Saturday, September 3, 2016

मित्रवर्य प्रभाकर चांदे
ज्येष्ठ सहकारी व मित्र प्रभाकर उपाख्य बाबूराव चांदे यांचे देहावसान झाल्याचे वृत्त कानावर पडले आणि माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा कालखंड नजरेसमोर उभा राहिला. धरमपेठ शाळेत आम्ही अनेक वर्षे बरोबर काम केले होते. त्या निमित्ताने आम्ही चांगले मित्र झालो होतो. त्यांचा व्यासंग फार दांडगा होता. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना एक वेगळाच आनंद व समाधान वाटत असे. त्यांचे इंग्रजी विषयाचे ज्ञान उत्तम होतेआणि स्टेट्समन सारखी वृत्तपत्रे ते नियमितपणे वाचत. माझे वाचन सामान्यत: प्रादेशिक वृत्तपत्रापुरतेच असे. त्यामुळे त्यांच्या तोंडून स्टेट्समन किंवा टाईम्स आॅफ इंडिया सारख्या वृत्तपत्रातील बातम्या व लेखांवर आमचे बोलणे नित्यनियमाने होत असे. त्या काळी प्रसार माध्यमे आजच्या सारखी सहज आटोक्यात असलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्या सोबतचा वार्तालाप मला खूपच महत्त्वाचा वाटत असे. ते वृत्तपत्रातही लिहीत असत. त्या निमित्ताने त्यांचे त्यावेळचे तरूणभारताचे संपादक श्री मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांचेशीही बोलणे व वार्तालाप होत असे. लेखक वर्तमानपत्रात  लेख लिहितांना उत्तरोत्तर अधिकाधिक कडक भाषा वापरू लागतो आणि त्यामुळे वृत्तकपत्रीय लेखनात हळूहळू टोकाची भाषा वापरण्याची लेखकाला कशी सवय लागते व त्यामुळे लेखात केवळ शिवराळपणा शिवाय दुसरे काही कसे आढळत नाही, याबद्दल श्री. बाबूराव यांनी त्यांचा कसा सोदाहरण पाठ घेतला घेतला हे त्यांनी मला बोलतांना सांगितले. विषय महत्त्वाचा होता म्हणून म्हणा, बाबूरावांनी शिकवलेला धडा त्यांना नेमका लागू पडत होता म्हणून म्हणा किंवा त्यांची सांगण्याची पद्धत परिणामकारक होती म्हणा पण हा मुद्दा माझ्या कायमस्वरुपी लक्षात राहिला आहे. आजही काही लिहून हातावेगळे केल्यावर ह्या गोष्टीचे स्मरण मला दरवेळी होते आणि लिहिलेल्या मजकुरावरून मी पुन्हा एकदा हात फिरवतो. 
 त्यांनी  घर बांधताना ग्काॅन्ट्रॅक्टर ग्राहकाला कसा बेजार करतो, या विषयावर लिहिलेले ‘विश्वासघात’ हे नभोनाट्य त्यावेळी विशेष गाजले होते.
पुढे बाबूराव कामठीच्या पोरवाल काॅलेजमध्ये गेल्यानंतर भेटी हळूहळू कमी होत गेल्या. आता एवढ्यात रस्त्यावरच भेटी व नमस्कार चमत्कार व्हायचे. बाबूरावांच्या हाती काठी असे. मी त्यांना म्हटले, ‘बाबूराव हातात काठी आली’. त्यावर ते म्हणाले, रस्त्यावरची कुत्री त्रास देतात. म्हणून ही काठी असते’. यावर मी हसलो आणि तेही हसले. 
त्यांची शेवटची आठवण म्हणून हा हसरा चेहराच यापुढे साथ देत राहील. 
  ईश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना व आप्तेष्टांना त्यांच्या वियोगाचे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना.
वसंत गणेश काणे,     
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२हल्ली मुक्काम प्राईम रोज लेन नाॅर्थ, याॅर्क, पेन्सिलव्हॅनिया  ९४२२८०४४३०    E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?

No comments:

Post a Comment