चीनची ही शस्त्रसिद्धता कुणासाठी?
तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक ०७/०५/२०२२४हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
चीनची ही शस्त्रसिद्धता कुणासाठी?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर 440 022 मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
जगातले बहुतेक देश, दुसरा देश काय करतो आहे, हे जाणून घेण्याच्या खटाटोपात असतात. याला क्वचितच कुणाचा अपवाद असेल. यातल्या मातब्बर मंडळीत अमेरिका, रशिया, चीन हे देश येतात. अमेरिकेने चीनमध्ये अशाचप्रकारे डोकावून पाहिले तेव्हा चीन आपल्या रणनीतीमध्ये बदल करण्याच्या खटाटोपात आहे, असे अमेरिकेला आढळून आले आहे. तसा अहवालच अमेरिकेच्या सैनिकी रणनीतीविषयक समितीने तयार करून देशासमोर ठेवला आहे. चीनने अतिविकसित आक्रमक शस्त्रांसोबत आक्रमणनिवारक अतिविकसित शस्त्रेही तयार करण्याचा धडाकाच लावला आहे, यात निरनिराळ्या प्रकारची शस्त्रे आहेत, ती भरपूर प्रमाणात तयार केली जात आहेत आणि त्यांची गुणवत्ताही अद्ययावत स्वरुपाची आहे, असे हा अहवाल सांगतो.
शस्त्रे डागता आली पाहिजेत
नुसती शस्त्रे असून उपयोगाचे नाही. ती डागण्यासाठीही यंत्रणा (डिलिव्हरी सिस्टीम) पाहिजे. जमिनीवरून प्रक्षेपित करायची आंतरराष्ट्रीय प्रक्षेपणास्त्रे (इंटरकॅान्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल - आयसीबीएम) तयार करण्याचा जंगी कार्यक्रम चीनने हाती घेतला आहे. अशाप्रकारची क्षेपणास्त्रे (मिसाईल्स) आजच चीनजवळ अमेरिकेपेक्षा जास्त आहेत. हल्ला झाला तर त्याचा प्रतिबंध करण्याची क्षमता असलेली कवचवजा शस्त्रे चीन का बरे तयार करतो आहे, असा प्रश्न अमेरिकेला पडला आहे. आज जगातले कोणतेही राष्ट्र स्वत:हून पुढाकार घेऊन चीनवर हल्ला करण्याच्या विचारात असेल असे संभवत नाही. मग चीनच तर असा हल्ला करण्याच्या विचारात नाहीना, अशी रास्त शंका अमेरिकेला आली आहे. असा हल्ला चीनने केला तर त्याला आक्रमित राष्ट्र चोख उत्तर देण्याचे बाबतीत मागेपुढे पाहणार नाही, हे उघड आहे. अशावेळी बचाव करता यावा म्हणूनतर चीन अशी कवचकुंडले प्राप्त करण्याच्या खटाटोपात नाहीना, असा प्रश्न अमेरिकेला पडला आहे.
चीनचे संभाव्य आक्रमण कुणावर?
चीन आक्रमण करण्यासाठी दोनच राष्ट्रांचा विचार करीत असणार. पहिले राष्ट्र आहे अमेरिका आणि दुसरे असू शकते, भारत. विद्यमान प्रतिस्पर्धी म्हणून चीन अमेरिकेकडे बघत असणार आणि संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून भारताकडे. भारताच्या सीमेवर चीनने जी सेना आणून उभी केली आहे, ती लगेचच आक्रमण करील, असे वाटत नाही. चीन भारताच्या अधूनमधून लहानमोठ्या खोड्या काढीत राहील आणि ठिकठिकाणी चकमकीही होत राहतील. पण यामुळे भारताचे फारमोठे सैन्य सीमेवर सर्वत्र अडकून राहील. त्यासाठी भारताला कायमच फारमोठा खर्च करावा लागेल आणि विकासावर करायच्या खर्चात भारताला सतत कपात करत रहावी लागेल, हा चीनचा मर्यादित हेतू निदान सद्ध्यातरी स्पष्ट दिसतो आहे.
अण्वस्त्रांचे बाबतीत चीन अमेरिका आणि रशियाच्या यांच्या बरोबरीला येऊन बसू इच्छितो आहे, ही भारतासाठी धोक्याची घंटाच मानली पाहिजे. म्हणूनच अण्वस्त्र निवारक यंत्रणा उभी करण्यासाठीचे भारताचे प्रयत्न महत्त्वाचे ठरतात.
चीनचे मनसुबे आणि सावध भारत
भारताने या दृष्टीने वेळीच दखल घेणे का आवश्यक होते हे जाणून घेण्यासाठी चीनच्या क्षेपणास्त्रांचे तळ कुठेकुठे आहेत, हे पाहिल्यास लक्षात येते. कुनमिंग आदी बहुतेक तळ भारतापासून विमानाने 1500 किलोमीटर अंतरावर आहेत. याच अर्थ असा की, भारतातील महत्त्वाची शहरे आणि सैन्यतळ चीनच्या क्षेपणास्त्रांच्या कक्षेत येतात. याशिवाय चीन अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रविषयक कच्चामाल आणि तंत्रज्ञान पाकिस्तानलाही पुरवतो आहे, ही बाब तर आणखीनच गंभीर आहे. कारण एक जबाबदार राष्ट्र अशी पाकिस्तानची ख्याती नाही. चीनचे हे कृत्य माकडाच्या हाती कोलित ठरेल.
शस्त्रसज्जतेसाठी स्वतंत्र विद्यापीठ
शी जिनपिंग यांनी सत्तारूढ होताच सैन्यदलात रॅाकेट फोर्स या नावाची एक नवीन शाखा उभारली आहे आणि सर्व प्रकारची क्षेपणास्त्रे या शाखेकडे सोपविली आहेत. स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स या शाखेकडे अवकाशातून होऊ शकणारे हल्ले, सायबर हल्ले आणि इलेक्ट्रॅानिक हल्ले थोपवण्याची जबाबदारी सोपविली आहे. या विषयांशी संबंधित एक विद्यापीठच चीनमध्ये आहे. रूढ अभ्यासक्रमासोबत नवीन संशोधन हा विषयही या विद्यापीठात हाताळला जातो. या विद्यापीठातील संशोधकांनी अतिवेगवान आणि महत्तम पल्ला गाठणारी क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत. चीनवर कोणत्याही दूरवरच्या राष्ट्राकडून हल्ला होण्याची शक्यता नसतांना एकीकडे अवकाशातून होऊ शकणारे हल्ले, सायबर हल्ले आणि इलेक्ट्रॅानिक हल्ले थोपवण्याची कवचसदृश बचाव यंत्रणा उभारायची आणि दुसरीकडे प्रत्याघात करण्यासाठीची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रे चीन तयार करीत आहे.
या नवीन क्षेपणास्त्रांवर जैविक, रासायनिक आणि आण्विक अशी कोणत्याही प्रकारची शस्त्रे असू शकतात. यांच्या जोडीला सुलभ हालचालीसाठी चीन ठिकठिकाणी परस्परांशी जोडलेले बोगदे तयार करतो आहे. सर्व शस्त्रसाठा यात साठवून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि भूपृष्ठाखालूनच्या हालचालीसाठी ही व्यवस्था आहे. याशिवाय चीन कॅांक्रिटची शंभरापेक्षा जास्त भूमीगत आश्रयस्थाने (सिलो) बांधतो आहे. ही व्यक्तींसाठी सुरक्षा प्रदान करतील तसेच शस्त्रास्त्रे साठविण्याठीही उपयोगी पडू शकणारी आहेत.
शस्त्रे आहेत पण ती डागायची कशी? हा प्रश्न हाताळण्यासाठी चीनने एक जंगी कार्यक्रम आखला आहे. हवेतूनच डागता येतील अशी बॅलिस्टिक मिसाईल्स आणि क्रूझ मिसाईल्स डागण्यासाठी नवीन मंच (प्लॅटफॅार्म्स) बांधले आहेत.
स्टेल्थ बॉम्बर नावाचे एक अमेरिकन बॅाम्बर आहे. हे विमान ओळखणाऱ्या यंत्रणेला चकमा देऊन शत्रूच्या प्रदेशात शिरून बॅाम्ब हल्ला करू शकते. अशी बॅाम्बर विमाने तयार करण्याच्या खटाटोपात चीन आहे. ही विमाने अण्वस्त्रेही वाहून नेऊ शकतात. याशिवाय मानवविरहित हवाई विमानेही तयार करण्याचा कार्यक्रम चीनने हाती घेतला आहे.
अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे वाहून नेणारी सबमरीन तर चीनने 2014 सालीच विकसित केली होती. तिचे हिंदीमहासागरातील अस्तित्व जाणवताच भारताने जागरूकतेने तोडीसतोड म्हणून तात्काळ ‘अँटि-सबमरीन वॅारफेअर (एएसडब्ल्यू) केपेबिलिटी’ ही निवारण क्षमता प्राप्त करण्यासाठीचा एक जंगी कार्यक्रम हाती घेऊन तो तडीस नेला.
अतिशुद्ध युरेनियम हवे कशाला?
अतिशुद्ध युरेनियम आणि पुनर्प्राप्त (रिप्रोसेस्ड) प्लुटोनियम तयार करण्यासाठी चीनने पराकोटीचे प्रयत्न चालविले आहेत. यांची माहिती प्रत्येक देशाने स्वत:हून वेळोवेळी जाहीर केली पाहिजे, असा आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार आहे. चीनने 2017 पासून या मूलद्रव्यांचा आपल्याजवळ किती साठा आहे, हे जाहीर करणे थांबवले आहे. पण बित्तंबातमी काढणाऱ्या शोधपत्रकारांनी चीनचे बिंग फोडले आणि अतिशुद्ध युरेनियम वापरून तयार केलेली 500 न्युक्लिअर वॅारहेड्स चीनजवळ तयार आहेत आणि आणखी तयार करणे सुरू आहे आणि अशी निदान 1000 अस्त्रे चीन तयार करतो आहे, ही बाब उघड केली आहे. आम्ही केवळ किमान प्रतिबंधात्मक (मिनिमम डिटरन्स) कारवाईपुरतीच लष्करी क्षमता साध्य करीत आहोत, हा चीनचा दावा खोटा ठरला आहे. या तयारीला बचावापुरती शस्त्रसज्जता मानायला जग तयार होईल का?
आपल्यावर हल्ला होतो आहे, हे तात्काळ कळावे, त्याच्या निवारणाची सिद्धता असावी आणि लगेच प्रत्याघात करून शत्रूस नामोहरम करता यावे, यासाठीची क्षमता प्राप्त करण्याची योजना आखून ती अमलात आणायला अमेरिका आणि भारत यांनीही तातडीने सुरवात केली आहे. कारण दोन राष्ट्रे समान शक्तीची असतील तर ती एकमेकांवर फारतर गुरगुरतात, पण हल्ले करण्याचे नाइलाज होईतो टाळतात, हा युद्घशास्त्राचा नियम आहे. म्हणून तर समर्थ सांगून गेले आहेत की, “अखंड सावधान असावे| दुश्चित कदापि नसावे| तजविजा करीत बसावे| एकांत स्थळी||१||”
No comments:
Post a Comment