युक्रेनप्रकरणी डाव प्रतिडाव
तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक १४/०५/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
युक्रेन प्रकरणी डाव-प्रतिडाव
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
युक्रेनप्रकरणी डाव प्रतिडाव
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर 440 022 मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी अमेरिकेला नुकतीच धमकी दिली आहे की, जर अमेरिकन फौजा युक्रेनच्या मदतीला धावल्या तर रशिया न्युक्लिअर युद्ध सुरू करण्यास मागेपुढे पाहणार नाही. तर दुसरीकडे युक्रेनने म्हटले आहे की, जर अमेरिकेसह इतर पाश्चात्य राष्ट्रांनी (नाटो) युक्रेनला वेळीच मदत केली नाही आणि त्यामुळे आमचा युद्धात टिकाव लागला नाही तर केवळ आमचाच पराभव होईल, असे नाही, इतर राष्ट्रांचीही यादी तयार आहे. युद्धविषयक तज्ञांनी इशारा दिला आहे की, असे जर घडले तर अणुयुद्धाची झळ जगातील 300 कोटी लोकांना सोसावी लागेल.
यापूर्वी पुतिन म्हणाले होते की, ‘लगेचच अणुयुद्ध सुरू होईल, असे नाही. अमेरिकेला पक्के ठावूक आहे की, त्यांनी युक्रेनमध्ये जर फौजा पाठविल्या तर त्यांची ही कृती आक्षेपार्ह ढवळाढवळ मानली जाईल. म्हणून युक्रेनमध्ये आण्विक शक्तीचा वापर करावा लागेल, अशी शक्यता मला दिसत नाही. तरीही आपण सर्वप्रकारचे युद्धसराव करीत तयारीत असलेले केव्हाही चांगले.’
पुतिन यांचे हे उद्गार रशियातील निवडणुकीच्या निमित्ताने केलेल्या भाषणातले होते. पाश्चात्य राष्ट्रांनी बहिष्कार टाकलेल्या भव्य समारंभात, 7 मे 2024 ला पुतिन यांनी अध्यक्ष या नात्याने पदग्रहण केले आहे. पण हे जुने भाषण त्यांचे स्वगत आहे, असे अनेक मानतात. एका महाबलाढ्य राष्ट्रप्रमुखाच्या मनाचा मागोवा या उद्गारातून घेता येतो, तो असा की, तशीच वेळ आली तर रशिया कोणत्या थराला जाऊ शकेल. सुरवातीला युक्रेनयुद्ध एवढ्या विकोपाला जाईल असे कुणालाही वाटले नव्हते. तेव्हा रशिया युक्रेनचा हवा तेवढा लचका तोडेल आणि युद्ध थांबेल, असे भाकीत करणारे काही कमी नव्हते. पण युक्रेन रशियाच्या अपेक्षेपेक्षा बराच टणक निघाला आणि पाश्चात्य राष्ट्रेही त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. सहाजीकच युद्ध रेंगाळले आणि आता तर ते निकराला येते आहे किंवा कसे असे वाटू लागले आहे.
सामंजस्य कसे निर्माण होते?
आज अनेकांना 1962 हे वर्ष आठवते आहे. या वर्षी रशियाच्या चार सबमरीन्स अटलांटिक महासागरातून अमेरिकेपासून केवळ 90 मैलावर असलेल्या क्युबा नावाच्या बेटाच्या दिशेने जबरदस्त शक्तिशाली न्युक्लिअर टारपेडो मिसाईल्ससह मार्गस्थ झाल्या होत्या. गुप्तता राखण्यासाठी या सबमरीन्स खोल समुद्रातून प्रवास करीत होत्या. तरीही या सबमरीन्स अमेरिकेच्या टेहळणी करणाऱ्या विमानांच्या नजरेला पडल्याच.
दुसरे महायुद्ध संपताच सोव्हिएट रशियाचा साम्यवादी प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेने रशियावर निर्बंध तर घातले होतेच शिवाय नाटोसारखी मोठी संघटनाही स्थापन केली होती. रशिया जवळच्या इटली आणि तुर्कीसारख्या राष्ट्रात अमेरिकेने अण्वस्त्रे नेऊन ठेवली होती. काही मिनिटातच मास्कोवर हल्ला करता यावा यासाठी ही तजवीज होती. तोडीस तोड म्हणून क्युबाशी संधान बांधून जर क्युबामध्ये आपण अण्वस्त्रे नेऊन ठेवली तर अमेरिकेला मात देता येईल असा विचार करून आखलेल्या योजनेनुसार रशियाच्या सबमरीन्स अमेरिकेच्या दिशेने कूच करीत होत्या. याच सबमरीन्सचा सुगावा अमेरिकेला लागला होता. यामुळे तोपर्यंत सुरू असलेले शीतयुद्ध एकदम अण्वस्त्र युद्धाइतके तापले. पण शेवटी दोन बलाढ्य राष्ट्रे एकमेकासमोर ठाकली की गुगुरण्यानंतर जे होते तेच यावेळी घडले. अमेरिकेने इटली आणि तुर्कीमधली अण्वस्त्रे काढून घ्यावीत आणि सबमरीन्सनी रशियाच्या दिशेने परत फिरावे, असे उभयपक्षी ‘सामंजस्याने’ ठरले आणि अणुयुद्धाचे ढग विरून जगाने सुटकेचा निश्वास टाकला.
युक्रेन युद्धामुळे अमेरिका आणि रशिया यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. अमेरिकन फौजा युक्रेनच्या बाजूने युद्धात उतरल्या तर खबरदार, असा सज्जड दमच रशियाने अमेरिकेला दिला आहे. असे कराल तर न्युक्लिअर युद्धाला तयार रहावे लागेल, ही पोकळ धमकी नाही, हे आता जगालाही उमगले आहे.
2024 अमेरिकेत निवडणूक वर्ष
या युद्धाला सुरवात होऊन तशी आठ वर्षे होत आली आहेत. आज युक्रेनच्या एकपंचमाश भागावर रशियाने ताबा मिळविला आहे. 2024 च्या शेवटी अमेरिकेत अध्यक्षासह सर्व पदांच्या निवडणुका होणार आहेत. या काळात अमेरिका शक्यतो कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलणार नाही. कारण तसे केल्यास निवडणुकीत सहभागी असलेला प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्ष अमेरिकेतील वातावरण सत्तारूढ डेमोक्रॅट पक्षाविरोधात भडकवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अमेरिका वगळून उरलेल्या पाश्चात्य राष्ट्रांवरच रशियाला थोपवून धरण्याची वेळ आली आहे. ही संधी साधली नसती तर तो रशिया कसला? रशियाने आणखी लाखभर सैनिकांना तर युद्धात उतरवलेच आणि त्याच बरोबर आघाडीवर ठिकठिकाणी निर्माण झालेला शस्त्रांचा तुटवडाही त्वरेने दूर करीत आणला आहे. या गतीने अमेरिका वगळून उरलेली पाश्चात्य राष्ट्रे आघाडीवर रसद पोचविण्याचे कामी कमी पडत आहेत. इकडे युक्रेन मदतीसाठी टाहो फोडतो आहे. युक्रेन ओरडून ओरडून सांगतो आहे की, बाबांनो आम्ही केवळ आमच्या साठीच लढतो आहोत असे समजू नका. रशिया ही एक बलदांडगी शक्ती आहे. ती आम्हाला परास्त करून थांबणार नाही. आमच्यानंतर तुमची पाळी असणार आहे. काय वाटेल ते करून आम्हाला सैन्यबळ आणि शस्त्रास्त्रांची मदत करा. उत्तरादाखल रशिया पाश्चात्यांना जाणीव करून देतो आहे की, आम्ही आत्तापर्यंत जिंकलेला भाग यापुढे रशियाचा हिस्सा मानला जाणार आहे. या भागावर केलेले आक्रमण हे रशियावर केलेले आक्रमण मानले जाईल.
अण्वस्त्र युद्धाला आवर घालणारी शक्ती
रशियामध्ये पुतिन सर्वोच्च नेतेपदी तर आहेतच पण ते एकटेच सर्वाधिकारीही आहेत. न्युक्लिअर युद्धाबाबत निर्णय घेणे हा विषय सर्वस्वी त्यांचा एकट्याच्या हाती आहे. अमेरिकेसकट अन्य पाश्चात्य राष्ट्रे लोकशाहीवादी राष्ट्रे आहेत. अशा राष्ट्रांना तडकाफडकी निर्णय घेता येत नाहीत. या राष्ट्रात निर्णयप्रक्रिया ही एक दीर्घसूत्री प्रक्रिया असते. त्यातून आता अमेरिकेत निवडणुका नोव्हेंबर 2024 मध्ये होत आहेत. रशियाने जाहीर केले आहे की, अण्वस्त्रे केव्हा वापरायची याबाबतचे रशियाचे धोरण आणि तत्त्वप्रणाली (डॅाक्ट्रीन) पूर्वीपासूनच निश्चित आहे. शस्त्रे आवश्यकतेनुसार वापरण्यासाठी असतात.
अण्वस्त्र युद्धाला आवर घालणारी शक्ती वेगळीच आहे. ती आहे तिची संहारक्षमता. जागतिक आण्विक युद्धाचे परिणाम जगातील 300 कोटी लोकांना भोगावे लागतील ही जाणीवच आजवर अनेकदा युद्धज्वराला आवर घालीत आली आहे. म्हणूनच रशियाने पाश्चात्यांना आवाहन केले आहे की, आहोत तिथे थांबूया. रशियाचा प्रस्ताव मान्य करणे म्हणजे युक्रेनने आपला एकपंचमाश भाग गमावणे हा आहे. सबब पाश्चात्य राष्ट्रांना ही बाब सपशेल अमान्य आहे.
रशियामध्येही सामरिक तज्ञपातळीवर चर्चा सुरू आहे. एक विचार असा आहे, ‘युद्ध जिंकण्यासाठी सरसकट सर्वत्र अण्वस्त्रे वापरावी लागतील का? की त्यांचा मर्यादितस्तरावर वापर करूनही भागेल? असे झाल्यास हानी कमी होईल.’ तर काहींचे मत तर असेही आहे की, ‘हे युद्ध आपण अण्वस्त्रे न वापरताही जिंकणार आहोत. तोपर्यंत परंपरागत युद्ध, आण्विक युद्धसराव आणि शाब्दिक हल्ले प्रतिहल्ले असेच चालू राहू द्या म्हणजे झाले!’ आता अपेक्षा आहे दुसऱ्या बाजूच्या चाणक्यांच्या डावपेचांची!! त्यांचे म्हणणे असे आहे की, ‘रशिया कबूल करत नसला तरी या लढाईत त्याची पुरती दमछाक झालेली आहे. आजच्या रशियाला गौणत्व पत्करून चीनशी दोस्ती करावी लागते आहे, ती का?’ आपली भूमिका मात्र फक्त बघ्याची!!
No comments:
Post a Comment