Saturday, September 29, 2018

दी नन (तंत्राने तारलेला चित्रपट)

दी नन (तंत्राने तारलेला चित्रपट)
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
    दी नन हा 2018 सालचा गोथिक लोकांशी संबंधित एक अद्भुत थरारपट आहे. काॅरिन हार्डीने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा पटकथा लेखक गॅरी डाॅबरमन आहे.  मूळ कथा राॅबरमन व जेम्स वॅन यांनी संयुक्त रीत्या लिहिलेली आहे. अमेरिकन अद्भुत थरारपट या व्यापक योजनेचा हा एक भाग आहे. यात डेमियन बिशिर, तैसा फार्मिगा व ज्योना बाॅक्वेट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गोथिक ही जर्मन जमात असून तिला रोमन लोक  रानटी मानत असत. एक रोमन कॅथोलिक धर्मगुरु आणि एक नवशिकी नन यांना 1952 साली रोमानियात एक अपवित्र गुपित उलगडते आणि चित्रपटाची कथा उलगडायला सुरवात होते.
   या चित्रपटाचे चित्रिकरण होत असतांना सेटला रोमन कॅथोलिक चर्चच्या धर्मगुरूंनी पावन केले होते. आपल्याकडील नारळ फोडण्यासारखाच हा प्रकार म्हटला पाहिजे. 2018 मध्ये हा चित्रपट अमेरिकेत दाखवायला सुरवात झाली यावरून तो किती ताजा आहे हे लक्षात येईल. बक्कळ कमाई करणाऱ्या या चित्रपटाची समीक्षा मात्र मिश्र स्वरुपाची आहे. सादरीकरण, दिग्दर्शन, चलचित्रनिर्मिती, दृश्ये, वातावरण या बाबी वाखाणल्या गेल्या तर तकलादू कथावस्तू व धक्कातंत्र वापरून भयनिर्मितीच्या दृश्यांचा अतिरेक ह्या बाबी टीकेस पात्र ठरल्या आहेत. थरारपटांचा डोलारा भिववणाऱ्या दृश्यांच्या विटांवर उभा असतो, असे म्हटले जाते. भयनिर्मितीसाठी अचानक एखादी घटना किंवा दृश्य उभे करायचे व जोडीला साजेसे ध्वनिसंयोजन भरीस वापरायचे, हे तंत्र अतिवापराने आता तेवढे परिणामकारक व अपरिचित राहिलेले नाही पण हे बाळबोध व सोपे तंत्रच या चित्रपटात वापरल्याचे दिसते.
कथावस्तू
   कथेचा प्रारंभ आहे, 1952 चा. दोन नन (ईश्वरी कार्याला वाहून घेतलेली स्त्री)
कार्टा माॅनेस्ट्रीत (भिक्षुकांचे निवासस्थान) नेहमीप्रमाणे वावरत असतांना त्यांच्यावर एका अज्ञात शक्तीचा हल्ला होतो. त्या एका बोगद्यातील काही जुने अवशेष गोळा करण्यासाठी गेलेल्या असतात. त्यांच्यापैकी एक सिस्टर व्हिक्टोरिया हल्यातून सुटका करून घेते. हल्ला करणारे भूत एका ननच्याच रूपात असते. ती स्वत:ला फास लावून घेते. तिचे प्रेत फ्रेंची नावाच्या माॅनेस्ट्रीला माल पुरवणाऱ्या वाहतुकदार खेडुताला सापडते.
    ही माहिती व्हेटिकनला (ख्रिश्चनांचे मुख्यालय) कळते. ते फादर बर्कला रोमला येण्याची अाज्ञा करतात. सर्व परिस्थितीचा शोध घेण्यासाठी एका नवशिक्या सिस्टर सोबत (सिस्टर आयरिनसोबत) ते त्याला येण्यास सांगतात. सिस्टर आयरिन त्यावेळी एका शाळेत धर्म व विज्ञान यातील संबंध मुलांना समजावून देत असते. मदर तिला मध्येच थांबवते व फादर बर्क तिला सोबत नेण्यासाठी आला असल्याचे सांगते.
    रोमानिया नावाच्या युरोपातील देशात फादर बर्क व सिस्टर आयरिन जातात. तिथे त्यांची फ्रेंची या वाहतुकदाराशी भेट होते. तो त्यांना पाद्र्यांच्या निवासस्थानी घेऊन जातो. त्यांना व्हिक्टोरियाचे प्रेत सापडते. त्या प्रेताजवळची किल्ली हस्तगत करतात. त्या निवासस्थानी त्यांची गाठ मठस्वामिनीशी पडते.ती त्यांना सांगते की त्यांनी रात्रभर मौन पाळले आहे. दुसऱ्या दिवशी त्यांना परत यायचे असेल तर ती त्यांना शेजारच्या काॅनव्हेंटमध्ये मक्काम करण्याचे निमंत्रण देते. फ्रेंची आपल्या घरी परत येत असतांना त्याच्यावर भूत हल्ला करते पण तो निसटतो. बर्क आयरिनला सांगतो की, डॅनियन नावाच्या मुलावरचे भूत त्याने उतरवले होते. या प्रक्रियेत तो अतिशय गंभीरपणे जखमी होऊन दगावला होता. तेव्हापासून तो सतत दु:खी असतो. आयरिन त्याला सांगते की, एक स्त्री म्हणून तिला ननची दृष्टी आहे. यामुळेच चर्चला तिच्यात विशेष आस्था आहे. भूत बर्कला जिंवत गाडते, तेव्हा आयरिन त्याला बाहेर काढते.
   दुसरे दिवशी बर्क व आयरिन पाद्र्यांच्या निवासस्थानी जातात. पण तो महिलांसाठीच असल्यामुळे फक्त आयरिनच आत जाते. तिथे तिला इतर नन भेटतात. त्या सांगतात की, संकट दूर व्हावे म्हणून त्या आळीपाळीने सतत प्रार्थना करीत आहेत. सिस्टर ओना तिला त्या वास्तूचा इतिहास सांगते.एका गूढाच्या प्रभावाखाली येऊन एका सरदाराने तो मठ बांधला होता. यात प्रेत पुरण्यासाठी एक तळघर आहे. सरदाराने या तळघराला असलेल्या फटीतून भूताला पाचारण केले. पण ख्रिश्चन सरदारांनी त्याला ठार केले व ती फट एक रसायन वापरून बंद केली. हे रसायन तयार करण्यासाठी त्यांनी येशूचे रक्त उपयोगात आणले होते. पण दुसऱ्या महायुद्धात जे बाॅम्बहल्ले झाले, त्यामुळे ही फट पुन्हा किलकिली झाली व ही पाशवी शक्ती-वॅलक- मुक्त झाली. एक ग्रंथांचा वाचक असलेला बर्क सांगतो की गोथिक ग्रंथामध्ये याचे वेगवेगळे वर्णन आढळते. तसेच ज्या मठस्वामिनीची त्यांची भेट झाली होती, ती तर केव्हाचीच मेलेली आहे, असे त्यांना कळते.
    आयरिनवर वॅलक हल्ला करतो. परत गेलेला फ्रेंची तिच्या मदतीसाठी परत फिरतो. ननसोबत तोही वॅलकचे संकट दूर व्हावे, म्हणून प्रार्थना करतो. हे एकत्र येतात आणि आयरिनच्या लक्षात येते की, ज्या अनेक ननशी ती बोलली होती, त्यापैकी एकही खरी नसते. प्रार्थना ती एकटीच करीत असते. तिला कळते की, तिथे आलेली व्हिक्टोरिया ही एकमेव खरी नन असते आणि तिने आपल्या शरीरावर वॅलकला क्रिया करण्यास व पाशवी शक्ती मुक्त करण्यास वाव मिळू नये म्हणून बलिदान दिलेले असते.
   बर्क, आयरिन व फ्रेंची या निष्कर्षाप्रत पोचतात की, वॅलकला थोपवण्यासाठी तळघराला पडलेली फट बुजवणे, हाच एकमेव मार्ग आहे आणि त्यासाठी पवित्र पात्रातील ख्रिस्ताचे रक्त हाच एकमेव उपाय आहे. व्हिक्टोरियाजवळच्या किल्लीचा उपयोग करून ते छोटीशी बाटली मिळवतात. आयरिन बर्कला सांगते की, परमेश्वराने तिने नवशिकी नन न राहता स्वघोषित नन व्हावे, असे म्हटले आहे. बर्क याला अनुसरून तिला स्वघोषित ननचा दर्जा देतो.
    बर्क, आयरिन व फ्रेंची हे तिघे बोगद्याचे दार उघडतात. वॅलक आयरिनला एका आध्यात्मिक पंचकोनी चिन्हाचा वापर करून मोहित करतो व तिच्यावर ताबा मिळवतो.पण फ्रेंची ख्रिस्ताचे रक्ततिच्या चेहऱ्यावर फासतो व तिला भुताच्या पाशातून मुक्त करतो. भूत आयरिनला पाण्यात बुडविण्याचा प्रयत्न करते व बर्कला जखमी करते. पण  आयरिन त्च्या चेहऱ्यावर ख्रिस्ताचे रक्त फेकते व त्याला हाकून लावते.ख्रिस्ताचे रक्त वापरून तळघराची फट ते बुजवतात. आयरिन शुद्धीवर येताच फ्रेंची तिला सांगतो की, त्याचे खरे नाव माॅरिस असे आहे. त्याच्यावरही कुणाच्याही नकळत वॅलकचा अंशत: प्रभाव पडलेला असतो. त्याच्या गळ्यातील उलट्या क्राॅसवरून हे स्पष्ट होते.
    आता चित्रपट आपल्याला एकदम वीस वर्षे पुढे नेतो. एका विद्यापीठात सेमिनार सुरू असतो. एडवर्ड वाॅरेन मिने आणि लाॅरेन रिटा वाॅरेन हे शास्त्रीय संशोधनाच्या पलीकडच्या क्षेत्रात (भूत पिशाच्य आदी) संशोधन करणारे संशोधक मंत्रोपचार करून माॅरिसला वॅलकच्या तावडीतून मुक्त करण्यासंबंधीचे चित्रण दाखवीत असतात. माॅरिस लाॅरेनला पकडतो व तिला मरणाच्या वाटेवर असलेल्या एडवर्डची दृष्टी देतो. यातून वाॅरेनच्या संशोधनाला वेगळीच दिशा मिळते. तो पेराॅन व वॅलक यांचा शोध घेण्यास सुरवात करतो. खराखुरा पॅराॅन दहा वर्षांपूर्वी एका फार्महाऊसमध्ये राहत असतो. त्याच्यावर वॅलकने प्रभाव टाकलेला असतो. अशी वॅलकची कुळकथा असते.
   चमत्कार, अंधश्रद्धा, अतिंद्रीय शक्ती व कल्पनाविलास यांची रेलचेल असलेला नन हा ढिसाळ कथानक असलेला चित्रपट केवळ उत्तम अभिनय, सादरीकरण, दिग्दर्शनकौशल्य, दृश्ये, चलचित्रनिर्मिती आणि पूरक व पोषक वातावरण यांच्या भरवशावर 21 व्या शतकातही कसा लोकप्रिय व लोकमान्य (तेही अमेरिकेत)  होतो, याचे नन हा चित्रपट एक उत्तम उदाहरण आहे

Tuesday, September 25, 2018

बिहाइंड एनिमी लाईन्स’

‘बिहाइंड एनिमी लाईन्स’, - एक वेगळाच युद्धपट
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
  ‘बिहाइंड एनिमी लाईन्स’, हा जाॅन मूरने 2001 साली दिग्दर्शित केलेला त्याचा पहिला चित्रपट आहे. ओवेन विल्सन व जीन हॅकमन यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. लेफ्टनंट क्रिस ब्रुनेट या अमेरिकेच्या नाविक दलातील वैमानिकाची ही कथा आहे. क्रिसचे विमान बाॅस्नियात पाडण्यात आले होते. बोसनियन युद्धात  वंशविच्छेद करण्यात आल्याचे त्याच्या लक्षात आलेले असते. त्याचा अधिकारी यांची सुटका करण्यासाठी तुकडी पाठवून शोध मोहीम करण्याची अनुमती मिळावी, म्हणून धडपडत असतो. हे कथानक बोस्नियन युद्धातील एका सत्यकथेवर आधारित आहे.
 या चित्रपटाची विशेषता ही आहे की, समीक्षकांनी या चित्रपटावर टीका केली होती. या चित्रपटातील समर दृश्ये ढिसाळ आहेत. कथानकात टोकाचे देशप्रेम दाखवले आहे, हे टीकेचे दोन प्रमुख मुद्दे होते. पण बाॅक्स आॅफिसवर हा चांगला चालला आणि त्याने खर्चाच्या दुप्पट कमाई केली. समीक्षकांनी दिलेली प्रतवारी व सजनसामान्यांची आवड यात अनेकदा विरोधाभास असतो. तो या चित्रपटाचे निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटाच्या तीन आवृत्या तीन वेगवेगळ्या कंपन्यांनी काढल्या हा मात्र या चित्रपटाचा एक खास विशेष आहे. तसेच मूळच्या चित्रपटातील एकही पात्र यापैकी एकातही नाही, हेही नवलच म्हटले पाहिजे.
  युगोस्लाव्हियाचे तुकडे झाल्यानंतर बाॅस्नियामध्ये गृहयद्धाला प्रारंभ झाला होता. अमेरिकेच्या नाविक दलाचा एक अधिकारी पायलट ख्रिस बुर्नेट आणि जेरी स्टॅकहाऊस यांची विमानवाहक जहाज एसएस कार्ल व्हिन्सनवर तैनात झालेली असते. अॅडमिरल रीगार्ट या त्यांच्या वरिष्ठाने त्या दोघांना  टेहेळणीच्या कामावर नेमलेले असते. टेहेळणी चालू असतांना सैन्य काढून घेतलेल्या एका भागात चालू असलेल्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटतात. या प्रदेशात दोन्ही लढाऊ गटांना प्रवेश निषिद्ध होता. तरीही या भागावरून उड्डाण करण्यासाठी बुर्नेट स्टॅकहाऊस या आपल्या सहकाऱ्याचे मन वळवतो व खाली जमिनीवर नक्की काय चालू आहे, हे पाहण्यासाठी विमान कमी उंचीवर नेतो व खालच्या भागाचे फोटो घेतो. आपण एका सामूहिक दफनस्थळाचे चित्रण करीत आहोत, याची त्यांना कल्पना नसते. सर्ब लोकांच्या नजरेला त्यांचे जेट विमान पडते. तेथील अर्धसैनिक दलाचा कमांडर मिरोस्लावह लोकार गुप्तपणे सामूहिक हत्याकांड घडवून आणित असतो. स्थानिक बोसनिक लोकांचे शिरकाण सुरू असते. हा वंशविच्छेदाचाच प्रकार सुरू होता. ही सामूहिक कबर उघडकीला येऊ नये म्हणून तो छायाचित्रे घेणारे विमान पाडण्याचा हुकुम देतो.
   विमानावर डागलेली क्षेपणास्त्रे चुकविण्याचा अटाकोटीचा प्रयत्न बुर्नेट व  स्टॅकहाऊस हे दोघे पायलट करतात. पण व्यर्थ! ती दोघे नाइलाजाने इजेक्शन सीट वापरून विमानाबाहेर पडतात व त्या सीटसह एका पुतळ्याजवळ पडतात. सर्ब लोकांच्या एका टेहळणी पथकाला जखमी झालेला स्टॅकहाऊस सापडतो. त्याची सुनावणी होते. लोकरचा सहाय्यक साशा त्याला ठार मारण्याची शिक्षा देतो. बुर्नेट दुरून टेकडीवरून हे सर्व पहात असतो. तो तिथून पळ काढतो पण हे सर्ब लोकांच्या लक्षात येते.
   बुर्नेटला मृत किंवा जिवंत शोधून काढा अशी आज्ञा लोकार साशा व बाझदा या दोघांना देतो. बुर्नेट विमानवाहू जहाजावरील प्रमुखाशी -रीगार्टशी- संपर्क साधतो. बुर्नेटला एका वेगळ्या जागी येण्यास सांगण्यात येते. तिथून त्याची सुटका करणे सोयीचे असते. तो त्याप्रमाणे त्या दिशेने जाण्यास निघतो. इकडे नाटोचा कमांडर मात्र रीगार्टला आपली योजना गुंडाळण्यास सांगतो. सैनिकविरहित भागात ही मोहीम राबवली तर शांतता वाटाघाटी फिसकटण्याची भीती आहे, असे त्याची भूमिका असते. बुर्नेट नेमून दिलेल्या जागी पोचतो पण रीगर्ट त्याला सैनिकविरहित क्षेत्राच्या पलीकडील जागी येण्यास सांगतो.
  याचवेळी बुर्नेटला बाझदा एक तुकडी घेऊन त्याच्या शोधात आलेला दिसतो. त्यांना पाहून तो पळत सुटतो आणि एका सामूहिक कबरीत पडतो. हिचेच चित्रण त्याने व स्टॅकहाऊसने केलेले असते. तो एका प्रेताखाली दडून बसतो. शोध तुकडी दूर गेलेली पाहून तो पुन्हा धावायला सुरवात करतो. त्याच्या सुटकेसाठी ठरलेल्या स्थळाकडे जात असतांना त्याची गाठ बाॅस्निक गनिमी तुकडीशी पडते. ही तुकडी युद्धक्षेत्रात अडकून पडलेल्यांना सुरक्षित स्थळी ट्रकने घेऊन जात असते. ते लोक बुर्नेटला बरोबर घेतात. ते हॅक नावाच्या सुरक्षित ठिकाणी जात असल्याचे त्याला सांगतात. पण प्रत्यक्षात तहीे युद्धक्षेत्रच असते. झटापट सुरू असतांना सर्ब सैनिकांना बुर्नेटचे शव सापडले आहे, असे वाटते. पण साशाच्या लक्षात येते की बुर्नेटने एका मृत सैनिकाचा पोषाख व आपला पोषाख यांची अदलाबदल केली आहे आणि तो निसटला आहे.
   पण या परिस्थितीचा सर्ब लोक आपल्या फायद्यासाठी करून घेतात. ते या प्रेताचे बुर्नेटच्या गणवेशातील छायाचित्र प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित करतात व  आपण बुर्नेटचा खातमा केला आहे, हे जाहीर करतात. याचा परिणाम असा होतो की बुर्नेटला मुक्त करण्याची मोहीम थांबविली जाते. बुर्नेटची भटकंती सुरूच असते. त्याची नजर योगायोगाने त्याची इजेक्शन सीट ज्या पुतळ्याजवळ पडली होती, तिकडे जाते. तो सीटजवळ जातो व खुणेसाठीची कळ वापरून जाळ निर्माण करतो. तो संदेश विमानवाहू जहाजावर ओळखला जातो. पण याच निमित्ताने बुर्नेटचा ठावठिकाणा सर्ब लोकांनाही कळतो.
   मुख्याधिकारी पिक्वेट याने मोहीम थांबवला असतांना सुद्धा या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेत विमानवाहू जहाजावरील कमांडर रीगार्ट बुर्नेटच्या सुटकेसाठी, एका कार्यदलाची उभारणी करतो. याचा परिणाम म्हणून आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊन आपल्याला कार्यमुक्त करण्यात येईल, याची त्याला कल्पना असते. या दरम्यान बुर्नेट जिवंत असून त्याचा ठावठिकाणाही कळलेला असल्यामुळे लोकार बाझदा व साशावर बु्र्नेटला शोधून ठार करण्याची जबाबदारी सोपवितो. या मोहिमेवर असतांना वाटेत बाझदाचा पाय एका सुरुंगावर पडतो व तो जखमी होतो. त्याला तसाच सोडून साशा पुढे निघतो. पण सुरुंगाच्या स्फोटाचा आवाज ऐकून बुर्नेटही सावध होतो. आपला पाठलाग होतो आहे, हे त्याला कळते. साशाला बुर्नेटची इजेक्शन सीट सापडते. तेवढ्यात बाजूलाच दडून बसलेला बुर्नेट त्याच्यावर अचानक हल्ला करतो. दोघात झटापट होते. झटापटीत साशा ठार होतो. पण त्याचवेळी लोकार स्वत: रणगाड्यांसह घटनास्थळी पोचतो. बुर्नेटवर गोळ्यांचा वर्षाव सुरू होतो. पण सामूहिक कबरीच्या छायाचित्रांची हार्ड ड्राईव्ह मिळवत बुर्नेट कार्यबलासह तिथून निसटतो.
   वंशविच्छेदाचा सबळ पुरावा मिळताच लोकारला शिक्षा होते. रीगार्टवर त्याच्या अपेक्षेप्रमाणे कारवाई होऊन त्याला कार्यमुक्त केले जाते व बुर्नेट याची नौदलातील कारकीर्द मात्र पुढे सुरू राहते.

Friday, September 21, 2018

बिमस्टेक - बंगालच्या उपसागराला गवसणी

    बिमस्टेक - बंगालच्या उपसागराला गवसणी
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

    बिमस्टेक देशांची दोन दिवसांची चौथी परिषद काठमांडू येथे एक सर्वसंमत जाहीरनामा प्रसिद्ध करून नुकतीच संपन्न झाली आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी दहशतवाद हा धोका असून त्याला खतपाणी घालणारे देश आणि सरकारबाह्य घटक हे दहशतवादासाठी जबाबदार मानले जावेत, असा महत्त्वपूर्ण ठराव यावेळी पारित करण्यात आला आहे. संपूर्ण सहमती व सर्व क्षेत्रात सहकार्य यासाठी कटिबद्धता हे या जाहीरनाम्याचे वैशिष्ट्य आहे. बंगालच्या उपसागराला गवसणी घालणाऱ्या देशांचा एक शांततामय व संमृद्ध प्रदेश भूतलावर निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार या परिषदेत व्यक्त करण्यात आला.
   अशी आहे बिमस्टेक ही आंतरदेशीय संघटना
    बिमस्टेक म्हणजे बे आॅफ बेंगाॅल इनिशिएटिव्ह फाॅर मल्टी-सेक्टोरल टेक्निकल अॅंड एकाॅनाॅमिक कोआॅपरेशन (बीआयएमएसटीईसी)ही दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील त्यात बांग्लादेश, इंडिया, म्यानमार, श्री लंका, थायलंड, भूतान आणि नेपाल या सात देशांची आंतरराष्ट्रीय संघटना असून यातील सदस्य देश बंगालच्या उपसागरावर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. यात दीडशे कोटीच्या पेक्षा जास्त लोकसंख्या वास्तव्यास आहे. एकूण लोकसंख्येच्या 65 टक्के लोकसंख्या असलेल्या भारताने या संघटनेचा 33% खर्च भारताने उचलेला आहे. यांचे सर्वांचे सकल उत्पादन ( ग्राॅस डोमेस्टिक प्राॅडक्ट)  2.5 लाख कोटी (ट्रिलियन) डाॅलर आहे. म्हणून याला बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थक सहयोगासाठी बंगालच्या खाडीतील देशांचे संघटन असे मराठीत म्हणता येईल. नेपाळ व भूतान वगळल्यास सर्व देशांच्या सीमा बंगालच्या उपसागराला लागू असल्यामुळे समुद्राच्या मार्गाने हे देश परस्परांच्या संपर्कात आहेत. चीन व पाकिस्तना हे देश या संघटनेचे सदस्य नाहीत. तसे ते होऊही शकत नाहीत, कारण ते बंगालच्या उपसागराला लागून नाहीत. संघटनेचे सचिवालय बांग्लादेशातील ढाका येथे आहे.
     अकारविल्हे पद्धतीने फिरते अध्यक्षपद
   21 वर्षांपूर्वी म्हणजे 6 जून 1997 ला स्थापन झालेल्या या संघटनेच्या अध्यक्षपदी 2014 पासून नेपाळ हे राष्ट्र आहे. पुढील अध्यक्षपद श्री लंकेकडे  म्हणजे अध्यक्ष मैत्रिपला सिरिसेना यांच्याकडे असणार आहे. कारण अध्यक्षपद सदस्य देशांच्या इंग्रजी नावानुसार अकारविल्हे पद्धतीने फिरते असते. सुरवात बांग्लादेशापासून झाली होती. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, भूतानचे  दाशो शेरिंग वांगचुक, इंडियाचे नरेंद्र मोदी, म्यनमारचे अध्यक्ष विन मिंट, नेपाळचे पंतप्रधान खड्गप्रसाद ओली, श्री लंकाचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे व थायलंडचे  पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा हे शासनप्रमुख या नात्याने संघटनेत आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व  आहेत.
   प्रायाॅरिटी एरिया ही नवीन संकल्पना
   एकूण चौदा प्राधान्यक्षेत्रांची (प्रायाॅरिटी एरिया) वाटणी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केलेली आहे. इंडिया (भारत) कडे वाहतुक व दळणवळण, पर्यटन, दहशतवादविरोध व आंतरदेशीय गुन्हेगारी आणि पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन ही महत्त्वाची क्षेत्रे आहेत. म्यानमारकडे उर्जा व कृषि, थायलंडकडे सार्वजनिक आरोग्य, मासेमारी व व जनसंपर्क, बांग्लादेशकडे व्यापार व गुंतवणूक आणि हवामानबदल, श्रीलंकेकडे तंत्रज्ञान, नेपाळकडे दारिद्र्य निर्मूलन, भूतानकडे सांस्कृतिक सहकार्य अशी ती चौदा क्षेत्रे आहेत.
    मुक्त व्यापार
    बिमस्टेकने मुक्त व्यापार क्षेत्र रूपरेखा  करारावर सदस्य देशांनी स्वाक्षरी केली आहे. हा अतिशय दीर्घ काळपर्यंत परिणाम करार असून व्यापार व गुंतवणुकीला चालना मिणार आहे. याबात करावयाच्या कारवाईसाठी थायलंडच्या स्थायी अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. व्यापार, सेवा, गुंतवणूक, आर्थिक,तसेच व्यापार व  तांत्रिक सहकार्य याबात एकमत होताच सेवा आणि गुंतवणूक याबाबत चर्चा प्रारंभ होईल.
   किनाऱ्यालगतचे नौकानयन
   नौकानयन करारासंबंधातील कराराबाबतच्या चर्चेला डिसेंबर 2017 लाच सुरू झाली आहे. किनाऱ्यालगतच्या २० नाॅटिकल मैलांच्या घेऱ्यात चालणारे हे नौकानयन देशांतर्गत व देशादेशातील व्यापारास चालना देणारे ठरेल. लहान बोटी, कमी खोल समुद्रातही नौकानयनाची क्षमता असलेल्या बोटींचा वापर करता येण्याची शक्यता व कमी खर्च हे या पद्धतीचे विशेष आहेत. मुळातच जल वाहतुक सर्वात स्वस्त असते. ती किमतही या प्रकामुळे कमी होणार आहे. हे जलमार्ग स्वस्त तर आहेतच पण पर्यावरणस्नेही व वेगवानही असणार आहेत

कथा आणि व्यथा मुक्त व बहिस्त शिक्षणाची !

कथा आणि व्यथा मुक्त व बहिस्त शिक्षणाची !
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   9 आॅगस्ट 2018 ला युनिव्हर्सिटी ग्रॅंट्स कमीशनने (युजीसीने) एक परिपत्रक काय काढले आणि अनेक मुक्त विद्यापीठांच्या कार्यालयात धडकीच भरली आहे. असे काही वाटावे असे या परिपत्रकात काय आहे? युजीसीने एमबीए, एमसीए, बीएड, व एम एड या सारख्या अभ्यासक्रमांबाबत मुक्त विद्यापीठांनी चालविलेल्या अभ्यासक्रमाबाबत फक्त माहिती मागविली आहे. अशी विद्यापीठे एकूण 35 असून त्यात काही केंद्रीय तर काही राज्य विद्यापीठे आहेत. त्यात काही बडी विद्यापीठेही आहेत, हे खरे आहे. जसे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी किंवा इग्नू व मुंबई विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट आॅफ डिस्टन्स ओपन लर्निंग किंवा आयडाॅल (आयडीओएल) यांचाही समावेश आहे. मागविलेली माहिती पत्र मिळाल्यापासून 30 दिवसात सादर करावयाची होती. म्हणजे ही मुदत आता संपून गेलेली आहे.
     युजीसीच्या मनात काय आहे?
   युजीसीचा विचार काहीसा वेगळा असण्याची शक्यता आहे. पण तो तसा असेल तर त्याला हरकत कोणत्या कारणास्तव घेतली जाऊ शकेल? जी विद्यापीठे जे अभ्यासक्रम नियमीत स्तरावर गेली अनेक वर्षे चालवीत नाहीत, त्या विद्यापीठांनी ते अभ्यासक्रम ‘मुक्त स्तरावर’ का चालवावेत व ती विद्यापीठे ते अभ्यासक्रम ‘मुक्त स्तरावर’ कसे काय चालवितात, असा प्रश्न युजीसीला पडला असेल तर त्याबाबत आश्चर्य वाटण्याचे काय कारण आहे? हे अभ्यासक्रम एकतर नियमीत व मुक्त अशा दोन्ही स्तरावर चालवा किंवा मुळीच चालवू नका, फक्त मुक्त स्तरावरच का चालविता असा प्रश्न युजीसीला पडला असून अशी अनुमती मात्र देता येणार नाही, एवढेच युजीसीचे म्हणणे असेल तर त्यात गैर काय आहे? या निर्णयाचा फटका एमबीए, एमसीए, बीएड, हाॅटेल मॅनेजमेंट व पर्यटन या विषयांना बसणार, अशी जी खरीखोटी भीती व्यक्त केली जात आहे, ती विनाकारणच नाही काय?
   भीती अनाठायी
     या 35 विद्यापीठांपैकी कोणत्याही विद्यापीठाची मान्यता रद्द केली जाईल, असे युजीसीने म्हटलेले नाही. झालीच तर काही व्यावसायिक अभ्यासक्रमांची मान्यता रद्द होऊ शकेल पण तीही योग्यत्या व रीतसर तपासणी (स्क्रुटिनी) नंतर! उमेदवारांची फसवणूक होऊ नये, म्हणून मान्याप्राप्त अभ्यासक्रमांची यादी युजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. ती पाहूनच संबंधितांनी प्रवेश घ्यावा, ही युजीसीची अपेक्षा चुकीची आहे, असे म्हणता येईल का?
   होतकरूंची सोय पण...?
    रीतसर व नियमीत शिक्षण घेणे अनेकांना शक्य होत नाही. प्रश्न पैशाचा, वेळेचा व संधी आपल्या गावी उपलब्ध नसणे हाच बहुदा असतो. घरगुती कारणेही असतात, अनेकदा वय निघून गेलेले असते. नोकरी/धंदा करताकरता शिक्षण घेऊन आपली शैक्षणिक पात्रता उंचावण्याचीही इच्छा असते. विशेषत: अनेक गृहिणींना विवाहामुळे  व पुढे मुले लहान असल्यामुळे अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असते. म्हणून शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या प्रत्येकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दूरस्थ व मुक्त शिक्षण पद्धतीची मुहूर्तमेढ रोविली गेली होती. हा हेतू उदात्त होता, यात शंका नाही.
    अंदरकी बात वेगळीच
     मात्र अंदरकी बात वेगळीच आहे. एखाद्या चांगल्या योजनेचा विचका व्हावा, तसेच या बाबतीतही फार मोठ्या प्रमाणत घडले. घुसखोरी व बोगस पदवी ही दोन बिरुदे या पद्धतीला चिकटली. युजीसीने याला आळा बसावा म्हणून काही सौम्य उपाय करून पाहिले. नियमही घालून दिले पण हेही अनेकांना मानवू नयेत, याला काय म्हणावे? गरजू व होतकरू विद्यार्थी एका सोयीला मुकणार अशी हाकाटी का बरे होत आहे?
    कर नाही त्याला...
    खरे तर 9 आॅगस्ट 2018 चे परिपत्रक प्रशासकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे, लबाडांवर अंकुश लावणारे आहे. कर नाही त्याला डर कसली? खोट्याच्या पाठी सोटा बसला तर बिघडले कुठे? पण शिक्षणक्षेत्रातील विद्यार्थी संघटनांसकट सर्वच मंडळी अस्वस्थ का व्हावीत ते कळत नाही. राज्य शासनाच्या शिक्षण विभागानेही दखल घेतली आहे, यांच्यासाठी रदबदली केली आहे. मात्र युजीसीने विद्यापीठांना आपली भूमिका मांडण्याची संधी दिली असल्याचे स्पष्ट केल्यावरही आक्षेपाला काही जागा आहे का? सर्व तपासण्या केल्यावर जर काही अभ्यासक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला तर गैर काय आहे? उलट असे न करणेच गैर ठरणार नाही का?
   अन्य पर्याय
     नियमीत शिक्षणाला दोन पर्याय आहेत. एक आहे, बहिस्त (बाहेरून परीक्षा देणे) शिक्षण पद्धती किंवा दुसरी आहे, पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण घेण्याची पद्धती. सकाळची महाविद्यालये, रात्रीची महाविद्यालये हेही पर्याय निर्माण झाले होते. पण घरबसल्या व स्वत:च्या  सोयीच्या वेळेनुसार शिक्षण घेण्याचा मुक्त पर्यायच सर्वात लोकप्रिय झाला, यात नवल वाटण्याचे कारण नाही. विसाव्या शतकाच्या शेवटच्या चतुर्थात मुंबई विद्यापीठाने प्रथम पत्रव्यवहाराद्वारे शिक्षण सुरू केले. त्यासाठी पत्रव्यवहार अभ्यासक्रम संचालनायाची रीतसर स्थापना केली. आजतर भारतात जवळजवळ सर्वच विद्यापीठात पत्रव्यवहाराद्वारे अभ्यासक्रम शिकवले जात असले तरी मुंबई विद्यापीठाचे अनुकरण व अनुसरण सर्वांनी सारखेच केलेले नाही, हा कळीचा मुद्दा आहे. खाजगी रीतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रवेश देणे व त्यांची परीक्षा घेणे, नियमित विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्यासक्रमात व या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मुळीच फरक नसणे, असे मुंबई विद्यापीठाच्या नियमांचे स्वरूप असते/आहे. या विद्यार्थ्यांना कोणतेही मार्गदर्शन उपलब्ध करून न देणे हे अयोग्य आहे. पण याकडे दुर्लक्ष करणारी विद्यापीठे, या निमित्ताने मिळणाऱ्या शुल्कावर अवलंबून राहतात व यासोबत येणारी मार्गदर्शनाची जबाबदारी मात्र जर पार पाडीत नसतील तर त्याचे समर्थन कसे करता येईल?
   दुरिताचे निर्दालन
    दूरस्थ व मुक्त शिक्षण देणारे एकमेव राष्ट्रीय विद्यापीठ आहे, ते म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, ज्याची स्थापना 1985 साली दिल्ली येथे झाली ते होय. आज विविध राज्यात 17 मुक्त विद्यापीठे, निरनिराळ्या विद्यापीठात मिळून एकूण 80 च्यावर दूरस्थशिक्षण संस्था व काही खाजगी संस्थाही आहेत. बीए, बीकॉम, एमए, एमकॉम, एमएस्सी (गणित), बीबीए, एमए (शिक्षणशास्त्र), व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम तसेच आयटी, कॉम्प्युटर सायन्स, एमसीए असेही तांत्रिक अभ्यासक्रम या दूरस्थ शिक्षण माध्यमातून चालविले जातात. काहींच्या स्वतंत्र प्रयोगशाळाही आहेत, तर काहींची अभ्यास केंद्रेही आहेत. या व अशा माध्यमातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी जीवनाच्या विविध क्षेत्रात नाव कमावतेही झाले आहेत. ही या क्षेत्राची जमेची बाजू असली तरी शिक्षणक्षेत्रात ट्यूशन टायकून्सनी आज जो धुमाकूळ माजवला आहे, त्याची लागण या क्षेत्रालाही लागली आहे. याच्या जोडीला घुसखोरी व बोगस पदवी यांचे ग्रहण दूरस्थ व मुक्त शिक्षणाला लागले आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी युजीसी काही पावले उचलत असेल तर त्याला विरोध करणे योग्य नाही. सुक्याबरोबर ओलेही जळणार नाही, याची काळजी मात्र घेतली पाहिजे.