आता शक्तिपरीक्षा राज्यसभेच्या उपसभापतीच्या निवडणुकीत
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
राज्यसभेतील पक्षांचे बलाबल 26 मे 2018 ला असे आहे.
भारतीय जनता पक्ष 69; काॅंग्रेस 51; अण्णाद्रमुक 13; तृणमूल काॅंग्रेस 13; समाजवादी पक्ष-13; बिजू जनता दल 9; स्वतंत्र 6; जेडियु 6; तेलगू देसम 6; तेलंगणा राष्ट्र समिती 6; सीपीएम 5; आरजेडि 5; नामनिर्देशित 5; डीएमके 4; बीएसपी 4; राष्ट्रवादी काँग्रेस 4; आमआदमी 3; अकाली दल 3; शिवसेना 3; वायएसआरसीपी 2; पीडीपी 2; जनतादल(एस) 1; केरळ काॅंग्रेस(एम) 1; लोकदल 1; सीपीआय 1; बोडोलॅंड पीपल फ्रंट 1; सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट 1; आरपीआय(आ) 1; नागा पीपल फ्रंट 1; रिकाम्या 4 = एकूण 245
राज्यसभेचे (उपसभापती) डेप्युटी चेअरपर्सन पीजे कुरियन यांची मुदत 30 जून 2018 ला संपत असून 245 सदस्य असलेल्या राज्यसभेत उपाध्यक्षपदी निवडून येण्यासाठी, सर्व मतदारांनी मतदान केले तर 122 मतांची आवश्यकता विजयी उमेदवाराला असणार आहे. विरोधकांजवळ सध्या 117 मते आहेत. यात तेलगू देसमची 6 मते गृहीत धरली आहेत. विरोधकांची एकजूट बांधण्याच्या सध्याच्या प्रयत्नांवर या निवडणुकीतील यशापयशाचे परिणाम होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
सद्यस्थिती
सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्षांची हमखास मते जवळजवळ सारखीच असून अलिप्त मते कुणाकडे वळतील यावर या निवडणुकीतील विजयी उमेदवाराचे यश अवलंबून असणार आहे. बिजू जनता दलाची 9 मते तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) ची 6 मते व वायएसआरसीपीची 2 मते निवडणुकीचा निकाल ठरविण्याचे बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असा सध्याचा अंदाज आहे.
महत्त्वाचे भिडू- भारतीय जनता पक्ष (69 सदस्य)
सध्या भारतीय जनता पक्ष राज्यसभेतील सर्वात मोठा पक्ष असून त्याचे 69 सदस्य राज्यसभेत आहेत.मित्र पक्ष, स्वतंत्र सदस्य व नामनिर्देशित सदस्य मिळून त्यांची मतसंख्या 115 इतकी आयात अण्णा द्रमुक पक्षाचे 13 सदस्य समाविष्ट आहेत.
महत्त्वाचे भिडू - काॅंग्रेस (51 सदस्य)
काॅंग्रेसचे राज्यसभेत 51 सदस्य असले तरी स्वत:चा उमेदवार उभा करून अवलक्षण पदरात पाडून घेण्यापेक्षा कर्नाटकी कावा या निवडणुकीत वापरता येईल किंवा कसे यावर सध्या पक्षात खलबते सुरू आहेत. असे केल्यास दरवेळीच दुय्यम भूमिका घ्यावी लागण्याची पाळी येऊ शकते, असे म्हणत एक गट या माशी सहमत नाही.
महत्त्वाचे भिडू- अण्णाद्रमुक (13 सदस्य)
हा पक्ष सामान्यत: भारतीय जनता पक्षाला साह्य व सहकार्य करीत आलेला आहे.
महत्त्वाचे भिडू- तृणमूल काॅंग्रेस (13 सदस्य)
तृणमूल काॅंग्रेसचे राज्यसभेत 13 सदस्य असून या पक्षाचा विचार ही निवडणूक लढविण्याचा आहे. त्यादृष्टीने समविचारी पक्षाशी या पक्षाच्या वाटा घाटी सुरू झाल्या असल्याच्या वार्ता आहेत.
महत्त्वाचे भिडू - समाजवादी पक्ष (13 सदस्य)
हा पक्ष भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेईल. कर्नाटकाच्या विरोधी पक्षांच्या मेळ्यात हा पक्ष सामील होता. बिगर भाजपा व बिगर काॅंग्रेस आघाडीत सामील होण्याची सध्यातरी मुळीच शक्यता नाही.
हा हिशोब लक्षात घेतला की राज्यसभेच्या उपसभापतीची (डेप्युटी चेअर पर्सनची) निवडणूक अटितटीची होणार, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
रिकाम्या जागा
सध्या राज्यसभेत तीन/चार जागा रिकाम्या असून त्या बहुदा जूनच्या शेवटीशेवटी भरल्या जातील. या पैकी तीन जागा केरळ मधल्या असून त्यातील दोन जागा डाव्या आघाडीकडे व एक जागा काॅंग्रेसकडे जाईल.
महत्त्वाचे भिडू- तिसऱ्या आघाडीचे पुरस्कर्ते चंद्रशेखर राव (6 सदस्य)
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आपले पत्ते अजून उघड केले नाहीत, असे वाटते. बिगरभाजपा व बिगरकाॅंग्रेस अशी तिसरी आघाडी उघडण्याचा त्यांचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. ते कर्नाटकातील विरोधकांच्या मेळ्यात सामील झाले नव्हते. कारण काॅंग्रेस बरोबर जायचे नाही, अशी त्यांची भूमिका होती. पण 15 व्या फायनान्स कमीशनच्या बैठकीलाही तेलंगणाचा अर्थमंत्री उपस्थित नव्हता, म्हणजे भारतीय जनता पक्षापासूनही दूर राहण्याचा त्यांचा विचार व्यक्त होताना दिसतो आहे. पण त्यांची मुख्य नाराजी काॅंग्रेस विषयी आहे. उमेदवार जर बिगर काॅंग्रेसी असेल तर ते त्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात.
महत्त्वाचे भिडू - बिजू जनता दल (9 सदस्य)
दुसरा पक्ष आहे बिजू जनता दल. हा पक्ष तर भारतीय जनता पक्ष व काॅंग्रेस पासून आपण सारखेच अंतर राखून आहोत, हे सतत दाखवत आला आहे. कर्नाटकच्या मेळ्यात बिजू जनता दलाचा प्रतिनिधी सामील झाला नव्हता. पण अनेक महत्त्वाच्या प्रसंगी बिजू जनता दलाने भारतीय जनता पक्षाला साथ दिली आहे. अण्णा द्रमुकही भारतीय जनता पक्षाला साथ देत आला आहे.
महत्त्वाचे भिडू- तेलगू देसम (6 सदस्य)
हा पक्ष भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेईल. कर्नाटकाच्या विरोधी पक्षांच्या मेळ्यात हा पक्ष सामील होता. बिगर भाजपा व बिगर काॅंग्रेस आघाडीत सामील होण्याची सध्यातरी मुळीच शक्यता नाही.
महत्त्वाचे भिडू - आंध्रातील वायएसआरपी (2 सदस्य)
वायएसआरपी ने अजून आपली भूमिका व्यक्त केलेली नाही. पण तेलगू देसम व भारतीय जनता पक्ष यात हा पक्ष यात राज्याला खास दर्जा देण्याच्या प्रश्नाबाबत तो भारतीय जनता पक्षापेक्षा तेलगू देसमला अधिक दोषी मानतो.
राज्यसभा निवडणुकीत सहभागी पक्षांची व त्यांच्या सदस्यांची संख्या बघितली की, आवळ्याची मोट बांधण्यात कोण यशस्वी होतो, यावर निवडणुकीचा निकाल फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहील, हे लक्षात येईल. छोटेछोटे बिनबुडाचे लोटे भरपूर आहेत. उपद्रव मूल्य दाखविण्याची संधी न सोडणारे तर परिचितच आहेत. दोन्ही डगरीवर हात ठेवणारेही आहेत. अशी ही बजबजपुरी राज्यसभेच्या पूर्वीच्या कोणत्याही निवडणुकीत दखल घ्यावी अशी ठरली नव्हती. सत्ताधारी व विरोधक अशा दोघांसाठीही ही मते आपल्या पारड्यात पाडून घेणे हे एक किचकट पण महत्त्वाचे काम ठरेल. तिसऱ्या आघाडीचा उदयही या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पटलावर होऊ शकेल. तसे झाल्यास ही निवडणूक भाजपासाठी तुलनेने सोपी ठरेल, अशी चिन्हे आहेत. असे न झाल्यास मात्र उत्कंठा वाढविणारा अटितटीचा सामना पाहण्यास मिळणार हे नक्की.
No comments:
Post a Comment