Monday, June 24, 2024


युरोपीयन युनीयनमध्ये उजवे वादळ  

(पूर्वार्ध)

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   

  युरोपीयन युनीयनमध्ये 2024 मधली निवडणूक नुकतीच पार पडली आहे. निवडणुकीला प्रारंभ नेदरलंडपासून 6 जूनला गुरुवारी झाला तर शेवटचे मतदान रविवारी 9 जून 2024 ला पार पडले. याच दिवशी बहुतेक देशांनी आपापल्या देशात निवडणूक घेतली. या निवडणुकीत 51% मतदान झाले.   

               पक्षोपपक्षांचे /आघाड्यांचे बलाबल 

या निवडणुकीत मध्यममार्गीयांचे (सेंटरिस्ट) बहुमत कायम राहिले असले तरी उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी मोठीच मुसंडी मारलेली दिसते.

 युरोपियन पीपल्स पार्टी  या मध्यममार्गी (सेंटरिस्ट) पक्षाला (नव्हे आघाडीला ) 189 जागा मिळाल्या आहेत. युरोपियन पीपल्स पार्टी हा ख्रिश्चन-लोकशाही, पुराणमतवादी आणि उदारमतवादी-पुराणमतवादी सदस्यांचा पक्ष आहे. हा एक  आघाडी स्वरुपाचा युरोपियन राजकीय पक्ष आहे. थोडक्यात असे की, ही एक आंतरराष्ट्रीय संघटना असून  त्यात अनेक राजकीय पक्ष आहेत. या निवडणुकीत या आघाडीस्वरुप पक्षाला मागील वेळेपेक्षा 13 जागा जास्त मिळाल्या आहेत.

समाजवादी व लोकशाहीवादी पुरोगामी आघाडी 135  - प्रोग्रेसिव्ह अलायन्स ऑफ सोशालिस्ट अँड डेमोक्रॅट्स हा युरोपियन समाजवादी पक्षाचा युरोपियन संसदेतील राजकीय गट आहे. या निवडणुकीत 4 जागांचा तोटा झाला आहे.

 मेक युरोप ग्रेट अगेन - (युरोपचे नूतनीकरण करा ‘रीन्यू’) 79-  युरोपला त्याचे पुनर्वैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने स्थापना झालेला पक्ष. या पक्षाला 23 जागांचा तोटा झाला आहे.

युरोपियन पुराणमतवादी आणि सुधारणावादी (कॅान्झर्व्हेटिव्ह अँड रिफॅार्मिस्ट) 73 - ही पुराणमतवादी आणि सुधारणावादींची आघाडी आहे. 7 जागांचा फायदा

ओळख आणि लोकशाही (आयडेंटिटी अँड डेमॅाक्रसी) 58 - आयडेंटिटी अँड डेमोक्रसी हा युरोपियन संसदेतील  उजवा राजकीय गट आहे, 9 जागांचा फायदा

ग्रीन्स-युरोपियन फ्री अलायन्स 53 - हरित राजकारण, किंवा इकोपोलिटिक्स. ही एक राजकीय विचारधारा आहे जी पर्यावरणवाद, अहिंसा, सामाजिक न्याय आणि तळागाळातील लोकशाहीमध्ये रुजलेली पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत समाजाला चालना देण्याचे उद्दिष्ट  असलेली विचारधारा असलेला पक्ष. 18 जागांचा तोटा.

 युरोपियन संसदेतले डावे 39 - डाव्या विचारसरणीचे पक्ष. 2 जागांचा फायदा.

नॉन-इन्स्क्रिट्स 45 या निवडणुकीत 17 जागांचा तोटा.

इतर 46 जागा.

पूर्वेतिहास 

 युरोपियन युनियन हा युरोपातील 27 राष्ट्रांचा संघ आहे. ही राष्ट्रे  अशी. ऑस्ट्रिया, बेलजियम, बलगॅरिया, क्रोएशिया, रिपब्लिक ऑफ सायप्रस, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लॅटव्हिया, लिथुएनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलंड, पोलंड, पोर्च्युगाल, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन आणि स्वीडन. 

   या संघाचे उद्दिष्ट युरोपीयन देशांमध्ये राजकीय व शासकीय एकता आणणे, समान अर्थव्यवस्था व समान व्यापार-नियम लागू करणे, समान चलन (युरो-€) अस्तित्वात आणणे हे आहे. युरोपियन युनीयन  हे युरोप खंडातील सर्वात मोठे राजकीय व आर्थिक संघटन  आहे. उजव्यांची सरशी याच निवडणुकीत झाली असे नाही तर गेल्या काही वर्षांपासून युरोपमधील अनेक देशांमध्ये अतिउजव्या विचारसरणीचा वरचष्मा निर्माण  होतांना दिसतो आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर तर युरोपातील अनेक देशांच्या सरकारांनी उजव्या दिशेने वाटचाल सुरू केली  आहे.

   दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेली युरोपियन युनियन ही अतिप्रगत अशी आर्थिक संघटना आहे. या संघटनेने युरोपमधील विविध सदस्य देशांत एकत्रित बाजारप्रणाली विकसित केली आहे. यामागे युरोपमध्ये वस्तू, सेवा व भांडवल यांचा मुक्त संचार व्हावा, हे उद्दिष्ट आहे. या देशांनी वस्तूंची देवाणघेवाण करताना सर्व वस्तूंवरील जकात रद्द केली आहे. तसेच सभासद देशांकरिता युरो चलनही निश्चित केले आहे.

  युरोपीयन युनीयनचे स्वरूप  

  पावणे दोन लक्ष चौरस मैल क्षेत्रफळ, 51 कोटी लोकसंख्या म्हणजे जगातील 7.3 टक्के लोक इतकी   लोकसंख्या असलेला हा विस्तीर्ण  भूप्रदेश आहे. 2012 मध्ये युरोपीयन युनीयनला नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले होते. शांततेच्या मार्गांचा अंगीकार, मानवी हक्कांची जपणूक, लोकशाही वृत्तीचा पुरस्कार आणि समन्वयाच्या भूमिकेवर भर यासाठी गत सहा दशके यशस्वी प्रयत्न केल्याबाबत हा पुरस्कार होता. पण आज मध्यममार्गी कात टाकून युरोपीयन युनीयन कूस बदलून उजवीकडे वळते आहे. अशी ही युरोपीयन युनीयनन जगातील उगवती आर्थिक महासत्ता मानली जाते. 

भाषा - युरोपीयन युनीयनमध्ये 24 अधिकृत भाषा असल्या तरी तिथे भाषिकवाद नाहीत. ही सर्व मंडळी आपापल्या भाषेत जशी बोलत असतात तशीच ती त्या त्या भाषेत संभाषणही करू शकतात. थोडक्यात असे की भाषेचा प्रश्न आपल्या भारतापेक्षा युरोपीयन युनीयनमध्ये कितीतरी बिकट आहे. पण तिथे रोमन लीपी थोड्याफार फरकाने सर्व भाषांसाठी सारखी आहे. भारतातील वाद भाषेपेक्षा भिन्न लीपीमुळे विकोपाला जात असतात. युरोपीयन युनीयनमध्ये लीपीसाधर्म्यामुळे भाषेचा प्रश्न भारताप्रमाणे वैषम्याला कारणीभूत होत नाही. 

धर्म - धर्माचा विचार करता ख्रिश्चन लोक बहुसंख्य आहेत. तसेच मुस्लीम 1.8 टक्के तर अन्य 2.6 टक्के आहेत. धर्म संकल्पनाच न मानणारे  24 टक्के, अज्ञेयवादी (एग्नॅास्टिक) 13.6 टक्के तर नास्तिक (एथिस्ट) 10.4 टक्के आहेत. 

डिग्रेसिव्ह प्रपोर्शनॅलिटीचे तत्त्व

  युरोपीयन युनीयनच्या 27 घटक राज्यांमध्ये जागांचे वाटप डिग्रेसिव्ह प्रपोर्शनॅलिटीच्या तत्त्वानुसार होते. या तत्त्वानुसार कमी लोकसंख्येच्या लहान देशांना थोड्या जास्त प्रमाणात प्रतिनिधित्व आणि मोठ्या लोकसंख्येच्या मोठ्या देशांना तुलनेने थोडे कमी प्रतिनिधित्व दिले जाते. जसे, युरोपीयन युनीयनच्या 27 घटक राज्यांमध्ये जर्मनीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. जर्मनीला लोकसंख्येनुसार समजा 100 प्रतिनिधी मिळू शकत असतील तर प्रत्यक्षात डिग्रेसिव्ह प्रपोर्शनॅलिटीच्या तत्त्वानुसार 100 ऐवजी 96 प्रतिनिधी मिळतात. तर माल्टा, एस्टोनिया, सायप्रस, लक्झेंबर्ग या लहान देशांना लोकसंख्येनुसार समजा दोनच प्रतिनिधी मिळू शकत असतील तर त्यांना प्रत्यक्षात प्रत्येकी 3 किंवा 4 प्रतिनिधी  जास्त मिळतात. अशाप्रकारे प्रतिनिधींची एकूण संख्या 720 आहे.

मतदान पद्धती

यादी पद्धती(लिस्ट मेथड) - ही पद्धत समजण्यासाठी इटलीचे उदाहरण घेऊ. समजा इटलीतून तीन पक्ष 76 जागी निवडणूक लढवीत आहेत. हे पक्ष निवडणुकापूर्वी प्रत्येकी 76  उमेदवारांची यादी प्रसिद्ध करतील. दर डोयी एक मत याप्रमाणे मतदार पक्षाला मतदान करतात. समजा अ पक्षाला 50 टक्के, ब आणि क पक्षाला प्रत्येकी 25 टक्के  मते मिळाली, तर अ पक्षाचे यादीतील निम्मे म्हणजे पहिले 38 उमेदवार निवडून येतील, आणि ब व क पक्षाचे  प्रत्येकी पहिले 19 प्रतिनिधी निवडून येतील.

सिंगल ट्रान्सफरेबल व्होट - ही पद्धती आपल्या येथे शिक्षक व पदवीधर मतदार संघात वापरतात.                               टीप: प्रत्येक पक्षाला विशिष्ट टक्के मतांचा उंबरठा (थ्रेशशोल्ड) ओलांडावाच लागतो. नाहीतर त्या पक्षाला मिळालेल्या मतांचा विचार टक्केवारी काढतांना  आणि  त्यानुसार जागा वाटपात केला जात नाही. या दोन पैकी कोणतीही एक पद्धती 27 सदस्य राष्ट्रे उपयोगात आणतात. अशा पद्धतीने युरोपीयन युनीयनच्या पार्लमेंटचे 720 सदस्य वर उल्लेख केल्याप्रमाणे निवडून आले आहेत. यात उजव्यांचे प्रभावी अल्पमत (स्ट्रॅांग मायनॅारिटी) आहे. (अपूर्ण) 

  


No comments:

Post a Comment