Tuesday, July 16, 2024

 


ब्रिटनमध्ये मजूरपक्षाची दिग्विजयी दमदार दौड

पूर्वार्ध

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक १६/०७/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.        

20240712 ब्रिटनमध्ये मजूरपक्षाची दिग्विजयी दमदार दौड!

(पूर्वार्ध)

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 


   ब्रिटनमध्ये 4 जुलै, 2024 रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले. ही निवडणूक खुद्द ब्रिटनसाठी जशी महत्त्वाची होती तशीच ती सर्व जगासाठीही तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे. सुरवातीला 2019 च्या निवडणुकीत ब्रिटनमधील राजकीय पक्ष, त्यांना मिळालेल्या जागा आणि मतांची टक्केवारी किती होती, हे पाहणे विषय समजण्यासाठी आवश्यक ठरेल. 

1) हुजूर पक्ष (कॅान्झर्व्हेटिव्ह पार्टी) या पक्षाला गेल्या निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये 344 जागा आणि (46.6%) मते मिळाली होती. ब्रिटनमध्ये कॅांझरव्हेटिव्ह (हुजूर) पक्ष हा एक उजवीकडे झुकलेला पक्ष असून 2010 पासून सतत सत्तेत आहे. ब्रिटनने युरोपियन युनीयनमधून बाहेर पडावे ही या पक्षाची भूमिका होती. सुरवातीचे  पंतप्रधान बोरिस जॅानसन हे बेभरवशाचे व खोटारडे म्हणून अगोदरपासूनच कुप्रसिद्ध  होते. त्यांना शेवटी 2022 मध्ये  राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यानंतर फक्त 44 दिवसांसाठी लिझ ट्रस या पंतप्रधानपदी होत्या. अल्पकालीन पंतप्रधान म्हणून त्यांचा पहिला क्रमांक लागतो.  2022 मध्येच भारतीय वंशाचे ऋषि सुनक हेही 1 वर्ष 8 महिने आणि काही दिवसांसाठीच पंतप्रधानपदी होते. एवढ्या कमी वेळात अनेक प्रयत्न करूनही त्यांनाही एवढ्या कमी वेळात बेरोजगारी आणि महागाई या समस्या सोडविता आल्या नाहीत. 

2)  मजूर पक्ष (लेबर पार्टी) या पक्षाला गेल्या निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये 205 जागा आणि 31.5 % मते मिळाली होती. लेबर (मजूर) पक्ष काहीसा डावीकडे झुकलेला व कामगारांच्या हक्कांबाबत जागृत असलेला पक्ष आहे. जनहितासाठी शासकीय हस्तक्षेप व सामाजिक न्यायाचे आपण पुरस्कर्ते असल्याचा या पक्षाचा दावा आहे. ब्रिटनने युरोपियन युनीयनमधून बाहेर पडू नये, असे या पक्षाचे मत होते. या विरोधी पक्षाचे नेते जेरेमी कार्बनि हे बेजबाबदार, हिंदूद्वेष्टे, पाकधार्जिणे व दहशतवाद्यांबाबत सौम्य भूमिका घेणारे म्हणून कुख्यात आहेत. 

3) स्कॉटिश नॅशनल पार्टी (एसएनपी) या पक्षाला गेल्या निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये 43  जागा आणि 6.6 % मते मिळाली होती. स्कॅाटिश नॅशनल पार्टी हा पक्ष स्कॅाटलंडच्या स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असून  युरोपियन युनीयनमध्ये स्कॅाटलंडला स्वतंत्र स्थान असावे, असे मानतो. याची मते फक्त स्कॅाटलंडमधूनच आलेली असल्यामुळे मते कमी म्हणजे 3.9 % एवढीच असूनही स्कॅाटलंडच्या वाट्याला असलेल्या एकूण  59 जागापैकी 48 जागा या पक्षाला मिळाल्या  होत्या. 

4) लिबरल डेमोक्रॅट्स या पक्षाला गेल्या निवडणुकीत म्हणजे 2019 मध्ये 15   जागा आणि 2.3 % मते मिळाली होती. लिबरल डेमोक्रॅट पक्ष हा नावाप्रमाणे मवाळ आहे. 

5) उरलेले पक्ष आणि स्वतंत्र उमेदवार यांना 43 जागा मिळाल्या होत्या. 

ब्रिटिश मतदारांची विशेषता 

     ब्रिटिश मतदार हा जगातला एक अत्यंत प्रबुद्ध मतदार मानला जातो. त्याने 1945 पर्यंत म्हणजे दुसऱ्या महायुद्धात विजय मिळेपर्यंत विन्स्टन चर्चिल या युद्धनीतीनिपुण व्यक्तीच्या हाती पंतप्रधानपद सोपविले होते. युद्ध संपताच पुनर्रचना हा मुद्दा आ वासून ब्रिटनसमोर उभा राहताच या कामासाठी हुजूर पक्षाऐवजी मजूर पक्ष आणि चर्चिल ऐवजी क्लेमेंट अॅटली ही व्यक्ती अधिक सोयीची ठरेल हे जाणून ब्रिटिश मतदारांनी पंतप्रधानपदाची सूत्रे त्यांच्याकडे सोपविली होती.

 ब्रिटनमध्ये गेली 14 वर्षे हुजूर पक्षाची सत्ता होती. या काळात सत्ताधाऱ्यांचा उद्दामपणा, रंगेलपणा, असहिष्णुता, धनवंतांचे लांगुलचालन, उद्योजकांना करसवलतीत झुकते माप, सामान्य नागरिकांवर मात्र करांचा वाढता बोजा यामुळे जनता चिडली होती. सहाजीकच तिने हुजुरांना निवडणुकीत आस्मान दाखवले आणि मजूर पक्षाला संधी उपलब्ध करून दिली. मजूर पक्ष या संधीचे सोने करील अशी जनतेची अपेक्षा आहे. 2024 च्या निवडणुकीचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य हे आहे की, ब्रिटनमधील वेल्स, स्कॉटलंड, इंग्लंड आणि नॉर्दर्न आयर्लंड या चारही प्रांतांत मजूर पक्षास दणदणीत यश मिळाले आहे. त्यामुळे मजूर पक्षाचे नेतृत्व करणारे, नवे पंतप्रधान कीर स्टार्मर हे पूर्ण ब्रिटनचे नेते ठरले आहेत. ब्रिटनमध्ये विविध प्रांतांस वेगळे होण्याचे वेध लागले होते, ते आता थांबेल. 

 दुसरे महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटनला पुन्हा उभे करण्यासाठी    ज्याप्रमाणे हुजूर पक्षाऐवजी मजूर पक्ष आणि चर्चिल ऐवजी अॅटली ही व्यक्ती अधिक सोयीची ठरेल हे जाणून ब्रिटिश मतदारांनी पंतप्रधानपदाची सूत्रे त्यांच्याकडे सोपविली होती,  त्याचप्रमाणे 2024 मध्ये सुद्धा  ब्रिटिश मतदारांचे शहाणपण प्रगट झाले आहे. इतिहासकाळातही  ब्रिटिश नागरिक  पंतप्रधानपदाची सूत्रे आलटून पालटून मजूर व हुजुरांकडे देत राहिले आहेत, याचीही या निकालाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आठवण होते आहे. कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखालील मजूर पक्ष मुळातच हुजूर पक्षापेक्षा अधिक आधुनिक आणि व्यवहारवादी आहे. 

ब्रिटनसाठी भारत महत्त्वाचा

 या काळात भारताचे जागतिक अर्थकारणातील, राजकारणातील आणि सामरिक क्षेत्रातील महत्त्व वाढल्याची जाणीव मजूर पक्षाला  आहे. ब्रिटनमध्ये भारतीयांची गुंतवणूक गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढली आहे. भारत हा त्या देशातला दुसरा सर्वांत मोठा गुंतवणूकदार देश आहे. ब्रिटनमधील भारतीय वंशाचे लोक सुसंस्कृत, उच्चशिक्षित आणि प्रभावी आहेत. निव्वळ मजुरी करण्यासाठी आलेल्या मीरपुरी पाकिस्तान्यांच्या मतपेढीला खूश करण्यासाठी  काश्मीर प्रकरणी पाकिस्तानला पाठिंबा देणे थांबवले पाहिजे एवढे शहाणपण कीर स्टार्मर आणि चमूला नक्कीच आहे. संपन्न, मेधावी आणि कर्तबगार भारतीयांना दुखावणे ब्रिटनच्या हिताचे नाही हे मजूर पक्षाचे नेतृत्व जाणून आहे. हा यू टर्न स्वरुपाचा बदल एकदम झालेला नाही. ही जाणीव ठेवूनच गेल्या वर्षीही चार ज्येष्ठ मजूर नेत्यांनी भारताला भेटी दिल्या होत्या. यांतील तिघे तर  आता स्टार्मर मंत्रिमंडळात मंत्री असणार आहेत. भारत-ब्रिटन यांच्यामधील संबंधांची आता नव्याने आखणी होणे अपरिहार्य  आहे. काश्मीर आणि खलिस्तान या मुद्द्द्यांवर या आधी मजूर पक्षाची भूमिका अनेकदा  वादग्रस्त राहिलेली आहे.  यामुळे पूर्वीच्या  मजूर सरकारांशी भारताचे खटकेही उडत असत.  नवे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी मोदी यांच्याशी बोलतांना अनेक बाबतीत नव्याने सुरुवात करण्यावर भर दिला आहे, ही घटना पुरेशी बोलकी आहे.

दोन्ही पक्षांचे जाहीरनामे असे होते.

1) मजूर पक्ष करसंकलन वाढवणार, पण प्राप्तिकरात मात्र वाढ करणार नाही, नवीन नेबरहूड हेल्थ सेंटर उभारणार, हरित प्रकल्पांत मोठी गुंतवणूक करणार,  संरक्षणावरील बजेटमध्ये 2.5 टक्के वाढ करणार आहे. ही आश्वासने प्रत्यक्षात उतरवणे वाटते तेवढे सोपे नाही. ती पूर्ण करतांना मजूर पक्षाला कितीतरी अडथळे पार करावे लागणार आहेत. 

2) हुजूर पक्ष अर्थव्यवस्थचे सक्षमीकरण,  करकपात, सार्वजनिक आरोग्याच्या बजेटमध्ये  वाढ, स्थलांतरितांच्या संख्येवर नियंत्रण  यावर भर देणार होता. आता विरोधी पक्ष या नात्याने हे मुद्दे लावून धरण्यात हुजूर पक्ष किती यशस्वी होतो, हेही पहावे लागेल. आपला जाहीरनामा मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यापेक्षा कसा अधिक चांगला होता, हे दाखवण्यासाठी हुजूर पक्षाला आपले वादपटुत्व पणाला लावावे लागणार आहे.


No comments:

Post a Comment