Friday, October 6, 2017

स्पेनमधील घडामोडींचा शोध व बोध

स्पेनमधील घडामोडींचा शोध व बोध
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
कॅटालोनियामध्ये रविवार दिनांक १ आॅक्टोबर २०१७ सार्वमत घेऊन स्पेनपासून विभक्त व स्वतंत्र होण्याबाबतचा कौल ९० टक्यापेक्षाही जास्त मतांनी घेतला गेला. पण फक्त ४० ते ४५ टक्के मतदारांनीच मतदानात भाग घेतला आहे, त्यामुळे हा जनमताचा निर्णायक कौल मानता यायचा नाही. पण स्पॅनिश लोकांतील दरी वाढण्याची चिन्हे मात्र या निमित्ताने समोर येत आहेत. केंद्र शासनाविरुद्ध लवकरच प्रत्यक्ष संघर्ष केव्हाही सुरू होऊ शकेल, अशी भीती निरीक्षकांना वाटते आहे.
गेले काही दिवस कॅटालोनिया मध्ये सतत ऊग्र प्रदर्शने व संप होतच होते.  इशान्य स्पेनमधील कॅटालोनिया हा आर्थिक संपन्न भाग आहे. बार्सिलोना, गिरोना, लेडा आणि तारागोना या चार विभागांचा मिळून तयार होणाऱ्या या कॅटालोनिया प्रांताचे वैशिट्य म्हणजे मुबलक स्वायत्तता, एकूण संख्येच्या १६ टक्के लोकसंख्या व सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २० टक्के उत्पन्न ही आहेत. स्पेनला लागून चिंचोळ्या पट्टीच्या आकाराचा पोर्तुगाल आहे. स्पेन व पोर्तुगाल मिळून आपल्या भारतासारखे एक द्विपकल्प होते. म्हणजे तीन बाजूंनी पाणी(समुद्र) व एका बाजूला जमीन असे या प्रदेशाचे स्वरूप आहे. जमिनीकडून स्पेन हा देश कॅटालोनिया या सरहद्दीच्या प्रांताने युरोपला जोडलेला अाहे. हे भौगोलिक वैशिष्ट्य यासाठी जाणून घ्यायचे की, त्यामुळे हा भूभाग स्पेनपासून सहज वेगळा होऊ शकेल असा आहे. हा भूभाग स्पेनच्या मध्यभागी असता तर हे शक्य झाले नसते. नव्हे वेगळेपणाची भावनाही कॅटालोनियामध्ये निर्माण झाली नसती, असे म्हणायला जागा आहे. कॅटालोनिया या एका सीमावर्ती विभागातील स्थानिक शासनाने स्वत:च्याच निर्णयानुसार हे सार्वमत घेतले आहे.  स्पेनचे पंतप्रधान मारियानो रॅजाॅय यांनी नि:शस्त्र निदर्शकांवर अमानुष व कठोर कारवाई केली पण याचा नेमका उलटा परिणाम झाला व आता कॅटालोनियाचे नागरिक अधिकच कडवे झाले आहेत. दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकांवर ठाम असून अभूतपूर्व घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होतांना दिसतो आहे. या आंदोलनाची ही लागण स्पेनपुरती मर्यादित राहणार नसून ती संपूर्ण युरोपात पसरणार आहे, अशी भीती निरीक्षकांना वाटते आहे. अगोदरच युरोपात अनेक  छोटीछोटी राष्ट्रे आहेत. महत्प्रयासाने युरोपीयन युनीयन कसेबसे अस्तित्वात आले आहे. हे होते न होते तोच ब्रिटन युरोपीयन युनीयनमधून बाहेर पडले आहे. आता युनीयनच्या घटक राष्ट्रांचेच तुकडे पडू लागले तर युरोपीयन युनीयनमध्ये एकच बजबजपुरी माजेल. युरोपातील ग्रीससारखी राष्ट्रे केवळ कंगालच नाहीत तर कर्जबाजारीही आहेत. यांचा उपयोग तर नाहीच पण भारच होणार, या भावनेने ही राष्ट्रे युरोपीयन युनीयनमधून बाहेर पडली तर बरेच होईल, असे मत युरोपात बळावू लागले आहे.
    कॅटालोनियात सार्वमत घेतले जाऊ नये म्हणून स्पेनच्या प्रशासनाने अडकाठी निर्माण केली होती त्यामुळे २० लक्ष  लोकांचे मतदान होऊ शकलेले नव्हते. यातील बहुसंख्य लोक कॅटालोनियाने विभक्त व स्वतंत्र व्हावे या विचाराचेच आहेत, यात शंका नाही. पण तरीही कॅटालोनियामधील ५० टक्यापेक्षा जास्त लोक विभक्त व स्वतंत्र होण्याच्या बाजू आहेत, असे ठरणार नाही. तरीही लवकरच कॅटालोनिया स्वातंत्र्याची घोषणा करणार आहे, हे नक्की आहे. इकडे स्पेनच्या हायकोर्टाने विभक्तवादी पोलिस अधिकारी व राजकारणी यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असून ही घटना थोपवण्याचा प्रयत्न सुरू केला असून तसे आदेशही दिले आहेत.
   एकतर्फी स्वातंत्र्याची घोषणा करून निर्माण झालेल्या कॅटालोनियाचे स्वरूप कसे असेल, हे आताच सांगता येणार नसले तरी सध्या स्पेन व कॅटालोनियात जे काही घडणार आहे ते भीषण असेल.  कॅटालोनियाचे एक बडे नेते मिरीया बोया हे म्हणत आहेत की, आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही माघार घेणार नाही.
   कॅटालोनियाचे मुख्यालय असलेल्या बार्सिलोना मध्ये स्वातंत्र्यवाद विरोधी लोकांनी स्पेनचे ध्वज हाती नाचवत निदर्शने केली. यांना वाटते आहे की, मूठभर स्वार्थी राजकारण्यांनी आपल्या अदूरदर्शी, संकुचित व हटवादी भूमिकेने कॅटालोनियाच्या नागरिकांना वेठीस धरले आहे.
इसाबेल कोझेट हे स्पेनमधील चित्रपट निर्माते म्हणतात की, वातावरण असे झाले आहे की, आमच्या सारखे शांतता व सुव्यवस्थावादी लोक सुन्न झाले आहेत. विभाजनवाद्यांनी असे वातावरण निर्माण केले आहे की, मुळात विभाजनाच्या विरोधात असलेले बहुसंख्य लोक काहीही बोलण्यास तयार नाहीत. कारण स्पष्ट आहे. जे विभाजनविरोधी आहेत, ते दहशतीखाली वावरत आहेत. या प्रकरणी आमच्यात दुहेरी तडा पडतो आहे. स्पेनचे विभाजन होणार हा एक तडा व स्वतंत्र कॅटालोनिया निर्माण होईल, तिथल्या जनतेतही दुही असणार आहे. त्यांची मने दुभंगलेली असणार आहेत, हा दुसरा तडा.
स्पेनचे पोलिसदल गार्डियन सिव्हिल फोर्स या नावे ओळखला जातो. हे अर्ध सैनिक दल आहे. कॅटालोनियातील गार्डियन सिव्हिल आॅफिसर्स यांचाच कॅटालोनियातील आंदोलनकर्त्यांनी छळ केला. कारण त्यांचे सामर्थ्य तोकडे पडले. आता त्यांनी देशभरातून कुमक मागविली आहे.
स्पेनचे राजे सहावे फिलीप यांनी आपल्या सरकारच्या भूमिकेशी सहमती व्यक्त करीत ती योग्य  ठरविली आहे.स्वातंत्र्याची मागणी बेकायदेशीर असून हा देशद्रोह आहे, असे जाहीर केले आहे. रविवारच्या सार्वमतानंतर कॅटालोनियाने चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता, पण तो स्पेनच्या सरकारने अर्थातच फेटाळून लावला.
‘यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली आहे. कॅटालोनिया व स्पेन या दोन्हीमध्ये तडे पडले आहेत. एकमेकात तसेच आपापसातही’, हे उद्गार आहेत जाॅन हाॅपकिन्स विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय प्रगत अध्यासनाच्या फेडेरिका बिंडी यांचे. तसे पाहिले तर स्पेनचे राजे सहावे फिलीप हे मूळचे कॅटालोनियाचे राजपुत्र होते. त्याना कॅटलन भाषा चांगलीच अवगत आहे. त्यांनी केवळ स्पॅनिशमध्ये न बोलता कॅटलन भाषेतही कॅटालोनियातील नागरिकांशी संवाद साधायला हवा होता.  त्याचा आंदोलकांवर परिणाम झाला असता कारण तसे ते त्यांच्यापैकीच होतेना. तसेच त्यांनी दोन्ही पक्षांना संवादासाठी पाचारण करावयास हवे होते. तसे न करता राजे सहावे फिलीप यांनी पंतप्रधान मारियानो रॅजाॅय यांचीच तळी उचलून धरली. यामुळे वातावरण निवळण्याचे बाजूलाच राहिले आणि आगीत तेल ओतल्यासारखेच झाले. स्वतंत्र कॅटालोनियाची मागणी मान्य करणे राजांना शक्यच नव्हते, ते त्यांच्या अधिकार कक्षेतीलही नव्हते, पण ते चर्चेसाठी बोलवू शकले असते आणि कॅटालोना हा प्रदेश स्पेनपासून फारकत घ्यायला का उद्युक्त झाला ते त्यांना जाणून घेता आले असते व स्वातंत्र्य सोडून बाकीच्या मागण्या चर्चेद्वारे सुटू शकतात, किंवा कसे हे पाहता आले असते.
   असे म्हणण्यास जागा आहे, याचा प्रत्यय कॅटालोनियाचे प्रादेशिक अध्यक्ष कॅरिस पिग्डेमाॅंट यांच्या वक्तव्यावरून येतो. ते राजे सहावे फिलीप यांना उद्देशून म्हणाले की, ‘आपण राजे होतात. कॅटालोनियाच्या नागरिकांमध्ये आपल्याबद्दल नितांत आदराची भावना आहे. नव्हे आपण त्यांच्यातलेच आहात. आपण मार्ग काढाल, चर्चा घडवून आणाल, असे आम्हा कॅटालोनियावासियांना वाटत होते. पण असे झाले नाही. ज्या लढ्याचे मी नेतृत्त्व करीत आहे तो मुळात केंद्राकडून होणाऱ्या दडपशाही विरुद्धचा लढा होता व आहे. आपण आमच्या वेदना सनजून घ्याल, अशी आमची आशा व अपेक्षा होती. ती फलदृप झाली नाही. आता आम्ही तडजोडीबाबत निराश झालो आहोत’.
  सध्या कॅटालोनियात आंदोलकांची धरपकड, प्रसार माध्यमांची गळचेपी, इंटरनेट सेवेची तहकुबी व नाकेबंदी सुरू आहे. सर्व संबंधितांवर रात्रंदिवस पाळत ठेवली जाते आहे. हुकुमशाही यापेक्षा वेगळी असते काय?
पंतप्रधान मारियानो रॅजाॅय यांच्या समोर निर्वाणीचा उपाय योजण्याशिवाय वेगळा पर्याय उपलब्ध नाही. स्पेनच्या घटनेतील १५५ क्रमांकाच्या कलमानुसार कॅटालोनियातील राज्य शासन विसर्जित करण्याचा अधिकार केंद्राला आहे. पण पंतप्रधान मारियानो रॅजाॅय यांना स्पेनच्या संसदेत स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे विरोधकांनी मांडलेला अविश्वासाचा ठराव नक्की फेटाळला जाईलच, असे म्हणता येत नाही. अशा परिस्थितीत कॅटालोनियामधील विभाजनविरोधी पण मत उघडपणे व्यक्त न करणाऱ्यांचे मत बदलण्यास सुरवात तर होणार नाहीना?
ही घटना स्पेनमधली असली तरी स्पेनपुरती मर्यादित नाही. युरोपात अशाच वेगळेपणाची भावना ठिकठिकाणी व्यक्त होत आहे. म्हणजे संपूर्ण युरोप एकसंध होणे बाजूलाच राहिले आणि युरोपचेच छोट्याछोट्या राष्ट्रात विभक्त होण्याची भावना वाढीस लागतांना दिसते आहे. ही बाब चिंताजनक आहे.
  जगात असे काही कुठे घडले की, त्यामागे कोणते ना कोणते बडे राष्ट्र असते. पण स्पेन प्रकरणी अमेरिका, रशिया, चीन यापैकी कोणीही नाही. या सगळ्यांना हा प्रश्न सामोपचाराने मिटावा, असे वाटते आहे. ही तशी आश्चर्याचीच बाब म्हटली पाहिजे. पण म्हणूनच या घटनेमागचा एक वेगळाच पैलू समोर येतो आहे, त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा आहे. एककाळ असा येऊन गेला की आपण सगळे  संपूर्ण जगच एक खेडे (ग्लोबल व्हिलेज) या दिशेने जातो आहोत, असे वाटू लागले होते. पण नंतर पुन्हा राष्ट्रभावना जोर पकडू लागली. अमेरिकेसारखे राष्ट्र ट्रंप यांच्या विजयानंतर आपल्या पुरताच विचार करू लागले आहे, असेही वाटू लागले. ज्या ज्या देशात निवडणुका पार पडल्या आहेत, त्या त्या देशात उजवे व कडवे राष्ट्रवादी जनमानसात लोकप्रिय होतांना दिसत आहेत. अनेक देशातील प्रांतात किंवा विभागात वेगळे होण्याची व आपल्यापुरते पाहण्याची वृत्ती वाढीस लागतांना दिसते आहे. याही पुढे जाऊन जो तो आपल्यापुरते पाहू लागला आहे. असे असेल तर मानवजातीसाठी हे सुचिन्ह आहे, असे म्हणता यायचे नाही. स्पेनमधील घडामोडींचा हाच शोध व बोध तर नाहीना?

No comments:

Post a Comment