Wednesday, October 4, 2017

ताक्या वैद्य

ताक्या वैद्य 
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
    परवा एका ठिकाणी जिरेपूड व मीठ घातलेले ताक पिण्याचा योग आला. ताक नळीने (स्ट्राॅ) शोषून पितापिता लहानपणची आठवण जागी झाली. 
    लहानपणी आमच्या घरी गाई म्हशी होत्या. दूधदुभत्याची रेलचेल होती. आम्ही चार भावंडे होतो. मनू, बंडू, मी(वसंता) व बहीण उषा. रोज सकाळी आई आम्हा चौघांसाठी पाटावर साखर घातलेल्या दुधाचे चार कप भरून ठेवायची. शेवटी प्रत्येक कपात एकेक चमचा साय घालीत असे. असे करून झाले की, मुलांनो, यारे दूध प्यायला, असे म्हणून हाक मारीत असे. मी सर्वात अगोदर धावत जाऊन प्रत्येक कपातील साय चमच्याने काढून खाऊन टाकीत असे. एक दिवस हे कोणाच्या तरी लक्षात आले. त्याने आईकडे तक्रार केली. आई मला रागवली. यापुढे तुझ्या कपात साय असणार नाही, असा तिने मला दम दिला. मला रडायला आले. तेव्हा ती म्हणाली की, असे पुन्हा करणार नाहीस, असे मला वचन दे. मी वचन देण्याच्या बाबतीत मुळीच हयगय करीत नसे. त्यामुळे मी तिला ताबडतोब पुन्हा कधीही दुसऱ्याच्या कपातील साय चोरून खाणार नाही, असे आश्वासन व वचन तिला दिले. माझ्याकडून तिला असे वचन अनेकदा घ्यावे लागत असे. असो. 
   ही हकीकत मी माझ्या नातवाला सांगितली, तेव्हा तो म्हणाला , ‘आबा, मी तुमच्या बरोबर असतो, तर माझ्या कपातली साय तुम्हाला रोज दिली असती. अहो, रोज इतके फॅट खाणे आरोग्याला चांगले नसते’. माझ्यासोबत तो तेव्हा नव्हता, याची मला हळहळ वाटली.
  आमच्या घरी दर मंगळवार व शुक्रवारी ताक होत असे. आई रवीने ताक घुसळायची व चटकन लोणी काढायची. सोबत गरम पाणी तयार ठेवलेले असायचे. योग्य वेळी ते टाकले की लोणी ताकातून लगेच वेगळे व्हायचे. गरम पाणी टाकताच केवळ दोनचारदा घुसळले की, लोणी ताकातून वेगळे व्हायचे. हे दृश्य मला खूप आवडायचे. आईने ताक करायला घेतले की, मी तिथे जाऊन ते दृश्य बघत उभा राही. आई लोण्याचा गोळा हातात घेऊन हळूहळू तो झेलीत असे. असे केल्याने त्यातील ताक निथळून लोण्याचा घट्ट गोळा तयार वहायचा. मग आई मला प्रत्येकाला हाक मारायला सांगायची. ‘अगोदर मला लोणी दे, मग हाक मारीन’, अशी माझी अट असायची. ती पूर्ण होताच मी इतरांना बोलवीत असे. त्यांच्या हातावरही आई लोण्याचा लिंबाएवढा गोळा ठेवायची. यावेळी माझा हात पुन्हा समोर असायचा. मी मागच्या जन्मी बहुदा राक्षस असलो पाहिजे, असे तिला वाटायचे. तसे ती बोलूनही दाखवायची. 
   तिने असे म्हटले की, मी तिथून निसटून आरशासमोर उभे राहून आपला चेहरा न्याहळत असे. चेहऱ्यावरचे सगळे भाग इतरांसारखेच दिसायचे. फक्त समोरचे दोन दात तेवढे अंमळ मोठे होते. ते मी चाकूने तासून लहान करायला सुरवात केली होती. कुणाच्याही न कळत माझा हा दात लहान करण्याचा क्रम बरेच दिवस चालू होता. एकदा आईने माझा हा उपद्व्याप पाहिला व ती चांगलीच रागावली. दाताला पडलेल्या खाचा तिने बोट लावून तपासल्या होत्या व मला भूतो न भविष्यति असा दम भरला. पुन्हा असे केलेस तर वडलांसमोर उभे करीन, अशी ताकीदही दिली. दातांवर ते तासल्याच्या त्यावेळच्या खुणा अजूनही माझ्या दातांवर आहेत. दात घासतांना क्वचित आजही त्या बोटांना जाणवतात. असे झाले की आज माझे मलाच हसू येते.
   आमच्या घरी दर मंगळवारी व शुक्रवारी ताक होते, हे ओळखीच्या सगळ्यांना माहीत झाले होते. ती लोकं ताक न्यायला येत. येणाऱ्याला संकोच वाटत नसे. देणाऱ्याला आपण काही खास मेहेरबानी करीत आहोत, असे वाटत नसे. काही लोकांसाठी तर आई ताक वगळून ठेवायची. एखाद वेळेस ते आले नाहीत, तर मला त्यांना बोलवायला पाठवायची. ‘त्यांना हवं असेल तर ते येतील की, बोलवायचे कशाला?’, माझी कुरकूर असायची. यावर आई म्हणायची, ’अरे, त्यांच्याकडे पथ्य आहे. ती लोकं सगळी औषध ताकासोबतच घेतात ना?’ मी ताक नेऊन देतो म्हटले तर आईला ते नको असे. ताक पुरतेपणी ज्याचे त्याला मिळेल की नाही, याची तिला शंका वाटत असावी. पण तिने तसे कधी बोलून मात्र दाखविले नव्हते.
  आमच्या गावी हा वैद्य होता. त्याला सगळे ‘ताक्या वैद्य’ म्हणायचे. कारण त्याची सगळी औषधे ताकासोबतच घ्यायची असायची. लोक चेष्टा करायचे. पण त्याच्यावर लोकांचा विश्वासही होता. मला याची गंमत वाटायची. मी एकदा याबद्दल वडलांना विचारले. तेव्हा ते म्हणाले होते की, ‘ताज्या ताकाची तुलना काही विद्वान मंडळींनी अमृताशी केली आहे, इतके गुण ताज्या ताकात असतात.’

   या आठवणीतून मी जागा झालो आणि जिरपूड व मीठ घातलेले प्लॅस्टिकच्या पिशवीतील ताक नळीने (स्ट्राॅ) शोषून पिण्यास सुरवात केली.

No comments:

Post a Comment