Monday, March 4, 2024

 पाकिस्तानमध्ये वेगळी आघाडी  

तरूणभारत, नागपूर

मंगळवार  दिनांक 05. 03. 2024

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॉगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.   

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 


पाकिस्तानमध्ये वेगळी आघाडी  


  पाकिस्तानमधल्या स्थापन होत असलेल्या  सरकारकडून काहीही वेगळे घडण्याची अपेक्षा नाही. भारताबरोबर कुठलीही चर्चा होण्याची शक्यता नाही. अमेरिकेने दम भरलाच तर काहीतरी थातुरमातुर हालचाली घडल्या तर घडतील. भारताचा कलही बोलणी व्हावीत, असा असणार नाही. जगात सद्ध्या प्रत्येक ठिकाणी इतके गतिरोध निर्माण होत आहेत की नवीन गुंता सोडविण्याच्या भानगडीत कुणी फारसे पडणार नाही. भारतासोबत असलेले जुने संघर्ष तेवत ठेवण्यापुरतीच गडबड पाकिस्तान करील. जसे 370 कलम पुन्हा प्रस्थापित करा, असा धोशा पाकिस्तान लावू शकेल, एवढेच. आंतरराष्ट्रीय सीमारेषा (इंटरनॅशनल बॅार्डर) आणि युद्धविरामानंतर निर्माण झालेली ताबा रेषा (लाईन ऑफ कंट्रोल) धुमसत ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न चालू राहील. 

निवडणूक पाकिस्तान स्टाईल

   पाकिस्तानमध्ये नुकतीच एक प्रांतीय आणि राष्ट्रीय  निवडणूक पार पडली आहे. घडू नयेत अशा सर्व गोष्टी पाकिस्तानात या निवडणुकीच्या निमित्ताने घडल्या आहेत. म्हणून जनमत अजूनही क्षुब्धच आहे. इम्रान खान आणि त्यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ समर्थित अपक्षांना  सर्वात जास्त जागा मिळूनही त्यांना बाजूला सारून लष्कराने आपल्या तालावर नाचणारे एक बाहुले सत्तेवर बसविले आहे. 

शरीफ बंधूंची एकच चूक!

   सुन्नीबहुल पाकिस्तामध्ये शिया व सुन्नी यातील वैर धुमसतच असते. नवाझ शरीफ स्वत: सुन्नी असूनही त्यांनी शिया असलेल्या परवेझ मुशर्रफ यांना लष्करप्रमुख नेमले होते. मुशर्रफ यांनी शरीफ यांची काय गत केली ते सर्वांना माहीत आहे. शाहबाज शरीफ यांनीही मुनीर या दुसऱ्या शियाला लष्करप्रमुख नेमून एकच चूक दुसऱ्यांदा केली. सेवानिवृत्तीला आलेल्या मुनीर त्यांना सहा वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. शिया असल्यामुळे सुन्नीप्रधान पाकिस्तानी लष्करावर मुशरर्फ यांची किंवा मुनीर यांची फारशी पकड असणार नाही हा दोन्ही शरीफ बंधूंचा समज पार चुकीचा ठरला आणि कळसूत्री भावल्या बनून सिंहासनावर आरूढ होण्याची नामुष्की दोन्ही बंधूंच्या नशिबी आली. आता पाकिस्तान मुस्लीम लीगचे (न) शाहबाज शरीफ हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी तर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे असीफ अली झरदारी हेही अध्यक्षपदी दुसऱ्यांदा असणार आहेत. प्रथम अध्यक्षपदाच्या काळात त्यांना जनतेने ‘मिस्टर 10%’ ही पदवी दिली होती. कोणतेही काम करवून घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी हे पाकिस्तानचे त्यावेळचे अध्यक्ष 10% कमीशन मागीत अशा शब्दात त्यांची चेष्टा केली जात असे. 

  तीनदा पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदाचा अनुभव गाठीशी असलेले नवाझ शरीफ  यांचे धाकटे बंधू आणि गेल्या आघाडी सरकारमधले पंतप्रधान शाहबाझ शरीफ हे पीएमएलचे (एन) नेते, बहुदा पुतणी मरियम अननुभवी असल्यामुळे,  पुन्हा एकदा पंतप्रधानपदाचे आणि बेनझीर भुत्तोंचे पती आणि माजी राष्ट्रध्यक्ष  आसिफ अली झरदारी हे पीपीपीचे ज्येष्ठ नेते अध्यक्षपदाचे दुसऱ्यांदा उमेदवार अशी उभयपक्षी सोयीची तडजोड होते आहे. इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून दूर करण्यासाठी 2022 या वर्षीही हे दोन पक्ष एकत्र आले होते, हे साम्य याही वेळी दिसते आहे, एवढेच.  परंतु ती आघाडी आणि ही आघाडी यातील साम्य इथेच संपते, हे खूप महत्त्वाचे आहे. पीपीपी त्यावेळी सरकारमध्ये सहभागी होती. बिलावल भुट्टो हे परराष्ट्रमंत्री होते. यावेळी मात्र पीपीपी सरकारला बाहेरून पाठिंबा देणार आहे. सरकारमध्ये सामील होणार नाही, हा फार मोठा फरक असणार आहे. असा टेकू केव्हा काढला जाईल, याचा नेम नसतो. अशी सरकारे आजवर अस्थिर राहत आलेली आहेत. याचवेळी काही वेगळे घडणार आहे काय? नवाझ यांची अननुभवी पण कर्तबगार व सौंदर्यवती कन्या मरियम देशातील आणि पंजाब प्रांताचीही पहिली महिला मुख्यमंत्री होते आहे.

लुच्चे पाकिस्तान 

पाकिस्तान कसेबसे जिवंत आहे. दोन तुकडे होऊन बांगलादेश वेगळा झाला, प्रत्येक लढाईत भारताने पाकिस्तानला येथेच्च बदडून काढले, आजी माजी राजकीय नेत्यांचे मुडदे पडले, केवळ शियाबहुल इराणच नव्हे तर अफगाणिस्तानही पाकिस्तानला विव्हल करतो आहे, शेवटी भिकेचा कटोरा हाती आला, महागाईचा दर 30% आणि तळाकडे झेपावणारा विकास दर 2%, असे असूनही पाकिस्तान नाकाशी सूत धरल्यास जिवंत असल्याचे दिसते आहे. याचे प्रमुख कारण हे आहे की, अमेरिकेला या भागात सैन्य उतरवायला एक हक्काचे स्थान हवे आहे. म्हणून अमेरिका पाकिस्तानला मरू देत नाही, देणार नाही. पाकिस्तानचा लुच्चेपणा असा आहे की ते एकाचवेळी चीन आणि रशियाशीही संधान बांधून आहे. पण अमेरिकेला सद्ध्यातरी त्याकडे डोळेझाक करण्यावाचून उपाय नाही. 

    पाकिस्तान हे एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे. म्हणजे माकडाच्या हाती कोलीत आले आहे. अण्वस्त्रांवर राजकीय नेत्यांचे किंवा मुल्ला मौलवींचे नियंत्रण असणे जगाला परवडणारे नाही. पाकिस्तानचे अण्वस्त्र निर्मितीचे प्रयत्न सुवातीलाच थोपवायला हवे होते. हे आपण केले नाही. इस्रायलने आपल्या तुलनेत अधिक जागरूकता दाखविली.  इराणचे अण्वस्त्रनिर्मितीचे प्रयत्न इस्रायल  बॅाम्बहल्ले करून उखडून टाकीत असतो.  आज पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वावर अंकुश ठेवण्याचे काम अमेरिका करते आहे. एरवी लोकशाहीचा उदोउदो करणारी अमेरिका पाकिस्तानात मात्र लष्कराला हाताशी धरून आहे. अण्वस्त्रे बेजबाबदार राजकीय नेते, मुल्ला मौलवी किंवा दशशतवादी यांच्या हाती पडू न देण्याची जबाबदारी तिने लष्करावर सोपविलेली दिसते.  मोबदल्यात लष्कराच्या लहान मोठ्या गमजांकडे अमेरिका डोळेझाक करीत असते, हे आपण पाहिले आहे.

  इम्रान खान यांच्या पाठीशी तरूणवर्ग

 पाकिस्तानी तरूण मात्र आज सत्तारूढ राजकारणी आणि लष्कर यांच्यावर विलक्षण संतापलेला आहे. तो इम्रान खान यांच्या पाठीशी उभा आहे. निवडणुका योग्य वातावरणात झाल्या असत्या तर इम्रानखान यांच्या तेहरिक-ए- इन्साफ समर्थित अपक्षांना बहुमत मिळाले असते, असे राजकीय निरीक्षकांचे ठाम मत आहे. अजूनतरी जनतेने उठाव केलेला नाही. पण विद्यमान पदाधिकारी ज्वालामुखीच्या तोंडावरच आरूढ आहेत, हे नक्की आहे. जनरल मुनीर इम्रानखान यांच्यावर खूपच नाराज आहेत याचे कारण असे आहे की या सव्यसाची माजी क्रिकेटपटूने लष्करातच एक दुसरा गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असे म्हणतात. गेल्या सरकारमध्ये शाहबाज हे पंतप्रधानपदी होते. त्यांची कारकीर्द जेमतेमच प्रभावी होती. त्यांच्या तुलनेत तरूण बिलावल भुट्टो चांगलेच पाताळयंत्री आहेत. ते आज ना उद्या शाहबाज खानांना पायउतार करण्यास भाग पाडतील, अशी चर्चा आताच पाकिस्तानमध्ये सुरू झाली आहे.

  इम्रान खान तुरुंगात असले तरी संपलेले नाहीत. त्यांनी लष्करात दुहीची बीजे पेरली आहेत, हे नक्की आहे. ती किती फुलतात,  फळतात हे काळच दाखवील. इतक्यातच असे काही घडेल असे मात्र वाटत नाही. घडा भरावा लागतो म्हणतात. यालाच ‘क्रिटिकल स्टेज’ यावी लागते, असे वैज्ञानिक व राजकीय भाषेत म्हणतात. तोपर्यंत आत धुमसणेच तेवढे सुरू असते. ‘क्रिटिकल स्टेज’  येताच स्फोट होतो, अगोदर होत नाही. तोपर्यंत वरवर सगळे कसे शांत शांत असते. आपले कुशल परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून असतीलच. यावेळी बांगलादेशाच्या वेळी जेवढी हालचाल भारताने केली, तेवढीही हालचाल करण्याची आवश्यकता असणार नाही. कारण पाकिस्तानी लष्करातच दुभंग निर्माण होतो आहे. क्रिकेटवीर इम्राान खान यांची प्रसिद्धी गुगलीसाठी फारशी नव्हती. पण त्यांनी राजकीय पातळीवर एक गुगली टाकली आहे, हे मात्र नक्की आहे. 


No comments:

Post a Comment