My son (Ajit), and daughter-in-law (Neelam) suggested to me that I should have a blog of my own. Because of their kind suggestion, I have created this blog.
Monday, December 27, 2021
काळाच्या कसोटीवर उतरलेली मैत्री
वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड.
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
भारत आणि रशिया यांच्यातील 21 वी शिखर परिषद दिल्लीला नुकतीच पार पडली. यावेळी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्वस्पर्शी प्रश्नांवर चर्चा झाली. बैठकीत तालिबानी ताब्यानंतर दहशतवादी गटांकडून होणारे मानवीहक्कहनन तसेच अल्पसंख्यांक, मुले आणि स्त्रिया यांच्या दशेविषयी तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. इतरही अनेक विषयांवर चर्चा झाली, करार झाले. या परिषदेचे वर्णन मोदींनी एकमेवाद्वितीय या शब्दात केले तर पुतिन यांनी भारताचे वर्णन एक महान शक्ती आणि काळाच्या कसोटीवर उतरलेला मित्र (टाईम टेस्टेड फ्रेंड) या शब्दात केले. दोन राष्ट्रप्रमुखांच्या या शिखर परिषदेसोबत भारताचे आणि रशियाचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री यांच्यात प्रथमच वाटाघाटी झाल्या आहेत. यांना 2+2 मीटिंग म्हणतात. अशा प्रकारच्या वाटाघाटी आणि त्यातून निष्पन्न होणाऱ्या फलितांचे महत्त्व काही वेगळेच असते. यानंतर पुन्हा मोदी आणि पुतिन यात मुख्यत: संरक्षण, कोविड-19, खत पुरवठा यासारख्या प्रश्नी फोनवर चर्चा झाली आहे.
भेटीचे प्रयोजन
अफगाणिस्तान आणि चीन यांनी दिलेली आव्हाने भारतासाठी जशी आणि जेवढी महत्त्वाची होती, तशी ती रशियासाठी नसतीलही पण हा विषय सरळ झटकून टाकावा असा आणि इतका क्षुल्लकही नव्हता. अफगाणिस्तानमध्ये जे घडते आहे आहे त्याचा उपद्रव रशियालाही होणार आहेच. अमेरिकेच्या युक्रेन आणि तैवान बाबतच्या कठोर आणि आग्रही भूमिकेमुळे सध्या रशिया आणि चीन एकत्र आले असले आणि आभासी चर्चेनंतर त्यांच्यातील मैत्री घट्ट झाली असली तरी चीन आपल्या वरचढ ठरू नये ही रशियाची आंतरिक इच्छा उरली नाही, असे नाही. त्याचबरोबर चीन आणि रशियामधले सीमावादही संपलेले नाहीत. पण पॅसिफिक महासागरात ॲाकुसच्या म्हणजे अमेरिका, युनायटेड किंगडम (ब्रिटन) आणि ॲास्ट्रेलिया यांच्या होत असलेल्या आणि होऊ घातलेल्या संयुक्त सैनिकी हालचाली, चीनबरोबर रशियाचीही चिंता वाढविणाऱ्या आहेत. त्याचप्रमाणे अमेरिका, भारत, जपान आणि ॲास्ट्रेलिया यांचे संघटन म्हणजेच क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॅाग, म्हणजे क्यूएसडी किंवा क्वाड याची संकल्पित सुरक्षा तसेच सहकारविषयक भूमिका; दुसरे म्हणजे यांचा मुक्त आणि खुल्या इंडोपॅसिफिक महासागराबाबतचा आग्रह आणि तिसरे म्हणजे पूर्व तसेच दक्षिण चिनी समुद्रात संचारस्वातंत्र्याचा पुरस्कार ह्या बाबींमुळे चीनचा तर नुसता जळफळाट झाला आहे. दक्षिण चिनी समुद्रातील बेटांवर आणि या समुद्राला लागून असलेल्या देशांच्या भूभागावर चीनने हक्क सांगितला आहे. चीन आणि तैवान यांच्यातील वाद तर विकोपालाच गेला आहे. अमेरिका, नाटो आणि जपानने तैवानची बाजू घेतली आहे आणि चीनमधील मानवीहक्कहननाचा निषेध केला आहे. तिबेटच्या स्वायत्ततेचा विषयही अमेरिकेच्या विषयसूचीत येताना दिसतो आहे. इकडे लडाखक्षेत्रात सीमारेषेबाबत आडमुठी भूमिका घेत चीनने सैन्याची आणि शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव केली आहे. भारत सदस्य असलेल्या क्वाडकडे पाहण्याची रशियाची भूमिकाही चीनप्रमाणे प्रतिकूलच राहिलेली आहे. इस्रायल, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिका यांच्यासोबतही भारत पश्चिम आशियातील क्वाडमध्ये सामील आहे. रशियाला ही आघाडी आपल्या विरुद्धच्या एशियन नाटो सारखीच वाटते आहे. त्यामुळे रशियाही भारतावर नाराज असणार, हे ओघानेच येते. तरीही पुतिन भारतभेटीवर आले आहेत, हे महत्त्वाचे. एकीकडे अमेरिका आणि युरोप तर दुसरीकडे रशिया आणि चीन या वादात भारत आपल्या बाजूने असावा निदान तटस्थ तरी रहावा, असे या दोन्ही गटांना वाटणार यात शंका नाही. अशा परिस्थितीत 70 वर्षांच्या मैत्रीची आठवण ठेवीत आणि तशी भूमिका घेत पुतिन भारतभेटीवर येऊन गेले आहेत. यात भारताला चुचकारण्याचा रशियाचा हेतू तर नसेल ना?
भेटीगाठी आणि ठराव
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचा भर अफगाणिस्तानविषयक प्रश्नांवर होता. अफगाणिस्तानमधील घडामोडींचे परिणाम केवळ त्या देशाला लागून असलेल्या देशांपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर ते संपूर्ण मध्य आशियावर परिणाम करणारे ठरतील, हा त्यांनी समपदस्थासोबत चर्चेसाठी निवडलेल्या मुख्य मुद्यांपैकी एक होता.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लडाखमधील चिनी घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे भारताच्या संरक्षणसिद्धतेची निकड व कोविड-19 चा प्रलय हे मुद्दे रशियन संरक्षणमंत्र्यासोबत चर्चेसाठी प्रामुख्याने निवडले होते.
2+2 डायलॅागच्या अगोदर एक अतिशय महत्त्वाची बैठक झाली, तेही विसरून चालणार नाही. इंडिया-रशिया इंटर-गव्हर्मेंटल कमीशन ॲान मिलिटरी ॲंड मिलिटरी-टेक्निकल कोॲापरेशन ची ही 20 वी बैठक होती. या बैठकीत 2021 ते 2031 अशा दीर्घ मुदतीचा करार झाला. हा करार मुख्यत: सैनिकी तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणविषयक सहकार्याशी संबंधित आहे.
यानंतर दुसरा जो महत्त्वाचा करार झाला तो आहे उत्तरप्रदेशातील अमेठी येथे 5 हजार 124 कोट रुपये किमतीचा, 6 लक्ष एके-203 ॲसॅाल्टरायफली तयार करण्याबाबतचा. लांब पल्याच्या, कमी वजनाच्या, नाईट व्हिजन असलेल्या, मिनिटाला 600 गोळ्या झाडू शकणाऱ्या, कोणत्याही ऋतूत वापरता येतील अशा, गरजेनुसार ॲाटोमॅटिक किंवा सेमीॲाटोमॅटिक रूप धारण करू शकणाऱ्या या बहुगुणी रायफलींच्या निर्मितीचा हा भारत 50.5 % व रशिया 49.5 % सहभाग असलेला संयुक्त प्रकल्प असणार आहे. यामुळे भारतीय सैन्यदलाच्या मारकक्षमतेत प्रचंड वाढ होणार आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जटिलस्वरूप
पुतिन यांचा हा कोरोना काळातला दुसरा विदेश दौरा होता. एकमेकांच्या देशांना आलटून पालटून भेट देऊन परस्परहिताच्या प्रश्नांवर तसेच जागतिक प्रश्नांवर आणि परस्पर सहकार्यावर चर्चा करायची असे 2000 सालीच ठरले होते त्यात कोरोना काळातही खंड पडलेला नाही. या दौऱ्यानंतर लगेचच पुतिन यांची अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासोबत आभासी चर्चा झाली आहे. हे महत्त्वाचे.
सध्या रशियासोबत चीन आणि चीनसोबत पाकिस्तानही असणारच. चीन आणि पाकिस्तान हे आपले शत्रू आहेत. पण रशिया मात्र आपला 70 वर्षापासूनचा मित्र आहे. ही मैत्री आपण कायम ठेवू इच्छितो अशी खात्री तर पुतिन यांना या भेटीच्या निमित्ताने द्यायची नसेल ना? अमेरिका आणि युरोपीयन युनीयन, चीन आणि रशिया या दोघांच्याही विरोधात गेल्यामुळे त्यांना एकमेकाशी जुळवून घेणे भाग आहे. अशा परिस्थितीत रशिया ज्येष्ठतेच्या अधिकाराने चीनला भारताशी जुळवून घेण्यास सांगू शकतो. भारताने या वादात तटस्थ राहणे ही तशी चीनचीही गरज आहेच. भारत आणि चीन यांच्यातील पुढच्या चर्चेच्या वेळी चीन समजुतदारपणे वागतो किंवा कसे, हे पाहून काही अंदाज बांधता येतील. भारत एकाचवेळी अमेरिका, रशिया, इस्रायल, अरब जगत आणि असे इतर अनेक यांच्याशी स्नेहाचे संबंध राखून आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातला हा गुंता मेंदूला मुंग्या आणणारा आहे.
सोव्हिएट युनीयनचे विघटन झाल्यानंतर स्वतंत्र झालेल्या अनेक देशांना नाटोने आपल्याकडे वळविले आहे. रशियाने क्रिमिया गिळंकृत केला आणि युक्रेनवरही आक्रमण करण्याची जय्यत तयारी केली. कदाचित युक्रेन आणि जॅार्जिया यांनी नाटोत सामील होऊ नये, एवढाच मर्यादित उद्देश रशियाचा असू शकेल. पण सर्व शक्यता गृहीत धरून उत्तरादाखल अमेरिका आणि युरोपीयन युनीयन यांनी रशियाची आर्थिक आणि व्यापारी कोंडी केली आहे. रशियन उर्जाक्षेत्रातील दिग्गज आयगोर सेशिन यांना आपल्याबरोबर भारतभेटीसाठी पुतिन यांनी विनाकारणच आणले असेल का?.
शस्त्रास्त्रांचा सर्वात जास्त पुरवठा भारताला
भारताइतका शस्त्रास्त्रांचा पुरवठा रशियाने इतर कोणत्याही देशाला केलेला नाही. एस-400 ही जमिनीवरून आकाशात डागता येणारी 5 बिलियन डॅालर किमतीची, जमिनीवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येईल अशी, क्षेपणास्त्रप्रणाली आहे. ही क्षेपणास्त्रप्रणाली भारताने रशियाकडून खरेदी करू नये. असे केल्यास अमेरिका निर्बंघ लावील अशी धमकीही अमेरिकेने देऊन पाहिली होती. पण चीनला वेसण घालायची असेल तर भारताची गरज भासणार असल्यामुळे या प्रकरणी अमेरिका ताणून धरणार नाही, असे दिसते. अशा 28 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे ही घटना जगभरातील महत्त्वाची बातमी ठरली आहे. कुणी सांगावे, उद्या एस-500 विकत घेणारा पहिला देश भारत असू शकेल?
यावेळी विज्ञान, तंत्रज्ञान, नवकल्पना (इन्नोव्हेशन) आणि शिक्षणक्षेत्रांतही सहकार्याचे करार केले गेले, बौद्धिक संपदा, सैनिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील 1994 साली केलेल्या कराराची मर्यादा 2031 पर्यंत वाढविण्यात आली, हे तर विशेषच म्हटले पाहिजे. समुद्र किनारी आणि खोल समुद्रात खनीज तेल आणि नैसर्गिक वायू यासाठी शोधमोहीम सुरू करण्यासंबंधी करार करण्यात आला. भारताची नैसर्गिक वायूची गरज भागविण्याचे दृष्टीने हा करार महत्त्वाचा मानला जातो.
सांस्कृतिक व कलाक्षेत्र, अवकाश संशोधन, अवकाशातील आणि भूपृष्ठावरील शोधकार्यासाठी उपग्रहाचे प्रक्षेपण, व्हॅलिडोस्टॅाक येथे स्वतंत्र व्यापारी कार्यालयाची उभारणी, आरोग्यक्षेत्र, सायबर हल्ल्यांचा प्रतिबंध, उर्जाक्षेत्र, पोलादाचे उत्पादन यासारख्या विषयांबाबतही करार करण्यात आले आहेत. या शिवाय आणखी एक महत्त्वाची बाब ही आहे की, रशियाने तंत्रज्ञान हस्तांतरण (टेक्नॅालॅाजी ट्रान्सफर) करण्याची तयारी दाखविली आहे. सामान्यत: जागतिक बाजारात यासाठी कुणी फारसे तयार नसते. झिजलेल्या सुट्या भागांच्या जागी नवीन भाग वेळेवर न आल्यामुळे(यामुळे) कामे अडून बसायची. ती ती उपकरणे, अस्त्रे विशेषत: विमाने वापरता येत नसत. किंवा वापरल्यास धोका संभवत असे. नव्हे बरेच अपघातही झाले आहेत. यापुढे सुटे भाग वेळेवर उपलब्ध होणार आहेत. प्रत्यक्षात असे झाले तर तीही मोठीच उपलब्धी ठरणार आहे. असे अनेक सर्वसमावेशी आणि सर्वस्पर्शी करार या भेटीत आकाराला आले आहेत. भारत आणि रशियातील मैत्रीचे संबंध गेल्या 70 वर्षात सतत वृद्धिंगत होत आहेत, ते पुढेही तसेच वाढत आणि विकसत होत राहतील अशी उभयपक्षी ग्वाही व्यक्त झाल्यानंतरच पुतिन यांनी मायदेशी प्रयाण केले.
Sunday, December 26, 2021
जगाच्या पाठशाळेतील एक ‘शहाणा’ मुलगा’- बांग्लादेश
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
भारत आणि मुक्ती वाहिनी यांनी यांनी पाकिस्तानच्या कचाट्यातून मुक्त केलेल्या बांग्लादेशची म्हणजेच पीपल्स रिपब्लिक ॲाफ बांग्लादेशची 17 कोटीच्या जवळपास असलेली लोकसंख्या बहुतांशी इस्लाम धर्मीय आहे. गेल्या 50 वर्षात त्याने साध्य केलेली प्रगती काहींच्या मते नेत्रदापक नसेलही पण ती आश्वासक नक्की आहे आणि भारताला आपले परिश्रम सार्थकी लागल्याचे समाधान देणारी आहे. बांग्लादेशाच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला भारत आहे तर दक्षिणेला बंगालचा उपसागर आणि आग्नेयेला म्यानमार आहे. नेपाळ आणि भूतान यांच्या मध्ये सिलीगुडी कोरिडॅार ही भारताची चिंचोळी पट्टी आहे. चीन (तिबेट) आणि बांग्लादेश यात भारताचे सिक्कीम हे राज्य येते. बांग्लादेशात सर्वात मोठे ढाका हे राजधानीचे शहर असून आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक केंद्रही आहे. दुसरे मोठे शहर चितगाव हे प्रमुख बंदर आहे.
शेती व्यवसाय
बांग्लादेशात शेती हे रोजगार मिळवून देणारे केंद्र असून त्याचा जीडीपीमधील वाटा 14% पेक्षा जास्त आहे. 43 % लोक शेतीवर अवलंबून असणारे आहेत. बांग्लादेशात शेतकी उत्पादनांचा अनुकूल प्रभाव रोजगार, सुबत्ता, मानव विकास, अन्नसमृद्धी यावर झालेला दिसतो. पूर नियंत्रण आणि सिंचन याबाबबत बांग्लादेशाने मिळवलेले यश याला कारणीभूत आहे. जोडीला असलेल्या खतांच्या नेमक्या वापराची, योग्य वितरण व्यवस्थेची आणि चलन पुरवठ्याची आश्वासक तजवीज आणि साथही तेवढीच महत्त्वाची आहे.
बांग्लादेश म्हटले की तांदूळ आणि ज्यूट यांचीच आठवण मुख्यत: येते. पण गव्हापेक्षा मका आणि भाजीपाला ही दोन पिकेही लक्ष वेधणारी आहेत. मका हे मुख्यत: कोंबड्यांचे खाद्य आहे तर ईशान्य भागातले चहाचे मळे देशातील आणि देशाबाहेरील चहाबाजांची तल्लफ पुरवणारे आहेत. निसर्गाने दिलेली सुपीक जमीन आणि पाण्याचा पुरेसा पुरवठा यांचा पुरेपूर फायदा घेत बांग्लादेशात तांदळाची वर्षाला तीने पिके घेतली जातात. याशिवाय बटाटे, फळफळावळ आणि माशांची शेती यामुळे बांग्लादेशाची अन्नसमृद्धीच्या दिशेने दौड सुरू आहे.
उर्जानिर्मिती
बांग्लादेशातील विजेचे उत्पादन 2020 मेगॅवॅट्स इतके होते. बांग्लादेशात जमिनीखाली नैसर्गिक वायू मुबलक प्रमाणात असून उर्जेचा 56 % पुरवठा नैसर्गिक वायूच्या आधारे होतो. यांच्या जोडीला खनीज तेल, जलविद्युत आणि कोळसा हेही आहेत. शिवाय भूतान आणि नेपाळकडून बांग्लादेश जलविद्युत विकत घेणार आहे. रशियाच्या मदतीने एक 2160 मेगॅवॅट क्षमतेचे न्युक्लिअर प्लॅंटही उभारले जात आहे. उर्जेच्या अपारंपरिक स्रोतात सौर उर्जा निर्मितीवर बांग्लादेश भर देतो आहे.
पाणी पुरवठा
बांग्लादेशात 98 % लोकांना पाणी पुरवठा हातपंपांच्या आधारे होत असतो. पण भूजल आर्सेनिक मिश्रित असल्यामुळे शुद्ध पाणी ही बांग्लादेशाची निकडीची समस्या होऊन बसली आहे.
कर आकारणी
बांग्लादेशात करांचे दर एकतर कमी आहेत आणि करवसुलीचे प्रमाणही समाधानकारक नाही. याचा परिणाम सुविधांवर झाला आहे. स्वच्छतेच्या सोयी 56 % लोकांनाच उपलब्ध आहेत. यासाठी विशेषत: ग्रामीणक्षेत्रात सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या उभारणीवरच भर दिला जातो आहे.
उद्योग
बांग्लादेशात वस्त्रोद्योग हा महत्त्वाचा उद्योग आहे. तयार कपड्यांच्या 5 हजार फॅक्टरी बांग्लादेशात आहेत. सुयांचा वापर करून आणि यांत्रिक हातमागांचा वापर करून तयार केल्यजाणाऱ्या कापडापासून कपडे तयार करून मुख्यत: त्यांचीच निर्यात जगभर होते. कोणत्याही अमेरिकन मॉलमध्ये बांग्लादेशातील तयार कपड्याचा गाळा हटकून असतोच. यांच्या निर्यातीतून बांग्लादेशाला भरपूर परकीय चलन मिळत असते. कामगारांचे वेतनमान कमी असल्यामुळे उत्पादन खर्च कमी असतो त्यामुळे मालाची कमी किंमत ठेवणे शक्य झाले आहे. याशिवाय औषधनिर्मिती उद्योग, इलेक्ट्रॅानिक्स, जहाज बांधणी, दोन व चारचाकी वाहनांची निर्मिती, चर्म उद्योग, ज्यूट, कागद, काच, प्लॅस्टिक, खाद्यपदार्थ, भूगर्भातील वायू, पोलाद आदींशी संबंधित उद्योग बांग्लादेशात उभारले गेले आहेत.
भांडवली गुंतवणूक
गुंतवणुकीला आकर्षित करील असे आर्थिक धोरण बांग्लादेशाने स्वीकारले आणि याचा परिणाम भांडवल उपलब्ध होण्यात झाला असून विविध क्षेत्रात नवनवीन प्रकल्प उभे होत आहेत. सरकारी क्षेत्रातील उद्योगांचे खाजगीकरण करण्याचे धोरण बांग्लादेशाने स्वीकारले आणि फारसा विरोध न झाल्यामुळे आमलातही आणता आले. अंदाजपत्रकात आर्थिक शिस्तीचे (बजेटरी डिसिप्लिन) काटेकोरपणे पालन केले जाते. बांग्लादेशाने सवंग लोकप्रियतेच्या नादी लागून वारेमाप आणि अस्थानी खर्च केले नाहीत. व्यापाराला चालना मिळेल अशी धोरणे राबविली. याचा परिणाम आर्थिकक्षेत्रात वेगाने प्रगती होण्यात झाला. सकल राष्ट्रीय उत्पन्नात 7 % वाढ नोंदविली गेली आणि आता 10 % वाढ दृष्टिपथात येते आहे. या सर्वावर कोविड-19 च्या प्रकोपाचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो हे खरे आहे. पण आज ना उद्या एकतर कोविड- 19 जाईल तरी किंवा मानव त्याचा इतर आजारांप्रमाणे स्वीकार करून त्याच्यासह जीवनाचे रहाटगाडगे सुरू ठेवण्यात यशस्वी तरी होईल. कोरोनामुळे बसलेली खीळ लवकरच सैल होईल आणि प्रगतीचा आलेख वर जाऊ लागेल यात शंका नाही. कारण मूळ पाया शाबूत राखण्यात बांग्लादेशाने यश मिळविले आहे.
दारिद्यनिर्मूलन
बांग्लादेशात दारिद्र्निर्मूलन मोहीम जेमतेम बरी म्हणावी इतपतच यशस्वी झालेली दिसते. तरीही अवाजवी राजकीय आणि अन्य हस्तक्षेप टाळता आले तर आर्थिक प्रगती संथपणे खात्रीने होत राहते, हे म्हणणे बांग्लादेशाचे बाबतीत तरी खरे ठरतांना दिसते आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो, महिलांच्या सहभागाचा. एका पाहणीनुसार निरनिराळ्या क्षेत्रातील महिलांचा सहभाग 45 % इतपर्यंत वाढला आहे. मुलींच्या शाळाप्रवेशाचे उद्दिष्ट बांग्ला देशाने 98 % इतके ठेवले असून ते नजीकच्या काळात सहज शक्य होईल, असे मानले जाते. वर्ल्ड एकॅानॅामिक फोरमनुसार पितृसत्ताक पद्धती अनुसरणारा बांग्लादेश लिंग समानतेच्या बाबतीत 47 व्या क्रमांकावर मानला आहे.
श्रमिकक्षेत्र
कामगार क्षेत्राचा विचार करायचा झाला तर एका पाहणीनुसार बांग्लादेशात ठोकळमानाने 40 % कामगार कृषिक्षेत्रात, 20 % उद्योगक्षेत्रात, 40 % सेवाक्षेत्रात आढळून येतात. उद्योग आणि सेवाक्षेत्रात येणाऱ्यांचे प्रमाण वाढते असून कृषिवर अवलंबून राहणाऱ्यांचे प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचे दुसऱ्या एका पाहणीत आढळून आले आहे. जगभरात बहुतेक ठिकाणी विकसनशील देशात हाच कल आढळतो.
बेरोजगारीचे प्रमाण कोविडपूर्व काळात सरासरीने 4.2 %, फक्त पुरुषात 3.1 % आणि फक्त महिलात 6.7% असल्याचे सांगतात. पण हे खरे मानावे तर बांग्लादेशातून भारतात होत असलेली घुसखोरी आर्थिक कारणास्तव होत असते असे कसे मानता येईल? याचा अर्थ असा की, सांगितले जाते त्यापेक्षा बेकारीचे प्रमाण बांग्लादेशात खचितच जास्त आहे. बहुदा म्हणूनच बांग्लादेशी आता जगभर आढळू लागले आहेत.
दहशतवादी कारवाया
एका अमेरिकन एजन्सीच्या अहवालानुसार बांग्लादेशमधील दहशतवादी कारवाया 2020 मध्ये बऱ्याच कमी झाल्या आहेत. याचे श्रेय त्यांनी जोरदार शोधमोहीम आणि अटकसत्राला दिले आहे, हे महत्त्वाचे. 2021 या वर्षात तीन दहशतवादी कारवाया घडल्या पण प्राणहानी झाली नाही. पण साऊथ एशियन टेररिझम पोर्टलनुसार बांग्लादेशात 197 दहशतवादी दबा धरून आहेत. 1999 पासून 2019 पर्यंतच्या काळात दहशतवादी कारवायांचा बांग्लादेशाला बराच उपद्रव होत होता अशा नोंदी आहेत. बांग्लादेशातील दहशतवाद्यांनी 441 वेळा भारतात घुसून घातपाती कारवाया करण्याचा प्रयत्न केल्याच्याची नोंद आहे. भारताने कुंपण घालून आणि पाहरे बसवून दहशतवाद्यांच्या कारवायांना आवर घालण्याचा प्रयत्न केला आहे. पण अशा प्रयत्नांचा पूर्णपणे बंदोबस्त करणे अतिशय कठीण असते.
धार्मिक सौहार्द्य
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे की, बांग्लादेश ही धार्मिक सौहार्द्याची भूमी आहे. प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार, श्रद्धेनुसार आचरण करण्याचा अधिकार आहे. कुणाचा कोणताही धर्म असला तरी हिंसाचार करणाऱ्यांना अद्दल घडेल अशी शिक्षा करण्यात येईल. वंगबंधूंच्या कन्येच्या सद्हेतूबद्दल संशय घेण्याचे कारण नाही. पण बांग्लादेशातील एका कट्टर आणि धर्मांध गटाची भारतद्वेशी मानसिकता या भूमिकेशी मुळीच जुळत नाही. नागरिकतेबाबत भारताने स्वीकारलेली भूमिका यांना मान्य नाही. दुर्गा पूजेच्या निमित्ताने झालेल्या दंगली, मंदिरांची मोडतोड अशा घटना याची साक्ष पटवतात. कट्टरतेच्या निमित्ताने खालिदा झिया आणि रोशवान इर्षाद यांची नावे उदाहरणादाखल देता येतील.
आयात निर्यात
निर्यातीचा विचार केला तर बांग्लादेशातून होणाऱ्या निर्यातीपैकी, 58 % निर्यात युरोपीयन युनीयन मध्ये,16.3 % अमेरिकेत 3.1 % जपानमध्ये, 3 % कॅनडात आणि फक्त 2.4 % च भारतात होते, असे कोविडपूर्व आकडे सांगतात. कोविडचा प्रकोप जसजसा कमी होत गेला तसतशी निर्यात वाढत जात असल्याचे दिसते.
आयातीच्या बाबतीतली स्थिती अशी आहे. चीन मधून होणारी आयात 21.5 % टक्के (निर्यात मात्र जवळजवळ नाहीच), भारतातून 12.2%, सिंगापूरमधून 9.2 %, युरोपीयन युनीयन कडून 6.5 % आणि उरलेली इतर देशांकडून असा हिशोब मांडला जातो.
खेळ, कला आणि शिक्षण
बांग्लादेशात भारताप्रमाणे हुतूतू, क्रिकेट, फुटबॅाल, हॅाकी,बुद्धिबळ,गोल्फ, हॅंडबॅाल, व्हॅालिबॅाल हे लोकप्रिय खेळ आहेत. 2000 वर्षांपासूनच्या कला बांग्लादेशाने जपल्या आणि जोपासल्या आहेत. यात फोटोग्राफी, आर्किटेक्चर, शिल्पकला आणि पेंटिंग्ज प्रमुख आहेत. नाट्यक्षेत्राचा जन्म तर 4 थ्या शतकातला आहे. बांग्लादेशातले संपन्न सिनेक्षेत्र ढालीवुड नावाने ओळखले जाते.
बांग्लादेशाच्या राज्यघटनेतील 17 व्या कलमानुसार मुलांसाठी 10 वर्षांचे शिक्षण नि:शुल्क आणि सक्तीचे आहे. यात 5 वर्षांचे प्राथमिक आणि 5 वर्षांचे माध्यमिक शिक्षण येते. यात बदल होत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वांसाठी शिक्षण आणि विकासाची किमान उद्दिष्टे (मिनिमम डेव्हलेपमेंट गोल्स) यांना बांग्लादेशाने आपल्या शिक्षणविषयक उद्दिष्टात समाविष्ट केले आहे. शिक्षणाचे माध्यम बंगाली आणि इंग्रजी आहे. साक्षरतेचे प्रमाण 78.70 % असून पुरुषात 80.40 % आणि महिलांमध्ये 78.90 % म्हणजे स्त्री व पुरुषांमध्ये जवळजवळ सारखेच आहे.
बांग्लादेशातील मदरसे
यात धार्मिक शिक्षण धार्मिक वातावरणात अरेबिकमधून दिले जाते. काही मदरशांमधील विद्यार्थी स्थानिक मशिदीत नोकरीही करतात. या मुलांनीही सर्वसामान्य शिक्षण पद्धतीनुसार अपेक्षित असलेले शिक्षणही घेतलेच पाहिजे, असा नियम आहे. काही मदरसे बेवारशी मुलांच्या शिक्षणासोबत त्यांच्या अन्न आणि निवाऱ्याची अशी तिहेरी जबाबदारी उचलतात. मदरशांचे दोन प्रकार आहेत.
कौमी मदरसे आणि आलिया मदरसे.
कौमी मदरसे - खाजगी संस्था आपल्या पैशाने कौमी मदरसे चालवतात. देवबंदी सिस्टीम ॲाफ एज्युकेशन नुसार दिलेल्या शिक्षणात विज्ञानाबाबत वेगळाच दृष्टीकोन अवलंबिला जातो.
आज विज्ञानाचे दोन प्रकार मानले जातात. कल्पनेवर आधारित बुद्धिप्रामाण्यवादी विज्ञान आणि प्रायोगिकतेवर आधारित अनुभवजन्य विज्ञान (रॅशनल ॲंड एंपिरिकल सायन्स) मदरशात रॅशनल सायन्सेस शिकविली जात नाहीत. 2 % मुले या प्रकारचे प्राथमिक शिक्षण घेतांना आढळतात. तर 2.2 % मुले माध्यमिक शिक्षण घेतात
आलिया मदरसे - खाजगी संस्थांद्वारे शिक्षण देणाऱ्या या मदरशांना शासकीय अनुदान मिळते. शिक्षणासाठीच्या अंदाजपत्रकातील 11.5 % तरतूद आलिया मदरशांसाठी असते. 8.4 % मुले या प्रकारचे प्राथमिक शिक्षण घेतांना आढळतात. तर 19 % मुले माध्यमिक शिक्षण घेतात. अरेबिक वगळता इतर शाळा आणि मदरसे यातील शिक्षण सारखेच असते, असे सांगितले जाते. पण प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळीच आहे.
संरक्षणावरील खर्च
बांग्लादेशाच्या अंदाजपत्रकात 6.1 % रक्कम संरक्षणावर खर्च केली जाते. ही रक्क्म सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1.1 % इतकीच आहे. तर पाकिस्तानच्या अंदाजपत्रकात 16 % रक्कम संरक्षणावर खर्च केली जाते. ही रक्कम सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 4 % इतकी आहे. संरक्षणावरील खर्च कमी करून ती रक्कम बांग्लादेशाने रचनात्मक बाबींवर खर्च केली आहे. याचा परिणाम असा झाला आहे की गेल्या 50 वर्षात बांग्लादेशाने उद्योग व शिक्षणासारख्या बाबतीत भरीव प्रगती करायला सुरवात केली आहे.
बांग्लादेशातील धर्म
बांग्लादेशात 90.4 % मुस्लीम, 8.5 % हिंदू, 0.6 % बौद्ध, 0.4 % ख्रिश्चन आणि उरलेले इतर आहेत. सेक्युलर स्टेट असलेल्या बांग्लादेशाच्या घटनेने प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. पण इस्लाम हा ‘स्टेट रिलिजन ॲाफ रिपब्लिक’आहे. बहुतेक बांग्लादेशी बंगाली मुस्लीम आहेत. सुन्नी बहुसंख्येत असून शिया आणि अहमदियाही अल्प प्रमाणात आढळतात. उर्दूचा शिरकाव 17 व्या शतकात मुख्यत: ढाकासारख्या व्यापारी केंद्रातच झाला आहे.
भाषा
बांग्लादेशात 98 % लोक बंगाली भाषा बोलतात. ती बंगाली लीपीत लिहिली जाते. 1987 च्या लॅंग्लेज इंप्लिमेंट ॲक्टनुसार सरकारी कामकाजात बंगाली भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल मात्र इंग्रजीतच असतात. उच्च शिक्षणात इंग्रजीचा वापर होतो. उर्दू भाषेला सरकारी भाषा बनविण्याचा प्रयत्न हाणून पाडला गेला. आज उर्दू भाषेचा वापर स्थलांतरित बिहारी मुस्लीम लोक करतात, असे म्हटले जाते. खरेतर यातील बहुतेक बांग्लादेशात उरलेले पाकिस्तानी आहेत.
परराष्ट्र संबंध
बांग्लादेश स्वतंत्र झाल्यानंतर 1972 मध्ये राष्ट्रकुलाचा (कॅामनवेल्थचा) सदस्य झाला. नंतर 1974 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य झाला. आतापर्यंत तो दोनदा सुरक्षा समितीवरही निवडून आला आहे.1986 मध्येतर हुमायून रशिद चौधरी हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदीही निवडून आले होते. बांग्लादेशाला वर्ल्ड ट्रेड ॲारगनायझेशनची सदस्यताही मिळाली आहे. विशेष असे की, संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता प्रस्थापन बलात (युनायटेड नेशन्स पीसकीपिंग फोर्स) बांग्लादेशाचे एक लक्षाहून अधिक सैनिक सहभागी असतात. या फोर्सने शांतता प्रस्थापित करण्याच्या आजवरच्या 54 मोहिमांमध्ये जबाबदारीची भूमिका पार पाडली आहे. मध्यपूर्व, बाल्कन क्षेत्र, आफ्रिका आणि कॅरेबियन क्षेत्रात या मोहिमा आयोजित होत्या. याबाबींचा सविस्तर उल्लेख यासाठी करायचा की, निर्माण झाल्यानंतर लगेचच एक जबाबदार राष्ट्र म्हणून जगाने बांग्लादेशाला स्वीकारले आहे.
बांग्लादेशाने पुढाकार घेऊन साऊथ एशियन असोसिएशन फॅार रीजनल कोॲापरेशन (सार्क) या संघटनेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. ही आर्थिक आणि भूराजकीय संघटना असून तिची स्थापना 8 डिसेंबर 1985 ला करण्यात आली. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि मालदीव हे सार्कचे प्रथम सदस्य होते. सार्कमध्ये अफगाणिस्तानचा सदस्य म्हणून प्रवेश 2007 मध्ये झाला.
बांग्लादेशने ॲार्गनायझेशन ॲाफ इस्लामिक कोॲापरेशन (ओआयसी) ची सदस्यता 1973 मध्येच घेतली आहे. ही संघटना मुख्यत: मुस्लीमबहुल देशांतील विवाद आणि संघर्षात समेट घडवून आणण्याचा उद्देश समोर ठेवून स्थापन करण्यात आली आहे.
डेव्हलपिंग एट (आठ) कंट्रीजच्या संस्थापक सदस्यांपैकी बांग्लादेश एक आहे. यात बांग्लादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराण, मलायशिया, नायजेरिया, पाकिस्तान आणि तुर्कस्थान हे सदस्य आहेत.
बांग्लादेशाला मान्यता देणारा पहिला देश म्यानमार होता. या दोन्ही देशांचे हितसंबंध सारखेच असून सुद्धा रोहिंग्या निर्वासितांच्या घुसखोरीमुळे बांग्लादेश आणि म्यानमार यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरावरील स्वामित्वाबाबत बांग्लादेश आणि म्यानमार यात वाद निर्माण झाला होता. शेवटी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाच्या मध्यस्तीने मार्गी लागला. पुढे 2016 आणि 2017 मध्ये बौद्ध धर्मी म्यानमारमधील, 7 लक्ष मुस्लीमधर्मी रोहिंग्ये निर्वासितांनी, पिटाळले गेल्यामुळे, बांग्लादेशात बेकायदा प्रवेश केला. अत्याचार, वांशिक द्वेश, वंशविच्छेद यामुळे जीव वाचवण्यासाठी आपण आश्रयाला आलो आहोत, असा दावा रोहिंग्यांनी केला आहे. बांग्लादेशाने आणि आंतरराष्ट्रीय जगताने या प्रकाराबाबत म्यानमारवर कडक शब्दात टीका केली होती. संयुक्त राष्ट्रसंघानेही म्यानमारवर ठपका ठेवला असून हा वांशिक द्वेशातून घडलेला प्रकार असल्याचे म्हटले आहे.
भारत आणि बांग्लादेश यातील संबंध समाधानकारक राहिले असून यांना विशेष राजकीय महत्त्व आहे. बांग्लादेशातील वृत्तपत्रांनी भारताला ‘बांग्लादेशाचा विश्वसनीय मित्र’, म्हणून संबोधले आहे. भारत आणि बांग्लादेश ही दक्षिण आशियातील परस्पर व्यापारसंबंध असलेली सर्वात मोठी जोडी आहे. यांचे आर्थिक आणि पायाभूत सोयीसुविधा संबंधातले जमिनीवरील आणि सागरातील वाहतुक प्रकल्प, यात सहयोग आणि सहकार्य असते.
समान सांस्कृतिक वारसा, लोकशाही मूल्यांवर विश्वास आणि बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील भारताचे सहकार्य यामुळे या देशांच्या मित्रत्वाच्या संबंधाना भरभक्कम पाया लाभला आहे. बांग्लादेशातील कट्टर आणि धर्मांध घटकांकडून हिंदूंवर होणारे अत्याचार, मंदिरांची तोडफोड, सीमेवर होणाऱ्या हिंसक कारवाया मात्र थांबण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे सामायिक नद्यांमधील पाण्याच्या वाटपाबाबतचा प्रश्नही चर्चेने सुटण्यासारखा आहे.
म्यानमारमधील मुस्लीम रोहिंग्यावरच्या कथित अत्याचारांचा निषेध करण्यास रशिया आणि चीन यांच्याप्रमाणे भारतानेही नकार दिला होता. म्यानमार मधील रोहिंग्यांच्या मानवीहक्कांचे हनन होते आहे आणि ते थांबले पाहिजे ही बांग्लादेशाची भूमिका होती. यामुळे भारत आणि बांग्लादेशात कटुता निर्माण झाली होती. पण भारताने बांग्लादेशात आलेल्या रोहिंग्यांसाठी सामग्री वाहून नेण्यास हवाई मदत केली, याचीही नोंद घ्यावयास हवी. गोधनाच्या बांग्लादेशात होणाऱ्या तस्करीवर भारताने नियंत्रण आणल्यामुळे बांग्लादेशात गोमांसाचे आणि कातड्यांचे भाव वाढून महागाई वाढली, हेही त्यांच्या नाराजीचे कारण आहे.
पाकिस्तान आणि बांग्लादेश यात 550 मिलियन डॅालरचा व्यापार करार झाला आहे. यामुळे पाकिस्तानातून आयात केलेला कापूस बांग्लादेशातील वस्त्रोद्योगला उपयोगाचा ठरतो आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशातील व्यापारक्षेत्रात दोस्ती झाली असली तरी राजकीय संबंध ताणलेलेच आहेत. कारण तेव्हाच्या पश्चिम पाकिस्तानमधून आलेल्या पंजाबी मुस्लीम सैनिकांनी बांग्ला मुस्लीम महिलांवर 1971 किंवा त्याअगोदर फार मोठ्या प्रमाणात अत्याचार केले, नागरिकांचा संहार केला (जेनोसाईड) हे पाकिस्तान मान्यच करीत नाही. यासाठी जबाबदार असलेल्यांना फाशी दिल्यानंतर पाकिस्तानने विरोध आणि निषेधही केला होता. यामुळे उभय देशांच्या संबंधात फार मोठी कटुता निर्माण झाली होती. ती लवकर विस्मरणात जाणार नाही.
चीन आणि बांग्लादेश (तेव्हाचा ईस्ट पाकिस्तान) यात 1950 पासूनच स्नेहाचे संबंध होते. बांग्लादेशाच्या 1971 च्या मुक्तीलढ्याचे वेळी मात्र चीनने पाकिस्तानची बाजू उचलून धरली होती. त्यामुळे चीन आणि बांग्लादेशात संबंध प्रस्थापित होण्यासाठी 1976 साल उजाडावं लागलं. नंतर मात्र संबंधात वेगाने सुधारणा होऊन चीनने बांग्लादेशाला भरपूर शस्त्रास्त्रे पुरवून नाराजी बऱ्याच प्रमाणात कमी केली.
आज बांग्लादेश जवळची 80 % शस्त्रे चीनकडून सौम्य आणि उदार अटीवर घेतलेली आहेत. आज या दोन देशातील व्यापार सर्वात जास्त आहे. आता हे दोन्ही देश बीसीआयएम व्यासपीठाचे (बांग्लादेश, चीन, भारत आणि म्यानमार यांचे व्यासपीठ) सदस्य आहेत.
जपानने बांग्लादेशाला कर्ज स्वरुपात सर्वात जास्त आर्थिक मदत केली आहे. ब्रिटनचे बांग्लादेशाशी आर्थिक, सांस्कृतिक आणि सैनिकी संबंध आहेत. अमेरिका बांग्लादेशाचा आर्थिक आणि सुरक्षा क्षेत्रातला सहयोगी आहे. आयातीचा विचार केला तर अमेरिका बांग्लादेशाकडून विविध वस्तूंची आयात करते. तसेच अमेरिकेने बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकही केली आहे. त्यामुळे 76 % बांग्लादेशी अमेरिकेवर बेहद्द खूश आहेत. पण यामागे अमेरिकेचा आंतरिक हेतू हा आहे की उद्या प्रशांत-भारतीयक्षेत्रात गरज भासली तर एक भरवशाचा साथीदार हाताशी असावा.
युरोपीयन युनीयनसाठी बांग्लादेश ही फार मोठी बाजारपेठ आहे. बांग्लादेशाच्या विकासासाठी युरोपीयन युनीयनकडून सढळ हाताने मदत मिळत असते. पण हे बांग्लादेशाच्या कल्याणासाठीच आहे, असे नाही. आपल्या देशात उत्पादन करून प्रदूषण वाढवायचे, किंमतही जास्त मोजायची त्यापेक्षा जमीन, पाणी, वीज आणि स्वस्त मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या देशात उत्पादन करायचे आणि हव्यात्या वस्तू हव्यात्या प्रमाणात आयात करणे अमेरिका आणि युरोपीयन युनीयनला परवडणारे आहे आणि गुंतवणूक करणारा आयातदार, बांग्लादेशालाही निदाान आजतरी परवडणारा आहे.
इतर देशांशीही बांग्लादेशाचे संबंध सलोख्याचेच आहेत. लोकशाही मूल्ये मानणारा देश असल्यामुळे पाश्चात्य देशांचे बांग्लादेशाशी बऱ्यापैकी जुळते. असा देश इस्लामी जगतात शोधावाच लागेल. बरे मध्यपूर्वेतील मुस्लीम जगताबाबत म्हणायचे तर धार्मिक आणि सांस्कृतिक सारखेपणामुळे बांग्लादेशी मनुष्यबळाच्या वाट्याला येणारे वातावरण चांगले नसूनही, तसेच सतत युद्धाच्या किंवा अस्थिर आणि असुरक्षित परिस्थितीत सुद्धा, बांग्लादेशाचे या मुस्लीम जगताशी स्नेहाचे संबंध आहेत. सौदी अरेबियाने बांग्लादेशाचा उल्लेख, मुस्लीम जगतातील एक महत्त्वाचा देश, असा केला, ते उगीचच असेल का? एकच कमतरता दिसते. ती ही की, बांग्लादेशाने इस्रायलला मान्यता दिली असली तरी इस्रायलने पॅलेस्टाईनचा भूभाग बेकायदेशीयरपणे व्यापणे बांग्लादेशाला मान्य नाही. पण आजच्या जगात मध्यस्ताकरवी गरज भागवता येते की. असा व्यवहार करणारा बांग्लादेश हा एकटाच देश नाही.
बांग्लादेशी संस्था अनेक विसकसनशील देशात रचनात्मक कामात सहयोगी होत आहेत. बांग्लादेश रुरल ॲडव्हान्समेंट कमेटी (बीआरएसी) या नावाची अशासकीय संस्था 1972 मध्येच, म्हणजे जन्म झाल्यानंतर तशी लगेचच स्थापन झालेली ही संस्था, जागतिक स्तरावर विकासविषयक कामात सहकार्य आणि सहयोग करीत असते. परराष्ट्रांकडून देणग्या स्वीकारणारी ही बांग्लादेशात रीतसर नोंदणी झालेली संस्था आहे. आताआता पर्यंत ती अफगाणिस्तानमध्ये प्रशंसनीय रचनात्मक कार्य करीत होती. भारताचीही अशीच मदत होती पण ती बहुतांशी दोन सरकारांमधील करारांना अनुसरून असे. तालिबान्यांच्या ताब्यानंतर इतर अनेक प्रश्नांप्रमाणे ह्यांच्या कार्यांचे बाबतीत तालिबानी काय निर्णय घेतात, ते यथावकाश कळेलच. बांग्लादेशाने न्युक्लिअर नॅान प्रॅालिफरेशन ट्रिटी (एनपीटी) आणि कॅाम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रिटी (सीटीबीटी) वर स्वाक्षरी केली आहे. नॅान अलाइन्ड मुव्हमेंट मध्ये (एनएएम) तर तो 1973 मध्येच दाखल झाला आहे. अशा दाखल्यांमुळे जगाच्या पाठशाळेत बांग्लादेशाचे नाव एका ‘शहण्या’मुलासारखे, निदान आजतरी झाले आहे आणि याचे पितृ्त्व भारताकडे आहे.
Monday, December 20, 2021
एका चिमुकल्या राष्ट्राच्या जन्माचे माहात्म्य !
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
दक्षिण अमेरिकेच्या ईशान्य दिशेला कॅरेबियन समुद्रातील वेस्ट इंडीज हा एक मोठा कंसाकार बेटसमूह आहे. वेस्ट इंडीज हे नाव क्रिकेटमुळे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असेल. या बेटसमूहाचा एक भाग ग्रेटर ॲंटिल्स या नावाने ओळखला जातो. यातील विंडवर्ड आयलंड्सना लागून असलेल्या बार्बाडोस या बेटाचा परिचय असा तपशीलवार करून देण्याचे कारण असे की, बार्बाडोस हे नाव क्रिकेटप्रेमी वगळता क्वचितच कुणी ऐकले असेल. सर गॅरी सोबर्स आणि एव्हर्टन वीक्स, फ्रॅंक वॉरेल, क्लाईड वॉलकॉट हे तीन शिलेदार, यांच्या शिवाय लगॉर्डन ग्रीनिज, माल्कम मार्शल, ज्योएल गार्नर, डेस्मंड हेन्स यांच्यावर भारतीय क्रीडाप्रेमी ते भारताविरुद्ध खेळत असूनसुद्धा बेहद्द खूश असत. पण क्रिकेटप्रेमी जगातही बार्बाडोस वेस्ट इंडिज या नावानेच क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांपैकी एक होता.
चिमुकला देश
34 किलोमीटर लांब आणि 23 किलोमीटर रुंद असे हे चिमुकले बेट असून ॲालिव्ह ब्लॅासम या नावाचे इंग्लिश जहाज या बेटावर 1625 मध्ये पोचले. त्यांनी बेटाचा ताबा घेतला आणि किंग जेम्स (पहिला) याच्या स्वामित्वाची द्वाही फिरविली. ब्रिटिश पार्लमेंटने 1966 च्या कायद्यानुसार एका या बेटासाठी एका सत्ताधीशाची नेमणूक केली. त्याच्या आधिपत्याखाली बार्बाडोसला 30 नोव्हेंबर 1966 ला नवीन घटना आणि तिच्या अधिन दोन सभागृह असलेली सांसदीय लोकशाही आणि प्रशासन पद्धती असलेले स्वातंत्र्य बहाल केले. पण हा सत्ताधीश ब्रिटिश राणीच्या मार्गदर्शनानुसार काम करणारा असल्यामुळे हे स्वातंत्र्य तसे अपूर्णच होते. ही स्थिती 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत अस्तित्वात होती.
ब्रिटिश कॅामनवेल्थ आणि कॅामनवेल्थ
अशाप्रकारे बार्बाडोसची सर्वोच्च सत्ताधारी ब्रिटिश राष्ट्रकूल (ब्रिटिश कॅामनवेल्थची) प्रमुख, नाममात्र स्वरुपात का असेना, ब्रिटनची राणी एलिझाबेथच होती. पण 2021 मध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवशी हा संबंध संपुष्टात आला आणि एका स्वतंत्र प्रजासत्ताकाची स्थापना झाली. ब्रिटिश कॉमनवेल्थमधील 15 राष्ट्रे आजही ब्रिटिश राणीला राष्ट्रप्रमुख मानतात. यात ॲास्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, जमैका यासारखे देश आहेत. पहिल्या तीन देशात गोरे लोक बहुसंख्य आहेत. त्यामुळे ब्रिटिश राणीला राष्ट्रप्रमुख मानण्यास त्यांची हरकत नसावी. पण बार्बाडोसने असा संबंध न ठेवता स्वतंत्र प्रजासत्ताकाची वेगळी वाट निवडली, हे विशेष म्हटले पाहिजे. ब्रिटिशांनी आपल्या वसाहतींना स्वातंत्र्य दिल्यानंतर त्यांनी ब्रिटिश कॅामनवेल्थमध्ये रहावे असा प्रस्ताव ठेवला होता. तो 15 देशांनी मान्य केला. त्यावेळी ब्रिटिश हा शब्द वगळून नुसते राष्ट्रकूल (कॅामनवेल्थ) म्हणणार असाल तर आम्ही त्यात राहू व या कॅामनवेल्थचे प्रमुखपद ब्रिटिश राणीकडे रहायला आमची हरकत असणार नाही, अशी भूमिका भारतासारख्या देशांनी घेतली होती. ती ब्रिटिश सरकारने ताबडतोब मान्य केली होती. या कॅामनवेल्थमध्ये आज लहानमोठी मिळून 53 राष्ट्रे आहेत. ब्रिटिश कॅामनवेल्थ मधील 15 राष्ट्रे या कॅामनवेल्थचीही सदस्य आहेत. कॅामनवेल्थमध्ये आशियातील 7 राष्ट्रे, आफ्रिकेतील 19 राष्ट्रे, अमेरिकेतील 13 राष्ट्रे, युरोपातील 3 राष्ट्रे, पॅसिफिक भागातील 11 राष्ट्रे आहेत. यापैकी रवांडा आणि मोझेंबिक हे देश बिटिश वसाहतीपैकी नाहीत पण तरीही त्यांनी कॅामनवेल्थची सदस्यता स्वीकारली आहे. या उलट एकेकाळी अमेरिकेत ब्रिटिश वसाहती होत्या पण आजची अमेरिका कॅामनवेल्थची सदस्य नाही. आजचा बार्बाडोस कॅामनवेल्थमध्ये आहे पण ब्रिटिश कॅामनवेल्थमध्ये मात्र नाही. आश्चर्याची बाब ही आहे की, हा निर्णय क्रिकेट पटू सर गॅरी सोबर्सला मात्र मान्य नाही. ब्रिटिशांनी बहाल केलेल्या ‘सर’कीचा तर हा परिणाम नसेल ना?
कृष्णवर्णियांमध्ये जागृती
अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडची हत्या एका पोलिसाने केली. त्याच्या मानेवर तो गोरा पोलीस गुढगा दाबून दाब देत होता. आपल्याला श्वास घेणेही शक्य होत नाही, असे जॉर्ज फ्लॉइड सांगत होता. पण व्यर्थ! शेवटी जॅार्ज फ्लॅाइड गुदमरून मेला. या हत्येमुळे जगातील सर्व कृष्णवर्णीयच नव्हे तर अन्यही खवळून उठले होते. अशा वातावरणात बार्बाडोसमधील बहुसंख्य कृष्णवर्णीयांनी गोऱ्यांच्या जगातील उरल्यासुरल्या सत्ताकेंद्रालाही संपविण्याचा निर्धार तर केला नसेल ना? गुलामगिरीचे जोखड झुगारून देण्याची प्रेरणा जॅार्ज फ्लॅाइडच्या हत्येमुळे जगभर निर्माण झालेल्या उद्रेकातून तर मिळाली नसेल ना? ब्रिजटाऊन या राजधानीच्या शहरात मध्यरात्री शेकडो लोक चेंबरलीन पुलावर प्रजासत्ताकाचा जयघोष करीत एकत्र आले. ‘प्राईड ॲंड इंडस्ट्री’, हे या नवीन प्रजासत्ताकाचे बोधवाक्य आहे. राष्ट्रनिष्ठेची, पूर्वजांविषयीच्या अभिमानाची ग्वाही देत प्रगतीपथावरच्या वाटचालीची खात्री ‘इन प्लेंटी ॲंड इन टाईम ॲाफ नीड’ या राष्ट्रगीतात प्रगट झाली आहे. ज्यांचा इतिहास केवळ अंधकारमय होता, ज्यांच्या वाट्याला प्रतिक्षणी गुलामगिरीमुळे केवळ यातनाच येत होत्या, ते बार्बेडियन यापुढे राष्ट्रनिष्ठेच्या स्फुलिंगासह प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. याची साक्ष या नवनिर्मित देशाच्या बोधवाक्यातून आणि राष्ट्रगीतातून व्यक्त होते आहे. ३० नोव्हेंबर हा बार्बाडोसचा स्वातंत्र्य दिनच यापुढे त्याचा प्रजासत्ताक दिन म्हणूनही साजरा होईल. जो स्वातंत्र्य दिन तोच प्रजासत्ताक दिन हे जगातले कदाचित एकमेव उदाहरण असावे.
बार्बाडोस जगाचे लघुरूप
90 % बार्बेडियन्स बाजान नावाच्या आफ्रिकन आणि कॅरेबियन या मिश्र जमातीतील असून उरलेले जगातील जवळजवळ सर्व देशातून येऊन इथे स्थायिक झालेले आहेत. अशाप्रकारे बार्बाडोस एकप्रकारे संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करते. जगातील बार्बेडियन लोक बार्बाडोसमध्ये परत येण्यास सुरवात झाली आहे. त्यांचे बार्बाडोसची लेकरे म्हणून स्वागत केले जात आहे. या निमित्ताने इस्रायलची आठवण झाल्यावाचून राहत नाही. इस्रायलची स्थापना होताच जगभरातील अनेक ज्यू आपल्या मायदेशी परत आले आहेत. लहान प्रमाणावर असेल पण हाच प्रकार बार्बाडोसच्या बाबतीतही घडतो आहे.
वांशिक दृष्ट्या विचार करायचा झाला तर 3 लक्ष लोकसंख्येपैकी काळे 91 % टक्के, गोरे 4 %, संमिश्र 3.5 %, भारतीय 1 % आणि उरलेले इतर आहेत. धार्मिक दृष्ट्या 75.6% ख्रिश्चन, 20.3 % कोणताही घर्म न मानणारे, 2.5% अन्य आणि 1.3 % माहिती उपलब्ध नसलेले आहेत. मिया मोटली या पंतप्रधान तर सॅंड्रा मॅसॅान अध्यक्षा आहेत. मिया मोटली या बार्बाडोस लेबर पार्टीच्या प्रमुख आहेत. त्यांनी 72.8% टक्के मतांच्या आधारे सर्वच्या सर्व म्हणजे 30 जागा प्रतिनिधी सभेत खेचून आणल्या आहेत. सर्व जागी एकच पक्ष निवडून आल्यामुळे बिशप ज्योसेफ ॲथर्ली यांनी स्वतंत्र सदस्य म्हणून भूमिका वठवण्याचे ठरविले आहे. अशाप्रकारे विरोधी पक्षाचा एक सदस्य हाच विरोधी पक्षनेता असणार आहे.
संड्रा मॅसॅान अध्यक्षा आणि मिया मोटली या पंतप्रधान ही महिलांची जोडगोळी एकाच वेळी बार्बाडोसमध्ये सत्तेवर येणे हा योगही जगाच्या इतिहासात बहुदा प्रथमच घडला असावा. बार्बाडोसच्या अध्यक्षा सॅंड्रा मॅसॅान यांनी प्रजासत्ताकाची स्थापना होत असतांना व्यक्त केलेले विचार नोंद घ्यावेत असे आहेत. ‘गरीब असू, पण आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार आहोत. आपणच आपल्या देशाला जपलं पाहिजे.’ बिटनच्या राणीने नवीन प्रजासत्ताकाला शुभेच्छा पाठविल्या आहेत. राणीचे पुत्र प्रिन्स चार्ल्स यांनी या प्रसंगी जातीने उपस्थित राहून, ‘ही एक नवीन सुरवात आहे’, अशा शब्दात प्रजासत्ताकाचे अभिनंदन केले आहे. मूळची बार्बाडोसची असलेली आजची अमेरिकन पॅापस्टार रिहाना यावेळी आवर्जून उपस्थित होती.
चिमुकल्या देशातील चिमुकली सभागृहे
बार्बाडोसच्या संसदेची दोन सभागृहे आहेत. हाऊस ॲाफ असेम्ब्ली हे कनिष्ठ सभागृह आहे. यातील 30 सदस्य हे आपल्या लोकसभेच्या सदस्यांप्रमाणे 30 मतदारसंघातून 5 वर्ष मुदतीसाठी निवडून येतील. स्पीकर 31 वा सदस्य असेल. दोन्ही बाजूंना समसमान मते पडल्यास त्याला निर्णायक मत (कास्टिंग व्होट) देण्याचा अधिकार असेल.
सिनेट किंवा वरिष्ठ सभागृहात 21 अराजकीय (नॅान पोलिटिकल) सदस्य असतील. यातील 7 सदस्यांची निवड अध्यक्ष आपल्या मर्जीनुसार करतील. 12 सदस्य पंतप्रधानाच्या सल्यानुसार निवडले जातील. उरलेले 2 सदस्य विरोधी पक्ष नेत्याच्या सल्यानुसार निवडले जातील. सिनेट हे कायम सभागृह नसेल. निवडणुकीचे वेळी दोन्ही सभागृहांचे विसर्जन होईल. सिनेट स्वत: ठराव पारित करू शकेल. तसेच कनिष्ठ सभागृहात पारित झालेल्या ठरावांचे पुनरावलोकन (रिव्ह्यू) करू शकेल. सिनेटला आर्थिक विधेयके पारित करण्याचा अधिकार मात्र नसेल.
सत्तारोहणप्रसंगी दिलदार प्रिन्स चार्ल्स उपस्थित
सत्तारोहणप्रसंगी प्रिन्स चार्ल्स हे मानवंदना देणाऱ्यात उभे राहून राणी एलिझाबेथ यांच्या पदावनतीचे साक्षीदार ठरले आहेत. यापुढे राणी एलिझाबेथ बार्बाडोसच्या सम्राज्ञी असणार नाहीत. कारण बार्बाडोस ब्रिटिश कॅामनवेल्थचा घटक असणार नाही. तो कॅामनवेल्थचा घटक मात्र असणार आहे. एकेकाळी चिमुकले इंग्लंड म्हणून जे बेट ओळखले जायचे ते आता बार्बाडोस या नावाचे स्वतंत्र प्रजासत्ताक झाले आहे. ब्रिटिश कॅामनवेल्थच्या इतर घटकांनाही यापासून प्रेरणा मिळेल आणि तेही ब्रिटिश कॅामनवेल्थमधून बाहेर पडून कॅामनवेल्थचेच सदस्य राहणे पसंत करतील, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. ब्रिटिश साम्राज्याच्या विलयानंतर आता ब्रिटिश कॅामनवेल्थच्या विलयाची प्रक्रिया या निमित्ताने सुरू झाली तर आश्चर्य वाटायला नको.
Monday, December 13, 2021
एक कथा न संपणारी
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हाईझर- एनएसए) भारताने आयोजित केलेल्या समपदस्थांच्या बैठकीत निषेध करीत अनुपस्थित राहिले आहेत. मोईद युसुफ यांचा निषेध यासाठी की, भारताची अफगाणिस्तानबाबतची भूमिका नकारात्मक आहे, म्हणे.
दिल्ली रीजनल सिक्युरिटी डायलॅाग ॲान अफगाणिस्तान या लांबलचक नावाने आयोजित ही बैठक नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यानंतर जे प्रश्न निर्माण झाले आहेत, ते अफगाणिस्तानपुरतेच मर्यादित नाहीत, तर या बदलाचा शेजारी देशांनाही उपद्रव होत असून तो दिवसेदिवस वाढत जाईल अशी शक्यता दिसायला लागल्यामुळे शेजारी आणि इतर संबंधित देशांच्या प्रतिनिधींची ही बैठक बोलविण्यात आली होती.
कांगावखोर पाकिस्तान आणि विस्तारवादी चीन अनुपस्थित
भारताने पुढाकार घेऊन बोलविलेल्या या बैठकीला पाकिस्तान, चीन, रशिया, इराण, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना पाचारण केले होते. पाकिस्तानने निषेध म्हणून या बैठकीला येण्याचे नाकारले आहे तर चीनने मात्र येण्याचे टाळले आहे. चीनने बैठकीची वेळ गैरसोयीची (शेड्युलिंग डिफिकल्टीज) असल्यामुळे बैठकीला येणे शक्य होणार नाही, असा सभ्य पवित्रा घेतला आहे. तसेच द्विपक्षीय चर्चेसाठी भारतासोबत चर्चा करण्यास आपण केव्हाही तयार आहोत, असा साळसूदपणाचा आवही आणला आहे.
पाकिस्तानने भारतालाच अफगाणिस्तानमधील समस्यांसाठी जबाबदार ठरविले आहे. ज्याने बिघाड घडवून आणला आहे तोच शांतिदूत कसा काय होऊ शकतो? असा प्रश्न पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी उपस्थित करीत नकार कळविला आहे.
युसुफ यांच्या मते अफगाणिस्तान समोरच्या अडचणी सर्वांना स्पष्ट दिसताहेत. यावर चर्चा ती काय करायची? भारताची भूमिका आणि भारतीय शासनाचे वर्तन पाहता या चर्चेतून शांतता प्रस्थापित होण्याचे दृष्टीने काही प्रगती होऊ शकेल, असे पाकिस्तानला वाटत नाही. सर्व जगानेही भारताला समज द्यायचे सोडून या मूळ मुद्याकडे डोळेझाक केली आहे, असे म्हणत पाकिस्तानने जगावरच ठपका ठेवला आहे.
पाकिस्तानची भूमिका अफगाणिस्तानच्या हिताची नाही, हेच त्या देशाच्या नकारामुळे स्पष्ट होते आहे, तसेच पाकिस्तान स्वत:ला अफगाणिस्तानचा संरक्षक देश मानतो आणि आपण त्या देशाचे पालक आहोत, या थाटात वावरतो आहे, हेही जगजाहीर होते आहे, असा टोला भारताने पाकिस्तानला लगावला आहे. खरे पाहता पाकिस्तानची भूमिका अफगाणिस्तानसाठी अहितकारक आणि नुकसान करणारी सिद्ध होणार आहे, हेही भारताने स्पष्ट केले आहे.
इतर देशांचा प्रतिसाद मात्र अतिशय समाधानकारक आहे. केवळ मध्यआशियातील देशांचीच नव्हे तर इराण व रशिया यांनीही बैठकीचे निमंत्रण सहर्ष स्वीकारले होते. या बैठकीचे एक वैशिष्ट्य असेही आहे की मध्य आशियातील देश प्रथमच अशाप्रकारच्या बैठकीत सहभागी होत आहेत. अफगाणिस्तानमध्ये शांतता नांदावी आणि त्या देशातील सर्व नागरिकांची सुरक्षा अबाधित रहावी, अशी भारताची मनापासूनची इच्छा आहे. या देशांचीही हीच इच्छा आहे, हे त्यांच्या बैठकीत सहभागी होण्याबाबतच्या उत्साहावरून दिसून येते.
अफगाणिस्तानबाबतचा कोणताही विचार भारताला वगळून करता येणार नाही, हे या बैठकीने सिद्ध होते आहे. या बैठकीचे स्थान आणि कुणाकुणाला बोलवायचे ते भारताने ठरविले आणि विषयसूचीही भारतानेच ठरविली, ही बाब भारताचे महत्त्व स्पष्ट करणारी आहे.
काबूल पडेपर्यंत भारताने तालिबान्यांशी अधिकृत रीतीने संपर्क साधला नव्हता. भारत काही मुद्यांवर ठाम आहे. दहशतवादी कारवायांसाठी कोणत्याही परिस्थितीत अफगाणिस्तानची भूमी उपलब्ध होऊ नये; तेथील प्रशासन सर्वसमावेशी असावे आणि तिसरे असे की, अल्पसंख्यांक, महिला आणि मुले यांचे अधिकार अबाधित असावेत. पण ही बाब आजतरी साध्य झालेली नाही. सध्या तालिबानींवर पाकिस्तानच्या आयएसआयचाच प्रभाव जाणवतो आहे. ही बाब अपेक्षा वाढविणारी खचितच नाही. तालिबानी मंत्रिमंडळ जाहीर होताच भारताने सर्व संबंधितांना स्पष्ट शब्दात याची जाणीव करून दिली होती. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने भारताचे वर्णन ‘बिब्बा घालणारा’ (स्पॅाईलर) म्हणून करीत बैठकीचे निमंत्रण का नाकारले असावे, हे यावरून लक्षात येते.
या अगोदर इराणमध्ये याच गटाच्या दोन बैठकी अनुक्रमे सप्टेंबर 2018 आणि डिसेंबर 2019 मध्ये पार पडल्या आहेत. तिसरी बैठक भारतामध्ये कोविड-19 च्या थैमानामुळे आता उशिराने झाली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला चीन आणि पाकिस्तान वगळता बाकीच्या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उपस्थित होते, यावरून या प्रश्नाचे गांभीर्य या सर्व देशांना जाणवले आहे, हे लक्षात येते. अफगाणिस्तानमधील परिस्थितीने गंभीर रूप धारण केले असून याबाबत कृतीपर पावले उचलून परिणामकारक उपाययोजना केली पाहिजे, हे या देशांना जाणवले आहे.
अफगाणिस्तानमधील विदारक स्थिती
बैठकींचा हा सिलसिला सुरू असतांनाच अफगाणिस्तानमध्ये किती विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे, याचे चक्षुर्वै सत्यम आलेखन अनेक अमेरिकन शोधपत्रकारांनी कसे केले आहे, तेही विचारात घेण्याची आवश्यकता आहे. अफगाणिस्तानमध्ये दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचे भाव तर कडाडले आहेतच पण यांच्या जोडीला पलायनासाठीचा खर्चही गगनाला भिडला आहे. अफगाणिस्तानमधून बाहेर पडू इच्छिणाऱ्या सर्व अमेरिकनांना बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यात आली असून आता जेमतेम 100 अमेरिकनच अफगाणिस्तानमध्ये अडकून आहेत असे अमेरिकेचे सेक्रेटरी ॲाफ स्टेट ॲंटोनी ब्लिंकेन यांनी जाहीर केले आहे.
साथ देणाऱ्यांना लांडग्यांसमोर टाकून येणार नाही
पण काही अमेरिकनांनी अफगाणिस्तानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर इतर काहींनी असा निर्णय घेतला आहे की, इतके दिवस त्यांना साथ देणाऱ्या अफगाण नागरिकांनाही त्यांच्यासह बाहेर पडता येणार असेल तरच ते बाहेर पडू इच्छितात. त्यांची भूमिका अशी आहे की, असंख्य अफगाण लोकांनी गेली 20 वर्षे त्यांना साथ दिली आहे. अशांना वाऱ्यावर सोडून यायचे म्हणजे त्यांना लांडग्यांसमोर टाकून येण्यासारखेच आहे. त्यांच्यातला एकही जिवंत राहण्याची शक्यता नाही. हालहाल करून त्यांना ठार केले जाईल. अमेरिकेने ठरवलेच तर या लोकांसाठी व्यवस्था करणे तिला अशक्य नाही. कारण आजही काही पत्ते अमेरिकेने आपल्या हाती राखून ठेवले आहेत. पण त्यांचा आधार घेऊन बाहेर काढण्यास बराच वेळ लागू शकतो, हेही स्पष्ट आहे.
तसेच ज्या अफगाणींनी प्रस्थापित घनी प्रशासनाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे साह्य केले होते, त्यांच्यावरही तालिबान्यांची वक्रदृष्टी असणार आहे. सुटकेसाठी त्यांना आता फक्त खाजगी ॲापरेटर्सचाच आधार आहे. त्यामुळे खाजगी ॲापरेटर्सची मात्र चंगळ सुरू झाली असून ते मनाला येईल ते भाडे आकारित आहेत. दर माणशी 10 हजार डॅालर्स हा भाव आहे, म्हणे. शिवाय पायी, मोटार किंवा विमान मार्गे ते फक्त कोणत्या ना कोणत्या देशात सीमा पार करून प्रवेश मिळवून देणार. पण त्यातही यशाची हमी नाहीच.
सुटकेसाठी वारेमाप मागणी
एका अमेरिकन वृत्तसंस्थेने अशाच एका सुटका मोहिमेची हकीकत जाहीर केली आहे ती काहीशी अशी आहे. कुटुंबप्रमुख डॅाक्टर होता. त्याला तालिबान्यांनी एका बंदिवानाचे हात आणि पाय, शिक्षा म्हणून छाटून टाकण्यास फर्मावले. डॅाक्टरने नकार देताच तालिबान्यांनी त्याला येथेच्च बडवून अर्धमेला केले. डॅाक्टरची बायको महिला हक्क समितीची कार्यकर्ती होती. ती अमेरिकन गटांसोबत कार्य करीत असे. या दाम्पत्याचा मुलगा अमेरिकेत कॅलिफोर्नियात राहतो. त्याने फेसबुकच्याआधारे आपल्या आईवडलांचा आणि त्यांची सुटका करून देऊ म्हणणाऱ्या गटाचा शोध घेतला. प्रतिव्यक्ती 10 हजार डॅालर हा दर ठरला. यात वाढही होऊ शकते, असेही त्याला बजावण्यात आले. याशिवाय यशाची हमी नाही, ते वेगळेच. हा सौदा अजून पूर्ण झालेला नाही.
दुसरी कथा अशी की, आईवडील आणि तीन मुलांचे कुटुंब काबूल मध्ये सतत जागा बदलत दडून बसले आहे. कर्ता पुरुष अमेरिकेला सहकार्य करणारा स्थानिक कंत्राटदार आहे. त्याला कळले की, सध्या चारपैकी फक्त काबूलचेच आंतरराष्ट्रीय विमानतळ परदेशी जाण्यासाठी उपलब्ध आहे. 50 हजार डॅालर द्याल तर विमानात जागा मिळवून देऊ, असा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवण्यात आला आहे. हे शक्य नसल्यामुळे त्याने स्पेशल व्हिसासाठी रीतसर अर्ज केला पण अमेरिकन वकिलातीकडून त्याला उत्तरच मिळालेले नाही. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटचे म्हणणे असे आहे की, स्पेशल व्हिसासाठी अर्ज करणारे हजारो आहेत. यातले खरे कोणते आणि तोतये कोणते हे कसे कळावे? यासाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क आवश्यक आहे. पण सध्या अफगाणिस्तानमध्ये स्थिती अशी आहे की, हे जवळजवळ अशक्यच आहे. तरीही अर्ज करणाऱ्यांच्या सुरक्षेला बाधा पोचणार नाही आणि माहितीही मिळवता येईल, यासाठी आम्ही मार्ग शोधतो आहोत,
अनेक तोतये गरजूंना अक्षरश: लुबाडताहेत. याला बळी पडणाऱ्यांचे पैसे जातात आणि हा प्रकार उघडकीला आला तर तालिबानी त्यांना हातपाय तोडण्यापासून ते जीव घेण्यापर्यंतच्या शिक्षा फर्मावतात. अशी आहे ही न संपणारी कथा! प्रत्येक कथेला शेवट असतोच असे नाही. निदान या कथेच्या बाबतीत तरी तसे वाटावे, अशी स्थिती आजतरी आहे.अमेरिकन वकिलातीकडे स्पेशल व्हिसासाठी आजवर आलेल्या अर्जांचे वजन निदान एक टन तरी असेल, असे म्हटले जाते. ही अतिशयोक्ती मानली तरी या समस्येचे स्वरुप अति गंभीर आहे, हे हा आकडा दर्शवतो हे मात्र नक्की.
Monday, December 6, 2021
बेलारुसने शोधले एक नवीन अस्त्र
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
मानवाने आजवर अनेक आश्चर्यकाक आणि भयंकर शस्त्रे शोधून काढली आहेत. पण बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी या सर्वांवर कडी करणारी शक्कल लढविली आहे. ज्या बेलारुसचे नाव क्वचितच माध्यमांमध्ये आजवर झळकले असेल, त्याने आज प्रत्येक माध्यमाचे लक्ष वेधून घेतले आहे. बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको हे या (अप)श्रेयाचे धनी आहेत.
बेलारुस देश पूर्व युरोपात असून त्याला पूर्व व ईशान्येकडून रशिया, दक्षिणेकडून युक्रेन, पश्चिमेकडून पोलंड आणि लिथुॲनिया, वायव्येकडून लॅटव्हिया अशा एकूण 5 देशांनी वेढले आहे. मिन्स्क हे शहर राजधानी असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ 2 लक्ष चौरस किलोमीटरपेक्षा थोडेसे जास्त तर लोकसंख्या एक कोटीपेक्षा थोडी कमी आहे. हा देश बटाट्याच्या उत्पादनासाठी आणि ट्रॅक्टरच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीने बेलारुसवर ताबा मिळविला होता. पुढे रशियाने तो जर्मनीकडून परत जिंकून घेतला. 25 ॲागस्ट 1991 पासून बेलारुस स्वतंत्र देश म्हणून वावरू लागला.
पहिल्या लीडची बातमी
आज मात्र अनेक पाश्चात्य वृत्तपत्रात या अज्ञात देशासंबंधीच्या आणि त्या देशाच्या अध्यक्षाच्या काळ्या कारवायांसंबंधातल्या बातम्या पहिल्या क्रमांकाच्या म्हणजेच फर्स्ट लीडच्या बातम्या म्हणून अध्यक्षांच्या छायाचित्रासह येत आहेत. बेलारुस आणि पोलंड यांच्यामधील सीमा अक्षरश:पेटली आहे. पोलिश पोलिसांनी अश्रूधूर आणि पाण्याचे फवारे मारून सीमारक्षकांवर दगडफेक करणाऱ्यांना पिटाळून लावण्यास सुरवात केली आहे. ॲागस्ट महिन्यातच बेलारुसची सीमा ओलांडून पोलंडमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना पोलिश पोलिसांनी परत बेलारुसमध्ये जाण्यास भाग पाडले. पोलंड हा युरोपीयन युनियनचा घटक असल्यामुळे हे युरोपीयन युनीयनवरील आक्रमणही ठरले आहे. युरोपीयन युनीयनने युनीयनचा सदस्य नसलेल्या बेलारुसवर शिक्षा म्हणून नव्याने निर्बंध लादले आहेत.
निर्वासितांची भूमिका
‘काय वाटेल ते झाले तरी आम्ही इराकला परत जाणार नाही, तिथे आम्ही ज्या वेदना सहन केल्या आहेत आणि जो नरकवास भोगला आहे त्याला आम्ही जन्मभर विसरू शकणार नाही’, असा या घुसखोरी करू पाहणाऱ्या इराकी कुर्द जमातीच्या निर्वासितांचा निर्धार आहे. यांच्या जोडीला सीरिया आणि अफघाणिस्तानमधून आलेले निर्वासितही आहेत. निर्वासित आहेत म्हणून काय झाले? बिनापरवाना पोलंडमध्ये घुसतात आणि पोलिश पोलिसांनी थोपवले तर दगडफेक करतात. मग आम्ही हे कसे खपवून घेऊ? पोलंडच्या मते हे तर सरळसरळ आक्रमण आहे.
एनजीओजची भूमिका
अशावेळी एनजीओजची दयाबुद्धी जागी होते. हा मुद्दा मानवतेशी संबंधित आहे. पोलंडने बळाचा वापर थांबवावा, असे त्यांना वाटते. फारतर कायदेशीर कारवाई करा. पोलिश पोलिसांची भूमिका केवळ बेकायदेशीरच नाही तर ती मानवतेला काळीमा फासणारी आहे. प्रत्यक्षात मात्र एकाही निर्वासिताला दुखापत झाल्याचे दिसत नाही. एकदोन पोलिश पोलिस मात्र जखमी झालेले आढळले.
नो मॅन्स लॅंडमध्ये अडकले निर्वासित
बेकायदेशीर रीतीने पोलंडमध्ये शिरू इच्छिणाऱ्या निर्वासितांची संख्या सीमेवर वाढत चालली असून त्यांचा पोलंडमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न सुरू असतांना आम्ही काहीही विरोध करू नये, अशी अपेक्षा अवाजवी आहे, असे पोलंडचे म्हणणे आहे. पोलंड युरोपीयन युनीयनचा सदस्य आहे. त्यामुळे युरोपीयन युनीयनने पोलंडची कड घेतली आहे.
दोन देशांमधली सीमा ही काही कागदावरच्या रेषेसारखी नसते. दोन देशांमध्ये जमिनीचा एक पट्टा मोकळा सोडलेला असतो. त्याला ‘नो मॅन्स लॅंड’, असे म्हणतात. याची रुंदी किती असावी, याचे निश्चित माप नाही. ते संबंधित देशांनी चर्चा करून ठरविलेले असते. या पट्ट्यात प्रवेश करणे दोन्ही देशांसाठी निषिद्ध असते. प्रवेश करायचाच झाला तर दुसऱ्या देशाला पूर्वसूचना देऊन जावे, हा आंतरराष्ट्रीय शिरस्ता आहे. असा कायदा मात्र नाही/नसतो. इराकमधील कुर्द निर्वासित हे बेलारुसमधून या पट्ट्यात ठिय्या देऊन बसले आहेत. सीमेवर तारेचे कुंपण असल्यामुळे ती बेलारूलने पुरविलेल्या कटरने कापून ओलांडणे हा काही अवघड प्रश्न नव्हता. आता मात्र पोलंडने आपल्या बाजूचे कुंपण अधिक पक्के करायला सुरवात केली आहे. असे असले तरी जे व्हायचे ते अगोदरच होऊन गेले आहे.
आता या नो मॅन्स लॅंडमध्ये हजारो निर्वासित गेले काही आठवडे अडकून पडले आहेत. त्यांची अवस्था त्रिशंकूसारखी झाली आहे. ना मागे फिरता येतं, न पुढे सरकता येतं. जबरदस्तीने घुसू पाहणाऱ्यांना परत मूळ जागी ढकलणे कायदेशीर ठरवणारा कायदा पोलंडने पारित केला आहे तर हे कृत्य आंतरराष्ट्रीय कायद्यांशी सुसंगत नाही, असा आक्षेप इतरांनी घेतला आहे. पोलंडने या भागापुरती आणीबाणी जाहीर केली असून एनजीओजसह माध्यमांना वृत्तसंकलन करण्यासाठी प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. आंतरराष्ट्रीय घटकांनी बेलारुसवर ठपका ठेवीत या पेचप्रसंगासाठी जबाबदार धरले आहे.
बेलारुसचा बेत
बेलारुसने सुरवातीला मध्यपूर्व आणि आफ्रिकेतून येणाऱ्या हजारो निर्वासितांना बोलवून बोलवून आपल्या देशात प्रवेश दिला, युरोपमध्ये प्रवेश मिळवू देऊ असे आश्वासन दिले आणि आता त्यांना सीमेवर पाठवून सीमेपलीकडच्या पोलंड देशात जाण्यास प्रोत्साहित केले आहे. पोलंडचे म्हणणे असे की, बेलारुसचे हे कृत्य आमच्यावर सूड घेण्यासारखेच आहे. असे असले तरी आम्ही पोलंडमधून या लोकांना अन्न, पाणी आणि स्लिपिंग बॅग्जचा पुरवठा करीत आहोत.
याला पोलंड सूडाचा प्रकार म्हणतो याचे कारण असे की, गेल्यावर्षी बेलारुसचे दीर्घकाळ अध्यक्ष असलेल्या अलेक्झॅंडर लुकाशेंको यांच्या विरुद्ध जी निदर्शने झाली होती, त्यांना पोलंडने पाठिंबा दिला होता. सहाजीकच जागतिक राजकारणातील विरुद्ध बाजूचा एक प्रमुख भिडू रशिया याने अलेक्झॅंडर लुकाशेंको यांना पाठिंबा देऊन युरोपीयन युनीयनची बंधने प्रभावहीन करण्यासाठी कोट्यवधी रुबल्सचे कर्ज दिले.
बेलारुसने केला मानवास्त्राचा प्रयोग
इराक आणि मध्यपूर्वेतील कुर्द जमातीच्या निर्वासितांना पोलंडच्या सीमेवर गोळा करून बेलारुसने पोलंडविरुद्ध एकप्रकारे युद्धच पुकारले आहे, असे म्हणता येईल. या युद्धात मानवांचाच उपयोग बेलारुसने शस्त्र म्हणून केला आहे. या शस्त्राला ‘पॅाप्युलेशन बॅाम्ब’ असे म्हटले जाते. या युद्धात दुसऱ्या देशात हजारो माणसेच घुसवली जातात. रशिया, युक्रेन, पोलंड, लिथुॲनिया आणि लॅटव्हिया यांच्या सीमेजवळ नो मॅन्स लॅंडमध्ये बेलारुसने निर्वासितांना आणून ठेवले आणि सीमा ओलांडा असा कानमंत्र दिला. हे देश या निर्वासितांना स्वीकारण्यास अर्थातच तयार नाहीत. सध्या पोलंडच्याच सीमेवरचा प्रश्न निकराला आला असला तरी अन्य ठिकाणीही चिंचोळ्या नो मॅन्स लॅंडमध्ये कोंबलेल्या या निर्वासितांची शोकांतिका हृदय पिळवटून टाकणारी आहे. मायदेशात हाल होतात म्हणून परागंदा झालेल्या या कुर्द निर्वासितांची स्थिती आगीतून फुपाट्यात आल्यासारखी झाली आहे. वैर, द्वेश, युद्ध यांच्या साह्याने आजवर समस्या सुटल्याचे दाखले खूपच कमी आहेत. याउलट यामुळे अगोदरच्या प्रश्नांच्या सोबतीला नवीन प्रश्न मात्र निर्माण होत जातात, असाच आजवरचा अनुभव आहे. या युद्ध प्रकाराला कुणी ‘संमिश्र युद्ध’ म्हणताहेत तर कुणी हायब्रिड युद्ध म्हणताहेत. हे बाळ तसे नुकतेच जन्माला आले असल्यामुळे बारसे झाल्यानंतरच या बाळाचे नक्की नाव ठरेल.
शेकोट्यांना न जुमानणारी कडाक्याची थंडी, खाण्यापिण्याचे आणि निवाऱ्याचे प्रश्न यामुळे बेलारुसने बेहाल केलेल्या निर्वासितांची बाजू घेत दबाव आणण्यासाठी संबंधित देशांसोबत, बेलारुसला सीमा लागून नसलेला जर्मनीही पोलंड आणि इतरांच्या बाजूने उभा राहिला आणि या सर्वांनी बेलारुसला बदडण्याची तंबी दिली तेव्हा कुठे बेलारुसने बऱ्याच निर्वासितांत आत आपल्या देशात परत घेतले आहे. पण बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको पोलंडवर इतके नारज का झाले आहेत? याचे कारण असे की, पोलंडने त्यांच्या विरुद्ध बंड करणाऱ्यांना चिथावणी दिली. म्हणून पोलंडला अद्दल घडविण्यासाठी लुकाशिंको यांनी हे अभिनव ‘मानवास्त्र’ योजले. हा डावपेच आखतांना ज्यांचा आपण शस्त्र म्हणून वापर करीत आहोत, तेही आपल्या सारखेच हाडामासाचे जीव आहेत, हे मात्र ते विसरले.
होय, मी तानाशहाच आहे.
बेलारुस युरोपीय युनीयनचा घटक तर नाहीच शिवाय त्याच्यावर अन्य काही कारणास्तवही युरोपीयन युनीयनने बंधने घातली आहेत. बेलारुसच्या अध्यक्षांना-अलेक्झांडर लुकाशेन्को यांना- स्वदेशात आणि बाहेरही सर्व लोक तानाशहा म्हणूनच संबोधतात. याची त्यांना मुळीही खंत वाटत नाही. ते स्वत:ही आपला उल्लेख तानाशहा असाच करतात. विरोधकांनी हासडलेली शिवी ते बिरुद म्हणून आणि मानून मिरवतात. बेलारुसमध्ये नावालाच लोकशाही राष्ट्र आहे. तिथे ठरल्याप्रमाणे निवडणुकाही उरकल्या जातात. पण त्या कधीही निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात झालेल्या नाहीत. ॲागस्ट 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत गडबडघोटाळा करीत 80% मते मिळवून ते जिंकले आहेत. या खोटेपणाच्या विरोधात जनता पेटून उठली. देशभर निदर्शने झाली, ती चिरडून टाकतांना अनेकांना प्राणास मुकावे लागले. जनतेने इतर देशांकडे मदतीसाठी आवाहन केले. त्याला नाटो (नॅार्थ अटलांटिक ट्रिटी ॲार्गनायझेशनन), युरोपीयन युनीयन आणि अमेरिकेने साथ दिली आणि बेलारुसवर निर्बंध घातले. अशाप्रसंगी रशियाने बेलारुसच्या अध्यक्षांची पाठराखण केली नसती तरच नवल होते. निर्बंध हटवण्यासाठी परंपरागत शस्त्रे आणि युद्धप्रकार यशदायी ठरणार नाहीत हे जाणून बेलारुसच्या अध्यक्षांच्या सुपीक मेंदूतून या मानवास्त्राचा जन्म झाला असे मानले जाते आहे.
Subscribe to:
Posts (Atom)