Monday, May 20, 2024

 भारतातील निवडणूक आणि पाश्चात्य वृत्तसृष्टीचे विषवमन 

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २१/०५/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

   भारतातील निवडणूक आणि पाश्चात्य वृत्तसृष्टीचे विषवमन  

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

   सद्ध्या भारतातील विरोधी पक्षांनी मोदींबाबत जी बेछुट विधाने करण्यास सुरवात केली आहे, त्याचे पडसाद पाश्चात्य वृत्तसृष्टीत उमटलेले दिसतात. मोदींना विरोधकांनी ज्या शंभरावर शिव्या दिल्या आहेत, त्यांची नोंद मात्र पाश्चात्य वृत्तसृष्टीतील अनेक पत्रकार घेतांना दिसत नाहीत. तसेच जर भारतात खरेच त्यांना वाटते तशी विपरीत परिस्थिती असती तर विरोधक अशाप्रकारे शिव्यांची लाखोली वाहू शकले असते का, असा साधा प्रश्नही त्यांना पडलेला दिसत नाही. तसेच मोदींचे अमेरिका, ब्रिटन आदी राष्ट्रांशी अतिशय स्नेहाचे संबंध आहेत पण तेथील प्रसार माध्यमे वेगळाच राग का आळवत आहेत हेही अनेकांना पडलेले एक कोडेच आहे.   न्यूयॅार्क टाईम्सने गेल्या महिन्यातील एका लेखात पुढील प्रमाणे भाष्य केले आहे. लेखाचे शीर्षक आहे ‘मोदींची शक्ती वाढतेच आहे’(मोदीज पॅावर कीप्स ग्रोईंग) या लेखात म्हटले आहे की, ‘भारतात मताधिकार पवित्र (सेक्रेड) मानला जातो. प्रक्षुब्ध (टर्ब्युलंट) वातावरणातही भारतातील लोकशाहीने जनतेला संरक्षण दिले आहे. पण (आज) भारतीय जनता आपल्या नागरी अधिकारांचा संकोच होत असतांनाही, कामे करवून घेण्याची क्षमता असलेल्या, (गेटिंग थिंग्ज डन)  नेत्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहत आहे.

   ब्लूमबर्ग न्यूज ही न्यूयॉर्क शहरात मुख्यालय असलेली एक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आहे. या वृत्तसंस्थेचा स्तंभ लेखक काय म्हणतो ते पहा. ‘हिंदूराष्ट्र किंवा ए नेशन स्टेट संकल्पनेला उत्तर भारतात चांगला पाठिंबा मिळतो आहे. पण दक्षिण भारतात मात्र यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदूराष्ट्रवाद ही उजवीकडे झुकलेली राष्ट्रवादी चळवळ आहे.’

  ब्रिटनच्या फायनॅनशियल टाईम्सच्या संपादकाने  ‘एक्स’ (पूर्वीचे ट्वीटर) मध्ये जे लिहिले आहे त्याचा आशय असा आहे. ‘ही भारतातील शेवटची निवडणूक असेल का? मोदींनी सर्व लवचिक (प्लायेबल) यंत्रणांचा वापर करून जबरदस्तीने टीकाकारांना शांत केले आहे, विरोधकांना तुरुंगात टाकले आहे, ही बाब भारताबाहेर फारशी मांडली जात नाही. मोदींचा धाक ऑर्बनच्या शंभरपट आहे. व्हिक्टर ऑर्बन हे हंगेरीचे पंतप्रधान असून ते हुकुमशाही वृत्तीचे आणि लोकशाहीतील यंत्रणांच्या अधिकारांवर मर्यादा घालणारे म्हणून ओळखले जातात.’ हे विधान करतांना ते भारतातील विरोधी पक्षांची री ओढताहेत, हे स्पष्ट आहे.  

  वॅाशिंगटन पोस्टही असाच राग आळवत असते. याच्या जोडीला ते कॅनडा आणि अमेरिकेतील खलिस्तानी म्होरक्यांच्या हत्येला भारत कारणीभूत असल्याचे सुचवीत असतात.

  भारताचे सडेतोड उत्तर 

  भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी अशा विपर्यस्त विधानांचा आणि आरडाओरडीचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘ते आमच्या देशातील लोकशाहीवर टीका करतात, याचे कारण त्यांना या देशातील  वस्तुस्थिती माहिती नाही, असे नाही. खरे कारण हे आहे की, तेही विरोधकांसोबत भारतातील निवडणुकीत सहभागी झाले आहेत. येथील कमी मतदानावर टीका करतांना ते विसरतात की हे मतदान त्यांच्याकडील महत्तम मतदानापेक्षाही अनेकदा जास्त राहिले आहे. पाश्चात्य माध्यमे भारतातील निवडणुकीत एवढा रस का बरे घेत  आहेत? याचे उत्तर गार्डियनमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात आढळते. या लेखात म्हटले आहे की, भारताचे राजकीय पटलावरील महत्त्व आता अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या बरोबरीत आले आहे. या देशांनी भारताशी असलेले आपले संबंध अधिक दृढ करीत आणले आहेत. या देशांना जगातील चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालायचा आहे. गार्डियनने भारतातील मोठ्या निवडणुकीच्या प्रचंड स्वरुपाची दखल घेत नोंदविले आहे की, या निवडणुकीत भाजप विजय संपादन करणार आहे.

   जगातील एकमेव घटना 

  भारतात सद्ध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्व विश्व या निवडणुकीकडे उत्सुकतेने, कुतुहलाने आणि आश्चर्याने पाहत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते आहे. ‘2024 मध्ये भारताच्या लोकसभेचे 543  सदस्य निवडण्यासाठी ही  निवडणूक होत आहे. 

  खरेतर ही जगातील सर्वात भव्य अशी घटना  आहे.  ती विविधता आणि लोकशाहीयुक्त आचरणाने  पार पडते आहे. या निवडणुकीत 97 कोटी भारतीय सहभागी होत आहेत. भारताच्या प्राचीन सभ्यतेला भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्याच्या बाबतीतला  आपला वाटा भारतीय उचलत आहेत. यात मोदी म्हणतात त्याप्रमाणे  केवळ भारतीयांचेच हित सामावलेले आहे, असे नाही, तर सर्व विश्वही या निवडणुकीकडे आशेने आणि अपेक्षेने पाहत आहे. यामागे एक कारण आहे, ते असे की, भारताच्या पाकिस्तान, चीन आणि म्यानमार यासारख्या शेजारी राष्ट्रांकडे लक्ष गेले की, एक घटना विशेष उठून दिसते. तिथे सर्वत्र अस्थिरता आहे. हिंसाचार उफाळला आहे. भारताला आपला विकास साधायचा आहे आणि त्याचवेळी दहशतवादाशीही लढायचे आहे. जगात क्वचितच कुठे अशी स्थिती आढळेल.  ही आव्हाने आणि असे शेजारी असतांना भारतात या निवडणुका होत आहेत. याशिवाय असे की, इतकी विविधता असलेला देश जगाच्या पाठीवर क्वचितच कुठे असेल. अनेक भाषा, अनेक उपासना पद्धती, सांस्कृतिक वेगळेपणा या सर्वांची भारतात भरभराटही होते आहे.

 भारत हे हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मांचे उगमस्थान आहे. बहुतेक मुस्लीम राष्ट्रांच्या लोकसंख्येपेक्षा  भारतात राहणाऱ्या मुस्लीमांची संख्या जास्त असून ते तुलनेने अधिक सुखी आणि सुरक्षित आहेत. आहेत. ख्रिश्चन धर्म भारतात 2000 वर्षांपासून आहे. रोमन लोकांनी ज्या ज्यू लोकांची हत्या केली त्यांचे दुसरे मंदीर  जाळले तेव्हापासून ज्यू लोक आपल्या धर्मस्थानांसह  भारतात वास्तव्य करून आहेत. भारताने चीनच्या विरोधाची चिंता न करता दलाई लामांना आश्रय दिला आहे. भारतात तिबेटी लोकांचे निर्वासित सरकार वावरते आहे. पर्शियातून परागंदा झालेले झोराष्ट्रीयन भारतात सुखैनेव नांदत आहेत. अनेक अमेरिकन, ब्रिटिश आणि अशाच कुणीकुणी निवासासाठी भारताची निवड केली आहे.  भारतात तीन मुस्लीम अध्यक्षपदी निवडून आले आहेत. एक शीख पंतप्रदानपदी होते. तर एक मूळची इटालीयन कॅथोलिक महिला सत्ताधारी पक्षाची प्रमुख होती. एक अध्यक्ष महिला होती. एक मुस्लीम वैज्ञानिक शास्त्रज्ञ भारताचा अध्यक्ष तर होताच पण तो आजही एक अलौकिक महापुरुष मानला जातो.

  सद्ध्या भारताच्या अर्थव्यवस्थेची भरभराट होत असून 40 कोटी लोकांना भारताने दारिद्र्यातून बाहेर ओढून काढले असून लवकर निम्मे भारतीय मध्यमवर्गीय असतील. भारतातील चित्रसृष्टी, कलाक्षेत्र, आर्थिक विकास आणि मतदान यात सकारात्मकता   आणि चैतन्य प्रकट होतांना दिसते आहे. विश्वास बसणार नाही अशी आव्हाने  आणि कठीण परिस्थिती समोर उभी ठाकली असतांनाही आज भारतात लोकशाहीतील महान उत्सव संपन्न होत आहे !

  आज सर्व बडी राष्ट्रे जगात आपला प्रभाव वाढावा म्हणून स्पर्धेत गुंतलेली असतांना भारतीय मतदार  स्वहितासोबत विश्वाचेही कल्याण साधण्यासाठी मतदानात सहभागी होत आहेत.    भारताच्या संसदेच्या प्रवेशद्वारावरचे उपनिषदातील वचन याची साक्ष अख्या जगाला करून देत असते. 

  अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् । 

उदारचरितानां तु वसुधैव कुतुम्बकम् ॥ 

 महाउपनिषद   VI.71-73 अध्याय 6 

  ‘हा माझा, हा परका असा विचार कोत्या मनाची माणसे करतात; परंतु उदार मनाची माणसे मात्र संपूर्ण विश्वाला आपले कुटुंब मानतात.’ 

हा मूळ महाउपनिषदातला श्लोक भारतीय लोकशाहीने प्रारंभापासून आपल्या उराशी कवटाळून धरला आहे. पण देशातील आणि देशाबाहेरील मोदीद्वेष्ट्यांना त्याचे महत्त्व कळू नये, यात आश्चर्य ते काय?


No comments:

Post a Comment