Monday, December 27, 2021

काळाच्या कसोटीवर उतरलेली मैत्री वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड. एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? भारत आणि रशिया यांच्यातील 21 वी शिखर परिषद दिल्लीला नुकतीच पार पडली. यावेळी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्वस्पर्शी प्रश्नांवर चर्चा झाली. बैठकीत तालिबानी ताब्यानंतर दहशतवादी गटांकडून होणारे मानवीहक्कहनन तसेच अल्पसंख्यांक, मुले आणि स्त्रिया यांच्या दशेविषयी तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. इतरही अनेक विषयांवर चर्चा झाली, करार झाले. या परिषदेचे वर्णन मोदींनी एकमेवाद्वितीय या शब्दात केले तर पुतिन यांनी भारताचे वर्णन एक महान शक्ती आणि काळाच्या कसोटीवर उतरलेला मित्र (टाईम टेस्टेड फ्रेंड) या शब्दात केले. दोन राष्ट्रप्रमुखांच्या या शिखर परिषदेसोबत भारताचे आणि रशियाचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री यांच्यात प्रथमच वाटाघाटी झाल्या आहेत. यांना 2+2 मीटिंग म्हणतात. अशा प्रकारच्या वाटाघाटी आणि त्यातून निष्पन्न होणाऱ्या फलितांचे महत्त्व काही वेगळेच असते. यानंतर पुन्हा मोदी आणि पुतिन यात मुख्यत: संरक्षण, कोविड-19, खत पुरवठा यासारख्या प्रश्नी फोनवर चर्चा झाली आहे. भेटीचे प्रयोजन अफगाणिस्तान आणि चीन यांनी दिलेली आव्हाने भारतासाठी जशी आणि जेवढी महत्त्वाची होती, तशी ती रशियासाठी नसतीलही पण हा विषय सरळ झटकून टाकावा असा आणि इतका क्षुल्लकही नव्हता. अफगाणिस्तानमध्ये जे घडते आहे आहे त्याचा उपद्रव रशियालाही होणार आहेच. अमेरिकेच्या युक्रेन आणि तैवान बाबतच्या कठोर आणि आग्रही भूमिकेमुळे सध्या रशिया आणि चीन एकत्र आले असले आणि आभासी चर्चेनंतर त्यांच्यातील मैत्री घट्ट झाली असली तरी चीन आपल्या वरचढ ठरू नये ही रशियाची आंतरिक इच्छा उरली नाही, असे नाही. त्याचबरोबर चीन आणि रशियामधले सीमावादही संपलेले नाहीत. पण पॅसिफिक महासागरात ॲाकुसच्या म्हणजे अमेरिका, युनायटेड किंगडम (ब्रिटन) आणि ॲास्ट्रेलिया यांच्या होत असलेल्या आणि होऊ घातलेल्या संयुक्त सैनिकी हालचाली, चीनबरोबर रशियाचीही चिंता वाढविणाऱ्या आहेत. त्याचप्रमाणे अमेरिका, भारत, जपान आणि ॲास्ट्रेलिया यांचे संघटन म्हणजेच क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॅाग, म्हणजे क्यूएसडी किंवा क्वाड याची संकल्पित सुरक्षा तसेच सहकारविषयक भूमिका; दुसरे म्हणजे यांचा मुक्त आणि खुल्या इंडोपॅसिफिक महासागराबाबतचा आग्रह आणि तिसरे म्हणजे पूर्व तसेच दक्षिण चिनी समुद्रात संचारस्वातंत्र्याचा पुरस्कार ह्या बाबींमुळे चीनचा तर नुसता जळफळाट झाला आहे. दक्षिण चिनी समुद्रातील बेटांवर आणि या समुद्राला लागून असलेल्या देशांच्या भूभागावर चीनने हक्क सांगितला आहे. चीन आणि तैवान यांच्यातील वाद तर विकोपालाच गेला आहे. अमेरिका, नाटो आणि जपानने तैवानची बाजू घेतली आहे आणि चीनमधील मानवीहक्कहननाचा निषेध केला आहे. तिबेटच्या स्वायत्ततेचा विषयही अमेरिकेच्या विषयसूचीत येताना दिसतो आहे. इकडे लडाखक्षेत्रात सीमारेषेबाबत आडमुठी भूमिका घेत चीनने सैन्याची आणि शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव केली आहे. भारत सदस्य असलेल्या क्वाडकडे पाहण्याची रशियाची भूमिकाही चीनप्रमाणे प्रतिकूलच राहिलेली आहे. इस्रायल, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिका यांच्यासोबतही भारत पश्चिम आशियातील क्वाडमध्ये सामील आहे. रशियाला ही आघाडी आपल्या विरुद्धच्या एशियन नाटो सारखीच वाटते आहे. त्यामुळे रशियाही भारतावर नाराज असणार, हे ओघानेच येते. तरीही पुतिन भारतभेटीवर आले आहेत, हे महत्त्वाचे. एकीकडे अमेरिका आणि युरोप तर दुसरीकडे रशिया आणि चीन या वादात भारत आपल्या बाजूने असावा निदान तटस्थ तरी रहावा, असे या दोन्ही गटांना वाटणार यात शंका नाही. अशा परिस्थितीत 70 वर्षांच्या मैत्रीची आठवण ठेवीत आणि तशी भूमिका घेत पुतिन भारतभेटीवर येऊन गेले आहेत. यात भारताला चुचकारण्याचा रशियाचा हेतू तर नसेल ना? भेटीगाठी आणि ठराव परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचा भर अफगाणिस्तानविषयक प्रश्नांवर होता. अफगाणिस्तानमधील घडामोडींचे परिणाम केवळ त्या देशाला लागून असलेल्या देशांपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर ते संपूर्ण मध्य आशियावर परिणाम करणारे ठरतील, हा त्यांनी समपदस्थासोबत चर्चेसाठी निवडलेल्या मुख्य मुद्यांपैकी एक होता. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लडाखमधील चिनी घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे भारताच्या संरक्षणसिद्धतेची निकड व कोविड-19 चा प्रलय हे मुद्दे रशियन संरक्षणमंत्र्यासोबत चर्चेसाठी प्रामुख्याने निवडले होते. 2+2 डायलॅागच्या अगोदर एक अतिशय महत्त्वाची बैठक झाली, तेही विसरून चालणार नाही. इंडिया-रशिया इंटर-गव्हर्मेंटल कमीशन ॲान मिलिटरी ॲंड मिलिटरी-टेक्निकल कोॲापरेशन ची ही 20 वी बैठक होती. या बैठकीत 2021 ते 2031 अशा दीर्घ मुदतीचा करार झाला. हा करार मुख्यत: सैनिकी तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणविषयक सहकार्याशी संबंधित आहे. यानंतर दुसरा जो महत्त्वाचा करार झाला तो आहे उत्तरप्रदेशातील अमेठी येथे 5 हजार 124 कोट रुपये किमतीचा, 6 लक्ष एके-203 ॲसॅाल्टरायफली तयार करण्याबाबतचा. लांब पल्याच्या, कमी वजनाच्या, नाईट व्हिजन असलेल्या, मिनिटाला 600 गोळ्या झाडू शकणाऱ्या, कोणत्याही ऋतूत वापरता येतील अशा, गरजेनुसार ॲाटोमॅटिक किंवा सेमीॲाटोमॅटिक रूप धारण करू शकणाऱ्या या बहुगुणी रायफलींच्या निर्मितीचा हा भारत 50.5 % व रशिया 49.5 % सहभाग असलेला संयुक्त प्रकल्प असणार आहे. यामुळे भारतीय सैन्यदलाच्या मारकक्षमतेत प्रचंड वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जटिलस्वरूप पुतिन यांचा हा कोरोना काळातला दुसरा विदेश दौरा होता. एकमेकांच्या देशांना आलटून पालटून भेट देऊन परस्परहिताच्या प्रश्नांवर तसेच जागतिक प्रश्नांवर आणि परस्पर सहकार्यावर चर्चा करायची असे 2000 सालीच ठरले होते त्यात कोरोना काळातही खंड पडलेला नाही. या दौऱ्यानंतर लगेचच पुतिन यांची अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासोबत आभासी चर्चा झाली आहे. हे महत्त्वाचे. सध्या रशियासोबत चीन आणि चीनसोबत पाकिस्तानही असणारच. चीन आणि पाकिस्तान हे आपले शत्रू आहेत. पण रशिया मात्र आपला 70 वर्षापासूनचा मित्र आहे. ही मैत्री आपण कायम ठेवू इच्छितो अशी खात्री तर पुतिन यांना या भेटीच्या निमित्ताने द्यायची नसेल ना? अमेरिका आणि युरोपीयन युनीयन, चीन आणि रशिया या दोघांच्याही विरोधात गेल्यामुळे त्यांना एकमेकाशी जुळवून घेणे भाग आहे. अशा परिस्थितीत रशिया ज्येष्ठतेच्या अधिकाराने चीनला भारताशी जुळवून घेण्यास सांगू शकतो. भारताने या वादात तटस्थ राहणे ही तशी चीनचीही गरज आहेच. भारत आणि चीन यांच्यातील पुढच्या चर्चेच्या वेळी चीन समजुतदारपणे वागतो किंवा कसे, हे पाहून काही अंदाज बांधता येतील. भारत एकाचवेळी अमेरिका, रशिया, इस्रायल, अरब जगत आणि असे इतर अनेक यांच्याशी स्नेहाचे संबंध राखून आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणातला हा गुंता मेंदूला मुंग्या आणणारा आहे. सोव्हिएट युनीयनचे विघटन झाल्यानंतर स्वतंत्र झालेल्या अनेक देशांना नाटोने आपल्याकडे वळविले आहे. रशियाने क्रिमिया गिळंकृत केला आणि युक्रेनवरही आक्रमण करण्याची जय्यत तयारी केली. कदाचित युक्रेन आणि जॅार्जिया यांनी नाटोत सामील होऊ नये, एवढाच मर्यादित उद्देश रशियाचा असू शकेल. पण सर्व शक्यता गृहीत धरून उत्तरादाखल अमेरिका आणि युरोपीयन युनीयन यांनी रशियाची आर्थिक आणि व्यापारी कोंडी केली आहे. रशियन उर्जाक्षेत्रातील दिग्गज आयगोर सेशिन यांना आपल्याबरोबर भारतभेटीसाठी पुतिन यांनी विनाकारणच आणले असेल का?. शस्त्रास्त्रांचा सर्वात जास्त पुरवठा भारताला भारताइतका शस्त्रास्त्रांचा पुरवठा रशियाने इतर कोणत्याही देशाला केलेला नाही. एस-400 ही जमिनीवरून आकाशात डागता येणारी 5 बिलियन डॅालर किमतीची, जमिनीवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येईल अशी, क्षेपणास्त्रप्रणाली आहे. ही क्षेपणास्त्रप्रणाली भारताने रशियाकडून खरेदी करू नये. असे केल्यास अमेरिका निर्बंघ लावील अशी धमकीही अमेरिकेने देऊन पाहिली होती. पण चीनला वेसण घालायची असेल तर भारताची गरज भासणार असल्यामुळे या प्रकरणी अमेरिका ताणून धरणार नाही, असे दिसते. अशा 28 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे ही घटना जगभरातील महत्त्वाची बातमी ठरली आहे. कुणी सांगावे, उद्या एस-500 विकत घेणारा पहिला देश भारत असू शकेल? यावेळी विज्ञान, तंत्रज्ञान, नवकल्पना (इन्नोव्हेशन) आणि शिक्षणक्षेत्रांतही सहकार्याचे करार केले गेले, बौद्धिक संपदा, सैनिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील 1994 साली केलेल्या कराराची मर्यादा 2031 पर्यंत वाढविण्यात आली, हे तर विशेषच म्हटले पाहिजे. समुद्र किनारी आणि खोल समुद्रात खनीज तेल आणि नैसर्गिक वायू यासाठी शोधमोहीम सुरू करण्यासंबंधी करार करण्यात आला. भारताची नैसर्गिक वायूची गरज भागविण्याचे दृष्टीने हा करार महत्त्वाचा मानला जातो. सांस्कृतिक व कलाक्षेत्र, अवकाश संशोधन, अवकाशातील आणि भूपृष्ठावरील शोधकार्यासाठी उपग्रहाचे प्रक्षेपण, व्हॅलिडोस्टॅाक येथे स्वतंत्र व्यापारी कार्यालयाची उभारणी, आरोग्यक्षेत्र, सायबर हल्ल्यांचा प्रतिबंध, उर्जाक्षेत्र, पोलादाचे उत्पादन यासारख्या विषयांबाबतही करार करण्यात आले आहेत. या शिवाय आणखी एक महत्त्वाची बाब ही आहे की, रशियाने तंत्रज्ञान हस्तांतरण (टेक्नॅालॅाजी ट्रान्सफर) करण्याची तयारी दाखविली आहे. सामान्यत: जागतिक बाजारात यासाठी कुणी फारसे तयार नसते. झिजलेल्या सुट्या भागांच्या जागी नवीन भाग वेळेवर न आल्यामुळे(यामुळे) कामे अडून बसायची. ती ती उपकरणे, अस्त्रे विशेषत: विमाने वापरता येत नसत. किंवा वापरल्यास धोका संभवत असे. नव्हे बरेच अपघातही झाले आहेत. यापुढे सुटे भाग वेळेवर उपलब्ध होणार आहेत. प्रत्यक्षात असे झाले तर तीही मोठीच उपलब्धी ठरणार आहे. असे अनेक सर्वसमावेशी आणि सर्वस्पर्शी करार या भेटीत आकाराला आले आहेत. भारत आणि रशियातील मैत्रीचे संबंध गेल्या 70 वर्षात सतत वृद्धिंगत होत आहेत, ते पुढेही तसेच वाढत आणि विकसत होत राहतील अशी उभयपक्षी ग्वाही व्यक्त झाल्यानंतरच पुतिन यांनी मायदेशी प्रयाण केले.

No comments:

Post a Comment