याही विशिष्ट देशाची मालमत्ता नाही'', ही मोहम्मद मुइज्जू यांची दर्पोक्ती हास्यास्पद असली तरी ती हसण्यावारी नेण्यासारखीही नाही. हिंदी महासागरात मालदीव मोक्याच्या जागी आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा राखण्यासाठी आणि व्यापारी जलमार्ग अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने मालदीव अतिशय महत्त्वाचा आहे. उत्तरादाखल भारताने आपली आयएनएस जटायू ही युद्धनौका  लक्षद्वीपमधील मिनीकॅाय बेटावर मालदीवपासून 130 किलोमीटर अंतरावर  आणून ठेवली आहे. त्यामुळेभारतालाही पाळत ठेवणे  (ऑपरेशनल सर्व्हिलन्स) सोयीचे होणार आहे. 

मालदीव कसा?

     मालदीवचे प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक कंकणाकृती द्वीपसमूह आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान 26 बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैऋत्येस 750 किलोमीटरवर आणि भारताच्या नैऋत्येस 600 किलोमीटरवर आहेत. मालदीव द्वीपसमूहाने जरी समुद्रातील  90,000 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे, तरी या बेटसमूहातील जलयुक्त भाग वगळला तर सर्व बेटसमूहांचे एकूण क्षेत्रफळ फक्त सुमारे 400 चौरस किमी आहे. म्हणजे हा ‘भला मोठा देश’ नक्कीच नाही. समुद्रात बुडालेल्या एका पर्वताची पाण्यावर आलेली शिखरे म्हणजे ही बेटे असून हा पर्वत लक्षद्वीपापर्यंत पसरलेला आहे.  तशी इथे एकूण 1200 बेटे आहेत. पण 6 लाख मनुष्यवस्ती फक्त 200 बेटांवरच आहे. बहुतेक बेटांची समुद्रसपाटीपासूनची उंची फक्त 8 फूट इतकीच आहे. त्यामुळे अनेकदा अगोदर अस्तित्वात असलेली बेटे समुद्रात बुडून जावीत व सागरांतर्गत उलथापालथींमुळे नवीन बेटे  निर्माण व्हावीत, असा प्रकार या भागात नेहमी सुरू असतो. सागराच्या उथळपणामुळे सुरवातीला या भागात नौकानयन करणे अतिशय धोकादायक मानले जात असे. म्हणून पूर्वी मसाल्याचे पदार्थ वाहून नेणारी जहाजे या बेटांना वळसा घालून जायची. आता मात्र अचुक नकाशे उपलब्ध आहेत. 

  एकट्या माले या  राजधानीच्या शहराची लोकसंख्याच एक लाख आहे. बाकीच्या अनेक बेटांवरील लोकसंख्या तर शेकड्यातच असते. इसवी सन 1117 च्या सुमारास येथे दीवा महाल साम्राज्य होते, असे उल्लेख आहेत. या बेटांचा सांस्कृतिक इतिहास तसा तिसऱ्या शतकापासून सुरू होतो. येथे अनेक वर्षे बौद्धधर्म आचरणात होता. दहाव्या शतकात या बेटात इस्लाम धर्माचा शिरकाव झाला आणि आज येथे 98 टक्के लोक सुन्नीपंथीय इस्लाम धर्मीय आहेत. 1965 पर्यंत येथे ब्रिटिशांची सत्ता होती. 

  आज इथे पर्यटन, मासेमारी, स्कुबा डायव्हिंग, हॅाटेलिंग हे मुख्य व्यवसाय आहेत. जोडीला औषधी पाण्याचे झरेही आहेत. मालदीवच्या उत्तर आणि दक्षिण बाजूने असलेल्या  समुद्राच्या  पट्ट्यातून  भारताचा 50 टक्के व्यापार होतो. आखाती तेलापैकी 80 टक्के येथून येते. चीनचाही आफ्रिका आणि आखाताला होणारा निम्मा व्यापार मालदीव समुद्रातून होतो. ही बेटे केव्हा बुडतील याचा काहीही भरवसा नाही, हे जाणून येथील राज्यकर्ते भारतात जमीन विकत घेण्याचा विचार करीत असतात, असे म्हणतात. 

   मालदीवचे नवीन अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू  

   मालदीवमध्ये सप्टेंबर 2023 च्या पंचवार्षिक निवडणुकीत, चीनधार्जिण्या पीपल्स नॅशनल कॅांग्रेसचे (पीएनसी) मोहम्मद मुईझ्झू  यांना 1,29,000 म्हणजे 54% मते मिळाली, तर भारतस्नेही मालदीव डेमोक्रॅटिक पार्टीचे (एमडीपी) मोहम्मद सोली यांना 1,10,000 म्हणजे 46% मते मिळून मोहम्मद मुईझ्झू   हे विजयी झाले. मालदीवमध्ये नव्याने निवडून आलेले अध्यक्ष  मुईझ्झू  हयांचा कल  चीनकडे असला तरी मुईझ्झू यांच्या आधीचे अध्यक्ष इब्राहीम सोली यांचा मात्र भारताविषयी विशेष स्नेहभाव होता. इब्राहीम सोली यांच्याच्याविरोधात अध्यक्षीय निवडणुकीत प्रचार करताना मुईझ्झू यांनी, तोपर्यंत मालदीवमध्ये उभयपक्षी मान्य तरतुदीनुसार तैनात असलेली भारतीय सैन्यदलाची तुकडी, यानंतर  तिथे असू नये अशी भूमिका घेतली होती. ही भूमिका ‘इंडिया आऊट’ मोहीम म्हणून गाजली होती. सोली यांचा पराभव करून मुईझ्झू सत्तेवर आले आणि त्यांनी भारतीय सैनिकी पथकाविषयी आवाज उठवण्यास सुरुवात केली. आता 10 मार्च 2024 रोजी भारतीय पथकातील काहींची रवानगी भारतात केली जात असून 10 मे 2024 पर्यंत उर्वरित सैनिकही भारतात रवाना होणार आहेत. मुईझ्झू जरी भारतविरोधी असले, तरी मालदीवच्या आधीच्या काही राज्यकर्त्यांचे भारताशी घनिष्ट संबंध होते. त्यामुळे भारत आजही सहकार्याची भूमिका कायम ठेवूनच वागतो आहे, पण बदललेल्या परिस्थितीकडे भारत फारकाळ दुर्लक्ष करून शकणार नाही. चीनला आपल्याला अनुकूल असलेल्या मुईझ्झू यांचा मालदीवमध्ये प्रभाव वाढवायचा आहे. आपल्या प्याद्याचा प्रभाव  वाढणे आणि खुद्द आपलाच प्रभाव वाढणे, यात चीनच्या दृष्टीने फारसा फरक नाही. याउलट प्याद्याच्या हातून आपल्याला हवेते साधून घ्यायचे आणि स्वत: नामानिराळे राहायचे, यातच चीनची सोय अधिक आहे. आज ना उद्या मालदीवलाला चीनचा हा कावा  कळेलही, पण तोपर्यंत मालदीववर चीनची मगरमिठी पक्की झालेली असेल. ‘बॉयकॉट मालदीव’ हे भारतीय पर्यटकांनी ‘इंडिया आऊट’ विरुद्ध उभे केलेले प्रत्युत्तर  उत्फूर्त आहे. त्याला भारताची फूस किंवा चिथावणी नाही. मालदीवचे अर्थकारण भारतातून येणाऱ्या पर्यटकांकडून मिळणाऱ्या पैशावर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. मुईझ्झू यांची चीनधार्जिणी भूमिका लक्षात येताच शेकडो भारतीय पर्यटकांनी आपली मालदीवमधील आरक्षणे रद्द करून आपला मोर्चा भारताचा भाग असलेल्या निसर्गरम्य लक्षद्वीपकडे वळवला आहे. (अपूर्ण)

Wednesday, March 13, 2024

 


का बरे बुडाली श्रीकृष्णाची द्वारका?

तरूणभारत,/मुंबई

गुरुवार   दिनांक 14. 03. 2024

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॉगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.   

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 



का बरे बुडाली श्रीकृष्णाची द्वारका?
                            Blog - kasa mee?
आज आत्ता यावेळी एक ‘वायु’ वादळ गुजराथला चाटून पुढे गेले. प्राचीनकाळी असाच खवळला होता समुद्र. त्यावेळचे जुन्या ग्रंथांमधील वर्णन आणि आजचे समुद्राचे तांडव यांच्या वर्णनातील साम्यभेदाची स्थळे नोंद घेण्यासारखी आहेत.
 

  'समुद्राच्या लाटा नेहमीप्रमाणे किनाऱ्यावर आपटत होत्या. काय झाले कुणास ठावूक? पण लाटांनी निसर्गनिर्मित किनारा एकाएकी ओलांडला आणि समुद्राचे पाणी वेगाने द्वारकेत घुसले. त्या अतीव सुंदर शहराच्या रस्त्यांवरून वळसे घेत त्यांनी संपूर्ण शहर व्यापले आणि द्वारका दिसेनाशी झाली. द्वारकेतील एकेक महाल एकापाठोपाठ बुडत असतांना अर्जुन सुन्न होऊन पहात होता. त्याने श्रीकृष्णाच्या महालाचे रूप आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न केला. तोच तो प्रासादही पाण्यात बुडून दिसेनासा झाला. आता समोर एक मोठे सरोवर तेवढे दिसत होते. द्वारकेचा मागमूसही दिसत नव्हता. यापुढे पांडवांचीही आवडती असलेली द्वारका नावापुरती आणि स्मृतीतच शिल्लक राहणार होती.' हे वर्णन समुद्राने एखादे शहर गिळंकृत करतानाचे वाटत नाही का?
द्वारकानगरी का उभारली?
    द्वारकेच्या निर्मितीची कथा पुराणात अशी वर्णन केलेली आहे. जरासंध आणि कालयवन यांचा मथुरेला सतत उपद्रव होत होता. म्हणून श्रीकृष्णाने यादवांसह मथुरेचा त्याग करायचे ठरवून सौराष्ट्राचा किनारा गाठला. समुद्रकिनारी आपली राजधानी उभारण्याचे ठरवून श्रीकृष्णाने वास्तुदेव विश्वकर्म्याला आवाहन केले. विश्वकर्मा तात्काळ प्रगट झाले. समुद्रदेवाने आपल्याला आणखी बारा योजने जमीन दिली तरच नगरी उभारता येईल, असे विश्वकर्म्याने सांगितल्यामुळे श्रीकृष्णाने समुद्रदेवाची पूजा केली. तसे समुद्रदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी पुरेशी जमीन दिली. यानंतर विश्वकर्म्याने या जमिनीवर स्वर्णनगरी द्वारकेची उभारणी केली.
    त्या काळी द्वारका नगरी द्वारामती, द्वारावती आणि कुशस्थली अशा नावांनी ओळखली जायची. सोमनाथ जवळच्या भल्क तीर्थ या ठिकाणी शिकाऱ्याचा  बाण लागून श्रीकृष्णाचा मृत्यू झाला आणि लगेच द्वारका समुद्रात बडाली, अशीही एक कथा सांगतात.
उत्खननात मिळालेली द्वारका आणि मूळ द्वारका
      आजवर या भागात झालेल्या उत्खननात जी माहिती समोर आली आहे आणि ज्या वस्तू / सामग्री मिळाली आहे त्या वस्तूंचे रूप मूळ द्वारकेतील वस्तूंच्या वर्णनाशी जुळते. भारतातील मणिपूर, इंग्लंडमधील ॲाक्सफोर्ड आणि जर्मनीतील हॅनोव्हर येथील विद्यापीठांच्या प्रयोगशाळांमध्ये येथे सापडलेले लाकडाचे तुकडे, मातीच्या भांड्यांचे तुकडे, प्राण्यांची हाडे तपासण्यासाठी पाठविले होते. या वस्तू ९००० वर्षे जुन्या आहेत, असा निष्कर्ष आहे. याच काळात 'आईस एज' संपले होते काही वस्तू तर ३२ हजार वर्षे पूर्वीच्या आहेत. महाभारत आणि संस्कृत साहित्यात द्वारकेचे समुद्रात बुडतानाचे वर्णन प्रारंभी केल्याप्रमाणे वर्णनाप्रमाणे आहे. समुद्राने मागे सरून किंवा समुद्राला मागे सारून उपलब्ध झालेल्या/करून दिलेल्या जमिनीवर द्वारका वसली होती, हे नक्की. जगातील ही सगळ्यात जुनी संस्कृती होती, यातही शंका नाही. आज द्वारकेत आढळणारे द्वारकाधीशाचे मंदीर श्रीकृष्णाच्या नातवाने - वज्रनभाने - हरिगृहावर म्हणजे श्रीकृष्णाच्या राहत्या महालावर बांधले होते.
    असे दिसते की, केवळ द्वारकाच नव्हे तर भारताच्या पश्चिम किनार्याचा बराच मोठा भाग समुद्राने गिळंकृत केलेला आहे. हा प्रकार इसवी सनापूर्वी १५०० वर्षे अगोदर घडला होता, असे संशोधकांचे म्हणणे आहे. पाश्चात्यांनी या संशोधनाला महत्त्व दिले नाही आणि कदाचित म्हणूनच आपल्यालाही ही बाब महत्त्वाची वाटली नसावी.
द्वारकेच्या शोधाचे महत्त्व
      इसवीसन ५७४ मध्ये सौराष्ट्राची राजधानी द्वारका असा लेखच आढळतो असे नाही, तर 'श्रीकृष्ण इथे रहात असे', असाही उल्लेख आहे. आदी शंकराचार्यांनी चार पीठांपैकी एक पीठ  आठव्या शतकात द्वारकेला स्थापन केले, एवढे त्यांना द्वारकेचे धार्मिक महत्त्व वाटत होते. याचे कारण काय असावे?
    डॅाक्टर एस आर राव म्हणतात, 'बुडालेल्या द्वारकेच्या शोधाचे भारताच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यामुळे महाभारत काव्य की इतिहास हा प्रश्न कायमचा निकालात निघाला आहे. वैदिक काळ आणि वर्तमान काळ यातील सातत्य सांगणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे द्वारकेचे अस्तित्व होय.' येथील उत्खननात देवादिकांच्या मूर्ती सापडल्या आहेत, म्हणजे ही नगरी एक धर्मस्थळही होते, असे मानणे प्राप्त आहे.
श्रीकृष्णाचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व
        श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्त्व एवढे उत्तुंग होते की त्याच्यातील 'मानव' त्याच्यातील 'देवापासून' वेगळा करणे कठीण होऊन बसले आहे. 'श्रीकृष्ण' हेच एक महान गूढ असून ज्याने त्याने आपल्या परीने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. योगींना त्याच्या व्यक्तिमत्त्वात 'सत्याचा आविष्कार' झाला तर गोपींना 'दिव्य प्रेमाचा साक्षात्कार' झाला. योद्ध्यांना तो नायक वाटतो तर कंसासाठी तो मूर्तिमंत भीतीच्या स्वरूपात होता. शिशुपालासाठी श्रीकृष्ण ही पराकोटीचा द्वेश करावा अशी व्यक्ती होती. हे काहीही असले तरी प्रत्येकाने तो आपल्याला साध्य व्हावा, असेच प्रयत्न केले आहेत. युधिष्ठिराने त्याला मित्रत्वाने आपलेसे केले तर नारदाने भक्तीने. काहींसाठी तो मूर्तिमंत बुद्धीच्या स्वरूपात होता तर काहींसाठी मूर्तिमंत आध्यात्मिकतेच्या स्वरूपात. धर्म, तत्त्वज्ञान, कला आणि साहित्य यावर सारखाच प्रभाव असलेले श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्त्व एकमेकाद्वितीय आहे. बालपणातील श्रीकृष्ण हे महदाश्चर्य आहे तर तरूण श्रीकृष्ण परिपूर्ण शरीरसौष्ठव असलेली देखणी व्यक्ती आहे. त्याची बुद्धिमत्ता वैदिक विद्वानाची आहे. तर गीतेतील त्याचा उपदेश निष्काम कर्मयोग, ज्ञान आणि निस्सीम भक्ती यांचे शाश्वत स्वरूप आहे. योद्धा म्हणून त्याला स्पर्धक नाही, त्याच्यासारखा चतुर मुत्सद्दी सापडणार नाही. सामाजिक चिंतक म्हणून विचार केला तर त्यच्याइतका उदारमतवादी तोच म्हटला पाहिजे. गुरू म्हणून त्याचे वक्तृत्व अतुलनीय आहे तर मित्र म्हणून विचार करावा तर श्रीकृष्णासारखा कधीही अंतर न देणारा दुसरा सखा नाही. त्याची साथ नसती तर पांडवांवरच्या संकटांचे निवारण झाले असते का? पांडवांना महाभारताचे युदध जिंकता आले असते का?
श्रीकृष्ण कुणाला कसा दिसला
  ॲनी बेझंट आणि जॅार्ज बर्नार्ड शॅा यांनी श्रीकृष्णाची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. तो देवांचाही देव, मानवातील परिपूर्ण मानव, प्रेमिकांचा सखा, नवदांपत्यांना कृपाशीर्वाद देणारा, आपल्या पहिल्यावहिल्या बालकाला कुशीत घेतलेल्या मातेकडे प्रसन्न मुद्रेने पाहणारा, प्रेम आणि सुखाचा परमेश्वर होता. त्यामुळे मानवांच्या हृदयावर त्याचे कायमस्वरूपी अधिराज्य असावे, यात आश्चर्य ते काय?
      सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांनी म्हटले आहे की,  भारतीय धर्मतत्त्वांचा उद्गाता असलेला, शिवाचे मूर्तरूप, ग्रीकांच्या हरक्युलिस सारखे पौरुष, येशूसारखी निष्कपटता, बुद्धासारखा हळवेपणा श्रीकृष्णाच्या ठायी होता. तो शांत, तपश्चर्या करणारा, ज्ञानी असा उपनिषदांचा भाष्यकार होता. कुरुक्षेत्रावर त्याचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व उठून दिसत होते.
    महाभारतात तसेच गीतेतही श्रीकृष्णाला मानव आणि देव अशा दोन्ही स्वरूपात प्रस्तुत केले आहे. छंदोपनिषदात श्रीकृष्णाचे देवरूप वर्णन केलेले आढळते. हा ऐतिहासिक दाखला म्हणता येईल. देवकीपुत्र कृष्णाशी अंगिरसाने चर्चा केल्याचा उल्लेख आहे. पाचव्या शतकात पाणिनीने अष्टाध्यायीमध्ये वासुदेवक म्हणजे वासुदेवाचा भक्त असा अर्थ सांगितला आहे. आपल्या दृष्टीने यातील व्याकरण महत्त्वाचे नसून वासुदेवाचा उल्लेख महत्त्वाचा आहे. याचसोबत अर्जुनाचाही उल्लेख आहे, या बाबीची नोंद घेतली पाहिजे. चंद्रगुप्ताच्या दरबारात मॅगॅसथेनिस हा वकील होता.त्याने लिहिले आहे की, शूरसेन हेराकल्सची पूजा करीत असे. हेराकल्सचा अर्थ श्रीकृष्ण असा संदर्भांवरून लागतो. याची बहीण पांडय्या हिचे दक्षिण भारतात राज्य होते. पांड्यांची राजधानी मदुराई होती. मथुरा आणि मदुराई या नावांमधील साम्य नजरेत भरणारे आहे.
        ग्रीक राजा ॲगाथोक्लेस याने 'चक्रधारी' वासुदेवाचे चित्र असलेली नाणी चलनात आणली होती, व्याकरणकर्त्या पतंजलीने पाणिनीच्या व्याकरणावर 'महाभाष्य' लिहिले आहे. यात कृष्णाचा उल्लेख आहे. इसवीसनापूर्वी दोन शतक अगोदर ॲगॅथोक्लेस नावाच्या ग्रीक राजाने श्रीकृष्ण व बलराम यांची चित्रे असलेली नाणी चलनात आणली होती. तो कृष्णभक्त मानला जातो. ही नाणी अफगाणिस्थानमध्ये उत्खननात सापडली आहेत.
      हा काही ऐतिहासिक लेख नाही. तरीही हे उल्लेख श्रीकृष्णाचे ऐतिहासिकत्व सिद्ध करण्यास पुरेसे वाटतात/वाटावेत. पण एक गूढ उकलत नाही. श्रीकृष्णाचा मृत्यू होताच द्वारकाही का बुडावी? श्रीकृष्णाचा विरह सहन न झाल्यामुळे तिने जलसमाधी तर घेतली नसेल ना?

Monday, March 11, 2024

 सेमीकंडक्टर व चिप  निर्माण करणारे देश आणि भारत

तरूणभारत, नागपूर

मंगळवार  दिनांक 12. 03. 2024

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॉगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.   


सेमीकंडक्टर व चिप  निर्माण करणारे देश आणि भारत

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com  

Blog - kasa mee?

   इलेक्ट्रॅानिक्स ही पदार्थविज्ञानशास्त्र (फिजिक्स) आणि अभियांत्रिकी  (इंजिनिअरिंग) या विद्याशाखांची मिळून तयार झालेली एक विद्याशाखा आहे. अभियांत्रिकीचा संबंध यंत्रांचा आराखडा, चाचणी आणि निर्मितीशी असतो. समस्या सोडविणे हा या विद्याशाखेचा प्रमुख उद्देश आहे. इलेक्ट्रॅानिक्स ही पदार्थविज्ञानशास्त्र आणि अभियांत्रिकी यांची मिळून तयार झालेली विद्याशाखा असून ती सुद्धा  पदार्थविज्ञानशास्त्रातील तत्त्वांच्या आधारे यंत्रे वा उपकरणे यांचा आराखडा तयार करणे, त्यांची निर्मिती करणे, ती चालू करणे यांच्याशी संबंधित आहे. 

सेमीकंडक्टर आणि  चिप्स

   सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणात सेमीकंडक्टरचे स्थान मेंदू सारखे आहे. सेमीकंडक्टर हा विद्युतवाहक आणि विद्युतरोधक यातील मधली स्थिती म्हणता येईल. सेमीकंडक्टरधातूपासून मोबाइल ते संगणक यांसारख्या उत्पादनांसाठी बनवल्या जाणाऱ्या ‘चिप्स’ चा प्रचंड तुटवडा ही तर संपूर्ण जगासाठी कोविड काळात मोठीच डोकेदुखी ठरली होती.

  चिप म्हणजे काय? ही एक अतिशय पातळ चकती असते. या चकतीवर एका बाजूने अतिसूक्ष्म ट्रान्झिस्टर्स कोरून बसवलेले असतात. यांचे काम विद्युतप्रवाहाचे नियंत्रण करणे, तसेच विद्युत प्रवाह ऑन/ऑफ करणे हे असते. एका चौरस इंच चिपवर हजारो ट्ररान्झिस्टर्स असतात. चिप आणि ट्रान्झिस्टर नसते तर उपकरण एका अजस्त्र अलमारीएवढे झाले असते. या चिपलाच मायक्रो चिप, इन्टिग्रेटेड सर्किट (आयसी) किंवा सिलीकॅान चिप अशी निरनिराळी नावे आहेत. स्मार्टफोन, वाहने, वैद्यकीय उपकरणे, ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षणसंबंधित यंत्रे  यासारख्यांमध्ये चिपचा वापर केला जातो.

   सेमीकंडक्टर चिप ही चिमुकली असली तरी तिच्या निर्मितीसाठीचा पसारा इतका प्रचंड असतो की त्याचे पाच निरनिराळे आणि वेगळे भाग करावे लागले आहेत. अ) चिपची रचना (डिझाइन) ब) चिपचीघडण/साचे (फाउंड्री) क) भागांची जुळवणी (असेम्ब्ली), चाचणी (टेस्टिंग)  आणि वेश्टण (पॅकेजिंग)    ड) वितरण (रवानगी), हे ते विभाग आहेत.

कुणाचा हातखंडा कशात?

  आज जगात चिपनिर्मितीचे टप्पे  निरनिराळ्या देशात पार पाडले जातात. जसे  आराखडा (डिझाइन) तयार करण्याच्या बाबतीत अमेरिका आघाडीवर आहे. साचे तयार करण्याच्या बाबतीत तैवान आणि चीन आघाडीवर आहेत, तर अमेरिका, नेदरलंड आणि  जपान हे निरनिराळी उपकरणे तयार करण्याचे बाबतीत पुढे आहेत.  1950 ते 1960 या काळात संशोधनक्षेत्र आणि चिपनिर्मितीक्षेत्र यावर अमेरिकेचा एकाधिकार होता. पुढे रशियाने स्वत: संशोधन न करता अमेरिकेची केवळ नक्कलच केली. रशियाने आपल्या गुप्तहेर संस्थेच्या  मदतीने अमेरिकेतून सर्व आवश्यक माहिती चोरून आणली आणि अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील सिलिकॅान व्हॅलीप्रमाणे  ‘झेलेनोग्राड’ नावाचे नवीन शहरच विकसित केले. पण रशियाला अमेरिकेची बरोबरी काही करता आली नाही. कारण नक्कल ती नक्कल आणि अस्सल ते अस्सल!

 याउलट जपान या क्षेत्रात स्वप्रयत्नाने, प्रज्ञेने  व परिश्रमाने  पुढे गेलेला आढळतो. दुसऱ्या महायुद्धात जपानचे अपरिमित नुकसान झाले होते. नव्याने उभे रहायचे असेल तर चिपतंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॅानिक्स यासारख्या नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला पाहिजे, हे जपानने ताडले.  पूर्व आशियात रशिया आणि चीनचा  मुकाबला करण्यासाठी एखाद्या विश्वासू सहकाऱ्याची गरज अमेरिकेलाही होतीच. अशाप्रकारे आशियात जपानने सेमीकंडक्टर आणि चिपनिर्मितीक्षेत्रात आघाडी घेतली. सोनी, हिताची, तोशिबा अशा कंपन्यांची नावे जगभर आदराने घेतली जाऊ लागली.

  तैवाननेही सेमीकंडक्टर उद्योगात चौफेर आघाडी घेतली आहे. आयसी निर्मिती, आराखडे तयार करणे, विक्रीयोग्य माल तयार करणे याबाबत तैवानला आज जगात प्रतिस्पर्धी नाही. कारण तैवानची एकट्याची आज परिपूर्ण निर्मितीसाखळी तयार आहे. त्यामुळे जगातली निम्मी बाजारपेठ आज तैवानच्या हाती आहे.

मलायाशिया हा देशही पुरवठा साखळीतील जगातला महत्त्वाचा देश आहे. सेमीकंडक्टर डिव्हायसेस, इलेक्ट्रॅानिक इटिग्रेटेड सर्किट्स यांच्या माध्यमातून मलायाशियाच्या अर्थकारणाला गती आणि दिशा मिळाली आहे.

[दक्षिण कोरिया - सेमी कंडक्टर निर्मितीसाठी लागणाऱ्या घटकांची आयात करून  चिप व उपकरणे यांच्या  जुळवणीक्षेत्रात दक्षिण कोरिया हे  एक प्रमुख राष्ट्र आहे.

नेदरलंडमधील अॅडव्हान्स्ड सेमीकंडक्टर मटेरियल लिथोग्राफी (एएसएमएल) ही 1984 साली स्थापन झालेली बहुराष्ट्रीय कंपनी असून तिचा फोटोलिथॅाग्राफी मशीनाचा आराखडा तयार करणे आणि त्यांचे उत्पादन करणे या बाबतीत हातखंडा आहे. यात सपाट दगडावर किंवा झिंक किंवा अॅल्युमिनियम  धातूच्या अतिशय पातळ पट्टीवर प्रतिमा अंकित करण्याची प्रक्रिया समाविष्ट असते. या प्रतिमेत वापरलेली  शाई अधिक गडद स्वरुपात दिसते तर रिकाम्या जागा शाईची किंचितही नोंद घेत नसल्यामुळे प्रतिमा अधिक उठून दिसते. संगणकातील चिप्स तयार करतांना हे तंत्रज्ञान वापरले जाते, एवढी माहिती आपल्यासारख्या सामान्य जिज्ञासूंना हा विषय समजून घेण्यापुरती पुरेशी ठरावी. चिप निर्मितीक्षेत्रात नवनवीन प्रयोग करून ही कंपनी सुधारित मायक्रोचिप्स तयार करण्यावर भर देत असते.

तंत्रज्ञानक्षेत्रात नक्कल आणि चोरी करण्याच्या बाबतीत चीन रशियाच्यामागे नाही. तरीही सेमीकंक्टर क्षेत्रातील जगातली सर्वात मोठी बाजारपेठ चीनमध्ये आहे. हिच्या आधारे चीनने जगाला कोविडकाळात वेठीस धरले होते. 2023 पासून अमेरिकेने चीनला काही खास प्रकारचे सेमीकंडक्टर विकणे थांबवले आहे.  यात कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक चिप्सचा प्रामुख्याने समावेश आहे. चीनच्या लष्करी क्षेत्रातील प्रयोगांना आवर घालण्याचा अमेरिकेचा हेतू आहे. चीनचा यामुळे तिळपापड झाला असून त्याने अमेरिकेचा निषेध केला आहे. 

 जर्मनीमधील  इन्फिनिऑन टेक्नॅालॅाजी कंपनी ही सुद्धा सेमीकंडक्टर क्षेत्रातील एक बडी कंपनी आहे. सेन्सर्स, वाहने, आयसी, मेमरी, युएसबी, ब्ल्यू टूथ,  वायफाय याबाबतच्या चिप्स तयार करणे यावर या कंपनीचा भर आहे.

 आयातीवर निर्भर न राहता  इस्रायलने स्वत: संशोधन आणि विकास यावर भर दिलेला आढळतो. इंटेलचा मायक्रोप्रोसेसर 8088 एकेकाळी प्रसिद्ध होता. इस्रायलमधील सेमीकंडक्टर उद्योगाचे संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणात मोठे योगदान आहे. सेमीकंडक्टर डिव्हाइसेस (एससीडी) मध्ये आणि इन्फ्रारेड नाईट व्हिजन वाढविण्यासाठी इस्रायल चिप्स विकसित करतो आहे. शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करणाऱ्या  हाय-टेक आयर्न डोम क्षेपणास्त्रसंरक्षणप्रणालीत चिप्सचा  वापर करून  इस्रायलने  संरक्षण कवच तयार केले आहे.  सिंगापूर आणि थायलंड यांनीही या क्षेत्रात भरपूर प्रगती केली आहे.


 भारताची भूमिका :  चिपनिर्मिती अथ पासून इतिपर्यंत

 ‘पैसे मोजा, विकत घ्या, स्वत: तयार करण्याच्या भानगडीत पडता कशाला?’, ह्या भूमिकेतून बाहेर पडण्याचा भारताने 2014 सालीच निर्णय घेतला आहे. त्याला अनुसरून सेमीकंडक्टरक्षेत्रातही प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भर निर्मिती केंद्र (हब) होण्याचा निर्धार भारताने केला आहे. म्हणूनच 1.26 लाख कोटी रुपये मोजून तीन अर्धवाहक केंद्रे/एकके (प्लांट/युनिट) भारतात उभारली जात आहेत. सेमीकंडक्टरच्या निर्मितीत लाखो गॅलन अतिशुद्ध (अल्ट्रा-प्युअर) पाणी लागते. त्यामुळे प्लॅंट उभारणीसाठी मुबलक पाणी पुरवठा सतत होऊ शकेल अशी जागा सहजासहजी उपलब्ध होऊ शकणार नाही. ती शोधावीच लागेल. येत्या 100 दिवसात गुजराथ आणि आसाम मध्ये योग्यजागी प्लॅंट उभारणीच्या कामाला सुरवात होते आहे. डिझाइन, घटकनिर्मिती, असेम्ब्ली, पॅकेजिंग, आणि संशोधन व विकास यासाठी  सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताला 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यात दक्षिण कोरिया व तैवान यांचे प्रस्ताव प्रामुख्याने आहे. येत्या 5 वर्षांत भारत चीनला एक लोकशाही आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून उभा ठाकणार आहे.  


Monday, March 4, 2024

 पाकिस्तानमध्ये वेगळी आघाडी  

तरूणभारत, नागपूर

मंगळवार  दिनांक 05. 03. 2024

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॉगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.   

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 


पाकिस्तानमध्ये वेगळी आघाडी  


  पाकिस्तानमधल्या स्थापन होत असलेल्या  सरकारकडून काहीही वेगळे घडण्याची अपेक्षा नाही. भारताबरोबर कुठलीही चर्चा होण्याची शक्यता नाही. अमेरिकेने दम भरलाच तर काहीतरी थातुरमातुर हालचाली घडल्या तर घडतील. भारताचा कलही बोलणी व्हावीत, असा असणार नाही. जगात सद्ध्या प्रत्येक ठिकाणी इतके गतिरोध निर्माण होत आहेत की नवीन गुंता सोडविण्याच्या भानगडीत कुणी फारसे पडणार नाही. भारतासोबत असलेले जुने संघर्ष तेवत ठेवण्यापुरतीच गडबड पाकिस्तान करील. जसे 370 कलम पुन्हा प्रस्थापित करा, असा धोशा पाकिस्तान लावू शकेल, एवढेच. आंतरराष्ट्रीय सीमारेषा (इंटरनॅशनल बॅार्डर) आणि युद्धविरामानंतर निर्माण झालेली ताबा रेषा (लाईन ऑफ कंट्रोल) धुमसत ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न चालू राहील. 

निवडणूक पाकिस्तान स्टाईल

   पाकिस्तानमध्ये नुकतीच एक प्रांतीय आणि राष्ट्रीय  निवडणूक पार पडली आहे. घडू नयेत अशा सर्व गोष्टी पाकिस्तानात या निवडणुकीच्या निमित्ताने घडल्या आहेत. म्हणून जनमत अजूनही क्षुब्धच आहे. इम्रान खान आणि त्यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ समर्थित अपक्षांना  सर्वात जास्त जागा मिळूनही त्यांना बाजूला सारून लष्कराने आपल्या तालावर नाचणारे एक बाहुले सत्तेवर बसविले आहे. 

शरीफ बंधूंची एकच चूक!

   सुन्नीबहुल पाकिस्तामध्ये शिया व सुन्नी यातील वैर धुमसतच असते. नवाझ शरीफ स्वत: सुन्नी असूनही त्यांनी शिया असलेल्या परवेझ मुशर्रफ यांना लष्करप्रमुख नेमले होते. मुशर्रफ यांनी शरीफ यांची काय गत केली ते सर्वांना माहीत आहे. शाहबाज शरीफ यांनीही मुनीर या दुसऱ्या शियाला लष्करप्रमुख नेमून एकच चूक दुसऱ्यांदा केली. सेवानिवृत्तीला आलेल्या मुनीर त्यांना सहा वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. शिया असल्यामुळे सुन्नीप्रधान पाकिस्तानी लष्करावर मुशरर्फ यांची किंवा मुनीर यांची फारशी पकड असणार नाही हा दोन्ही शरीफ बंधूंचा समज पार चुकीचा ठरला आणि कळसूत्री भावल्या बनून सिंहासनावर आरूढ होण्याची नामुष्की दोन्ही बंधूंच्या नशिबी आली. आता पाकिस्तान मुस्लीम लीगचे (न) शाहबाज शरीफ हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी तर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे असीफ अली झरदारी हेही अध्यक्षपदी दुसऱ्यांदा असणार आहेत. प्रथम अध्यक्षपदाच्या काळात त्यांना जनतेने ‘मिस्टर 10%’ ही पदवी दिली होती. कोणतेही काम करवून घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी हे पाकिस्तानचे त्यावेळचे अध्यक्ष 10% कमीशन मागीत अशा शब्दात त्यांची चेष्टा केली जात असे. 

  तीनदा पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदाचा अनुभव गाठीशी असलेले नवाझ शरीफ  यांचे धाकटे बंधू आणि गेल्या आघाडी सरकारमधले पंतप्रधान शाहबाझ शरीफ हे पीएमएलचे (एन) नेते, बहुदा पुतणी मरियम अननुभवी असल्यामुळे,  पुन्हा एकदा पंतप्रधानपदाचे आणि बेनझीर भुत्तोंचे पती आणि माजी राष्ट्रध्यक्ष  आसिफ अली झरदारी हे पीपीपीचे ज्येष्ठ नेते अध्यक्षपदाचे दुसऱ्यांदा उमेदवार अशी उभयपक्षी सोयीची तडजोड होते आहे. इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून दूर करण्यासाठी 2022 या वर्षीही हे दोन पक्ष एकत्र आले होते, हे साम्य याही वेळी दिसते आहे, एवढेच.  परंतु ती आघाडी आणि ही आघाडी यातील साम्य इथेच संपते, हे खूप महत्त्वाचे आहे. पीपीपी त्यावेळी सरकारमध्ये सहभागी होती. बिलावल भुट्टो हे परराष्ट्रमंत्री होते. यावेळी मात्र पीपीपी सरकारला बाहेरून पाठिंबा देणार आहे. सरकारमध्ये सामील होणार नाही, हा फार मोठा फरक असणार आहे. असा टेकू केव्हा काढला जाईल, याचा नेम नसतो. अशी सरकारे आजवर अस्थिर राहत आलेली आहेत. याचवेळी काही वेगळे घडणार आहे काय? नवाझ यांची अननुभवी पण कर्तबगार व सौंदर्यवती कन्या मरियम देशातील आणि पंजाब प्रांताचीही पहिली महिला मुख्यमंत्री होते आहे.

लुच्चे पाकिस्तान 

पाकिस्तान कसेबसे जिवंत आहे. दोन तुकडे होऊन बांगलादेश वेगळा झाला, प्रत्येक लढाईत भारताने पाकिस्तानला येथेच्च बदडून काढले, आजी माजी राजकीय नेत्यांचे मुडदे पडले, केवळ शियाबहुल इराणच नव्हे तर अफगाणिस्तानही पाकिस्तानला विव्हल करतो आहे, शेवटी भिकेचा कटोरा हाती आला, महागाईचा दर 30% आणि तळाकडे झेपावणारा विकास दर 2%, असे असूनही पाकिस्तान नाकाशी सूत धरल्यास जिवंत असल्याचे दिसते आहे. याचे प्रमुख कारण हे आहे की, अमेरिकेला या भागात सैन्य उतरवायला एक हक्काचे स्थान हवे आहे. म्हणून अमेरिका पाकिस्तानला मरू देत नाही, देणार नाही. पाकिस्तानचा लुच्चेपणा असा आहे की ते एकाचवेळी चीन आणि रशियाशीही संधान बांधून आहे. पण अमेरिकेला सद्ध्यातरी त्याकडे डोळेझाक करण्यावाचून उपाय नाही. 

    पाकिस्तान हे एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे. म्हणजे माकडाच्या हाती कोलीत आले आहे. अण्वस्त्रांवर राजकीय नेत्यांचे किंवा मुल्ला मौलवींचे नियंत्रण असणे जगाला परवडणारे नाही. पाकिस्तानचे अण्वस्त्र निर्मितीचे प्रयत्न सुवातीलाच थोपवायला हवे होते. हे आपण केले नाही. इस्रायलने आपल्या तुलनेत अधिक जागरूकता दाखविली.  इराणचे अण्वस्त्रनिर्मितीचे प्रयत्न इस्रायल  बॅाम्बहल्ले करून उखडून टाकीत असतो.  आज पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वावर अंकुश ठेवण्याचे काम अमेरिका करते आहे. एरवी लोकशाहीचा उदोउदो करणारी अमेरिका पाकिस्तानात मात्र लष्कराला हाताशी धरून आहे. अण्वस्त्रे बेजबाबदार राजकीय नेते, मुल्ला मौलवी किंवा दशशतवादी यांच्या हाती पडू न देण्याची जबाबदारी तिने लष्करावर सोपविलेली दिसते.  मोबदल्यात लष्कराच्या लहान मोठ्या गमजांकडे अमेरिका डोळेझाक करीत असते, हे आपण पाहिले आहे.

  इम्रान खान यांच्या पाठीशी तरूणवर्ग

 पाकिस्तानी तरूण मात्र आज सत्तारूढ राजकारणी आणि लष्कर यांच्यावर विलक्षण संतापलेला आहे. तो इम्रान खान यांच्या पाठीशी उभा आहे. निवडणुका योग्य वातावरणात झाल्या असत्या तर इम्रानखान यांच्या तेहरिक-ए- इन्साफ समर्थित अपक्षांना बहुमत मिळाले असते, असे राजकीय निरीक्षकांचे ठाम मत आहे. अजूनतरी जनतेने उठाव केलेला नाही. पण विद्यमान पदाधिकारी ज्वालामुखीच्या तोंडावरच आरूढ आहेत, हे नक्की आहे. जनरल मुनीर इम्रानखान यांच्यावर खूपच नाराज आहेत याचे कारण असे आहे की या सव्यसाची माजी क्रिकेटपटूने लष्करातच एक दुसरा गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असे म्हणतात. गेल्या सरकारमध्ये शाहबाज हे पंतप्रधानपदी होते. त्यांची कारकीर्द जेमतेमच प्रभावी होती. त्यांच्या तुलनेत तरूण बिलावल भुट्टो चांगलेच पाताळयंत्री आहेत. ते आज ना उद्या शाहबाज खानांना पायउतार करण्यास भाग पाडतील, अशी चर्चा आताच पाकिस्तानमध्ये सुरू झाली आहे.

  इम्रान खान तुरुंगात असले तरी संपलेले नाहीत. त्यांनी लष्करात दुहीची बीजे पेरली आहेत, हे नक्की आहे. ती किती फुलतात,  फळतात हे काळच दाखवील. इतक्यातच असे काही घडेल असे मात्र वाटत नाही. घडा भरावा लागतो म्हणतात. यालाच ‘क्रिटिकल स्टेज’ यावी लागते, असे वैज्ञानिक व राजकीय भाषेत म्हणतात. तोपर्यंत आत धुमसणेच तेवढे सुरू असते. ‘क्रिटिकल स्टेज’  येताच स्फोट होतो, अगोदर होत नाही. तोपर्यंत वरवर सगळे कसे शांत शांत असते. आपले कुशल परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून असतीलच. यावेळी बांगलादेशाच्या वेळी जेवढी हालचाल भारताने केली, तेवढीही हालचाल करण्याची आवश्यकता असणार नाही. कारण पाकिस्तानी लष्करातच दुभंग निर्माण होतो आहे. क्रिकेटवीर इम्राान खान यांची प्रसिद्धी गुगलीसाठी फारशी नव्हती. पण त्यांनी राजकीय पातळीवर एक गुगली टाकली आहे, हे मात्र नक्की आहे.