Saturday, June 2, 2018

खेळ हा कळसूत्री बाहुल्याचा!

खेळ हा कळसूत्री बाहुल्याचा!
वसंत गणेश काणे,  बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  कोरिया हा पूर्व आशियातील इतिहासकालीन देश आहे. 1945 साली दुसरे महायुद्ध संपल्यानंतर कोरियावरील जपानचे स्वामित्त्व संपले खरे पण त्याचे रशियाच्या वर्चस्वाखालील उत्तर कोरिया (डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक आॅफ कोरिया) व अमेरिकेच्या वर्चस्वाखालील दक्षिण कोरिया (रिपब्लिक आॅफ कोरिया) अशा दोन सार्वभौम राष्ट्रात विभाजन करण्यात आले. कोरिया हे एक द्विपकल्प आहे. म्हणजे भारताप्रमाणे याच्याही तिन्ही बाजूंना पाणी व एका बाजूला जमीन आहे. वायव्येला कोरिया व चीनमधील सीमा रेषा खूप मोठी असून इशान्येला रशिया व कोरिया यातील सीमारेषा मात्र अतिशय लहान आहे. 
   उत्तर कोरियात साम्यवादी व दक्षिण कोरियात लोकशाही राजवट
  कोरियाचे 38 व्या अक्षांश रेषेवर उत्तर व दक्षिण कोरिया असे विभाजन करण्यात आले. उत्तरेकडच्या उत्तर कोरियात साम्यवादी राजवट व दक्षिण कोरियात अमेरिकेप्रमाणे लोकशाही राजवट स्थिरपद झाली. या दोन राजवटीत 1950 साली युद्ध झाले. 1953 मध्ये युद्धविराम झाला पण रीतसर शांतता करार मात्र झाला नाही. त्यामुळे या दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली नाही. ही परिस्थिती आजतागायत कायम आहे. या दोन देशातून विस्तव जात नाही. एकमेकावर गुरगुरणे तर सतत चालूच असते. यात कुरापतखोर उत्तर कोरियाच आहे.
  दोन्ही कोरियातील एकूण लोकसंख्या जेमतेम 8 कोटी आहे. उत्तर कोरियात अडीच कोटी तर दक्षिण कोरियात साडे पाच कोटी लोक राहतात. सर्व लोकांचा वांशिक वारसा एकच आहे. सर्व कोरियन भाषा बोलतात. अन्य भाषिक व वांशिक लोक खूपच कमी आहेत.
 धर्माचा विचार करता दक्षिण कोरियातील सुमारे 50 टक्के लोक कोणत्याही धर्माचे पालन करीत नाहीत. ख्रिश्चन 30 टक्के ( प्रोटेस्टंट 18 टक्के व कॅथाॅलिक 12 टक्के) तर बौद्ध 20 टक्के आहेत. उत्तर कोरियात मात्र धर्माचरणावर बंदी आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रप्रमुख हाच प्रतिपरमेश्वर असतो. त्याच्याच आरत्या ओवाळल्या जातात व त्याचीच करुणा भाकली जाते.
 दक्षिण कोरिया  हे पर्वतबहुल अमेरिकेच्या छत्रछायेखालील स्वतंत्र राष्ट्र असून त्याने कोरियन द्विपकल्पाचा दक्षिण भाग व्यापला आहे. सेऊल या जगातील पहिल्या दहा क्रमांकातील व दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या शहरात 2.5 कोटी लोक राहतात. हान ही प्रमुख नदी सेऊल शहरातून वाहते. उत्कृष्ठ व्यवस्थापनासाठी हे शहर वाखाणले जाते.
दक्षिण कोरिया हा औद्योगिकदृष्ट्या अत्यंत प्रगत असून त्याची आर्थिक प्रगती गेली 30 वर्षे सतत 10 टक्के वेगाने वाढते आहे. हा विक्रमच म्हटला पाहिजे. हा तसा चिमुकला असलेला देश जी (20) राष्ट्रगटातील एक महत्त्वाचा देश असून त्याचे चीन, अमेरिका व युरोपीयन युनीयन या परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या देशांशी एकाचवेळी बऱ्यापैकी व्यापारी संबंध राखण्याची चतुराई त्याने साध्य केली आहे. लोकशाही, पारदर्शी कारभार, प्रथम दर्जाच्या ओरोग्यविषयक सोयी, मूलभूत अधिकारांचे जतन या वैशिष्ट्यांमुळे दक्षिण कोरिया जगातील एक अति संपन्न देशम्हणून मान्यता पावला आहे. तो पॅरिस हवामानविषयक कराराचाही खंदा पुरस्कर्ता आहे.
 उत्तर कोरिया कोरियन द्विपकल्पातील 38 व्या अक्षांश रेषेवरील उत्तर भाग व्यापतो. प्यांगयांग हे त्याच्या राजधानीचे शहर 33 लक्ष लोकसंख्येचे  आहे. त्याची उत्तर सीमा बहुतांशी चीनला व किंचितशी रशियाला लागून आहे. उत्तर कोरियात साम्यवादी हुकुमशाही असून मानवी हक्कांच्या हननात त्याचा हात जगात कुणीही धरू शकणार नाही. जगातील शस्त्रसज्ज जगात त्याचा चौथा क्रमांक लागतो. तो अण्वस्त्रधारी नास्तिक देश आहे. सुसंपन्न दक्षिण कोरिया व भणंद पण युद्धखोर उत्तर कोरियाच्या एकीकरणाच्या वाटाघाटी आजवर यशस्वी का होऊ शकल्या नाहीत, हे यावरून स्पष्ट व्हावे.  
वैऱ्यांची गळाभेट अचानक कशी काय?
  दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी व उत्तर कोरियाचे तानाशहा किम जोंग ऊन यांची 26 व 27 एप्रिल 2018 ला भेट झाली. ही भेट अमेरिका व चीनच्या सूचनावजा आदेशाने झाली आहे. त्यामुळे यावेळी या दोन राष्ट्रात शिमग्याऐवजी संक्रांत साजरी झालेली दिसते आहे. एवढेच नव्हे तर शांतता, उभय देशांची संमृद्धी व एकीकरण यावरही मनमोकळी चर्चा झाल्याचे बाहेर आले आहे. या मनमोकळेपणाच्या मुळाशी चीन व अमेरिकेचा हातभार लागलेला आहे, ते मात्र प्रकटपणे पुढे आलेले नाही व निदान इतक्या लवकर तरी समोर येणारही नाही. तसेच आणखीही एक गुह्यतम गुपित बाहेर झिरपत झिरपत आले आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र व/वा क्षेपणास्त्र चाचणी केंद्रात असाकाही भयंकर स्फोट व अपघात झाला आहे, की ज्यामुळे नव्याने चाचण्या घेणे बऱ्याच काळपर्यंत दुरापास्त झाले आहे. अशावेळी कोणताही शहाणा माणूस शांततेची जपमाळ हाती घेईल, यात आश्चर्य ते काय?
 पाॅनमूनजाॅनच्या पुलावर हे दोन्ही नेते- किम व मून - एकमेकांकडे चालत आले, जवळ येताच त्यांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली व ते एकाच बाकावर बसून 30 मिनिटेपर्यंत एकमेकांचे कुशलमंगल विचारते झाले. कधी हास्याची कारंजी फुललेली तर कधी चेहऱ्यांवर गांभीर्याचे ढग भरून येतांना दुरून दिसत होते. पण विषय मात्र एकच होता, तो म्हणजे संपूर्ण कोरियन द्विपकल्प अण्वस्त्रमुक्त कसे करायचे? येत्या मे/जूनमध्ये किम यांची डोनाल्ड ट्रंप यांचेशी भेट ठरली होतीना. गुरगुरण्या व बोचकारण्यापासून आवरायला कोणीही नसतांना हे दोन नेते एकमेकांशी चर्चा करतील, असे कुणालाही स्वप्नात सुद्धा वाटले नसेल. नंतर हे दोन नेते पीस हाऊसमध्ये गेले. खरेतर शिखर परिषद इथेच भरणार होती. पण गळाभेटी अगोदरच उरकल्या होत्या. मोजून फक्त 15 मिनिटे एकांतात बोलणी झाली व पाॅनमुनजाॅन घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या झाल्या देखील! कारण या दोघांना कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे हलविणारे चीन व अमेरिका पडद्याआडून नव्हे तर रिमोट वापरत लक्ष ठेऊन होते. दक्षिण कोरियाचे युनिफिकेशन मिनिस्टर च्यो म्याॅंग ग्याॅन तर स्वत:शीच उद्गरले सुद्धा की, असे काही घडेल, याची कुणी स्वप्नातही कल्पना केली असेल का? त्यांच्या मते किम सडेतोड वृत्तीचे व सरळ तुकडा पाडणारे वाटले, त्यांच्या वागण्याबोलण्यात व्यावहारिक चातुर्याचा मागमूसही दिसला नाही. चालत येताना अवजड शरीराच्या किमना अवघड चढण चढावी लागली होती. यावेळी किम धूम्रपान करीत होते. तसे ते चेन स्मोकर असले तरी चारचौघात ते धूम्रपान करण्याचे टाळतात. अवघड चढणीचे आरोहण त्यांना जमेल का, याबद्दल उत्तर कोरियाच्या प्रतिनिधींना अंमळ शंका वाटत होती. या विषयीची चर्चा दबक्या आवाजात होत होती. हीही प्रगतीच म्हणायला हवी कारण काही बाबतीत तर उत्तर कोरियाचे लोक स्वत:शी देखील बोलायला धजत नाहीत, असे म्हणतात. बैठकीत ॲश ट्रे ठेवला होता. पण 34 (?) वर्षांच्या पोरसवदा  किमने 65 वर्षांच्या पोक्त व धीरोदात्त मून समोर धूम्रपान करून त्यांचा अधिक्षेप केला नाही.
  यावेळी चढणाऱ्या मद्याचे पेले भरले जात होते व किम एका पाठोपाठ एक पेला रिचवत चालले होते. तब्बल 160 मिनिटाच्या कार्यक्रमात ते एकदाही नाही म्हणाले नाहीत. सहाजीकच म्हटले पाहिजे, यजमानांचा अधिक्षेप झाला असता ना!
  खास मेनू
  योगायोगाची गोष्ट ही की मून यांच्या अर्धांगिनीचे नावही किम (पूर्ण नाव - किम जुंग सूक) हेच आहे. तर किम यांच्या पत्नीचे नाव री सोल ज्यू आहे. या दोन्ही जोडप्यांनी मिलेट व सोरघम पासून तयार केलेले खास 40 टक्के तीव्रतेचे मद्य प्राशन करून आपली मद्यप्राशनाची हौस, बैठकीत सामील झालेल्या इतरेजनांसोबत भागवली. राजकारणी मंडळी बैठकीत मद्यासोबत राजकारणातले मुद्दे चिवडीत असतांना इकडे बाजूलाच त्यांच्या अर्धांगिनी मात्र चवीसाठी कला व संगीत चघळत होत्या.
  बैठकीला रंग चढावा म्हणून किम यांनी येताना सोबत उत्तर कोरियातून नेंगमियाॅन नावाचे खवैय्यांचे खास फर्माइशी नूडल्स व ते तयार करायच्या मशीन्सही भेट देण्यासाठी आणल्या होत्या. दक्षिण कोरियाच्या प्रतिनिधींनी यावर अगोदर येथेच्छ ताव मारला. खाऊन झाल्यावर मात्र हे नूडल्स आजकाल दक्षिण कोरियातही सर्रास मिळतात, असा गौप्यस्फोट त्यांनी केला व एकच हशा पिकला. शेवटी हे नूडल्स उत्तर कोरियातील हाॅटेलात खाण्यातली मजा काही वेगळीच असणार यावर मात्र सर्वांचे एकमत झाले.
 संयुक्त पत्रकार परिषद
 संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी एका पाठोपाठ एक निर्धार घोषित केले. शांतता व सहकार्याला पर्याय नाही, हे दोघांनाही पटले होते. कोरिया द्विपकल्प अण्वस्त्रविरहित करण्यावर दोघांचाही भर होता पण जवळच्या अण्वस्त्रांचे काय करणार यावर मात्र किम यांनी मौन धारण केले होते. तात्पुरत्या युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या होऊन आता 65 वर्षे होत आहेत, याची नोंद घेत आता मात्र याचे कायम स्वरूपी शस्त्रसंधी करारात परिवर्तन करण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले. परस्परविरोधी कारवाया थांबवण्याचे, विभाजित कुटुंबीयांच्या भेटीगाठीस प्रोत्साहन देण्याचे, सीमेवर दळवळणाच्या सोयी विकसित करण्याचे, एकमेकांविरुद्धचा प्रचार थांबवण्याचे निर्णय फटाफट व चुटकीसरशी एकमत होऊन जाहीर करण्यात आले. पुढेही भेटत राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. हाक मारून तर पहा, ताबडतोब हजर होतो की नाही, ते बघा, असे म्हणत किम यांनी जड अंत:करणाने निरोप घेतला.
 वाटाघाटींचा समोर आलेला तपशील हा असा आहे. आगतस्वागताचे वृत्त नक्कीच खरे आहे. धोरणात्मक मुद्यांचे नक्की काय ते एकतर शी जिनपिंग व डोनाल्ड ट्रंप यांनाच माहिती असणार! कळसूत्री बाहुल्यांकडून यापेक्षा जास्त काही कळेल, ही अपेक्षा बाळगणे मुळातच चूक आहे, नाहीका?
चिमटे राजकारणातले
कोरिया व जपान यात कोरियन सामुद्रधुनी आहे. दोन मोठ्या जलाशयांना (प्रशांत महासागर व जपानचा सागर) जोडणाऱ्या नैसर्गिक कालव्यासमान असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला सामुद्रधुनी म्हणतात. जपानचा समुद्र एक बंदिस्त समुद्र असल्यामुळे त्यात लाटा फारशा उसळत नाहीत व त्यात मिठाचे प्रमाणही कमी असते. यामुळे समुद्राचे सर्व फायदे मिळतात पण खवळणाऱ्या समुद्राचा प्रलयकारी प्रत्यय मात्र अनुभवाला येत नाही. अशी ही बहुगुणी सामुद्रधुनी आहे.
 या कोरियन सामुद्रधुनीत लियानकोर्ट राॅक्स, खडक व बेट स्वरुपात आहेत. कोरियन लोक यांना डोकडो किंवा टोकडो बेटे असे म्हणतात, तर जपानी लोक यांना ताकेशीमा म्हणतात. सध्या या बेटांवर दक्षिण कोरियाचा अंमल असून जपानने मात्र ही बेटे आपलीच आहेत, असा दावा केला आहे. दक्षिण व उत्तर कोरियातील शिखर परिषदेत दुपारच्या पंक्तीत भोजनाच्या शेवटी शेवटी ताकभाताऐवजी आमरसयुक्त (हपूस?) पक्वान्न तोंड गोड व्हावे म्हणून योजले होते. इथपर्यंत ठीक होते पण या पक्वान्नाला डोकडो या बेटाचे नाव देऊन, या एकमेकांपासून 65 वर्षे दुरावलेल्या उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया या भावाभावांनी एकत्र येतांना, जपानला मात्र डिवचल्यासारखे केले. लगेचच या बेटांवर आपलाच हक्क आहे, अशी जाणीव व तशी तंबी देत, हा खवचटपणा करण्याची काही गरज होती का असे म्हणत व निषेध करीत जपानने आम्ररसयुक्त डोकडोत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला. प्रमग्रासे मक्षिकापात झाला नाही पण भोजनोत्तर फलरस प्राशनात पडलेला/पाडलेला हा मिठाचा खडा काय काय नासवणार हे भविष्यकाळच दाखवील, असे दिसते.

No comments:

Post a Comment