2024 0726 चार ठार, चार जखमी
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
इतर देशात हल्ले करून किंवा हल्ले घडवून आपल्याला नको असलेल्या व्यक्तींचा नायनाट करणे, हे कृत्य अमेरिकेसाठी नवीन नाही. त्याच अमेरिकेत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्ला झाला आणि जगभर खळबळ उडाली. अधिकृत आकड्यानुसार अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटी असून, जनतेजवळच्या बंदुकांची संख्या मात्र 40 कोटी आहे. अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बंदुकांच्या सर्रास वापरावर प्रतिबंध लावण्यासाठी एक कायदा केला होता खरा पण त्याचा नाममात्र परिणामही दिसून येत नाही. गोळीबाराच्या घटना कमी झालेल्या नाहीत, भविष्यातही कमी होण्याची शक्यता नाही..
बंदूक संस्कृतीचे बळी ठरलेले अध्यक्ष
अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि अमेरिकी लोकशाहीत हिंसाचारास स्थान नाही, असे म्हटले. पण ते वस्तुस्थितीचे निदर्शक नाही. या देशाच्या चार अध्यक्षांचे प्राण हिंसाचारात गेलेले आहेत आणि तेवढेच जखमी झाले आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याच्या निमित्ताने अमेरिकेत राजकीय नेत्यांच्या हत्या आणि त्यांच्या हत्येचा प्रयत्नांचा आढावा हा असा आहे.
1) अमेरिकच्या डेमोक्रॅट पक्षाच्या जॅान एफ केनेडी या सर्वात तरूण अध्यक्षावर 1963 च्या नोव्हेंबरच्या 22 तारखेला हल्ला झाला होता. ते टेक्सास प्रांतातील डल्लास शहरी कार मधून जात असतांना त्यांच्यावर गोळीबार झाला आणि ते मृत्युमुखी पडले.
2) या अगोदर रिपब्लिकन पक्षाचे विल्यम मॅकिन्ले यांची हत्या 6 सप्टेंबर 1901 ला न्यूयॅार्कमध्ये झाली. ते उपस्थितांबरोबर हस्तांदोलन करीत असतांना हस्तेखोराने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या.
3) रिपब्लिकन पक्षाचे जेम्स गारफिल्ड यांच्यावर वॉशिंगटन येथे 2 जुलै 1881 रोजी हल्लेखोराने गोळीबार केला होता. त्यानंतर काही आठवड्यांनी त्यांचा मृत्यू झाला.
4) रिपब्लिकन पक्षाचे अब्राहम लिंकन हे अमेरिकेच्या इतिहासातले हत्या झालेले पहिले अध्यक्ष होत. त्यांची 14 एप्रिल 1865 ला वॉशिंग्टनमधील फोर्ड थिएटर येथील एका कार्यक्रमात ते पत्नीसह सहभागी झालेले असताना हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला होता. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला.
जखमी झालेले अध्यक्ष
1) रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज बुश यांच्यावर 2005 मध्ये हल्लेखोरांनी हॅन्ड ग्रेनेड फेकले होते. ग्रेनेडचा स्फोट न झाल्याने अध्यक्ष बुश बचावले.
2) रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या हत्येचा प्रयत्न मार्च 1981 मध्ये झाला होता त्यांच्यावर गोळीबार झाला. पण त्यातून ते बचावले.
3) तत्कालीन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांची हत्या करण्याचे प्रयत्न 1975 मध्ये दोनवेळा झाले होते
4) माजी अध्यक्ष हॅरी दुमन यांच्या हत्येचा प्रयत्न नोव्हेंबर 1950 मध्ये झाला होता.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर ट्रंप यांनी विजयाच्या दिशेने मोठीच मजल मारली आहे. गोळी कानाला चाटून गेल्यावर चेहऱ्यावर, कपड्यावर रक्ताचे थेंब असताना ट्रम्प उठून उभे राहिले आणि मूठ आवळून त्यांनी ‘फाइट, फाइट’ असे शब्द उच्चारून यांनी आपले लढवैयेपण अमेरिकन जनतेला दाखवून दिले आहे. मतदार वैचारिक आवाहनापेक्षा भावनिक आवाहनला अधिक दाद देत असतो.
१५ जुलैला सुरू झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनप्रसंगी ट्रम्प यांचे एकेकाळचे अतिप्रखर टीकाकार, कट्टर प्रतिस्पर्धी, त्यांना सतत पाण्यात पाहणारे ओहिओ राज्याचे 39 वर्षीय सिनेटर असलेले जे. डी. व्हॅन्स ह्यांनी यू टर्न घेत ट्रंप यांची प्रशंसा केली. त्यांनी पूर्वी ट्रंप यांना हिटलरची उपमा दिली होती. रात्रीतून हृदयपरिवर्तन झालेल्या व्हॅन्स यांना ट्रंप यांनीही आपले उपाध्यक्षपदाचे साथीदार उमेदवार म्हणून स्वीकारले आहे. 2028 च्या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. एवढा मान त्यांना रिपब्लिकन पक्षात आहे. येत्या 2024च्या निवडणुकीतही पेनसिल्व्हॅनिया, मिशिगन, विस्कॉन्सिन, ओहायो, मिनेसोटा ही राज्ये स्विंग स्टेट्स ठरतील. ही राज्ये निवडणुकीच्या निकालाला कलाटणी देणारी मानली जातात. इतर राज्यांचे कल तसे बरेचसे निश्चित आणि कायम असतात. सिलिकॉन व्हॅलीमध्येही व्हॅन्स यांच्यामुळे ट्रम्प यांना बळ मिळू शकेल. सिलिकॉन व्हॅली हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील एक प्रदेश आहे. सान होजे ते सान फ्रांसिस्को व आसपासच्या भाग सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखला जातो. येथे फेसबुक, गुगल, सिस्को, इंटेल आणि इतर अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्याची आवारे आहेत. व्हॅन्स यांची कायदेतज्ञ तेलगू पत्नी उषा चिलुकुरी ही उद्या ट्रंप आणि व्हॅन्स ही जोडी जिंकली तर अमेरिकेच्या उपाध्यक्षाची पत्नी या नात्याने सेकंड लेडी ठरेल. तसे खुद्द व्हॅन्स आंध्राचे जावई आहेतच. अनेकदा फासे उलटे पडतात, हे ऐकले होते. पण कधीकधी ते इतके सुलटेही पडतात, तर! व्हॅन्स यांनी परराष्ट्र व्यवहार, मंदी आणि अर्थकारण, रोजगारक्षेत्राच्या समस्या यावर ट्रंप यांची येती राजवट लक्ष केंद्रित करील, असे घोषित केले आहे.
निष्फळ झाले बाण
फौजदारी खटल्यांचा ससेमिरा, संसदेवर हल्ला केल्याचा आरोप, गोपनीय कागदपत्रांची अवैध हाताळणी, जॉर्जियातील निवडणूक प्रक्रियेत ढवळाढवळ, पोर्नस्टारशी संबंध, विधिनिषेधांचा अभाव असलेला, खोटरडा, भामटा, बलात्कारी असे डेमोक्रॅट पक्षाच्या भात्यातील डोनाल्ड ट्रंप वर सोडलेले बाण आज एकदम असे कसे निष्फळ आणि परिमाणशून्य झाले, ते डेमोक्रॅट पक्षाला कळेनासे झाले आहे. 78 वर्षीय आणि त्यातही आक्रस्ताळी ट्रम्प यांचा कडवी झुंज देण्यासाठीचा आक्रमक पवित्रा व आत्मविश्वासपूर्ण शैली आणि 81 वर्षीय बायडेन यांची थकलेली देहबोली, मुखदुर्बळता, विस्मृती, असंबद्ध बडबड व बचावात्मक भूमिका यातील फरक डेमोक्रॅट पक्षीयांना दिवसेदिवस ठळकपणे जाणवू लागला होता. इतका की शेवटी विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांना निवडणुकीला केवळ साडे तीन महिने उरले असतांना नामुष्की पत्करत आपली उमेदवारी स्पर्धेतून परत घ्यावी लागली आणि कमला हॅरिस यांचा पुरस्कार करावा लागला. युक्रेन आणि नाटोसदस्य देश यांच्यावर ट्रंप यांची खपा मर्जी आहे. तर पुतिन यांच्याविषयी त्यांना विशेष आपलेपणा आहे. मेक्सिको, आफ्रिका, चीन, कांगो या देशांतून होणारे बेकायदा स्थलांतर आजच्या अमेरिकेपुढच्या अनेक समस्यांचे एक प्रमुख कारण आहे, असे ट्रंप मानतात. कमला हॅरिस विजयी झाल्या तर गर्भपाताच्या अधिकाराच्या खंद्या पुरस्कर्त्या असलेल्या, कारणे दूर झाल्याशिवाय स्थलांतर थांबणार नाही अशी ठासून जाणीव करून देणाऱ्या, पुनर्नवीकरणीय (रिन्युएबल) अक्षय उर्जाश्रोतावर भर देणाऱ्या, स्वत:ला लोकशाहीवादी आणि नाहीरे (हॅव नॅाट्स) घटकांच्या कैवारी म्हणवणाऱ्या, हमास घातक पण इस्रायलने गाझापट्टीतील कारवाई थांबवावी असा आग्रह धरणाऱ्या, मानवीय चेहऱ्याच्या पोलिस कायद्याची आवश्यकता मानणाऱ्या, भारतीय वंशाच्या पण मुस्लीम आणि पाकिस्तानधार्जिण्या महिला नेत्या अमेरिकेच्या अध्यक्षपदी प्रथमच निवडून येऊ शकतात. आहेत. हे सर्व बघितले की, नवीन प्रतिस्पर्ध्याला म्हणजे बहुदा कमला हॅरिस यांना ट्रंप कशी टक्कर देतात ते पहाणे रंजक ठरेल. पण आंतरराष्ट्रीय राजकारणाला कूस बदलायला तर एक आठवडाही लागत नाही. म्हणून 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत काहीही अंदाज न वर्तवण्यातच शहाणपणा आहे, नाहीका? (956 )