निर्बीजीकरण आणि वंशविच्छेद? तरीही धर्मबांधव गप्प?
तरूणभारत , मुंबई
रविवार, दिनांक ०२/०६/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
निर्बीजीकरण आणि वंशविच्छेद? तरीही धर्मबांधव गप्प?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
सिनीफिकेशन हे एका प्रक्रियेचे नाव असून यानुसार चिनी नसलेले समाज किंवा गट यांना चिनी संस्कृतीत आत्मसात करून घेणे अपेक्षित आहे. यातून असे समाज किंवा गट भाषा, सामाजिक नियम, संस्कृती आदी बाबतीत मूळ चिनी समाजाशी एकरूप होणे अपेक्षित आहे. गेल्या पाच वर्षांत चीनमध्ये शेकडो मशिदींमध्ये बदल करण्यात आले आहेत. चीन हा तसा अनेक धर्मीयांचा देश आहे. बौद्ध धर्म, ताओवादी, प्रोटेस्टंट, कॅथोलिक आणि इस्लाम यांना मानणारे तर अनेक लोक चीनमध्ये राहतात. बहुसंख्य चिनी मुस्लिमात हुई लोक आणि उईघुर (उघुर) लोक प्रमुख आहेत. चीनमधील बहुसंख्य मुस्लिम देशाच्या वायव्य भागात राहतात, विशेषत: गान्सू, किंघाई, निंग्झिया आणि शिनजियांग या भागात त्यांची वस्ती आहे. या भूभागाचे क्षेत्रफळ 1.6 चौरस मिलियन किलोमीटर किंवा 0.64 मिलीयन चौरस मैल (म्हणजे चीनमधील एकषष्ठांश भाग) आहे. संपूर्ण चीनचे क्षेत्रफळ सुमारे 9.6 चौरस मिलियन किलोमीटर किंवा 3.7 मिलीयन चौरस मैल आहे. आज चीनमध्ये अंदाजे 25 दशलक्ष (अडीच कोटी) मुस्लिम आहेत, ज्यात हुई, उईघुर, कझाक, टाटर आणि इतरांचा समावेश आहे. पण मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर सुन्नी आहे. अंदाजे एक ते तीन दशलक्ष मुस्लिम शिया आहेत. अनेक लहान मुस्लिम गटही अस्तित्वात आहेत अहमदी मुस्लिमांची एकूण संख्या 200,000 ते 400,000 असावी. तर चीनची एकूण लोकसंख्या १४० कोटी आहे.
अरबी शैलीत बांधलेली एकही मशीद आता चीनमध्ये उरलेली नाही. चीनच्या शेवटच्या मोठ्या मशिदीच्या इमारतीमध्ये अनेक बदल करतांना घुमट आणि मिनार काढण्यात आले आहेत. मशिदीच्या इमारतीचे रूपांतर अरबी शैलीतून चिनी वास्तूकलेमध्ये करण्यात आले आहे. मिनार नसलेल्या मशिदींची छायाचित्रे समोर आल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी चीनच्या या कृत्याविषयी संताप व्यक्त केला. भारत किंवा अन्य देशांत असे झाले असते, तर आम्ही आकाश-पाताळ एक केले असते, अशी टीका त्यांनी केली, या बाबीची विशेष नोंद घ्यावयास हवी आहे. पण बातम्यांमध्ये ही छायाचित्रे कुठेही दाखविण्यात आली नसल्यामुळे त्याविषयी जनतेला नीटशी माहिती नाही. पाकिस्तानी नागरिक चीनपेक्षा पाकिस्तान सरकारवरच अधिक उखडले आहेत, हे वृत्तही नोंद घ्यावी असेच आहे. ही घटना चीनशी संबंधित असल्याने त्यावर मौन बाळगण्याचे एक कारण म्हणजे पाकिस्तानचे चीनशी असलेले संबंध अतिशय विशेष आहेत, हे आहे काय? कदाचित आता जगातील चीन असा एकमेव देश आहे, ज्याच्यावर पाकिस्तानचा थोडाफार विश्वास उरला आहे, चीनचाच पाकिस्तानला मोठा आधार आहे, त्यामुळे फारसा आरडाओरडा न करता गप्प बसावे, असा शहाणपणाचा मार्ग तर पाकी सरकारने व मुल्ला मौलवींनी स्वीकारला नाहीना, असा प्रश्नही विचारला जायला सुरवात झालेली दिसते आहे.
चीनसाठी वास्तूत बदल करणे ही नवीन गोष्ट नाही ते तिथे सर्वांना समान बनवण्याचा साचा सर्रास वापरला जात असतो. प्रत्येकाने सारखाच विचार करावा आणि मशीद असो किंवा इतर काहीही का असेना, सर्व वास्तू सारख्याच दिसाव्यात, असे चीन सरकारचे धोरण असे आहे. दुसरे असे की, चीन अशा बातम्या बाहेर येऊ देत नाहीत.
चीनकडून आर्थिक साहाय्य घेत असल्यामुळेच पाकिस्तानी प्रसारमाध्यमे या बातमीबाबत मौन बाळगून आहेत. खरेतर पाकिस्तानचा खरा शत्रू चीनच आहे. भारत हा पाकिस्तानचा शत्रू नाही. भारताकडून पाकिस्तानला कोणताही धोका नाही. उलट भारत आणि पाकिस्तान यांनी गरिबीविरुद्ध लढा उभारला पाहिजे, ही भारताची भूमिका आहे. चीनचा इतिहास असा आहे की, त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. हे मुस्लिमांना समजत नसेल असे नाही. पण न बोलणेच शहाणपणाचे आहे, असे ते मानत असले पाहिजेत. बाकीच्यांचे एकवेळ बाजूला ठेवूया. भारतातील मुस्लिमही याबाबत गप्प असावेत ना? भारतात कुठेकाही खुट्ट झाले की त्यांचा केवढा थयथयाट सुरू होतो? ‘अहो, चीन एक लष्करी आणि आर्थिक महासत्ता आहे, तिच्याविरुद्ध आवाज उठवायचा म्हणजे भलतेच काहीतरी नाही का?’, अशीच भारतासह सर्व मुस्लिमदेशातील मुस्लिमांची भावना तर झालेली नाहीना? मुस्लिम जगाने उघुर लोकांसोबत सर्व काही ठीक चालले आहे अशीच भूमिका कायम ठेवली आहे. मार्च 2019 च्या सुरूवातीला तर, इस्लामिक सहकार्य संघटनेने (ओआयसी) एक ठराव संमत करून आपल्या मुस्लिम नागरिकांची काळजी घेतल्याबद्दल चीनचे कौतुक केले आहे. आता बोला! एवढेच नाहीतर याच सुमारास सौदी अरेबिया, बहारीन, कुवेत, सीरिया, पाकिस्तान, इजिप्त, अल्जेरिया आणि संयुक्त अरब अमीरात या सारख्या अनेक प्रमुख मुस्लिम देशांसह 37 देशांच्या राजदूतांनी एक संयुक्त पत्र प्रसिद्ध करून उघुर वंशाच्या संदर्भातील चीनच्या धोरणांना पाठिंबा दर्शविला होता.
थोडे मागे जाऊया
आजच्या चीनमधील शिझियांग (सिकियांग) राज्यात/प्रांतात गत 2,500 वर्षात डझनावारी राज्ये/साम्राज्ये जन्माला आली, फुलली, फळली व शेवटी लयाला गेली. याहीपेक्षा मागे जातो म्हटले तर महाभारतात या सिकियांग प्रदेशाला ‘तुषार’/‘तुखार’ हे नाव दिलेले दिसते. दिग्विजय यात्रेत अर्जुनाने हा भाग जिंकल्याचेही उल्लेख आहेत. अशा या अतिप्राचीन आणि इतिहासप्रसिद्ध पण विद्यमान चिनी भागात सुरू असलेले चीनचे सक्तीचे प्रयोग सध्या विकोपाला गेले आहेत. ते समजण्यासाठी नजीकच्या मागील काळात जावे लागणार आहे. मुळात मध्य आणि पूर्व आशियात उघुर नावाचा एक तुर्कीक वांशिक गट होता/आहे, ह्यातील बहुतेक लोक आज धर्माने मुस्लिम आहेत. चीनमधील शिझियांग (सिकियांग) नावाच्या राज्यात उघुर लोकांची वस्ती जास्त प्रमाणात असून त्यांचा एक स्वायत्त विभागच चीनमध्ये आहे. चीनमध्ये उघुरांना वांशिक अल्पसंख्यांक म्हणून मान्यता आहे. पण ते मूळ निवासी आहेत, असे काही चीन मानत नाही. या प्रदेशात उघुर अल्पसंख्यांक आहेत, एवढेच चीन मानतो. उघुरांची भूमिका मात्र नेमकी उलट आहे. चीनमध्ये वायव्य दिशेला असलेल्या या शिझियांग (सिकियंग) राज्याच्या सीमा जशा चीन या मुख्य देशाला लागून आहेत, तशाच त्या मंगोलिया, कझखस्थान, किरगिझस्थान आणि अफगाणिस्थान या देशांनाही लागून आहेत. या सीमावर्ती भागातील सर्वच देशात उघुरांची संख्या अर्थातच जास्त आहे आणि ते स्वाभावीकच आहे. या राज्यात जवळजवळ 15 लाख उघुर लोक राहतात. संपूर्ण जगाचा विचार करायचा झाला तर, रशियात त्यांची संख्या 4,000, तुर्कस्थानात 10,000, उझबेकिस्थानमध्ये 37,000 आहे. दूर अमेरिकेतही 1000 उघुर आहेत. अगदी बारीक शोध घ्यायचा झाला तर, तर उघुर लोक ॲास्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, स्वीडन, अफगाणिस्तान, नॅार्वे, बेल्जियम, नेदरलंड व सौदी अरेबियातही रहात आहेत पण तिथे त्यांची संख्या अत्यल्प/नगण्य आहे.
तुर्कीक भाषा बोलणाऱ्या या उघरांना आजवर जवळजवळ सर्वच देशांनी निर्दयपणे वागवले अशा नोंदी इतिहासात सापडतात. पण याचा अर्थ असाही नाही की, उघुर स्वत: अगदी धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ आहेत. उघुरांचा असा दावा आहे की, शिनजियांग प्रदेश हा चीनचा भागच नाही आणि 1949 मध्ये त्याचा चीनमध्ये बेकायदेशीरपणे समावेश केला गेला. उघुर कट्टरपंथीयांकडून दहशतवादी कृत्ये केल्याच्या बातम्या चिनी मीडियामध्ये येत आहेत. राजकारणात त्यातही जागतिक राजकारणात तर असा ‘बिचारा’ क्वचितच कुणी सापडेल. पण आज त्यांची चीनमध्ये ससेहोलपट होते आहे, ही मात्र वस्तुस्थिती आहे. तुर्कीक भाषेत दोन प्रमाण भाषा असल्याचे मानले जाते. बोली तर अनेक आहेत. असे भेद असले तरी उघुर बोली बोलणाऱ्यांना एकमेकांचे बोलणे समजते. मध्य आशियात प्रामुख्याने वास्तव्य असलेल्या या उघरांनी मंगोल सेनेत सहभागी होऊन एकेकाळी चीन व मध्यपूर्वेत शौर्य गाजवले आहे. मंगोल दरबारात तर उघरांना मानाच्या जागा मिळत असल्याचीही नोंद आहे.
चीनमध्ये मुस्लिम अल्पसंख्य असून त्यांची टक्केवारी जवळजवळ 3% इतकीच आहे. तशी चीनमध्ये इस्लामचा शिरकाव होऊन 1400 वर्षे झाली आहेत. त्यातही हुई मुस्लिम बहुसंख्य आहेत. ते मुख्यत: शिझियांग (सिकियांग) राज्यात असून इथे मात्र उघर मुस्लिमांची संख्या जास्त आहे. मुस्लिमांमध्येही सुन्नींचे प्रमाण जास्त असते. तसे ते उघुरांमध्येही सुन्नींची संख्या शियांपेक्षा जास्त आहे. चीनमध्ये अल्पसंख्यांकांचे तसे एकूण 55 गट असून त्यातले 10 सुन्नी आहेत.
प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला जुना ‘सिल्क रूट’ वापरणाऱ्या व्यापाऱ्यात मुस्लिमांचे प्रमाण बरेच होते. या मार्गाने केवळ व्यापारी देवघेवच झाली असे नाही तर धर्म, संस्कृती व श्रद्धांचाही प्रसार झालेला आढळतो. या मार्गावर युद्धे जशी झाली तशी राजकीय देवघेवही झालेली आढळून येते. ती जशी धर्मासाठी झाली तशीच ती राजकीय कारणांसाठीही झाली आहे.
आपले स्वतंत्र राज्य असावे
चीन, मंगोलिया, कझखस्थान, किरगिझस्थान आणि अफगाणिस्थान यांच्या सीमा शिझियांग राज्याला स्पर्श करतात. अशा प्रकारे जेव्हा अनेक देशांच्या सीमा एकमेकींना स्पर्श करीत असतात, तेव्हा त्या त्या भागात तणावाचे वातावरण निर्माण होणे, ही एक स्वाभावीक घटना असते. तीच स्थिती याही बाबतीत आहे. येथील उघरांच्या मनात आपले स्वतंत्र राज्य असावे, अशी सूप्त भावना आहे. त्यामुळे या सर्वच देशात त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते व ते बदडले जात आहेत. चीनमध्ये सध्या हा चिनी व उघेर संघर्ष विकोपाला जाण्याचे हे प्रमुख कारण आहे. कारण शिझियांग (सिकियांग) राज्य बरेच मोठे आहे. एखाद्या राज्यात चीनपासून फुटून निघण्याचा विचार होत असेल ते चीनला सहन होणे शक्यच नाही.
चीनमधील संस्कार छावण्या
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार आज चीनमध्ये एकूण 10 लाख उघर अटकेत असून त्यांच्या पुनर्शिक्षणाचा कार्यक्रम चीनने हाती घेतला आहे. त्यासाठी छावण्याही उभारण्यात आल्या आहेत. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या तत्त्वांचे ‘संस्कार’ त्यांच्यावर या छावण्यात केले जात असतात. चीनचा हा ‘गोपनीय’ कार्यक्रम उजेडात आणण्याच्या बाबतीत शोधपत्रकारितेने महत्त्वाची भूमिका बजावून सर्व तपशील उघड केला आहे. त्यानुसार उघरांचे प्रशिक्षण 12 महिनेपर्यंत चालते. त्यात कुणाची प्रगती (?) किती झाली, कुणात किती सुधारणा (?) झाली, याचा आढावा घेतला जातो. प्रगती किती झाली हे तपासण्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. समाधानकारक प्रगती असणाऱ्यांनाच छावणीतून परत घरी जाण्याची अनुमती चिनी सरकार देत असते. प्रशिक्षणार्थी आठवड्यातून एकदाच कुटुंबीयांशी फोनवर बोलू शकतात. संयुक्त राष्ट्रांच्या मानव हक्क समितीने हा प्रशिक्षण कार्यक्रम थांबवून सर्वांची सुटका करावी, असे चीन सरकारला सांगितले असून छावण्याही बंद करा असेही म्हटले आहे. या सर्व प्रकारांकडे अमेरिका दुर्लक्ष करणार नाही. उघरांच्या बाबतीत मानवी हक्कांचे उल्लंघन अमेरिका सहन करणार नाही, असे अमेरिकेच्या वतीनेही जाहीर करण्यात आले आहे. पण याबाबत अनुकूल भूमिका घेईल तर तो चीन कसला?
उघुर ह्यूमन राईट्स पॅालिसी ॲक्ट
या संबंधातील, उघुर ह्यूमन राईट्स पॅालिसी ॲक्ट, अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत (हाऊस ॲाफ रिप्रेझेंटेटिव्हज) प्रचंड बहुमताने पारित झाला आहे. पण अमेरिकेच्या या भूमिकेमुळे चीनचा अक्षरश: तिळपापड झाला असून, प्रत्यक्षात आम्ही उग्रवाद व अलगाववाद संपवण्याचा प्रयत्न करीत असतांना, अमेरिकेने ही अशी भूमिका घ्यावी व आमच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ करावी याबद्दल चीनने अमेरिकेचा निषेध केला आहे. याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असे बजावण्यासही चीनने कमी केलेले नाही.
याचा स्वाभाविक परिणाम असा झाला आहे की, अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्ष सुद्धा आणखी चिघळला आहे. या अगोदरच चीन व अमेरिका यात गेल्या अनेक महिन्यांपासून व्यापार युद्ध पेटले असून, उभय देशांनी एकमेकांच्या मालावरील आयात शुल्क खूपच वाढविले आहे.
चीनकडे प्रचंड पैसा आहे, त्यामुळे चीनला कर्ज देऊ नये, अशी मागणी अमेरिकेने जागतिक बँकेकडे केली आहे. जागतिक बँकेने चीनला कर्ज देण्याऐवजी इतर गरीब देशांना कर्ज द्यावे,अशी भूमिका अमेरिकेने घेतली आहे. हा प्रस्ताव जागतिक बँकेने स्वीकारला आहे.
चिनी सरकार शिनजियांगमधील उघुरांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे त्यांचा छळ करीत आहे. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी महिलांचे निर्बीजिकरण करीत आहे, त्यांच्यावर बलात्कार केला जातो आहे. त्यांचा वंशविच्छेद होतो आहे. हा छळ किंवा नरसंहाराचाच प्रकार मानला पाहिजे, असे प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. उघुरांना वेगळे विचार स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे, त्यांचे विचार परिवर्तन घडवून आणले जात आहे (ब्रेनवॉश). आमुलाग्र मतपरिवर्तन किंवा वृत्तीतील बदल करून व्यक्तीला नवीन व्यक्तिमत्त्व देण्याचाच हा आहे. हे सर्व आरोप चीनने सपशेल फेटाळले असले तरी त्यावर कुणीही विश्वास ठेवण्यास तयार नाही. उघुर नावाच्या मानवसमूहाच्या बाबतीतला चीनचा व्यवहार हा निंद्य, आक्षेपार्ह आणि मानवतेला काळीमा फासणारा आहे, असेच मुस्लिमेतर जग मानते आहे आणि मानत राहणार आहे, हे नक्की. पण मग मुस्लिम जग अशी मुलखावेगळी भूमिका का घेत आहे? राजकीय, धार्मिक आणि वैचारिक भूमिकांपेक्षा आर्थिक हितसंबंधच सर्वोच्च असतात, हेच यावरून सिद्ध होत नाही का? ‘अर्थेन दासता’, हेच खरेतर!!
No comments:
Post a Comment