Sunday, March 24, 2024

20240326 लहानपण देगा देवा!

आमचे खेळ आणि खरचटणे 

वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी 7, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022   

Email- kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   टीव्हीवर होळीची दृश्ये पाहत होतो आणि एकदम घानमाकड हा खेळ खेळला जातांना दिसला. हा आमचा लहानपणचा खेळ होता. यात मोकळ्या जागेत मध्यभागी एक ४/५ फूट उंचीचा भरभक्कम खांब उभारला जायचा. त्याचे वरचे टोक काहीसे निमुळते केलेले असायचे. एका ५/६ फूट लांबींच्या तशाच खांबाला मध्यभागी खाच केलेली असे. हा खांब उभ्या खांबावर ठेवला की तराजूच्या आडव्या दांड्यासारखी रचना तयार व्हायची. आडवा खांब भूपृष्ठाला समांतर असायचा. त्याच्या  एका बाजूला आडव्या खांबावर दोन तीन मुले बसायची. दुसऱ्या बाजूला अशीच समवयस्क  मुले बसायची. अशाप्रकारे समतोल साधला गेला की एक मुलगा आडव्या खांबाला गती धेऊन पटकन बाजूला होत असे. मग बाहेर काहीसा दूर उभा राहत तो आडव्या खांबाला वर्तुळाकार गती देण्याचे काम करायचा. गोलगोल फिरून चक्कर यायला लागली की एकेक पडायला लागायचा आणि मगच हा खेळ थांबत असे.

   दुसरा खेळ म्हणजे लोखंडी रिंग. लोखंडी रिंग आणि तिला दांडा असे हिचे स्वरुप असायचे. दांड्याच्य एका टोकाला वर्तुळाकृती आकार असायचा ही दोन वर्तुळे एकातएक अडकवलेली असायची. अशी रिंग घेऊन शर्यत लावून पळायचे हा आमचा लहान मुलांचा कार्यक्रम असायचा. रिंग लहान असली तर वाकून धावावे लागे. योग्य आकारची असे तेव्हा ताठ उभेराहून आम्ही धावत असू. मोठ्या उंच मुलांच्या रिंगा आमच्या डोक्याच्या रांगेत याव्यात, इतक्या मोठ्या असत. लहान मुले त्या घेऊन धावायचा प्रयत्न करीत. पण ते सोपे नसे. उंच रिंग घेऊन धावणे व धावतांना तोलही सांभाळणे ही कौशल्याची बाब होती. अनेक प्रयत्न असफल होत. पडले की खरचटायचे. 

    दुसरे दिवशी ती जखम पिकायची. जखम  पायाला झाली असेल तर जांघेत गाठ यायची, हाताताला जखम झाली असेल तर काखेत गाठ यायची.  गाठी दुखायच्या. माझ्या हाताला आणि पायाला नेहमीच काहीनाकाही कारणास्तव खरचटायचे. आणि दुसऱ्या दिवशी जखम पिकायची जखमा आणि गाठी ठसठसायच्या. त्या रात्री कंदिलांवर कापड ठेवून शेकायच्या हा कार्यक्रम ठरलेला असे. तरी आम्ही खरचटताच टिंक्चर आयोडीनमध्ये कापूस बडवून त्या फायाने खरचटलेली जागा स्वच्छ करीत असू. त्याकाळी जखमेवर लावायला ‘सल्फरचे मलम’ मिळत असे. ते लावायचे. वर कापसाचा फाया ठेवायचा. मग बॅंडेज बांधायचे. पायाचे बँडेज उभे राहताच घसरायचे. मग ते पुन्हा बांधायचे. यावेळी ते करकचून बांधले जायचे. मग रग लागायची. दुसऱ्या  दिवशी परमँगनेट ऑफ पोटॅश टाकलेल्या पाण्याने  जखम स्वच्छ करण्याचा कार्यक्रम असायचा. त्यावेळी कापूस जखमेला पक्का  चिकटला जायचा. तो ओढून काढायचा तर वेदना होत. त्या टाळण्यासाठी त्याच्यावर  परमँगनेट ऑफ पोटॅश टाकलेल्या पाण्याचा अभिशेक करायचा. आणि तो हळूहळू जखमेपासून अलगद वेगळा करायचा. कधिकधि आपलाच धक्का लागून तो ओढला जायचा आणि त्वचेच्या काही भागाला सोबत घेऊन तो वेगळा व्हायचा. त्यावेळी देव आठवत. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागत. पण पुढचा कार्यक्रम पार पाडणे भाग असे. तो म्हणजे जखम परमँगनेट ऑफ पोटॅश टाकलेल्या पाण्यात कापूस बुडवून त्या फायाने जखम स्वच्छ करायची. मृत त्वचा चांगल्या त्वचेपासून सहजासहजी वेगळी होत नसे. कापूस घासावा तर वेदना होत. पण उपाय नव्हता. मग जखमेवर बोरिक पावडर टाकायची. कापसाच्या फायाला सल्फरचे मलम लावायचे ते नीट लागले तर दुसऱ्या दिवशी ड्रेसिंग करतांना जखमेवर ठेवलेला कापूस अलगद निघत असे. मग पट्टीबंधन (बॅंडेज)  हा कार्यक्रम असायचा. मला दुसरे महायुद्ध संपलेले आठवते. युद्धात जखमी सैनिकांच्या जखमा पिकू नयेत म्हणून शास्त्रज्ञांनी निरनिराळी औषधे, मलमे, गोळ्या, इंजक्शने शोधून काढली होती. ती बाजारात यायला सुरवात माझ्या समोर झालेली मला आठवते. आजच्या अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल औषधांचे पूर्वज भूतलावर अवतरले होते. जखमांचे पिकणे बरेच कमी झाले होते.  

  खरजेवरचेही याचवेळी औषध आले त्यामुळे खरूजही हळूहळू नाहीशी होत गेली. त्याकाळी शाळकरी मुलांना खरजेचा त्रास होत असे. खरूज बोटांच्या बेचकेत होत असे. तिला भयानक खाज सुटायची. खाजवून खाजवून रक्त यायचे. त्यावरही परिणामकारक औषध आले नव्हते. स्वच्छतेचे पालन हाच प्रतिबंधात्मक उपाय असे. मोठ्यांच्या वाट्याला खरूज फारशी येत नसे. पण शाळेत एकाला जरी खरूज झाली तरी ती वर्गात हळूहळू पसरायची. खाजवून खाजवून आम्ही रडकुंडीला येत असू. त्यावर रडण्याशिवाय उपाय नसे. पुढे औषधे आली ती ‘सल्फा ड्रग्ज’ म्हणून ओळखली जायची, असे अंधुकसे आठवते. वर्षा दोन वर्षांनी टायफाईडवरचे परिणामकारक औषध क्लोरोमायसेटीनही बाजारात आल्याचे माझ्या आठवणीत आहे. सिबॅझॅाल आणि एल्कोसीन ही औषधेही बाजारात आल्याचे आठवते. ही दुसऱ्या महायुद्धाची सकारात्मक देणगी होती. जखमी सैनिक बरे व्हावेत म्हणून तेव्हा त्यांच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून शोधून काढलेली औषधे सामान्यासाठीही बाजारात उपलब्ध होऊ लागल्यामुळे बालगोपालांबरोबर मोठ्यांचेही जीवन पुष्कळ  सुकर झाले आहे. 



 

No comments:

Post a Comment