Monday, May 27, 2024

 विळख्यातल्या इस्रायलचे प्रत्युत्तर (लेखांक 1 ला)

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

 इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी हे हेलिकॉप्टरने अजरबैजानमधून परतत असतांना त्यांचा मृत्यू  झाला. हा घातपात आहे आणि यासाठी इस्रायल जबाबदार की अमेरिका, की दोघेही यावर उलटसुलट वार्ता कानी पडत आहेत. याचा सद्ध्या सुरू असलेल्या युद्धावर काय परिणाम होतो, ते युद्ध कोणते वळण घेते ते लवकरच स्पष्ट होईल. ‘हमास’ने गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये 7 ऑक्टोबरला इस्रायली नागरिकांवर केलेल्या अमानुष हल्ल्यानंतर शेकडो (250?) नागरिकांना आणि सैनिकांना ओलीस म्हणून नेले, त्यातल्या काहींची नंतर सुटका केली, काही मरण पावले आणि काही अजून अज्ञातस्थळी कैदेतच आहेत. इस्रायलने आता प्रत्युत्तरादाखल अख्या गाझापट्टीतील हमास समर्थकांना नेस्तनाबूत करण्याचा जणू चंगच बांधला आहे, असे दिसते. पण या हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचाही बळी जातो आहे, हे एक  दारूण सत्य आहे. यानंतर गाझामध्ये आपली किंवा आपल्याला अनुकूल असलेली किंवा आपल्या नियंत्रणाखालील एक शासनव्यवस्था उभी करायचीच असा चंग इस्रायलने बांधलेला दिसतो आहे. हमासने ओलीस ठेवलेल्या निरपराध नागरिकांना सोडले असते तर चर्चेनंतर  काही मार्ग निघू शकला असता. ते हमासने केले नाही, हे गैरच.  पण म्हणून ‘हमास’ला धडा शिकवताना निरपराध नागरिक, त्यांना  मदत करणारी पथके, पत्रकार यांचा बळी जाणे थांबू नये, हे मानवाचे दुर्दैव आहे. दोन्ही महायुद्धात हे प्रकर्षाने घडले आहे. निरपराध्यांचे बळी तेव्हाही थांबले नव्हते. ते थांबवणे आजही साधलेले नाही. ते पुढे कधी शक्य होईल का, हेही सांगता यायचे नाही.

वैरी झाला सखा 

  आज जरी इस्रायल आणि इराण या दोन राष्ट्रात युद्ध भडकले असले तरी हे दोन देश 1979 सालापर्यंत एकमेकांचे चांगले मित्र होते. इस्रायलची स्थापना झाल्यानंतर त्याला मान्यता देणाऱ्या काही पहिल्या देशांमध्ये इराण होता. 1947 मध्ये पॅलेस्टाईनचे दोन तुकडे करण्याचा निर्णय युनोने घेतला आणि ज्यूंना 55% भूभाग देऊन इस्रायलची तर अरबांना 45% भूभाग  देऊन पॅलेस्टाईनची निर्मिती केली. जेरुसलेम हे ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम धर्मीयांसाठी पवित्र असलेले शहर मात्र संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली ठेवले.  त्यावेळी सगळे अरब व इस्लामी देश इस्रायलच्या विरुद्ध असताना धर्मनिरपेक्ष, मवाळ आणि पुरोगामी विचारांच्या फक्त शाह मोहंमद रझा पहलवी यांच्या नेतृत्वाखालील इराण हा शियापंथी मुस्लिम बहुसंख्य देश इस्रायलच्या बाजूने उभा होता. शाह मोहम्मद रजा  पहलवी यांची  16 सप्टेंबर  1941 ते 11 फेब्रुवारी 1979 पर्यंत इराणवर सत्ता होती. नंतर क्रांती झाल्यामुळे त्यांना इराणमधून बाहेर पडावे लागले. इस्रायलने शाह मोहम्मद रजा पहलवी यांच्या कार्यकाळात इराणला विशेषतहा  कृषी आणि लष्करी क्षेत्रात मदत केली. इराणने याच्या मोबदल्यात इस्रायलला खनीज तेल देऊन परतफेड केली. त्यावेळी जगातील निरनिराळ्या देशात ज्यू रहात होते. इस्रायलनंतर सर्वाधिक ज्यू तर  इराणमध्ये होते. पण 1980 साली आयोतुल्ला खोमेनी या शियापंथीयच पण कट्टर धार्मिक नेत्याने  इराणमध्ये इस्लामिक क्रांती घडवून आणली आणि ज्यूधर्मीय इस्रायलला आपला शत्रू घोषित करून नष्ट करण्याची प्रतिज्ञा केली. 

हिजबुल्लाच्या निर्मितीमागचे कारण

   इराण आणि इस्रायल यांच्या  सीमा एकमेकींना स्पर्श करीत नाहीत. दोन्ही देशांच्यामध्ये लेबनान, सीरिया, इराक आणि सौदी अरबिया हे देश आहेत. त्यामुळे दोन्ही देश एकमेकांपासून निदान एक हजार किलोमीटर दूर आहेत. अर्थातच त्यांच्यात थेट युद्ध होणे शक्य नाही. यावर उपाय म्हणून इराणने शियापंथीयांची हिजबुल्लासारखी लष्करी संघटना तयार करून ती लेबनॉन व सीरियात ठेवली व तिच्यामार्फत इस्रायलवर हल्ले करण्यास सुरुवात केली. कारण ऐंशीच्या दशकात इराणकडे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे नव्हती, त्यावेळी इस्रायलनेही इराणच्या सीरिया, लेबनॉनमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून गेल्या चार दशकांहून अधिक काळ या दोन्ही देशांचे एकमेकांवर असे दुरूनच हल्ले सुरू आहेत. हिजबुल्ला (अल्ला यांचा पक्ष) ही शियापंथी मुल्लिमांची राजकीय संघटना आहे. यातला एक गट अतिरेकी (मिलिटंट) आहे. 1992 पासून या गटाचे नेतृत्व लेबनीज धर्मगुरू हसन नसरुल्लाकडे आहे. याचा जन्म शिया कुटुंबात लेबॅनॅानची राजधानी बैरूटमध्ये 1960 मध्ये झाला. ही हिजबुल्लाची  जिहादी शाखा आहे.  राजकीय गट लॅायल्टी टू दी रेझिस्टंट ब्लॅाक पार्टी या नावाने लेबॅनॅानच्या संसदेत ओळखला जातो. हिजबुल्लाच्या जिहादी शाखेने हमासला पाठिंबा म्हणून इस्रायलवर रॅाकेट व ड्रोन यांच्या सहाय्याने मारा सुरू केला. पण हमासप्रमाणे इस्रायलच्च्या सीमा मात्र ओलांडल्या नाहीत. इस्रायलनेही हिजबुल्लाच्या हल्ल्याला चोख उत्तर दिले.

हूती बंडखोर 

    येमेनच्या हूती बंडखोरांनी तुर्कस्तानहून भारताकडे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाचे, ते इस्रायलचे जहाज आहे असे समजून लाल समुद्रात अपहरण केले. ओलीस म्हणून ठेवलेल्या जहाजावरील एकूण २५ कर्मचाऱ्यांमध्ये एकही भारतीय नागरिक नव्हता.  हे इस्रायली जहाज असल्याचे हूतींनी सांगितले. परंतु, इस्रायलने हा दावा ठामपणे नाकारला. जहाजाच्या मालकांपैकी एक इस्रायली होता, एवढेच. जहाजाचे नाव ‘गॅलेक्सी लीडर’ असून ते भारताच्या दिशेने येत होते. अशाप्रकारे सना या येमेनच्या राजधानीतील हूतींनी इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात स्वतंत्रपणे प्रवेश केला, त्यांनी इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. 

 हूती ही येमेनच्या सुन्नी शासनाविरोधात शिया मुस्लिमांमधील  झायदी नावाच्या गटाने चालवलेली चळवळ आहे. हूती ही एक  दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाते. सहाजीकच शियापंथी हूतींना शियाबहुल  इराणचा पाठिंबा आहे.  येमेनच्या उत्तरेकडील भागात या हूतींचे मूळ निवासस्थान आहे. ‘झायदी’ गटाचे एकेकाळी येमेनवर राज्य होते. पुढे ते लयाला गेले. 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात हूतींनी ‘झायदी’ शाखेच्या  पुनरुत्थानासाठी चळवळ सुरू केली. मुस्लिमांध्ये सुन्नी बहुसंख्य आहेत, शिया अल्पसंख्य आहेत. या अल्पसंख्यामध्येही झायदा अत्यल्पसंख्य आहेत. थोडक्यात असे की झायदा हा शियापंथी मुस्लिमांमधला अति चिमुकला गट आहे. या शियापंथी गटाला इराणने  हाताशी धरून भरपूर लष्करी आणि आर्थिक मदत केली सप्टेंबर 2014 मध्ये तर हूतींनी येमेनची राजधानी असलेले सना शहर ताब्यात घेतले होते आणि 2016 पर्यंत उत्तर येमेनच्या बर्‍याच भागावरी हूतींचा अंमल होता. आज इराणचे इस्रायलशी वैर असल्यामुळे हूतीही इस्रायलच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तसेच 2003 मध्ये  अमेरिकेने  शियापंथी इराकवर हल्ला केला होता तेव्हापासूनही हूती अमेरिकेच्या आणि अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या इस्रायलच्या विरोधात गेले आहेत.  

सुन्नीपंथी हमास 

   हमास ही पॅलेस्टाईनमधील सुन्नींपंथीयांची इस्रायलच्या विरोधात काम करणारी इस्लामिक चळवळ आहे. 1987 साली या संघटनेची स्थापना झाली. सुन्नीपंथीय आणि शियापंथीय यांच्यातून विस्तव जात नाही असे असूनही हमास या सुन्नीपंथीय संघटनेला शियापंथीय इराणचा पाठिंबा आहे. राजकारणात फक्त हितसंबंधांना प्राधान्य असते, याचे उदाहरण म्हणून हे दाखवता येईल. हितसंबंधांना प्राधान्य देत हाडवैरीही एकमेकांचे दोस्त कसे बनतात, अशी अनेक उदाहरणे जगाच्या इतिहासात दाखविता येतात. 


No comments:

Post a Comment