Monday, December 6, 2021

बेलारुसने शोधले एक नवीन अस्त्र वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? मानवाने आजवर अनेक आश्चर्यकाक आणि भयंकर शस्त्रे शोधून काढली आहेत. पण बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी या सर्वांवर कडी करणारी शक्कल लढविली आहे. ज्या बेलारुसचे नाव क्वचितच माध्यमांमध्ये आजवर झळकले असेल, त्याने आज प्रत्येक माध्यमाचे लक्ष वेधून घेतले आहे. बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको हे या (अप)श्रेयाचे धनी आहेत. बेलारुस देश पूर्व युरोपात असून त्याला पूर्व व ईशान्येकडून रशिया, दक्षिणेकडून युक्रेन, पश्चिमेकडून पोलंड आणि लिथुॲनिया, वायव्येकडून लॅटव्हिया अशा एकूण 5 देशांनी वेढले आहे. मिन्स्क हे शहर राजधानी असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ 2 लक्ष चौरस किलोमीटरपेक्षा थोडेसे जास्त तर लोकसंख्या एक कोटीपेक्षा थोडी कमी आहे. हा देश बटाट्याच्या उत्पादनासाठी आणि ट्रॅक्टरच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीने बेलारुसवर ताबा मिळविला होता. पुढे रशियाने तो जर्मनीकडून परत जिंकून घेतला. 25 ॲागस्ट 1991 पासून बेलारुस स्वतंत्र देश म्हणून वावरू लागला. पहिल्या लीडची बातमी आज मात्र अनेक पाश्चात्य वृत्तपत्रात या अज्ञात देशासंबंधीच्या आणि त्या देशाच्या अध्यक्षाच्या काळ्या कारवायांसंबंधातल्या बातम्या पहिल्या क्रमांकाच्या म्हणजेच फर्स्ट लीडच्या बातम्या म्हणून अध्यक्षांच्या छायाचित्रासह येत आहेत. बेलारुस आणि पोलंड यांच्यामधील सीमा अक्षरश:पेटली आहे. पोलिश पोलिसांनी अश्रूधूर आणि पाण्याचे फवारे मारून सीमारक्षकांवर दगडफेक करणाऱ्यांना पिटाळून लावण्यास सुरवात केली आहे. ॲागस्ट महिन्यातच बेलारुसची सीमा ओलांडून पोलंडमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना पोलिश पोलिसांनी परत बेलारुसमध्ये जाण्यास भाग पाडले. पोलंड हा युरोपीयन युनियनचा घटक असल्यामुळे हे युरोपीयन युनीयनवरील आक्रमणही ठरले आहे. युरोपीयन युनीयनने युनीयनचा सदस्य नसलेल्या बेलारुसवर शिक्षा म्हणून नव्याने निर्बंध लादले आहेत. निर्वासितांची भूमिका ‘काय वाटेल ते झाले तरी आम्ही इराकला परत जाणार नाही, तिथे आम्ही ज्या वेदना सहन केल्या आहेत आणि जो नरकवास भोगला आहे त्याला आम्ही जन्मभर विसरू शकणार नाही’, असा या घुसखोरी करू पाहणाऱ्या इराकी कुर्द जमातीच्या निर्वासितांचा निर्धार आहे. यांच्या जोडीला सीरिया आणि अफघाणिस्तानमधून आलेले निर्वासितही आहेत. निर्वासित आहेत म्हणून काय झाले? बिनापरवाना पोलंडमध्ये घुसतात आणि पोलिश पोलिसांनी थोपवले तर दगडफेक करतात. मग आम्ही हे कसे खपवून घेऊ? पोलंडच्या मते हे तर सरळसरळ आक्रमण आहे. एनजीओजची भूमिका अशावेळी एनजीओजची दयाबुद्धी जागी होते. हा मुद्दा मानवतेशी संबंधित आहे. पोलंडने बळाचा वापर थांबवावा, असे त्यांना वाटते. फारतर कायदेशीर कारवाई करा. पोलिश पोलिसांची भूमिका केवळ बेकायदेशीरच नाही तर ती मानवतेला काळीमा फासणारी आहे. प्रत्यक्षात मात्र एकाही निर्वासिताला दुखापत झाल्याचे दिसत नाही. एकदोन पोलिश पोलिस मात्र जखमी झालेले आढळले. नो मॅन्स लॅंडमध्ये अडकले निर्वासित बेकायदेशीर रीतीने पोलंडमध्ये शिरू इच्छिणाऱ्या निर्वासितांची संख्या सीमेवर वाढत चालली असून त्यांचा पोलंडमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न सुरू असतांना आम्ही काहीही विरोध करू नये, अशी अपेक्षा अवाजवी आहे, असे पोलंडचे म्हणणे आहे. पोलंड युरोपीयन युनीयनचा सदस्य आहे. त्यामुळे युरोपीयन युनीयनने पोलंडची कड घेतली आहे. दोन देशांमधली सीमा ही काही कागदावरच्या रेषेसारखी नसते. दोन देशांमध्ये जमिनीचा एक पट्टा मोकळा सोडलेला असतो. त्याला ‘नो मॅन्स लॅंड’, असे म्हणतात. याची रुंदी किती असावी, याचे निश्चित माप नाही. ते संबंधित देशांनी चर्चा करून ठरविलेले असते. या पट्ट्यात प्रवेश करणे दोन्ही देशांसाठी निषिद्ध असते. प्रवेश करायचाच झाला तर दुसऱ्या देशाला पूर्वसूचना देऊन जावे, हा आंतरराष्ट्रीय शिरस्ता आहे. असा कायदा मात्र नाही/नसतो. इराकमधील कुर्द निर्वासित हे बेलारुसमधून या पट्ट्यात ठिय्या देऊन बसले आहेत. सीमेवर तारेचे कुंपण असल्यामुळे ती बेलारूलने पुरविलेल्या कटरने कापून ओलांडणे हा काही अवघड प्रश्न नव्हता. आता मात्र पोलंडने आपल्या बाजूचे कुंपण अधिक पक्के करायला सुरवात केली आहे. असे असले तरी जे व्हायचे ते अगोदरच होऊन गेले आहे. आता या नो मॅन्स लॅंडमध्ये हजारो निर्वासित गेले काही आठवडे अडकून पडले आहेत. त्यांची अवस्था त्रिशंकूसारखी झाली आहे. ना मागे फिरता येतं, न पुढे सरकता येतं. जबरदस्तीने घुसू पाहणाऱ्यांना परत मूळ जागी ढकलणे कायदेशीर ठरवणारा कायदा पोलंडने पारित केला आहे तर हे कृत्य आंतरराष्ट्रीय कायद्यांशी सुसंगत नाही, असा आक्षेप इतरांनी घेतला आहे. पोलंडने या भागापुरती आणीबाणी जाहीर केली असून एनजीओजसह माध्यमांना वृत्तसंकलन करण्यासाठी प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. आंतरराष्ट्रीय घटकांनी बेलारुसवर ठपका ठेवीत या पेचप्रसंगासाठी जबाबदार धरले आहे. बेलारुसचा बेत बेलारुसने सुरवातीला मध्यपूर्व आणि आफ्रिकेतून येणाऱ्या हजारो निर्वासितांना बोलवून बोलवून आपल्या देशात प्रवेश दिला, युरोपमध्ये प्रवेश मिळवू देऊ असे आश्वासन दिले आणि आता त्यांना सीमेवर पाठवून सीमेपलीकडच्या पोलंड देशात जाण्यास प्रोत्साहित केले आहे. पोलंडचे म्हणणे असे की, बेलारुसचे हे कृत्य आमच्यावर सूड घेण्यासारखेच आहे. असे असले तरी आम्ही पोलंडमधून या लोकांना अन्न, पाणी आणि स्लिपिंग बॅग्जचा पुरवठा करीत आहोत. याला पोलंड सूडाचा प्रकार म्हणतो याचे कारण असे की, गेल्यावर्षी बेलारुसचे दीर्घकाळ अध्यक्ष असलेल्या अलेक्झॅंडर लुकाशेंको यांच्या विरुद्ध जी निदर्शने झाली होती, त्यांना पोलंडने पाठिंबा दिला होता. सहाजीकच जागतिक राजकारणातील विरुद्ध बाजूचा एक प्रमुख भिडू रशिया याने अलेक्झॅंडर लुकाशेंको यांना पाठिंबा देऊन युरोपीयन युनीयनची बंधने प्रभावहीन करण्यासाठी कोट्यवधी रुबल्सचे कर्ज दिले. बेलारुसने केला मानवास्त्राचा प्रयोग इराक आणि मध्यपूर्वेतील कुर्द जमातीच्या निर्वासितांना पोलंडच्या सीमेवर गोळा करून बेलारुसने पोलंडविरुद्ध एकप्रकारे युद्धच पुकारले आहे, असे म्हणता येईल. या युद्धात मानवांचाच उपयोग बेलारुसने शस्त्र म्हणून केला आहे. या शस्त्राला ‘पॅाप्युलेशन बॅाम्ब’ असे म्हटले जाते. या युद्धात दुसऱ्या देशात हजारो माणसेच घुसवली जातात. रशिया, युक्रेन, पोलंड, लिथुॲनिया आणि लॅटव्हिया यांच्या सीमेजवळ नो मॅन्स लॅंडमध्ये बेलारुसने निर्वासितांना आणून ठेवले आणि सीमा ओलांडा असा कानमंत्र दिला. हे देश या निर्वासितांना स्वीकारण्यास अर्थातच तयार नाहीत. सध्या पोलंडच्याच सीमेवरचा प्रश्न निकराला आला असला तरी अन्य ठिकाणीही चिंचोळ्या नो मॅन्स लॅंडमध्ये कोंबलेल्या या निर्वासितांची शोकांतिका हृदय पिळवटून टाकणारी आहे. मायदेशात हाल होतात म्हणून परागंदा झालेल्या या कुर्द निर्वासितांची स्थिती आगीतून फुपाट्यात आल्यासारखी झाली आहे. वैर, द्वेश, युद्ध यांच्या साह्याने आजवर समस्या सुटल्याचे दाखले खूपच कमी आहेत. याउलट यामुळे अगोदरच्या प्रश्नांच्या सोबतीला नवीन प्रश्न मात्र निर्माण होत जातात, असाच आजवरचा अनुभव आहे. या युद्ध प्रकाराला कुणी ‘संमिश्र युद्ध’ म्हणताहेत तर कुणी हायब्रिड युद्ध म्हणताहेत. हे बाळ तसे नुकतेच जन्माला आले असल्यामुळे बारसे झाल्यानंतरच या बाळाचे नक्की नाव ठरेल. शेकोट्यांना न जुमानणारी कडाक्याची थंडी, खाण्यापिण्याचे आणि निवाऱ्याचे प्रश्न यामुळे बेलारुसने बेहाल केलेल्या निर्वासितांची बाजू घेत दबाव आणण्यासाठी संबंधित देशांसोबत, बेलारुसला सीमा लागून नसलेला जर्मनीही पोलंड आणि इतरांच्या बाजूने उभा राहिला आणि या सर्वांनी बेलारुसला बदडण्याची तंबी दिली तेव्हा कुठे बेलारुसने बऱ्याच निर्वासितांत आत आपल्या देशात परत घेतले आहे. पण बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको पोलंडवर इतके नारज का झाले आहेत? याचे कारण असे की, पोलंडने त्यांच्या विरुद्ध बंड करणाऱ्यांना चिथावणी दिली. म्हणून पोलंडला अद्दल घडविण्यासाठी लुकाशिंको यांनी हे अभिनव ‘मानवास्त्र’ योजले. हा डावपेच आखतांना ज्यांचा आपण शस्त्र म्हणून वापर करीत आहोत, तेही आपल्या सारखेच हाडामासाचे जीव आहेत, हे मात्र ते विसरले. होय, मी तानाशहाच आहे. बेलारुस युरोपीय युनीयनचा घटक तर नाहीच शिवाय त्याच्यावर अन्य काही कारणास्तवही युरोपीयन युनीयनने बंधने घातली आहेत. बेलारुसच्या अध्यक्षांना-अलेक्झांडर लुकाशेन्को यांना- स्वदेशात आणि बाहेरही सर्व लोक तानाशहा म्हणूनच संबोधतात. याची त्यांना मुळीही खंत वाटत नाही. ते स्वत:ही आपला उल्लेख तानाशहा असाच करतात. विरोधकांनी हासडलेली शिवी ते बिरुद म्हणून आणि मानून मिरवतात. बेलारुसमध्ये नावालाच लोकशाही राष्ट्र आहे. तिथे ठरल्याप्रमाणे निवडणुकाही उरकल्या जातात. पण त्या कधीही निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात झालेल्या नाहीत. ॲागस्ट 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत गडबडघोटाळा करीत 80% मते मिळवून ते जिंकले आहेत. या खोटेपणाच्या विरोधात जनता पेटून उठली. देशभर निदर्शने झाली, ती चिरडून टाकतांना अनेकांना प्राणास मुकावे लागले. जनतेने इतर देशांकडे मदतीसाठी आवाहन केले. त्याला नाटो (नॅार्थ अटलांटिक ट्रिटी ॲार्गनायझेशनन), युरोपीयन युनीयन आणि अमेरिकेने साथ दिली आणि बेलारुसवर निर्बंध घातले. अशाप्रसंगी रशियाने बेलारुसच्या अध्यक्षांची पाठराखण केली नसती तरच नवल होते. निर्बंध हटवण्यासाठी परंपरागत शस्त्रे आणि युद्धप्रकार यशदायी ठरणार नाहीत हे जाणून बेलारुसच्या अध्यक्षांच्या सुपीक मेंदूतून या मानवास्त्राचा जन्म झाला असे मानले जाते आहे.

No comments:

Post a Comment