Monday, April 14, 2014

Charli Chaplin 16th April 1889 - 25th December 1977

कलाविष्काराला कारुण्याची  किनार
            वसंत गणेश काणे
हल्ली मुक्काम पुणे
९४२२८०४४३०
१६ एप्रिल २०१४ ला जगविख्यात विनोदी अभिनेता ,पहिल्या श्रेणीचा लेखक, दिग्दर्शक, सादरकर्ता (प्रोड्यूसर), संगीत रचनाकार, कमालीच्या परिपूर्णतेचा पुरस्कर्ता आणि तरीही आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी अशा अनेकविध गुणांचा एकाच व्यक्तिमत्वात समुच्चय असलेला करुणेचा कैवारी चार्ली चॅप्लिन याची १२५वी जयंती आहे. रंगभूमी म्हटली की शेक्सपिअर हा मापदंड मानला जातो. त्याचप्रमाणे सिनेमा म्हटला की, चार्ली चॅप्लिन असे समीकरण आहे. जेम्स बाँड ह्या पात्रानेही अफाट लोकप्रियता मिळविली पण ००७ म्हणजे कुणालाही संपवण्याचा परवाना (लायसन्स टू किल) असलेल्या या पात्राची जातकुळी वेगळीच आहे. लॉरेल आणि हार्डी ही जोडगोळीही खूप गाजली. एक जाड्या तर दुसरा रड्या पण संपूर्ण कथानकात निखळ विनोद आणि हलकी फुलकी गंमत यांची रेलचेल म्हणजे लॉरेल आणि हार्डी यांचे चित्रपट. एक लठ्ठ आणि बराचसा बावळट तर दुसरा काटकुळ्या शरीरयष्टीचा पण चतुर आणि समयसूचकता असलेला.
चार्ली चॅप्लिनची  स्वतंत्र शैली
चार्ली चॅप्लिनचे असे नव्हते. त्याची स्वत:ची अशी स्वतंत्र शैली होती. ती काळ आणि संस्कृती यांचे बंधन तोडून स्वछन्दपणे संचार करीत राहिली. त्याची कलाकृती अभिजात स्वरुपाची होती. अशा कलाकृतीची नक्कल करणे कठीण  असते.तसेच तिला स्थळकाळाचे बंधन नसते. त्यामुळेच चार्ली चॅप्लिनचे त्याकाळचे बोलपटच नव्हेत तर मूकपटही आजसुद्धा रसिकांच्या आवडीचे झाले आहेत.
चार्ली चॅप्लिनचे मूकपट गाजले ते त्यांच्या शब्दाशिवाय संवाद साधण्याच्या वैशिष्ट्यामुळे. कॅमेरा आणि स्वत:चे शरीर यांचा त्याने मोठ्या शिताफीने आणि कौशल्याने उपयोग करून घेतलेला आढळतो. त्याचा मुद्राभिनय लाजबाब होता.
चार्ली चॅप्लिनच्या वाट्याला ८८ वर्षांचे दीर्घायुष्य आले होते. कलाकार म्हणून त्याची कारकीर्द ७५ वर्षांची होती. त्याने आपल्या दीर्घायुष्याचे सोने केले, असेच म्हटले पाहिजे. आपल्या कार्यकाळात त्याने अनेक चित्रपट निर्माण केले.विनोद, वक्रोक्ती, विडंबन यांचा आधार घेऊन सामाजिक अपप्रवृत्ती ,राजकीय अरेरावी आणि हुकुमशाही, यांत्रिकतेने मानव्याची केलेली घुसमट बळवंत आणि धनवंतांनी जनसामान्यांची केलेली ससेहोलपट , असा कोणता न कोणता अंत:प्रवाह त्याच्या वरवर विनोदी वाटणाऱ्या सर्वच कलाकृतींचा स्थायीभाव राहत आला आहे. याचा एक परिणाम असा झाला की,त्याची गणना केवळ प्रस्थापितांचा विरोध करणारा अशी  झाली नाही तर तो साम्यवादाची भलावण करतो,असे लोक म्हणू लागले. अमेरिकेने त्याला साम्यवादाचा समर्थक ठरविले आणि त्याला देश सोडण्यास भाग पाडले.
चार्लीचे बालपण लंडन येथे गेले. अपार दारिद्र्य आणि विपन्नावस्था यांचा सामना त्याने काबाडकष्ट करून केला. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याची आई वेडी झाल्यामुळे (सायकॉसीस) तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. त्याची  प्रत्येक कालाकृती विनोद कारुण्याची किनार घेऊन येते  याचे कारण आईचे हे वेडेपण तर नसेल ना? काबाडकष्ट करूनही दोन वेळी पोटाची खळगी भरणे कठीण व्हावे हा अनुभव,त्याला कष्टकरी लोकांबाबत वाटणाऱ्या अनुकम्पेच्या मुळाशी तर नसेल ना?तरुणपणीच त्याला दिग्दर्शनाची संधी मिळाली. त्याच्या लोकप्रियतेची कमान यानंतर उंचावतच गेली आणि तो जागतिक कीर्ती संपादन करता झाला.
मूकपट निर्माता
वयाच्या एकोणिसाव्या वर्षी चार्ली अमेरिकेत गेला.एका प्रतिष्ठाप्राप्त सिनेकम्पनीशी त्याचे करारमदार झाले. १९१४ साली त्याचा मूक चित्रपट-मेकिंग अ लिव्हिंग – रसिकमान्य झाला. १९१९साली त्याने ‘युनायटेड आरटिस्ट’ नावाची स्वतंत्र सिनेकंपनी काढली. आता त्याच्यावर कोणतेच बंधन उरले नाही. आपल्या कलाकृतीवर त्याला संपूर्ण नियंत्रण ठेवता येऊ  लागले. १९२१साली त्याने ‘द किड’ (एका अनाथ मुलाचे अनिच्छेने पालकत्व स्वीकारलेल्या मुलाची कथा), १९२३ मध्ये ‘वूमन इन पॅरीस’(अपघाताने ताटातूट झालेल्या प्रेमिकांची कथा), १९२८ मध्ये ‘दी सर्कस’(जगाला हसवणारया विदुषकाची कथा) अशा एकाहून एक सरस कलाकृतींची भेट त्याने रसिकांना दिली.
आता बोलपटांचा जमाना येऊ लागला होता पण चार्ली मूकपटच काढत राहिला. १९४०साली त्याने ‘ग्रेट डिकटेटर’ (ज्यू लोकांच्या छळाची कथा) हा चित्रपट काढला. यात केवळ हुकुमशहांची टिंगलटवाळी नाही,तर हुकुमशाहीवर कोरडे ओढले आहेत. असे म्हणतात की, हुकुमशहांचे विनोदाशी वावडे असते.ते प्रत्यक्ष शत्रूला जेवढे घाबरतात त्यापेक्षा विनोद, उपहास आणि विडंबन यांचा त्यांनी जास्त धसका घेतलेला असतो कारण प्रस्थापितांचा बुरखा फाडण्याचे या प्रकाराचे महत्त्व वादातीत आहे. यानंतरची १० वर्षे मात्र चार्लीने वादग्रस्ततेत घालविली. त्याच्या कीर्तीला ओहोटी लागली.
अमेरिका सोडली
अमेरिकेचे गुप्तहेर खाते चार्लीच्या हात धुऊन मागे लागले. ग्रेट डिकटेतरमध्ये हुकुमशाही प्रवृत्तीच्या अनेक लोकांना आपलीच प्रतिमा दिसू लागली.हे आरशाला दोष देण्यासारखे होते. शेवटी चार्लीने अमेरिका सोडली,आणि तो स्वित्झर्लंडमध्ये येऊन स्थाईक झाला.आता १९५२ मध्ये त्याने मुकपटामधली आपली भटक्याची (ट्रॅम्प) भूमिका करणे सोडून दिले.यानंतर चित्रविचित्र हालचाली व स्वत:विषयी दया उत्पन्न करणाऱ्या भावना यांचा सुंदर मेळ त्याच्या भूमिकांमधून प्रकट होऊ लागला. प्रतिकुलतेवर मात, सामाजिक आशयप्रधान कथानक, राजकीय वैचारिक भूमिका त्याच्या चित्रपटातून दिसू लागल्या.
१९७२ साली कलाविष्काराचा एक प्रकार म्हणून चित्रपटाला मान्यता मिळवून देणारा शतकातला एकमेव चित्रकर्मी असा त्याचा गौरव करण्यात आला. अखेरपर्यंत तो युरोपातच वास्तव्य करून होता.खोटे आरोप,अपप्रचार,पीत पत्रकारिता (यलो प्रेस)यांचे शुक्लकाष्ठ त्याची पाठ सोडत नव्हते. तो स्वत:ला उदारमतवादी म्हणवून घेत असे. अशा माणसाला अमेरिकेत राहणे अशक्य व्हावे, याचे त्याला सखेद आश्चर्य वाटत असे.वयाच्या ८८व्या वर्षी २५ डिसेंबर १९७७ ला या लोकविलक्षण अवलिया कलाकाराने जगातून ‘एग्झीट’ घेतले ते मात्र कायमचेच.   

           

No comments:

Post a Comment