Monday, July 8, 2024

 


दक्षिण आफ्रिकेत विळ्या भोपळ्यांचे सख्य !


तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ००/००/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

 

  दक्षिण आफ्रिकेत विळ्या भोपळ्यांचे सख्य ! 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

    दक्षिण आफ्रिका 2025 मध्ये प्रथमच जी-20 चे अध्यक्षपद भूषवणार आहे. सध्या, दक्षिण आफ्रिका हे एकमेव आफ्रिकन राष्ट्र आहे जे जी-20 चे सदस्य आहे. एकेकाळी इंग्रजांची  वसाहत असलेला आणि आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला असलेला दक्षिण आफ्रिका आज एका गणराज्याच्या स्वरुपात आहे. याला 2,798 किलोमीटर  किनारपट्टी लाभलेली आहे. किनारपट्टीच्या एका बाजूला दक्षिण अटलांटिक आणि दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर  आहे. याचे क्षेत्रफळ 1 कोटी चौरस किलोमीटरपक्षा थोडेसे जास्त आहे. (भारत 3.3 कोटी चौरस किमी) तर सर्वात मोठे शहर जोहान्सबर्ग आहे. 6 कोटी लोकसंख्या 12 अधिकृत भाषा बोलणारी आहे.  81.4% काळे, 8.2% रंगीत, 7.3% गोरे आणि 2.7% भारतीय असे वांशिक गट दक्षिण आफ्रिकेत आहेत. 78.0% ख्रिश्चनधर्मी, 10.9% धर्म नसलेले, 4.4% पारंपरिक श्रद्धा मानणारे, 1.7% इस्लामधर्मी, 1.0% हिंदूधर्मी, 2.7% इतर आणि अन्य 1.4% अनिश्चित धर्माचे लोक दक्षिण आफ्रिकेत आहेत. म्हणून दक्षिण आफ्रिका इंद्रधनू राष्ट्र म्हणून ओळखले जाते.

निवडणूक पद्धती

 दक्षिण आफ्रिकेत संसदीय पद्धतीचे शासन आहे. पण अध्यक्ष हा औपचारिक राष्ट्रप्रमुख तर असतोच पण त्यालाच सर्व प्रशासकीय अधिकारही असतात. भारतात अध्यक्षाला  फक्त औपचारिक अधिकार (सेरेमोनियल पॉवर्स) आहेत. प्रत्यक्ष प्रशासकीय अधिकार (एक्झिक्युटिव्ह पॉवर्स) पंतप्रधानाला आहेत. नॅशनल असेम्ब्लीतील 400 जागांपैकी 200 जागा यादी पद्धतीने तर उरलेल्या 200 जागा मतदारसंघनिहाय मिळालेल्या मतसंख्येनुसार  भरल्या जातात.


प्रमुख राजकीय पक्ष

  1. आफ्रिकन नॅशनल कॅांग्रेस - 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतचे निकाल   धक्कादायक लागले आहेत. कृष्णवर्णियांसाठी कामकरणाऱ्या आफ्रिकन नॅशनल कॅांग्रेसचे गेली  30 वर्षे संसदेत निर्विवाद बहुमत असे. पण या निवडणुकीत मात्र या पक्षाला 40% मते आणि 400 पैकी 159 जागाच मिळाल्या आणि बहुमत हुकले. याउलट 2019 मध्ये या पक्षाला एकट्यालाच 230 जागांसह 58% मते   मिळाली होती.  यापूर्वीही हा पक्ष कधीही 50 टक्क्यांच्या खाली आलेला नव्हता. तरीही पहिले आश्चर्य हे आहे की, बहुमत नसूनही या पक्षाचे प्रमुख आणि दक्षिण आफ्रिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा पुन्हा एकदा सत्तेवर येत आहेत. 
  2.  डेमोक्रॅटिक अलायन्स (डीए) -  दक्षिण आफ्रिकेमध्ये डेमोक्रॅटिक अलायन्स  हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. श्वेतवर्णीयांचा हा पक्ष उदारमतवादी, संघराज्यपद्धतीचा पुरस्कर्ता आणि वंशवादविरोधी आणि उजवीकडे झुकलेला मध्यममार्गी पक्ष आहे. या निवडणुकीमध्ये या पक्षाला 22 टक्के मते आणि 87 जागा मिळाल्या आहेत. दुसरे आश्चर्य असे की, या प्रमुख विरोधी पक्षासोबतच तडजोड करीत आफ्रिकन नॅशनल काँग्रेस सत्तेवर येणार आहे. थोडक्यात, दक्षिण आफ्रिकेमध्ये आता ‘नॅशनल युनिटी’चे सरकार असणार आहे.
  3.  इंकाथा फ्रीडम पार्टी - हा पुराणमतवादी पक्ष आहे. हा नावपुरताच राष्ट्रीय पक्ष आहे. याने 17 जागा जिंकल्या आहेत.
  4.  स्पीअर ऑफ द नेशन या नवीन पक्षाला 58 जागा मिळाल्या आहेत. 
  5.  तर एकॅानॅामिक फ्रीडम या डाव्या पक्षाला 39 जागा मिळाल्या आहेत.
  6.  पॅट्रिऑटिक अलायन्सच्या खाती 9 जागा आहेत. 
  7. अन्य सर्वांना मिळून  एकूण 11 जागा मिळाल्या आहेत. 

इंकाथा फ्रीडम पार्टी  हा पक्ष सामाजिकदृष्ट्या पुराणमतवादी समजला जातो, तर पॅट्रीऑटिक अलायन्स हा पक्ष उजव्या विचारसरणीचा  मानला जातो. तिसरे आश्चर्य हे आहे की, हे दोन्ही पक्षही(17+9=26) या ‘युनिटी’मध्ये सहभागी होणार आहेत. खरेतर यांच्या पाठिंब्याची युनिटीली तशी मुळीच गरज नव्हती. आफ्रिकन नॅशनल कॅांग्रेसचे 159 आणि डेमोक्रॅटिक अलायन्स (डीए) चे 87 मिळून 246 होतात. हे बहुमत आहे. असो. आफ्रिकन नॅशनल कॅांग्रेस (एएनसी) हा कृष्णवर्णीयांसाठी काम करणारा, तर डेमोक्रॅटिक अलायन्स (डीए) हा पक्ष प्रामुख्याने श्वेतवर्णीयांचा पक्ष म्हणून ओळखला जातो.  म्हणजे यांची युती ही जणू विळ्या भोपळ्याची दोस्ती आहे. राजकारणात कुणाचीही कुणाशीही मैत्री होते, असे जे म्हटले जाते त्याचे हे ठसठसीत उदाहरण आहे. पण डेमोक्रॅटिक अलायन्सचे प्रमुख नेते जॉन स्टीनह्युसन मात्र म्हणताहेत, “आज एका नव्या आणि अभूतपूर्व पर्वाची सुरुवात होत आहे! आम्ही आमच्यातील मतभेद दूर ठेवून दक्षिण आफ्रिकेच्या भल्यासाठी एकत्र येण्याचे ठरवले आहे.” या दोन्ही पक्षांमध्ये साटेलोटे रीतीप्रमाणे सिरील रामाफोसा यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदावर बसण्यासाठी डेमोक्रॅटिक अलायन्स हा पक्ष पाठिंबा देईल, तर त्या बदल्यात डेमोक्रॅटिक अलायन्सला संसदेमध्ये उपसभापतिपद मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या राजकीय इतिहासात सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्षानेच युती करून सरकार स्थापन करण्याची ही घटना अभूतपूर्व म्हणायला हवी. 

युतीसमोर येऊ शकणाऱ्या समस्या 

  सिरील रामाफोसा यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा आरोप आहे.  आश्चर्याची चौथी गोष्ट ही आहे की, असे असूनही पक्षांतर्गत सत्तासंघर्षात त्यांची पक्षावरील पकड निदान आजतरी कायम आहे.  वाढती बेरोजगारी, गुन्हेगारांचे वाढलेले मनोबल  आणि वीज कपात यामुळे दक्षिण आफ्रिकेचे एरवी अल्पसंतुष्ट असलेले नागरिकही आफ्रिकन काँग्रेस पक्षावर नाराज आहेत. 

   हे कमी आहे म्हणून की काय, आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षातील  आजवरचे खदखदत असलेले अंतर्गत वाद एकदम उफाळून वर येत आहेत. दुसऱ्या फळीच्या नेत्यांमध्ये जीवघेणी  स्पर्धा सुरू झाली असून ज्येष्ठ नेते नुसते मूग गिळून बसले आहेत की त्यांची या सुंदोपसुंदीला मूकसंमती आहे, हे कळत नाही. रामाफोसा यांच्या राष्ट्राध्यक्ष पदावर अस्थिरतेची सतत टांगती तलवार अंतर्गत   सत्तासंघर्षामुळे लटकत राहणार आहे, असे राजकीय निरीक्षक म्हणताहेत, ते यामुळेच. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमधील रामाफोसा यांचे प्रतिस्पर्धीच त्यांना आव्हान देतांना भविष्यात दिसतील आणि स्वत:च्याच पक्षातील सहकाऱ्यांच्या   आव्हानामुळे त्यांचा बळी जाईल, अशीही शक्यता आहे. रामाफोसा यांच्या नेतृत्वातील गेल्यावेळचे एकपक्षीय बहुमतातील सरकार ठोस निर्णय न घेण्यासाठी प्रसिद्ध होते. या सरकारला तर सहमतीशिवाय निर्णय घेताच येणार नाहीत. त्यामुळे निर्णय घेण्याला उशीर होईल. या दिरंगाईमुळे या सरकारमध्येही नवीन समस्या  निर्माण होत राहतील आणि असंतोष वाढेल. 

काथ्याकूट !काथ्याकूट !!आणि फक्त काथ्याकूट!!!

  टोकाचा विरोध असलेले  पक्षच एकत्र येऊन सरकार स्थापन करणार, असे ठरल्यावर चर्चेच्या कितीही फेऱ्या पार पडल्या तरी एकमत कसे होणार? वाटाघाटी काही केल्या संपेचनात. अधिवेशन सुरू व्हायचा दिवस उजाडला पण वाटाघाटी सुरूच! शेवटी अधिवेशनला सुरूवात व्हायच्या जेमतेम  आधी वाटाघाटी एकदाच्या कशाबशा संपल्या आणि सरन्यायाधीशांनी खासदारांचा शपथविधी आटोपून घेतला. संबंधित पक्षांनी जाहीर केले की, देशहित समोर ठेवून आम्ही एकत्र येत आहोत. आता मतभेदाचे काही मुद्दे उरलेच असतील तर त्यांच्यावरही आम्ही असाच तोडगा काढू! अशी मुलखावेगळी आहे इंद्रधनूतील म्हणजेच दक्षिण आफ्रिकेतील लोकशाही!! 



No comments:

Post a Comment