दिन विशेष
तारीख: 15 Apr 2014 23:56:35 |
विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिन
आज १६ एप्रिल रोजी जगविख्यात विनोदी अभिनेता, पहिल्या श्रेणीचा लेखक, दिग्दर्शक, सादरकर्ता (प्रोड्यूसर), संगीतरचनाकार, कमालीच्या परिपूर्णतेचा पुरस्कर्ता आणि तरीही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी... अशा अनेकविध गुणांचा एकाच व्यक्तिमत्त्वात समुच्चय असलेला करुणेचा कैवारी चार्ली चॅप्लिन यांची आज जयंती आहे. रंगभूमी म्हटली की शेक्सपिअर हा मापदंड मानला जातो. त्याचप्रमाणे सिनेमा म्हटला की, चार्ली चॅप्लिन असे समीकरण आहे. जेम्स बॉंड या पात्रानेही अफाट लोकप्रियता मिळविली. पण म्हणजे कुणालाही संपवण्याचा परवाना (लायसन्स टू किल) असलेल्या या पात्राची जातकुळी वेगळीच आहे. लॉरेल आणि हार्डी ही जोडगोळीही त्याकाळी खूप गाजली. एक जाड्या तर दुसरा रड्या, पण संपूर्ण कथानकात निखळ विनोद आणि हलकीफुलकी गंमत यांची रेलचेल म्हणजे लॉरेल आणि हार्डी यांचे चित्रपट. एक लठ्ठ आणि बराचसा बावळट, तर दुसरा काटकुळ्या शरीरयष्टीचा पण चतुर आणि समयसूचकता असलेला.
चार्ली चॅप्लिनचे असे नव्हते. त्याची स्वत:ची अशी स्वतंत्र शैली होती. ती काळ आणि संस्कृती यांचे बंधन तोडून स्वछंदपणे संचार करीत राहिली. त्याची कलाकृती अभिजात स्वरूपाची होती. अशा कलाकृतीची नक्कल करणे कठीण असते. तसेच तिला स्थळकाळाचे बंधन नसते. त्यामुळेच चार्ली चॅप्लिनचे त्याकाळचे बोलपटच नव्हेत, तर मूकपटही आजसुद्धा रसिकांच्या आवडीचे झाले आहेत.
चार्ली चॅप्लिनचे मूकपट गाजले ते त्यांच्या शब्दाशिवाय संवाद साधण्याच्या वैशिष्ट्यामुळे! कॅमेरा आणि स्वत:चे शरीर यांचा त्याने मोठ्या शिताफीने आणि कौशल्याने उपयोग करून घेतलेला आढळतो. त्याचा मुद्राभिनय लाजबाब होता.
चार्ली चॅप्लिनच्या वाट्याला ८८ वर्षांचे दीर्घायुष्य आले होते. कलाकार म्हणून त्याची कारकीर्द सुमारे ६० वर्षांची होती. त्याने आपल्या दीर्घायुष्याचे सोने केले, असेच म्हटले पाहिजे. आपल्या कार्यकाळात त्याने अनेक चित्रपट निर्माण केले. विनोद, वक्रोक्ती, विडंबन यांचा आधार घेऊन सामाजिक अपप्रवृत्ती, राजकीय अरेरावी आणि हुकूमशाही, यांत्रिकतेने मानव्याची केलेली घुसमट, बळवंत आणि धनवंतांनी जनसामान्यांची केलेली ससेहोलपट, असा कोणता न कोणता अंत:प्रवाह त्याच्या वरवर विनोदी वाटणार्या सर्वच कलाकृतींचा स्थायीभाव राहत आला आहे. याचा एक परिणाम असा झाला की, त्याची गणना केवळ प्रस्थापितांचा विरोध करणारा अशी झाली नाही, तर तो साम्यवादाची भलावण करतो, असे लोक म्हणू लागले. अमेरिकेने त्याला साम्यवादाचा समर्थक ठरविले आणि त्याला देश सोडण्यास भाग पाडले.
चार्लीचे बालपण लंडन येथे गेले. अपार दारिद्र्य आणि विपन्नावस्था यांचा सामना त्याने काबाडकष्ट करून केला. त्याच्या वयाच्या चौदाव्या वर्षी त्याची आई वेडी झाल्यामुळे (सायकॉसिस) तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. त्याची प्रत्येक कलाकृती विनोद आणि कारुण्याची किनार घेऊन येते, याचे कारण आईचे हे वेडेपण तर नसेल ना? काबाडकष्ट करूनही दोन वेळी पोटाची खळगी भरणे कठीण व्हावे हा अनुभव, त्याला कष्टकरी लोकांबाबत वाटणार्या अनुकंपेच्या मुळाशी तर नसेल ना? तरुणपणीच त्याला दिग्दर्शनाची संधी मिळाली. त्याच्या लोकप्रियतेची कमान यानंतर उंचावतच गेली आणि तो जागतिक कीर्ती संपादन करता झाला.
वयाच्या एकोणिसाव्या वर्षी चार्ली अमेरिकेत गेला. एका प्रतिष्ठाप्राप्त सिनेकंपनीशी त्याचे करारमदार झाले. १९१४ साली त्याचा मूक चित्रपट- ‘मेकिंग अ लिव्हिंग’ रसिकमान्य झाला. १९१९ साली त्याने युनायटेड आर्टिस्ट नावाची स्वतंत्र सिनेकंपनी काढली. आता त्याच्यावर कोणतेच बंधन उरले नाही. आपल्या कलाकृतीवर त्याला संपूर्ण नियंत्रण ठेवता येऊ लागले. १९२१ साली त्याने ‘द किड’ (एका अनाथ मुलाचे अनिच्छेने पालकत्व स्वीकारलेल्या मुलाची कथा), १९२३ मध्ये ‘वूमन इन पॅरीस’ (अपघाताने ताटातूट झालेल्या प्रेमिकांची कथा), १९२८ मध्ये ‘दी सर्कस’ (जगाला हसवणार्या विदुषकाची कथा) अशा एकाहून एक सरस कलाकृतींची भेट त्याने रसिकांना दिली. १९२९ साली त्याच्या अभिनयासाठी त्याला ऍकेडेमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
आता बोलपटांचा जमाना येऊ लागला होता, पण चार्ली मूकपटच काढत राहिला. १९४० साली त्याने ‘द ग्रेट डिक्टेेटर’ (ज्यू लोकांच्या छळाची कथा) हा चित्रपट काढला. यात केवळ हुकूमशहांची टिंगलटवाळी नाही, तर हुकूमशाहीवर कोरडे ओढले आहेत. असे म्हणतात की, हुकूमशहांचे विनोदाशी वावडे असते. ते प्रत्यक्ष शत्रूला जेवढे घाबरतात त्यापेक्षा विनोद, उपहास आणि विडंबन यांचा त्यांनी जास्त धसका घेतलेला असतो. कारण, प्रस्थापितांचा बुरखा फाडण्याचे या प्रकाराचे महत्त्व वादातीत आहे. यानंतरची अनेक वर्षे मात्र चार्लीने वादग्रस्ततेत घालविली. त्याच्या कीर्तीला ओहोटी लागली.
अमेरिकेचे गुप्तहेर खाते हात धुऊन चार्लीच्या मागे लागले. ‘द ग्रेट डिक्टेटर’मध्ये हुकूमशाही प्रवृत्तीच्या अनेक लोकांना आपलीच प्रतिमा दिसू लागली. हे आरशाला दोष देण्यासारखे होते. शेवटी चार्लीने अमेरिका सोडली आणि तो स्वित्झर्लंडमध्ये येऊन स्थायिक झाला. नंतर त्याने मूकपटामधली आपली भटक्याची (ट्रॅम्प) भूमिका करणे सोडून दिले. यानंतर चित्रविचित्र हालचाली व स्वत:विषयी दया उत्पन्न करणार्या भावना यांचा सुंदर मेळ त्याच्या भूमिकांमधून प्रकट होऊ लागला. प्रतिकूलतेवर मात, सामाजिक आशयप्रधान कथानक, राजकीय वैचारिक भूमिका त्याच्या चित्रपटातून दिसू लागल्या.
१९७१ साली कलाविष्काराचा एक प्रकार म्हणून चित्रपटाला मान्यता मिळवून देणारा शतकातला एकमेव चित्रकर्मी, असा त्याचा गौरव करण्यात आला. तत्पूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि डरहॅम विद्यापीठाने चार्ली चॅप्लिनला ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ पदवीने सन्मानित केले. १९७२ साली त्याला व्हेनिस चित्रपट महोत्सवात ‘गोल्डन लॉयन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७५ साली न्यू इयर ऑनर्स अंतर्गत चार्लीला ‘नाईट कमांडर ऑफ मोस्ट एक्सलन्स ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ आणि फ्रांस सरकारने ‘कमांडर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लिजियन ऑफ ऑनर’ने गौरवान्वित करण्यात आले. चार्लीच्या आणखी दोन चित्रपटांना ऍकेडेमी अवॉर्ड मिळाले. चार्लीवर नंतर तर पुरस्कारांचा अक्षरश: पाऊसच पडला! त्याच्या मूकपटातील संगीताचा महिमा म्हणजे अनेक भारतीय संगीतकारांनी त्याच्या चित्रपटातील संगीतावरून गाण्याच्या चाली रचल्या. अखेरपर्यंत तो युरोपातच वास्तव्य करून होता. खोटे आरोप, अपप्रचार, पीत पत्रकारिता (यलो प्रेस) यांचे शुक्लकाष्ठ त्याची पाठ सोडत नव्हते. तो स्वत:ला उदारमतवादी म्हणवून घेत असे. अशा माणसाला अमेरिकेत राहणे अशक्य व्हावे, याचे त्याला सखेद आश्चर्य वाटत असे. वयाच्या ८८ व्या वर्षी २५ डिसेंबर १९७७ ला या लोकविलक्षण अवलिया कलाकाराने जगातून एग्झिट घेतली ती मात्र कायमचीच. पण, येथेही नियतीने वेगळाच डाव खेळला. काही समाजकंटकांनी चार्लीचे शव उकरून त्याचे अपहरण केले व त्याच्या पत्नीकडे खंडणी मागितली. नंतर पोलिसांनी ते प्रेत महत्प्रयासाने हस्तगत केले व नंतरही सन्मानाने दफन केले. चित्रपटाच्या इतिहासात चार्ली चॅप्लिन आपले नाव अजरामर करून गेला.
वसंत गणेश काणे , पुणे
No comments:
Post a Comment