मु.पो.– यॉर्क, अमेरिकेची पहिली राजधानी
माझी अमेरिका वारी
वसंत गणेश काणे
एल बी ७,
लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२
बी एस्सी ;एम
ए(मानसशास्त्र); एम.एड.
0712)2221689,
9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak
Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया
अमेरिकेतील पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील यॉर्क काउंटी मध्ये(काउंटी
म्हणजे जिल्हा) वसलेले हे त्याच नावाचे एक
टुमदार शहर आहे. हे शहर ‘व्हाईट रोज सिटी’ या नावाने प्रसिद्ध आहे. हाऊस (सभागृह) ऑफ यॉर्क वर पांढऱ्या गुलाबाचे
चिन्ह आहे, त्यावरून ‘व्हाईट रोज सिटी’ हे नाव पडले, असे ऐकले. संमिश्र
लोकसंख्या असलेले यॉर्क हे शहर मुख्यत: जर्मन लोकांनी वसवलेले आहे. मुख्य शहर
आणि उपनगरे यांची मिळून या शहराची लोकसंख्या दहा लक्षापेक्षा जास्त आहे. ही
अमेरिकेची पहिली राजधानी आहे. अमेरिकेच्या आजच्या राज्यघटनेचे लेखन या शहरात झाले
आहे,असे या शहराचे ऐतिहासिक महत्व आहे. पण अनेकांचा पहिल्या राजधानीचा मान या
शहराला द्यायला विरोध आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, ज्यावेळेला हे घडले त्यावेळी
संयुक्त राज्य (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) अस्तित्वातच आले नव्हते. तर मग यॉर्क ही त्याची राजधानी कशी
म्हणायची? आपण या वादात पडूया नको. राज्य घटनेच्या लेखनाची धुरा जेफरसन यांनी
सांभाळली होती या कामात बेन्जामिन फ्रँन्क्लीन यांचाही मोलाचा
सहभाग होता.
अमेरिका राष्ट्र या
नात्याने लहान वयाचे आहे. त्यामुळे येथील प्रत्येक गाव कोणत्या ना कोणत्या
दृष्टीने महत्वाचे आहे. तसेच या राष्ट्राच्या उभारणीच्या कामात अनेकांचे महत्वाचे
योगदान असते तसेच याची बहुतेकांना आदरयुक्त जाणीव असते. पण याची कायमस्वरूपी आठवण असावी
म्हणून आपल्याप्रमाणे प्रात:स्मरण असावे, असे वाटते. एका अमेरिकन बुध कौशिक ऋषीने या देशात जन्म घ्यावा आणि त्याने असे प्रात:स्मरण
रचावे, असे वाटून गेले. अशी या भूमीची आणि इथल्या व्यक्तींची महती नक्कीच आहे.असो.
यॉर्क शहरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. यापैकी
मला तीन स्थळे विशेष महत्वाची वाटली शू हाउस, यार्क सिटी एरिना आणि यॉर्क सेन्ट्रल मार्केट ही तीन मला विशेष महत्वाची वाटली. अर्थात व्यक्तिपरत्वे
आवडीनिवडी बदलणारच .
‘शू हाउस’ एक अफलातून कल्पना
जोड्याच्या आकाराचे ‘शू
हाउस’ ही एक अजब कमाल आहे. याची रचना करणारा एक अवलियाच म्हटला पाहिजे. याची
बांधणी कर्नल मालोन हेन्स याने केली आहे. याचा पादत्राणे तयार करण्याचा व्यवसाय
होता. माणूस हाडाचा ‘बेपारी’ होता. या व्यवसायातला तो बादशहा (विझार्ड) मानला
जातो. निरनिराळ्या ठिकाणी त्याची चाळीस दुकानांची मालिका होती. आपली आणि आपल्या
व्यवसायाची प्रसिद्धी व्हावी म्हणून त्याने चक्क जोड्याच्या आकारचे ‘शू हाउस’ बांधले आहे. ४८
फूट लांब, १७ फूट रुंद आणि २५ फूट उंचीचे हे पादत्राणगृह हेन्सने १९४८ साली
बांधले. बांधकामात लाकडाचा उपयोग मुख्यत: करण्यात आला असून आवश्यक तिथे तारा आणि
सिमेंटचा वापर मजबुतीसाठी केला आहे. यात तीन बेड रूम्स, दोन बाथ रूम्स एक किचन आणि
लिव्हिंग रूम आहे..
सुरवातीला हेन्स वयस्कर दाम्पत्याला
या ‘गेस्ट हाउसमध्ये’ रहायला बोलवी. त्यांची राजेशाही बडदास्त ठेवी. जातांना
त्यांना कपडेलत्ते देऊन त्यांची बोळवण करी. पुढे तो हे ‘गेस्ट हाउस’ मधुचंद्राला
येणाऱ्या जोडप्यांना देऊ लागला. हेन्सच्या आरोग्यविषयक सवयी वाखाणण्यासारख्या
होत्या. तो स्वत: निर्व्यसनी तर होताच पण धुम्रपानविरोधी मोहीम सुरु होण्या अगोदारपासूनच
त्याचा धुम्रपानाला विरोध होता. रस्त्याने कोणी सिगरेट ओढत जाताना दिसला तर तो त्याच्या
तोंडातील सिगरेट काढून घेई. त्याने सिगरेट पिणे सोडल्यास त्याला पैसे देऊ करी.
त्याने जसा भरभरून पैसा मिळवला तसाच तो वाटून टाकला. ‘मी या जगात निष्कांचन
अवस्थेत जन्माला आलो आहे, निष्कांचन अवस्थेतच जगाचा निरोप घेईन’, असे तो म्हणत
असे. हे ऐकले की, ‘मुठ्ठी बांधके आये हो,(मूल जन्माला येत तेव्हा त्याच्या मुठी
आवळलेल्या असतात), हाथ पसारे जावोगे’, या (बहुदा) महात्मा कबीराच्या दोह्यातील पंक्तीची आठवण होते.असो.
आज हे ‘शू हाऊस’ एक पर्यटन स्थळ झाले आहे.
यॉर्क सिटी एरिना
यॉर्क शहरातील हे दुसरे एक महत्वाचे आणि कल्पकतेने
उभारलेले स्थान आहे. इथे वर्षाचा बहुतेक काळ हा
सर्व भूभाग बर्फाने झाकलेला असतो.
स्केटिंग आणि बर्फावरची हॉकी हे खेळ या
निमित्ताने खेळले जातात. निसर्गाच्या प्रतिकूलतेला अनुकूलतेत परिवर्तित करण्याच्या
अमेरिकन लोकांच्या गुणाला आणि वृत्तीला दाद दिली पाहिजे, असे वाटते. अर्थात याला
पर्यायही नाही, हेही खरे आहे .
यॉर्क सेन्ट्रल मार्केट
यॉर्क सेन्ट्रल मार्केट ही योजना ग्राहकांसाठी
तसेच शेतकऱ्यांसाठीही खूपच महत्वाची आहे. तशीच ती अनुकरणीयही आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये
कोणताही मध्यस्त न ठेवता सरळ आणि प्रत्यक्ष संबंध निर्माण करण्यासाठीची ही योजना
आहे. आपल्या नागपुरातील कॉटन मार्केटच्या दसपट आकाराची भलीमोठी आणि भरपूर
उंचीची ही इमारत आहे. मधोमध हिंडण्यासाठी जागा असलेली लंबवर्तुळाकृती टेबले
मांडलेली रचना आपण पाहिलेली आहे. अशी रचना करून साधारणपणे संस्थेच्या
कार्यकारिणीच्या सभा घेण्याची पद्धतीही
आपल्या परिचयाची आहे. योग्य अंतर ठेवून अशी शंभरावर गट मांडलेले असतात. एका गटात दहा ते पंधरा टेबले असतात. आतमध्ये विक्रेत्या महिला
उभ्या असतात. टेबलांवर टोपल्यांमध्ये भाज्या ठेवलेल्या असतात. गिऱ्हाइक बाहेरच्या बाजूने
येऊन भाजी निवडतात. भाजी निवडून झाली की ती आतमध्ये उभ्या असलेल्या विक्रेतीजवळ
द्यायची. ती भाजी पिशवीत भरून विक्रेती तिचे वजन करते आणि किंमत सांगते. तेवढी
रक्कम देऊन ती भाजी विकत घ्यायची, अशी विक्रीची पद्धती असते. सेन्ट्रल यॉर्क मार्केट मध्ये फक्त दर शुक्रवारी हा बाजार भरतो.
आठवड्याच्या प्रत्येक वारी प्रत्येक भागात असा बाजार भरतो. भाजी/धान्य पिकवणारे आणि ग्राहक यांचा प्रत्यक्ष संबंध अशाप्रकारे येत असतो. या पद्धतीत मध्यस्त
पूर्णपणे वगळला जातो. अशी पद्धती काही फेरफार करून आपल्या इथे राबवता येऊ शकते. आपल्या
येथे भाज्यांचे भाव जेव्हा वाढतात, तेव्हा फायदा द्लालांचाच होत असतो. वाढलेल्या
किमतीचा लाभ ग्राहकांना फारसा मिळतच नाही. आमदार / खासदार निधीतून अशा इमारती
बांधता येतील आणि शेतमाल विकणाऱ्यांची सोय करता येईल. पण कुणीतरी हे मनावर घ्यावयास
हवे आहे. आपल्या इथली हीच प्रमुख अडचण आहे.
No comments:
Post a Comment