Saturday, June 21, 2014

अमेरिकन गवळी -लोकशाही वार्ता - २१.०६.२०१४ रविवार


यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया
अमेरिकेत पाश्‍चराइज्ड दूध मिळते. गॅलनभर दूध सोयीनुसार मॉलमधून घेऊन यायचे आणि ते फ्र ीजमध्ये ठेवून लागेल तसे वापरायचे, अशी पद्धत इथे रूढ आहे. हे दूध पाश्‍चराइज्ड तसेच होमोजीनाइज्ड असते. हे दूध फ्रीजमध्ये ठेवायचे आणि लागेल तसे वापरायचे. ते न तापवता वापरले तरी चालते. तसेच हे दूध कितीही तापवले तरी साय येत नाही किंवा यातील स्निग्ध पदार्थ वेगळे करता येत नाहीत. सौ नीलमने 'रॉ' (निरसं दूध) मिल्क म्हणजे कोणतीही प्रRिया न केलेले दूध मिळू शकेल का, याचा शोध घेण्यास सुरवात केली. इथल्या 'मंडईमध्ये' असं निरसं दूध ती शेतकर्‍याकडून बाजारात जाऊन घेत असे. आणि काय आश्‍चर्य? एक दिवस तिला फेसबुकवर एक जाहिरात दिसली. त्यात दुधाचे सगळे प्रकार (यात 'रॉ' मिल्कही - निरसं दूध - समाविष्ट होतं) घरपोच देण्याचा उल्लेख होता. डिलिव्हरी चार्जेस फक्त चार डॉलर इतकेच(!) होते. एका गॅलनला (साडे चार लिटर) दहा डॉलर असा दर होता. त्यामुळे दर आठवड्याला दूध न घेता दर दोन आठवड्यांनी घेण्याचे ठरविले. हे दूध तापविले की चांगली जाड साय येते. तूप वेगळे खरेदी करण्याची गरज पडत नाही.
पण गवळ्याला एक अभिवचन (डिक्लरेशन ) द्यावे लागते. गाईचे पोषण कशाप्रकारे झाले आहे, त्याबद्दल आश्‍वासन द्यावे लागते.
१. अ) दूध वाढावे, म्हणून गाईला हार्मोनचे इंजेक्शन दिलेले नाही. ब)तिला अँटीबायॉटिक औषधे/ इंजेक्शने दिलेली नाहीत. क) तिने जे गवत किंवा वनस्पती किंवा अन्य प्रकारचे अन्न खाल्ले आहे त्यावर कीटकनाशके फवारलेली नाहीत ड) रासायनिक खाते दिलेल्या गवतावर तिचे पोषण झालेले नाही.
२. तिचे पोषण पूर्णपणे नैसर्गिक अन्नावर झालेले आहे.
३. ती जी एमओ (जेनेटिकली मॉडिफाइड ऑरागॅनिझम) या प्रकारात मोडत नाही.
अशा प्रकारची गाय असेल तर दुधाचा भाव दहा डॉलरला एक गॅलन, असा असतो एरवी तो तीन डॉलरला एक गॅलन असा भाव असतो.
मुद्दा वेगळाच आहे. अमेरिकेतही घरपोच दूध पोचवणारे गवळी आहेत. हे गवळी ट्रकमध्ये कॅन भरभरून दूध आणतात आणि चार डॉलर डिलिव्हरी चार्जेस घेऊन घरोघर दूध पोचवतात ही माझ्यासाठी आश्‍चर्याची गोष्ट होती. म्हणून या 'घरपोच दूध' प्रश्नाकडे साहजिकच माझे लक्ष गेले.
अमेरिकेतील गोपालन आणि गोसंवर्धन
या प्रदेशात कडाक्याची थंडी असते. त्यामुळे इथले 'गोठे' वातानुकुलित असतात. इथल्या गाईंना कृत्रिम रीत्या फळवतात. वासरू जन्माला येताच त्याला वेगळे करून बाटलीने दूध पाजून वाढवतात. त्यांना वातानुकुलित खोल्यात वाढवतात. ज्या कालवडी असतात, त्यांना गाई म्हणून वाढवतात. जे खोंड असतात, ते पुरेसे वाढले ही, त्यांची कत्तलखान्यात नेऊन हत्या करतात आणि त्यांच्या मासाचे पावाच्या आकाराचे तुकडे करून ते पॅक करून वातानुकुलित मॉलमध्ये विRीला ठेवतात.
याबाबत एक कथा कानावर आली. एक माणूस गायी पाळत आहे. जन्मलेले वासरू खोंड असेल तर त्याला पुरेसे वाढवून तो त्याला कत्तलखान्यात घेऊन जातो. त्याच्या मासाचे घनाकार तुकडे करून घरी घेऊन येतो. ते भल्यामोठय़ा फ्र ीज मध्ये रचून ठेवतो. रोज एक तुकडा काढून तो ओव्हनमध्ये शिजवतो आणि मिरे मीठ लावून खातो. हा साठा संपतो तोपर्यंत दुसरा खोंड मोठा झालेला असतो. आपल्या सारख्या गोपूजकांच्या आणि गोभक्तांच्या अंगावर शहारे आणणारा हा सर्व प्रकार आहे.
गोपूजक हिंदुस्थान म्हशीचे दूध पितो
एक मात्र नक्की आहे. इथे गोसंवर्धन आणि गोपालन मात्र उत्तम रीत्या होते. पण त्याचे कारण अगदी वेगळे आहे. खोंड कापून भरपूर मांस मिळते. ते चविष्टही असते, असे म्हणतात. या साठीच येथे गायींची निगा राखली जाते. येथे गोपूजन ही संकल्पनाच नाही. गोपूजाकांच्या आपल्या देशात गायींची काय अवस्था आहे, ते आपण पाहतोच आहोत. आपल्या येथे गोपूजन आहे. पण गोपालन आणि गोसंवर्धन याबद्दल न बोललेच बरे. याउलट अमेरिकेत किंवा पाश्‍चात्य देशात गोपालन आणि गोसंवर्धन उत्तम आहे पण गाई विषयी उत्तम दूध आणि भरपूर मांस देणारा प्राणी या व्यतिरिक्त दुसरा भाव नाही. आणखीही एक विरोधाभास आहे. गोपूजन करणारा हिंदुस्थान म्हशीचे दूध पितो. गोभक्षण करणारा अमेरिकन गायीचेच दूध पितो.
गायींना भरपूर दूध असते. सर्व दूध यंत्राने काढून घेतात. अगदी थेंब न थेंब काढून घेतात. आपल्या येथे दूध काढल्यानंतर वासरांसाठी दूध राखून ठेवतात. इथे वासरांना बाटलीने दूध पाजून वाढवतात. त्यामुळे वासरांसाठी दूध राखून ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच वासरांना वातानुकुलीत गोठय़ांमध्ये वाढवतात. कारण निदान सहा महिने तरी इथे भरपूर बर्फ पडत असतो. ही थंडी गाईंना किंवा वासरांना मानवत नाही. म्हणून ही व्यवस्था करावी लागते.
नॉनव्हेज,व्हेज आणि विगन
अमेरिकेत विविध प्रकारचे, प्रथा परंपरा जपणारे लोक आढळतात. नॉनव्हेज म्हणजे मांसाहारी हे आपल्याला माहीत आहे. यातही दोन प्रकार आहेत. काहींना बीफ(गोमांस ) चालत नाही. इतर सर्व मांसाहार त्यांना चालतो. काहींना हॅम (डुकराचे मांस) चालत नाही. बाकी सर्व प्रकार चालतात. व्हेजिटेरियन (शाकाहारी) यांना मांसाहार चालत नाही, हे आपल्याला माहीत आहे. पण दूध, दही चालते. आहार पद्धतीनुसार माणसांचा आणखी एक प्रकार इथे आहे. त्यांना 'विगन' असे म्हणतात. यांना दूध सुद्धा चालत नाही. दुधालाही ते मांसाहारच मानतात. प्राण्यापासून मिळालेला कोणताही पदार्थ त्यांच्या दृष्टीने नॉनव्हेजच असतो. अपवाद असतो तो फक्त आईच्या दुधाचा! ही मंडळी वनस्पतीपासून दुधासारखा पदार्थ तयार करून ते दूध म्हणून वापरतात. आपल्या इथे तर आजीबाईच्या उपासाला सुद्धा दूध, दही, ताक, तूप हे प्रकार चालतात. दुधाला मांसाहार समजायचे की शाकाहार हा वादाचा मुद्दा आहे, हा विषय तर्काच्या कसोटीवर न्यायचा म्हटले तर दूध हा मांसाहारच ठरणार नाही का? मात्र तर्काचा आधार आपण अनेकदा घेतच नाही. म्हणून शाकाहारी मंडळींनी श्रीखंड, बासुंदी, रसगुल्ले यावर ताव मारायला हरकत नाही.
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४0 0२२

No comments:

Post a Comment