नक्षलवादी, दुहेरी, तिहेरी व दुटप्पीही!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
कोरेगाव-भीमा दंगल प्रकरण अजूनही गाजतेच आहे. या संबंधात एल्गार परिषदेचे आयोजक मानली जाणारी एक व्यक्ती, नागपूर येथील दोन वकील आणि दिल्लीस्थित एक कार्यकर्ता यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. तसेच नागपूर विद्यापीठाच्या एका प्राध्यापिकेचीही चौकशी सुरू असून तिच्या घराची झडती घेण्यात आली आहे. यासोबतच दलित संघटनांमध्ये हिंसक माओवादी विचार पेरण्याची जी मोहीम माओवाद्यांकडून सुरू आहे, तिचा पर्दाफाश यानिमित्ताने झाला असून पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या थिंक टँकलाही मोठा धक्का बसला असल्याची चर्चा आहे. दिल्लीला अटक झालेला कार्यकर्ता मूळचा केरळचा आहे. नक्षली थिंक टँकचा प्रमुख असलेल्या साईबाबाला अटक झाल्यानंतर या कार्यकर्त्याकडे त्याच्याकडची जबाबदारी सोपविण्यात आली होती. नक्षली चळवळीत जंगलातील माओवादी व शहरातील माओवादी यांच्यातील निरोपांची देवाणघेवाण करणाऱ्या नागपुरातील एका कार्यकर्त्याचाही या निमित्ताने पोलिस तपास करीत आहेत. नक्षलवाद्यांचे निरनिराळे चेहरे, मुखवटे, स्लीपर सेल,थिंक टॅंक याबद्द्ल सतत निरनिराळ्या धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. एखादा वरकरणी साधा वाटणारा प्रश्न जेव्हा अचानक व प्रमाणाबाहेर ऊग्र रूप धारण करतो, तेव्हा त्यामागे नक्षलवाद्यांची थिंक टॅंक असते, असे यापूर्वीही अनेकदा लक्षात आले आहे. अशी प्रकरणे न्यायलयांच्या कसोटीवर अनेकदा उतरत नाहीत व ही मंडळी पुन्हा उजळ माथ्याने समाजात प्रागतिक विचाराचे म्हणून वावरू लागतात. त्यामुळे या सगळ्यांची माहिती सामान्य नागरिकांपर्यत पोचणेही आवश्यक झाले आहे.
नक्षलवादाचा उगम
नक्षलवादी हे नाव पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुडी सबडिव्हिजनमधील नक्षलबारी या नावाच्या खेड्यावरून आले आहे. नक्षलवादी/माओवादी यांच्या उठावानंतर हे खेडे प्रसिद्धीला आले. हे खेडे हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या तराई प्रदेशाला लागून आहे. नक्षलबारी व नेपाळ यांना वेगळे करणारी मेची नदी मात्र नेपाळच्या हद्दीतून वाहते.
नक्षलवाद्यांचे अध्वर्यू
1967 साली गरीब शेतकऱ्यांनी नक्षलबारीला उठाव केला व कसेल त्याची जमीन हा नारा दिला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 11 जण मृत्युमुखी पडले. कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (माओवादी) या गटाने इथे नक्षलबारीला लेनिन, स्टॅलिन व माओ यांचे पुतळे उभारले आहेत. गोळीबारत मरण पावलेल्यांची नावे कोरलेला एक स्तंभही इथेच आहे. चारू मुजुमदार, कानू सन्याल व जंगल संथाल हे नक्षलवादी चळवळीचे प्रणेते मानले जातात. हा नक्षलवाद्यांचा मूळ व पहिला गट म्हणता येईल.
दंडकारण्य नक्षलवाद्यांचे प्रभाव स्थान
आज नक्षलवादी चळवळ पूर्वी ज्या भूभागाला दंडकारण्य म्हणून संबोधले जायचे त्या भागातच मुख्यत: प्रभावी आहे. या पूर्वीच्या दंडकारण्याचा आजचा उरला सुरला भाग चार राज्यात म्हणजे मध्यप्रदेश, ओडिशा, आंध्र व तेलंगणा या त विभागला गेलेला आढळतो. मध्यप्रदेशातील बस्तर, ओडिशाचा तुलनेने एक मोठा भाग, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा व आसपासचा थोडासा भूभाग आणि पूर्वीच्या आंध्रप्रदेशातील व आजच्या तेलंगणातील बराचसा भाग म्हणजे प्राचीन दंडकारण्याचे आधुनिक काळातील अवशिष्ट रूप आहे, असे म्हणावयास हवे. तसा हा भूभाग सलग आहे. पण आज चार राज्यात विभागला गेल्यामुळे ही चार राज्ये आपापल्या परीने येथील सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण हाताळत आहेत. प्राचीन दंडकारण्य हे एक निबिड अरण्य होते. आजचे उर्वरित दंडकारण्य त्या निबिडपणाची आठवण करून देण्याइतपत निबिड निश्चितच आहे. त्यामुळे या भागात सैनिकी कारनाई करतांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. हा नक्षलवाद्यांचा दुसरा गट म्हणावा लागेल.
शोषित, पीडित, वंचितांना मदत केलीच पाहिजे
भारतात शोषित, वंचित, पीडित लोक भांडवलदारी व्यवस्थेकडून सतत भरडले, चिरडले जात असतात, त्यांचे रक्षण करण्याची, त्यांना न्याय देण्याची जबाबदारी आपल्याच शिरावर आहे, असे नक्षलवादी मानतात/ मानत आले आहेत. हा हेतू साध्य करण्यासाठी नक्षलवाद्यांना सर्व प्रकारचे मार्ग मान्य आहेत. यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा, हिंसेचा मार्ग योग्य मानायचा किंवा नाही, हा वादाचा मुद्दा असू शकेल. पण शोषित, पीडित, वंचितांना मदत करण्याच्या बाबतीत कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही.
साध्यानुसार मार्ग नाही
हे साध्य करायचे असेल तर सध्याची भांडवलशाही व्यवस्थाच बदलावी लागेल, असे नक्षलवादी मानतात. पण भारतात त्यांनी जी चळवळ उभारली आहे, त्याचा परिणाम म्हणून प्रत्यक्षात असे झालेले नाही. जी व्यवस्था बदलण्याचा चंग बांधून नक्षलवादी पुढे सरसावले होते, त्या व्यवस्थेचाच एक भाग म्हणून त्यापैकी काही नक्षलवादी राहू लागले आहेत, असा आक्षेप त्यांच्यावर घेतला जातो. हा आक्षेप कितपत खरा आहे आणि जर खरा असेल तर असे का व्हावे/झाले हा प्रश्न सहाजीकच निर्माण होतो.
ध्येयप्राप्तीचे एकापेक्षा अधिक मार्ग असू शकतात
उद्दिष्ट/उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर एकमार्गी, एकसुरीच असले पाहिजे, असे म्हणता यायचे नाही. बहुदा याच भूमिकेतून नक्षलवादी चळवळीने दुहेरी /तिहेरी स्वरूप धारण केले असावे. त्यातही काही गैर नाही. सोप्या शब्दात मांडायचे तर नक्षलवाद्यांचा एक गट आदीवासी/ वनवासी क्षेत्रात काम करू लागला तर आणखी एक गट शहरात दैनंदिन कामाबरोबरच विचारही प्रसृत करू लागला आहे. परस्परसंपर्क यंत्रणा राबवू लागला आहे. वनवासी क्षेत्रातील चळवळीसाठी संपत्ती, सामग्री बरोबरच वैचारिक व कायदेशीर दबावगटही निर्माण करू लागला आहे. चळवळीचे हे तिहेरी स्वरूप झाले.
पण पुढे हा तिसरा गट नावापुरताच नक्षलवादी राहिला व प्रत्यक्षात स्वत:च आज खंडणीखोर झाला आहे, असा आक्षेप आहे. मूळ ध्येय/उद्दिष्ट एकच असावे, वेगवेगळे मार्ग असायला हरकत नाही पण ते परस्परपोषक असावेत हा प्रयत्न होता व ते योग्यच होते. पण पुढे चळवळीचे स्वरूप दुहेरी/तिहेरी न राहता दुटप्पी झाले असे म्हटले जाऊ लागले व तसे ते झाले असेल तर ते या चळवळीचे दुर्दैव व अपयश म्हणावे लागेल व देशासाठी अहितकारी म्हणावे लागेल.
पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न नाही
व्यवस्थेत बदल करायचा असेल तर तो व्यवस्थेच्या बाहेर राहून करता येईल का? त्यासाठी व्यवस्थेतच राहण्याची आवश्यकता असते का? व्यवस्था मोडून गरिबांचे कल्याण साधता येईल का? हा पुनरुत्थानाचा मार्ग आहे का? असू शकेल का? आजची व्यवस्था श्रीमंतांना संरक्षण देते. केवळ ती मोडून चालणार/भागणार नाही. तिची जागा घेणारी दुसरी व्यवस्था उभी करावी लागेल. असे काहीही न करता प्रस्थापित व्यवस्थेवर फक्त हल्ला करून काय घडते/घडले, ते आता अधिकाधिक उघडपणे दिसू लागले आहे. विध्वंस हा विद्यमान व्यवस्थेला पर्याय असू शकत नाही. जुनी व्यवस्था केवळ मोडून तोडून टाकून नवीन व्यवस्था आपोआप निर्माण होत नसते.
साम्यवादी व नक्षलवादी
साम्यवादी पक्ष निवडणूक लढवून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. भलेही त्यांचा निवडणुकीच्या मार्गाने सत्ता मिळविण्यावर विश्वास नसला तरीही. लोकशाही व्यवस्थेत सहभागी होऊन तिला सुरुंग लावण्याचा हा प्रकार आहे.
नक्षलवाद्यांचे एक बरे आहे. त्यांना हा लोकशाही मार्ग साफ नामंजूर आहे. क्रांती व मतपेटी यांचा संबंधच त्यांना मान्य नाही. त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला आहे. व्यवस्था बदलण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आदीवासींच्या मुलांनी शासनमान्य शिक्षणसंस्थेत शिकू नये, असा त्यांचा कटाक्ष असतो. त्या शाळा/ संस्था त्यांना नष्ट करायच्या असतात. सरकारला कोणत्याही प्रकारे सहकार्य करू नये यावर त्यांचा भर असतो. निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असे त्यांचे आवाहन असते. सरकारी कार्यालये ते नष्ट करतात. सरकारी अधिकाऱ्यांना विशेषत: पोलिसांना ते ठार मारतात. अशाप्रकारे आजवर किती लोकांना मृत्यू पत्करावा लागला असेल याची गणती न केलेलीच बरी. नक्षलवाद्यांच्या एका गटाची ही तऱ्हा लोकांनाही चांगलीच माहीत झाली आहे. पण यातून काही साध्य झाले आहे काय? हा प्रश्न जरी बाजूला सारला तरी याबाबत नक्षलवादी प्रामाणिक आहेत, हे मात्र खरे आहे. हिंसेचा पुरस्कार करतांना ते किंचितही संकोचत नाहीत. साम्यवाद्यांसारखे त्यांचे आत एक व बाहेर दुसरे असे नाही.
नक्षलवाद्यांचा आणखी एक गट
नक्षलवाद्यांच्या या गटाच्या कारवाया वेगळ्याप्रकारे सुरू आहेत. हा गट शहरात वास्तव्याला असतो. ते शहरात राहून नक्षलवादी चळवळ अप्रत्यक्षपणे चालवीत असतात. ते हातात बंदूक घेत नाहीत. हिंसा करीत नाहीत. पण नक्षलवाद्यांचे समर्थन करण्याची एकही संधी सोडत नाहीत. नक्षल चळवळीला मदत करण्याच्या आरोपावरून यापैकी ज्यांना ज्यांना अटक झाली आहे, त्यांच्या विरुद्धची प्रकरणे न्यायालयात टिकली नाहीत. 13 गुन्ह्यांची नोंद असलेली बस्तरची सोनी सोरी 11 गुन्ह्यात निर्दोष सुटली. विनायक सेनही निर्दोष सुटले. हे प्रकरण तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजले होते. सुधीर ढवळे व अरूण फरोरा यांची कथाही वेगळी नाही. पुण्याच्या कबीर मंचच्या काही सदस्यांवरचे खटले अजून सुरूच आहेत. दिल्लीच्या साईबाबाला मात्र जन्मठेप झाली व तो तुरुंगात आहे. पण 90 टक्के प्रकरणी आरोपी निर्दोष का सुटतात? याचे कारण असे की, जंगलात बंदुका घेऊन लढणारे सशस्त्र तरुण नक्षलवादी याबाबत शंका नसते/नाही. याबाबतचा कायदा पुरेसा स्पष्ट आहे. पण पण जे स्वत: बंदूक हाती घेत नाहीत, शहरात राहतात, छुपी मदत करतात, ते कोण? नक्षलवादी की नक्षलवाद्यांचे सहानुभूतीदार? त्यांचे वर्तन गुन्हा या सदरात मोडते का? याबाबतचा कायदा पुरेसा स्पष्ट नाही व त्यामुळे त्यांच्या विरुद्धचे खटले न्यायालयात टिकत नाहीत.
नुकतेच गडचिरोली जिल्ह्यात फार मोठ्या संख्येत नक्षलवादी मारले गेले. लगेच यांचा एक गट सक्रिय झाला. त्याने प्रत्यक्ष जागी जाऊन पाहणी केल्याचा आव आणला. त्यांनी निष्कर्ष काढले ते असे. चकमकीत काही नागरिकही मारले गेले, त्याचे काय? काही शरण येऊ इच्छित होते पण त्यांना तशी संधी मिळाली नाही, म्हणून त्यांनी जीव वाचविण्यासाठी वाहत्या नदीत उड्या मारल्या व ते बुडून मेले, ही हिंसा नाही काय? काही नक्षलवादी शरण येणार होते, ते उगीचच मारले गेले नाहीत का? नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडावा, शरण यावे, त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल, अशी संधी शासन वारंवार देत असते. पण त्यावेळी हा अभ्यास गट त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी, त्यांना शरण येण्यास प्रवृत्त करण्यासाठी कधी समोर आला आहे का? कायद्याचे पालन करून जीवन जगणाऱ्या आदीवासींना हे नक्षलवादी ठार करतात, तेव्हा हा गट त्याची निंदा/निषेध करायला पुढे येतो काय? पण हे प्रश्न या मानवतावाद्यांना विचारयचे नसतात. नागपूर व अन्यत्र सध्या जे अटकसत्र सुरू झाले आहे, त्यातून काय काय समोर येईल, त्याची सध्याती वाटच पहायला हवी.
नक्षलवाद्यांची हीही कार्यपद्धी
नक्षलवाद्यांचा तिसरा गट काय करीत असतो, हे पाहणे मात्र चांगलेच बोधप्रद आहे. हा गट राजकारणात, समाजव्यवस्थेत सामील झाला आहे. हे लोक शहरी सुखसोयींचा लाभ घेत उच्चभ्रू होत गेले आहेत. ते जेव्हा राजकारणात सत्ताधीश झाले, तेव्हा तेही इतरांसारखेच पथभ्रष्ट झाले आहेत. चैनीत राहू लागले आहेत, मोटारी उडवू लागले आहेत, त्यांची वेशभूषाही पार बदलून गेली. पण नक्षलवाद्यांचे गुणगान मात्र ते मुक्त कंठाने करीत असतात. ही मंडळी मुख्यत: केंद्रीय विद्यापीठे व महाविद्यालये, वृत्तसृष्टी व वकील मंडळी यात प्रतिष्ठावंत आहेत. हा बदल असा वरवरचा व एवढाच असता तरी चालले असते. पण त्यांची मुलेही त्याच शिक्षणसंस्थांमध्ये शिकू लागली की ज्या शिक्षणसंस्थाना नक्षलवाद्यांनी आदीवासी क्षेत्रात नष्ट करण्याचा चंग बांधला होता. याप्रकाराचे व प्रवृत्तीचे स्पष्टीकरण करण्यासाठी नवीन शब्दच शोधावा लागेल किंवा तयार करावा लागेल.
हा दुटप्पीपणा नाही का?
यांनी व इतर काहींनी हे काहीही न करता वेगळाच मार्ग अवलंबिलेला आहे. जंगलातील संपत्तीचा अपहार अनेक भांडवलदार, कंत्राटदार करीत असतात, हे उघड गुपित आहे. यात तेंदूपत्ता गोळा करणारे आहेत, रेतीचा अवैध उपसा करणारे आहेत, तसेच आणखी इतरही असेच अनेक प्रकार करणारे आहेत. यांच्याकडून पैसे उकळायचे व त्या मोबदल्यात त्यांना सशस्त्र नक्षलवाद्यांपासून अभय द्यायचे, असा प्रकार सर्रास सुरू झाला आहे. या अवैध कारवाया करणाऱ्यांना शासकीय यंत्रणेचे फारसे भय नसते. कारण ती विकत घेता येते. नक्षलवाद्यांचे बाबतीत मात्र असे नसते. तिथे जिवाशीच गाठ असते. पण त्यांच्याकडून पैशाच्या मोबदल्यात अभय मिळत असेल, तर या भांडवलदारांना/ कंत्राटदारांना यापेक्षा चांगला सौदा कोणता असणार आहे? अशाप्रकारेही पैशाची सोय नक्षलवादी करू लागले आहेत. इथे दुहेरी/तिहेरी पणा संपतो व दुटप्पीपणा सुरू होतो.
नक्षलवादी चळवळीने हे नेते ज्यांची कड घेऊन लढा देत आहेत, त्यांचे कल्याण झालेले तर मुळीच दिसत नाही. पण स्वत:ला नक्षलवादी म्हणवणारे हे नेते मात्र चैनीत व ऐषआरामात राहतांना दिसत आहेत, हे नक्षलवाद्यांचे दुटप्पी रूप नाही काय?