Sunday, March 4, 2018

अध्यक्षीय निवडणूक - रशियन स्टाईल

अध्यक्षीय निवडणूक - रशियन स्टाईल 
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee?
  रशियात अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पहिली फेरी रविवार दिनांक 18  मार्च 2018 रोजी पार पडणार असून कुणालाही स्पष्ट बहुमत (50 टक्यांपेक्षा जास्त मते) न मिळाल्यास 8 एप्रिल 2018 ला मतदानाची दुसरी फेरी पार पडेल. दिनांक 6 डिसेंबर 2017 ला विद्यमान अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आपण लगोपाठ दुसऱ्यांदा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. आजवरच्या जनमत चाचण्यांचा विचार करता व्लादिमिर पुतिन निवडून येतील याबद्दल कुणाच्याही मनात शंका दिसत नाही.
प्रमुख राजकीय पक्ष
 रशियात अध्यक्ष मतदारातून प्रत्यक्ष निवडणुकीने सहा वर्षांसाठी निवडला जातो. किमान  35 वर्ष वय 10 वर्षांचा रशियात स्थायी निवास व सतत दोनपेक्षा जास्तवेळा अध्यक्षपदी राहण्यास मनाई हे अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारीचे निकष आहेत. रशियन लोकसभेत - स्टेट ड्युमा - मध्ये ज्या राजकीय पक्षांना प्रतिनिधित्त्व आहे,ते पक्ष आपला अध्यक्षपदाचा उमेदवार उभा करू शकतात. ज्या पक्षांना स्टेट ड्युमामध्ये प्रतिनिधित्त्व नसेल त्यांना 31 जानेवारी पूर्वी निदान एक लक्ष स्वाक्षऱ्या गोळा कराव्या लागतील. ज्यांना स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवायची असेल त्यांच्यासाठी सह्यांचा आकडा 3 लक्ष इतका आहे. ज्या पक्षांना स्वाक्षऱ्या गोळा करण्याची आवश्यकता नाही, ते पक्ष असे आहेत. 1 सिव्हिक प्लॅटफाॅर्म,  2 दी कम्युनिस्ट पार्टी आॅफ रशियन फेडरेशन,  3 दी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आॅफ रशिया, 4 ए जस्ट रशिया, 5 रोडिना अॅंड युनायटेड रशिया. 
 आश्चर्याची गोष्ट ही आहे की, विद्यमान अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असून त्यांनी  3 लक्ष 15  हजार स्वाक्षऱ्या सादर केल्या असून त्या सर्व स्वाक्षऱ्यांची सत्यता मान्य करण्यात आली आहे.
  अलेक्सी नॅव्हलनी यांनी आपला जाहीरनामा 13 डिसेंबर  2017 ला प्रलिद्ध करून उमेदवारी अर्ज 24 डिसेंबर 2017 ला सादर केला. पण त्यांना या पूर्वी कैदेची शिक्षा झालेली आहे, या सबबीखाली त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. हा अन्याय आहे, असे सांगत त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
प्रमुख उमेदवार  
  पावेल ग्रुडिनिन (दी कम्युनिस्ट पार्टी आॅफ रशियन फेडरेशन) , व्लादिमिर पुतिन, सेनिया सोबॅक या महिला उमेदवार, बोरिस टिटाॅव, ग्रेगरी यवलिंन्स्की,  व्लादिमिर झिरिनोव्हॅस्की (दी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आॅफ रशिया) हे उमेदवार सध्या रिंगणात आहेत. पैकी अलेक्सी नॅव्हलनी यांना उमेदवारी मिळाली तर सेनिया सोबॅक त्यांना पाठिंबा देत आपली उमेदवारी परत घेणार आहेत. याशिवाय आणखीही उमेदवार रिंगणात राहू शकतील.
  अलेक्सी नॅव्हलनी यांना उमेदवारी नाकारली 
   रशियातील एक प्रभावी नेते अशी अलेक्सी नॅव्हलनी यांची ओळख आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज नाकारण्यात आल्यामुळे मार्चमध्ये होऊ घातलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा म्हणून गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीत (सैबेरियातील उष्णतामान उणे 50 अंश सेल्सियस) मेळावा आयोजित केला होता. ही निवडणूक एक लुटुपुटीचा खेळ आहे, असा आरोप करीत प्रभावी व भ्रष्टाचारविरोधी म्हणून ख्याती असलेल्या अलेक्सी नॅव्हलनी यांच्या नेतृत्त्वात हा मेळावा आयोजित होता. या मेळाव्याला उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांसह अलेक्सी नॅव्हलनी यांनाही अटक करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी अॅलेक्सी यांच्याशी धक्काबुक्की केली. त्यात ते खाली पडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ओढत बसमध्ये नेले. आपल्याला अटक झाली असली, तरी आपल्या सहकाऱ्यांनी लढा चालूच ठेवा, असा संदेश  अॅलेक्सी यांनी ट्विटरवरून दिला होता.
रशियातील येकाटेरिनबर्ग शहराचे मेयर विरोधी पक्षाचे आहेत. अशी फारशी उदाहरणे रशियात आढळत नाहीत. त्यांनी होऊ घातलेली निवडणूक एक फार्स असल्यामुळे या निवडणुकीवर जनतेने बहिष्कार टाकून आपला असंतोष जगजाहीर केला पाहिजे, अशा आशयाचे आवाहन केले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमिर पुतिन हेच भरपूर मताधिक्याने निवडून येतील, असे भाकीत राजकीय निरीक्षकांचे असले, तरी रशियात असा मेळावा आयोजित होतो, यालाही महत्त्व आहे, हे सर्वच मान्य करतात. व्लादिमिर पुतिन यावेळी पुन्हा एकदा सहा वर्षांसाठी निवडून येणार यावर जरी मतैक्य असले तरी त्यानंतरच्या सहा वर्षात रशियातील परिस्थिती बदललेली असेल व व्लादिमिर पुतिन यांच्या पक्षाला आव्हान देणारा तगडा विरोधी पक्ष रशियात उदयाला येईल, हेही नक्की मानले जाते. आयर्न कर्टनची पकड सैल व्हायला एवढा काळ द्यावा लागणारच, असेही मानले जाते.
 विरोधाचे सूर
   रशिया विरोधाचे सूर गेल्या दशकापासूनच उमटू लागले असले तरी  अलेक्सी नॅव्हलनी यांच्यासारखा खंदा विरोधक पहिल्यांदाच पुढे येतो आहे. अलेक्सी नॅव्हलनी यांची तशी बिनशर्त सुटका झाली असली तरीत्यांना कोर्ात हजर व्हावे लागणार आहे. त्यावेळी त्यांच्यावर आरोप ठेवण्यात येतील, असे मानले जाते. कारण पोलिसांनी त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली असून काही साहित्य जप्तही केले आहे. अलेक्सी नॅव्हलनी यांनी रशियातील जनतेला निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले असून एकाला अटक होताच दुसऱ्याने त्याची जागा घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. असे होणार नसेल तर एकेकट्याने दिलेल्या लढ्याला अर्थ उरणार नाही, असे म्हणत रशियन जनमानसाला साद घातली आहे. पुतिन जितका काळ  सत्तेवर राहतील, तेवढा काळ रशियन राष्ट्रजीवन सडत राहणार आहे, असे टोकाचे विधान अलेक्सी नॅव्हलनी यांनी केले आहे. भावनिक उद्रेक निर्माण करणाऱ्या या आवाहनाला रशियात प्रतिसाद मिळत असून बंदी हुकुम झुगारून देत रशियात ठिकठिकणी मेळावे आयोजित होत आहेत.  योग्यतेच्या तुलनेत कमी वेतन व व्यापारात अपेक्षेपेक्षा कमी परतावा हे प्रकार आपण आणखी किती दिवस सहन करायचे असा व्यावहारिक व रोखठोक सवाल ते लोकांना विचारित असतात. ‘ही निवडणूक नाही, रशियात झारशाही आहे’, असे ते कंठरवाने सांगत असतात. लगेच हीच वाक्ये प्रतिध्वनी स्वरुपात समोरच्या जनमानसातूनही बाहेर पडतात. त्यामुळे रशियात धरपकड सुरू झाली असून आंदोलनकर्त्यांच्या निदान दोनशे स्थानिक पुढाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी धरपकड व झडतीसत्राचे समर्थन करीत बाॅम्बहल्याची शक्यता वर्तवली आहे. येत्या दोन महिन्यात रशियातील वातावरण बरेच तापणार, हे या घटनांवरून स्पष्ट होते आहे.
 आंदोलनांचे विविध प्रकार 
  निरनिराळ्या शहरांमध्ये अलेक्सी नॅव्हलनी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत करण्यात आलेल्या आंदोलनांना वेगवेगळ्या प्रकारे हाताळण्याचा प्रकार रशियन प्रशासनाने केला. कझन नावाच्या शहरात तर एक अभिनव पद्धत योजण्यात आली होती. हमरस्त्याच्या कडेला आंदोलकांना मेळावा भरवण्यासाठी जागा देण्यात आली. जवळच कचऱ्याचे पृथक्करण करणारा प्रकल्प होता. आंदोलक गोळा होताच बुलडोझर आणून त्यांना झाकून टाकील अशी बर्फाची चांगली दहा फूट उंचीची भिंत उभारण्यात आली. त्यामुळे रस्त्यावरील रहदारीला भिंतीपलीकडले दिसणारच नाही, अशी प्रशासनाची अपेक्षा होती. पण आंदोलक त्यांचे बारसे जेवून आलेले होते. एकेक आंदोलक महत्प्रयासाने त्या भिंतीवर चढून हातात फलक घेऊन उभे झाले. आता रस्त्याने येणाऱ्याच्या जाणाऱ्याच्या नजरेला एका ओळीत उभे राहिलेले ते 600 आंदोलक नक्कीच पडू लागले. भिंतीवर उभी राहिलेली आंदोलकांची ती रांग मागील निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती. 
  23 वर्षांचा आयटी स्पेशालिस्ट ग्रिगोरी बाॅश्कारेव म्हणतो की, ‘मी पुतिनच्या राजवटीतच वाढलो आहे. मी कर भरतो. पण देशात चांगले रस्ते नाहीत, कल्याणकारी योजना नाहीत. सगळा पैसा लुबाडून भ्रष्ट अधिकारी वर्ग मोटारी उडवीत आहेत.’
  तर 79 वर्षांचा ज्येष्ठ स्वता:चे नाव खलिउल्ला एवढेच सांगतो. तो म्हणतो, ‘समाजवादी समजरचना उभारण्याच्या कामी मी माझे आयुष्य वेचले आहे. आज या वयात मला मिळणारे निवृत्तिवेतन तुटपुंजे आहे. घरभाडे भरावे तर औषधासाठी पैसे कुठून आणायचे, ही चिंता आहे. आपल्यावर वृद्धापकाळी अशी पाळी येईल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते.’ हेचि फळ काय मम तपाला, असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते. ‘आम्हाला निदर्शने करण्यासाठी कचऱ्याच्या डेपो जवळची जागा मुक्रर करून दिली आहे. बरोबरच आहे, त्यांच्या लेखी आमच्यात व कचऱ्यात फरक उरलेला नाहीच मुळी’. 
 मास्को व सेंट पिटर्सबर्ग येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शने करणारे  एकत्र येतील, असे प्रशासनाला वात होते. तिथे मात्र प्रशासनानं रौद्र रूप धारण केलं. प्रशासनानं सरळ सरळ धमकीच दिली. ‘खबरदार, निदर्शने कराल तर! चिरडून टाकू’. तरीही धमकीला न जुमानता हजारोंनी निदर्शनात बेधडक सहभाग नोंदवला. एक स्वतंत्र वेबसाईट उभारून लोक शासनाचे वाभाडे काढीत आहेत.
  निरीक्षकांचे मत असे आहे की, अलेक्सी नॅव्हलनीला आजतरी परिणाम घडवून आणील, इतपत पाठिंबा मिळतांना दिसत नाही. कदाचित लोकांच्या मनात भीतीचे सावट असेल. सैबेरियातील छळछावण्यांच्या आठवणी/कथा त्यांना थिजवून ठेवीत असतील. पण व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात दोन घटक असे आहेत की, त्यांच्यावर जनमानसातील भीतीचा परिणाम होणार नाही. एक घटक हा आहे की, व्लादिमिर पुतिन वार्धक्याकडे झुकले आहेत, (वय वर्ष 65). त्यामुळे आधुनिकतेपासून ते दूर होत चालले आहेत. त्यांना प्रौढत्त्वी निज शैषवास जपता आलेले नाही. दुसरे असे की, रशियन तरूण जो पूर्वी राजकारणापासून अलिप्त असायचा, तो आता समाजजीवनात अधिकाधिक रस घेऊ लागला आहे. तरुणातील ही जागृती ही एक जागतिक प्रक्रिया असून रशियन तरूणही त्याला अपवाद नाहीत. रशियातील गणितज्ञ व आयटी इंजिनिअर असलेल्या व वयाने तरूण असलेल्या ( वय वर्ष 32) सर्गेल झिकिन यांचे हे मत आहे. इकडे अलेक्सी नॅव्हलनी  यांचे वय 41 वर्षे इतके आहे. त्यातून त्यांचे प्रसन्न व रुबाबदार व्यक्तिमत्त्व रशियन तरुणाईला आकृष्ट करीत असते, हीही एक जमेची बाजू आहे.

  बहिष्काराला सर्व विरोधकांचा पाठिंबा नाही 
सर्वांनाच अलेक्सी नॅव्हलनीचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार पटत नाही. या प्रश्नावर विरोधक विभागलेले आहेत. आज मतदानात सहभाग घेण्याला फारसा अर्थ नाही, कारण जिंकून येण्यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था व्लादिमिर पुतिनने अगोदरच करून ठेवलेली आहे, हे त्यांना मान्य असले तरी शेवटी याच मार्गाने व्लादिमिर पुतिन यांना घालवावे लागेल, असे त्यांचे मत आहे. अगोदरच सर्वकाही शिजले असले तरी व निकाल काय लागणार हे स्पष्ट असले तरी मतदानात सहभागी होण्यावाचून  दुसरा कोणताही मार्ग आपल्याला उपलब्ध नाही, असे त्यांचे मत आहे. आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत द्या. असा कोणीच उभा नसेल तर निदान पुतिनच्या नावावर फुली मारून बाहेर यावे, असा या गटाचा विचार आहे. बहिष्कार टाकून आपण पुतिन यांना निवडून येण्यासच मदत करणार आहोत, हे लक्षात घ्या. कुणी एक एकांडा शिलेदार अशा आशयाचा फलक घेऊन हिंडतांना अनेकांनी पाहिला आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी तशीच कमी राणार आहे. बहिष्कार टाकून ती आणखी कमी करून आपण काय साधणार, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
  मोकळ्या वातावरणात निवडणूक झाली तर आपण व्लादिमिर पुतिन यांचा पराभव करू, असा अलेक्सी नॅव्हलनी यांचा दावा असून, म्हणूनच आपल्यावर आळ घेऊन आपल्यावर खटला भरण्यात आला होता, एवढेच नव्हे तर आपल्याला कैदेची शिक्षाही करण्यात आली होती  व निवडणुकीला उभे राहण्यास यापूर्वीच अपात्र ठरविण्यात आले आहे, असा गंभीर आरोप अलेक्सी नॅव्हलनी यांनी व्लादिमिर पुतिन यांच्यावर केला आहे. रशियातील स्टासबर्ग येथील युरोपियन कोर्ट आॅफ ह्यूमन राई्ट्स नावाच्या न्यायालयातून बाहेर आल्यानंतर अलेक्सी नॅव्हलनी यांनी हा आरोप केला आहे.  व्लादिमिर पुतिन यांनी मात्र आजवर कधीही अलेक्सी नॅव्हलनी यांचा साधा नामोल्लेखही केलेला नाही.
  स्टॅलिननंतरची पुतिनची मोठी कारकीर्द 
  रशियात पुतिन यांचा एकछत्री अंमल 2000 पासून सुरू आहे. मध्ये चार वर्षांचा खंड पडला. कारण पुन्हा पुन्हा सलगपणे एकाच व्यक्तीला रशियात अध्यक्षपदाची निवडणूक लविता येत नाही. पण पुतिन यांनी यातूनही मार्ग काढला अध्यक्षपदाच्या कारकिर्दीला ब्रेक देत ते पंतप्रधान झाले व त्यांनी सलगता संपविली. त्यानंतर ते रशियाचे पुन्हा एकदा अध्यक्ष झाले. आता ते पुन्हा चौथ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढार आहेत व जिंकणार आहेत व पुढची सहा वर्षे म्हणजे 2024 पर्यंत रशियाचे अध्यक्ष असणार आहेत. यानंतर मात्र त्यांना पुन्हा एकदा ब्रेक घ्यावा लागणार आहे. त्याची चिंता आता कशाला करायची, असा विचार व्लादिमिर पुतिन कदाचित करीत असावेत. कारण स्टॅलिन नंतरची ही सर्वात मोठी कारकीर्द असणार आहे.

No comments:

Post a Comment