Wednesday, October 4, 2017

तात्या टोपेज, आॅपरेशन रेड लोटस’

‘तात्या टोपेज, आॅपरेशन रेड लोटस’
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  ब्रिटिश राजवटीला वरदान मानणारे अनेक महाभाग आपल्या देशात होते. क्वचित आजही आढळतील. निदान त्यांनी अवश्य वाचावा असा ग्रंथ एका पराक्रमी महापुरुषाच्या  वंशजाने लिहिला आहे. कोण आहे हा वंशज? त्याचे नाव आहे पराग. आणि महापुरुष? हा महापुरुष आहे, रामचंद्र? या दोन्ही नावांवरून अर्थबोध होण्याची शक्यता खूपच कमी आहे. हा महापुरुष आहे, तात्या टोपे आणि वंशज आहे पराग टोपे. 
  इंग्रजी राजवटीला दयाळू राजवट मानण्याचा काळ या देशात होऊन गेलेला आहे. या राजवटीचे स्वरूप कसे मानवतेला काळीमा फासणारे होते, या राजवटीत क्रूरतेचा कळस कसा गाठला होता, हे या ग्रंथाच्या वाचनाने कळेल. काय नाव आहे, या ग्रंथाचे? या ग्रंथाचे नाव आहे, ‘तात्या टोपेज, आॅपरेशन रेड लोटस’. ग्रंथ इंग्रजीत आहे. १८५७ सालच्या संग्रामात संदेश वहनासाठी भाकऱ्यांचा वापर केल्याचे आपण ऐकले असेल, पण यासाठी कमळे व कमळांच्या पाकळ्यांचा वापर केल्याचे कुणालाही फारसे माहीत असल्याची शक्यता नाही. म्हणूनच बहुदा या ग्रंथाला ग्रंथकाराने नावच देऊन टाकले आहे, ‘तात्या टोपेज, आॅपरेशन लोटस’. ग्रंथाची विशेषता, त्याचे नावीन्य त्याच्या नावपासूनच सुरू होताना वाचकाला दिसेल. १८५७ चा रणसंग्राम एक अभूतपूर्व रणसंग्राम का मानायचा, याचा बोध ग्रंथ वाचून हातावेगळा करतांना प्रत्येक वाचकाला झाल्याशिवाय राहणार नाही. याबाबत एका समीक्षकाने तर म्हटले आहे की, १८५७ झाले नसते तर १९४७ झाले असते का?
  ब्रिटिशांच्या अमानुष क्रूरतेचा उल्लेख बहुदा गोडसे भटजी यांनी ‘माझा प्रवास’ या नावाच्या पुस्तकात प्रथमत: एका सामान्य व्यक्तीच्या चष्म्यातून केलेला आढळतो. गोडसे भटजी हा एक धर्मकांड जाणणारा गरीब भिक्षुक होता. त्या काळी (१८५७ च्या आसपास) काशीला एका महायज्ञाचे आयोजन केले होते. त्या निमित्ताने आवश्यक ती पात्रता असलेल्या ब्राह्मणांपैकी आपण एक आहोत, या विश्वासाने हा भटजी, भरघोस दक्षिणा मिळेल या अपेक्षेने, काशीच्या दिशेने दरकोस दरमदल करीत निघाला आणि या रणसंग्रामात सापडला. त्याची चांगलीच ससेहोलपट झाली व शेवटी ज्या निष्कांचन अवस्थेत तो काशी यात्रेला भरपूर दक्षिणा मिळेल, या आशेने गेला होता, ती त्याची आशा तर पूर्ण झाली नाहीच, पण लुटला गेल्यामुळे मूळच्याच निष्कंचन अवस्थेत स्वगृही परत आला व जीव तर वाचला ना, यात समधान मानू लागला. त्याने लिहिलेले हे प्रवास वर्णन आहे. एका महासंग्रामाचे एका अतिसामान्य व्यक्तिमत्त्वाच्या भिक्षुकाने केलेले वर्णन म्हणूनच हे विशेष वाचनीय झाले आहे. त्याचा व त्याने लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख आत्ता यासाठी करायचा की, त्यात ब्रिटिशांनी केलेल्या भीषण नरसंहाराचा उल्लेख आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणाऱ्यांना ज्या गावातून समर्थन मिळत असे. त्या संपूर्ण गावाला एक भयंकर शिक्षा फर्मावली जात असे. त्या गावातील वय वर्ष १५ ते ५०/५५ वयाच्या सर्व पुरुषांना गोळा करून त्यांची सरसकट कत्तल करण्यात येत असे. याला त्या काळी ‘बीजन’ म्हटले जायचे. हा सर्व उल्लेख गोडसे भटजीच्या प्रवास वर्णनात आहे. त्याला ऐकीव माहिती मानणाऱ्यांचा भ्रम या ग्रंथातील सप्रमाण माहिती/पुराव्यावरून दूर होईलच. पण त्यांच्या माहितीत भरही पडेल ती अशी की केवळ पुरुषच नव्हेत तर अनेकदा स्त्रिया व मुलांच्या वाट्यालाही हीच शिक्षा येत असे. वंशविच्छेदावर टीका करणारे अनेक ब्रिटिश लेखक/ राजकारणी आहेत. मात्र वंशविच्छेदाच्या बाबतीत ब्रिटिशांची कीर्तीही फारशी वेगळी नाही, याचे पुरावे आपल्याला हा ग्रंथ देतो. या छळामुळे, त्याच्या धसक्यामुळे ‘नेटिव्ह’ (मूळ रहिवासी) पुन्हा बंड करण्यास धजावणार नाहीत, ते आज्ञापालन करणारे मूकजन होतील, असा ब्रिटिशांचा कयास होता. याच ब्रिटिशांनी इतरांच्या वंशविच्छेदाचा निषेध केलेला आहे. त्यांनानिदान  या प्रश्नी तरी नाकाने कांदे सोलण्याची सवड या ग्रंथाने ठेवलेली नाही. 
 या भूमीने शक/हूणांची आक्रमणे पचविली आहेत. मोगलांच्या आक्रमणाबाबतची लढाई अशाच निर्णायक निष्कर्षाप्रत पोचण्याअगोदरच ब्रिटिश व अन्य पाश्चात्य या देशात आले. त्यांच्या विरोधात लढायचे असेल तर हिंदूंना चुचकारले पाहिजे, त्यांच्या सहकार्य व/वा पाठिंब्याशिवाय आपला निभाव लागणार नाही, याची जाणीव टिपू सुलतानला झाली, अशी इतिहासाची नोंद आहे. १८५७ च्या संग्रामात तर हिंदू दिल्लीच्या मुसलमान बादशहा बहाद्दूरशहाजफर याच्या नेतृत्त्वात लढले होते. हा संग्राम यशस्वी न झाल्यामुळे व पुढे ब्रिटिशांच्या ‘फोडा व झोडा’ या नीतीमुळे शक/हूण व स्थानिक जनता जसे एकरस जीवन जगायला लागले, तसे मुसलमानांच्या बाबतीत होऊ शकले नाही/ नसावे. हे काहीही असले तरी १८५७ मध्ये हिंदू व मुसलमान एक होऊन ब्रिटिशांविरुद्ध लढलेले दिसतात. याचा धसकाही  ब्रिटिशांनी घेतलेला स्पष्ट दिसतो.
  या ग्रंथात आपल्याला एका वेगळ्याच भारताचे दर्शन घडते. १८५७ चा लढा हे शिपायांचे बंड नव्हते, तर ते ब्रिटिशांविरुद्धचे एक सुनियोजित सैनिकी प्रत्याक्रमण होते, याचा आपल्याला साक्षात्कार होतो. आपल्या प्रत्येक विधानाच्या/निष्कर्षाच्या पुष्ट्यर्थ ग्रंथकाराने सज्जड पुरावा दिलेला आहे, तसेच हा एक ऐतिहासिक दस्तऐवज ठरणार आहे, याची पुरेपूर जाणीव लेखकाला आहे. या लढ्यातील उभय पक्षाकडचे लहानमोठे शेकडो नायक व सैनिक यांच्या पराक्रमांच्या व पलायनाच्याही कथा ग्रंथकाराने इतिहासाची वस्तुनिष्ठतेची अट कसोशीने पालन करून मांडल्या आहेत. समोर साक्षात मृत्यू आ वासून पुढे दिसत असतांनाही केवळ सैनिकच नव्हेत तर, सामान्यजनही कसे डगमगले नाहीत, कुणीही कशी डळमळीत भूमिका घेतली नाही, याचे यथातथ्य वर्णन या ग्रंथात आहे. विशेष बाब ही की, अशी जिवाची बाजी लावली तरी कोणतीही बक्षिसी किंवा पारितोषिक आपल्याला मिळणार नाही, याची प्रत्येकाला जाणीव होती. पण असे म्हणावे तर तसेही नव्हते. मिळणार होते की मातृभूमीला स्वातंत्र्य!  यापेक्षा मोठे असे कोणते पारितोषिक असणार होते?
 आॅपरेशन रेड लोटस हा एक वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक ग्रंथ आहे. एका वंशजाने आपल्या पूर्वजांच्या कार्याचा घेतलेला हा वस्तुनिष्ठ आढावा आहे. पूर्वजांची कीर्ती सांगणारे अनेक सापडतील. पण काळाच्या उदरात गडप झालेल्या हकीकती उजेडात आणण्याचा हा प्रयत्न वेगळ्याच जातकुळीचा म्हटला पाहिजे. ही जातकुळी संशोधकाची आहे. एका सच्च्या इतिहासकाराची आहे. असे हे पराग टोपे, तात्या टोपे यांचे वंशज आहेत. त्यांनी १८५७ च्या त्या महानपर्वाची माहिती मिळविण्यासाठी जिवाचे रान केले. इतिहासात दडलेले प्रसंग उभे करण्यासाठी ते ते  प्रसंग जिवंत उभे करण्यासाठी, स्वत: त्या त्या जागी जाऊन त्यात प्राण फुंकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
   १८५७ चा भारतीय व इंग्रज यातील संग्राम हा भारताच्या इतिहासातील एक भव्य व उत्तुंग संग्राम होता. तात्या टोपे हे या संग्रामातील तेवढेच उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. अनेक पाश्चात्य इतिहासकार या संग्रामाला शेतकरी, जमीनदार, यांनी उभारलेले व विखुरलेले बंड म्हणून संबोधतात. एका नेमक्या शत्रूविरुद्ध संघटितपणे उभारलेला हा लढा होता, असे त्यांना वाटत नाही. याउलट मार्क्सवादी या लढ्याकडे एक वर्ग संघर्ष म्हणून पाहतात. जमीनदार व वसाहतवादी सत्ता या विरुद्ध हा लढा होता, असे त्यांना वाटते. ज्याची जी विचारधारा त्यानुसार त्याचे या लढ्याकडे पाहणे असते. प्रत्येकाचा स्वत:चा स्वतंत्र चष्मा असतो. पण आता मात्र हा भारतीयांनी परकीय सत्तेविरुद्ध उभारलेला पहिला संघटित व सुनियोजित स्वातंत्र्य लढा होता, हे आता जागतिक कीर्तीचे इतिहासकारही मानू लागले आहेत. आपल्यापैकी अनेकांना  अशा प्रमाणपत्राची आवश्यकता भासते, म्हणूनच केवळ याचा उल्लेख करायचा. असेच एक इतिहासाचे अभ्यासक सी ए बेली हे केंब्रिज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या मते बंडखोर व स्वातंत्र्य सैनिक यांच्या मनोभूमिकेत महदंतर असते. १९४७ साली लखनऊच्या रेसिडेंसीसमोर जमा झालेला जनसागर आणि १८५७ च्या संग्रामात केव्हातरी कानपूरच्या बिबीघरासमोर गोळा झालेल्यांची वैचारिकता एकाच जातकुळीची होती, हे मान्य करायला हवे, असे त्यांनी नमूद केले आहे.

कानपूरच्या ब्रिटिशांच्या कत्तलीबाबत कदाचित प्रथमच एवढी तपशीलवार हकीकत यापूर्वी मांडली गेली असेल. या कत्तलीचा सूड म्हणून हजारो भारतीयांची कत्तल ब्रिटिशांनी केली, अनेकांना तोफेच्या तोंडीही दिले. पण याबाबतची वस्तुस्थिती ‘तात्या टोपेज, आॅपरेशन आॅफ रेड लोटसमध्ये’ बहुदा प्रथमच समोर येते आहे. बीजनच्या निमित्ताने ब्रिटिशांनी केलेला भीषण नरसंहार व त्यांच्या मनात भडकलेला सूडाग्नी त्यांच्या वसाहतवादी भूमिकेत सतत कायम राहिलेला पहायला मिळतो. कानपूरची ब्रिटिश बायकामुलांची कत्तल  व नंतर त्यांनी या कत्तलीचा सूड उगवण्यासाठी केलेली एतद्देशीयांची केलेली कत्तल, एवढे सरळ साधे व बाळबोध निदान या प्रश्ना संदर्भात करणे कसे चुकीचे आहे, हे या ग्रंथाच्या वाचनातून कळेल. हेही या ग्रंथाचे एक महत्तवाचे वैशिष्ट्य आहे. निर्दोष ब्रिटिश बायकामुलांची कत्तल करण्यात आली  व तिची प्रतिक्रिया म्हणून ब्रिटिशांनी तशीच रणनीती स्वीकारली, असे म्हणून ब्रिटन मधील स्थानिक टीकाकारांना ब्रिटिशांनी गप्प केले. पण हे सर्व प्रकरण एवढे साधे, सरळ व सोपे नव्हते, हे या ग्रंथात सप्रमाण दाखविले आहे.

No comments:

Post a Comment