तरूणभारत , मुंबई
आजच्या महत्त्वाच्या विषयाशी संबंधित सोबतचा लेख प्रसिद्ध करण्याचे बाबतीत योग्य तो निर्णय व्हावा, ही विनंती.
आपला स्नेहाकांक्षी,
वसंत काणे मार्च 2024
मालदीवमध्ये मुइझ्झूंची मनमानी आणि मोदी मॅजिक
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर 440 022 मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
2024 च्या मार्च महिन्यात मालदीव आणि चीन यांच्यामध्ये एका संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यानुसार चीन मालदीवला काहीही मोबदला न घेता (ग्रॅटिस) संरक्षण देणार आहे. अशाप्रकारे मालदीवच्या बाबतीत भारतापासून दूरता आणि चीनशी जवळीक याला प्रारंभ झाला आहे. मालदीव भारतासाठी भूराजकीय, सामरिक, आर्थिक, वांशिक, भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यापारी अशा विविध दृष्टींनी महत्त्वाचा आहे. त्यामुळे या कराराचा परिणाम हिंदी महासागरातील भूराजकीय वातावरणात फार मोठा बदल होण्यात होणार आहे. कारण हे निमित्त करून मालदीवने भारताची जी सैनिकी पथके (77 सैनिक आणि 12 वैद्यकीय कर्मचारी), जी उभयपक्षी मान्यतेनुसार आजवर मालदीवमध्ये होती, त्यांना भारतात परत जाण्यास सांगितले आहे. याच्या उत्तरादाखल भारत आणि अन्य काही राष्ट्रांना हिंदीमहासागरविषयक रणनीतीची नव्याने आखणी करावी लागणार आहे. मालदीव आणि चीन यातील करार गुप्त स्वरुपाचा आहे. चीन म्हणे घातक नसलेली शस्त्रेच मालदीवला पुरवणार असून त्यांच्या वापराविषयीचे प्रशिक्षणही देणार आहे. पण या समजुतीत राहण्यात अर्थ नाही. याला जोडूनच चिनी संशोधन/गुप्तचर जहाज शियांग यांग हाँग 03 डॉकिंगने मालदीवला भेट दिल्याचे वृत्त आहे. भारतासोबतच्या तणावाच्या या काळात मालदीव हळूहळू नवे मित्रही जोडतो आहे. चीनसोबत संरक्षण करार केल्यानंतर अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांनी कट्टर इस्लामिक देश तुर्कीसोबत नवा करार केला आहे. तुर्कीसोबतच्या या नव्या करारानुसार मालदीवने आपल्या भोवतालच्या समुद्रात म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये गस्त घालण्यासाठी लष्करी ड्रोन्सची खरेदी 3 मार्च 2024 रोजी केली आहे. म्हणजे हा करार भारतीय सैन्याच्या माघारीपूर्वी झाला असल्याची गंभीर दखल भारताने घेतली आहे.
दर्पोक्ती!
‘‘मालदीव कोणत्याही देशाच्या मदतीवर अवलंबून नाही. आमचा देश जरी लहान असला, तरी भोवतालचा हिंद महासागर हिशोबात घेतला तर आम्ही नऊ लाख चौरस किलोमीटरचा स्पेशल इकॉनॉमिक झोन असलेला एक ‘भला मोठा देश’ आहोत. हा महासागर कोणत्याही विशिष्ट देशाची मालमत्ता नाही'', ही मोहम्मद मुइज्जू यांची दर्पोक्ती हास्यास्पद असली तरी ती हसण्यावारी नेण्यासारखीही नाही. हिंदी महासागरात मालदीव मोक्याच्या जागी आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा राखण्यासाठी आणि व्यापारी जलमार्ग अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने मालदीव अतिशय महत्त्वाचा आहे. उत्तरादाखल भारताने आपली आयएनएस जटायू ही युद्धनौका लक्षद्वीपमधील मिनीकॅाय बेटावर मालदीवपासून 130 किलोमीटर अंतरावर आणून ठेवली आहे. त्यामुळे भारतालाही पाळत ठेवणे (ऑपरेशनल सर्व्हिलन्स) सोयीचे होणार आहे.
मालदीव कसा?
मालदीवचे प्रजासत्ताक हा दक्षिण आशियाच्या हिंदी महासागराच्या अरबी समुद्रामधील एक कंकणाकृती द्वीपसमूह आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान 26 बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैऋत्येस 750 किलोमीटरवर आणि भारताच्या नैऋत्येस 600 किलोमीटरवर आहेत. मालदीव द्वीपसमूहाने जरी समुद्रातील 90,000 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले आहे, तरी या बेटसमूहातील जलयुक्त भाग वगळला तर सर्व बेटसमूहांचे एकूण क्षेत्रफळ फक्त सुमारे 400 चौरस किमी आहे. म्हणजे हा ‘भला मोठा देश’ नक्कीच नाही. समुद्रात बुडालेल्या एका पर्वताची पाण्यावर आलेली शिखरे म्हणजे ही बेटे असून हा पर्वत लक्षद्वीपापर्यंत पसरलेला आहे. तशी इथे एकूण 1200 बेटे आहेत. पण 6 लाख मनुष्यवस्ती फक्त 200 बेटांवरच आहे. बहुतेक बेटांची समुद्रसपाटीपासूनची उंची फक्त 8 फूट इतकीच आहे. त्यामुळे अनेकदा अगोदर अस्तित्वात असलेली बेटे समुद्रात बुडून जावीत व सागरांतर्गत उलथापालथींमुळे नवीन बेटे निर्माण व्हावीत, असा प्रकार या भागात नेहमी सुरू असतो. सागराच्या उथळपणामुळे सुरवातीला या भागात नौकानयन करणे अतिशय धोकादायक मानले जात असे. म्हणून पूर्वी मसाल्याचे पदार्थ वाहून नेणारी जहाजे या बेटांना वळसा घालून जायची. आता मात्र अचुक नकाशे उपलब्ध आहेत.
एकट्या माले या राजधानीच्या शहराची लोकसंख्याच एक लाख आहे. बाकीच्या अनेक बेटांवरील लोकसंख्या तर शेकड्यातच असते. इसवी सन 1117 च्या सुमारास येथे दीवा महाल साम्राज्य होते, असे उल्लेख आहेत. तसे सद्ध्या माहीत असलेला मालदीवचा इतिहास, 2,500 वर्षांहून अधिक जुना आहे. येथील सुरुवातीचे रहिवासी हे गुजराती असल्याचं मानलं जातं. तर काहींच्या मतानुसार या बेटांचा सांस्कृतिक इतिहास तसा तिसऱ्या शतकापासून सुरू होतो. मालदीववर 12 व्या शतकापर्यंत हिंदू राजांचे राज्य होते. यानंतर ते बौद्ध धर्माचे केंद्र बनले. तमिळ चोला राजांनीही येथे राज्य केल्याचं सांगितलं जातं. येथे अनेक वर्षे बौद्धधर्म आचरणात होता. पुढे अरब व्यापाऱ्यांच्या आगमनानंतर या बेटात इस्लाम धर्माचा शिरकाव झाला आणि आज येथे 98 टक्के लोक सुन्नीपंथीय इस्लाम धर्मीय आहेत. 1965 पर्यंत येथे ब्रिटिशांची सत्ता होती.
आज इथे पर्यटन, मासेमारी, स्कुबा डायव्हिंग, हॅाटेलिंग हे मुख्य व्यवसाय आहेत. जोडीला औषधी पाण्याचे झरेही आहेत. मालदीवच्या उत्तर आणि दक्षिण बाजूने असलेल्या समुद्राच्या पट्ट्यातून भारताचा 50 टक्के व्यापार होतो. आखाती तेलापैकी 80 टक्के येथून येते. चीनचाही आफ्रिका आणि आखाताला होणारा निम्मा व्यापार मालदीव समुद्रातून होतो. ही बेटे केव्हा बुडतील याचा काहीही भरवसा नाही, हे जाणून येथील राज्यकर्ते भारतात जमीन विकत घेण्याचा विचार करीत असतात, असे म्हणतात.
मालदीवचे नवीन अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू
No comments:
Post a Comment