Tuesday, October 31, 2017

कांडला ते अफगाणिस्तान व्हाया छाबहार’


‘कांडला ते अफगाणिस्तान व्हाया छाबहार’
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   अबू रायहान अल्- बिरुनी हा एक मुस्लिम खगौलशास्त्रज्ञ, गणिती, भूगोलतज्ञ, वैज्ञानिक व इतिहासकार मध्ययुगात होऊन गेला. त्याने इस्लामला भारताचा सखोल परिचय करून दिला, असे मानतात. गणितीय तंत्र वापरून त्याने पृथ्वीचा व्यास मोजण्याचा प्रयत्न केला होता असेही मानतात. भारताचा समुद्रकिनारा छाबहार बंदरापासून सुरू होतो, असे लिहून ठेवले आहे. इराणमध्ये पूर्वेकडे टिस नावाचे शहर होते. तेच आजचे छाबहार बंदर होय. ही कथा आहे दहाव्या शतकातली.
आज एकविसावे शतक आहे. बिरुनीचे शब्द या शतकात खरे होत आहेत. भारताने एक जहाजभरून गहू अफगाणिस्तानला पाठविण्यासाठी छाबहार बंदराचा उपयोग केला आहे. अफगाणिस्तानला समुद्र किनारा नाही. त्यामुळे इराणमधील छाबहार बंदराचा आधार भारताने धेतला आहे. सध्या छाबहार बंदराचा विकास व्हावा, म्हणून भारत इराणला मदत करीत आहे. हा गहू पाठवताना भारताने पाकिस्तानला एकप्रकारे वळसा घालून अफगाणिस्तानला अन्नतुटवड्याच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानची निर्मिती होण्यापूर्वी भारताच्या सीमा अफगाणिस्तानशी जोडलेल्या होत्या. त्यामुळे भारतातून अफगाणिस्तानला जाण्याचा खुश्कीचा मार्ग उपलब्ध होता. आता पाकिस्तानच्या निर्मितीनंतर हा मार्ग बंद झाला/केला आहे. त्यामुळे जल वाहतुकीने प्रथम इराणच्या छाबहार बंदरात व तिथून अफगाणिस्तानमध्ये मात्र जमिनीवरून वाहतुक करून भारताने पाकिस्तानने केलेली अफगाणिस्तानची कोंडी फोडली आहे व भारत आणि अफगाणिस्तानमध्ये एक नवीन व्यापारी मार्ग निर्माण केला आहे व भारताचा समुद्रकिनारा छाबहारपासून सुरू होतो हे दहाव्या शतकात होऊन गेलेल्या बिरुनीचे शब्द वेगळ्याप्रकारे खरे करून दाखविले आहेत.
इराण व अमेरिका यातील तणाव -   या मार्गात एक अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, निदान होती. सध्या इराण व अमेरिकेच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे ही वाहतुक इराण मार्गे केल्यास अमेरिकेची नाराजी ओढवली जाईल की काय, अशी शंका वाटत होती. जुन्या काय किंवा नवीन काय, अमेरिकन शासनाचा/प्रशासनाचा एक अजब खाक्या होता व आजही आहे. ज्याच्याशी अमेरिकेचे बिनसते, त्याच्याशी इतरांनी संबंध ठेवलेले तिला आवडत नाही. पण याबाबत तसे झाले नाही. कारण अफगाणिस्तान आपल्या पायावर उभा रहावा, तालिबान्यांचा अफगाणिस्तानच्या मागे लागलेला ससेमिरा संपावा व स्थिरपद तसेच पाश्चात्यधार्जिणी राजवट अफगाणिस्तानमध्ये प्रस्थापित व्हावी, असे अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसापूर्वी, नक्की सांगायचे तर 21 आॅगस्टला अमेरिकेने अफगाणिस्तानच्या संदर्भातील आपल्या धोरणाची काहीशी नव्याने आखणी केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीच खुद्द असे प्रतिपादन केले की, युद्धदग्ध अफगाणिस्तानला स्थिरता पात्र व्हावी, त्याची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून भारताने पुढाकार घ्यावा.
भारताकडून अपेक्षा - आजवर अमेरिकेने एवढ्या स्पष्टपणे अफगाणिस्तानबाबतच्या आपल्या भारतापासूनच्या अपेक्षा व्यक्त केल्या नव्हत्या. पाकिस्तानने कान फुंकल्यामुळे असे होत होते. अमेरिका दहशतवादाच्या विरुद्ध असली तरी भारताविरुद्ध होणाऱ्या दहशतवादी कारवाया व अमेरिका आणि  पाश्चात्य राष्ट्रे यांच्याविरुद्ध होणाऱ्या दहशतवादी कारवाया यात अमेरिका फरक करीत असे. कारण अमेरिकेला अफगाणिस्तानात काहीही करायचे झाले तरी पाकिस्तानची मदत लागत असे.
  दुसरे कारण असे होते की, अमेरिका आणि  पाश्चात्य राष्ट्रे यांच्याविरुद्ध होणाऱ्या दहशतवादी कटांची माहिती पाकिस्तान त्यांना पुरवीत असे. त्यामुळे पाकिस्तानच्या भारतद्वेशाची अमेरिका फारशी दखल घेत नसे.
  तिसरे कारण असे होते की, भारताविरुद्ध होणाऱ्या कारवाया काश्मीर प्रश्न न सुटल्यामुळे होत आहेत असे अमेरिका आणि  पाश्चात्य राष्ट्रांना पटवण्यात पाकिस्तानला यश मिळत होते. पण अगोदर भारतात व नंतर अमेरिकेत नवीन राजवट आल्यानंतर अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांचा भ्रमनिरास होण्यास सुरवात झाली. त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरप्रकरणी दहशतवाद्यांना मदत करू नये व अफगाणिस्तान प्रकरणी भारताने फार मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, अशी भूमिका अमेरिकेने घेतली. अमेरिकेच्या धोरणात हा फार मोठा बदल घडवून आणण्यात मोदी शासनाला यश मिळाले. भारत व अमेरिका यातील संबंध पूर्वीपेक्षा दृढ झाले. यासाठी ट्रंप यांना पुन्हा एकदा मिठी मारण्याची राहूल गांधी यांची सूचना अमलात आणण्याची गरज पडली नाही, याची नोंद घ्यावयास हवी.
भारताच्या परराष्ट्र नीतीचा विजय -  भारतीय जहाज गहू भरून छाबहार बंदराकडे गेले त्याच्या काहीच दिवस अगोदर अमेरिकेचे सेक्रेटरी आॅफ स्टेट रेक्स टिलरसन भारत भेटीवर आले होते. त्यांच्यात व परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यात अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी हरकत तर घेतली नाहीच उलट गहू पाठविण्याच्या या व्यवहाराला पाठिंबा दिला. ही केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर चीनलाही चपराकच आहे. कारण भारताला अफगाणिस्तानप्रकरणी दूर ठेवावे, असे पाकिस्तान प्रमाणे चीनचेही धोरण होते व अमेरिका त्याला मान्यता देत असे.
  आमचा वाद इराणच्या नेतृत्त्वाशी आहे, इराणच्या जनतेशी नाही, एवढेच म्हणून रेक्स टिलरसन थांबले नाहीत तर इराणसोबत वाजवी व्यापारी संबंध ठेवायला आमची हरकत नाही. हे जसे युरोपच्या बाबतीत लागू आहे तसेच ते भारताच्या बाबतीतही लागू आहे, असे त्यांनी जाहीर केले.
  वळसा घालून विळखा सोडवला - गहू पाठविण्याचा हा व्यवहार केवळ व्यापारी व्यवहार नाही, त्याला मानवतावादाची किनार आहे. पंजाब व अफगाणिस्तान यातील खुष्कीचा  प्राचीन मार्ग पाकिस्तानने बंद केला. त्याला पर्याय म्हणून गुजराथमधील कांडला बंदरातू न छाबहारकडे जाणाऱ्या जलमार्गाचा पर्याय उभयपक्षी सोयीचाही आहे. छाबहारमधून हा गहू ट्रकद्वारे अफगाणिस्तानमध्ये नेण्यात आला. ही वाहतुक प्रथम जल वाहतुक व नंतर ट्रक द्वारे वाहतुक अशी असली तरी ती किफायतशीर आहे. तसेच पाकिस्तानला वगळून होणारीही आहे. ही वाहतुक वळसा घालून करावी लागत असली तरी अफगाणिस्तानला पाकिस्तानच्या विळख्यातून सोडवणारी आहे.
  भारत, इराण व अफगाणिस्तान यांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एकत्र येऊन एकीकडे  हिरवी झेंडी दाखवीत असतांना पंतप्रधान मोदींनीही ट्विट करून ‘कांडला ते अफगाणिस्तान व्हाया छाबहार’ मार्गाच्या श्रीगणेशाच्या निमित्ताने इराण व अफगाणिस्तान यांचे अभिनंदन केले. या पर्यायी मार्गाचे भविष्यात खूप महत्त्व असणार आहे.
संबंधांचे इंद्रधनुष्य
सांस्कृतिक देवाणघेवाण, व्यापारी देवघेव, तंत्रज्ञान, सेवाक्षेत्र, राजकीय व्यवहार अशा अनेक रंगी संबंधांचे हे इंद्रधनुष्य या तिन्ही देशांना आवडेल यात शंका नाही.
   अलेक्झांडर या मार्गाने गेला तेव्हा छाबहारचे नाव टिस असे होते. ते  पाकिस्तानमधील ग्वादार बंदरापासून केवळ 100 किलोमीटर दूर आहे.  या बंदराचा विकास चीनच्या मदतीने झाला आहे. पण बलूच लोकांचा याला विरोध आहे. कारण यामुळे आपले शोषण होईल, अशी त्यांना सार्थ भीती वाटते आहे. तर जवळच्याच छाबहार या इराणमधील बंदराचा विकास भारताच्या मदतीने होतो आहे. त्याचे इराण व अफगाणिस्तानमध्ये स्वागत होते आहे. हा चीनच्या सैनिकी व व्यापारी रणनीतीला भारताने दिलेला शह आहे.
  भारत व अफगाणिस्तान यात हवाई वाहतुक यापूर्वीच सुरू झाली आहे. याशिवाय छाबहार ते झाहेदान हा लोहमार्ग हा अफगाणिस्तानच्या सीमेजवळून जाणारा लोहमार्ग बांधण्याचे लक्षावधि डाॅलर किमतीचे कंत्राटही भारताला मिळाले आहे. लोहमार्गाने होणारी वाहतुक  रस्त्यावरील वाहतुकीच्या संदर्भात कमी खर्चाची असणार आहे.
अफगाणिस्तान व भारताचे पूर्वापार संबंध - भारताचे अफगाणिस्तानशी पूर्वापार घनिष्ठ संबंध आहेत. अफगाणिसातानशी निखळ मैत्री व उभयपक्षी उपकारक ठरतील असे व्यापारी संबंध ठेवणारा व कायमपणे ठेवू इच्छिणारा भारत हा एकमेव देश आहे. 1980 साली रशियाच्या सक्रिय पाठिंब्यावर अफगाणिस्तानात डेमो क्रॅटिक रिपब्लिक आॅफ अफगाणिस्तान स्थापन झाल्याबरोबर भारताने त्याला मान्यता दिली.
1990 मध्ये अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्ध झाले व तालिबानी राजवट आली. या काळात 1995 पर्यंत भारताचे अफगाणिस्तानशी असलेले संबंध अगदीच सुमार होते. म्हणून तालिबानी राजवट उलथून लावण्याच्या कामी भारताने साह्य केले. हा एवढा कालखंड सोडला तर मानवतावादी दृष्टीकोनातून मदत, व पुनर्निर्माण कार्यात भारताचा कायम सहभाग होता व आहे. शिक्षणसंस्थांसाठी, हाॅस्पिटलसाठी  इमारती बांधून देणे, रस्ते तयार करणे, तांत्रिक साह्य देणे, सलमा धरण बांधून देणे, संसद सभागृह उभारून देणे व होतकरू विद्यार्थ्यांना हजारोंच्या संख्येत शिक्षण व शिष्यवृत्या देणे, सैनिकी प्रशिक्षण देणे ही कामे भारताने निखळ मैत्रीच्या भूमिकेतून पार पाडली आहेत. म्हणूनच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना भारताने याहीपेक्षा मोठी व महत्त्वाची भूमिका अफगाणिस्तानबाबत स्वीकारावी, असे वाटते, तर या वक्तव्यामुळे पाकिस्तानच्या नाकाला मिरच्या झोंबत आहेत. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचा अफगाणिस्तानमधून फौजा परत घेण्याची भूमिका आज बदलली आहे. इराणच्या समुद्किनाऱ्यावर चाबहार बंदर बांधण्याच्या निर्णयाचा अफगाणिस्तानलाही लाभ होणार आहे. एरवी अफगाणिस्तानमध्ये जायचे तर पाकिस्तानच्या भूमीवरून जावे लागते. यावेळी पाकिस्तान सतत काहीना काही अडथळे निर्माण करतो. आता भारतातून समुद्मार्गे चाबहार बंदरात फक्त सात दिवसात मालाची वाहतुक करता येईल. शांत, सुरक्षित व पुनर्निर्मित अफगाणिस्तान निर्माण करण्याची भारताची भूमिका आहे, हे भारताला जसे भूषणावह आहे, तसेच अशी भूमिका घेणारे देश जगात खूप कमी असावेत, ही एक विदारक वस्तुस्थितीही आहे, हे आपण विसरता कामा नये

Monday, October 23, 2017


जपानच्या जागतिक बिचारेपणाच्या अंताचा आरंभ?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
   जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांचा राजकीय मटका यशस्वी झाला, त्यांना नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. २०१४ सालच्या निवडणुकीत जपानमध्ये सर्वात कमी मतदान झाले होते व आबे शिंटो यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमतही मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांना आघाडीचे सरकार स्थापन करून देशाचा कारभार हाकावा लागत होता. यावेळच्या निवडणुकीत २०१४ च्या तुलनेत थोडेसेच अधिक मतदान झाले असले तरी पक्ष म्हणून आबे शिंटो यांच्या पक्षाला मात्र घवघवीत यश मिळाले आहे. राजकीय पंडित याला सुपर मेजाॅरिटी म्हणत आहेत. हे काठावरचे बहुमत नाही पन्नास टक्यापेक्षा जास्त जागा (२/३ बहुमत) तसत्ताधारी पक्षाला मिळते आहे.
  जपानचा सेल्फ-डिफेन्स फोर्स - या निवडणुकीचा जपानच्या अंतर्गत कारभारावर परिणाम होईल, हे नक्कीच आहे. पण या विजयाने जागतिक सत्ता समीकरणे बदलणार आहेत, ही फार महत्त्वाची बाब ठरणार आहे. १९४५ साली दुसरे महायुद्ध संपले. हिरोशिमा व नागासाकीवर अमेरिकेने अणुबाॅम्ब टाकल्यामुळे जपान दाती तृण धरून शरण आला. अणुबाॅम्ब टाकला नसता तर कट्टर जपानी सैनिकांनी इंच इंच लढवून अमेरिकेचे असंख्य सैनिक यमसदनी पाठविले असते व महायुद्ध अनेक वर्षे रेंगाळले असते. पण म्हणून अणु हल्ला? अणुहल्याला एक नैतिक काळी बाजू आहे व ती अतिशय महत्त्वाची आहे, यात शंकाच नको. या हल्याचे नैतिकतेच्या दृष्टीने समर्थन करता येत नाही, हे नक्की. पण व्यावहारिक दृष्ट्या या हल्याची परिणिती जपानने विनाअट सपशेल शरणागती पत्करण्यात झाला, ही वस्तुस्थिती आहे. आमच्या सम्राटांना कायम ठेवा, त्यांना शिक्षा नको, एवढीच विनंतीवजा अट जपानने घातली व अमेरिकादी राष्ट्रांनी ती मान्य केली व जपानने सेल्फ-डिफेन्स फोर्स या नावाची नाममात्र स्वसंरक्षण व्यवस्था, एक अट म्हणून स्वीकारली व तशी घटनेत दुरुस्ती केली.
   आर्थिक सुसंपन्नतेचे वरदान - जपान नि:शस्त्र झाला. लढण्याची त्याची क्षमता संपली. दर वर्षी संरक्षणासाठी पैशाचा मोबदला घेऊन अमेरिकेने जपानच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. एकप्रकारे हे जपानचे लष्करी खच्चीकरणच झाले. पण जपानने या अपमानास्पद अटीचेही सोने केले व संरक्षणावर होणारा अवाढव्य खर्च विकासावर खर्च केला आणि अभूतपूर्व आर्थिक प्रगती करून आर्थिकक्षेत्रात जगात पहिल्या पाच राष्ट्रात (तिसरे?) जपानने स्थान मिळवले. अशाप्रकारे शस्त्रसंन्यासाचा शाप आर्थिक वरदान देता झाला.
  १९४५ व २०१७ या काळात निर्माण झालेली प्रतिकूलता -  २०१७ सालची परिस्थिती वेगळी आहे. अमेरिकेला संरक्षणानिमित्त जपानकडून मिळणारी रक्कम कमी वाटू लागली आहे. ती वाढवून मिळावी, अशी अमेरिकेची भूमिका आहे. खरेतर होती असे म्हटले पाहिजे. कारण ट्रंप सरकारला असे वाटते की, यापुढे ज्याने त्याने आपल्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी. संरक्षणासाठी वाढीव पैसा नको आणि ती जबाबदारीही नको. पण अल्पावधित शस्त्रसज्ज होणे ही सोपी गोष्ट नाही. शिवाय शस्त्रसज्ज व्हायचे म्हणजे नुसत्या बंदुका व तोफा तयार करणे नव्हे. अण्वस्त्रधारीच झाले पाहिजे. उत्तर कोरिया, चीन व रशिया हे परंपरागत वैरी अण्वस्त्रधारी तर आहेतच शिवाय त्यांना आर्थिकक्षेत्रातही जपानचा वरचढपणा नको आहे.
  आबे शिंझो यांचा कोंडमारा दूर होणार - जपानचे पंतप्रधान यांना अण्वस्त्रधारी व्हायचे आहे. जपानचे लष्करी नष्टचर्य संपवावयाचे आहे. पण संसदेत बहुमताचा अभाव, अण्वस्त्रे न करण्याची राज्यघटनेतील तरतूद व खुद्द सम्राटांचा अण्वस्त्रधारी होण्यास विरोध या देशांतर्गत तीन प्रमुख अडचणी आहेत/होत्या. आता स्पष्ट बहुमत मिळते आहे, त्यामुळे निर्णय स्वातंत्र्य मिळाले आहे, आता बहुमत मिळाल्यामुळे घटनादुरुस्तीही करता येण्यासारखी आहे. सम्राटांचे वय झाले आहे, त्यांची प्रकृतीही ठीक नसते व सरकारच्या विरोधात भूमिका घेण्यापेक्षा निवृती घेतलेलीच बरी, असा विचार सम्राट करीत आहेत, असे बोलले जाते. पण जपानी सम्राटाने तहाहयात सम्राटपदी राहिले पाहिजे, अशी जपानच्या घटनेतील तरतूद आहे, त्यांच्यासाठी निवृत्तीचा पर्याय खुला नाही. पण बहुमत मिळाल्यामुळे शिंझोआबे याबाबतही आवश्यक ती घटनादुरुस्ती पारित करून घेऊ शकतील.
   हे सर्व बदल देशांतर्गत होतील/ होऊ शकतील, अशी स्थिती या निवडणुकीतील निकालांमुळे निर्माण झाली आहे. यादृष्टीने शिंझो आबे यांना मटका लागला, असे म्हटले जाते. आहे ते बहुमत तरी टिकेल का, अशी शंका निवडणूक जाहीर झाली, तेव्हा व्यक्त होत होती. पण ती अनिश्चितता आता संपली आहे.
 जनतेने विश्वास ठेवला -  उत्तर कोरियाचे संदर्भात आपण कडक धोरण स्वीकारू असे अभिवचन शिंझो आबे यांनी मतदारांना दिले होते, त्याला मतदारांनी अनुकूल प्रतिसाद दिलेला दिसतो आहे. राज्य घटनेतील शांततावादी भूमिकेत बदल करीन, असेही ते म्हणाले होते. जपानला अण्वस्त्रसज्ज करीन, असा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला नव्हता पण त्यांना तेच अभिप्रेत आहे, याबद्दल जनमतात खात्री होती. या तुलनेत विरोधी पक्षांची भूमिका जनतेला पटली नाही. गेल्या काही वर्षातील शिंझो आबे यांची कारकीर्द काही अगदी धुतल्या तांदुळासारखी नव्हती. पण जनतेने तिकडे दुर्लक्ष करून त्यांना भरभरून मते दिली आहेत. आता मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी शिंझो आबे यांच्यावर येऊन पडली आहे. त्यांचा लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष या पार्श्वभूमीवर काय करतो याकडे जपानी जनतेबरोबरच जगाचेही लक्ष लागून राहणार आहे.
सुपर मेजाॅरिटी?- ४६५पैकी लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष व त्यांचा लहानसा जोडीदार असलेला कोमिटो यांना मिळून ३११ जागा मिळाल्या आहेत. ही सुपर मेजाॅरिटी (२/३ बहुमत) मानले जाते. आता घटनेत आवश्यक ते बदल करता येतील. सैन्याची बचावात्मक कार्यापुरती मर्यादित असलेली भूमिका आता तशीच राहण्याची आवश्यकता राहिलेली नाही.
  निवडणुकीची वादळवाट -  यावेळचे मतदान २०१४ पेक्षा थोडेसेच जास्त झाले आहे, हे जरी खरे असले व २०१४ चे मतदान जपानच्या इतिहासातले आजवरचे सर्वात कमी मतदान होते, हेही खरे असले तरी या वेळची परिस्थिती मतदानाला कशी प्रतिकूल होती, हेही पहावे लागेल. यावेळी सतत पाऊस पडत होता. त्यामुळे निवडणूक प्रचार सभा बंद सभागृहातच होत असत. मैदानातही सभा होत. पण त्यांच्याकडे आकाशातून पाहिले तर फक्त छत्र्याच दिसाव्यात इतका पाऊस होता. वक्ता व श्रोते या दोघांच्यावरही छत्री असे, असे विनोदाने म्हटले जायचे. त्यामुळे २०१४ पेक्षा थोडेसे अधिकच मतदान झाले ही बाब निराशाजनक म्हणता यायची नाही. बरे नुसता पाऊसच पडत होता, असे नाही. सोबत वादळेही होती. लान या नावाचे चक्री वादळही सभेला उपस्थिती लावून गेले होते, अशी नोंद आहे. तरीही आणि निवडणुका एक वर्ष अगोदर घेऊन सुद्धा मतदार मतदानाला आले होते, हेही विसरून चालणार नाही.
  जपानला समुद्रात बुडवण्याची धमकी -  निवडणुकीपूर्वी शिंझो आबे यांची लोकप्रियता ओसरू लागली आहे, असे पत्रपंडितांचे भाकीत होते. तरीही हा चमत्कार कसा घडला? त्याचे श्रेय उत्तर कोरियाकडेही जाते. उत्तर कोरियाने डागलेली दोन मिसाईल्स जपान वरून उडत गेली होती. ती जपानवरही डागता आली असती. त्याच्या सोबत अणु बाॅम्बही असता/असेल तर? जपानला समुद्रात बुडवून टाकू, अशी धमकी उत्तर कोरियाने दिली होती. ही धमकी पोकळ नाही, हे जपानी जनतेने जाणले. सर्वविनाशाची शक्यता जपानी जनतेने ओळखली, तिचे गांभीर्य तिला जाणवले व तिने शिंझो आबे यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली व सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना दिले.
   खरे तर शिंझो आबे यांच्यावर क्रोनी कॅपिटॅलिझमचा आरोप होता. काही विशिष्ट उद्योगपतींची सोय होईल, असे कायदे केल्याचा/ असे निर्णय घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या आरोपात मुळीच तथ्य नव्हते, असे म्हणता यायचे नाही. पण जनतेने या आरोपाकडे दुर्लक्ष केलेले या निकालांवरून तरी दिसते.
 पार्टी आॅफ होपच्या पदरी निराशा -   निवडणुकीपूर्वी काही दिवस एक पक्ष शिंझो आबे यांच्या विरोधात स्थापन झाला होता. टोकियोचे लोकप्रिय गव्हर्नर युरिको कोइके यांनी हा पक्ष स्थापन केला होता.त्याचे नावही त्यांनी पार्टी आॅफ होप असे ठेवले होते. युरिको कोइके यांची जनमानसातील प्रतिमा उजळ होती. पण जनतेने त्यांची व त्यांच्या पार्टी आॅफ होपची निराशाच केली व शिंझो आबे यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षालाच पुन्हा सत्तारूढ केले. होपला ६० पेक्षा कमीच जागा मिळाल्या तर मिळतील. असे अंदाज बांधण्याचे कारण असे की, जपान असूनही लान या चक्री वादळाच्या तडाख्यातून बाहेर येतोच आहे. सगळे निकाल अजूनही पुरतेपणी समोर येतच आहेत. जपान हा अनेक बेटांचा देश आहे, हे लक्षात घेतले म्हणजे निकाल हळूहळू व उशिराने का लागत आहेत, हे लक्षात येईल.
   शिंझो आबे यांचे निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचे पण प्रचारातले शेवटचेच भाषण महत्त्वाचे ठरले, असे म्हणतात. उत्तर कोरिया आम्हाला रोज नवनवीन धमक्या देतो आहे. तणाव सतत वाढवत चालला आहे. आम्ही डगमगून चालणार नाही. धमक्यांना भीक घालून चालणार नाही. आम्हीही शस्त्रसज्ज झाले पाहिजे. या आशयाचे त्यांचे प्रतिपादन मतदारांना भावले.
   जपानी सैन्य दलाचे आजचे व आजवरचे नाव सेल्फ-डिफेन्स फोर्स असे आहे. हे नाव असेच राहते की बदलते ते लवकरच दिसेल पण ते जे काय राहील ते राहो. पण त्याची भूमिका यापुढे सेल्फ-डिफेन्स पुरती मर्यादित राहणार नाही, हे नक्की. नवीन नखे, दात व सुळे असलेले जपानी सैन्य हे जपानी सैन्याचे भविष्यातले रूप राहणार हे आता नक्की झाले आहे.
 ऐतिहासिक चुका/गुन्हे पाठ कधी सोडणार? -  ही शक्यता लक्षात येताच चीन व दक्षिण कोरियाही संतापले आहेत. चीनची उत्तर कोरियाला चिथावणी आहे, असे मानले जाते. पण दक्षिण कोरियाचा विरोध का असावा? उत्तर कोरिया तर त्यालाही गिळंकृत करण्याची भाषा बोलतो आहे. जपान उत्तर कोरियाचा शत्रू म्हणून उभा राहतो आहे. शत्रूचा शत्रू म्हणून दक्षिण कोरियाची जपानशी मैत्री असावयास नको का? पण दक्षिण कोरिया दुसऱ्या महायुद्धातील जपानचे पशुतुल्य वर्तन विसरलेला नाही. दक्षिण कोरियातील हजारो तरुणींना क्वचित लालूच दाखवून व  फसवून किंवा/ बहुदा त्यांचे सरळसरळ अपहरण करून दूरदूरच्या जपानी सैनिकांच्या लैंगिक गरजा भागवण्यासाठी पाठविले जात असे. या तरुणीपैकी शेवटची तरुणी नुकतीच कालवश झाली. या आठवणी आजवर कायम राहण्याचे हे कारण नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले आहे. १९४५ पासूनच दक्षिण कोरिया (उत्तर कोरिया सुद्धा) जपानचा पराकोटीचा द्वेश करतो आहे. एक राष्ट्र या नात्याने जपानने क्षमायाचना केल्यानंतर व या सर्व संबंधित तरुणींच्या योगक्षेमाची सर्व जबाबदारी उचलल्यानंतरही दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया व चीन हे भुक्तभोगी जपानची पशुता विसरायला तयार नाहीत. या तरुणीपैकी अनेकांनी आत्महत्या केली होती, काही कायमच्या वेड्या झाल्या होत्या तर काहींना पुरुष दृष्टीला पडला तरी वेडाचे झटके येत असत.
 कमकूवत विरोधी पक्ष -   काॅन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टी हा डावीकडे झुकलेला विरोधी पक्ष आहे. त्याची स्थिती २०१४ च्या तुलनेत किंचित सुधालेली दिसते. पण तेवढे पुरेसे नाही. शिंझो आबे यांची अडवणूक करता येईल, अशी या पक्षाची स्थिती नाही. विरोधी मतांची विभागणी झाल्यामुळे आम्ही हरलो, हे त्या पक्षाचे म्हणणे खरे असले तरी विजय तो विजय व पराभव तो पराभवच असतो. 
मंदीचे सावट-  जपानला आज मंदीने ग्रासले आहे. तिसरी जागतिक आर्थिक महासत्ता असूनही ही स्थिती आहे. म्हणूनच शून्य टक्के व्याज आकारण्याची सवलत देऊन बुलेट ट्रेनचे कंत्राट जपानने भारताकडून मिळवले आहे. पण सर्व सामग्री जपानकडूनच खरेदी करण्याची अट असल्यामुळे जपानच्या औद्योगिक क्षेत्राला उभारी मिळण्यास मदत मिळेल, असा जपानचा कयास आहे. उगीच का कुणी शून्य टक्के व्याज आकारण्यास तयार होईल?
तरुणाई हरवलेला देश - आजचा जपान हा म्हाताऱ्यांचा देश आहे. जपानी जनतेला आज पुरेसे पेंशन मिळत नाही, वेतनमानही तुटपुंजेच आहे. तरूण मनुष्यबळ कमी पडते आहे, तर वृद्धांना पोसण्याचा खर्च दिवसेदिवस वाढतो आहे. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळावरचा ताण वाढतो आहे. ओव्हर टाईम न घेता काम केले तर काय बिघडले, असे मालकवर्ग म्हणतो तर कामगार वर्गाजवळ याचे उत्तर नसते. शस्त्रास्त्र निर्मितीला सुरवात केल्यासही आर्थिकक्षेत्र गतिमान होईल, असे अर्थपंडित मानत आहेत. शस्त्रसज्जता व आर्थिक उन्नती अशी दोन्ही अभिवचने आबे यांनी मतदारांना दिली आहेत. पण तरुणाईची कमतरता असतांना हे शिवधनुष्य त्यांना कितपत पेलवते ते काळच ठरवील.

Wednesday, October 18, 2017

इसीसची पोस्टर परी असलेली व्हाईट विडो

इसीसची पोस्टर परी असलेली व्हाईट विडो  
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  आज महिलांसाठी अमूक एक क्षेत्र वर्जित नाही. तरीही जगभर महिलांच्या संदर्भात एक नवीनच प्रकार वाढत्या प्रमाणावर कानावर पडतो आहे, कोणता आहे हा प्रकार? दहशतवादी गटात महिला वाढत्या प्रमाणात सामील होत आहेत, अशा वार्ता ऐकायला येत आहेत. यात कितपत तथ्य आहे? भारतापुरते बोलायचे झाले तर केरळमधून दहशतवादी गटात महिला सामील झाल्याच्या वार्ता वृत्तपत्रात आल्या होत्या. कल्याणची एक तरुणीही दहशतवाद्यांसोबत असतांना मारली गेल्याचे उदाहरण आहे. तसे ते आता जुने झाले आहे. नक्षलवाद्यांच्या पथकातही महिला आढळून येत आहेत. काहीतर नेतृत्त्वही करीत आहेत, असे उघडकीला आले आहे. तसेच हा प्रकार नवीनही नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात माताहारी नावाच्या गुप्तहेर महिलेची कथा आज वाचली तर ती काहींना कल्पित कथाही वाटू शकेल. 
  दहशतवादाकडे का वळतात? -  दहशतवादी महिला एकटदुकटच आढळून येत असल्यामुळे या वार्तेला जरा जास्तच प्रसिद्धी मिळते, असेही एक मत आहे. नुकतीच एक दहशतवादी महिला मारली गेल्याचे वृत्त समोर आले आहे. सोबत तिचा संपूर्ण जीवनवृत्तांतही जाहीर झाला आहे. ही महिला दहशतवादी का झाली, याचा शोध हिच्या जीवनवृत्तांतावरून लागू शकेल का? निदान अंदाज तरी बांधता येईल का?
पोस्टर परी ची व्हाईट विडो - सॅली अॅने जोन्स ही दहशतवादी महिला व्हाईट विडो या नावाने ओळखली जायची. दहशतवाद्यांच्या मोहिमा बिनचुकपणे आखण्यात तिचा हातखंडा होता. वय वर्ष 50 असलेली ही महिला दोन लेकरांची आई व व्हाईट विडो असली तरी ती इसीसची पोस्टर परीच होती. 2013 मध्ये तिने लहान मुलाला- ज्योज्योला- सोबत घेऊन  इंग्लंड सोडले व ती इसीस या दहशतवादी संघटनेत सामील झाली. नंतर तिने गुप्तता वगैरे काहीही पाळली नाही. सरळ ट्विटर अकाऊंट्स सुरू करून त्यावर शस्त्रास्राचे नेम धरतानाचे तिचे फोटो तिने प्रसिद्ध केले. यात केवळ पिस्तुलच नाही तर कॅलॅश्निकोव्ह सारखे हत्यारही दाखविले आहे. अशीही इसीसची पोस्टर परी होती.
कॅलॅश्निकोव्ह रायफल- मिखेल कॅलॅश्निकोव्ह हा एक रशियन लेफ्टनंट जनरल होता. तो संशोधक, इंजिनीअर, लेखक तर होताच  पण शस्त्रांचे डिझाईन तयार करण्यातही त्याचा हातखंडा होता. मास्कोमध्ये त्याचा पुतळा उभारलेला आहे. कारण तो एके 47या स्वयंचलित रायफलचा निर्माता आहे. ही रायफल गेली 50 पेक्षा जास्त वर्षे वापरात आहे. ती दहशतवाद्यांमध्येच केवळ नव्हे तर ड्रग माफियांमध्येही अतिशय लोकप्रिय आहे. काही सेकंदात अनेक गोळ्या या रायफलमधून डागता येतात. ही एक रायफल घेऊन आलेला दहशतवादी शेकडो लोकांना ठार मारू शकतो. ही रायफल बाळगण्याचा अधिकार व मान सामान्य अतिरेक्याला मिळवायचा असेल तर त्यासाठी आपली योग्यता सिद्ध करावी लागते व प्रशिक्षणही घ्यावे लागते. यावरून सॅली अॅने जोन्स चे महत्त्व व योग्यता लक्षात येऊ शकेल.
ड्रोन हल्ले- सीरियामधील रागा या शहरात अतिरेक्याचा बहुदा शेवटचा बालेकिल्ला उरला होता. इंग्लंडमधून आलेली सॅली अॅने जोन्सा मुक्काम या बालेकिल्यात होता. अतिरेक्यांना मारण्यासाठी पाश्चात्य राष्ट्रे ड्रोन्सचा म्हणजे मानवरहित विमानांचाच अनेकदा वापर करतात. यामुळे मनुष्यहानी होत नाही व संबंधिताला अचुक टिपताही येते. एका ड्रोन हल्यात सॅली अॅने जोन्स मारली गेली अशी खात्रीलायक माहिती  समोर आली आहे.
निरनिराळ्या नावानी ओळखली जाणारी जोन्स - सॅली अॅने जोन्स चे अतिरेक्यांनी वेगळे बारसे केले होते. काहींच्या मते तिनेच नवीन नाव धारण केले होते. ती आता उम्मा हुसेन अल् ब्रिटानी झाली होती. नामांतर करतांना तिने आपल्या मायदेशाचे नाव कायम ठेवले होते. मानसशास्त्राच्या अभ्यासकांच्या दृष्टीने ही घटनाही महत्त्वाची ठरावी अशी आहे. ती शकीना हुसेन या नावानेही ओळखली जायची. पत्रकारांनी तिचे बारसे व्हाईट विडो असे केले होते. अनेक अतिरेक्यांची अशी वेगवेगळी नावे असतात. यामुळे इतरांमध्ये संभ्रम निर्माण करता येतो.
 जोन्सचे महात्म्य -  सॅली अॅने जोन्स उर्फ  उम्मा हुसेन अल् ब्रिटानी उर्फ शकीना हुसेन उर्फ व्हाईट विडो हिचे अतिरेक्यात तीन कारणास्तव मोठे स्थान होते. एखादी अतिरेकी कारवाई कशी आखावी हे तिच्याकडूनच शिकावे, असे मानले जायचे. अतिरेक्यांची प्रचार यंत्रणा तिच्या भरवशावर चालत होती. अतिरेक्यांना समाजातील घटकांमधून सहानुभूती व साह्य मिळविण्याचे तिचे तंत्र वाखाणण्यासारखे होते. तिसरे असे की, अतिरेक्यांमध्ये नवीन तरूण व्यक्तींची भरती करण्याचे यशस्वी तंत्रही तिने साध्य केले होते. 
   राका शहर पडणार हे कळताच तिने तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि वाटेतच ती ड्रोन हल्यात मारली गेली असे म्हणतात. राका शहरातला लढा अतिरेक्यांचा शेवटचा लढा असेल, असे मानले जाते. अतिरेक्यांचा एक गट पाश्चात्य राष्ट्रांच्या सैनिकांना अडवण्यासाठी थांबला होता आणि दुसऱ्या गटाने अज्ञातस्थळी प्रयाण करण्याचे ठरविले होते. या गटात सॅली अॅने जोन्स उर्फ उम्मा हुसेन अल् ब्रिटानी उर्फ शकीना हुसेन उर्फ व्हाईट विडो हिचा समावेश होता.
जोन्स अतिरेक्यांच्या संपर्कात कशी आली? - सॅली अॅने जोन्स उर्फ  उम्मा हुसेन अल् ब्रिटानी उर्फ शकीना हुसेन उर्फ व्हाईट विडो हिने आपल्या 9 वर्षांच्या मुलाला- ज्योज्योला- सोबत घेऊन अतिरेक्यांच्या गटात प्रवेश केला. यावेळी तिचा जुनेद हुसेन या अतिरेक्याशी विवाह झालेला होता. पोरसवदा जुनेद हुसेन हा मूळचा पाकिस्तानी होता. तो इंग्लंडचा नागरिक झाला. संगणक क्षेत्रात त्याला चांगलीच गती होती. वेबसाईट हॅक करण्यात तर तो तरबेज होता. त्याने 1300 अमेरिकन सैनिकांचे सर्व तपशील हॅककरून  अल्पावधीत मिळवले होते. 21 वर्षांचा हा तरूण 2015 मध्ये ड्रोन हल्यात ठार झाला. सॅली अॅने जोन्स उर्फ  उम्मा हुसेन अल् ब्रिटानी उर्फ शकीना हुसेन उर्फ व्हाईट विडो ही 50 वर्ष वयाची व जुनेद हुसेन हा 21 वर्ष वयाचा कोवळा तरूण हे तसे विरूप जोडपे होते. ही दोघे आपल्या सोबत सॅली अॅना जोन्सच्या लहान मुलाला -ज्योज्योला-सोबत नेत. वेळप्रसंगी त्याचा ढालीसारखा उपयोग करून निसटून जात. पण एकदा हुसेनने मुलाला सोबत नेले नव्हते. ही चूक त्याला भोवली व तो मारला गेला. सॅली अॅना जोन्स दुसऱ्यांदा विधवा झाली. आता मात्र ती व्हाईट विडो याच नावाने ओळखली जाऊ लागली.
कटकारस्थाने - जोन्सने 1300 अमेरिकन अधिकाऱ्यांची नावे प्रसिद्ध केली. ही माहिती तिच्या ठार झालेल्या नवऱ्याने हॅक केली होती. एकेकाला वेचून ठार करण्याचे ठरले होते. तसे आदेशही प्रसारित करण्यात आले होते.ही यादी अतिरेकी सतत जवळ बाळगीत असत. 2015 मध्ये जोन्सने हत्येचा एक खास कट रचला. इंग्लंडची राणी व व राजपुत्र फिलिप हे एका कार्यक्रमाला येणार होते. त्यांना टिपण्याचे ठरले होते. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव होऊन जपानने शरणागती ज्या दिवशी पत्करली होती, तो दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जाणार होता. पण हत्येचा हा बेत फसला.
   एका अमेरिकन सेनाधिकाऱ्याचे अपहरण करण्याचा बेत मात्र तडीस गेला. त्या अधिकाऱ्याचा शिरच्छेद करण्यात आला व या प्रसंगाची चित्रफीत काढून ती अमेरिकनांना जरब बसावी म्हणून जारी करण्यात आली. अमेरिकेने या घटनेची सर्वोच्च स्तरावर नोंद घेऊन तिला ठार करण्याचे आदेश दिले.
या सर्व काळात जोन्स इंग्लंडमधील परिचितांच्या संपर्कात असे. हवापाण्याच्या, शिळोप्याच्या गप्पा मारीत असे. एकदा मात्र तिने लंडन, ग्लासगो व कॅड्रिफ या शहरातील महिलांना खास आवाहन करून, ‘रमझानच्या पवित्र महिन्यात अतिरेकी हल्ले करा’ असे सुचविले होते. पण पुढे मात्र तिच्या संभाषणात वेगळेच मुद्दे येऊ लागले. असे एकदा तर ती म्हणाली होती,‘मला सीरियातून पळून इंग्लंडमध्ये परत यावे, असे वाटते’. कशासाठी हे मात्र तिने सांगितले नव्हते. ब्रिटिश नागरिकांनी मात्र तिला ब्रिटनमध्ये येऊ देऊ नये अशा सह्यांची मोहीमच राबवली होती.
 समस्यायुक्त बालपण-ग्रिनविचमध्ये जन्मलेली जेन्स इंग्लंडमधील केंट काऊंटी (जिल्हा) मधील चॅथॅम गावी रहात होती. आईबापाची ती एकुलती एक मुलगी होती. आईबापांचा घटस्फोट झाला, त्यानंतर बापाने आत्महत्या केली होती. त्यावेळी जोन्सचे वय दहा वर्षांचे होते. वयाच्या १६ व्या वर्षी तिने ब्युटिशियनची नोकरी पत्करली. पण तिला गीटार चांगली वाजवता येत असे. तसेच तिचा गळाही गोड होता. त्यामुळे तिने ब्युटिशियनची नोकरी सोडून एका महिला चमूच्या संगीत पथकात प्रवेश केला. पण याच काळात तिला ड्रग्जचाही नाद लागला.
  जोन्सचे दोन विवाह -  1996 मध्ये तिने जोनॅथन विल्किनसन नावाच्या कामगाराशी लग्न केले.  तिला या विवाहापासून एक मुलगा झाला. 1999 साली तिचा नवरा लिव्हरच्या आजाराने मेला. नवऱ्याच्या मृत्यूनंतर 2004 मध्ये तिने दुसऱ्या ज्योज्यो नावाच्या मुलाला जन्म दिला.
   तिची आणि हुसेनची गाठभेट आॅनलाईन झाली होती. हुसेनने तिला सीरियाला येण्याबाबत प्रवृत्त केले. सोबत धाकट्या मुलाला ज्योज्योला घेऊन ती सीरियाला गेली.
ज्योज्योचे आजोबा सांगतात की, त्यांनी आपल्या नातवाला- ज्योज्योला - प्रथम हातात हॅंडगन घेतलेला एका व्हिडिओमध्ये पाहिले. पकडलेल्या शत्रूंना ठार करतांना दाखवणारा तो व्हिडिओ होता. ते म्हणतात, ‘माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मला अतिशय दु:ख झाले. मला अपराध्यासारखेही वाटत होते. ज्योज्यो आपल्या आई बरोबर जाण्यास तयार नव्हता. आजोबांजवळच थांबण्याची त्याची इच्छा होती. तो तसा हट्टच धरून बसला होता. पण …
   आपल्या सावत्र मुलीबद्दल ते म्हणतात,’ ते जेवढ्या लवकर तिला उडवतील, तेवढे बरे होईल. ती एक चक्रम व अत्यंत स्वार्थी मुलगी आहे.तिने सगळ्यांनाच दुखवले, रडवले आणि छळले आहे.’
  जोन्सच्या एक्झिटचा परिणाम-प्रत्यक्ष रणांगणावर जोन्सचा इसीसला फारसा उपयोग नव्हता.पण तरीही तिच्या जाण्याने अतिरेक्यांना जबरदस्त झटका बसला आहे. तिला वृत्तक्षेत्रात जसजशी पिरसिद्धी मिळू लागली तसतसा तिचा भाव अतिरेक्यांमध्ये वाढत गेला. इसीसची मोहिनी परकीय महिलांवर कशी पडते आहे, हे दाखवण्यासाठी इसीसने जोन्सच्या सदस्यतेचा भरपूर उपयोग करून घेतला. अझदेह मोवेनी हे व्यवसायाने पत्रकार असून त्यांनी ‘लिप्स्टिक जिहाद’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. बीबीसीवर बोलतांना त्यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. तेम्हणतात,’ ब्रिटिश महिला जगतात अतिरेक्यांना शिरकाव करण्याचा मार्ग जोन्सने खुला करून दिला आहे’.
   ‘मी जिहादी मुस्लिम महिलांच्या पलटणीची मुख्या आहे, ज्यांना जिहादी व्हायचे असेल, त्यांनी सीरिया मध्ये यावे’. एका मूळच्या पाश्चात्य महिलेने फक्त महिलांना केलेले हे बहुदा पहिलेच आवाहन असावे. याचा परिणाम किती झाला याचा शोध जो तो पाश्चात्य देश आपापल्या देशात घेत आहे.
  जोन्सचा धसका -   जोन्सच्या भूमिकेचा व आवाहनांचा पाश्चात्य देशांनी चागलाच धसका घेतला आहे / निदान होता. ‘आमच्या देशातील महिलांवर या आवाहनाचा काहीही परिणाम झालेला नाही’, हे ते वरवर भलेही म्हणत असोत. असे नसते तर अमेरिकेने जोन्सचा नायनाट करण्यासाठी खास आदेश प्रसारित केले नसते. पेटॅगाॅनच्या हिटलिस्टवर जोन्सचे नाव अग्रक्रमाने होते, ते काय विनाकारणच? एम 16 व पेंटॅगाॅनने जोन्सला ठार मारण्यासाठी संयुक्त कारवाई करण्याचे ठरविले ते काय उगीचच? शेवटी सीरिया व इराकच्या सीमेवर त्यांनी जोन्सला पळून जात असतांना गाठले व ड्रोन्सचा वापर करून तिला ठार केले, ती काय नित्याची कारवाई होती?
फक्त जोन्सलाच ठार करा - खरे तर जोन्सचा अंत जूनमध्येच झाला होता, असे म्हणतात. पण तिचा मुलगा ज्योज्यो तिच्याबरोबर होता किंवा कसे याची माहिती मिळत नव्हती. आज्ञा फक्त जोन्सला मारण्याचीच होती. ज्योज्योला मारायचे नाही, असे ठरले होते. पण जोन्स नेहमी ज्योज्योसहच असायची. त्याचा ती ढालीसारखा उपयोग करीत असे. तो सोबत असेल तर आपल्यावर प्राणघातक हल्ला होणार नाही, याची तिला कल्पना असावी. पण ज्योज्यो सुद्धा बाल अतिरेकी झाला होता. इराकी व पाश्चात्य युद्ध कैद्यांचे हात मागे बांधून त्यांना गुढग्यावर बसायला सांगितले जायचे. बाल अतिरेक्यांकडे मागून त्यांच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालण्याचे काम असे. या कामात बाल ज्योज्यो चांगलाच तरबेज झाला होता.  
  थेट अमेरिकेतून नियंत्रण - जोन्सला टिपणाऱ्या ड्रोनचे नियंत्रण थेट अमेरिकेतून केले जात होते. तिला टिपले तेव्हा सोबत ज्योज्यो नव्हता याची खातरजमा करून घेण्यात आली होती. पण जोन्सचे डिएनए सॅंपल घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला नाही. ज्योज्यो जर जिवंत असण्याची शक्यता असती तर त्याची ओळख पटविण्यासाठी जोन्सच्या डिएनए सॅंपलची गरज भासली असती. पण तसा प्रयत्न झाला नाही. याचा अर्थ मायलेक एकाचवेळी टिपले गेले असा तर अर्थ निघत नाही ना?  
   सीरियात इसीसमध्ये सामील झालेले पाच ब्रिटिश नागरिक आजवर ठार झाले आहेत. जोन्सही सहावी आहे. तिच्या शेवटच्या ट्विटर पोस्टमध्ये ती म्हणते, ’मी यानंतर विवाह करणार नाही. माझ्या दुसऱ्या नवऱ्याशी मी शेवटपर्यंत प्रामाणिक राहणार आहे’.
स्वर्गातल्या परी ऐवजी - सीरियात आता ठिकठिकाणी सामूहिक दफनभूमी आढळून येत आहेत. त्यातल्या ज्या अतिरेक्यांच्या आहेत, त्यात तर प्रेते धडपणे जमिनीत पुरलेलीही नाहीत. अनेक प्रेतांवर भटकी कुत्री ताव मारतांना दिसत आहेत. धार्मिक युद्धात वीरगतीला गेलात, तर प्रत्येकाच्या वाट्याला निदान एकतरी परी नक्कीच येणार होती. ते राहिले बाजूलाच, पण त्यांच्या वाट्याला आता फार तर कुत्र्याच्याच पोटात जागा मिळणार, हे नक्की झाले आहे.

  ज्या व्यक्ती इसीसमध्ये दाखल झाल्या आहेत, त्यांच्या बालपणी, कौटुंबिक व वैवाहिक जीवनात कोणती ना कोणती समस्या असतेच असते, असे एका पाहणीत आढळून आले आहे. पाश्चात्य किंवा अन्य देशातील नागरिक इसीसमध्ये सामील होण्याचे हेही एक कारण असेल का?

Friday, October 6, 2017

स्पेनमधील घडामोडींचा शोध व बोध

स्पेनमधील घडामोडींचा शोध व बोध
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
कॅटालोनियामध्ये रविवार दिनांक १ आॅक्टोबर २०१७ सार्वमत घेऊन स्पेनपासून विभक्त व स्वतंत्र होण्याबाबतचा कौल ९० टक्यापेक्षाही जास्त मतांनी घेतला गेला. पण फक्त ४० ते ४५ टक्के मतदारांनीच मतदानात भाग घेतला आहे, त्यामुळे हा जनमताचा निर्णायक कौल मानता यायचा नाही. पण स्पॅनिश लोकांतील दरी वाढण्याची चिन्हे मात्र या निमित्ताने समोर येत आहेत. केंद्र शासनाविरुद्ध लवकरच प्रत्यक्ष संघर्ष केव्हाही सुरू होऊ शकेल, अशी भीती निरीक्षकांना वाटते आहे.
गेले काही दिवस कॅटालोनिया मध्ये सतत ऊग्र प्रदर्शने व संप होतच होते.  इशान्य स्पेनमधील कॅटालोनिया हा आर्थिक संपन्न भाग आहे. बार्सिलोना, गिरोना, लेडा आणि तारागोना या चार विभागांचा मिळून तयार होणाऱ्या या कॅटालोनिया प्रांताचे वैशिट्य म्हणजे मुबलक स्वायत्तता, एकूण संख्येच्या १६ टक्के लोकसंख्या व सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २० टक्के उत्पन्न ही आहेत. स्पेनला लागून चिंचोळ्या पट्टीच्या आकाराचा पोर्तुगाल आहे. स्पेन व पोर्तुगाल मिळून आपल्या भारतासारखे एक द्विपकल्प होते. म्हणजे तीन बाजूंनी पाणी(समुद्र) व एका बाजूला जमीन असे या प्रदेशाचे स्वरूप आहे. जमिनीकडून स्पेन हा देश कॅटालोनिया या सरहद्दीच्या प्रांताने युरोपला जोडलेला अाहे. हे भौगोलिक वैशिष्ट्य यासाठी जाणून घ्यायचे की, त्यामुळे हा भूभाग स्पेनपासून सहज वेगळा होऊ शकेल असा आहे. हा भूभाग स्पेनच्या मध्यभागी असता तर हे शक्य झाले नसते. नव्हे वेगळेपणाची भावनाही कॅटालोनियामध्ये निर्माण झाली नसती, असे म्हणायला जागा आहे. कॅटालोनिया या एका सीमावर्ती विभागातील स्थानिक शासनाने स्वत:च्याच निर्णयानुसार हे सार्वमत घेतले आहे.  स्पेनचे पंतप्रधान मारियानो रॅजाॅय यांनी नि:शस्त्र निदर्शकांवर अमानुष व कठोर कारवाई केली पण याचा नेमका उलटा परिणाम झाला व आता कॅटालोनियाचे नागरिक अधिकच कडवे झाले आहेत. दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकांवर ठाम असून अभूतपूर्व घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होतांना दिसतो आहे. या आंदोलनाची ही लागण स्पेनपुरती मर्यादित राहणार नसून ती संपूर्ण युरोपात पसरणार आहे, अशी भीती निरीक्षकांना वाटते आहे. अगोदरच युरोपात अनेक  छोटीछोटी राष्ट्रे आहेत. महत्प्रयासाने युरोपीयन युनीयन कसेबसे अस्तित्वात आले आहे. हे होते न होते तोच ब्रिटन युरोपीयन युनीयनमधून बाहेर पडले आहे. आता युनीयनच्या घटक राष्ट्रांचेच तुकडे पडू लागले तर युरोपीयन युनीयनमध्ये एकच बजबजपुरी माजेल. युरोपातील ग्रीससारखी राष्ट्रे केवळ कंगालच नाहीत तर कर्जबाजारीही आहेत. यांचा उपयोग तर नाहीच पण भारच होणार, या भावनेने ही राष्ट्रे युरोपीयन युनीयनमधून बाहेर पडली तर बरेच होईल, असे मत युरोपात बळावू लागले आहे.
    कॅटालोनियात सार्वमत घेतले जाऊ नये म्हणून स्पेनच्या प्रशासनाने अडकाठी निर्माण केली होती त्यामुळे २० लक्ष  लोकांचे मतदान होऊ शकलेले नव्हते. यातील बहुसंख्य लोक कॅटालोनियाने विभक्त व स्वतंत्र व्हावे या विचाराचेच आहेत, यात शंका नाही. पण तरीही कॅटालोनियामधील ५० टक्यापेक्षा जास्त लोक विभक्त व स्वतंत्र होण्याच्या बाजू आहेत, असे ठरणार नाही. तरीही लवकरच कॅटालोनिया स्वातंत्र्याची घोषणा करणार आहे, हे नक्की आहे. इकडे स्पेनच्या हायकोर्टाने विभक्तवादी पोलिस अधिकारी व राजकारणी यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असून ही घटना थोपवण्याचा प्रयत्न सुरू केला असून तसे आदेशही दिले आहेत.
   एकतर्फी स्वातंत्र्याची घोषणा करून निर्माण झालेल्या कॅटालोनियाचे स्वरूप कसे असेल, हे आताच सांगता येणार नसले तरी सध्या स्पेन व कॅटालोनियात जे काही घडणार आहे ते भीषण असेल.  कॅटालोनियाचे एक बडे नेते मिरीया बोया हे म्हणत आहेत की, आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही माघार घेणार नाही.
   कॅटालोनियाचे मुख्यालय असलेल्या बार्सिलोना मध्ये स्वातंत्र्यवाद विरोधी लोकांनी स्पेनचे ध्वज हाती नाचवत निदर्शने केली. यांना वाटते आहे की, मूठभर स्वार्थी राजकारण्यांनी आपल्या अदूरदर्शी, संकुचित व हटवादी भूमिकेने कॅटालोनियाच्या नागरिकांना वेठीस धरले आहे.
इसाबेल कोझेट हे स्पेनमधील चित्रपट निर्माते म्हणतात की, वातावरण असे झाले आहे की, आमच्या सारखे शांतता व सुव्यवस्थावादी लोक सुन्न झाले आहेत. विभाजनवाद्यांनी असे वातावरण निर्माण केले आहे की, मुळात विभाजनाच्या विरोधात असलेले बहुसंख्य लोक काहीही बोलण्यास तयार नाहीत. कारण स्पष्ट आहे. जे विभाजनविरोधी आहेत, ते दहशतीखाली वावरत आहेत. या प्रकरणी आमच्यात दुहेरी तडा पडतो आहे. स्पेनचे विभाजन होणार हा एक तडा व स्वतंत्र कॅटालोनिया निर्माण होईल, तिथल्या जनतेतही दुही असणार आहे. त्यांची मने दुभंगलेली असणार आहेत, हा दुसरा तडा.
स्पेनचे पोलिसदल गार्डियन सिव्हिल फोर्स या नावे ओळखला जातो. हे अर्ध सैनिक दल आहे. कॅटालोनियातील गार्डियन सिव्हिल आॅफिसर्स यांचाच कॅटालोनियातील आंदोलनकर्त्यांनी छळ केला. कारण त्यांचे सामर्थ्य तोकडे पडले. आता त्यांनी देशभरातून कुमक मागविली आहे.
स्पेनचे राजे सहावे फिलीप यांनी आपल्या सरकारच्या भूमिकेशी सहमती व्यक्त करीत ती योग्य  ठरविली आहे.स्वातंत्र्याची मागणी बेकायदेशीर असून हा देशद्रोह आहे, असे जाहीर केले आहे. रविवारच्या सार्वमतानंतर कॅटालोनियाने चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता, पण तो स्पेनच्या सरकारने अर्थातच फेटाळून लावला.
‘यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली आहे. कॅटालोनिया व स्पेन या दोन्हीमध्ये तडे पडले आहेत. एकमेकात तसेच आपापसातही’, हे उद्गार आहेत जाॅन हाॅपकिन्स विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय प्रगत अध्यासनाच्या फेडेरिका बिंडी यांचे. तसे पाहिले तर स्पेनचे राजे सहावे फिलीप हे मूळचे कॅटालोनियाचे राजपुत्र होते. त्याना कॅटलन भाषा चांगलीच अवगत आहे. त्यांनी केवळ स्पॅनिशमध्ये न बोलता कॅटलन भाषेतही कॅटालोनियातील नागरिकांशी संवाद साधायला हवा होता.  त्याचा आंदोलकांवर परिणाम झाला असता कारण तसे ते त्यांच्यापैकीच होतेना. तसेच त्यांनी दोन्ही पक्षांना संवादासाठी पाचारण करावयास हवे होते. तसे न करता राजे सहावे फिलीप यांनी पंतप्रधान मारियानो रॅजाॅय यांचीच तळी उचलून धरली. यामुळे वातावरण निवळण्याचे बाजूलाच राहिले आणि आगीत तेल ओतल्यासारखेच झाले. स्वतंत्र कॅटालोनियाची मागणी मान्य करणे राजांना शक्यच नव्हते, ते त्यांच्या अधिकार कक्षेतीलही नव्हते, पण ते चर्चेसाठी बोलवू शकले असते आणि कॅटालोना हा प्रदेश स्पेनपासून फारकत घ्यायला का उद्युक्त झाला ते त्यांना जाणून घेता आले असते व स्वातंत्र्य सोडून बाकीच्या मागण्या चर्चेद्वारे सुटू शकतात, किंवा कसे हे पाहता आले असते.
   असे म्हणण्यास जागा आहे, याचा प्रत्यय कॅटालोनियाचे प्रादेशिक अध्यक्ष कॅरिस पिग्डेमाॅंट यांच्या वक्तव्यावरून येतो. ते राजे सहावे फिलीप यांना उद्देशून म्हणाले की, ‘आपण राजे होतात. कॅटालोनियाच्या नागरिकांमध्ये आपल्याबद्दल नितांत आदराची भावना आहे. नव्हे आपण त्यांच्यातलेच आहात. आपण मार्ग काढाल, चर्चा घडवून आणाल, असे आम्हा कॅटालोनियावासियांना वाटत होते. पण असे झाले नाही. ज्या लढ्याचे मी नेतृत्त्व करीत आहे तो मुळात केंद्राकडून होणाऱ्या दडपशाही विरुद्धचा लढा होता व आहे. आपण आमच्या वेदना सनजून घ्याल, अशी आमची आशा व अपेक्षा होती. ती फलदृप झाली नाही. आता आम्ही तडजोडीबाबत निराश झालो आहोत’.
  सध्या कॅटालोनियात आंदोलकांची धरपकड, प्रसार माध्यमांची गळचेपी, इंटरनेट सेवेची तहकुबी व नाकेबंदी सुरू आहे. सर्व संबंधितांवर रात्रंदिवस पाळत ठेवली जाते आहे. हुकुमशाही यापेक्षा वेगळी असते काय?
पंतप्रधान मारियानो रॅजाॅय यांच्या समोर निर्वाणीचा उपाय योजण्याशिवाय वेगळा पर्याय उपलब्ध नाही. स्पेनच्या घटनेतील १५५ क्रमांकाच्या कलमानुसार कॅटालोनियातील राज्य शासन विसर्जित करण्याचा अधिकार केंद्राला आहे. पण पंतप्रधान मारियानो रॅजाॅय यांना स्पेनच्या संसदेत स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे विरोधकांनी मांडलेला अविश्वासाचा ठराव नक्की फेटाळला जाईलच, असे म्हणता येत नाही. अशा परिस्थितीत कॅटालोनियामधील विभाजनविरोधी पण मत उघडपणे व्यक्त न करणाऱ्यांचे मत बदलण्यास सुरवात तर होणार नाहीना?
ही घटना स्पेनमधली असली तरी स्पेनपुरती मर्यादित नाही. युरोपात अशाच वेगळेपणाची भावना ठिकठिकाणी व्यक्त होत आहे. म्हणजे संपूर्ण युरोप एकसंध होणे बाजूलाच राहिले आणि युरोपचेच छोट्याछोट्या राष्ट्रात विभक्त होण्याची भावना वाढीस लागतांना दिसते आहे. ही बाब चिंताजनक आहे.
  जगात असे काही कुठे घडले की, त्यामागे कोणते ना कोणते बडे राष्ट्र असते. पण स्पेन प्रकरणी अमेरिका, रशिया, चीन यापैकी कोणीही नाही. या सगळ्यांना हा प्रश्न सामोपचाराने मिटावा, असे वाटते आहे. ही तशी आश्चर्याचीच बाब म्हटली पाहिजे. पण म्हणूनच या घटनेमागचा एक वेगळाच पैलू समोर येतो आहे, त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा आहे. एककाळ असा येऊन गेला की आपण सगळे  संपूर्ण जगच एक खेडे (ग्लोबल व्हिलेज) या दिशेने जातो आहोत, असे वाटू लागले होते. पण नंतर पुन्हा राष्ट्रभावना जोर पकडू लागली. अमेरिकेसारखे राष्ट्र ट्रंप यांच्या विजयानंतर आपल्या पुरताच विचार करू लागले आहे, असेही वाटू लागले. ज्या ज्या देशात निवडणुका पार पडल्या आहेत, त्या त्या देशात उजवे व कडवे राष्ट्रवादी जनमानसात लोकप्रिय होतांना दिसत आहेत. अनेक देशातील प्रांतात किंवा विभागात वेगळे होण्याची व आपल्यापुरते पाहण्याची वृत्ती वाढीस लागतांना दिसते आहे. याही पुढे जाऊन जो तो आपल्यापुरते पाहू लागला आहे. असे असेल तर मानवजातीसाठी हे सुचिन्ह आहे, असे म्हणता यायचे नाही. स्पेनमधील घडामोडींचा हाच शोध व बोध तर नाहीना?

Wednesday, October 4, 2017

ताक्या वैद्य

ताक्या वैद्य 
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
    परवा एका ठिकाणी जिरेपूड व मीठ घातलेले ताक पिण्याचा योग आला. ताक नळीने (स्ट्राॅ) शोषून पितापिता लहानपणची आठवण जागी झाली. 
    लहानपणी आमच्या घरी गाई म्हशी होत्या. दूधदुभत्याची रेलचेल होती. आम्ही चार भावंडे होतो. मनू, बंडू, मी(वसंता) व बहीण उषा. रोज सकाळी आई आम्हा चौघांसाठी पाटावर साखर घातलेल्या दुधाचे चार कप भरून ठेवायची. शेवटी प्रत्येक कपात एकेक चमचा साय घालीत असे. असे करून झाले की, मुलांनो, यारे दूध प्यायला, असे म्हणून हाक मारीत असे. मी सर्वात अगोदर धावत जाऊन प्रत्येक कपातील साय चमच्याने काढून खाऊन टाकीत असे. एक दिवस हे कोणाच्या तरी लक्षात आले. त्याने आईकडे तक्रार केली. आई मला रागवली. यापुढे तुझ्या कपात साय असणार नाही, असा तिने मला दम दिला. मला रडायला आले. तेव्हा ती म्हणाली की, असे पुन्हा करणार नाहीस, असे मला वचन दे. मी वचन देण्याच्या बाबतीत मुळीच हयगय करीत नसे. त्यामुळे मी तिला ताबडतोब पुन्हा कधीही दुसऱ्याच्या कपातील साय चोरून खाणार नाही, असे आश्वासन व वचन तिला दिले. माझ्याकडून तिला असे वचन अनेकदा घ्यावे लागत असे. असो. 
   ही हकीकत मी माझ्या नातवाला सांगितली, तेव्हा तो म्हणाला , ‘आबा, मी तुमच्या बरोबर असतो, तर माझ्या कपातली साय तुम्हाला रोज दिली असती. अहो, रोज इतके फॅट खाणे आरोग्याला चांगले नसते’. माझ्यासोबत तो तेव्हा नव्हता, याची मला हळहळ वाटली.
  आमच्या घरी दर मंगळवार व शुक्रवारी ताक होत असे. आई रवीने ताक घुसळायची व चटकन लोणी काढायची. सोबत गरम पाणी तयार ठेवलेले असायचे. योग्य वेळी ते टाकले की लोणी ताकातून लगेच वेगळे व्हायचे. गरम पाणी टाकताच केवळ दोनचारदा घुसळले की, लोणी ताकातून वेगळे व्हायचे. हे दृश्य मला खूप आवडायचे. आईने ताक करायला घेतले की, मी तिथे जाऊन ते दृश्य बघत उभा राही. आई लोण्याचा गोळा हातात घेऊन हळूहळू तो झेलीत असे. असे केल्याने त्यातील ताक निथळून लोण्याचा घट्ट गोळा तयार वहायचा. मग आई मला प्रत्येकाला हाक मारायला सांगायची. ‘अगोदर मला लोणी दे, मग हाक मारीन’, अशी माझी अट असायची. ती पूर्ण होताच मी इतरांना बोलवीत असे. त्यांच्या हातावरही आई लोण्याचा लिंबाएवढा गोळा ठेवायची. यावेळी माझा हात पुन्हा समोर असायचा. मी मागच्या जन्मी बहुदा राक्षस असलो पाहिजे, असे तिला वाटायचे. तसे ती बोलूनही दाखवायची. 
   तिने असे म्हटले की, मी तिथून निसटून आरशासमोर उभे राहून आपला चेहरा न्याहळत असे. चेहऱ्यावरचे सगळे भाग इतरांसारखेच दिसायचे. फक्त समोरचे दोन दात तेवढे अंमळ मोठे होते. ते मी चाकूने तासून लहान करायला सुरवात केली होती. कुणाच्याही न कळत माझा हा दात लहान करण्याचा क्रम बरेच दिवस चालू होता. एकदा आईने माझा हा उपद्व्याप पाहिला व ती चांगलीच रागावली. दाताला पडलेल्या खाचा तिने बोट लावून तपासल्या होत्या व मला भूतो न भविष्यति असा दम भरला. पुन्हा असे केलेस तर वडलांसमोर उभे करीन, अशी ताकीदही दिली. दातांवर ते तासल्याच्या त्यावेळच्या खुणा अजूनही माझ्या दातांवर आहेत. दात घासतांना क्वचित आजही त्या बोटांना जाणवतात. असे झाले की आज माझे मलाच हसू येते.
   आमच्या घरी दर मंगळवारी व शुक्रवारी ताक होते, हे ओळखीच्या सगळ्यांना माहीत झाले होते. ती लोकं ताक न्यायला येत. येणाऱ्याला संकोच वाटत नसे. देणाऱ्याला आपण काही खास मेहेरबानी करीत आहोत, असे वाटत नसे. काही लोकांसाठी तर आई ताक वगळून ठेवायची. एखाद वेळेस ते आले नाहीत, तर मला त्यांना बोलवायला पाठवायची. ‘त्यांना हवं असेल तर ते येतील की, बोलवायचे कशाला?’, माझी कुरकूर असायची. यावर आई म्हणायची, ’अरे, त्यांच्याकडे पथ्य आहे. ती लोकं सगळी औषध ताकासोबतच घेतात ना?’ मी ताक नेऊन देतो म्हटले तर आईला ते नको असे. ताक पुरतेपणी ज्याचे त्याला मिळेल की नाही, याची तिला शंका वाटत असावी. पण तिने तसे कधी बोलून मात्र दाखविले नव्हते.
  आमच्या गावी हा वैद्य होता. त्याला सगळे ‘ताक्या वैद्य’ म्हणायचे. कारण त्याची सगळी औषधे ताकासोबतच घ्यायची असायची. लोक चेष्टा करायचे. पण त्याच्यावर लोकांचा विश्वासही होता. मला याची गंमत वाटायची. मी एकदा याबद्दल वडलांना विचारले. तेव्हा ते म्हणाले होते की, ‘ताज्या ताकाची तुलना काही विद्वान मंडळींनी अमृताशी केली आहे, इतके गुण ताज्या ताकात असतात.’

   या आठवणीतून मी जागा झालो आणि जिरपूड व मीठ घातलेले प्लॅस्टिकच्या पिशवीतील ताक नळीने (स्ट्राॅ) शोषून पिण्यास सुरवात केली.

तात्या टोपेज, आॅपरेशन रेड लोटस’

‘तात्या टोपेज, आॅपरेशन रेड लोटस’
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  ब्रिटिश राजवटीला वरदान मानणारे अनेक महाभाग आपल्या देशात होते. क्वचित आजही आढळतील. निदान त्यांनी अवश्य वाचावा असा ग्रंथ एका पराक्रमी महापुरुषाच्या  वंशजाने लिहिला आहे. कोण आहे हा वंशज? त्याचे नाव आहे पराग. आणि महापुरुष? हा महापुरुष आहे, रामचंद्र? या दोन्ही नावांवरून अर्थबोध होण्याची शक्यता खूपच कमी आहे. हा महापुरुष आहे, तात्या टोपे आणि वंशज आहे पराग टोपे. 
  इंग्रजी राजवटीला दयाळू राजवट मानण्याचा काळ या देशात होऊन गेलेला आहे. या राजवटीचे स्वरूप कसे मानवतेला काळीमा फासणारे होते, या राजवटीत क्रूरतेचा कळस कसा गाठला होता, हे या ग्रंथाच्या वाचनाने कळेल. काय नाव आहे, या ग्रंथाचे? या ग्रंथाचे नाव आहे, ‘तात्या टोपेज, आॅपरेशन रेड लोटस’. ग्रंथ इंग्रजीत आहे. १८५७ सालच्या संग्रामात संदेश वहनासाठी भाकऱ्यांचा वापर केल्याचे आपण ऐकले असेल, पण यासाठी कमळे व कमळांच्या पाकळ्यांचा वापर केल्याचे कुणालाही फारसे माहीत असल्याची शक्यता नाही. म्हणूनच बहुदा या ग्रंथाला ग्रंथकाराने नावच देऊन टाकले आहे, ‘तात्या टोपेज, आॅपरेशन लोटस’. ग्रंथाची विशेषता, त्याचे नावीन्य त्याच्या नावपासूनच सुरू होताना वाचकाला दिसेल. १८५७ चा रणसंग्राम एक अभूतपूर्व रणसंग्राम का मानायचा, याचा बोध ग्रंथ वाचून हातावेगळा करतांना प्रत्येक वाचकाला झाल्याशिवाय राहणार नाही. याबाबत एका समीक्षकाने तर म्हटले आहे की, १८५७ झाले नसते तर १९४७ झाले असते का?
  ब्रिटिशांच्या अमानुष क्रूरतेचा उल्लेख बहुदा गोडसे भटजी यांनी ‘माझा प्रवास’ या नावाच्या पुस्तकात प्रथमत: एका सामान्य व्यक्तीच्या चष्म्यातून केलेला आढळतो. गोडसे भटजी हा एक धर्मकांड जाणणारा गरीब भिक्षुक होता. त्या काळी (१८५७ च्या आसपास) काशीला एका महायज्ञाचे आयोजन केले होते. त्या निमित्ताने आवश्यक ती पात्रता असलेल्या ब्राह्मणांपैकी आपण एक आहोत, या विश्वासाने हा भटजी, भरघोस दक्षिणा मिळेल या अपेक्षेने, काशीच्या दिशेने दरकोस दरमदल करीत निघाला आणि या रणसंग्रामात सापडला. त्याची चांगलीच ससेहोलपट झाली व शेवटी ज्या निष्कांचन अवस्थेत तो काशी यात्रेला भरपूर दक्षिणा मिळेल, या आशेने गेला होता, ती त्याची आशा तर पूर्ण झाली नाहीच, पण लुटला गेल्यामुळे मूळच्याच निष्कंचन अवस्थेत स्वगृही परत आला व जीव तर वाचला ना, यात समधान मानू लागला. त्याने लिहिलेले हे प्रवास वर्णन आहे. एका महासंग्रामाचे एका अतिसामान्य व्यक्तिमत्त्वाच्या भिक्षुकाने केलेले वर्णन म्हणूनच हे विशेष वाचनीय झाले आहे. त्याचा व त्याने लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख आत्ता यासाठी करायचा की, त्यात ब्रिटिशांनी केलेल्या भीषण नरसंहाराचा उल्लेख आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणाऱ्यांना ज्या गावातून समर्थन मिळत असे. त्या संपूर्ण गावाला एक भयंकर शिक्षा फर्मावली जात असे. त्या गावातील वय वर्ष १५ ते ५०/५५ वयाच्या सर्व पुरुषांना गोळा करून त्यांची सरसकट कत्तल करण्यात येत असे. याला त्या काळी ‘बीजन’ म्हटले जायचे. हा सर्व उल्लेख गोडसे भटजीच्या प्रवास वर्णनात आहे. त्याला ऐकीव माहिती मानणाऱ्यांचा भ्रम या ग्रंथातील सप्रमाण माहिती/पुराव्यावरून दूर होईलच. पण त्यांच्या माहितीत भरही पडेल ती अशी की केवळ पुरुषच नव्हेत तर अनेकदा स्त्रिया व मुलांच्या वाट्यालाही हीच शिक्षा येत असे. वंशविच्छेदावर टीका करणारे अनेक ब्रिटिश लेखक/ राजकारणी आहेत. मात्र वंशविच्छेदाच्या बाबतीत ब्रिटिशांची कीर्तीही फारशी वेगळी नाही, याचे पुरावे आपल्याला हा ग्रंथ देतो. या छळामुळे, त्याच्या धसक्यामुळे ‘नेटिव्ह’ (मूळ रहिवासी) पुन्हा बंड करण्यास धजावणार नाहीत, ते आज्ञापालन करणारे मूकजन होतील, असा ब्रिटिशांचा कयास होता. याच ब्रिटिशांनी इतरांच्या वंशविच्छेदाचा निषेध केलेला आहे. त्यांनानिदान  या प्रश्नी तरी नाकाने कांदे सोलण्याची सवड या ग्रंथाने ठेवलेली नाही. 
 या भूमीने शक/हूणांची आक्रमणे पचविली आहेत. मोगलांच्या आक्रमणाबाबतची लढाई अशाच निर्णायक निष्कर्षाप्रत पोचण्याअगोदरच ब्रिटिश व अन्य पाश्चात्य या देशात आले. त्यांच्या विरोधात लढायचे असेल तर हिंदूंना चुचकारले पाहिजे, त्यांच्या सहकार्य व/वा पाठिंब्याशिवाय आपला निभाव लागणार नाही, याची जाणीव टिपू सुलतानला झाली, अशी इतिहासाची नोंद आहे. १८५७ च्या संग्रामात तर हिंदू दिल्लीच्या मुसलमान बादशहा बहाद्दूरशहाजफर याच्या नेतृत्त्वात लढले होते. हा संग्राम यशस्वी न झाल्यामुळे व पुढे ब्रिटिशांच्या ‘फोडा व झोडा’ या नीतीमुळे शक/हूण व स्थानिक जनता जसे एकरस जीवन जगायला लागले, तसे मुसलमानांच्या बाबतीत होऊ शकले नाही/ नसावे. हे काहीही असले तरी १८५७ मध्ये हिंदू व मुसलमान एक होऊन ब्रिटिशांविरुद्ध लढलेले दिसतात. याचा धसकाही  ब्रिटिशांनी घेतलेला स्पष्ट दिसतो.
  या ग्रंथात आपल्याला एका वेगळ्याच भारताचे दर्शन घडते. १८५७ चा लढा हे शिपायांचे बंड नव्हते, तर ते ब्रिटिशांविरुद्धचे एक सुनियोजित सैनिकी प्रत्याक्रमण होते, याचा आपल्याला साक्षात्कार होतो. आपल्या प्रत्येक विधानाच्या/निष्कर्षाच्या पुष्ट्यर्थ ग्रंथकाराने सज्जड पुरावा दिलेला आहे, तसेच हा एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरणार आहे, याची पुरेपूर जाणीव लेखकाला आहे. या लढ्यातील उभय पक्षाकडचे लहानमोठे शेकडो नायक व सैनिक यांच्या पराक्रमांच्या व पलायनाच्याही कथा ग्रंथकाराने इतिहासाची वस्तुनिष्ठतेची अट कसोशीने पालन करून मांडल्या आहेत. समोर साक्षात मृत्यू आ वासून पुढे दिसत असतांनाही केवळ सैनिकच नव्हेत तर, सामान्यजनही कसे डगमगले नाहीत, कुणीही कशी डळमळीत भूमिका घेतली नाही, याचे यथातथ्य वर्णन या ग्रंथात आहे. विशेष बाब ही की, अशी जिवाची बाजी लावली तरी कोणतीही बक्षिसी किंवा पारितोषिक आपल्याला मिळणार नाही, याची प्रत्येकाला जाणीव होती. पण असे म्हणावे तर तसेही नव्हते. मिळणार होते की मातृभूमीला स्वातंत्र्य!  यापेक्षा मोठे असे कोणते पारितोषिक असणार होते?
 आॅपरेशन रेड लोटस हा एक वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक ग्रंथ आहे. एका वंशजाने आपल्या पूर्वजांच्या कार्याचा घेतलेला हा वस्तुनिष्ठ आढावा आहे. पूर्वजांची कीर्ती सांगणारे अनेक सापडतील. पण काळाच्या उदरात गडप झालेल्या हकीकती उजेडात आणण्याचा हा प्रयत्न वेगळ्याच जातकुळीचा म्हटला पाहिजे. ही जातकुळी संशोधकाची आहे. एका सच्च्या इतिहासकाराची आहे. असे हे पराग टोपे, तात्या टोपे यांचे वंशज आहेत. त्यांनी १८५७ च्या त्या महानपर्वाची माहिती मिळविण्यासाठी जिवाचे रान केले. इतिहासात दडलेले प्रसंग उभे करण्यासाठी ते ते  प्रसंग जिवंत उभे करण्यासाठी, स्वत: त्या त्या जागी जाऊन त्यात प्राण फुंकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
   १८५७ चा भारतीय व इंग्रज यातील संग्राम हा भारताच्या इतिहासातील एक भव्य व उत्तुंग संग्राम होता. तात्या टोपे हे या संग्रामातील तेवढेच उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. अनेक पाश्चात्य इतिहासकार या संग्रामाला शेतकरी, जमीनदार, यांनी उभारलेले व विखुरलेले बंड म्हणून संबोधतात. एका नेमक्या शत्रूविरुद्ध संघटितपणे उभारलेला हा लढा होता, असे त्यांना वाटत नाही. याउलट मार्क्सवादी या लढ्याकडे एक वर्ग संघर्ष म्हणून पाहतात. जमीनदार व वसाहतवादी सत्ता या विरुद्ध हा लढा होता, असे त्यांना वाटते. ज्याची जी विचारधारा त्यानुसार त्याचे या लढ्याकडे पाहणे असते. प्रत्येकाचा स्वत:चा स्वतंत्र चष्मा असतो. पण आता मात्र हा भारतीयांनी परकीय सत्तेविरुद्ध उभारलेला पहिला संघटित व सुनियोजित स्वातंत्र्य लढा होता, हे आता जागतिक कीर्तीचे इतिहासकारही मानू लागले आहेत. आपल्यापैकी अनेकांना  अशा प्रमाणपत्राची आवश्यकता भासते, म्हणूनच केवळ याचा उल्लेख करायचा. असेच एक इतिहासाचे अभ्यासक सी ए बेली हे केंब्रिज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या मते बंडखोर व स्वातंत्र्य सैनिक यांच्या मनोभूमिकेत महदंतर असते. १९४७ साली लखनऊच्या रेसिडेंसीसमोर जमा झालेला जनसागर आणि १८५७ च्या संग्रामात केव्हातरी कानपूरच्या बिबीघरासमोर गोळा झालेल्यांची वैचारिकता एकाच जातकुळीची होती, हे मान्य करायला हवे, असे त्यांनी नमूद केले आहे.

कानपूरच्या ब्रिटिशांच्या कत्तलीबाबत कदाचित प्रथमच एवढी तपशीलवार हकीकत यापूर्वी मांडली गेली असेल. या कत्तलीचा सूड म्हणून हजारो भारतीयांची कत्तल ब्रिटिशांनी केली, अनेकांना तोफेच्या तोंडीही दिले. पण याबाबतची वस्तुस्थिती ‘तात्या टोपेज, आॅपरेशन आॅफ रेड लोटसमध्ये’ बहुदा प्रथमच समोर येते आहे. बीजनच्या निमित्ताने ब्रिटिशांनी केलेला भीषण नरसंहार व त्यांच्या मनात भडकलेला सूडाग्नी त्यांच्या वसाहतवादी भूमिकेत सतत कायम राहिलेला पहायला मिळतो. कानपूरची ब्रिटिश बायकामुलांची कत्तल  व नंतर त्यांनी या कत्तलीचा सूड उगवण्यासाठी केलेली एतद्देशीयांची केलेली कत्तल, एवढे सरळ साधे व बाळबोध निदान या प्रश्ना संदर्भात करणे कसे चुकीचे आहे, हे या ग्रंथाच्या वाचनातून कळेल. हेही या ग्रंथाचे एक महत्तवाचे वैशिष्ट्य आहे. निर्दोष ब्रिटिश बायकामुलांची कत्तल करण्यात आली  व तिची प्रतिक्रिया म्हणून ब्रिटिशांनी तशीच रणनीती स्वीकारली, असे म्हणून ब्रिटन मधील स्थानिक टीकाकारांना ब्रिटिशांनी गप्प केले. पण हे सर्व प्रकरण एवढे साधे, सरळ व सोपे नव्हते, हे या ग्रंथात सप्रमाण दाखविले आहे.